‘गिधाडे’, ‘लॉन्ग डेज जर्नी इन्टू दी नाईट’ आणि ‘कपूर अँड सन्स’

समकालीन प्रसिद्धी: फेसबुक
तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’ बद्दल मी पहिल्यांदा लागूंच्या ‘लमाण’ मध्ये वाचले. लागूंनी ‘नाटक फार हिंस्त्र होते. त्यांनी माझ्या चिंध्या केल्या, माझे रक्त गटारात वाहू दिले, त्यातलेच टमरेलभर तोंडाला लावून गटागटा पिऊन टाकले आणि समाधानाची घाणेरडी ढेकर दिली’ असे काहीसे लिहिले आहे. त्यानंतर ‘गिधाडे’ चे प्रयोग, त्या नाटकाने ढवळून निघालेला त्या काळातला समाज ( साडीवरचा निळा डाग वगैरे विनोदी प्रकार), नाटकातल्या शिव्या आणि तेंडुलकरांचे त्यावरील भाष्य (‘गिधाडे’ मधील शिव्या म्हणजे आजच्या काळात बुळबुळीत केळीची कोशिंबीर आहे. ‘कामाची सदा भेंचोद टाळाटाळ’ यातली ‘भेंचोद’ ही शिवी आहे हे आता समजावून सांगावे लागेल) आणि त्या काळात सेन्सॉर काय म्हणेल याची पर्वा न करता लागू आणि मंडळींनी त्या नाटकाचे केलेले प्रयोग हे सगळे वाचून ते नाटक बघावे, किमान त्याची संहिता वाचायला मिळावी असे फार वाटले. दोन्ही गोष्टी झाल्या. नाटकाचा प्रयोग उत्तम होता. (तरी मूळ प्रयोगातील ढोलीसारखे नेपथ्य, पार्श्वभूमीवर गिधाडांचा आवाज, त्यातूनच पपांचे गिधाडासारखे खदखडून हसणे हे सगळे बघायला, ऐकायला मिळाले नाही याची खंत होतीच) या नाटकाच्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये आलेल्या परीक्षणात म्हटले आहे,
‘एकेकाळी मराठी रंगभूमीचं पावित्र्य जपणाऱ्यांना अब्रह्मण्यम वाटलेलं, असह्य झालेलं विजय तेंडुलकरांचं स्फोटक नाटक ‘गिधाडे’ सुमारे साडे चार दशकानंतर मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहातच सादर व्हावं, हे तेंडुलकरांच्या द्रष्टेपणाचंच लक्षण होय. ते लिहिलं गेल्यानंतर अनेक वर्षांनी रंगभूमीवर आलं आणि जेव्हा ते प्रथम सादर झालं तेव्हा त्यातली हिंसक प्रवृत्तीची, एकमेकांच्या जिवावर उठलेली शिवराळ माणसं ही तेंडुलकरांच्या विकृत कल्पनेतली पात्रं आहेत, प्रत्यक्षातल्या जगण्याशी यांचा संबंध नाही, असं म्हटलं गेलं. काही जाणकारांनी मात्र हे भविष्यवेधी नाटक आहे, असं म्हटलं. आणि तेच खरं ठरलं. यातली रमाकांत, उमाकांत, माणिक आणि पप्पा ही परस्परांचे लचके तोडणारी अर्थलोलुप वासनांध, मदांध माणसं ही आजच्या पराकोटीच्या चंगळवादी जगण्याची प्रतिकं बनून गेली आहेत. अनैतिकतेच्या निसरड्या वाटांवरून धावत सुटलेली, आताचा क्षण सेलिब्रेट करण्याच्या ध्यासाने पछाडलेली आणि जगण्यातली सगळी कोवळिक बेमुरव्वतपणे खुडून काढणारी अतोनात स्वार्थी जमात हीच आजच्या मानवप्राण्याची ओळख बनत चालली आहेत. तेंडुलकरांची ‘गिधाडे’ हा तिचा सूक्ष्मदर्शकाखाली धरलेला एक पापुद्रा आहे.
गिधाडांची लक्षणं अशी सार्वत्रिक होत असल्यामुळेच ‘गिधाडे’मधली धक्कादायकता आज कमी झाली आहे. ज्या काळात हे नाटक लिहिलं गेलं त्या काळात त्यातला उग्रपणा अंगावर शहारे आणणारा होता. रमाकांतच्या घरातलं अनैतिकतेचं उघडं वाघडं दर्शन आणि शेजारच्या आउटहाऊसमध्ये राहणाऱ्या रजनीनाथच्या मनात जन्म घेणारी तरल काव्यात्मता यांची विरोधाभासी मांडणी काळ्यापांढऱ्या रंगाप्रमाणे आली होती. ह्या दोहोंमधली करडी छटा नाटकात नाही. अर्थात ही संहितेतेली मर्यादा नाटकाच्या अपूर्व मांडणीमुळे झाकली गेली होती. आज विषयातली स्फोटकता कमी झाल्यावर ही मर्यादा पृष्ठभागावर आली आहे.
अर्थात व्यावसायिक रंगभूमीवर ‘गिधाडे’ करणं हे आजही एका अर्थाने धाडसच आहे, कारण या रंगभूमीने निर्माण केलेले टॅबू खिळखिळे झाले असले तरी पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. पण त्याला न जुमानता आतिशा नाईक यांनी हा प्रयोग दिग्दर्शित केला आहे. त्यांनी आकाराला आणलेल्या प्रयोगाने गिधाडांचं धाडसी उग्र दर्शन घडवलं आहे. मात्र या दर्शनाला सामोरं जाताना त्याचं आघाती स्वरूप आस्वादात वारंवार विक्षेप आणतं. एकूण प्रयोगाचं दृश्यरूप अत्यंत गडद आहे. नेपथ्यात बंगल्यांच्या भिंतींसाठी वापरलेली काळपट करडी रंगच्छटा, बंगल्यातल्या लाकडी फर्निचरचं जुनाटपण, नेपथ्यकाराने हेतूतः बंदिस्त केलेलं अभिनयक्षेत्र, प्रकाश योजनेत कधीच संपूर्णपणे न उजळणारा रंगमंच, लाल, पिवळ्या रंगांचा तीव्रपणे केलेला वापर यामुळे मूळ लेखनातला गडद सूर आणखीनच दाट झाला आहे. तशात रमा आणि रजनीनाथ ही सौम्य पात्रं वगळता सर्वांचाच सूर पहिल्यापासून टीपेचा लागल्याने हे एकूणच रसायन भडक रंगाचा जाड थर द्यावा तसं होऊन जातं. विशेषतः पहिल्या अंकात हा चढा आवाज असह्य होतो आणि नाटक एकसुरीपणाकडे प्रवास करू लागतं. कलावंतांचा टीपेचा सूर टाळूनही त्यांच्यातली मग्रुरी, हिंसकता दाखवता आली नसती का, असा प्रश्न पडतो.
पहिल्या अंकाने गमावलेल्या गोष्टी दुसऱ्या अंकाने मात्र चांगल्या आटोक्यात आणल्या आहेत. तेंडुलकरांच्या संहितेतच या अंकात वेगवेगळे आवाज ऐकू येतात. कारण पहिल्या अंकातल्या सपाट आणि चढ्या उन्मादानंतर माणसं पराभूतपणाकडे प्रवास करू लागली आहेत. ही उतरती कळा अधिक गहिरी आहे. इथे रमाकांत आणि रजनीनाथ ह्या दोन टोकांच्या व्यक्तिरेखा अधिक टोकदार होतात. गौतम जोगळेकर यांनी प्रथमपासून चढा सूर लावणं खटकलं, मात्र संपूर्ण व्यक्तिरेखेचं वजन आणि तोल त्यांनी शरीरभाषेतून, मुद्राभिनयातून ज्या सहजतेने पेलला त्याला दाद द्यायला हवी. रमाकांतच्या जगण्याची लय त्यांना सापडली आहे, हे त्यांच्या बेभान होण्यातून, धडपडण्यातून, गुरगुरण्यातून कळत होतं. शारीर पातळीवर जगणाऱ्या एका मग्रूर माणसाचा शोकांतिकेकडे होणारा प्रवास त्यांनी उत्तम उभा केला. अंगद म्हसकरनी रजनीनाथचा उद्रेक पुरेशा संयमितपणे व्यक्त केला. आतिशा नाईकांनी रमा या कुटुंबातील एकमेव सच्छिल व्यक्तिरेखेला कारुण्याची आणि असहायतेची छटा देताना तिच्यातला मूळचा कणखरपणा नाहिसा केला. सुनील गोडबोले (पप्पा), अमृता संत (माणिक) आणि सुहास शिरसाट (उमाकांत) यांच्या कामात मनःपूर्वकता होती, पण या व्यक्तिरेखांना असू शकणारे वेगळे कंगोरे एकसुरीपणामुळे हरवले’.
या तुलनेत नाटकाची संहिता बाकी मला अगदीच मचूळ वाटली. पण ज्या काळात हे सगळे लिहिले, साकारले गेले तो काळ ध्यानात घेता ते तत्कालीन समाजाला किती खळबळजनक वाटले असावे याचा अंदाज आला.
युजीन ओ’ नील याच्या ‘लॉन्ग डेज जर्नी इन्टू दी नाईट’ या नाटकाबद्दल मी पहिल्यांदा जी.ए. कुलकर्णी यांच्या पत्रांमध्ये वाचले. बर्‍याच वेळा त्यांना या नाटकाचा अनुवाद करण्याचा मोह झाला असे त्यांनी लिहिले आहे. अखेर त्यांनी तो अनुवाद केला पण तो त्यांना समाधानकारक न वाटल्याने त्यांनी त्या पहिल्या खर्ड्याच्या हस्तलिखितावर ‘हे प्रकाशनार्थ नाही’ असे लिहून ठेवले होते. त्यावर पुन्हा हात फिरवण्याइतपत वेळ जीएंना मिळाला नाही. जीएंच्या मृत्यूनंतर तो पहिला खर्डाच ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ या नावाने पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे. सकाळी साडेआठ ते मध्यरात्र हा या नाटकाचा कालावधी. जेम्स टायरॉन हा पासष्ट वर्षाचा कुटुंबप्रमुख, त्याची चोपन्न वर्षे वयाची बायको मेरी आणि तेहतीस वर्षांचा जेमी आणि तेवीस वर्षांचा एडमंड ही त्यांची मुले या चारच पात्रांचे हे नाटक आहे. ‘गिधाडे’ प्रमाणे या नाटकातही एक अदृष्य पात्र आहे ते म्हणजे दारूचे. मद्यासक्तीमुळे या नाटकातल्या पात्रांचाही विवेक, तरतमभाव आणि जणू त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. तीव्र आम्लात एखादे मुंडके टाकावे आणि कालांतराने त्यावरची त्वचा, स्नायू, मेद विरघळून जाऊन फक्त कवटीच शिल्लक राहावी तसे या लोकांवरची संस्कार, चाड, मार्दव यांची आवरणे दारुत विरघळून गेली आहेत. पण त्यातूनही कधीकधी एखादा डोळा उघडतो आणि मेरीचे स्वप्नाळू स्वगत ऐकू येते. एखादा तरंग उठतो आणि जेमी स्विनबर्गच्या कवितेतील काही ओळी म्हणतो. पण हे तात्पुरते. एरवी एकमेकांशी अनिवार्यपणे, अपरिहार्यपणे बांधली गेलेली ही माणसे एकमेकांना कुरतडत, एकमेकांचे टवके काढत, एकमेकांना रक्तबंबाळ करत आणि स्वत:ही रक्तबंबाळ होत जगत आहेत.
आणि हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे मी या सक्तीच्या घरबंदीत पाहिलेला २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘कपूर अँड सन्स (सिन्स १९२१)’ हा चित्रपट. (चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट आता बघणे आणि त्यावर लिहिणे म्हणजे लग्नाची वरात जाऊन त्या जोडप्याला झालेल्या मुलाच्या मुंजीच्या वरातीमागचे घोडे आहे!) म्हातार्‍या आजोबांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यानिमित्ताने भारताबाहेर राहाणारे त्यांचे दोघे नातू त्यांना भेटायला येतात. किती तरी दिवसांनी ते दोन तरुण नातू, त्यांचे मध्यमवयीन आईबाप आणि तो म्हातारा पण रंगेल आजोबा हे एकत्र येतात. तसे वरवर दिसायला हे अगदी सुखी, आनंदी कुटुंब आहे. पण ते एकत्र येतात आणि त्यांच्या संबंधांमधल्या चिरा, भेगा, तडे त्यांना दिसायला लागतात. अगदी रक्ताची असली म्हणून काय झाले, नाती ही शेवटी कृत्रीमच. चिकटवलेलीच. ‘जीवनावरची सर्व मोहक वस्तराभरणं बाजूला सारली की अखेर एकच कठोर – नग्न सत्य राहतं! प्रत्येक मानवाला सर्वांत प्रिय वाटणारी व्यक्ती म्हणजे तो स्वत:च! स्वत:पेक्षा अधिक प्रिय अशी अन्य व्यक्ती कधी असू शकेल का?’ या गैरसोयीच्या वाटणार्‍या पण शाश्वत सत्याची सगळ्यांनाच प्रचिती येते.
मानवी नात्यांचे हे असे का होते? प्रेम, माया, जिव्हाळा या शब्दांमधला आशय नाहीसा होऊन हे फक्त बुडबुडे का उरतात? ‘गिधाडे’ आणि ‘दिवस तुडवत अंधाराकडे’ मध्ये किमान मानवी नात्यांना पोखरत जाणारी, मानवी अध: पतनावर पोसत जाणारी दारू आहे. ‘कपूर अँड सन्स’ मध्ये आजकालच्या चित्रपटांत जेवढी असते तेवढीच दारू आहे, पण तरीही या तीनही कलाकृतींमध्ये एकत्र असलेल्या कुटुंबातली माणसे वेगवेगळ्या वाटांवर फेकली जातात. म्हटले तर ते एका कुटुंबाचे सदस्य आहेत, म्हटले तर कुणीच नाहीत. म्हटले तर त्यांच्यात एकाच रक्त आहे, म्हटले तर त्यालाही काही अर्थ नाही.
विविध कालखंडांत, वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या रचनांमध्ये कसे साम्य आढळते ही आस्वादकाला चकरावून टाकणारी पण विलक्षण समाधान देणारी बाब आहे. ‘We look before and after, And pine for what is not; Our sincerest laughter With some pain is fraught; Our sweetest songs are those that tell of saddest thought’ यातले pine for what is not हे शांताबाईंचे ‘सहज मिळे त्यांत जीव तृप्तता न पावे जें सुदूर, जें असाध्य, तेथें मन धांवे!’ हे आहे आणि Our sweetest songs are those that tell of saddest thought हे शैलेन्द्रचे ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे हम दर्द के सुर में गाते है’ हे आहे, हे कळणे ही आस्वादकाला मोठा आनंद देऊन जाणारी गोष्ट आहे. कपूर अँड सन्स (सिन्स १९२१)’ बघून मला हा आनंद मिळाला.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'कपूर ॲण्ड सन्स' मध्ये दारु नाही पण आपल्या कुटुंब संस्थेत (त्यात विवाहसंस्था, नातेसंबंध, समाज क्या कहेगा वगैरे सगळं आलं) किंवा संस्थेमुळे वैयक्तिक आशा-आकांक्षांची कशी वाट लागते आणि त्याची परिणीती शेवटी दुराव्यात कशी होते हेच दाखवलं आहे. तुम्ही कितीही जवळ आणण्याचा प्रयत्न केला तरी असा जबरदस्तीचा एकोपा शेवटी फार काळ टिकत नाही. 'कपूर...' मध्ये शेवटी लोक फक्त हे स्वीकरताना दाखवले आहेत एवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सामाजिक बदलांची दखल घेतली गेली नाही तर जवळचा नातेसंबंध दूर होत जातो.. हे सार आहे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गिधाडे बघायचं कैक दिवस ठरवतोय.
त्यात बाकीही दोन ॲड करतोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरेस्टिंग ! मुळात काळाचे आणि सामाजिक संदर्भ आणि वागण्याचे साचे बदलले की पूर्वीच्या नाटकातील मानवी भावभावनांचे आणि त्यांच्या अभिव्यक्तीचे नक्की काय करायचे हा प्रश्न पडतो ! अशी पुष्कळ नाटके आणि त्यातले अनेक संदर्भ ( घटना , अभिव्यक्तीचे प्रकार , भावभावना आदी ) सांगता येतील. बेगम बर्वेचं उदाहरण माझ्यासाठी ताजं आहे . मुळात हे नाटक मी अनेक वेळा पाहिलं आहे. पहिल्यांदा मी बेगम बर्वे पाहिलं तेव्हा चौदा वर्षांचा असेन, त्यानंतर जवळजवळ पंचवीस वर्षाचा होईपर्यंत त्याचे अनेक प्रयोग बघण्याचे योग आले. प्रत्येक वेळी त्यात काहीतरी नवीन सापडत होतं आणि नाटकाचा प्लॉट जरी पोस्ट-गंधर्व युगाभोवती असला तरी त्याच्याशी रिलेट होता येत होतं.  नुकताच बेगम बर्वे पुन्हा वाचलं. यावेळी भाषांतर करण्याच्या इराद्याने वाचलं. त्यात गुरुवारी उदबत्त्या विकण्याचा संदर्भ आहे. मला प्रश्न पडला , की आपण एक प्रेक्षक म्हणून नाटक पाहत असताना हे गुरुवारी उदबत्त्या विकण्याचं किती सहज ग्रहण करीत असू. आजूबाजूला उदबत्त्या विकणारी माणसे होती, त्यांच्या चेहऱ्यावरची एक अजीजी , त्यांचं गरीब असणं हे सर्व जिवंत होतं. त्यामुळे हा संदर्भ अगदी सहज समजू येत असे आणि बेगमच्या भक्तिभावमय जगाचा सुगंधित, स्वरश्रीमंत आणि तरीही लौकिकार्थाने दरिद्री कोपरा लख्ख  दिसत असे. आजच्या पिढीला ( पुन्हा यात ग्लोबलायझेशन , आयटी वाली पिढी , त्याने झालेले सामाजिक बदल ) या संदर्भांचं आकलन नक्की कसं होईल याचा शोध घेतला पाहिजे. या अर्थाने मला वाटतं, की जुनी नाटके पिंजून काढून त्यातले असे संदर्भ , अशा घटना पुन्हा लिहून पहायला हव्यात किंवा त्याचा आजच्या प्रेक्षकांवर नक्की कसा असर होतो याचा शोध घ्यायला हवा ! 
नाटकाचं एक लफडं असं आहे , की नाटक ( केवळ ) वाचणे आणि नाटक पाहणे ( त्यातही आधी नाटक वाचून मग पाहणे हे आणखीच वेगळं लफडं ) यात खूप तफावत आहे. "गिधाडे" मी फक्त वाचलं आहे , त्यातल्या नेपथ्याच्या मांडणीवर रघुवीर तळाशिलकरांचा लेख , एकदा त्यांची प्रत्यक्ष मुलाखत असं अनुभवलं आहे . परंतु नाटक पाहिलेलं मात्र नाही . "गिधाडे" कुठे पाहिलंत ?  हा कपूर अँड सन्स पाहायचा राहिला आहे, तो पाहण्याचा प्रयत्न करेन !
रोचक विषयाला हात घातल्याबद्दल धन्यवाद आणि अर्थातच अभिनंदन !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed