बाजाराच्या आठवणी!

माझं लहानपण तसं फार गरिबीतही नाही आणि फार मध्यम वर्गातही नाही असे मध्येच कुठेतरी गेले. आईवडीलांकडे पैसा कमी होता पण खाऊन पिऊन सुखी होतो. शेती व जोडधंद्यामुळं सतत चलन फिरत राही पण ते अगदी पोटापुरतं असे. अगोदर शेती जिरायती होती. धान्य, कडधान्य एवढंच मिळायचं.
मग विहीर खणली, पाणी लागले तसं इंजिन बसवलं पाणी उपसण्यासाठी. मग काय अनेक पिकं, भाजीपाला घेता येऊ लागली. जशी पिकं येऊ लागली तसं ती विकायचं काम वाढलं. डोक्यावर, सायकलवर बोजा घेऊन तालुक्याच्या गावाला जाऊन विक्री करावी लागे. आईसोबत जाऊन हातकाट्यावर विक्री करायची. टोमॅटो, भेंडी, दुधी, लाल भोपळा, मेथीची भाजी, शेपू, करडई, पालक, कांदे अशा गोष्टी सिझनप्रमाणे नेऊन विकाव्या लागत.
पण मला एकट्यानं विकायला फार वैताग येत असे. अगोदरच विक्री करणारे भरपूर. त्यात त्यांच्या जागा ठरलेल्या.. कसं तरी मध्येच घुसखोरी करून जागा मिळवायची. त्यांची बोलणी ऐकून घेत गिर्हाईकाची वाट बघायची. लहान पोर पाहून गिर्हाईक तर लयी भाव पाडून मागायचीत. यासाठी आपल्या सारखाच माल विकणारांनी काय भाव लावला आहे हे पटकन फिरुन विचारुन घ्यायचे आणि तोच भाव लावायचा. मेथीची भाजी लाल कोराची आहे हे पाहून पटापट विकली जाई. हिरव्या मिरच्या, गवार, वांगी आतपाव, पावशेर मोजून विकत बसावं लागायचं. एकदा आईसोबत भाजीपाला विकायला आठवडी बाजारात गेलो. बाकीचा माल विकला पण दुधी भोपळे काय विकले जाईनात. आई म्हणाली. मी बाजार घेऊन घरी जाते, तू भोपळे विकूनच घरला ये. गिर्हाईक यायचं भोपळ्याला नख टोचायचं, केवढ्याला दिला विचारले की मी एक रुपया किंमत सांगायचो. ते चाराण्या आठाण्याला मागणार. नखं टोचून टोचून भोपळे कसेतरीच दिसायला लागले. एक बाई आली तिने पंच्याहत्तर पैशाला भोपळा घेतला. अख्खा बाजार फिरुन आली एक तासाने. म्हणाली भोपळा निबर आहे पैसे परत दे. मी तिला म्हणालो दुसरा घे. ती पैसे मागत होती. पैसे परत दिले. भोपळे विकेना म्हणून रडकुंडीला आलो. तसाच घरी गेलो तर आई बोलणार तूला भोपळा विकता येत नाही.. फारच वैतागून गेलो. भूकही लागली होती. पाटी उचलली तडक पाच किलोमीटर घरी. आई जास्त काही बोलली नाही पण एकही विकला नाही म्हणून नाराज झाली. असंच चारा विकायला गेले की खूप वेळ जाई पण अपेक्षित भाव मिळत नसे. एकदा लाल भोपळ्याच्या फोडी घेऊन आमच्या गावात विकायला गेलो. वीस पैशाला फोड.. तर एक बाई म्हणाली नंतर देते वीस पैसे. दुसऱ्या दिवशी मागितले, तिसऱ्या दिवशी मागितले तरीही बाईने दिले नाहीत. शेवटपर्यंत दिले नाहीत. वीस पैसे फार नव्हते पण फसवणूक जिव्हारी लागली. असे फसवणारे लोक भेटतच. चार पाच जूड्या देवाला म्हणून सोडून द्याव्या लागत. नातेवाईक भेटले तर त्यांना भेट म्हणून एक-दोन जूड्या द्यायच्या हे घरूनच सांगितले जाई.
दूधाचा रतीब घालायला मी गेलो तर मापाच्या वर थोडं थोडं दूध घालताना शेवटी दूध कमी येई. मग मोठा भाऊ तूला दूध नीट घालता येत नाही असं बोलायचा. इकडे प्रत्येक गिर्हायकाला वरुन थोडे दूध टाकावं ही अपेक्षा असायची.
आठवडी बाजाराच्या दिवशी बैलबाजार असायचा. तिकडे गुरेढोरे, शेळ्या, बोकड विकायला असत. बोकड विकायला गेले की विकत घेऊ पाहणारा हरेक जण त्याचे पोट दाबून पहायचा. ते बिचारे बकरु ओरडायचे वेदनेने. बोकड, शेळ्या, गाई विकताना मनाला त्रास होई. त्यांचा लळा लागलेला असायचा.
कोंबड्या आणि अंडी याला मात्र घरीच गिर्हाइक येई.
त्या दिवसांत शाळा सुटल्यावर, सुटीच्या दिवशी शेतात काम आणि भाजीपाला विक्री करणं ही कामं बहुतेक मुला, मुलींना करावीच लागत.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाजारचे धडे तुम्हाला फारच लहान वयात मिळाले. शेती उत्पन्न त्यात आणखी नाशिवंत आणि वेळेत विकलं जाणे महत्त्वाचे.
-----
फार पूर्वी ('८०) भंडारदारा सहलीला गेलेलो. रविवारी दुपारी बारा साडेबाराला मुंबई बस होती. रविवारचा आठवडी बाजार भरतो. एमटिडिसीचे दहाचे चेकाऊट करून बाजारात टाइमपास करत होतो तेव्हा गिऱ्हाईक कसे भाव करतात ते पाहायला मिळालं. मलं मुली शेतातील माल छोट्या टोपलीत ठेवून विकायला बसलेली. कोंबड्या, अंडी घेणारे अडते भाव करत होते आणि विकणारे अजिबात बधत नव्हते. त्या कोंबड्या भराभर टोपलीत भरून मुंबई बसवर टाकून बस निघाली की त्यांचा बाजार उठतो.
"कितीला?"
"शंभर."
"ऐंशी"
"नाय."
"बसची येळ झाली बघ, परत जाचील."
"जाईन."
असे संवाद.
कोण मागच्या रविवारी हाच माल घेऊन आलेला ते अडत्यांना माहीत असणार. शेवटी ऐंशी रुपये फेकून कोंबडी उचलून चालू पडले.

वसईजवळ एक होळी नावाचे गाव आहे. तिथे बाजारात पानमळेवाल्या बायका त्यांच्याच घराभोवती असलेल्या मळ्यातली भाजी विकतात. तोंडली, भेंडी, अळुची पाने, केळी, नारळ वगैरे. घेणारे गिऱ्हाईक मुंबईतील भय्ये अडते. तेही भाव करून (त्यांनी ठरवलेला भाव हाच भाव) पैसे फेकून भाजी उचलून चालू पडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद आचरट बाबा. होळी गावातील स्त्रियांविषयी कणव आली. बिचाऱ्या दोन पैशाच्या आशेने कष्ट करतात पण दाम व्यवस्थित मिळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

।।श्रीराम जयराम जय जय राम।।