एका "मार्गदर्शका" ची अटळ सेवानिवृत्ती

काही वर्षापूर्वीची गोष्ट. कोल्हापूर-सोलापूर प्रवासात असताना राल्फ वाल्डो इमर्सनच्या लेखाचा समावेश असलेले पेंग्विनचे एक पुस्तक वाचत होतो. कवितेसंदर्भात इमर्सनची निरीक्षणे वाचताना त्याने केलेला 'एम्मा लाझारस' या कवयित्रीच्या १८६७ साली प्रसिद्ध झालेल्या 'पोएम्स अ‍ॅण्ड ट्रान्सलेशन' चा उल्लेख वाचला आणि त्याबरोबर एम्मा लाझारसच्या कवितेवर त्याने उधळलेली स्तुतीसुमनेही. त्यावेळेपर्यंत तिची कोणतीही कविता माझ्या वाचनात आली नव्हती, ना तिच्याविषयीची काही माहितीही माझ्याकडे होती. सोलापूर येईपर्यंत इमर्सनसारखा जगन्मान्य असा लेखक तिच्याविषयी आत्मियतेने इतके लिहितो ही बाब मी मनी नोंदवून ठेवली. ऑडिटच्या ज्या कामासाठी सोलापूरमध्ये येणे झाले होते ते आकस्मिकपणे लवकर संपले असले तरी अन्य सहकारी अन्यत्र त्यांच्या अपूर्ण कामात गुंतले असल्याने किमान दोनतीन तास मोकळे होते, त्यामुळे मग मी सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आलो. तेथील मंडळींना मी माहीत असल्याने नित्याचे स्वागत झाले. चहावगैरे नित्याचे उपचार झाल्यानंतर मी ग्रंथपालांची परवानगी घेऊन स्टॅक रूमकडे वळलो आणि पावले अगदी अलगदपणे 'रेफरन्स सेक्शन' कडे गेली आणि तिथे एका सुंदर कपाटात एकाखाली एक अशा तीन रॅक्समध्ये सोनेरी अक्षरांनी झळकणारे नाव समोर आले : ENCYCLOPEDIA BRITANNICA.

"L" लेटरने सुरू झालेला त्यातील एक ग्रंथराज उचलला आणि तिथेच सोय असलेल्या टेबलखुर्चीचा आधार घेऊन त्या 'एम्मा लाझारिस" विषयी जी काही माहिती मिळाली ती टिपून घेतली. New Colossus ही अमेरिकेच्या स्वातंत्रदेवता पुतळ्याला समर्पित केलेली आणि तितक्याच गाजलेल्या कवितेचीही माहिती मिळाली. तासभर वाचन केले आणि नित्यनेमाने स्वत:शीच पुटपुटतो तसे "थॅन्क्स, ब्रिटानिका" म्हटले आणि प्रसन्न चित्ताने त्या ग्रंथालयातून बाहेर पडलो; बाहेर त्या दिवशीची त्या परिसरातील संध्याकाळ नकळत अधिकच आल्हाददायक वाटली.

ही जादू 'एनसायक्लोपिडीया ब्रिटानिका' ची. आज (किंबहुना आत्ताच) समजले की एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा विश्वकोश, यापुढे छापील स्वरूपात मिळणार नाही. छपाईची किंमत परवडत नसल्याने प्रकाशकांना हा निर्णय घ्यावा लागला. तब्बल २४४ वर्षांपूर्वी पहिल्या खंडाचे प्रकाशन झाल्यानंतर प्रथमच हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाचताक्षणीच विलक्षण अशी काहीतरी हरवत चालल्याची जाणीव झाली आणि ३०-३५ वर्षापूर्वीचे कॉलेजमध्ये पाय ठेवण्यापूर्वीही अगदी हायस्कूलच्या दिवसात शेजारी राहणारे कुलकर्णीसर आम्हा मुलांना "ब्रिटानिका" संदर्भात आठवले. (ते विश्वकोशही म्हणत असत, पण ब्रिटानिका हेच नाव फार लाडके वाटत होते) सर जी काही माहिती देत ती अगदी अरेबियन नाईट्सप्रमाणेच वाटे. कॉम्प्युटर, इंटरनेट, टीव्ही तर नव्हतेच, पण गल्लीतील सर्वात श्रीमंत म्हटल्या जाणार्‍या फक्त खोत वकिलांकडे फोन आणि रेडिओ होता. अशावेळी 'माहितीचा पूर' नावाची संकल्पना रुजली नव्हती यात आश्चर्य नव्हते. हायस्कूल्सच्या लायब्ररीत ब्रिटानिका "न परवडणारी खरेदीची बाब' असणे साहजिकच होते, त्यामुळे त्यांचे ओळीने दर्शन झाले ते गोखले कॉलेजमध्ये पाय ठेवल्यानंतरच. लायब्ररीचा वापर कसा करावा या संदर्भात तिथले ग्रंथपाल आणि समिती सदस्यांनी सार्‍या लायब्ररीची आमच्या बॅचला सफर घडवून आणली आणि मी कधी 'रेफरन्स सेक्शन' मधील ब्रिटानिकाच्या रॅक्सकडे तेथील अटेन्डंट आम्हाला नेतील याची वाट पाहात होतो. पहिलाच दिवस असल्याने हातात थेट त्यातील एकही व्हॉल्यूम येणे शक्यच नव्हते. पण मी सहा.ग्रंथपाल याना बाजूला घेऊन आम्हा विद्यार्थ्यांना हा रेफरन्स सेक्शन पाहता येईल का याची चौकशीही केली. पुढे असे समजले की विद्यार्थीच काय पण प्राध्यापक मंडळींनाही ब्रिटानिकाचा कोणताही खंड घरी नेण्याची परवानगी नसायची. जर काही संदर्भ हवेच असले तर आपले कार्ड काऊंटरवर जमा करून मग अगदी तासदोनतास कोणत्याही 'लेटर' ने सुरू होणारा त्यातील एखादा खंड घेऊन इंग्रजीतील ती मुंगीच्या आकाराची बारीक अक्षरे वाचत बसण्याचा छंदच लागला मला आणि माझ्या दोन मित्रांना. पुढे तर एकदा ग्रंथपालांनी चक्क 'मॅग्निफाईंग ग्लास' ही दिला...विशेषतः खंडातील नकाशे अभ्यासण्यासाठी. कॉलेजची सारी वर्षे ब्रिटानिका हा अत्यंत चांगला स्नेही झाला होता.

माहितीचा किती प्रचंड खजाना त्या पानापानातून खच्चून भरलेला असतो हे ज्याने ब्रिटानिकाचे खंड हाताळले आहेत त्याच्या लक्षात जरूर येईल. कुतूहलापोटी "Z" खंडात काय सापडेल हे एकदा पाहताना तिथे चक्क मेक्सिकन क्रांतिकारक "झपाटा एमिलानो" विषयी इतकी छान माहिती मिळाली की जी ग्रंथालयात कुठल्याच सेक्शनमध्ये जमा नसणार कारण मेक्सिको तसेच लॅटिन अमेरिकेतील अन्य अनेक देशांविषयीच्या लोकक्रांती (काही प्रमाणात क्युबा सोडल्यास) संदर्भात भारतात अत्यल्प माहिती असते. हे शक्य झाले ते ब्रिटानिकामुळे.

एनसायक्लोपिडीआ ब्रिटानिकाच्याही अगोदर "विश्वकोशाची" संकल्पना अंमलात असल्याचे इतिहास सांगतो. नॅचरल हिस्टरी (इ.स.पू. सु. ७९-२३) हा प्लिनीचा सर्वांत जुना असा कोशरचनेचा प्रयत्न होता. आठव्या-नवव्या शतकांत आणि नंतर अरबी भाषेत धर्म, नीती, तत्त्वज्ञान इ. विषयांवर कोशसदृश रचना होऊ लागली. पश्चिमी प्रबोधनकाळापासून सगळ्याच ज्ञानव्यवहाराला नवी प्रेरणा व दिशा लाभली. ज्ञानाचे संघटन व विशिष्ट विषयपर आणि सर्वविषयसंग्राहक कोशरचना यांबद्दलच्या संकल्पना याच काळात अधिक स्पष्ट होत गेल्या. सोळाव्या शतकापासून फ्रान्स, इंग्लंड इ. देशांत कोशरचनेस नव्याने चालना मिळाली. त्याचीच परिणती म्हणजे "एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका" ची कल्पना मूर्त स्वरूपात आली आणि सन १७६७—७१ (स्कॉटलंडमधील एडिम्बर्गमध्ये १७६८ मध्ये पहिले प्रकाशन करण्यात आले होते.) हा प्रयत्न जनमानसात रुजलाही. ज्ञानक्षेत्रांतील संदर्भसेवेच्या विविध गरजा विविध प्रकारे पुरविणारे अनेकविध प्रकारचे कोश तयार होऊ लागले आहेत हे जरी एक सुचिन्ह असले तरी 'ब्रिटानिका' ला विश्वात जे स्थान लाभले आहे त्याची जागा त्यानंतर आजतागायत अन्य कुठलाही विश्वकोश घेऊ शकलेला नाही.

पण आता संचालक मंडळाला "पैशाचे गणित" झेपेनासे झाले असे खुद्द अध्यक्षांनीच आज जाहीर केले म्हणजे अन्य कुणाला विचारण्याचा प्रश्नच राहिला नाही. एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका इन्कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जॉर्ज काऊझ म्हणाले, की यापुढे ब्रिटानिकाच्या प्रती केवळ डिजिटल स्वरूपातच विकण्यात येतील. छापील आवृत्तीच्या विक्रीचा विक्रम १९९० मध्ये झाला होता. या एकाच वर्षात १ लाख २० हजार खंड विकले गेले होते. त्यानंतर अवघ्या सहा वर्षांत, म्हणजे १९९६ मध्ये हा खप अवघ्या ४० हजारांपर्यंत खाली उतरला. काऊझ म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून छापील खंडांची विक्री दिवसेंदिवस घटत असल्याने, कधीतरी ही वेळ येणार, याची कंपनीला कल्पना होतीच. धंद्याच्या गणिताला समोर ठेवले तर ही स्थिती नक्कीच चिंताजनक वाटणे स्वाभाविक आहे. कारण कसल्याही परिस्थितीच 'ब्रिटानिका' ने खंड सादर करण्याचा क्वालिटीत तडजोड केल्याचे उदाहरण गेल्या तिन्ही शतकाच्या कोणत्याही कालखंडात सापडणार नाही.

अर्थात जिथेजिथे हे खंड आहेत (माझ्या पाहणीनुसार्/माहितीनुसार "ब्रिटानिका" चे खंड हमखास सापडण्याची ठिकाणे म्हणजे महाविद्यालय आणि विद्यापीठ ग्रंथालय. शहरांतील कॉलेजीसमधून अगदी 'कंपल्सरी' म्हटली जाते अशा स्वरूपातील खरेदी होत असतेच. याला शासनाचे अनुदान १००% मिळते. पण बर्‍याच ग्रामीण भागातील महाविद्यालयातील ग्रंथालयाच्या संचालक मंडळाला ब्रिटानिकाचे खंड आपल्या ग्रंथालयासाठी असले (च) पाहिजेत असे वाटत नाही, दुर्दैवाने. आतातर नवीन आवृत्ती प्रकाशितच होणार नसल्याने तो वादच संपुष्टात आला) तिथेतिथे पानापानातून ही मार्गदर्शनाची गंगामाई वाहती राहणारच आहे. शिवाय क्राऊझ यानी सांगितल्याप्रमाणे सर्व खंडांची सीडी-रॉम व्हर्जन १९८९ मध्ये प्रकाशित करण्यात आली आहेच शिवाय आणि १९९४ मध्ये ऑनलाईन व्हर्जन सुरू झाले.

"मार्गदर्शक मित्र" ऑनलाईन भेटत राहणार यात शंका नाही, पण त्याला हाती घेऊन टेबलवर ठेवून स्वत:च्या बोटानी त्याला हाताळण्यामध्ये जी आपुलकी वाटत होती, ती वेगळीच होती. तो आजही ओळखीच्या ग्रंथालयात भेटणार आहेच, पण त्याचे नित्यनेमाने "कात टाकून" येणारे सुंदर झळझळीत रुपडे कायमचे अस्तंगत झाले याची खंत नेहमी राहिल.

[आभार : ब्रिटानिका इन्कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जॉर्ज क्राऊझ यांच्या आजच्या निवेदनातील आकडेवारीची माहिती ही "ई-सकाळ" वरून घेतली आहे, त्याबद्दल त्या संपादक मंडळाचा मी ऋणी आहे.]

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.25
Your rating: None Average: 4.3 (4 votes)

लेख आवडला. लड्डाइट स्टाइल आहे. पण आवडला. स्मार्टफोनवर हवे ते संदर्भ सहज मिळत असताना विश्वकोषाची छपाई न परवडणारी होणे हे आलेच. पण आता हे दिवस संपले, याची चुटपुट लागणे साहजिक आहे.

बाय द वे मी कॉलेजात असतानाची एक गोष्ट आठवली. एका प्रोजेक्टसाठी मला विश्वकोष पहायचा होता. ग्रंथपाल म्हणाले तुम्हाला मिळणार नाही, गाइडना देऊ. ते गाइड तिथेच ग्रंथालयात होते. त्यांना मी सांगितले एन्सायक्लोपीडिया हवाय म्हणून. गाइड तिथूनच मोठ्याने ग्रंथपालांना म्हणाले, अहो माझ्या नावाने तो "आर्किपिडिया" इश्यु करा यांना!
धन्य ते ग्रंथपाल, धन्य ते गाइड, धन्य तो आर्किपीडिया, आणि धन्य तो माहितीचा महापूर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आ.रा. जी ~

तुमच्यासारख्या (तसेच अन्यही) वाचनप्रेमी व्यक्तीकडून 'ब्रिटानिका' च्या अनुभवाबद्दल वाचायला मिळाले अन् त्यातही संबंधित ग्रंथपाल आणि गाईडराव यांची त्याबद्दलची आस्था पाहून मन 'भरून' आले. पण मला वाटते कित्येक ठिकाणी (काही प्रमाणात विद्यापीठ ग्रंथालये वगळता) देतंय सरकार खरेदीसाठी अनुदान, तर घेऊन टाकू या, या विचारापोटीही ब्रिटानिकाची खरेदी होत असे. [ग्रंथपालांची अशा ग्रंथ खरेदीबाबतची 'उदासीनता' का असते, हा मला माहीत असलेला, पण सर्वस्वी वेगळा विषय आहे. त्या विषयीची चर्चा पुढे केव्हातरी इथेच करू.]

(बाय द वे ~ व्हॉट्स धिस लड्डाइट स्टाईल ? माझ्या माहितीनुसार (वा वाचनानुसार) लड्डाइट हा जिप्सी जमातीतील 'पोवाडा' पध्दतीने इतिहासाचे गुणगान गायनाचा प्रकार आहे, ज्याला आपण Folklore म्हणू शकू. समथिंग लाईक दॅट ? मला आवडेल याविषयी जादाची माहिती वाचायला.)

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे प्राथमिक माहिती आहे.

हवेहवेसे वाटणारे, जुने झालेले तरी अजून मौल्यवान वाटणारे असे काहीतरी हरवत चालल्याचे, कालबाह्य होत असल्याचे दु:ख, खंत या लड्डाइट स्टाइलने व्यक्त होत असते.

माझ्या मते इतिहासातील लड्डाइट स्टाइलचा पहिला वहिला संदर्भ बौद्ध तत्वज्ञानाच्या प्रारंभिक प्रसारात सापडतो. इसपू सहाव्या शतकाच्या दरम्यान गंगा यमुनेच्या सुपीक खोर्‍यांमध्ये वेगाने नागरीकरण होत होते, अर्थव्यवस्था कॉम्प्लेक्स होत चालली होती, आणि त्याच पार्श्वभूमीवर सहज सोप्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारे बौद्ध तत्वज्ञान लोकांना - खासकरुन जे नव्या व्यवस्थेमध्ये स्टेकहोल्डर असूनही हवे ते स्थान मिळवू शकत नव्हते अशा लोकांना - भुरळ पाडून गेले, असा एक विचार आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दॅट्स इट. हा खरा आणि हवाहवासा वाटणारा संस्थळाचे सदस्यत्व घेतल्याचा फायदा.
मी फार अनभिज्ञ होतो या लड्डाइट स्टाईलविषयी. आता पूर्ण वाचून काढतो. चांगली भर पडली ज्ञानात. [माझ्या डोक्यात लड्डाइटबाबत 'Gypsy Folklore' कुठून आले याचाही तलास करतो].

धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उत्तम लेखन.

"मार्गदर्शक मित्र" ऑनलाईन भेटत राहणार यात शंका नाही, पण त्याला हाती घेऊन टेबलवर ठेवून स्वत:च्या बोटानी त्याला हाताळण्यामध्ये जी आपुलकी वाटत होती, ती वेगळीच होती. तो आजही ओळखीच्या ग्रंथालयात भेटणार आहेच, पण त्याचे नित्यनेमाने "कात टाकून" येणारे सुंदर झळझळीत रुपडे कायमचे अस्तंगत झाले याची खंत नेहमी राहिल.

हे अटळ आहे. पण मला वाटतं पुढची पिढी, जी आज पंचविशीत आहे, तिच्यासाठी हे झटकन स्वीकारलं जाऊ शकेल. खरं तर, पुस्तकाच्या त्या हाताळणीचा आनंद तिला किती माहिती असावा, अशी शंकाही चाटून जाते. हातातल्या टॅब्लेटवर अमूक हजार पुस्तकांचा संग्रह वगैरे भविष्य फार दूर नाही. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद श्रावणजी ~

मान्य. समाजाच्या विविध घटकांत विज्ञानाच्या साथीने होणारे बदल हे अपरिहार्य असतातच असतात. चुलीवरील भाकरी कितीही चवदार असली तरी आजची गृहिणी गॅसच्या शेगडीला दूर करून स्वयंपाकघरात पुन्हा चूल मांडू शकत नाही, हे जसे खरे, तसेच ब्रिटानिकाचे हातातील रुपडे कितीही हवेहवेसे वाटत असले तरी नवनवीन 'फॅसिलिटीज' मुळे सध्याच्या पिढीला तळहातावर मावणार्‍या टॅब्लेटची सवय लागणे हा अगदी नैसर्गिक बदल मान्य केलाच पाहिजे.

आता केवळ 'नॉस्टॉल्जिया' नात्याने गेल्या अडीचशे वर्षाच्या ब्रिटानिकाच्या वाटचालीकडे पाहणे इतकेच उरले.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लेख. आपल्याला ज्या माध्यमांची सवय आहे ती जाऊन दुसरी आली की चुटपुट लागतेच. वाचनावर प्रेम असलं, ज्ञान मिळवण्यावर प्रेम असलं तर तो पुस्तकाचा स्पर्श, लायब्ररीचं वातावरण, यांच्याविषयी आत्मीयता येणं साहजिकच आहे.

मध्ये कुठेतरी एडिसनचा दिवा - फिलामेंट वगैरे असलेला - आता पुन्हा बनवला जाणार नाही (बहुधा काही अपवाद वगळता) हे वाचलं होतं. त्या दिव्यांविषयी मला तसं काही प्रेम नाही पण एका स्थित्यंतराचं ते प्रतीक होतं. नवीन पद्धतीचे एक चतुर्थांश वीज खाणारे, अधिक काळ टिकणारे दिवे आता आहेत. एन्सायक्लोपीडियाविषयीदेखील तेच. विकीपेडिया जगभर सर्वत्र उपलब्ध आहे. फुकटात. लायब्ररीत जाणं, बाबापुता करून तो ग्रंथ वाचायला मिळवणं हे काही नाही. इंटरनेटचा वेगाने होणारा प्रसार पूर्ण झाला की झालं.

मला वाटतं जोपर्यंत प्रकाश टिकून रहातो तोपर्यंत दिवा कुठचा हे महत्त्वाचं नाही. ज्ञानाचंही तसंच. मात्र वैयक्तिक सवयी, आठवणी, ते स्पर्श, तो वास, ते वातावरण - पुन्हा कधी येणार नाही हे विसरता येत नाहीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद राजेश ~

मला वाटते गतस्मृतीची आस आपल्या रक्तात इतकी भिनली आहे की ती आसच मानव 'रोबोट' नाही हे सिद्ध करण्यास पुरेशी असते. वाचनावर नीतांत प्रेम करणार्‍या व्यक्तीला पुस्तक हातात आहे, संध्याकाळ झालेली आहे, गॅलरीत आरामखुर्ची टाकून पडलेला आहे, वाफाळलेल्या चहाचा मग शेजारी आहे, घरातील पोरेटोरे कुटुंबासह अंबाबाई मंदिराकडे दोन तासासाठी नक्की गेली आहेत.....आणि अशावेळीच मग ग्रेस 'मितवा' च्या ललितनिबंधात नेमके काय सांगत आहेत हे उमजते.....हे कॉम्प्युटरवरील अक्षरे पाहून समजेलच असे नाही. पुस्तक साथी बनतो तो इथे.

४० ते ५० हजार रुपयांचे ते ब्रिटानिका खंड विकत घेण्याची ऐपत नव्हती, नाही, हे तर स्पष्टच आहे माझ्याबाबतीत [आज सहज कुतूहलाने फ्लिपकार्टवर २०१० च्या सेटची किंमत पाहिली ती दिसली ६३ हजार रुपये], त्यामुळे थेट ग्रंथालयात जाण्याशिवाय गत्यंतर नाही. पण उलटपक्षी 'चेंज' म्हणून मला ते भावतेही, त्यानिमित्ताने चार ओळखीचे चेहरेही दिसतात, बोलणेही होते. आता 'ई' मुळे ब्रिटानिका कुठे अस्तंगत होणार नाही हे जसे सत्यच आहे, तद्वतच टेबलवर ते खंड ठेवून त्या (नव्या) पानांचा हवाहवासा वाटणारा गंध मिळणेही आता 'गतकालीन वैभव' गटातील घटना होणार.

[एडिसनच्या दिव्याचे उदाहरण आवडले.] तुम्ही म्हणता तसे 'प्रकाश आहे तो पर्यंत तो कुठल्या दिव्याकडून येतो हे महत्वाचे नाही'; तरीही माणूस हा संवेदनशील प्राणी असल्याने "जुन्या" गोष्टीं त्यागताना त्याला हुरहूर वाटतेच. नवीन घरात जाण्यापूर्वीच तिथे गीझर, वॉशिंग मशिन, वॉटर स्टोरेज टॅन्क आदी सार्‍या सुविधांची आईसाठी तरतूद केली होती. तरीही आईने जुन्या घरातील पाणी गरम करण्यासाठी ठेवलेल्या एक मोठ्या तांब्याच्या हंड्याचे ओझे ज्यावेळी ट्रान्स्पोर्टवाल्याच्या व्हॅनमध्ये ठेवल्याचे पाहिले त्यावेळी मला तिचा संताप आला होता. पण आज कळते की तिला तो हंडा पाणी भरून ठेवण्यासाठी नव्हे तर त्या निमित्ताने 'जुन्या आठवणी' जतन करण्यासाठी हवा होता.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख फारच आवडला.

छापील संदर्भ पुस्तक हातात असताना लगेच आवश्यकता नसलेले संदर्भही उगाच शोधण्याची सवय मलाही आहे; तुम्ही Z* शोधलात तसाच! एकातून एक शोधत जाणं सुरू होतं आणि दिवस कसा संपतो समजत नाही. पुढे विकीपिडीया चाळताना एका टॅबवरून वाचन सुरू करावं आणि दहा टॅब उघडाव्यात हे नेहेमीचं झालं. हा बदल फार त्रास न घेता झाला.
श्रावण, पुस्तक हाताळणीतला आनंद मी समजू शकते. पण एका शहरात, घरात दोन-तीन वर्षांच्यावर न रहाणार्‍या माझ्यासारख्या लोकांना संग्रह करण्याबद्दल संतांचे सगळे विचार घरं बदलताना आठवतात. त्यामुळे आता टॅबलेटवर पुस्तकं वाचायची सवय लावून घेते आहे

एन्सायक्लिपीडीआच्या बाबतीत हा बदल होणं कदाचित तरूण पिढीला संदर्भ ग्रंथ वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी उपयुक्तच ठरेल.

*त्यावरून उगाच आठवलं. माझ्या एका ब्रिटीश मित्राला पोलिश मित्राचं आडनाव फार आवडायचं. का म्हणे, तर त्यात एक सोडून दोन Z आहेत. हे ऐकल्यावर अर्थातच मी त्याला मराठी शिवी शिकवून ज्ञानवर्धन करणं आलंच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थॅन्क्स ३१४ ~

हो ना, त्या Z ची शोधाची मजा अनोखीच वाटली मला. पुढे अभ्यासातून वा वाचनातूनही काहीशी उसंत मिळाली की, मग मी टु किल द टाईमसाठी रॅकमधून हाताला येईल त्या लेटरचा खंड घेत असे [मला अगदी फ्री अ‍ॅक्सेस होता लायब्ररीचा....शिवाय घरही कॉलेजपासून अगदी ज्याला वॉकेबल डिस्टन्स म्हटले जाते तितक्याच अंतरावर असल्याने घरी परतण्याचीही घाई नसायची] आणि मग अगदी मजेत खंड उघडल्या क्षणीच पहिल्याच झटक्यात जे पान समोर येई त्यावरील मजकुरात मी डाईव्ह घेत असे. कित्येकदा अनपेक्षित हवीहवीशी माहिती समोर झळकायची. उदा. जॉन केनेडी खून शोध प्रकरणासाठी जॉन्सन सरकारने नियुक्त केलेले 'वॉरेन कमिशन' संदर्भातील माहिती समोर आली. म्हणजे मला फक्त अर्ल वॉरेन हे नाव माहीत होते पण त्या पानावर कमिटीवर नियुक्ती करण्यात आलेल्या अन्य सदस्यांचीही नावे आली. परत मग त्या ऐतिहासिक घटनेविषयीचा सारीपाट पाहणे आले, तसेही झालेच. हा ब्रिटानिका सोबत असण्याचा फायदा.

(हे मी प्री-इंटरनेट इरा काळातील आठवण सांगत आहे. त्या काळी टीव्हीही नव्हता त्यामुळे कॉम्प्युटर जग कानी पडलेही नव्हते)

अवांतर : त्या पोलिश मित्राच्या आडनावातील डबल "झेड" किस्सा रोचकच. त्यावरून मला आठवला जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस या दोन दिग्गजांमध्ये रंगलेला 'इंग्रीड बर्गमन' च्या नावातील स्पेलिंगबाबतचा वाद. N एक की दोन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मार्गदर्शकाच्या जुन्या अवताराला श्रद्धांजली.
कालाय तस्मै नमः

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कालाय तस्मै नमः

+१
असेच म्हणतो. चवली ते टाइपरायटर या मालिकेत अजुन एकाची भर, कालाय तस्मै नमः हेच खरं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कुठलीच बाब कायम नसते. अनिश्चितता हीच एक निश्चित बाब या जगात आहे. असली वाक्ये आपण नेहमीच ऐकत / वाचत आलेलो आहोत.

>

ब्रिटानिका चा सदर निर्णय देखील याच प्रकारात मोडणारा असण्याची शक्यता आहे. कदाचित पुन्हा ते मुद्रित आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतीलही (जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले पाहून पाहून लोकांच्या डोळ्यांच्या खाचा व्हायची वेळ आलेली असेल). मुद्रण प्रकारातही कदाचित तोवर क्रांती झालेली असेल. अतिशय स्वस्तात व पर्यावरणाचा नाश न करता (शक्यतो कचर्‍यातील पॉलिमरचा पुनर्वापर करून) न फाटणारी पाने बनवून त्यावर ही छपाई अस्तित्वात आलेली असेल. अगदी काहीही घडू शकते, ज्याची आपण (निदान मी तरी) या क्षणी कल्पनाही करू शकणार नाही. तेव्हा तुम्हाला हा तुमचा आवडता ग्रंथराज पुन्हा हाताळायला मिळू शकेल अशी आशा आहे.

अवांतर :- अनेकांच्या वाहनात पूर्वी कार कॅसेट प्लेयर असायचा. आता बहूतेकांनी ते काढून त्याच्या जागेवर सीडी / डीवीडी / बीआर्डी / यूएसबी प्लेयरची स्थापना केली. परंतू माझे एक ज्येष्ठ मित्र (वय वर्षे ६३ फक्त) यांना त्यांच्या १९९६ च्या प्युजोट कार मधील कॅसेट प्लेयरचा दर्जा इतका आवडतो की त्यांना ते बदलण्यात रस नव्हता. तेव्हा त्यांनी बाजारातून एक अशी कॅसेट आणली की जी त्या प्लेयरमधे आत सरकविता येते आणि त्यातून पुन्हा एक बारीक वायर बाहेर येते. या बारीक वायरच्या दुसर्‍या टोकाला आयपॉड / मोबाईल इत्यादी जोडून त्यावरील संगीत कॅसेट प्लेयरमधून ऐकता येते. जुनी वस्तू कालबाह्य ठरण्याची शक्यता या केसमध्ये मावळली, आणि माझे मित्र अजुनही त्यांच्या आवडत्या प्लेयरचा आस्वाद घेऊ शकताहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुम्ही म्हणता त्यात काही तथ्य आहे चेतन जी. पुढे भविष्यात नवीन मंडळ कदाचित नव्याने सध्याच्या स्थितीची पुस्तकरुपातील आवृत्ती आणण्याचा विचार करतीलही. त्यामुळे तशी आशा जिवंत राहील यात शंका नाही.

कॅसेट प्लेयरच्या ओढीचे उदाहरण अगदी समर्पक आहे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लायब्ररीचा वापर कसा करावा या संदर्भात तिथले ग्रंथपाल आणि समिती सदस्यांनी सार्याा लायब्ररीची आमच्या बॅचला सफर घडवून आणली.
सॉलिड लकी आहात असं वाटलं. ग्रंथपालाना विद्यार्थांनी पुस्तकांना हात लावू नये ह्यासाठी पगार देतात की काय (काही बाबतीत कडक धोरण योग्य आहे, पण विद्यार्थी पुस्तक खराबच करणार हे काही बरोबर नाही), इतपत समज होईपर्यंत वाईट वागणूक मिळाली.
नॉस्टॅल्गिक टच असलेला आपला लेख आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

थॅन्क्स प्रसाद ~ शुअर वुई वेअर लकी एनफ इन दॅट रीस्पेक्ट. अर्थात माझ्या या संदर्भातील आठवणी ८० च्या दशकातील म्हणजे जवळपास २५-३० वर्षापूर्वीच्या आहेत. त्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये शासनाचेच 'ग्रंथपालन वर्ग' ही चालायचे. त्याचे 'कंडक्टर' खुद्द प्रमुख ग्रंथपालच होते. कदाचित त्या अनुषंगाने 'विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय परिचय' असा एखादा भाग त्या सिलॅबसमध्ये असण्याची शक्यताही असणार. पण आम्ही जरी त्या कोर्सचे विद्यार्थी नसलो, तरी आम्हाला त्याबाबतीत सुखद अनुभव आले होते हे आवर्जुन नमूद करावेसे वाटते. श्री.बोन्द्रे आडनावाचे एक चांगले गृहस्थ आमच्या कॉलेजचे ग्रंथपाल होते आणि मी प्रथम वर्षाचा विद्यार्थी असूनही कथाकादंबर्‍यासाठी नव्हे तर सातत्याने ब्रिटानिकासाठी त्यांच्याकडे कार्ड जमा करत असे याचे त्याना फार कौतुक होते. पुढेपुढे तर ते कार्ड घेतही नसत आणि मला स्टॅकरूमच्या आतील बाजूस बसण्याची परवानगीही दिली. घरही कॉलेजपासून अगदी 'वॉकेबल डिस्टन्स' वर असल्याने वेळेचीही चिंता नव्हती. पदवी घेऊन मी कॉलेजला रामराम करून विद्यापीठात दाखल झालो तर याच श्री.बोन्द्रे यानी तेथील ग्रंथपालासाठी माझ्याबाबत एक पत्र दिले होते. तिथेही असाच सुखद अनुभव आला.

अर्थात तुम्हाला कॉलेज ग्रंथालय आणि ग्रंथपालांबाबत उदासिनतेचा आलेला अनुभव इथल्या कित्येकांना आला असणार. त्याला कारणही बर्‍याच व्यक्ती ग्रंथपालाची नोकरी ही ग्रंथप्रेमापोटी करतात की वेतनापोटी करतात याचा प्रश्न पडतो. एखादाच शां.शं.रेगे, ज्याच्या या क्षेत्रातील अभ्यासाला सलाम करावा.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तर निव्वळ, आमच्या आय-टी भाषेत सांगायचं तर, Version 2.0 आहे. Wink

शाळेत असताना एका मित्राकडे वर्ल्ड बूक एनसायक्लोपेडीया(+डिक्शनरी) होता. तीन चार किलोचं एक असं असे दहा-पंधरा ग्रंथांच ते संकलन तेव्हा २०-२५ हजार रुपयांना मिळायचं. चकचकीत अन गुळगुळीत पानांचा, रंगीबेरंगी एनसायक्लोपेडीया कधीतरी विकत घेऊ असं स्वप्नं तेव्हा आम्हालाही पडायचं (बाकी आम्ही मोडक म्हणतात त्या पुढच्या पिढीचेच बरंका! Wink ). लिओनार्डो द विंचींनं काढलेलं हृदयाचं चित्र पहिल्यांदा त्यातच पाहिलं. इकडची तिकडची माहिती तर झालंच पण अभियांत्रिकीच्या अनेक गोष्टी सुद्धा इनसाक्लोपिडीयातच वाचायची सवय तेव्हा लागली होती. एअरक्राफ्ट सिस्टीम्स शिकत असताना इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आमच्या अभ्यासक्रमातल्या पुस्तकात नव्हतं पण एनसाक्लोपेडियात होतं. (तेव्हा इंटरनेट आजच्या इतकं घराघरात नव्हतं). पुढे ब्रिटानिकाची सीडी पहिल्यांदा पाहिली आणि त्याची किंमत कळल्यावर एनसायक्लोपेडीया मिळवण्याचं स्वप्न लवकरच साकार होईल असा दिलासा मिळाला. पुढे इंटरनेट नियमीत वापरायला लागल्यानंतर मात्र एनसायक्लोपेडिया फुकटातच मिळाला!

पुस्तकरुपातला एनसायक्लोपेडीया अगदी जिव्हाळ्याने हाताळला असला तरी हा होत असलेला बदल "अरे रे" असे उद्गार माझ्या मनात तरी अजिबात आणत नाहीए. पाच सहा महिन्यांआधीच वर्ल्डबुक घ्यावं का असा विचार करत होतो, शेल्फमध्ये चांगलं दिसेल म्हणून. पण आजही ती किंमत पाहिल्यावर, इतके पैसे आज कोण देईल हा प्रश्न पडल्याशिवाय रहावत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नक्की निलेश....जरी पुस्तकरूप बंद होणार असले तरी डिजिटल आणि ऑनलाईन अवतार चालूच राहाणार असल्याने तुम्ही म्हणता तसा नूतन व्हर्जनचाच हा प्रकार आहे.
पण असे असले जे आता अदृश्य होणार त्याची हुरहूर माझ्यासारख्यांनी ज्या खंडाच्या सहवासात तब्बल तीस वर्षे काढली त्याना जास्तच जाणवणार आणि ते नैसर्गिकच आहे. अवाढव्य किंमत कधीच आवाक्यात नव्हती म्हणून तर ज्या ज्या ठिकाणाच्या ग्रंथालयात हे सेट असत तिथे जाण्याची मजा आजही आहे, पण त्या रॅक्समध्ये 'लेटेस्ट एडिशन्स' येण्याचे बंद होणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाची छापील आवृत्ती बंद होणार या विषयावर कुळाला तरी लिहावेसे वाटले आणि काही लोकांना वाचावेसे वाटले हेही उत्साहवर्धक आहे.
'ई-बुक्स' किंवा ज्ञानकोषांच्या 'ई' आवृत्त्या यांशी जुळवून घेणे अपरिहार्य आहे. पण 'हाडामासाचे' पुस्तक ते वेगळेच. मला वाटते, या गोष्टींची सवय करुन घ्यावी लागेल. फणस, शेपूची भाजी, शेवग्याच्यी शेंगा (आणि सुनीताबाई म्हणतात तशी बीयर!) यांसारखी एकदा या गोष्टींची सवय झाली की मग त्यासारखी मजा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

इथे थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून या बातमीकडे पाहिलं आहे. छापील पुस्तकं टिकून राहतील, पण आपल्या लहानपणी छापील पुस्तकाला जे उच्चभ्रू मूल्य होतं ते आता नसेल असं लेखक म्हणतो. मध्यमवर्गीय आकांक्षांचं प्रतिबिंब ब्रिटानिकामध्ये पडत होतं असंही तो म्हणतो. याविषयी आणि एकंदर ब्रिटानिका साम्राज्यामागच्या व्यावसायिकतेविषयी (आणि तिच्या अभावाविषयी) एका रोचक लेखाचा दुवाही त्या लेखात आहे. आंतरजाल किंवा विकीपीडिआपेक्षा मायक्रोसॉफ्टचा एन्कार्टा विश्वकोश ब्रिटानिकाच्या प्रारब्धात मोठ्या घडामोडी आणणारा ठरला असं त्यात म्हटलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सर्वश्री सन्जोप राव आणि चिंतातुर जंतू
~ तुम्हाला ब्रिटानिका हा विषय भावणार याची मला खात्री होती. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

१. श्री.राव : नक्की. चालूच नव्हे तर अगदी मागील दशकाच्या सुरुवातीपासून "ई" माध्यमाने वाचनसंस्कृतीमध्ये जाणवण्याइतका शिरकाव केला होता आणि त्याची प्रगती नव्या पिढीला जितकी उत्साहवर्धक वाटत गेली, तितके स्वागत माझ्यासारख्या मागील पिढीतील व्यक्तीला करणे जड जरी गेले तरी त्याची अपरिहार्यता नक्कीच समजली होती. पण जसे वर श्री.मन आणि श्रे.ऋषिकेश म्हणतात तसे 'कालाय तस्मे नमः" म्हणणे अटळ आहे. तरीही जी.एं.चा 'प्रवासी' म्हणतो त्याप्रमाणे "कल्पनेतील बोरापेक्षा प्रत्यक्ष हाती असलेले बोर मोलाचे ठरते...." तद्वतच "ई" पेजवरील ट्रॉयच्या हेलेन पेक्षा ब्रिटानिकाच्या पानावरील हेलेनविषयीची आपुलकी जिवंत वाटेल....अर्थात ज्यानी ब्रिटानिका हाताळला आहे किमान त्याना.

२. श्री.चि.जं. ~ सुरेखच आहे तो पीडीएफ मधील केलॉगचा लेख. एन्कार्टाने ब्रिटानिकापुढे केलेले 'आर्थिक गणित' कसे ब्रिटानिकाला पचविणे जड गेले ते शेवटच्या परिच्छेदात आहेच. १९९५ ला तब्बल ९९५ डॉलर्स किंमतीची ब्रिटानिकाची सीडी लागलीच पुढील वर्षी १९९६ मध्ये अवघ्या २०० डॉलर्सला द्यायला मॅनेजमेन्ट तयार होते आणि तरीही एन्कार्टावर काहीच परिणाम होत नाही याचाच अर्थ बिल गेट्सचे गणित जादा व्यावहारिक होते हे सिद्ध झाले. मला वाटते, त्यानंतर ब्रिटानिका बाजार सावरू शकले नाहीत.

लेखाच्या लिंकबद्दल खूप धन्यवाद.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0