चहा
तर मी हल्ली चहा प्यायला शिकल्ये. अर्ल ग्रे प्रकारचा चहा, त्यात कॉफी क्रीमर घालून पिते. कॉफी क्रीमरची एक कुपी कपात रिकामी करायची, अर्ल ग्रेची एक पुडी कपात सोडायची, वरून उकळतं पाणी सोडायचं. पाच मिनीटांनी चहा प्यायला सुरुवात करायची.
आता अर्थातच चहाप्रेमी 'य'वी बाजू-लोक येऊन "ई, चहात कॉफी क्रीमर कसलं घालायचं", "चहात दूध घालणं हा नीचभ्रूपणा" वगैरे ढोस सुरू करतील. या लेखाच्या सुरुवातीला केलाय तसलाच -
How British colonialism ruined a perfect cup of tea
तर माझं असं म्हणणं आहे की चहा म्हणजे डॉ. पेपर किंवा कोक नव्हे की सगळ्यांनी एकाच चवीचं पेय प्यावं. तुम्हाला जसा आवडतो तसा चहा खुशाल प्या. चहाचं सपाटीकरण करण्याची गरजच काय!
मागे एक मित्र, मोगऱ्याच्या फुलांचा चहा करता का, असं विचारत होता. त्यात मी तरी चहा, दूध, आलं, असले काहीही प्रकार घालणार नाही.
चहा हा शब्द प्रेमासारखाच घासून गुळगुळीत झालाय. आईवर प्रेम, विज्ञानावर प्रेम, बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडवर प्रेम, रक्तवारुणीवर प्रेम आणि मांजरीवरही प्रेम ... आणि "खुद से प्यार जताऊं"सुद्धा आहेच. तसंच चहाचं. त्या लेखाच्या लेखकाला आणि बहुतेकशा चहाप्रेमींना हे समजत नाही की चहा या नावाखाली फार निरनिराळी पेयं पाजली, प्यायली जातात. दोन्ही पेयांना चहाच म्हणत असले तरीही अर्ल ग्रे निराळा आणि अमृततुल्य निराळा; शुगेऽऽर क्यूब्ज जिभेखाली ठेवून घोट घोट पित प्यायचा इराणी चहा आणखी निराळा; नारळाचं दूध घालून पिण्याचा थाई चहा आणखी निराळा.
पण "आरोग्यास चांगलं" म्हणून जे विकलं, दाखवलं जातं त्याला चहा म्हणू नये. त्याला आरोग्यवर्धक पेय म्हणावं. आणखी काय वाटेल ते नाव द्यावं. कॉफी, वारुणी, असल्या आवडत्या पेयांचे आरोग्यासाठी फायदे वगैरे बडबड कानावर आली की माझा संतापसंताप होतो. निव्वळ आनंदासाठी पिऊ द्या की काहीतरी भोसडीच्यांनो!
मूर्खान्न
मारी हे मूर्ख बिस्कीट आहे
खरं तर इथे एक संपूर्ण निबंध लिहिता येईल.
बॉनबॉन नावाची बिस्किटं सर्वात हुशार असतात. अर्थातच. पण घरी वडलांनी बनवलेल्या नानकटायांना अधिक इमोशनल इंटेलिजन्स असतो, त्यात वडलांचं प्रेमही असतं ना! आईच्या हातची चकली, चितळ्यांची बाकरवडी, 'टेढा है पर मेरा है' कुरकुरे, वाण्याच्या दुकानातल्या बरणीत भरलेले सुटे टोस्ट यांमुळे स्मरणरंजनी न्यूरल नेटवर्क उद्दीपित होतं, त्यामुळे त्यांचीही किंमत अधिक. मग यांची कत्तल कशी करावी! हिंसा टाळावी म्हणून मांसाहार न करणाऱ्यांनी हे सगळे पदार्थ खाणंही बंद करावं.
मारीला मात्र चव ना ढव. पुठ्ठा खाल्ला काय आणि मारी खाल्लं काय, काहीही फरक पडत नाही. पुठ्ठ्याला भावना नसतात, आपल्या भावना पुठ्ठ्यात अडकलेल्या नसतात, घरच्या मांजरीत अडकलेल्या असतात तशा. मग मारी बिस्किट दणकून खावं.
शिवाय मारीचे कोणीही चाहते नसतात. मारीला गायीसारखे संरक्षक नसतात. मारीमुळे कोणाच्याही भावना दुखावत नाहीत. मारी मूर्खान्न असलं तरीही खुशाल खावं.
मारी चहात फार वेळ बुडवल्यामुळे चहात पडत नाही. चहाची चव बदलत नाही. मारी स्वतः फार चहा पीत नाही. पोळीही चहा पीत नाहीच, पण पोळीसोबत आईच्या, बहिणीच्या, बायकोच्या प्रेमाची गोलाईसुद्धा येते. मारीच्या गोलाईला असा काहीही आधार नाही.
मारी खावं. चिकार मारी खावं. मारी खाल्ल्यामुळे मार खावा लागत नाही.
दे टाळी
दे टाळी शुचि! वरच्या मारी मूर्खान्न वगैरे प्रतिक्रिया वाचल्या आणि लॉगिन केल्याशिवाय रहावलं नाही! देवा, या अज्ञानी मानवाना क्षमा कर. त्याना मारी कसं खावं ते समजलंच नाही त्याला ते काय करणार? हाय कंबक्त तूने मारी नीट खायाही नही. तर ऐका. एक कप चहा घ्यावा, दूध/साखर घालून, पण आलं नको. साखर अर्धा चमचा जास्तच घालावी. अर्धा कप चहा जिभेला चटके देत प्यावा. तोपर्यंत तो पुरेसा गार / पुरेसा गरम, मारीला योग्य असा "गोल्डीलॉक्स" तपमानाला आलेला असतो. मग त्यात ४ ते ६ मारी बिस्कीटांची चळत टाकावी. ती चळत चहा शोषून घेते ते पहावं. चार पाचदा हा "मारी सेरेमनी" केल्यावर किती चहा उरल्यावर बिस्किटांची आहुती टाकावी याचं बरोब्बर जजमेंट येतं - जवळजवळ सगळा चहा मारी पिउन घेतात पण वरच्या बिस्किटाचा मधला भाग काही कोरडा रहात नाही. मग चमचा घेउन केक खावा तशी ही मारींची चळत खावी. तुम्हाला मारीचा फ्लेवर येत नसेल तर दुर्दैवाने या जन्मातलं हे तुमचं न्यून तुम्हाला जन्मभर वागवण्याला काहीही पर्याय नाही. काही जणाना तालाचं ज्ञान नसतं तसं हे एक अज्ञान. कधी बदल म्हणून उगाच त्या चळतीत एखादं ग्लूको नाहीतर ब्रिटानिया नाईस घालावं. अहाहाहाहाहा.... आणि म्हणे मारी मूर्ख बिस्किट आहे. खाता येईना तर म्हणे मारी वाईट :-P
ता.क. - तरी हे परवडलं. मागे एकदा मेघनाने आमटीबद्दल अनुद्गार काढले होते. साक्षात आमटीबद्दल??? छ्या :-)
हत्तिच्या मारी
मारी हे महा बोअर बिस्कीट आहे. एकतर बव्हांश ममव कपांमध्ये ते सबंध घुसत नाही. दोन म्हणजे त्यासाठी त्याचा थोडासा तुकडा तोडावा तर चहासाठी वखवखलेल्या जिभेचा भलताच्च रसभंग होतो. कडक चपाती तिच्यायला.
चहात बुडवूनही काही फार खास लागेल असं काही नाही. उगीच स्वस्त बिनचवीचं आणि हॉस्पिटलात जाताना न्यायचं- थोडक्यात व्यक्तिमत्त्वहीन हे माझं मारीबद्दलचं मत आहे. लहानपणी हॉस्पिटलांत लोक फक्त तेच खाताना बघून वाटायचं की कायतरी रोग झाले (तरच) हे बिस्कीट खायचं असतं म्हणे.
अवांतर: हा व्हिडीओ पहा
अर्ल ग्रे
अर्ल ग्रे हा महान चहा आहे. टोटल फॅन. त्याचा वास (तोच तो अरोमा ई. प्रत्येकाने आपापले उच्चभ्रू/नीचभ्रू शब्द वापरावेत) मला एकदम नॉस्टॅल्जिक करतो. अमेरिकेत आलो तेव्हा हापिसात जे चहा उपलब्ध असत त्यात पहिल्यांदा हाच आवडला.
फ्रेण्ड्स मधे एमिली-रॉस वेडिंग इन्व्हिटेशन्स सीन मधे जो अर्ल ग्रे चा उल्लेख आहे ती चतुर प्रॉडक्ट प्लेसमेण्ट होती की काय असे वाटते आता. सेक्स ॲण्ड द सिटी मधल्या जिमी चू'ज सारखी.
मारीचे उपयोग
चहात बुडवून मारी खायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण् मारीचे आणखीही उपयोग आहेत.
तोंड उघडून, सबंधच्या सबंध मारी बिस्कीट तोंडात ठेवून तोंड मिटता येते की नाही, यावरुन तुमच्या तोंडाची कॅपॅसिटी मोजता येते. त्यानंतर, तोंड बंदच ठेवून, त्या मारी वर, जिभेचा आणि टाळुचा दाब देऊन, दांत न वापरता ते मोडता येते की नाही, ही एक कला आहे. त्याशिवाय, दांत न वापरता एखाद्याचे दमन कसे करता येते, त्याचा तो वस्तुपाठ आहे. किंवा, मारी वर दाब न देता, हळुहळु त्यांत लाळ मिसळून, ते कसे विरघळते, या अनुभवातून, एखाद्याचा, तब्येतीने आणि चवीचवीने कसा थंड सूड घेता येतो, त्याचेही ट्रेनिंग मिळते.
मारी
च्यामारी मधला मारी वापरला फक्त, अन च्या गौरान भाषेत म्हणजे चहा. चहा बरोबर खाल्ला तर चहा-मारी, नै खाल्ला तर च्यामारी.
चहा वर किती तरी साहित्य आहे (वर सांगितल्या प्रमाणे), मला भावलेलं एक...
चहा म्हणजे उत्साह..
दारू म्हणजे स्टाईल..!
चहा म्हणजे मैत्री..
दारू म्हणजे प्रेम..!!
चहा एकदम झटपट..
दारू अक्षरशः निवांत..!
चहा म्हणजे झकास..
दारू म्हणजे वाह मस्त..!!
चहा म्हणजे कथा संग्रह..
दारू म्हणजे कादंबरी..!
चहा नेहमी मंद दुपार नंतर..
दारू एक धुंद संध्याकाळी.!!
चहा चिंब भिजल्यावर..
दारू ढग दाटुन आल्यावर.!
चहा = discussion..
दारू = conversation..!!
चहा = living room..
दारू = waiting room..!
चहा म्हणजे उस्फूर्तता..
दारू म्हणजे उत्कटता..!!
चहा = धडपडीचे दिवस..
दारू = धडधडीचे दिवस..!
चहा वर्तमानात दमल्यावर..
दारू भूतकाळात रमल्यावर..!!
चहा पिताना भविष्य रंगवायचे..
दारू पिताना स्वप्न रंगवायची..!!
(कावळ्याच्या मुळ्याच्या चहाला नावं ठेवणाऱ्याच्या नानाची टांग)
('न'बा ह्या वनस्पतीच्या मुळ्या असतात हो)
मारीकडून धागा हाइज्याक
मारीकडून धागा हाइज्याक होताहोता टूच्चेश यांनी परत चावर आणला पण दालूशी तुलना करून नवीनच पेटारा उघडला.
ब्रिटिशांनी चहा बिघडवला का माहित नाही पण वरच्या थरातल्या कोणी आपल्याला आमंत्रण दिलं आहे याची धन्यता मानायला अंडरडॅाग्जना शिकवलं. जपानमध्येही टी सेरमनिमध्ये तेच अपेक्षित होते. बाकी टपरीवर यापेक्षा चांगला चहा मिळतो का हा प्रश्न फारच गौण असतो.
गावाकडचा च्या
गावाकडं चक्कर झाली कि च्या ला या म्हणणारे लै भेटतात अन दूध कम शक्कर जादा वाली डुळूकपाणी च्या पाजवतात तेंव्हा पळून जावंस वाटत. बाकी भात्यावरची च्या लै भारी, एका सीटिंग मध्ये चार-चार कप हाणतो. टीचर ची मी टी अन चेअर अशी फोडच केलीय बाकी. profession नुसार वागावं लागतं
माझ्या एका मास्तरांचा विनोद -२:
संस्कृत विषयाची चेष्टा करणारे माझे एक शिक्षक भगवद्गीतेत चहा, पोहे व ते करण्यासाठी लागणारा "ष्टो" यांचे स्पष्ट उल्लेख आहेत असे पुढील श्लोकाचे उदाहरण देऊन सांगायचे:
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो
मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो
वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्
इथे ओशाळला अर्ल...
अर्ल ग्रे प्रकारचा चहा, त्यात कॉफी क्रीमर घालून पिते. कॉफी क्रीमरची एक कुपी कपात रिकामी करायची, अर्ल ग्रेची एक पुडी कपात सोडायची
बेर्गामोचा तलम सुगंध ल्यालेली चहाची पाने उकळत्या पाण्यात नाहताच उमलून येतात आणि त्या सुगंधाच्या मंद लहरींची जादू... वगैरे वगैरे वाचण्याऐवजी तुम्ही सोडलेल्या पुड्या वाचून तो बिचारा अर्ल त्याच्या कबरीत हेलावून गेला असेल. हे पुडी कुडी, तुझं माहेर कुठलं का असेना, असे धागे स्रवण्यासाठी का तुस्सी तिथे धाडलं होतं!
अर्ल ग्रे ची बदनामी थांबवा!
तुम्ही जाऊन ते मेलं डेली वाचा.
+
बरेच दिवस मरीआई म्हणजेच मेरीमाता असावी, या समजुतीखाली होतो. मरीआई वायली आन् मेरीमाता वायली, हे खूप उशिरा लक्षात आले. (आणि हो, कर्झन वायली वायला आन् लॉर्ड कर्झन वायला, हेसुद्धा. हॅ हॅ हॅ.) (चट्टेरीपट्टेरी पैजाम्याची नाडी मिळणार नाही.)
मल्याळी किरिस्तांवांतील मरीअम्मा मात्र मेरीमाताच असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)
तुमच्याकडे...
...नाडी असलेला चट्टेरीपट्टेरी पैजामा आहे काय हो?
नाही म्हणजे, अलीकडेच 'ऐसी'वर असले विनोद करणाऱ्यांना चट्टेरीपट्टेरी पैजाम्याच्या नाडीने टांगण्याचा फतवा निघालेला आहे (संदर्भ: खरडफळा.), त्याच्या 'बेनेफिशियरीज़'च्या लाँगलिष्टेत मी आणि थत्तेचाचा यांच्यानंतर आता तुमचा नंबर आहे, म्हणून विचारले.
माझ्या समजुतीप्रमाणे...
... चट्टेरीपट्टेरी असण्याची रिक्वायरमेंट फक्त पैजाम्यापुरती असावी. नाडीला ती लागू नसावी.
पैजाम्याच्या नाडीने आम्हास फाशी लागण्याऐवजी ती नाडीच आमच्या वजनाने तुटण्याची शक्यता आहे.
तो प्रश्न तुमचा नाही. त्यांचा आहे.
(मी तर नाडी पुरविण्यास ठाम नकार देण्याचे ठरविले आहे. म्हणजे, माझ्याकडे चट्टेरीपट्टेरी पैजामा किंवा नाडी दोन्ही तसेही नाहीत, परंतु तरीही.)
समजूत अनाठायी नाही
बरेच दिवस मरीआई म्हणजेच मेरीमाता असावी, या समजुतीखाली होतो
ही समजूत अगदीच अनाठायी नसावी. माझीच एक जुनी प्रतिक्रिया.
अर्धा कप पाणी खळाखळा उकळून
अर्धा कप पाणी खळाखळा उकळून त्यात आख्खा चमचा भरून चहा टाकायचा. रंग फुटायला लागला की साखर टाकायची दीड चमचा, त्यात थोडसं आलं चेचून टाकायचं, मग अर्धा कप दूध टाकायचं. पातेल्यातलं दूध संपलं असेल तर साय खरवडून घ्यायची, त्यातच चहा गाळायचा. कप भरून चहा फुर्र फुरके मारत सकाळी पाच- साडेपाचला 'ज्योती कलश छलके' नाय तर 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असलं काही तरी ऐकत संपवायचा..
मी असला नीचभ्रू चहा पितो..
मसाला दुधाची तिथी जवळ आलीय
मसाला दुधाची तिथी जवळ आलीय म्हणून विचारतो मसाला चहाची कुणी शिफारस कशी केली नाही॥
लहान असताना मळवली - भाजे -कार्ले ट्रिपमध्ये गुळाचा कोरा चहा प्यावा लागला होता तो आठवतो. घरी चहाची सवय होती परंतू बाहेर कधी पिण्याची वेळ आली नव्हती. इकडे मुंबईत कधी कडाक्याची थंडी अनुभवली नव्हती. रात्रीच्या पुणे प्यासिंजरने अडिचला पहाटे मळवली स्टेशनात सहापर्यंत कुडकुडल्यावर चहाच्या शोधात भाजेकडे निघालो॥ कुठे चहावाला दिसेचना. गावात गेल्यावर "मिळेल पण कोरा,गुळाचा." कसातरी गिळला तेव्हा तरतरी आली. थंडी घालवण्याचं पेय हे नक्की.
फजिती झालेल्या गोष्टी पक्क्या आठवतात.
रेल्वे प्रवासातही पहाटे तीन चारला स्टेशनात गाडी थांबली की कधी एकदा चहा मिळतो असे होते. कॅाफीवाल्यांचा सुस्तपणा वाखाणण्यासारखा असतो. मेले ते एकटे दुकटे केटली घेऊन धावणारे चहावाले जेनरलच्या डब्याकडे टोकाला धावतात. रिझव डब्ब्यांकडे येतच नाहीत. चा-उर्फ-तोंडधुवायचे-गरम-पाणी असले तरी त्याशिवाय चैन पडत नाही.
आमच्याकडे बाबाला उठल्या
आमच्याकडे बाबाला उठल्या उठल्या चहा हातात द्यायची सोय नाही म्हणून तो सगळ्यात आधी चहाच आधण गॅसच्या डोंबल्यावर ठेऊन ब्र्श घेऊन टूला पळतो. मग बाहेर आला की स्वतःपुरता गाळून पहिले घशात ओततो कि त्याच इंजिन सुरू. बाकी सकाळी उठून सगळ्यात पहिले चहा ठेवण्याच्या गृहकृत्यदक्षेतचं आपल्याला भारी कवतिक आहे....
बाकी काहीही म्हणा, पण...
... तूर्तास ((त्यातल्या त्यात) परवडण्याजोग्या) चहांत हिरव्या लिप्टनसारखा चहा नाही!
(एके काळी लोपचू होता, परंतु आता तो बहुधा कोणालाच परवडण्यासारखा न राहिल्यामुळे गेली अनेक वर्षे दुकानदार तो ठेवत नाहीत. (कालाय तस्मै नमः।) बाकी, मकाइबाड़ी वगैरे फक्त नाव ऐकून आहे - कधी पिण्याचा योगही आला नाही, आणि आपल्या 'पहुँच'च्या बाहेरची चीज वाटते.)
(बाकी, 'वाघ बकरी दार्जीलिंग'बद्दल कोणी ऐकले आहे काय? होय, असाही प्रकार अस्तित्वात असतो!)
- (तूर्तास लोपचूची तहान हिरव्या लिप्टनवर भागवणारा) 'न'वी बाजू.
(स्पॉयलर अलर्ट: क्वचित्प्रसंगी मी हिरव्या लिप्टनात पावाचा स्लाइस बुचकळून खाऊ शकतो. कारण शेवटी आम्ही इ.इ.)
बाघबकरी नाही पण दार्जिलिंग
बाघबकरी नाही पण दार्जिलिंग चहा माहीती आहे .. पत्ती चहा आहे ना तो ? त्यात अगदी कमी साखर आणि दूध घातले तर अप्रतिम लागतो . वास पण सुंदर आहे त्याचा .
ग्रीन टी मला आवडतो .. आणि आईस लेमन टी सुद्धा मस्त असतो ,
एकूणच कुठल्याही प्रकारचा चहा मला अतीप्रिय आहे . आणि नशीबाने अनेक प्रकारच्या चहाची चव घेता आली.
दार्जीलिंगपुराण, वगैरे…
दार्जिलिंग चहा माहीती आहे .. पत्ती चहा आहे ना तो ? त्यात अगदी कमी साखर आणि दूध घातले तर अप्रतिम लागतो . वास पण सुंदर आहे त्याचा .
हो. अजिबात कडक नसतो. (स्ट्रेंग्थच्या नावाने बोंब.) परंतु, फ्लेवर आणि सुगंध… निव्वळ लाजवाब! Worth its weight in gold. मात्र, पाण्यात उकळायचा नाही. पाण्यात उकळल्यास नको तितका अर्क पाण्यात उतरून अत्यंत कडू आणि भयंकर (उलटी येण्याइतपत) घाणेरडा लागतो. भांड्यात दार्जीलिंगची पत्ती आणि भांड्याखाली विस्तव एकसमयावच्छेदेकरून कधीही असता कामा नयेत. शक्यतो किटलीत दार्जीलिंगची पत्ती घालून त्यावर उकळते पाणी ओतावे. (प्रेफर्ड मेथड.) किंवा, ते शक्य नसल्यास, प्रथम भांड्यात पाणी उकळावे, नि मग विस्तव बंद करून त्यानंतर मगच दार्जीलिंगची पत्ती त्यात घालावी. (सेमाय-घाटी मेथड.) त्यानंतर मग कपात ओतून अगदी थोडी साखर नि नावापुरते (अक्षरशः थेंबभर; रंग बदलण्यापुरते) दूध घालून प्यावा. (‘पहिल्या धारेचा’ असल्यास साखर नि दूध घातले नाही, तरीही चालते.)
बाघबकरी नाही पण दार्जिलिंग चहा माहीती आहे
‘वाघ बकरी’ हा गुजरात्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असा कडक चहाचा (माझ्या लेखी थर्डरेट असा) एक ब्राण्ड आहे. नेहमीच्या यशस्वी कडक चहाबरोबरच त्यांचा एक (इतर दार्जीलिंग चहांच्या तुलनेत बऱ्यापैकी स्वस्त असा) दार्जीलिंग चहासुद्धा मिळतो (हल्ली कोण काय विकेल, सांगवत नाही!); मात्र, ‘वाघ बकरी दार्जीलिंग’ हे वदतो व्याघाताचे उत्तम उदाहरण आहे. (‘हातभट्टीची सिंगलमाल्ट’ म्हटल्यासारखे.)
ग्रीन टी मला आवडतो
माफ करा, परंतु उपरोल्लेखित ‘हिरवा लिप्टन’ बोले तो ‘ग्रीन टी’ नव्हे. ‘हिरवा लिप्टन’ बोले तो पूर्वी ‘लिप्टन ग्रीन लेबल’ या नावाने बाजारात मिळायचा, तो. हल्ली त्याचे नाव बदलले असून ‘लिप्टन दार्जीलिंग’ या नावाने विकतात. काळाच चहा; हिरवा नव्हे. हा तुलनेने जरा बऱ्यातला दार्जीलिंग. Certainly not one of the greatest, but fairly decent, and quite easily available in the market.
आणि आईस लेमन टी सुद्धा मस्त असतो
हो. त्याकरिता फार उच्च प्रतीची वगैरे चहाची पूड लागत नाही, परंतु उन्हाळ्यात अत्यंत छान लागतो. पाण्यासारखा/पाण्याऐवजी हवा तेवढा प्यावा! (मात्र, हिंदूंकरिता ही अक्वायर्ड टेस्ट असावी. प्रथमघोटे जमत नाही.)
यात आणखी एक caveat म्हणजे बिनसाखरेचा (अगोड, unsweetened) पाहिजे. आमच्या दक्षिण संयुक्त संस्थानांत याची एक भयंकर गोड अशी (“sweetened” अथवा सामान्य परिभाषेत “sweet tea”) आवृत्ती मिळते. त्याइतके भयानक लागणारे दुसरे पेय (कदाचित ‘रूट बियर’ नावाच्या आचरट बाळबोध प्रकाराचा अपवाद वगळल्यास) मी आजतागायत प्यायलेलो नाही. मात्र, आमच्या दक्षिण सं.सं.त प्रचंड लोकप्रिय आहे. इतके, की दक्षिणेत जर तुम्ही रेष्टारंटात गेलात, नि आइस्ड टी जर मागावयाचा असेल, तर आवर्जून Unsweetened iced tea (किंवा, सामान्य परिभाषेत, Unsweet tea. व्याकरणशुद्ध इंग्रजी वगैरे गेले तेल लावत!) म्हणून, unवर आघात देऊन सांगावे लागते; अन्यथा, नुसतेच आइस्ड टी म्हटल्यास हमखास गोड चहा पुढ्यात येतो. (इतके सांगूनही चुका करतात, त्या निराळ्या. मग बोंब मारून परत पाठवावा लागतो. तर ते एक असो.) उलटपक्षी, उत्तरेकडील रेष्टारंटांत unsweetened iced tea मागविल्यास, अत्यंत भंजाळलेल्या नजरेने, ‘नाहीतर मग आणखी कसा असू शकतो?’ अशा भावाने आपल्याकडे पाहतात. तर तेही एक असो.
तर असे आहे एकूण सगळे.
त्यातलाच आहे. रावणाने सीतेला
त्यातलाच आहे. रावणाने सीतेला अशोकवनात का ठेवले यामागे काही खास कारण नाही. कुठेतरी ठेवायचे ते अशोकवनात ठेवले. हा तो अशोकवनिका न्याय.
तसेच नोटबंदी ८ नोव्हेंबरला का केली? ती ९ नोव्हेंबर किंवा १० नोव्हेंबर किंवा ८ डिसेंबरलाही करता आली असती. ८ नोव्हेंबरच का याला काही कारण नाही.
चहा नंतर काय???
ह्यावर पण चर्चा हवी, नै तर चहा अधुरा राहतो (भरपूर जणांचा)
गोग्गोड च्या वर पॉईंट २०% ज्यादा चुना लावून गायछाप...त्याची झनक अनुभवत डीपट्रान्स मध्ये जाणे हा लै झ्याक अनुभव है.
कडक १२०-३०० बार असेल तर अतिउत्तम. सिगरेट मात्र च्या बरोबरच घ्यावी.
नाहीतर तोंड आंबट पडायला चालू होतं नाही तर दात सळसळ करायला
मस्त चालू आहे कषायपेय पुराण
लमसा चहा आवडणारे आहे का कोणी ? फ्लेवर्ड चहा आहे हा. लहानपणापासून माझ्या घरी हाच चहा होतो. सपटच्या १ किलो चहात हा लमसा फ्लेवर्ड चहा १/२ किलो अशा प्रमाणात मिसळला कि अप्रतिम आणि थोडीशी वेगळी चव असलेला चहा होतो. सवयीचा परिणाम म्हणून असेल पण मला हा(च) चहा आवडतो. चहा हा विषय 'भेदाभेद भ्रम अमंगळ' असा असला तरी हा लमसा फ्लेवर्ड चहा मुसलमान लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे असे निरीक्षण नोंदवतो. चॉकलेट चहा असे या चहाचे दुसरे नाव फेमस आहे.
दुकानांत पाहिलेला आहे
मात्र, कधी चाखून पाहिलेला नाही.
फ्लेवर्ड चहा - विशेषतः चॉकोलेट-फ्लेवर्ड चहा - कसा लागेल, कल्पना येत नाही. सपटमध्ये मिसळायचा म्हणताय म्हणजे कडक असावा बहुधा, आणि कडक चहाचा मी व्यक्तिशः भोक्ता नाही, त्यामुळे मला कितपत आवडेल ते सांगवत नाही, परंतु तुम्ही आता कुतूहल चाळविलेलेच आहेत, तर पुढेमागे जमेल तसे कधीतरी एकदा तरी ट्राय करेनच म्हणतो.
(सवांतर)
कषायपेय म्हणजे नक्की काय? चहा, की कॉफी?१
की दोन्ही?२
..........
१ दोन्ही प्रवाद ऐकलेले आहेत.
२ अत्र्यांचे 'कषायपेयपात्रपतितमक्षिकेप्रत' ऐकून आहे. मात्र, त्यातून त्या मक्षिकेच्या आत्माहुतिप्रसंगी अत्रे नक्की कशाचे प्राशन करीत असावेत२अ, यांचे नीटसे आकलन किमानपक्षी आम्हांस तरी होऊ शकले नाही. असो.
२अ कपातूनच. ग्लासातून नव्हे.२अ१
२अ१ वस्तुतः, कपातून पिण्याचे किमान एक तरी पेय किमान एका तरी ठिकाणी ग्लासातून(च) मिळते.२अ१अ घराबाहेर. टपरीवर. आणि तेथेच प्रमुखतः मक्षिका याही प्रकर्षाने, प्रादुर्भावाने आढळतात, आणि ग्लासातील त्यांच्या आत्मसमर्पणाची संभाव्यताही तेथे प्रचंड असते. शिवाय, टपरीवर शक्यतो चहाच मिळतो; कॉफी अभावानेच आढळत असावी. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, आत्रेयपेयाची समस्या चटकन सुटली, असे वरकरणी वाटू शकते. मात्र, तसे नाही. अत्रे टपरीवर जात असावेत काय, हा मूलभूत प्रश्न या गहन समस्येच्या मुळाशी आहे. तो सुटल्याखेरीज या समस्येचे समाधान नाही. असो.
२अ१अ पोऱ्याच्या बोटांच्या अर्कासहित.
कषायपेय = भगव्या रंगाचं पेय ?
कषाय - गेरू किंवा भगवा रंग असा काहीसा अर्थ मी वाचला होता. हा शब्द अर्थासाठी विवेकानंदांचं चरित्र वाचत असतांना शोधलेला आठवतो. संन्यास घेतल्यावर स्वामी विवेकानंद आणि त्यांचे इतर गुरूबंधू 'कषायवस्त्र' नेसतात असा उल्लेख होता त्यात ( तेव्हाच 'परिव्राजक' हा आणखी एक शब्द शोधलेला अर्थासाठी असे आठवते).
चहासाठी 'कषायपेय' असा उल्लेख पुलंनी कुठेतरी केलेला वाचला आहे. नक्की संदर्भ आठवत नाहीये.
कषाय वायलं आन् काषाय वायलं.
कषाय वायलं आन् काषाय वायलं.
काषायपेय हे जनरली षायनेस कमी करण्यासाठी 'का षाय?' म्हणत (सहसा सोबतच्या स्त्रीमनुष्यास) देण्याचा प्रघात आहे.
(षायनेस अधिकच कमी करावयाचा झाला तर त्या पेयात इतरही पदार्थ मिसळले जातात. अधिक माहितीसाठी श्री. बिल कॉस्बी यांजषी संपर्क साधणे)
का असू नये?
अमेरिकेत ‘अर्बल टी’ (herbal tea) या नावाने जे विविध भीषण प्रकार मिळतात, त्यांपैकी अनेकांत होमेपदीच्या औषधांत जितके औषध असते, तितकादेखील चहाचा अंश नसतो. (बोले तो, होमेपदीच्या औषधांत निदान मुळात कधी काळी औषध होते, असा (पोकळ) दावा तरी असतो. येथे तेदेखील नसते.) सबब, ‘उकळून पिण्याचा एक काढा’ अशा अर्थाने उपरोक्त प्रकार ‘अर्बल टी’ या प्रकारात घुसडून देण्यास हरकत नसावी.
(नाहीतरी गवती चहात तरी कोठे चहा असतो? तोही एका प्रकारचा ‘अर्बल टी’च म्हणायचा!)
मारी बिस्किटाचा एकमेव सुटेबल
मारी बिस्किटाचा एकमेव सुटेबल उपयोग बहुतेक ह्या मोजमापात 'उगी, अजून चारच सेमी र्हायले' म्हणायला होऊ शकतो.
आलं घालुन, पाणी उकळवायचं आणि
आलं घालुन, पाणी उकळवायचं आणि ते उकळलं की त्यात चहापूड टाकायची. ते नाचरे कण खूप सुंदर मस्त दिसतात. जरा रंग आला न आला की दुध टाकायचं (कारण टॅनिन उतरु नये म्हणुन) मग दुधाचा शुभ्र रंग जाऊन बफदामी रंग येण्यास सुरुवात होते. थोड्या वेळात सर्व मिश्रण उकळलं की शेगडी बंद करुन पातेल्यावरती झाकण ठेवायचं. चहा मुरणे अति मतहत्वाचे. अन्यथा मजा नाही.
या निमित्ताने
वामनपंडितांच्या टी पार्टीची आठवण झाली.
वंशी नादनटी तिला कटितटी खोवोनि पोटी पटी
कक्षे वामपुटी स्वशृंगनिकटी वेताटिही गोमटी
जेवीं नीरतटी तरू तळवटी श्रीश्यामदेही उटी
दाटी व्योमघटी सुरासुखलुटी घेती जटी धूर्जटी ||
चवथी स्कॉलरशिपच्या परीक्षेत या श्लोकात टी हे अक्षर कितीवेळा आले (१७ वेळा) हा प्रश्न हमखास असायचाच....
कम टू थिंक अॉफ इट...
...अधिक चाळले असता, याच धाग्यात वरती श्री. आदूबाळ यांनी अगोदरच डकविलेला आढळला.
निव्वळ आनंदासाठी ___ द्या की
बस्स... क्या बात है. ___ इथे आपापली आवड फिक्स करा.
अवांतर - मला स्वत: चहा हे युनिवर्सल बुडवर वाटत आलेलं आहे. त्यात काहीही टाकून प्यावं, चव वाढते.
पाव , ब्रेड, बिस्कीटं (मारी हे मूर्ख बिस्कीट आहे.), चकल्या, बाकरवड्या, चिप्स(थोड्या तिखट- कारण मग तो तिखटपणा चहाला येतो).