भारत माझा बाजार आहे. सारे भारतीय कस्टमर आहेत. माझ्या बाजारावर माझे प्रेम आहे...

“अरे बाबा, तुला माहीत आहे का?” सकाळी शाळेच्या वाटेवर असताना आपल्या गाडीहाक्या बापाच्या ज्ञानात थोडी भर घालण्याच्या उद्देशाने चिंगी (वय वर्षे पाच) विचारती झाली.

“काय गं गुंडम?” समोरून रस्त्याच्या मधोमध प्रातर्विधी उरकून वळणाऱ्या गाईला वळसा घालत, दुसर्‍या गियरला तिसर्‍यात ढकलत, बाबाने आपले चार ज्ञानचक्षू उघडून ठेवले.

“अरे आपण जे टीव्हीवर बघतो ते सगळं खरं होतं!”

“काय सांगतेस? कसं काय गं?” बाबाचे ज्ञानचक्षू विस्फारले.

“काल मी झोरेमॉन पाहात होते तेव्हा ती ऍड लागली होती ना?”

“कुठली?”

“ती रे, फॅडबरीच्या फॉरियो बिस्कीटांची!?”

“हो का, मग?”

“अरे तीच बिस्कीटं मला काल गडुरा मॉलच्या त्या शॉपमध्ये दिसली.”

“गडुरा नाही...गरुडा”

“हां...गरुडा...अरे पण ती टीव्हीमधलीच बिस्कीटं तिथे कशी आली?”

“हॅ: हॅ:, गुंडमेश्वरी, अगं ती दुकानात विकायला ठेवली आहेत हे तुला कळावं म्हणून त्यांनी टीव्हीवर दाखवली.”

“पण ती बार्बीडॉलपण आधी मला 'आर्ट अटॅक’च्या वेळी दिसली होती!”

“हार्ट अटॅक?” बाबाचा ठोका चुकला.

“हार्ट नाही आर्ट...आऽऽर्ट...ते अंकल चित्र काढून दाखवतात आणि काय काय क्राफ्ट शिकवतात ना टीव्हीवर? तो प्रोग्रॅम.”

“ते होय. बरं बरं” तेवढ्यात बाबाचं लक्ष चौकात रातोरात बदललेल्या होर्डिंगवरच्या आकर्षिक सुंदरीकडे गेलं. चिंगीने ही संधी दवडली नाही.

“बाबा, मला तसा ड्रेस हवा.”

“कसा?”

“तो, ती आंटी घालून उभी आहे ना, तसा.”

“शी:, किती घाण दिसतोय तो...अख्खे खांदे उघडे दिसताहेत!”

मनोमन आवडलेल्या गोष्टीला खोटं खोटं नाक मुरडणे ही बाबापणाची एक जबाबदारी असते.

“ए छान दिसतोय...आपण माझ्या बर्थडेला घेऊया, ओके ?”

“नॉट ओके. आईला हे अजिबात आवडणार नाही.”

“अरे, पण आपण तिलापण घेऊया ना तसाच...”

“काय!” बाबा भयचकित! शेवटी आपल्या संस्कृतीचे रक्षण ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी असते आणि ती ते आपल्या बायकोच्या बाबतीततरी नेहमी सीरियसली घेतात.

“बरं, मग आपण माझ्या फ्रेंड्सना ‘पिझ्झा गट्ट’ मधे पार्टी देऊ, ओके ?”

“गेल्यावर्षी दिली होती ना? प्रत्येक बर्थडेला नसते काही बाहेर पार्टी द्यायची. त्यापेक्षा आपण घरीच सर्वांना बोलावून केक कापूया आणि काही स्नॅक्स देऊ.”

“मॅक्केन पोटॅटो स्नॅक्स?”

“ते कशाला? आई घरीच काहीतरी बनवेल ना!”

“पण ते खूप यम्म असतात...टीव्हीवर दाखवतात ना...आणि आईने काही बनवलं तर ती खूप दमेल...तिची पाठ दुखेल...मग काय तू तिला मूव्ह लावनू देणारेस का? आपल्याकडे ते नाहीच आहे!”

“काही दमत नाही आई. ती पोळीभाजी, वरणभात असं हेल्दी फूड खाते. त्यामुळे ती खूप स्ट्रॉंग आहे. तुझ्यासारखी फक्त नूडल्स आणि पास्ता नाही खात ती!” डोस पाजायची अशी संधी बाबा कसली सोडतोय.

“नूडल्सपण खूप हेल्दी असतात. त्यात रियल आटा असतो. बाबा, आटा म्हणजे काय?”

“आटा म्हणजे कणीक – गव्हाचं पीठ. तुला आटा म्हणजे काय तेपण माहीत नाही आणि म्हणे नूडल्स हेल्दी!”

“असं ते डॉक्टर अंकल सांगत होते.”

“कोण डॉक्टर अंकल?”

“त्या ऍडमधले.”

“पुन्हा ऍड ...अगं चिंगी, त्या ऍड वर जाऊ नकोस तू. त्यात काहीही दाखवतात. आता बघ...आपण

तुझ्यासाठी ती डोराची पेन्सिल आणली होती ऍड बघनू. त्याच्यामुळे मॅम खूष होतील असं ऍडमधे दाखवलं होतं. झाल्या का त्या खूष? उलट टोक सारखं मोडतं म्हणून ओरडल्या ना तुला?”

“हो रे. पण मग ते असं का दाखवतात टीव्हीवर?”

“खूप लोकांनी त्यांच्या गोष्टी विकत घ्याव्यात आणि त्यांना खूप पैसे मिळावेत म्हणून.”

“मग खूप पैसे मिळवून काय होतं, बाबा?”

आता क्लायमॅक्सचा साक्षात्कारी डायलॉग म्हणायची वेळ आल्याचं बाबाला जाणवलं. शाळेच्या गेटापाशी नो पार्किंगच्या बोर्डाखालीच गाडी उभी करत एकविसाव्या शतकाचे ते अंतिम सर्वव्यापी सत्य त्याने उद्याच्या त्या सिटीझनला, नव्हे, कनझ्युमरला सांगितले –

“खूप पैसे मिळवले की खूप गोष्टी विकत घेता येतात...तुम्हाला लागणाऱ्या आणि अजिबात न लागणाऱ्यासुद्धा!”

आपलं ‘छोटा भीम आणि चुटकी’ दप्तर पाठीला लावून चिंगी शाळेत शिरली. लवकरच घंटा होऊन,

शाळेची मौज पाहात थबकलेल्या बाबाच्या कानी कुठूनतरी प्रतिज्ञेचे शब्द पडले...

“भारत माझा बाजार आहे.
सारे भारतीय कस्टमर आहेत.
माझ्या बाजारावर माझे प्रेम आहे.
माझ्या बाजारातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या मॉल्सचा मला अभिमान आहे.
त्या मॉल्सचा रिपीट कस्टमर होण्याची हौस
माझ्या अंगी रहावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पॉकेटमनी देणार्‍यांचा, दुकानदारांचा
आणि जाहिरातदार कंपन्यांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाचा माल विकत घेईन.
माझा बाजार आणि माझे बाजारबुणगे
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यातच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद.”

(बाबाच्या लहानपणी त्याच्या पाठ्यपुस्तकातली प्रतिज्ञा काही वेगळीच होती. केवळ संदर्भासाठी ती इथे देत आहे.

भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तुम्ही सारस्वत काय हो? नाही म्हणजे, शीर्षकातले ते 'भारत माझा बाजार आहे' नि (खास करून) 'माझ्या बाजारावर माझे प्रेम आहे' वगैरे वाचून तसा ग्रह झाला खरा. ('बाजारा'चे इतके ऑब्सेशन त्याच लोकांना असू‌ शकते. चालायचेच.)

..........

बाकी, ती मॉक प्रतिज्ञा लिहून झाल्यानंतर खरी प्रतिज्ञा ('बाबाच्या लहानपणीची' म्हणून) लिहून दाखवावी लागली, यातच सगळे आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

छान टिप्पणी!
कुटुंबव्यवस्थेच्या बाजारीकरणाची वाट पहात आहे!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुटुंबव्यवस्थेचे बाजारीकरण नक्की कसे करता येईल, असे वाटते?

काही कल्पना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घरातील बिनकामाचे थेरडे इबेवर विकायला ठेवायचे. अनप्लॅन्ड पोरं ॲमेझॉनवर. बायको, नवरे काही दिवसांसाठी भाड्याने द्यायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

घरातील बिनकामाचे थेरडे इबेवर विकायला ठेवायचे.

कोण विकत घेईल? नि कशासाठी? (अनलेस, पेंढा भरून मुंडकी दिवाणखान्यातल्या भिंतीवर लटकवण्याची काही सामाजिक तरतूद करता आली तर.)

बाकीच्या दोन संकल्पना तत्त्वतः वाईट नाहीत. मात्र, त्यांत काही प्रॅक्टिकल अडचणी येतील किंवा कसे, याचा नीट व पूर्ण विचार करूनच त्या इंप्लिमेंट केल्या पाहिजेत.

अनप्लॅन्ड पोरं ॲमेझॉनवर.

१. अनप्लॅन्डच काय म्हणून?

२. भाड्याने देता/घेता येणार नाहीत काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटत होते की हा मुद्दा lightly घेतला जाईल. असो.
ढोबळपणे कुटुंबाची व्याख्या करत असल्यास कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. एकेकाळचे पारंपरिक स्वरूपातील अशा प्रकारचे कुटुंब म्हणजे जवळच्या परिघातील सर्व नातेवाइकांनी एकत्र राहणे. तसे स्वरूप आज दिसत नाही.
त्याचप्रमाणे बाजारीकरण या संकल्पनेचा गूगलवर शोध घेतल्यास खालील गोष्टी त्यात आढळतात. बाजारयंत्रणा फायद्याच्या प्रेरणेवर चालत असते. ‘Profit motive’ हा बाजारयंत्रणेचा प्राण आहे. बाजारयंत्रणेवर आधारित अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ म्हणजे स्वहित साधण्याचा प्रयत्न करतो व त्यातून समाजाचे हित साधले जाते. अडम स्मिथ याने आपल्या ‘अदृश्य हात’ (Invisible hand) या संकल्पनेत स्पष्टीकरण देताना असे म्हटले आहे की ““It is not from the benevolence of the butcher, the brewer and the baker that we expect our dinner but from their regard to their own interest.” इ.इ.
माझ्या मते कुटुंब व्यवस्था निरपेक्षपणे केलेल्या प्रेमावर टिकते. त्या प्रेमासाठी खस्ता खाल्या जातात. स्वतःचे हित बाजूला ठेवले जाते. कित्येक वेळा आवडो न आवडो, (नात्यातील) दुसऱ्याचे हित बघितले जाते. यात परतफेडीची अपेक्षा ठेवली जात नाही. दूरगामी परिणामांचा हिशोब केला जात नाही. आपल्या प्रेमामुळे व त्यासाठी घेतलेल्या शारीरिक, मानसिक श्रमामुळे दुसऱ्या व्यक्तीत होत असलेले परिवर्तनच आपल्याला आनंद देत असतो. या व्यवहारात प्रतिफलाची अपेक्षा ठेवली जात नाही. कुटुंब व्यवस्थेत सहजीवनातून मिळणारी प्रेरणा, निखळ आनंद-समाधान, अडचणीच्या प्रसंगात मिळणारा आधार, इत्यादी गोष्टी गृहित धरलेले असतात.
परंतु ज्या प्रकारे (आताच्या) शिक्षणाचे, आरोग्य व्यवस्थेचे, देव-धर्माचे, क्रीडा प्रकारांचे बाजारीकरण (झाले) होत आहे त्याच प्रकारे कुटुंब व्यवस्थेचे बाजारीकरण झाल्यास मुलां-बाळावर, वयोवृद्धावर केलेल्या प्रत्येक कृतीची, उच्चारलेल्या शब्दांची किंमत प्रत्येक जण वसूल करू लागल्यास कुटुंब व्यवस्थेला विकृत स्वरूप येण्याची शक्यता आहे. आपल्या मुलां-बाळांच्या तोंडात भरलेल्या प्रत्येक घासाची किंमत आई-वडील (पैशाच्या सवरूपात) वा मुलं आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठीचा मोबदला वसूल करू लागल्यास समाजाचे बराकीकरण होईल. व हा समाज रोबोसदृश माणसांने भरलेले असेल.
असे काहीही न होवो एवढीच अपेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण नबा, तुम्हाला गंमत आवडली नै का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुटुंबातील व्यक्तींचं बाजारीकरण होतच आहे. नवीन काय? फक्त त्यात आपल्या प्रत्येकाचं नाही.
लहान बाळ - न्यापी, पावडर, तेल.
वय ७- दात पडके.
वय ९-१३ - शंखपुष्पी
-/
--
म्हातारे - फुकटचे सल्ले

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त स्फुट आहे यावर नकलांच्या कार्यक्रमात एखादी नक्कल खूप छान बसेल. फक्त ते 'छोटा भीम आणि चुटकी' दप्तर कसे convey करायचे ते पहावे लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0