फोटोग्राफीच्या इतिहासातील (काही) पाने

सेल्फीच्या या जमान्यात प्रत्येक मोबाइलधारक स्वतःला आपण फोटोग्राफर आहोतच या मस्तीत ढिगाने फोटो काढत असतो (व फॉर्वर्ड करून मोबाइलची मेमरी भरत असतो.) स्मार्टफोनधारकांना तर याविषयी आकाशच ठेंगणे वाटत असते. खरे पाहता मोबाइल तंत्रज्ञानामुळे मनगट्यावरील वॉचेस व भिंतीवरील घड्याळं कायमचे गायब होतील असे वाटत होते. परंतु तसे काही न होता उलट ही इंडस्ट्री भरभराटीत धंदा करत आहे. व बाजारात महागड्या वाचेस् खपवत आहे. त्याचप्रमाणे फोटो काढायची सुविधा मोबाइलमध्ये आल्यानंतर बाजारातून कॅमेरे व फोटोग्राफर्सचे स्टुडिओ अस्तंगत होतील असे वाटत होते. परंतु फक्त फोटोग्राफिक रोल्सचे उत्पादन करणाऱ्या कोडक, अग्फा, ओर्वो सारख्या व फोटोग्राफीसाठी लागणाऱ्या रसायनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या वगळता कॅमेरा व त्याच्यासाठीचे इतर साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्या भलत्याच तेजीत आहेत.

18व्या शतकाच्या शेवटपर्यंत एखाद्या बॉक्सचा वापर करून समोरचे दृश्य पकडून ठेवता येते ही कल्पनेच्या पलीकडची होती. 19व्या शतकाच्या सुरुवातीला निसेफोर नीप्से यांनी फोटोग्राफिक तंत्राचा शोध लावल्यानंतर मात्र समोर दिसणाऱ्या चित्राला हुबेहूबपणे कागदावर उतरवून पुन्हा पुन्हा बघू शकतो हे लक्षात आले. परंतु हे उमटलेले चित्र धूसर व केवळ काळ्या-पाढऱ्या रंगात असूनसुद्धा त्याची नाविन्यता लोकांना भुरळ पाडू शकली. पहिल्या पहिल्यांदा फोटो एक्स्पोजरसाठी 6-8 तास लागत होते. नंतर काही वर्षानी लुई डगेरो या निसेफोर नीप्सेच्याच विद्यार्थ्यानी शोधलेल्या तंत्रामुळे ही वेळ काही मिनिटापर्यंत आली. या खडतर सुरुवातीनंतर फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा विकास होत होत रंगीत फोटो व त्यानंतर डिजिटल फोटो यांचे तंत्रज्ञान विकसित झाल्या.

या विकास होत गेलेल्या तंत्रज्ञानाचे फोटोच्या स्वरूपातील पुराव्यांची झलक खालील फोटोमधून बघता येईल. कदाचित ऐसी अक्षरेच्या वाचकांना हा इतिहास आवडेल.

निसेफोर नीप्सेनी काढलेला पहिला फोटो (1826)

01

पहिल्या फोटोची सुधारित प्रत
"02

माणसाचा पहिला फोटो (1838)

03

पॅरिसमधील एका रस्त्याचा फोटो काढत असताना योगायोगाने एक जण बूट पॉलिश करून घेत असतानाचे दृश्यही त्यात टिपले गेले. या फोटोची एक्स्पोजरची वेळ 10 मिनिटं होती.

पहिली सेल्फी (1839)

05

रॉबर्ट कॉर्नेलिअसचा हा फोटो असून स्वतःचाच फोटो स्वतः काढत असताना अनेक वेळा कॅमेरा ऑन-ऑफ करत असल्यामुळे फोटो धूसर आला आहे.

वृत्तपत्रासाठीचा सर्वात जुना फोटो (1847)

06

पॅरिसमध्ये कैद्यांना पकडल्या वेळचा हा फोटो असून फोटोग्राफर व फोटोतील व्यक्तींच्या बद्दलची माहिती उपलब्ध नाही.

आकाशातील चंद्राचा पहिला फोटो (1840)
3
07

जॉन विलियम ड्रेपर यानी चंद्राचा काढलेला हा फोटो इतकी वर्षे जपून ठेवत असताना खराब झालेला आहे. तरीसुद्धा डगेरोटाइप तंत्रज्ञान वापरून अंधाऱ्या रात्री काढलेल्या या छायाचित्रात चंद्राची छबी उठून दिसते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा पहिला फोटो (1843)

08

अमेरिकेचे सहावे राष्ट्राध्यक्ष, जॉन किन्सी अ‍ॅडम्स यांचा हा फोटो फिलिप हास या फोटोग्राफरने वाशिंग्टन येथील त्याच्या स्टुडिओत काढला होता.

पहिला एरिअल फोटो (1860)

09

राइट बंधूंचे पहिले विमान उड्डाण 1903 साली झालेले असल्यास 1860 साली एरिअल फोटो कसा काढला असेल? जॉन वॅलेस ब्लॅक यानी गरम हवा भरलेल्या बलूनला कॅमेरा बांधून हा बोस्टन शहराचा एरिअल फोटो काढला होता. या फोटोत आकाशात भराऱ्या मारणारे घारसुद्धा दिसतात.

वादळवाऱ्याचा पहिला फोटो (1884)

10

14 मैल लांबून दिसणाऱ्या वादळवाऱ्याचा हा फोटो ए ए अ‍ॅडम्स या फोटोग्राफरने कन्सासच्या अँडर्सन कौटीतील एका बागेत कॅमेरा ठेऊन काढला होता.

सूर्यग्रहणाचा पहिला फोटो (1851)

11

सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याच्या परिवलयाला फोटोमधून टिपणे फारच जिकिरीचे ठरले असेल. रशियातील रॉयल ऑब्झर्वेटरीतील जोहान ज्युलियस फ्रेड्रिक बेर्कोव्हस्की या वैज्ञानिकाने ही किमया साधली.

पहिला रंगीत फोटो (1861)

12

फोटोग्राफी तंत्रज्ञानाच्या शोधापासूनच्या वर्षापासून अगदी विसाव्या शतकातील 90च्या दशकापर्यंत बहुतेक फोटोग्राफर्स ब्लॅक अँड व्हाइट फोटोलाच वेगवेगळे रंग देत ‘रंगीत’ फोटोची निर्मिती करत होते. परंतु रंगीत फोटोच्या तंत्रज्ञानाचा शोध 1861 सालीच झाला होता. जेम्स क्लार्क मॅक्सवेल या स्कॉटिश वैज्ञानिकाने SLR कॅमेराचा शोध लावला व त्यानीच पिवळ्या, निळ्या व तांबड्या टार्टन रिबन्सवर तीन वेगवेगळे फोटो काढून त्या एकत्र करून खराखुरा पहिला रंगीत फोटो काढला. परंतु ही प्रक्रिया फार महागडी असल्यामुळे रंगीत फोटोचा जास्त प्रचार होऊ शकला नाही.

पाण्याखाली काढलेला पहिला फोटो (1926)

13

समुद्राच्या तळाशी जाऊन रंगीत फोटो काढणे आव्हानात्मक ठरते. कारण फोटोच्या एक्स्पोजरच्या क्षणी प्रखर प्रकाशाची गरज भासते. एवढा उजेड पाण्याखाली नसतो. शिवाय कॅमेरा व इतर साहित्य जलनिरोधक असाव्या लागतात. चार्ल्स मार्टिन व विलियम लाँग्ली या नॅशनल जियाग्रफीक्ससाठी काम करणाऱ्या फोटोग्राफर्सनी ज्वालाग्राही मॅग्नेशियम असलेले फ्लॅश गन व जलनिरोधक पेटीत कॅमेरा ठेऊन फ्लोरिडा जवळच्या समुद्राच्या तळाशी जाऊन हा रंगीत फोटो काढला होता.

पहिला डिजिटल फोटो (1957)

14

आजकाल डिजिटल फोटोग्राफीचे पेव फुटले असले तरी 1970 पर्यंत डिजिटल कॅमेराचा शोध लागला नव्हता. त्याकाळी स्कॅनर वापरून डिजिटल फोटो काढले जात होते. रसेल किर्ष्च यानी ड्रम स्कॅनर तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मुलाचा हा फोटो काढला आहे.

संदर्भ

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो संकलन आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.