माझे सट्ट्याचे प्रयोग

गोव्याची मांडवी नदी राजधानी पणजीपाशी समुद्राला मिळते तिथे जवळच नदीच्या प्रवाहात किनार्‍यापासून थोडं अंतर ठेवून काही जहाजं नांगरुन ठेवलेली दिसतात. नदीतून नौकाविहाराला गेला असाल तर तुमची बोट त्या जहाजांशी लगट करतच गेली असेल. हे आहेत गोव्यातील प्रसिद्ध कसिनोंपैकी काही. सरकारी धोरणाप्रमाणे गोव्यात वैध जुगाराचे अड्डे फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा असे ऑफशोअर (म्हणजे जमीनीपासून दूर, बहुतेकदा नदीच्या पाण्यात तरंगत) असू शकतात. जेणेकरुन स्थानिक सामान्य (गरीब?) माणसाला जुगार खेळायचा मोह होऊ नये किंवा झालाच तर राजरोस अशा ठिकाणी जायला गैरसोयीचे असावे आणि खिशाला भरपूर भुर्दंड पडायच्या भीतीने त्याने लांबच राहावे हा हेतू. एकीकडे हे असं आणि दुसरीकडे पर्यटकांनी मात्र लोंढ्यांनी यावं,भरपूर द्यूतक्रीडा करुन कराच्या रुपाने गोव्याच्या तिजोरीत मापं टाकावीत असा शकुनी कावा. शासन यंत्रणेचं असं दुहेरी आपमतलबी वागणं हे काही नवं नाही. कात्यायनानंसुद्धा लिहून ठेवलं आहे की जुगार थांबवता येत नसेल तर सरकारी नियंत्रणाखाली चालू द्यावा आणि त्यातून राजाने राजस्व तरी गोळा करावा. अथर्ववेदात चक्क जुगारात जिंकायचा मंत्र आहे म्हणे. नारद स्मृतीतपण द्यूतक्रीडेकडे सहानुभूतीने पाहिले गेले आहे. कौटीलीय अर्थशास्त्रात तर जुगारात हातचलाखी करणार्‍यांना, फसवे फासे वापरणार्‍यांना शिक्षा काय करावी ते लिहून ठेवले आहे. म्हणजे जुगाराला शिक्षा नव्हती तर बिचार्‍या जुगर्‍यांना जे फसवू पाहतील त्यांची कंबक्ती होती. भले!

आपल्या पूर्वजांच्या आणि राज्यकर्त्यांच्या अशा सोयीस्कर व्यवहारी दृष्टीकोनाबद्दल त्यांचे मनोमन कौतुक करत मी नदीकिनार्‍याशी एका छोट्या बोटीत पाय ठेवला. तीच आम्हाला त्या कसिनो जहाजावर घेऊन जाणार होती. पाण्यात संथपणे डुलणारी ती जादुई गलबती दुनिया जवळ आली तेव्हा छोट्या बोटीच्या सुकाणूवर बसलेल्या एकाने आम्हा सर्व भावी गॅम्बलर्सना तोंडभरुन शुभेच्छा दिल्या. पण नंतर दुसरीकडे तोंड करुन त्याने स्वत:लाच एक डोळा मारला असा काहीसा मला भास झाला.

त्याचा काय अर्थ असावा असा विचार करतोय तोपर्यंत मी आत शिरलो. गेल्या गेल्या हिन्दी चित्रपटांत दाखवतात तसे एक दालन दिसले...लाल भडक गालीचा, सोनेरी नक्षीकाम केलेले फर्निचर,भरपूर दिवे असूनसुद्धा जेमतेम उजेड पडावा अशी खुबीने केलेली प्रकाशयोजना आणि कडक इस्त्रीच्या गणवेशात उभे उंचेपुरे पण अदबशीर मदतनीस. ते माझ्या मनगटावर बांधलेल्या फीतीकडे बघून मला जोखत होते असं जाणवलं. तिच्या रंगावरुन मला कुठल्या मजल्यावरच्या कुठल्या दालनात शिरु द्यायचे किंवा नाही याबद्दल त्यांचे काही संकेत होते. खरं तर माझा चेहराच अशा ठिकाणी बोलका होतो. ह्या नवीन वेडपटाला सर्वात स्वस्त पैजा जिथे लावता येतात त्याच ठिकाणी सोडायचं हे कुणीही माझ्या फीतीचा रंगसुद्धा न बघता ओळखलं असतं.

तर मी किमान १०० रुपयांची पैज असलेल्या एका टेबलापाशी आलो. खेळ तसा सोपा होता. आपण सापशिडीत वापरतो तसे दोन फासे टाकून बेरीज सात पेक्षा अधिक किंवा कमी किंवा सातच येईल यावर पैसे लावायचे. या सोप्या खेळात एकदोनदा हरल्यावर आणि एकदोनदा जिंकल्यावर मला जरा हुरुप आला. आयला जमतंय की. डोक्याचा भाग फारसा न वापराव्या लागणार्‍या सगळ्या गोष्टी मी नेहमीच जास्त आत्मविश्वासाने करु शकतो. नव्या उमेदीने आणि चाळवलेल्या उत्सुकतेने मी पुढच्या टेबलाकडे वळलो. इथे खूपच गर्दी होती आणि ह्या लोकप्रिय खेळाला रूलेट्ट म्हणतात असे कळले. एक छोटा चेंडू खोबणीत बसवलेल्या गरागरा फिरणार्‍या चक्रात टाकायचा. त्या चक्राच्या परिघावर १ ते ३६ आकड्यांचे कप्पे असतात. टणाटण उद्या मारत तो चेंडू चक्र फिरायचं थांबतं तेव्हा एखाद्या नंबराच्या कप्प्यात जावून विसावतो. त्या नंबरवर तुम्ही पैसे लावले असतील तर तुमची चांदीच. असं थेट एकाच नंबरावर तुम्ही नशीब आजमावू शकता किंवा सम अथवा विषम क्रमांक येईल अशी पैज लावू शकता. नाहीतर लाल किंवा काळ्या रंगाच्या कप्प्यात बॉल जावून पडेल असा अदमास बांधून जिंकायचा पर्यायही असतो. आणखीही बरीच कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या आवडत्या पद्धतीने बुद्धू बनायची सोय असते. पण तो चेंडू उड्या मारत असतानाचं थ्रिल आणि कधीमधी जिंकायचं समाधान अनुभवण्यासाठी बरेचसे लोक राजीखुशीने बर्‍याचदा बुद्धू बनायला तयार होतात.

ही गंमत बघून आणि खिसा थोडासा हलका करुन मी पत्त्यांच्या टेबलाकडे मोर्चा वळवला. ब्लॅकजॅक, बॅक्करा, पोकर, तीन पत्ती असे बरेच पर्याय होते. एक कसिनो वॉर नामक अगदी सोप्पा गेमपण होता. पत्तेवाट्या तुम्हाला एक पत्ता देणार आणि स्वत:ला एक घेणार. ज्याचं पान जड तो जिंकला. ब्लॅकजॅकमध्ये २१ च्या जास्तीत जास्त जवळ जायचं हा उद्देश. पण २१च्या वर गेलात तर तुम्ही हरलात. समजा डीलरकडे एक राजा (१० गुण) आणि पंजी (५ गुण) आली आणि तुमच्याकडे एक सत्ती (७ गुण) आणि एक राणी (१० गुण) असेल तर तिसरं पान घेण्याआधी तुम्ही थोडा शक्याशक्यतेचा विचार करायचा. चौवी (४ गुण)पेक्षा मोठं कुठलंही पान आलं तर तुम्ही बाहेर. पान न घेता तुम्ही खेळ चालू ठेवलात आणि डीलरकडे तिर्री (३ गुण) जरी आली तरी तो २१च्या जास्त जवळ पोचणार आणि तुमचे पैसे स्वाहा करणार. पण त्याच्याकडे सत्ती आली तर मात्र तुम्ही जिंकणार कारण तो २१ च्या पलीकडे गेलेला असेल. हॉलीवूडचा एक अख्खा सिनेमाच आहे या विषयावर – नाव आहे ‘२१’. आपल्याकडेही त्याच धर्तीवर ‘तीन पत्ती’ नावाखाली एक आला होता काही वर्षांपूर्वी. पण अमिताभ असूनही तो साफ आपटला तो भाग वेगळा.

आधीचा तोटा पत्त्यांच्या खेळांमधे थोडा भरुन निघाल्यावर मी महात्प्रयासाने मनाला आवर घातला आणि जरा फेर फटका मारावा आणि पोटपूजा करावी म्हणून वरच्या मजल्यावर गेलो. तिथे मनोरंजनाचा कुंभमेळाच भरला होता. फॅशन शो काय, जादूचे प्रयोग काय, बॉलीवूडच्या गाण्यांवर नाच काय, तंबोला काय, जत्राच भरली होती जहाजावर! आपण नदीच्या पाण्यावर तरंगतोय हे विसरायलाच झाले होते एव्हाना. शेठजी खाली बेछूटपणे पैसे उडवताहेत आणि शेठाण्या आणि त्यांची बाळे वर सतराशे साठ खाद्यपदार्थांवर तुटून पडताहेत. भारत हा गरीब देश आहे वगैरे विधानं पटतच नाहीत अशा ठिकाणी. असो. आपल्याला काय, सरकारला टॅक्स मिळतोय ना? मग झालं तर.

इथपर्यंत आलोय तर दुसर्‍या मजल्यावर काय आहे ते पण पाहावे असा विचार केला. मनगटी फीत माझ्या शर्टाच्या बाहीने झाकत चेहेर्‍यावर पराकाष्ठेने शेठचा आव आणत मी घुसलो. आश्चर्य म्हणजे कोणीच मला अडवले नाही. इथे ‘हाय स्टेक्स’ म्हणजे अत्युच्च रकमांच्या पैजा लावणार्‍यांनाच प्रवेश होता. म्हणूनच गर्दी तुरळक होती. पण सर्वत्र लक्ष्मीपुत्रांचे भारदस्त अस्तित्व जाणवत होते. बर्‍याच टेबलांवर पोकरचा खेळ चालू होता. गोरे, पिवळे, काळे असे विविध वर्णाचे लोक तपकीरी साहेबांबरोबर तल्लीन होऊन हिरव्या आच्छादनाने मढवलेल्या मंचावर सोनेरी चंदेरी चकत्यांच्या चळत्यांनी कुबेराची प्राणप्रतिष्ठा करण्यात गुंतले होते. अधून मधून उंची मद्याच्या चषकांचा होणारा मंद किणकिणाट पूजेच्या घंटेसारखा भासत होता. त्या भक्तांच्या मांदियाळीतच कुठेतरी बसलेला एखादा प्राण किंवा प्रेम चोप्रा अचानक येऊन एखाद्या टेबलरुपी द्यूतवेदीवर माझा बळी द्यायला घेऊन जाईल की काय अशा अनामिक भीतीमुळे मी लवकरच काढता पाय घेतला.

एक गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आली होती. जुगारी जिंकोत किंवा हरोत, अड्ड्याचा मालक नेहमीच जिंकणार. वर वर्णन केलेल्या प्रत्येक खेळात जिथे जिथे मी डीलर बरोबर जिंकलो तिथे तिथे माझ्याबरोबरच बाजूला खेळणारा कोणीतरी डीलरविरुद्ध हरला होता. म्हणजे माझी कमाई कसिनोच्या खिशातून नाही तर दुसर्‍या गिर्हाइकाच्या कमनशिबातून झाली होती. एका टेबलाबर चार जण एकाच वेळी डीलरबरोबर खेळताहेत. समजा सर्वांनी सारखीच रक्कम पैजेवर लावलीय. खेळाचे नियम आणि खेळाडूंची वैयक्तिक मानसिकता हे असं समीकरण असतं की डीलरला निव्वळ तोटा होण्याचे प्रसंग शक्यतेच्या सिद्धांतानुसार (game theory किंवा probability) विरळाच. म्हणजे तुमच्याआमच्यासाठी हे बेभरवश्याचे धाडस आणि हानीकारक व्यसन असेल कदाचित, पण कसिनोचा धंदा गणिती हुशारी आणि मानवी मनाची कमजोरी यांचा मेळ घालणारा धूर्त व्यवसाय आहे. उगाच नाही तो बोटवाला डोळा मारत छद्मीपणे हसत होता!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

भारतातले कसिनो फार भकास असतात असं तिथे नेहमी जाणाऱ्या एका मित्राचं मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आवडलं.
गेल्या वर्षापासून परदेशी पर्यटक गोव्यात येणे कमी झालेत. ते परत यावेत म्हणून जुगार आणि दारुवरची बंधने लादलेली पुन्हा काढा मागणी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0