ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता

संकल्पना

ऑडन : संक्रमण, प्रत्यय आणि चार कविता

- - शैलेन

‘ऐसी’च्या संकेतस्थळावर या अंकासाठी केलेल्या आवाहनातले ‘इन्फ्लेक्शन पॉइंट’ आणि ‘संक्रमणकाल’ हे दोन शब्द मनात अधिक ठसले. आपण ज्या जगात वावरत आहोत त्या जगाशी हे दोन शब्द व्यवच्छेदक लक्षण म्हणावेत इतक्या तीव्रतेने बांधले गेले आहेत. पण अर्थातच ही परिस्थिती काही पहिल्यांदाच उद्भवली आहे असे नाही. विसाव्या शतकाच्या जगड्व्याळ इतिहासात ती या आधीही येऊन गेली आहे. अशा परिस्थितींतून वेगवेगळे समाज जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यात होणाऱ्या उलथापालथीला छेद देणारा एक सामायिक विभाजक म्हणजे या काळांत होणारी कलानिर्मिती. कलाकार हे मुळातच ‘अस्वस्थ प्रकृती’चे असतात आणि त्या अस्वस्थतेला ही सामाजिक अथवा राजकीय वातावरणातली अस्वस्थता अधिकच टोकदार करते. कलाकाराला त्याच्या विवक्षित ‘आत्मभाना’तून आणि निर्मिती किंवा सर्जनाच्या उर्मीतून या परिस्थितीवर म्हणूनच भाष्य करावेसे वाटते. अनेक वेळा असेही होते की मूळ कलाकार काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याचा कलात्मक हुंकार अशी परिस्थिती जेव्हा पुनश्च उद्भवते तेव्हा आपल्याला स्पष्ट जाणवतो. हा एक प्रकारचा ‘पुनःप्रत्यय’च म्हणायचा, पण तो ‘हृष्यामि च पुनः पुनः’च्या दैवी पातळीवर नसतो, तर ‘सावध ऐका पुढल्या हाका’ असा सूचनात्मक असतो. या ‘हाका’ ऐकू आल्यावर साहजिकच आपण पुन्हा इथे(च) कसे येऊन पोचलो, असा प्रश्न कुठल्याही संवेदनाशील मनाला पडल्याशिवाय राहत नाही..

विस्टन ह्यू ऑडन हा विसाव्या शतकातला गाजलेला (जन्माने ब्रिटिश, पण नागरिकत्वाने अमेरिकन) कवी — काहींच्या मते तर इंग्लिश भाषेत लिहिणारा या शतकातला ‘सर्वश्रेष्ठ’ कवी! त्याचा कलात्मक ‘आउटपुट’ अर्थातच फार मोठा आहे. कवितांबरोबरच त्याने निबंध, नाट्यगीते, टीकात्मक लेखन हेही खूप लिहिले. आपण ज्या ‘संक्रमणकाला’तून जात आहोत त्याचा विचार करताना या संक्रमणाशी संवाद साधू शकणाऱ्या त्याच्या चार कविता सतत आठवत राहिल्या. हा लेख त्याच कवितांबद्दल लिहिलेला आहे. ‘प्रत्यय’ हे या संवादाचे मुख्य रूप आहे. वाचकांना एक सूचना म्हणजे लेख वाचत असताना, कवितांचे दुवे दिले आहेत, तिथे ती विवक्षित कविता आधी वाचावी आणि मग पुढे लेखाचे वाचन चालू ठेवावे.

ऑडनचे आयुष्य तसे पाहिले तर टिपिकल इंग्लिश मध्यम-मध्यमवर्गीय — त्याचा जन्म यॉर्कमध्ये झाला, आणि शिक्षण वेगवेगळ्या ‘पब्लिक’ (म्हणजे ‘प्रायव्हेट’!) शाळांत झाले. १९२५ साली तो ऑक्सफर्डला जीवशास्त्रात पदवी घेण्यासाठी रुजू झाला, पण दुसऱ्याच वर्षी त्याने विषय बदलून ‘इंग्लिश’ घेतले. भाषेचा लळा त्याला आधीपासूनच होता, आणि पुढच्या आयुष्यातही शब्दांशी खेळण्यातून त्याला मिळणाऱ्या आनंदाची तुलना त्याने लैंगिक आनंदाशी केली आहे! ऑडन उघडपणे समलैंगिक होता, आणि स्वतःची लैंगिकता लपवण्याचा त्याने विशेष प्रयत्न केला नाही. एकोणीसशे विशीच्या उत्तरार्धात ऑक्सफर्डला असताना सेसिल डे ल्युईस, स्टीव्हन स्पेंडर आणि ख्रिस्टोफर ईशरवूड हे पुढे नावारूपाला आलेले इंग्लिश साहित्यकार त्याचे सहाध्यायी होते. यांपैकी ईशरवूडबरोबर ऑडनची विशेष मैत्री जमली, कारण तिला अधेमध्ये लैंगिक रूपही मिळत राहिले.

विशीच्या दशकातच ऑडनची एक प्रतिभावंत कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली. त्या दशकाच्या अखेरीस ऑडनने ऑक्सफर्डची पदवी (थर्ड क्लास) घेतली आणि एकोणीसशे तिशीच्या सुरुवातीला वेगवेगळ्या शाळांत शिकवण्याचे काम काही वर्षे केले. १९३५ साली शिक्षणक्षेत्राला रामराम ठोकून त्याने ब्रॉडकास्टिंगमध्ये करीअर करण्याचा प्रयत्न केला, पण १९३९ साली, युरोपात युद्धाचे ढग जमत असतानाच त्याने अमेरिकेला प्रयाण केले. हा अनेकांच्या दृष्टीने पळपुटेपणाचा प्रकार होता, पण ऑडनने हा आरोप झटकून टाकला. १९३९मध्येच ऑडन चेस्टर कॉलमन या अमेरिकन कवीच्या प्रेमात पडला. हे त्याच्या आयुष्यातले पहिलेच ‘प्रेम’ होते. ऑडनला या नात्यात वैवाहिक जीवनात अपेक्षित असते तशी ‘निष्ठा’ अपेक्षित होती, पण कॉलमनच्या कल्पना लैंगिक स्वैरतेकडे झुकणाऱ्या असल्याने त्यांचे लैंगिक नाते पुढच्या तीन वर्षांतच संपुष्टात आले. तरीही, कॉलमन ऑडनच्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याचा सहचर राहिला. ते दोघे उन्हाळ्यात युरोपात आणि हिवाळ्यात अमेरिकेत न्यूयॉर्कला राहत. १९५६ मध्ये ऑडनला ऑक्सफर्डने ‘प्रोफेसर ऑफ पोएट्री’चा मान दिला, तेव्हा त्याचे उन्हाळी वास्तव्य काही काळ ऑक्सफर्डमध्ये झाले, पण १९५८ साली त्याने ऑस्ट्रियात कर्षष्टेटन इथे एक फार्महाउस विकत घेतले आणि मग तो आणि कॉलमन उन्हाळ्यांत तिथेच राहू लागले. १९७२ साली हिवाळ्यात न्यूयॉर्क सोडून ऑक्सफर्डला राहायचा ऑडनने विचार केला पण १९७३च्या उन्हाळ्यात व्हिएनात एका काव्यवाचनाच्या कार्यक्रमानंतर रात्री अचानक ऑडन मरण पावला. कर्षष्टेटन इथेच त्याला मूठमाती देण्यात आली.

त्याच्या काळातल्या अनेक प्रातिभ आणि मनस्वी कलाकारांप्रमाणे ऑडनचा वैचारिक ओढा ‘डाव्या’ विचारसरणीकडे होता, पण ख्रिश्चन धर्माचा आणि ऑडनच्या वैयक्तिक ‘धार्मिक आत्मभाना’च्या परिणामांपासून त्याचे काव्य अलिप्त राहिलेले नाही. ऑडनच्या काव्याबद्दल अनेक टीकाकार, समीक्षक आणि चरित्रकार यांनी पुष्कळ लिहून ठेवले आहे, आणि त्याची पुनरुक्ती करायचे या लेखात कारण नाही. पण आपण ज्या कविता बघणार आहोत त्यांच्या अनुषंगाने काही ठळक मुद्दे इथे नोंदवण्यासारखे आहेत. पहिले म्हणजे ऑडनच्या कवितेत त्याने विविध ‘घाटां’चा (फॉर्म्सचा) उपयोग केला. त्यात पारंपरिक घाटांबरोबरच मुक्तछंदासारखे नवीन घाटही आहेत. दुसरे म्हणजे ऑडनची शब्दकळा! त्याची शब्दांवर अप्रतीम हुकुमत आहे — मर्ढेकरांच्या उक्तीचा वापर करून म्हण्याचे तर ‘शब्दांच्या तोंडात गच्च लगाम’ घालायची कला त्याला चांगलीच साध्य आहे. पण मर्ढेकरांसारखी त्याची शब्दकळा आक्रस्ताळी होत नाही; ‘तिरडी’, ‘हाडे’, ‘मांस’, ‘रक्त’ अशा तीव्र प्रतिमांचे त्याला वावडेच आहे. तो चपखल, मोजक्या शब्दांतून लख्खकन जाणवेल असा परिणाम साधतो. पु. शि. रेग्यांप्रमाणे काव्यात्म अनुभूतीसाठी नवनवीन शब्द घडवण्याचा सोसही तो करत नाही. साध्या रूपकांतून, कल्पनांतून, आणि प्रतिमांतून ‘ऐहिक’ गोष्टींचे ‘वैश्विक’ स्वरूप उलगडण्याची त्याची किमया अतुलनीय आहे.

विशीच्या दशकाच्या अखेरीस ऑडन आणि ईशरवूड यांनी बर्लिनचा दौरा केला. या दौऱ्याचा आणि त्यांत आलेल्या अनुभवांचा ऑडनच्या साहित्यकृतींवर, आणि एकंदरीत वैचारिकतेवर मोठा प्रभाव पडला. त्या दशकात बर्लिन हे युरोपमध्ये सामाजिक आणि लैंगिक स्वातंत्र्याचे केंद्र गणले जाऊ लागले होते. पहिल्या महायुद्धानंतर कायसरशाही संपून स्थापित झालेल्या प्रजासत्ताकाने जर्मन नागरिकांना पहिल्यांदाच ‘मॉडर्न’ म्हणता येतील असे अभिव्यक्ती-स्वातंत्र्याचे हक्क दिले होते, आणि सरंजामशाहीच्या उच्चनीचतेला वैतागलेल्या शहरी जर्मन लोकांनीही ते वेगवेगळ्या पद्धतींनी राबवायला सुरुवात केली होती. चित्रकला, साहित्य, नाट्य/चित्रपट/छायाचित्रकला अशा कलेच्या सगळ्याच प्रांतांत हा बदल दिसत होता. ब्रिटनसारख्या परंपरावादी देशात राहून जे साध्य होण्यासारखे नव्हते, ते सगळे करायची संधी ऑडनला या बर्लिनवारीतून मिळाली. या काळातच त्याला त्याच्या लैंगिकतेचा ‘आविष्कार’ झाला, आणि ऑक्सफर्ड आणि एकंदरीतच ब्रिटीश सांस्कृतिक वातावरणात या बाबतीत असलेले कोंझेपण त्याने स्वैरतेच्या स्वीकृतीतून झुगारून दिले. १९३०च्या सुरुवातीला ऑडन स्कॉटलंडमध्ये शाळामास्तराची नोकरी करायला परतला पण ईशरवूड बर्लिनलाच राहिला. तिशीच्या दशकात ऑडनच्या बर्लिनवाऱ्या चालू राहिल्या. या काळात, विशेषतः १९२९ मध्ये ‘वॉल स्ट्रीट क्रॅश’ होऊन सुरु झालेल्या जागतिक मंदीनंतर, युरोपात प्रचंड राजकीय ढवळाढवळ सुरु झाली. जर्मनी, इटलीत आत्यंतिक राष्ट्रवादी असलेल्या नाझी आणि फासिस्ट लोकांना सत्ता मिळाली आणि तिथे हुकुमशाही अवतरली. स्पेनसारख्या देशात हुकुमशाहीचा मार्ग यादवी युद्धाच्या रक्तरंजित पावलांनी आखला गेला. युरोपाबाहेरच्या जगातही उलथापालथी झाल्या — चीनवर जपान्यांनी आक्रमण करून तो देश भरडून काढला. या वादळी कालखंडाची परिणती सप्टेंबर १९३९ मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाच्या सुरुवातीत झाली, आणि ते संपल्यानंतरही त्याचे पडसाद अनेक वर्षे जाणवत राहिले. या सर्व घडामोडींचा परिणाम अर्थातच ऑडनच्या कलाकृतींवर झाला आणि होत राहिला.

त्या १९३९च्या सप्टेंबरनंतर साठांहून थोडी अधिक वर्षे उलटून गेल्यावर असा एक सप्टेंबर आला की, आपण आज ज्या काळात जगत आहोत त्याची एक ‘वॉटरशेड मोमेंट’ त्याने मार्क केली. ११ सप्टेंबर २००१ या दिवशी न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेन्टरवर अतिरेक्यांनी पळवलेली विमाने धडकली. स्फोट, आग, हतबल लोकांचे आक्रोश, धुरळ्याच्या प्रचंड ढिगात त्या वास्तूंचे ध्वस्त होणे, हे सगळे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सर्व जगाने अनुभवले. न्यूयॉर्क शहरावर मृत्यूची भयाण सावली पसरली. त्यावेळी अनेकांना ऑडनने लिहिलेल्या ‘सप्टेंबर १, १९३९’ या कवितेची आठवण झाली. या कवितेच्या पहिल्याच कडव्यात आपल्याला न्यूयॉर्कमध्ये एका कोपऱ्यात बसलेला ऑडन दिसतो. शेकडो मैलांवर युरोपात हिटलरने पोलंडवर हल्ला चढवलेला आहे आणि त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये ऑडन दुःखी, चिंताक्रांत, आणि अगतिक झालेला आहे. युद्धाला आता कुठे तोंड लागले आहे, पण ‘सप्टेंबरच्या त्या रात्रीला येणारा अनिर्वचनीय मरणगंध’ त्याला त्रस्त करतो. दुसऱ्या आणि आठव्या कडव्यांच्या अखेरीस ऑडनने सूत्रात्मक पद्धतीने काही ‘सत्ये’ सांगितली आहेत. “ज्यांना पूर्वी दुष्टपणाची वागणूक भोगावी लागली आहे ते लोक इतरांशी दुष्टपणाने वागतात” आणि “आपण सर्वांनी (एकतर) एकमेकांवर प्रेम करावे, किंवा मरून जावे” ही ती दोन सूत्रे. यांच्यातली ‘ख्रिश्चन’ छटा उघड आहे आणि पाश्चात्य नेत्यांनी तसेच इतर साहित्यिकांनी ती वारंवार उद्धृत केली आहेत.

ऑडन जो काव्यात्म परिसर या कवितेत रंगवतो, त्याची प्रतीती ११ सप्टेंबरच्या प्रसंगात पुनःपुन्हा यावी असे काही तपशील या कवितेत डोकावतात. कवितेत एकाहून अधिक वेळा ‘स्कायस्क्रेपर्स’चा उल्लेख आहे — एकदा त्या मानवाच्या सामूहिक शक्तीचे उत्तुंग प्रतीक म्हणून येतात, तर दुसऱ्या वेळी ‘अधिकारा’च्या असत्यतेचे तितकेच उत्तुंग, ‘आकाश चिवळणारे’ प्रतीक म्हणून. आयुष्याच्या व्यक्तिगततेला झाकोळणाऱ्या भय आणि संताप यांच्या ‘आकाशस्थ घिरट्यां’चे जे उल्लेख आहेत ते आपल्याला अर्थातच त्या विमानांची आठवण करून देतात. हे जेव्हा घडते आहे त्या काळाचा उल्लेख ‘एका अप्रामाणिक दशकाची अखेर’ असा आहे. ११ सप्टेंबरचा प्रसंग २००१ मध्ये घडला, त्यामुळे तो असा ‘दशकाच्या अखेरी’स घडलेला नाही; पण तरीही ‘सहस्रकाच्या सांध्या’त तो घडला असल्याने ही ‘अखेर-सुरुवात’ यांची संधीकालीन प्रतीतीही आपल्याला इथे जाणवत रहाते. “हे कसे झाले?” ही ११ सप्टेंबरच्या घटनेबाबत न्यूयॉर्क-वासीयांची, आणि अमेरिकेतल्या अनेकांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती (जळणाऱ्या इमारतींकडे तोंडावर हात ठेवून स्तब्धपणे बघणाऱ्या, संवेदनामूढ अमेरिकनांची चित्रे आठवावीत.) हा हतबुद्ध प्रश्न ऑडनलाही पडला आहे, आणि त्याने त्याचे उत्तर सुदूर इतिहासात शोधायचा प्रयत्न केला असला तरी त्यांचा समकालीन वास्तवाशी असलेला संबंधही तो आपल्यापुढे ठेवतो. या वास्तवात हुकुमशहा, त्यांनी पसरवलेली असत्ये, त्यांची ‘हृदयशून्य थडग्यां’पुढे ठोकलेली हिंस्र भाषणे इत्यादी बाबींचा समावेश आहेच, पण त्याचबरोबर साम्राज्यवादातून दाखवली जाणारी कृतक स्वप्ने आणि त्यांच्या पाठपुराव्यापायी होत राहणाऱ्या ऐतिहासिक ‘आंतरराष्ट्रीय घोडचुका’ यांचाही निर्देश आहे.

पण ऑडनचा सुरात क्षीण अशी आशाही आहे. “माझ्याकडे केवळ एक आवाज आहे”, असे तो म्हणतो. या आवाजातून तो आपल्याला काही सत्ये सांगतो, काही ‘घडी घातलेली असत्ये’ उलगडून दाखवतो. ‘शासन’, ‘अधिकार’ किंवा ‘हुकूमत’ ही रोमँटिक असत्ये आहेत. जगात कोणीही ‘एकटा’ नसतो, पूर्ण मानवता ही एकच आहे, आणि भुकेला चॉइस नसतो, ती सगळ्या मानवजातीला सारखीच ग्रासते — सबब, आपल्यापुढे एकमेकांवर प्रेम करा अथवा मरा असे दोनच पर्याय आहेत, ही त्याने उलगडलेली काही सत्ये. जगावर हताशपणाची आणि निराधारतेची काळोखी रात्र पसरली असली तरी कुठेतरी न्यायाच्या ठिणग्या दिसत आहेत. त्यांच्याकडे धीरोदात्तपणे निर्देश करून, त्यांच्यातून एक सकारात्मक ज्योत आपण पेटवू शकू हा ऑडनचा विश्वास आहे.

१९३९ला सुरु झालेले महायुद्ध क्रौर्याची परमावधी आणि नरसंहाराची खाई मानवतेला दाखवून सहा वर्षांनी संपले. पण कलह संपला नाही. त्यानंतरही युद्धे होतच राहिली. गेल्या तीस वर्षांत तर युद्धजन्य परिस्थिती नाही असे सुधारलेल्या आणि मागासलेल्या अशा दोन्ही जगांत एकही वर्ष गेले नाही. पण युद्धांची टेक्नोलॉजी बदलली आहे — उघड युद्धांबरोबर छुपी युद्धे, सैनिकांबरोबरच सामान्य लोकांनाही टार्गेट करणारी ‘दहशतवादी’ कृत्ये, यादवी युद्धे, राजकीय मतप्रणालींच्या टक्करींतून आणि धार्मिक तेढीतून होणारी युद्धे अशी सगळ्या प्रकारची युद्धे आपल्या आजूबाजूला अगदी आजही चालू आहेत; पण त्याची आपल्यापैकी बहुतेकांना प्रत्यक्ष झळ बसत नाही. महागाई, शेअरबाजारातल्या उलथापालथी आणि त्यातून होणारे आर्थिक नफानुकसान वगैरे सोडले तर आपल्या घरांच्या दारांशी युद्धे आलेली नाहीत. कदाचित त्यामुळेच युद्धांबद्दल एक प्रकारची प्रणयरंजक ‘ओढ’ आपल्याला आवडते. ‘युद्धस्य कथा रम्या’सारखे सुभाषित त्याचा मूळ अर्थ लक्षात न घेता आपण बिनदिक्कत पॉझिटिव्ह अर्थाने वापरतो! अमुकतमुक कर्तव्ये केली नाहीत तर अलीकडे लोक त्याची तुलना लगेच सैनिकांनी केलेल्या ‘त्यागा’शी करतात. एकंदरीत ‘युद्धखोरी’ म्हणजे काहीतरी प्रेरक आणि अभिमानास्पद बाब आहे अशाच तऱ्हेने लोक युद्धाचा उद्घोष करत असतात. पण वास्तविक चित्र वेगळे असते. युद्धांत भाग घेतलेले अनेक सैनिक ‘शूर’ असले तरी त्या आठवणी खाजगीत पुन्हा काढत नाहीत. ‘युद्धात मिळवलेला जय हा युद्धात झालेल्या पराजयाइतकाच विषण्ण असतो’ असे युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव असलेले लोक सांगतात. युद्धाची नजीकता आणि त्याचे मानवी नात्यांवर होणारे परिणाम सांगणारी ऑडनची दुसरी कविता ‘ओ व्हॉट इज दॅट साऊंड’. युद्धखोरीच्या उन्मादाने भारलेल्या वातावरणात आणि जगात अनेक युद्धे चालू असतानाच्या काळात वारंवार आठवणारी.

या कवितेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ऑडनने ती १९३२ साली लिहिली आणि १९३४ साली प्रसिद्ध केली. या काळात पुढे येऊ घातलेल्या युद्धाचे पडघम युरोपात अजून जोराने वाजायला सुरुवात झाली नव्हती, पण ज्यू-द्वेष्टे राजकीय तत्त्वज्ञान, फासिस्टांची निमलष्करी दले आणि त्यांनी मांडलेले उच्छाद यांचा उदय राजकीय क्षितिजावर झालेला होता. असे असूनही युद्ध जणू काही दारीच येऊन ठेपले आहे अशा भावनेतून ऑडन लिहितो. हे एका प्रकारे कवीच्या ‘जे न देखे रवी’-प्रकारच्या द्रष्टेपणाचेच उदाहरण म्हणायला हवे.

या कवितेत कुठलेतरी एक स्पेसिफिक युद्ध ऑडनला अनुस्यूत नाही; युद्ध आणि योद्धे यांच्या चिरकालिक किंवा वैश्विक प्रतिमा वापरून ऑडनने ही कविता लिहिली आहे. तिच्या ‘फॉर्म’साठी त्याने पारंपरिक प्रकारचे ‘बॅलड’ हा काव्यप्रकार निवडला आहे, जो अनेकदा युद्धगीतांसाठी वापरला जातो. प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या चरणात तो शब्दांची द्विरुक्ती करतो, आणि चौथ्या चरणाशी ही द्विरुक्ती यमक साधते. याचा अनाहूत परिणाम अस्थिरता, भय, पुढे काय होणार याबद्दलची संदिग्धता वाढवण्यात होतो. प्रत्येक कडव्यात पहिले दोन चरण प्रश्नात्मक आहेत, आणि हा दोन माणसांतला संवाद आहे. प्रश्नकर्त्याला दुसऱ्या दोन चरणांतून उत्तर मिळते. जे सैनिक चाल करून येत आहेत ते नक्की काय करत आहेत याबद्दल कवितेच्या निवेदकांत संदिग्धता आहे. कविता जसजशी पुढे जाते तसतशी ही संदिग्धता थोडी दूर होते, आणि तितकीच गडदही! सैनिक त्यांची नेहमीचीच कवाईत करत आहेत का, की आणखी काही, त्यांनी गावातल्या इतर लोकांना पकडले आहे का, की ते आपल्या दिशेनेच येत आहेत अशा अनेक संदिग्धता निवेदकांना सामोऱ्या येतात. पण शेवटी त्यांचा रोख आपल्याकडेच आहे असे जाणवल्यावर, आता मात्र इथून पळालेच पाहिजे असे निवेदकांपैकी एका/की ला वाटते. त्यात तो यशस्वी झाला की नाही हे आपल्याला कळण्याआधीच सैनिकांची धाड त्यांच्या घरावर पडते, ते घराचा दरवाजा तोडतात. त्यांचे हेतू हिंस्र असल्याचे त्यांच्या जळजळीत डोळ्यांवरून दिसते, आणि इथेच ही कविता संपते.

विध्वंस आणि विस्थापन ही युद्धाची अटळ परिणती असते. आजच्या काळात निर्वासितांचा प्रश्न युरोपला चांगलाच भेडसावत आहे. आपल्याकडेही म्यानमारमधले रोहिंग्या हा प्रश्न ज्वलंत होत चालला आहे. अशीच परिस्थिती ऑडनच्या काळातही उद्भवली होती. फरक असलाच तर एवढाच होता की, तेव्हा प्रत्यक्ष युद्ध सुरु व्हायच्या आधीही, सत्ताधारी पक्षाने सरकारी धोरण म्हणून राबवलेल्या एका विशिष्ट जमातीविरुद्धच्या अनेक-कलमी द्वेषमूलक कार्यक्रमांतून ही परिस्थिती निर्माण झाली होती. युद्ध सुरु झाल्यानंतर या प्रश्नाने अधिकच गंभीर रूप धारण केले. ज्यू निर्वासितांची करुण कहाणी काव्यमय रीत्या सांगणारी ‘रेफ्युजी ब्लूज’ ही ऑडनची एक कविता.
वरच्या कवितेप्रमाणेच, ही कविता ऑडनने मार्च १९३९मध्ये म्हणजे युद्ध सुरु व्हायच्या काही महिने आधीच लिहिली. तो तेव्हा अमेरिकेत राहू लागला होता. हिटलरच्या ज्यू-निर्दालन मोहिमेमुळे जर्मन आणि ऑस्ट्रियन ज्यू निर्वासितांचा ओघ अमेरिकेकडे सुरु झाला होता. ही माणसे मोठ्या संख्येने इथे आली तर त्याचे काय परिणाम होतील, याबद्दल अमेरिकेतले जनमत साशंक होते (किंबहुना हे राजकारण, आणि पुढे त्यातून सुरु झालेले युद्ध ही केवळ एक ‘युरोपियन’ बाब आहे, आणि त्यात अमेरिकेने पडायचे काही कारण नाही, असा समज या काळात अमेरिकेत दृढ होता. जपानने १९४१ साली अमेरिकेवर आक्रमण केले तेव्हाच तो बदलला.) ऑडनने हा कालिक सूर उत्तम पकडला आहे. पण त्याचबरोबर तो निर्वासितांची दैना केंद्रीभूत ठेवून त्यातून वाचकांची सहानुभूती त्यांच्याकडे वळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रत्येक कडव्याच्या अखेरीस, एक उदास आणि उद्विग्न उद्गार त्याच्या कवितेचा निवेदक उच्चारतो. ‘माय डियर’ या शब्दाने विभागलेली या उद्गाराची द्विरुक्ती त्यांच्यामागचा हताशपणा दाखवण्यासाठी ऑडनने कौशल्याने वापरली आहे. ‘ओ व्हॉट इज दॅट साऊंड’ या कवितेप्रमाणेच अशा द्विरुक्तीतून इच्छित भावनात्मक परिणाम साधायची ऑडनची कल्पना उत्तमरित्या साध्य झाली आहे.

कवितेच्या सुरुवातीलाच “Say this city has ten million souls / Some are living in mansions, some are living in holes” असे निवेदक म्हणताना, सामाजिक विषमता, उच्चनीचता यांच्याकडे त्याचा निर्देश आहे. पण तरीही, इथे आपल्याला जागा नाही हे त्याचे भेदक वास्तव आहे. माणसांची माणुसकी त्यांना कशी सोडून जाते, आणि रूक्ष कागदपत्रे हेच माणसांचे ‘माणूसपण’ कसे बनते हे “पासपोर्ट नसला तर तुम्ही मेल्यातच जमा आहात” असे निर्वासितांना ठणकावणाऱ्या ऑफिसराच्या वागण्यातून दिसते. पासपोर्ट असला तरी मरणातून सुटका होणे कठीणच, आणि जिवंत आहोत हेच दुर्दैव हे या विस्थापितांचे भेदक वास्तव यातून उभे राहते. सृष्टीत कालानुक्रमानुसार बदल होतात, तसे पासपोर्ट बदलता येत नाहीत. “एके काळी आम्हालाही देश होता, आणि तो आम्हाला न्याय देईल अशी आमची खात्री होती — पण आता तो आमच्यासाठी नकाशांच्या पुस्तकातच उरलाय” अशी नकारात्मक भावना या विस्थापितांच्या मनात आहे. असेच लोक येऊ दिले तर ते आमची रोजीरोटी हिरावून घेतील, अशी तक्रार स्थानिक लोक करताना त्यांच्या कानावर येते, तेव्हा तर या कवितेचा आपल्या समकालीन वास्तवाशी अतूट सांधा जुळतो.
‘ऐहिक’ तपशीलांतून ‘वैश्विक’ तथ्यांकडे निर्देश करण्याची जादू या कवितेत ऑडनने छान साधली आहे. मुक्त विहार करणारे मासे आणि पक्षी पाहून त्याच्या निर्वासित निवेदकाच्या मनात “यांना हे शक्य आहे, कारण यांच्यात राजकारणी लोक नाहीत”, किंबहुना ते मानवी सृष्टीतले नाहीत हे सुद्धा उत्तमच आहे, असे विचार येतात. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून कोट घातलेला पूडल कुत्रा आणि उघड्या दाराच्या फटीतून सुळकन आत शिरणारी मांजर यांनाही ‘आश्रय’ आहे पण ज्यू निर्वासितांना तो मिळत नाही हे विदारक सत्य त्याला जाणवते. इथे सहानुभूती, अनुकंपा, दया वगैरे वैश्विक समजल्या जाणाऱ्या मूल्यकल्पना कशा भंगुर ठरतात हे विदारक सत्य आपल्याला या छोट्या ऐहिक उदाहरणांतून ऑडन दाखवतो. अखेरीस, एका उत्तुंग ‘फॅण्टसी’ स्वप्नात निवेदक क्षणभर रमून जातो — त्याला हजार मजल्यांची, हजार खिडक्या आणि हजार दारे असलेली इमारत दिसते, पण त्यातले एकही त्यांच्यासाठी नसते! ही ‘युफोरिक ड्रीम’ची कल्पना त्याने ‘१ सप्टेंबर’च्या कवितेतही ‘उंच इमारतीं’च्या प्रेक्ष्यातच वापरली आहे. उंच इमारतीचे स्वप्न, आणि त्याचा जागृतीत ‘नसण्या’शी आलेला संबंध, या दोन भावनांच्या परस्परसंदर्भाद्वारे कवितेच्या अंती ऑडनने निर्वासितांच्या हताश खिन्नतेचा कळसाध्यायच रचला आहे असे म्हणायला हरकत नाही.

संक्रमणकाळाचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे आलेल्या परिस्थितीवर काही उपाय नसून “काय करणार, दिवसच असे आले आहेत!” या भावनेचा विशेष प्रादुर्भाव. अगदी आजही आपल्या आजूबाजूला पाहिले तर हे उद्गार आपल्याला ऐकू येतील! इथे आपल्याला जाणवते ते ‘काल’ या वैश्विक कल्पनेचे मानवाच्या मनावर असलेले ओझे. या कल्पनेपायीच माणसे अनेकदा ‘काळा’ला मानवी रूप देतात. तो माणसांशी बोलतो, त्याची ‘चाल’ माणसांना जाणवते. त्याची गती ही मानवाच्या हाती नसून कुठल्यातरी अतिमानवी शक्तीचे ते फळ आहे असे माणसे मानू लागतात. ‘कर्म’-कल्पनेने भारलेल्या भारतीय मनाला तर ‘कालाय तस्मै नमः’ची अटळ शरणागती फारच भावते. युद्ध सुरु होऊन काही दिवस उलटल्यावर, १९४० साली ऑडनने लिहिलेली ‘इफ आय कुड टेल यू’ ही कविता अशीच काळाच्या तथाकथित ‘उद्गारां’वर आधारित आहे.

या कवितेसाठी ऑडनने ‘व्हिलानेल’ हा पारंपरिक फॉर्म वापरला आहे. इथे उल्लेखलेल्या त्याच्या इतर कवितांच्या मानाने हा लवचिक नाही, कारण याला चरणांचे, पालुपदांचे तसेच एकूण ओळींचे बंधन असते. प्रत्येक कडवे त्रिपदीचे असते. पहिल्याच कडव्यात पुढे येणारी पालुपदे उल्लेखली असतात आणि ती प्रत्येक कडव्यांच्या अखेरीस येणाऱ्या त्रिपदींमध्ये आळीपाळीने येत जातात. पाच त्रिपदींनंतर शेवटची एक चतुष्पदी येते, आणि अशा प्रकारे एकोणीस ओळींत हे काव्य संपते.

कवितेत एक निवेदक दुसऱ्याला काही सांगतो आहे आणि ही दुसरी व्यक्ती निवेदकाला जवळची आहे. ‘काळ’ हे कवितेतले तिसरे पात्र आहे. काळ काय घडवू शकतो याबाबत ऑडनने काळाला झुकते माप दिले आहे — आपल्याला जीवनाची जी किंमत द्यावी लागते ती काळ जाणतो, सबब तो अखेरीस ‘बघ मी म्हटलंच होतं’ याव्यतिरिक्त काहीच बोलत नाही. इथे काळ सर्वज्ञ आहे, ही भावना प्रकर्षाने पुढे येते. पण त्याचबरोबर निवेदकाचा नाईलाजही ऑडनने दाखवला आहे — ‘मला उमगलं असतं तर मी सांगितलं असतं’, ही निवेदकाची भूमिका आहे. काय उमगलं असतं हा प्रश्न अधांतरी सोडून दिलेला आहे, त्यामुळे कवितेला एक गंभीर बाज येतो. कवितेत पुढे काळाच्या सामर्थ्याला उद्देशून अधिक भाष्ये केलेली आहेत. ‘There are no fortunes to be told’ यासारख्या सूत्रात्मक ओळींतून आपण भविष्य पाहू शकत नाही, आणि त्यामुळे काळाला शरण जाण्याखेरीज आपल्याला इलाज नाही हे दिसते. पण तरीही, ‘माझ्या प्रेमाबद्दल तू शंका घेऊ नयेस, कारण मी तुझ्यावर शब्दांपलीकडचे प्रेम करतो’ असे निवेदकाचे म्हणणे आहे. इथे ऑडनचा सूर अचानक ‘आत्मचरित्रात्मक’ होतो आहे की काय अशी शंका येते. हे ‘शब्दांपलीकडचे प्रेम’ म्हणजे केवळ प्रेमाची आलंकारिक अनुभूती नाही, तर हा ऑडनच्या समलैंगिक प्रेमाचा आविष्कार आहे असे दिसते (ऑस्कर वाइल्डने त्याच्या अशाच प्रेमाचा ‘the love that dare not speak its name’ असा उल्लेख केल्याचे इथे आठवावे — म्हणजे हेही ‘शब्दांत न सांगण्यासारखे’च प्रेम!) ऑडन चेस्टर कॉलमनच्या प्रेमात नुकताच पडला होता, हे ह्या भावनेशी सुसंगतच आहे.

चौथ्या आणि पाचव्या कडव्यांत निसर्गात होणाऱ्या घडामोडींचा काळाशी संबंध लावला आहे, आणि पुन्हा एकदा काळाचे सामर्थ्य वर्णलेले आहे. शेवटच्या कडव्यात सिंहांचा आणि सैनिकांच्या पळून जाण्याचा जो उल्लेख आहे, तो एका प्रकारे सर्कस किंवा मिरवणुकीच्या अंताकडे निर्देश करतो — आयुष्याचे ‘कार्निव्हल’ संपत असतानाही, काळ ‘बघ मी म्हटलेच होते’ असे म्हणेल काय? असा तात्त्विक प्रश्न ऑडन उपस्थित करतो, आणि काळ काय घडवून आणेल याबद्दलची संदिग्धता अधिकच गहिरी करतो. ‘मला याचे उत्तर माहीत असते तर मी तुला सांगितलेच असते’ ही निवेदकाची भूमिकाही त्याची असाहाय्यता अधोरेखित करते. पण एका परीने ‘काळ काहीही करू शकतो’, ही भावना आपल्याला अधिक सन्मुखही करू शकते — कारण त्यामुळेच काळ निरर्थक ठरतो! ‘करे ना का, आपण आपल्याला काय हवे ते करू’ अशा अर्थाने आपण काळाला नाकारूही शकतो. आधीच्या कवितेत काळाचे म्हणणे ठासून सांगताना, शेवटच्या कडव्यात ‘काळ असे म्हणेल का?’ असे ते प्रश्नांकित करून ऑडनने या सन्मुखतेकडेही आपले लक्ष वेधले आहे.

ऑडनच्या या चार कविता आज आपल्याला प्रत्ययकारी का वाटतात? याचे एक कारण त्या ज्या काळात त्याने लिहिल्या त्या काळात आपल्याला आजच्या काळाचे प्रतिबिंब जाणवते हे आहे. हे प्रतिबिंब अर्थातच सगळ्या तपशिलांत सारखे नाही. तिशीचे दशक — ज्या कालखंडात ऑडनने हे लिहिले — हे अनेक प्रकारे ‘संक्रमणा’चे दशक होते. या संक्रमणाची सुरुवात ढोबळ मानाने पहिल्या महायुद्धानंतर, म्हणजे विशीच्या दशकाच्या सुरुवातीला झाली होती. युरोपात या काळात सरंजामशाहीचा अंत झाला; हाब्सबर्ग, होहेनझोलर्न, रोमानोव्ह आणि ऑटोमन, अशी चार बलाढ्य सरंजामी साम्राज्ये लयास गेली. त्यांच्या अस्तातून राजकीय सीमा पुन्हा आखल्या गेल्या. त्यातून नवनवीन देश निर्माण झाले, नवीन अस्मितांना वाचा फुटली. लोकशाही ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका विजयी ठरले, पण याचबरोबर या दशकांत ‘कामगारांच्या कल्याणकारी राज्या’ची स्थापनाही रशियात झाली. अशा प्रकारे ‘अर्थकेंद्रित राजकीय विचारसरणी’ आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या शासनसंस्था या दोन दशकांचा केंद्रबिंदू ठरला. धर्म, अर्थ आणि काम या ‘पुरुषार्था’चे परस्पर-संबंध आणि संदर्भ बदलत गेले. ‘अनिर्बंधत्व’ हा उत्पादनाचा, व्यापाराचा आणि जीवनशैलीचा कणा बनत गेला. पण अनिर्बंध उत्पादनातून मंदी उद्भवली आणि समाजाच्या धारणांना भेगा पडत गेल्या. असंतुष्टांची संख्या वाढली. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गांतली तेढ वाढत गेली. या तेढीचा फायदा युरोपात हुकुमशहांनी उचलला. मूळ प्रश्नांकडून जनतेचे लक्ष वळवून, नको ते बागुलबुवे उभे करण्यात या हुकुमशहांना यश आले.

अशीच परिस्थिती आपण गेल्या दोन दशकांत अनुभवत आहोत. सध्याच्या संक्रमणाची सुरुवात १९९०-९१ साली सोव्हिएत साम्राज्याच्या आणि ‘डाव्या’ विचारसरणीच्या पतनातून झाली. त्याआधीच्या दशकांत डाव्या-उजव्या विचारसरणीतल्या संघर्षाने घेतलेली धोकादायक वळणे पाहता, ‘डावी’ बाजू कोलमडून पडणे हे ‘उजव्या’ बाजूच्या विचारवंतांनी इतके डोक्यावर घेतले की, जीवनशैलीत त्या वैचारिकतेचाही काही वाटा असतो, असू शकतो, हे उजव्या बाजूने जवळपास विसरल्यासारखेच झाले! ‘इतिहासाचा(च) अंत’ झाला असल्याचे तत्त्वज्ञांनी उद्घोषून सांगितले. ‘जागतिकीकरणा’चे वारे वाहू लागले. या वैचारिकतेच्या विजयाच्या उद्घोषात ती ‘डावी’ बाजू ज्या समाजघटकांच्या हितसंबंधांची पाठराखण करत होती त्या समाजघटकांच्या धारणा, गरजा यांच्याकडे दुर्लक्ष होत गेले. सहज उपलब्ध असणाऱ्या कर्जाचे गाजर या वर्गाला दाखवले की त्याचे प्रश्न विसरून तो सुखाने ते कुरतडत राहील अशी अपेक्षा निर्माण झाली. पण जेव्हा या कर्जाचा बुडबुडा फुटला, तेव्हा या सातत्याने दुर्लक्षित राहिलेला वर्गावर अधिकच जोराचा आर्थिक आघात झाला! त्याचबरोबर ‘नव-उजव्या’ वैचारिकतेतून नवीन आर्थिक हितसंबंध उभे राहिले, मध्यमवर्गाची सर्वत्र वाढ झाली. पण या सुबत्तेला कुठल्याही बांधिलकीचे, निष्ठेचे आणि प्रामाणिकतेचे अधिष्ठान राहिले नाही. त्यामुळे वर्गीय अस्मितांवर अधिकच ताण पडत राहिला आणि असमानता वाढत गेली. त्याचबरोबर सामाजिक असंतोषही वाढत गेला, यात नवल नाही.

या दोन कालखंडांचा विचार करताना एका महत्त्वाच्या बाबीकडे आपले लक्ष जाते — ती बाब म्हणजे समाजाच्या इतिहासात विशिष्ट जनसमूहांच्या ‘ओळखी’ला असलेले लक्षणीय स्थान. व्यक्तिगत ‘स्व’च्या शोधातून आणि उत्क्रांतीतून ही ओळख तयार होत जाते. जेव्हा सामाजिक स्तरातील उलथापालथीमुळे या ‘स्व’ला धक्का पोचतो, तेव्हा त्याचे पडसाद समाजातल्या वर्गीय जाणिवांत आपोआपच उमटत जातात. या दोन्ही काळांत वेगवेगळ्या देशांत आपल्याला हेच झालेले दिसते. या ‘फॉल्ट लाईन्स’चा चतुर राजकारणी फायदा घेतात आणि या फायद्यांतून पुढचे राजकारण घडवत राहतात. ऑडनच्या There is no such thing as the State; And no one exists alone’ अशा शब्दांची तेव्हा प्रकर्षाने आठवण येते. समाजघटकांच्या ‘स्व’चा केंद्रबिंदू ढळला की त्याला एक प्रकारच्या सांस्कृतिक खच्चीकरणाचे रूप राजकारणी देतात, आणि अनेकदा त्या खच्चीकरणाचे दायित्व त्यांना सोयीस्कर अशा समष्टीवर सोपवतात. हे करण्यासाठी अर्थातच (अप)प्रचार आवश्यक असतो आणि प्रभावी वक्तृत्व तसेच प्रचारी यंत्रणांच्या शिवाय हे साध्य होत नाही. या दोन्ही कालखंडात याही गोष्टींचे साम्य आपल्याला दिसेल. उत्तम वक्तृत्वशैली असलेले, आणि त्याद्वारे लोकांवर छाप पडू शकणारे असे हुकुमशाही प्रवृत्तीचे नेते (demagogue) हे या दोन्ही कालखंडांतले एक वैशिष्ट्य आहे. ऑडनच्या काळात ‘ज्यू’ हे अशी एक समष्टीजन्य ‘दुष्प्रवृत्ती’ आहे असे लोकांचे मत करून देण्यात या हुकुमशहांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

व्यक्तिकेंद्रित मूल्यांचा लंबक आता हळूहळू अधिकच उजवीकडे सरकत असल्याचे आपल्याला जाणवू लागले आहे. व्यक्तिवाद आणि व्यक्तिकेंद्रितता यांनी गेली काही शतके गाजवली. ती विचारसरणी मानवाच्या इतिहासावर खोलवर परिणाम करणारी ठरली. तो दृष्टीकोन मानवाला अनेक प्रकारे उपयुक्त ठरला त्यामुळे तो योग्यच, पण समष्टीचा बळी देण्याइतका तो योग्य आहे का, मानवी समाजकारणात समष्टीला काहीच महत्त्व नसावे का, ‘man is a social animal’ हे जर खरे आहे तर पराकोटीचा व्यक्तिकेंद्रित विचार करणे कितपत योग्य आहे, याचा पुनर्विचार आपल्याला करणे आता भाग आहे. ऑडनने विचारलेला “Will Time say nothing but I told you so?” हा तात्त्विक प्रश्न आपल्याला अधिकच विचारमग्न करत आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

उत्तम लेख. साध्या शब्दांतून त्या दशकातली भयाण परिस्थिती मांडणार्या कविता आवडल्या. त्यांचा अर्थ उलगडून दाखवत आजच्या काळातही त्या कशा लागू होतात हे सांगणारा लेखही आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खूप सुंदर लेख आहे.

त्याची शब्दांवर अप्रतीम हुकुमत आहे — मर्ढेकरांच्या उक्तीचा वापर करून म्हण्याचे तर ‘शब्दांच्या तोंडात गच्च लगाम’ घालायची कला त्याला चांगलीच साध्य आहे. पण मर्ढेकरांसारखी त्याची शब्दकळा आक्रस्ताळी होत नाही.

हे निरीक्षण वाचून गंमत वाटली. मर्ढेकरांवर ऑडनचा प्रभाव होता असं कुठेतरी वाचलं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.