सुखाचा शोध

सुखाच्या मागे मागे आपण धावत रहावे का?

कदाचित हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा वाटेल. परंतु सुखी माणसाचा सदरा सापडणे व वाळवंटातील मृगजळ पकडणे दोन्ही सारखेच ठरतील. सुखाचा शोध घेण्याचा मार्ग फारच खडतर आहे याची जाणीव बहुतेकांना आहे व या मार्गावरील खड्ड्यात पडणार्‍यांची, टक्के टोणपे सहन करत राहणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नाही. या मार्गाच्या शेवटच्या टप्प्यात परमसुख मिळणार आहे या आशेने आपण माग्रक्रमणातील दु:ख, वेदना, त्रास, विसरून पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो. भरपूर पगाराची नोकरी, मुबलक (अतिरिक्त!) पैसा (disposable income), प्रशस्त घरात वास्तव्य, आवडत्या संगातीबरोबरचे कौटुंबिक सौख्य, आरोग्यमय जीवन, इत्यादीत अडकून घेतल्यामुळे आयुष्यात या व्यतिरिक्तही काही गोष्टी असू शकतात, त्यातूनही मानसिक समाधान मिळू शकते, हे आपण विसरत आहोत. इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहोत.

सुखाच्या शोधातील मार्गस्थाला सुरुवातीला अनेक प्रकारच्या उपदेशांना, सल्ल्यांना तोंड द्यावे लागते. काही उपदेश नक्कीच मार्गदर्शी व good sense चे असतात. उदाहरणार्थ, परस्परातील सौहार्दपूर्ण वर्तन, इतरांसाठी त्याग, कृतज्ञता, यातच सुख असून स्वार्थीपणात, अप्पलपोटेपणात नसते, हा उपदेश नक्कीच आपल्याला उपयोगी पडू शकेल. त्याचप्रमाणे संपत्तीच्या मागे धावण्यात, किंवा सत्ता हाशील करण्यासाठी काहीही करत राहण्यात सुख नाही, हा सल्लासुद्धा योग्य ठरेल. परंतु कौटुंबिक सौख्य किंवा भरपूर संपत्ती काही निवडक नशीबवान व्यक्तींनाच मिळते व आपल्या नशीबात ते लिहिलेले नसल्यामुळे आपण प्रयत्न करण्याची गरज नाही, हा सल्ला कदाचित अस्थायी ठरेल.

मुळातच कशामुळे आपण सुखी (वा दु:खी) होतो हेच आपल्याला समजत नसते. म्हणूनच आपण सदान कदा सुखाच्या मार्गापासून भरकटत जातो. अनेक वेळा (आपल्या दृष्टीने) आयुष्याला कलाटणी देणार्‍या महत्वाच्या घटना किंवा आपले प्रयत्न - सकारात्मक वा नकारात्मक - फारच कमी प्रमाणात व कमी काळासाठी आपल्या सुख - दु:खात भर घालत असतात, हे आपण लक्षातच घेत नाही.

याचा अर्थ आपण सुखासाठी प्रयत्नच करू नये का? तसे नव्हे. फक्त आपण चांगल्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करत असताना आपल्या अपेक्षा आपल्या अंदाजाप्रमाणे पूर्ण होतीलच याची खात्री बाळगू नये, एवढाच इशारा देण्याचा उद्देश येथे होता. महत्वाचे म्हणजे आपण अशा प्रयत्नांच्या अनुभवातून जात असताना आपल्याला कशात समाधान व आनंद मिळू शकतो याचा अंदाज येईलच. त्यामुळे आपण उगीचच भव्य दिव्य मोठे काही तरी करत राहण्यापेक्षा ज्या अनुभवाद्वारे समाधान मिळते, त्यातच आणखी वाढ करण्यात गुंतून राहणे, प्रयत्न करत राहणे योग्य ठरू शकेल. आपण जे करत आहोत ते (फक्त) सुखासाठी नसले तरी काही जीवन मूल्यांसाठी त्यांच्या जोपासनेसाठी केलेल्या प्रयत्नात जे समाधान मिळते त्यातच खरे सुख दडलेले असते, याचे भान हवे. बाजारात उपलब्ध असलेली सुखाच्या शोधाबद्दलची शेकडो पुस्तक हीच गोष्ट आलटून पालटून सांगत असतात. परंतु मतितार्थ मात्र एकच असतो.

एकेकाळी सुख-समाधान-मानसिक शांती इत्यादीसाठी भगवंताला शरण जाणे हाच एकमेव उपाय होता. त्यासाठी बाबा, महाराज, माताजी इत्यादी भगवंताच्या दलालांची मनधरणी करावे लागत असे. (आजही असे करणार्‍यांची संख्या कमी नाही). परंतु आजकाल सुख -समाधानाच्या गुपिताची मक्तेदारी मानसतज्ञांकडे आहे की काय असे वाटत आहे. एकेकाळी धर्मगुरूंच्या मठातून वा देवळातून जाणारा हा परमोच्चसुखाचा मार्ग आजकाल मानसतज्ञांच्या क्लिनिकमधून जात असल्यामुळे काळजी वाटत आहे. कारण ही मंडळीसुद्धा अध्यात्माचीच कास धरण्याचा आग्रह करत आहेत.

पूर्वी मानसशास्त्र व तत्वज्ञान एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवत जात होते. परंतु सुमारे शंभर वर्षापूर्वी मानसशास्त्र स्वतंत्र वाटेने जाऊ लागली व तत्वज्ञानापासून फारकत (सोडचिठ्ठी) घेतली. परंतु हे करताना या विषयावर लिहिलेल्या पुस्तकांची वाटणी कशी करावी हा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला. शेवटी (कंटाळून!) मानसशास्त्राने याविषयाशी संबंधित सर्व पुस्तकं तत्वज्ञानाच्या खोलीत ढकलून दिले. (व ती पुस्तकं अजूनही तेथेच धूळ खात पडलेले आहेत!) परंतु आता एवढ्या वर्षानंतर मानसशास्त्राला या सुख-समाधानावरील पुस्तकांची तीव्रतेने आठवण होऊ लागली आहे. म्हणूनच मानसशास्त्र अती उत्साहाने सुख समाधानाचा शोध घेत आहे.

तत्वज्ञानाला आपल्या जुन्या मित्राला खरोखरच मदत करावयाची इच्छा असल्यास एखाद्या समस्येचे description व त्यासाठीचे prescription यामधील नेमका फरक काय असतो हे मानसशास्त्राला समजावून सांगणे गरजेचे आहे. मानसशास्त्र एखाद्याचे मन नेमके कसे काम करते याचे वर्णन करणारे शास्त्र आहे. परंतु आक्रमक मानसशास्त्रज्ञांना मात्र मानसशास्त्र म्हणजे लोकांनी कसे वागावे व वागू नये हे सांगण्याचे शास्त्र आहे असे वाटू लागले आहे.

कुटुंब वा समाजात राहिल्यामुळे सुख मिळत असल्यास आपले वर्तन कुटुंब - समाज यांच्या अपेक्षाशी सुसंगत असावे असा त्यांचा दावा असतो. उदाहरणार्थ, भोवतालचा समाज धार्मिक असल्यास, तुम्हाला आवडो न आवडो, तुम्हीसुद्धा धार्मिक असणे गरजेचे असते. धर्मपालन रूढी परंपरांचे ओझे तुमच्यावर लादते. परमेश्वरावर विश्वास ठेवण्याची सक्ती करते. मुळात धर्माची शिकवण सत्य काय आहे ते सांगणे असावे; तुम्हाला कशात समाधान मिळते हे सांगण्याचे त्याचे काम नाही. मानसशास्त्र खरोखरच विज्ञानाची भूमिका बजावत असल्यास अशा प्रसंगी तटस्थ असणे अपेक्षित आहे. कारण विज्ञानाला या गोष्टीशी काही देणे घेणे नाही. ते फक्त आपण आपल्या आयुष्याशी झगडत असताना त्यासाठी लागणारे काही ठराविक नियम, काही ठोकताळे, नैसर्गिक घडामोडी याविषयी सांगू शकते. तुम्ही सुखी राहण्यासाठी काय करत आहात - परमेश्वराला मानता की नाही; देवाची प्रार्थना करता की नाही - याच्याबद्दल विज्ञान काहीही सांगू शकत नाही.

मानसशास्त्रीयदृष्ट्या आपण मानत असलेले मूल्य व त्यांची जोपासना यासाठी करत असलेले प्रयत्न यानाच सुख - समाधानाची साधनं असे समजत असल्यास आणखी काही समस्या उद्भवू शकतात. उदाहरणार्थ, परस्पर सौहार्दता व संबंध हे आपल्या समाधानी आयुष्याचे सूचक आहेत. हे कदाचित मानसशास्त्राला मान्य होणार नाही. यात काही तरी काळे बेरे असावे, असा संशय मानसशास्त्र निर्माण करू शकते. या शास्त्राच्या मते मूल्य किंवा मूल्याविषयीची आपुलकी स्वायत्त असू शकत नाही. म्हणूनच मानसशास्त्र आपल्याला सुखी राहण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचवत असते. परंतु आपण काय करावे वा काय करू नये या गोष्टी कालांतराने नैतिकतेच्या अखत्यारीतील विषय होतात. त्यामुळे आपल्याला तत्वज्ञानाला शरण जावे लागते. परंतु तत्वज्ञान आपल्याला काय करावे वा करू नये हे सांगत नाही; फक्त आपण स्वत: निर्णय घेण्याइतके समर्थ व्हावे यासाठी ते प्रयत्न करते.

हेही नसे थोडके!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

परंतु आजकाल सुख -समाधानाच्या गुपिताची मक्तेदारी मानसतज्ञांकडे आहे की काय असे वाटत आहे. एकेकाळी धर्मगुरूंच्या मठातून वा देवळातून जाणारा हा परमोच्चसुखाचा मार्ग आजकाल मानसतज्ञांच्या क्लिनिकमधून जात असल्यामुळे काळजी वाटत आहे. कारण ही मंडळीसुद्धा अध्यात्माचीच कास धरण्याचा आग्रह करत आहेत.

भविष्यात बाबा बुवांची जागा हे मानसतज्ञ घेतील. त्या दिशेने वाटचाल चालूच आहे. मग त्यांचे संप्रदाय देखील होतील.फॅन क्लब म्हणा हव तर! सायकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट वा कौन्सिलर यांची गरज प्रत्येक कुटुंबाला लागेल. एकदा डॉ मोहन आगाशे एका कार्यक्रमात म्हणाले होते. 'लोकांमध्ये अशा चर्चा चालतील " तुमचे कोण? डॉ आगाशे का? आमचे डॉ वाटवे बर कां!"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/