नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)

*****

ललित

नातीगोती- (ब्रह्मघोटाळा या आगामी कादंबरीतील एक वगळलेलं प्रकरण - भाग २)

लेखक - ज्युनियर ब्रह्मे

काका-काकूंच्या भांडणात जसा बंगाल या श्वशुरगृहाचा उल्लेख अटळ तसं बाबा-आईंच्या भांडणात माझ्या सावंतवाडीच्या बंडामामाचं नाव हटकून येतं. सावंतवाडीचा वीरप्पन असं स्वतःला म्हणवून घेणारा हा मामा मला कधी रिकामा दिसलेलाच नाही. कायम, जय-विजयसारखे दोन हवालदार सोबतीला घेऊनच फिरत असतो, पण तरीही आईला त्याचं कौतुक फार. तिला वाटतं, सरकारनं त्याच्या संरक्षणासाठी पोलिस दिलेयत म्हणून.

ब्रह्मेवाडा - तिसरा मजला - बाबांची खोली
पात्रं - बाबा आणि आई.

आई : हे काय? इतक्यातच परत आलात? आणि पिशवी रिकामी?
बाबा : मग? नेताना रिकामी नेली होती म्हणून आणतानाही रिकामी आणली.
आई : काय बाई हे! अहो, पण तुम्ही मंडईत गेला होता ना?
बाबा : हे बघ वत्सले, माणूसपण पृथ्वीतलावर या पिशवीसारखा रिकामा येतो आणि रिकामा जातो. भाजी-फळं हा त्याच्या आयुष्यातला किरकोळ बाजार आहे.
आई : आता दारूपण मिळायला लागली का मंडईत? की भाजीवाल्यांना बघूनच चढते?
बाबा : तू काहीतरी आणायची भुणभुण करत होतीस म्हणून घरी न बसता मंडईत जाऊन बसलो. म्हटलं तेवढीच हिरवळ!
आई : आणि काहीतरी आणायला सांगितलं होतं ते विसरलात…
बाबा : विसरेन कसा? गवारीची का कसलीतरी जुडी आणायची होती. चांगलं ध्यानात आहे.
आई : गवार नव्हे मेथी! माझ्या कर्मा! एक भाजी आणायला सांगितली की ह्यांची सतरा नाटकं. आमचा बंडा बघा, नुसतं भा म्हटलं की भाजी तोडून आणतो.
बाबा : थापा मारू नकोस. मागच्या सुट्टीत तुझ्या माहेरी गेलो होतो तेव्हा भा म्हणाल्याबरोबर भाऽऽगो, पोलिस आया असं म्हणत पळाला होता.
आई : ते पळायची प्रॅक्टीस असावी म्हणून. नाहीतर आमचा बंडा कधी पळालाय का?
बाबा : ते ही खरंच म्हणा. पळायचा त्रास नको म्हणून एसटीच्या टपावर बसून पळाला होता. आळशी लेकाचा!
आई : आळशी? त्याच्यासारखा कामाला पहाड असलेला माणूस पाहिला नाही मी अजून. अरे बंडू, जंगलात जातोस का, इतकंच विचारलं तरी सगळं कळतं हो त्याला.
बाबा : तेवढं तर आपल्या दारात बांधलेल्या बकरीलापण कळतं. पण आहे का काही उपयोग?
आई : काही नको बकरीचं कौतुक. आमचा बंडू बघा, हत्तीचे दात काढायला गेला तरी बहिणीच्या आठवणीनं वाटेत येताना शेतातली मेथी खुडून आणतो.
बाबा : कोकणात कुठं मेथी उगवते गं? आणि तुझा हा कौतुकाचा भाऊ काय कोल्हापूरात जाऊन हत्तीचे दात पाडतो का?
आई : बघा, बघा. मेथी मिळत नाही अशा ठिकाणीपण बहिणीसाठी मेथी शोधून आणतो.
बाबा : मोठ्या गुणाचा तुझा भाऊ. नशीब की भाऊबीजेला हा असला पाला ओवाळणी म्हणून घालत नाही.
आई : म्हणजे तुम्ही तोंडाला पानं पुसता तसं का?
बाबा : ते बरं. तुझा भाऊ चुना लावतो ते? मागं एकदा मला हस्तिदंत म्हणून खडू दिला होता त्यानं.
आई : काहीतरी बदनामी करू नका माझ्या भावाची. सावंतवाडीच्या प्राणीजगतात दहशत आहे हो त्याची. जंगलातले सगळे हत्ती माझा भाऊ येतोय म्हटल्यावर कवळ्या लावून फिरतात म्हणे.
बाबा : हत्तींनापण फसवायला तुझा भाऊच बरा सापडतो गं.
आई : बंडूला फसवत नाहीत ते, बंडूला घाबरूनच त्यांचे दात ढिले होतात.
बाबा : दात ढिले होतात? म्हणजे परवा पोलिसांनी त्याचे मणके ढिले केले होते तसे?
आई : काहीतरी बरळू नका. तो निव्वळ गैरसमज झाला होता पोलिसांचा.
बाबा : अगं, चोरासारखा चोर पकडला ह्यात कसला आलाय गैरसमज?
आई : बातमी नीट वाचली होतीत का तुम्ही? की पेपरमधल्या जाहिरातीतल्या बायकाच बघत बसता नुस्ते?
बाबा : बंडाला पकडलं ह्या आनंदात डोळे भरून आल्यानं काही वाचता आलं नाही मला त्या दिवशी.
आई : तेच! जळता माझ्या गुणी भावावर! अहो, बातमीत स्पष्ट लिहिलं होतं - खोट्या हस्तिदंताची विक्री करताना अट्टल भुरटा पोलिसांच्या जाळ्यात.
बाबा : मग? गैरसमज कसला आहे यात? तो भुरटा आहे हा की अट्टल आहे हा?
आई : अहो, खोटा हस्तिदंत विकला त्यानं. मग यात कसला गुन्हा झाला, सांगा बघू? उगा खोटा आळ आणला हो गरीबावर.
बाबा : तुझ्या ह्या अजब न्यायानं अख्ख्या जगात हा गुणी बाळ एकटाच निर्दोष असणार.
आई : आहेच्च तसा तो.
बाबा : तो तुम्हा सगळ्यांना शेंड्या लावतो आणि तू मला. तुझा भाऊ फक्त मंडईतली भाजी चोरणारा भुरटा चोर आहे. बाकी हस्तिदंत वगैरे सगळं झूट.
आई : तो भाजीतरी आणतोय ना? तुम्ही बघा, मंडईत गेलात तर रिकामी पिशवी घेऊन येता.
बाबा : तुझ्या भावासारखा खडू विकत फिरत नाही मी.
आई : तो काहीही विकत असला तरी थोडेतरी हातपाय हलवतो ना? तुम्हां भावांसारखं आयतं बसून खात नाही काही.
बाबा : आम्ही आयतं बसून खातो? मग विद्यापीठात कोण माझा सासरा जातो का?
आई : जाऊनतरी करताय काय तुम्ही? गणिताच्या मास्तरणीबरोबर गुलूगुलू गप्पाच मारताय ना?
बाबा : मास्तरीण नाही, प्रोफेसर आहे ती. आणि गप्पा मारत नाही आम्ही, जीवनातली अवघड प्रमेयं सोडवायचा प्रयत्न करत असतो. तुझ्या सात पिढ्यांत तरी कुणी विद्यापीठात गेलंय का?
आई : आमचा बंडू नव्हता का गेला?
बाबा : विद्यापीठातलं चंदनाचं झाड चोरायला गेला असेल.
आई : विद्यापीठात चंदनाचं झाड आहे तरी का? उलट सगळ्या बायका तुम्हालाच चंदनाचं खोड समजून उगाळतात. मुलं झाली तरी मूळ स्वभाव जात नाही.
बाबा : तू मुद्द्याचं बोल. मूळ विषयाला सोडून बोलायची तुमची खोड काही जात नाही.
आई : मेथी आणलीत?
बाबा : नाही. तू कधी सांगितलं होतंस?
आई : सकाळी. तुम्ही आंघोळ करून शिट्टी वाजवत भांग पडत होतात तेव्हा.
बाबा : काहीतरी बरळू नकोस. सकाळसकाळी तुझ्याशी एक शब्दही बोलत नाही मी कधी.
आई : तुम्ही बोलला नाहीत हो. पण तुम्हाला चहा देताना मी सांगितलं होतं. पण तुमचं लक्ष पेपरातल्या जाहिरातींतून बाहेर आलं तर ना?
बाबा : डोळे तुझ्याकडे नसले तरी कान तुझ्याकडेच होते. तू एकाचवेळी कान आणि जिभेवर अत्याचार करत असतेस म्हणून त्यावर उतारा म्हणून जाहिराती बघून डोळ्यांना तेवढंतरी सुख द्यावं लागतं.
आई : पेंड्या सोडू नका. ऐकलंत की नाही ते सांगा.
बाबा : तू असं काहीही सांगितलं नाहीएस.
आई : खोटेपणाची हद्द झाली. मी अगदी स्पष्ट तुम्हांला मेथी आणा म्हणून सांगितलं होतं.
बाबा : काय भरतनाट्यम्‌ करून सांगितलं होतंस का?
आई : तुमचं लक्षच नसतं हो कुठं. तुम्हांला चहा देताना मी काय गाणं म्हणत होते ते ऐकलं का?
बाबा : कानावर आदळलं असेल, पण ऐकलं नाही.
आई : तेच ते. मी काय गाणं म्हणत होते? तर.. अन् राया मला हिर्वीगार मेथीची पेंडी आणा…
बाबा : असं गाणं म्हणून कधी सांगतात का? उद्या भोपळा आणायचा असला तर 'भोपळा गं बाई भोपळा, मल्ला हव्वाय पावशेर भोपळा…' असं गाणं गाशील का?
आई : तुमच्याशी सरळ बोलले तर उत्तर कुठं देता? म्हणून गाण्यातनं सांगितलं.
बाबा : ठीकाय. आता मेथी मिळाली तर आणतो. पण काय गं, मेथीच कशाला पाहिजे तुला?
आई : अहो, सकाळच्या गाडीनं बंडू पुण्यात येतोय असा बाबांचा फोन आला होता. त्याला मेथी पराठे करून खायला घालणारेय.
बाबा : बायका कशाचं कौतुक करतील याचा खरंच काही नेम नाही.
आई : तुमचं नाहीत करत? आणि काय हो, काय कौतुक न करण्यासारखं काय आहे माझ्या भावात?
बाबा : अगं, तो पुण्याला येतोय म्हणजे, बंडूसाहेबांची बदली झालीय येरवड्याला.
आई : आं!
बाबा : आता म्हणा गाणं :
निळीनिळी छान
पोलिसांची व्हॅन
बंडूची होईल आता धुलाई छान…

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)