माझे आणखी सट्ट्याचे प्रयोग

गोव्यातल्या देशी कसिनोमधल्या अनुभवाने भीड चेपल्यावर आणि खिसा हलका न होता चक्क किंचित जड झाल्यावर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन खेळले पाहिजे असे माझ्या मनात आले. ते मात्र माझं एक आहे. अर्ध्या हळकुंडाने जास्तीत जास्त पिवळं कोणहोतेय अशी स्पर्धा ऑलिंपिकमधे असती तर मी भारताला कित्येक पिवळी धम्मक सुवर्ण पदके मिळवून दिली असती. पण नाही! ह्या जगात सामान्य आणि साध्या माणसांना आपल्या कर्तबगारीवर काहीतरी देदीप्यमान करुन दाखवण्याची संधी मिळतच नाही हेच खरे.म्हणूनच असे लोक सट्ट्याकडे वळतात अशी माझी थियरी आहे.

तर मी संधी मिळताच माझा मोहरा मकावकडे वळवला. पूर्वी पोर्तुगीज अमलाखाली असलेले हाँगकाँग जवळचे हे चिमुकले द्वीपकल्प जगातल्या सर्वात श्रीमंत अशा प्रदेशांत गणले जाते. इथले दरडोई उत्पन्न भारताच्या सुमारे चाळीस पट आहे. गेल्या दोन दशकांत जुगारखेळायला येणार्‍या पर्यटकांमुळे इथले सरकार इतके श्रीमंत झाले आहे की ते प्राप्तीकर तर जेमतेमच लावते, वर उलट दर वर्षी सर्व नागरिकांवर पाच-दहा हजार पटाकांची

खैरात करते. पटाका हे इथले चलन असून त्याची किंमत सध्या नऊ रुपयांच्या आसपास आहे. मी इथे का जन्माला आलो नाही असा प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा मोदीजींचे १५ लाखांचे वक्तव्य आठवून मी स्वत:ची समजूत घालून घेतो. शिवाय मी मकानीज झालो असतो तर मघाशी म्हटलेली सुवर्णपदके भारताला कशी मिळाली असती?

तर अशा ह्या मकाव प्रदेशी सध्या जुगाराची सर्वाधिक उलाढाल होते. तुम्हाला लास वेगास ह्या अमेरिकन शहराची माहिती असेल पण चीनच्या अभूतपूर्व आर्थिक मुसंडीमुळे मकाव हीच आता गॅम्बलिंगची मोठ्ठ्यात मोठ्ठी मक्का आहे. उत्तुंग कसिनो इमारती आणि हॉटेल्स, तोंडात बोटे जातील इतका चमचमाट आणि धो धो वाहणारा पैसा पाहायचा असेल तर इथे या. बॅक्करा हा खेळ इथल्या कसिनोंमद्धे विशेष लोकप्रिय दिसला. बहुतेक पंटर चिनी वाटत होते. पण म्यानमार, लाओस, व्हिएतनाम वगैरे गरीब देशातील अमीर लोकही इथे बरेचयेतात. गरीब देशातला गरीब असा मी एकटाच होतो. इथल्या सर्वच टेबलांवर किमान पैजा २०० ते ५०० पटाकांच्या लागत असल्याने भारतीय खिशाला रिस्क सुरुवातीला जास्तच वाटते. पण अर्थात तुमचे नशीब चांगले असेल तर कमाईदेखील पटाकांत होत असल्यानेएकदा मनाचा हिय्या केला की झाले. सगळेच कसिनो २४ तास उघडे असतात. प्रत्येक कसिनो आणि हॉटेलमधून विमानतळ आणि जहाज धक्क्याला आणायला-पोचवायला फुकट बसेसची सोय असते. नुकताच चिनी सरकारने एकशे पंचवीस अब्ज युआन (म्हणजे सव्वालाख कोटी रुपये) खर्चून भर समुद्रात ५५ किमी लांबीचा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल हाँग काँग आणि झुहाई नावाच्या चिनी शहराला मकावशी जोडतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे लावणारे चिनी सरकार हा सर्व जुगार्‍यांचा बाप आहे अशी खात्रीच या अगडबंबप्रकल्पाकडे पाहून पटते.

चिन्यांची नेत्रदीपक प्रगती पाहून मी भारतात परत आलो आणि लवकरच बातमी आली की आपल्या सरकारच्या विधी मंत्रालयाने भारतात जुगार आणि क्रीडाक्षेत्रातील पैजांसंबंधित कायद्यांचा आढावा घेत त्यात कालानुरूप काही बदल सुचवणारा अहवाल कायदे मंत्र्यांकडेपाठवला आहे. आय पी एल शी संबंधित सट्टा आणि मॅच फिक्सिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने विधी आयोगाला तशी पाहणी करण्यास सांगितले होते. एखाद्या गोष्टीवर नैतिकतेच्या दृष्टीकोनातून सरसकट बंदी घातली जाते तेव्हा त्या गोष्टीचे समाजातून उच्चाटन होते असेनाही. लोक ती गोष्ट लपून छपून करु लागतात एवढेच. दारु, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय यावरील बंदी बहुतेकदा फोल ठरते. कायद्याला धूप न घालणारी किवा कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकणारी अनुचित, गुन्हेगारी पार्श्वभूमीची मंडळी त्या उद्योगात शिरतात.आपल्या काळ्या पैशाचा विनियोग करायला आणि तो आणखी वाढवायला त्या मंडळींना एक साधन मिळते. गरीब आणि हतबल नागरिकांचे शोषण होतच राहते आणि एकंदरीत समाजाचे नुकसानच जास्त होते. तेव्हा पूर्णपणे बंदी घालण्यापेक्षा अशा गोष्टींना रीतसरपरवाना देऊन त्यांचे नियमन करावे असा विचार प्रवाह हल्ली बळावू लागला आहे. जुगार आणि क्रीडाक्षेत्रातील पैजांसंबंधाने विधी आयोगाचा हा सल्ला केंद्र सरकारला मानवला आणि तसे विधेयक संसदेत पास झाले तर लवकरच तुम्हा आम्हाला वैध प्रकारे खेळांच्यासामन्यांवर बेटिंग करता येईल. शिवाय त्यासाठी हिन्दी सिनेमात दाखवतात तशा कुठल्याशा खलनायकी अड्ड्यावर रिकामी पिंपे, खोकी आणि टायर्सने भरलेल्या गोदामात, गालावर मोठ्ठा काळा चामखीळ असलेल्या गुंडाकडे पैशांची सुटकेस घेऊन जावे लागणार नाही.ऑनलाइन बेटिंगची कितीतरी अॅप्स आता जगभर उपलब्ध आहेत. घरबसल्या बेटिंगचे रोमांचक जग तुम्ही अनुभवू शकाल.

फुटबॉल वर्ल्डकपच्या वेळी betfair, bet365 अशा काही जागतिक बेटिंग एक्सचेंजेसच्या अॅप्सचा वापर करुनपैजा लावायचा प्रयत्न मी करुन पाहिला. पण भारतात बेटिंग अद्याप बेकायदेशीर असल्याने इथल्या क्रेडिट/डेबिट कार्ड कंपन्या तुम्हाला ऑनलाइन पैसेलावूच देत नाहीत. नेटेलर, स्क्रिल अशी काही आंतरराष्ट्रीय ई-वॉलेट्स (पेटीएम सारखी) आहेत ज्यांचा वापर करुन पूर्वी पैसे भरता येत असत. हल्ली त्यांनीसुद्धा भारतीयांकडून पैसे घेणे बंद केले आहे असे ऐकतो. एवढे करुन तुम्ही पैसे लावू शकलात आणि जिंकलात तर तेपैसे भारतात परत आणणे हेही सामान्यांसाठी अगदी अशक्य नसले तरी जिकीरीचे, खर्चिक आणि कदाचित धोक्याचे काम आहे. तुम्ही मोठे उद्योगपती किंवा राजकारणी असाल तर मात्र हे सगळे कसे करता येते ते मी तुम्हाला सांगायची गरज नाहीच. तुमच्या विजयकाकाकिंवा नीरवमामाने तुम्हाला आधीच सांगितले असेल.

कसिनो हा जसा गणिती आराखडे आणि मानसिक स्खलनशीलतेवर आधारलेला धूर्त धंदा आहे तसाच बुकमेकिंग हाही एक चतुर आकडेमोडीचा व्यवसाय आहे. रॉयल चॅलेंजर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बंगलोरात सामना होणार आहे असं समजूया. खेळाडूंचा फॉर्म,खेळपट्टीचा स्वभाव, स्थानिक हवामान, गेल्या काही सामन्यांतली संघांची कामगिरी, घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा वगैरे लक्षात घेता रॉयल चॅलेंजर्स जिंकायची शक्यता ५०%, मुंबई इंडियन्स जिंकायची शक्यता ४०% आणि ड्रॉ होण्याची शक्यता १०% आहे असा गणिती अंदाजआहे. याला म्हणतात खरी संभाव्यता (true odds). बुकीला किमान पैज म्हणून लावल्या गेलेल्या रकमेच्या १०% नफा स्वत:साठी ठेवायचा आहे असे गृहीत धरु. तर तो काय करतो, वरील सगळ्या शक्यता १०%ने वाढवतो. म्हणजे रॉयल चॅलेंजर्स ५५%, मुंबई इंडियन्स४४% आणि ड्रॉ ११%. यानुसार मग तो भाव किंवा ऑड्स (यालाच बेटिंग लाईन असेही म्हणतात) असे देतो:- रॉयल चॅलेंजर्स - ९/११ (म्हणजे रॉयल चॅलेंजर्सवर तुम्ही ११ रुपये लावलेत आणि ते जिंकले तर तुम्हाला तुमचे ११ रुपये तर परत मिळणारच पण वर ९ रुपये नफाहीमिळणार). मुंबई इंडियन्स- १४/११ आणि ड्रॉ ८९/११. आता वरील सर्व ऑड्सची गोळाबेरीज ११०% होते हे तुमच्या लक्षात आले असेल (११ ला ९ अधिक ११ ने भागिले तर ११/२० म्हणजे ५५%; ११ ला १४ अधिक ११ ने भागिले तर ११/२५ म्हणजे ४४% आणि ११ ला ८९अधिक ११ ने भगिले तर ११/१०० म्हणजे ११%). ह्या ऑड्स वर आता ह्या बुकीकडे १०० कोटीच्या पैजा आल्या आहेत. साधारणपणे खर्‍या संभाव्यतांच्या गुणोत्तरातच (५० लाख : ४० लाख : १० लाख) त्या लावल्या गेल्या आहेत. आता जर रॉयल चॅलेंजर्स हा सामना जिंकलेतर त्या संघावर ५० लाख लावलेल्या सट्टावीरांना बुकी ५० x ९/११ म्हणजे सुमारे ४१ लाख नफा आणि मुळची पैजेची रक्कम ५० लाख असे एकूण सुमारे ९१ लाख रुपये देणार. उरलेले ९ लाख झाला बुकीचा फायदा! अर्थात हे खूप सुलभीकृत उदाहरण झाले. प्रत्यक्षात पैजायेतील त्या अगदी बरोब्बर खर्‍या संभाव्यतांच्या गुणोत्तरातच येतील असे नाही. मग स्वत:चा नफा धोक्यात येऊ नये म्हणून मग प्रत्येक नवीन पैजेसाठी ऑड्समध्ये फेरफार करुन आपले बुक बॅलन्स करायचा प्रयत्न बुकी करतो. बंगलोरवर फारच जास्त पैसे लागू लागले तरत्या पैजा घेण्याचे तो थांबवतो. मुंबईवरील पैजा वाढाव्यात म्हणून जास्त आकर्षक भाव देऊ करतो. अधिकाधिक गुंतागुंतीचे पण पाहता क्षणी एखाद्याच्या तोंडाला पाणी सुटेल आणि बुद्धी गहाण पडेल असे पैजांचे विलक्षण जोखमी पर्याय पुढे करतो. हा सर्व व्यवसाय मुळातभूमीगतच करावा लागत असेल तर प्रसंगी खेळाडूंना आमिष दाखवून सामन्याचा निकाल फिरवायचा प्रयत्न करणे हीसुद्धा एक साहजिक पायरी असू शकते. वरील सर्व रोमहर्षक उपद्व्यापांची एक कहाणी बघायची असेल तर अॅमझोन प्राईमवरील इनसाईड एज ही वेबसीरीज पाहायला तुम्हाला आवडेल.

असा सगळा सध्या बेकायदेशीर असलेला खटाटोप करायचा नसेल तर तुम्ही आपले घोड्यांच्या शर्यतीला जा बरे. तेही नको असेल तर लॉटरीचं तिकीट घ्या. तुमचं पापभीरु मन त्यालाही धजावत नसेल तर शेअर बाजार आहेच. ह्या सगळ्या विषयी पुन्हा कधीतरी बोलूया.कुठे न कुठेतरी तुमचे उखळ नक्की पांढरे होईल. लागली पैज?

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

छान लेख आहे. ऐसीचा बोर्ड एकदम जिता जागता झाला. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यापैकीच एका जाणकाराने 'मटक्या'चे गणित {थोडक्यात} सांगितले ते असे - स्थानिक बुकीसुद्धा आणखी मोठ्या बुकीकडे आकडा लावतात. बेटिंग आल्यावर जर अमुक आकडा फुटला तरच तो मायनसमध्ये जाणार असतो तोच आकडा तो आणखी मोठ्या बुकीकडे लावतो. ब्यालन्सिंगचे टेक्निक असते.

एका नवीन विषयाला आल्याआल्या सुरुवात केल्याने मी ठरवलेला ऐसीसन्यास ताबडतोब मागे घेतला. नाहीतर माझा पिवळाबांडिस होणार होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0