काळ आला होता पण वेळ नाही...

रवींद्र दत्तात्रय तेलंग

रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्‌टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली...

ती सीमेंट फॅक्ट्री होती... मी स्टीम इंजीनमधे फायरमेन होतो...आमचे इंजीन ड्रायव्हर रेल्वे मधून सेवानिवृत्त झालेले ड्रायव्हर होते...

फॅक्ट्री ते एक्सचेंज यार्ड...तेरा किलोमीटरचं सेक्शन होतं....

एक दिवसपाळी, दुसरी रात्रपाळी...दिवसपाळी करिता घरून सकाळी सात वाजता डबा घेऊन निघावं लागे...दीड किलोमीटर लांब असलेल्या स्टाप वरुन बस मिळे...त्याने आठ वाजता फॅक्ट्रीला पोहचायचं...दिवसभर ड्यूटी...संध्याकाळी सातच्या बसनी परत यायचं...रात्रपाळी करिता संध्याकाळी साडे पाचला बस असे...रात्री सात ते सकाळी आठ वाजे पर्यंत ड्यूटी...परतण्यासाठी बस नऊ वाजता असे...

काही दिवसांमधेच रूटीन सेट झाला होता. इंजेक्टर लावून गेज ग्लास मधे पाणी भरणं, फायरबॉक्स मधे शॉव्हेलनी कोळसा व्यवस्थित फेकणं, (तो कोळसा फायरबॉक्स मधील चूकप्लेटपर्यंत गेला पाहिजे), फायरबॉक्स मधे जमलेली राख काढणे (जळलेला कोळसा जमून दगड व्हायचा, त्याला जांगड म्हणायचो, यामुळे स्टीम मेंटेन ठेवणं कठिण जात असे...मग हे जांगड मोठा, लांबलचक राॅड घेऊन बाहेर काढायचे).

याच काळात रूळांवर पडायची सवय झाली होती...आपला पंचा (किंवा इंजीनमधे असलेलं पोतं...सीमेंट पैकिंगचे प्लास्टिकचे बैग ज्या जूटच्या पोत्यात भरून यायचे ते पोते आम्ही पैकिंग प्लांट मधून वापरण्यासाठी घेऊन येत असू...) ते पोतं त्या लाकडी/ सीमेंटच्या रूळांवरच्या स्लीपरवर अंथरायचं आणि लोखंडी रूळावर डोकं ठेवून पडायचं... वर मोकळं आकाश...आणि आजू बाजूला रूळं असल्यामुळे मोकळी जागा... मस्त झोप यायची...बरेचदा इंजीनच्या मागे असलेल्या टेंडर मधे भरलेल्या कोळश्यावर पोतं अंथरून त्यावर झोपत असूं... त्या लोखंडी अगडबंब दिसणारया टेंडरचं पाणी तर कितीदा प्यायलो याची गणतीच नाही...कारण ते आमच्या एलुमीनियमच्या बरणीमधील पाण्यापेक्षा थंड असे. थंडीच्या दिवसांमधे इंजीनच्या लोखंडी फुटबोर्डवर पोतं अंथरून झोपण्यात मजा यायची...त्या फायरबॉक्स समोर झोपतांना थंडी अजिबात जाणवायची नाही...पांघरायला घरून आणलेली चादर किंवा शाल असे...एक मात्र खरं की त्या पाचेक वर्षे मी इंजीनवर काम केलं पण नाइट ड्यूटी वर असतांना स्वेटर कधीच घातलं नाही. कानाला लोकरीचा कनटोप आणि गळयांत पंचा...बस्स...

तर...

त्या दिवशी रात्रपाळी होती...संध्याकाळी सातच्या सुमारास इंजीनजवळ पोचलो. ड्यूटी ड्रेस चढवला...

मास्टरनी विचारलं तेलंग-पानी कितना है...(म्हणजे बॉयलर में) मी गेज ग्लास बघितला...तो भरलेला होता (म्हणजेच दिवसपाळी असलेला अहमद बॉयलर भरून गेला होता...)

मास्टरनी टेंडर मधे डोकावूून बघितलं...अर्धा टेंडर कोळसा होता...तेलंग कोयले के लिए बोलना पड़ेगा...

मी म्हणालो-हां मास्टर...कोई आता है तो बताएंगे...

संध्याकाळचे साडे सात वाजले होते...इतक्यात आवाज आला-मास्टर...

मागोमाग पोर्टर आला...म्हणाला-चलो मास्टर, शंटिंग करना है.

मी सहज विचारलं...क्यों, दोनों डीजल कहां गए...(पैकिंग प्लांटमधे वॅगन प्लेसमेंटचं काम सहसा डीजल इंजीन करायचे).

तो म्हणाला बड़ा वाला एक्सचेंज यार्ड गया है...एक मेंटनेंस में है... तीसरे की शिफ्ट चेंज का टाइम है...

मी म्हटलं चलो...किधर चलना है?

तो म्हणाला-यहीं पीछे कोल यार्ड में सिक वॅगन काटना है...बड़ा डीजल एम्प्टी वॅगन लेकर आ रहा है। दूसरा स्टीम इंजीन शंटिंग करके एक लाइन खाली करके रखेगा। डीजल अंदर आने के बाद यही एम्प्टी कोल बॉक्स वॅगन लेकर हमें एक्सचेंज यार्ड जाना है। हमारे जाने के बाद पहले डीजल इंजीन, फिर दूसरा वाला स्टीम इंजीन लोड लेकर एक्सचेंज यार्ड आएगा, तब हमें वहां से कोल लोड लेकर आना है.

ठीक है...यानी आज रातभर पेरोगे (काम कराओगे)... चलो मास्टर...

इंजीन वाटर कॉलम मधेच उभं होतं...मी खलाश्याला म्हणालो टेंडर में पानी भर लो...तो खाली उतरून शेजारी असलेल्या पाण्याच्या टंकीवर चढला...मी मास्टर (ड्रायव्हर) राममनोहर यांना म्हणालो...मास्टर थोड़ा पीछे लेना...त्यांनी शीटी वाजवली...(इंजीनची) आणि रेग्युलेटर उचलून इंजीन थोडं मागे घेतलं...वरून खलाशी ओरडला...बस...मी मास्टरला म्हणालो हाेप्प...(म्हणजे बस...)

मी विचारलं कितनी सिक वॅगन काटना है.

पोर्टर म्हणाला-तीन हैं...

त्या तीन सिक वॅगन वेगळया करेस्तोवर दहा वाजले...मग त्याच एम्प्टी कोल बॉक्स वॅगन करिता व्हॅक्यूमसाठी पाइप लावून तो म्हणाला ‘मी जातो...शिफ्ट चेंजनंतर आलेला पोर्टर येईल...’ तो गेला...

मी गेज ग्लास भरला...अंगार नीट केलं...फायरबॉक्स मधे कोळसा फायर केला... तो पर्यंत खलाश्याने मागे टेंडर मधून कोळसा सरकवून ठेवला होता...गेज ग्लास भरताच मी इंजेक्टर बंद केला...हात धुतले...मास्टरला म्हटलं चलो मास्टर खाना खा लेते हैं। साढ़े दस-पौने 11 के पहले कुछ नहीं होगा। तसंच झालं...पावणे 11 वाजता शिफ्ट इंजार्च आले...म्हणाले...चलिए मास्टर... एम्प्टी कोल वॅगन लेेकर जाना है। आम्ही तयारच होतो...मास्टरनी व्हॅक्यूम चेक केला... आणि आम्ही निघालो...

मास्टरनी रेग्युलेटर उचलला...आणि इंजीनची मोट्‌ठी असलेली चाकं आपल्याच जागेवर एकदा गरगर फिरली...आणि गाडी पुढे सरकली...कंपनीच्या आवारातील गेटपर्यंत पोहचता-पोहचता स्पीड आली होती...गेट पासून थोडा चढाव असून लेफ्ट टर्न (डावीकडे वळण) होतं...तो टर्न संपताच गाव असून एक नाला होता...आम्ही एक्सचेंज यार्डजवळ पोहचलो...थोडंसं चढाव असलेला लेफ्ट टर्न (वळण) पार केला की कट पाइंट होतं. तिथे थांबावं लागे...तिथे असलेल्या छोटयाशा खाेपटीत दुसरा पोर्टर असे...तो त्या खोपटीत असलेल्या फोनवर केबिनमेनला सांगे की फॅक्ट्रीतून गाडी पोचली...मग तिथून लाइन क्लियर मिळाल्यावर ती किल्ली मिळायची. मग कटपॉईंट जोडला जाई. आणि आम्ही गाडी घेवून यार्डमधे पोहचत असू.

तर...त्यादिवशी वळणावरुनच दिसत होतं की तो पाेर्टर लाइन क्लियरचा बावटा दाखवत होता...रात्रीचे अकरा-सव्वा अकरा झाले असतील...चोहीकडे घुप्प अंधार होता...मी मास्टरला म्हणालो की आज वर्कलोड ज्यादा दिख रहा है. देखो ना...वो लाइन क्लियर का सिगनल दे रहा है. आम्ही कटपॉईंट जवळ पोचलो, तो पोर्टर इंजीन सोबत धावत-धावत वर चढला...

मी त्याला म्हणालो क्या बात है...आज कुछ खास है क्या...? एकदम प्वाइंट सेट करके लाइन क्लियर दे रहे थे...

तो म्हणाला आज काम बहुत है...यहां सभी लाइन ब्लाक हैं...एक लाइन खाली है...बड़ा वाला डीजल इंजीन (650 एचपी) एम्प्टी वॅगन में लगकर तैयार खड़ा है. आप अंदर आकर ये कोल वॅगन 4 नंबर लाइन पर बैक करोगे... तब वो डीजल एम्प्टी वॅगन लेकर फॅक्ट्री जाएगा...उसके जाते ही आप उसके द्वारा खाली की गई लाइन से वापस आकर शंटिंग करके पहले से रखे हुए सीमेंट लोड वॅगन में से 4 सिक वॅगन छांटोगे. शंटिंग के बाद कटप्वाइंट पर आकर साइड में खड़े रहोगे...अभी एक और कोल लोड आने वाला है. उसका इलेक्ट्रिक इंजीन जाने के बाद आपको उस कोल लोड में लगाकर व्हॅक्यूम रेडी करके रखना है...फॅक्ट्री से आने वाला दूसरा स्टीम इंजीन पहले आए हुए सीमेंट लोड का दूसरा हिस्सा लेकर आएगा...तब आप व्हॅक्यूम रेडी करके रखे हुए कोल लोड को लेकर फॅक्ट्री जाओगे...फॅक्ट्री पहुंचते ही पानी लेने के बाद फिर से एम्प्टी वैगन लेकर आओगे...

अबे...थोड़ी सांस तो ले...यानी आज पूरी रात जागना है...मास्टर आज रातभर जागरण है...मग मी खलाश्याला म्हटलं देख भई कोयला ठीक से भर ले...

आमचं इतकं बोलणं होईस्तोवर आम्ही यार्डमधे लाइनीच्या दुसरया टोकाला पोचलो होतो...मी आपल्या साइडच्या दारावरून समोर बघितलं...दूर काेपरयावर असलेल्या केबिनमधून लाइन क्लियर दिसलं...मी मास्टरला म्हणालो-रोकना मत, जाने दो...आम्ही डावीकडे पुढे जात होतो...

खरं म्हणजे केबिन नंतर पुढे एक ट्रैंगल होता...डावीकडे गेलं की बिलासपुर (मुंबई) आणि उजवीकडे गेलं की अकलतरा (हावड़ा)...आमच्या समोर तिसरी मुंबई-हावड़ा मेन लाइन होती....आम्हाला त्या केबिनच्या पार डावी-उजवीकडे असलेल्या होम सिगनलपर्यंत जायची मुभा होती.

डावीकडे आम्ही पुढे जातच होतो...मी पहिल्यांदाच इतक्या पुढे आलो होतो...मागे कोळश्याचा एम्प्टी वॅगन होत्या (म्हणजे बॉक्स वॅगनची अक्खी ट्रेन), त्यामुळे आम्ही मुंबई-हावड़ा मेन लाइनच्या अगदी जवळ पोहचलो होतो...मी ओरडलो-मास्टर होप्प...हां...अब बैक लो...आणि शेजारी उभ्या असलेल्या खलाश्याला म्हणालो...कोयला खिसका लिया है ना...टेंडर में ऊपर मत जाना...वहां ओएचई तार (ओवरहेड इलेक्ट्रिक तार) है...

आम्ही वॅगन चार नंबर लाइनीवर बैक केल्या...आज यार्ड फुल होता...तिथे असलेल्या पाच रेल लाइन पैकी चार पैक होत्या...तीनवर फॅक्ट्रीहून आम्ही आणलेले सीमेंट लोड वॅगन, एम्प्टी वॅगन होत्या. उरलेल्या दाेन लाइनीवर रेल्वेचे इंजीन लोड-एम्प्टी वॅगन आणून सोडत असत...

कटपॉईंटच्या शेजारी सीसीआयची सीमेंट फॅक्ट्री होती...आमच्या कटपॉईंट वरून एक लाइन त्या सीसीआयच्या यार्डकडे गेली होती...या मधल्या रेललाइनचा उपयोग इमर्जंसी मधे केला जायचा. एकीकडे आमचं यार्ड...दुसरी कडे सीसीआयची रेल्वे लाइन होती...त्या लाइनी पलीकडे एक मोट्‌ठं देऊळ होतं...त्या देवळासमोर सीसीआयची कालोनी होती...खरं म्हणजे ती फॅक्ट्री बंद होती...

तर ते बाॅक्स वॅगन प्लेस करून आम्ही परत केबिनपर्यंत आलो...पोर्टर केबिनवर जाऊन विचारपूस करून आला...म्हणाला चलो मास्टर...आम्ही परत फॅक्ट्री एंडच्या कटपॉईंट वर आलो...मग शंटिंग करून सिक वैगन वेगळया काढून ठेवल्या. नंतर त्या सीसीआयच्या सायडिंगला जाणारया लाइनवर आलो आणि तिथे उभं राहिलो...अंगार नीट करून पहुडलो. आज संध्याकाळी इंजीनवर चढल्यापासून हाच थोडासा वेळ मोकळा मिळाला होता...या दरम्यान फॅक्ट्रीमधून डीजल लोड घेऊन आला आणि परत गेला...त्यानंतर यार्ड मधून इलेक्ट्रिक इंजीनची शीटी ऐकू आली...डोळे किलकिले करून बघितलं तर रेल्वेचं इलेक्ट्रिक इंजीन आमच्या जवळ येऊन परत जात होतं...ते इंजीन निघून गेल्यावर आमचा पोर्टर आला...चलाे मास्टर कोल लोड आ गया है उसे लेकर हमें फॅक्ट्री चलना है...आम्ही परत कटपॉईंटपर्यंत आलो...आणि यार्डमधे शिरलो...कोल लोड मधे इंजीन जोडून पोर्टर मास्टरला सांगून व्हॅक्यूम चेक करायला निघून गेला. वीसेक मिनिटांनी तो परतला...तो पर्यंत मी फायरबॉक्स नीट करून ठेवला होता...आणि इंजीन समोरच असलेल्या रूळांवरील एका स्लीपरवर पंचा अंथरून आडवं व्हायच्या तयारीत होतो...पोर्टर रामलाल आला आणि माझ्याच शेजारी तो देखील येऊन पहुडला. मोकळया, निरभ्र आकाशा खाली आणि मुख्य म्हणजे संध्याकाळ पासून सलग काम करीत असल्यामुळे आलेल्या थकव्यामुळे पटकन झोप कधी लागली, माझं मलाच कळलं नाही.

कशाचा तरी मोट्‌ठा आवाज आला आणि मी दचकून उठलो...आवाज डावीकडून येत होता...तिकडे बघितलं तर समोर दोनशे फुटांवर स्टीम इंजीन आम्ही पहुडलेल्या रूळावर शिरत होतं...म्हणजे बघा फॅक्ट्रीतून येणारी एक लाइन...यार्डमधे पोहचल्यावर तिथून पाच लाइनी होतात...पैकी पहिल्या लाइनीवर आमचं इंजीन होतं...दुसरीवर मी आणि पोर्टर पहुडलेलो होतो...आमच्याच रूळावर इंजीन शिरतांना बघताच माझी फाटली...आणि मी ओरडलो...रामलाल भाग...रामलाल भाग...आणि पंचा उचलून उडी घेतली...रामलाल उठला आणि त्याने देखील उडी घेतली...आम्ही दीड फुट लांब झालो आणि इंजीन ज्या रूळांवर आम्ही झोपलो होतो त्याच रूळांवरून धाड-धाड करत यार्डमधे शिरलं...

मी बघितलं पोर्टर थर-थर कापत होता...मी त्याला धीर दिला...

आम्ही दोघं निस्तब्ध उभे होतो...काही सुचतच नव्हतं...

येणारं स्टीम इंजीन पहिल्यापासून ठेवलेल्या सीमेंट लोडचा दुसरा पार्ट घेऊन आलं होतं...आम्ही याच इंजीनची वाट बघत उभे होतो. ते पंधरा डबे...यार्डमधे शिरले...

दुसरीकडच्या रूळावर उभ्या असलेल्या आमच्या इंजीनमधे वर पहुडलेले मास्टर विचारत होते- तेलंग...सब ठीक है ना...! मी हो म्हणालो आणि तितक्यात कटपॉईंटच्या खोपटात असलेला तो पोर्टर आला...चलाे मास्टर लाइन क्लीयर मिल गया है...कोल लोड फॅक्ट्री लेकर जाना है...

मी म्हणालो...चलो...मास्टर...मी इंजीनमधे चढून फायरबॉक्स मधे कोळसा फायर केला...इंजेक्टर लावून बॉयलर मधे पाणी भरू लागलो आणि मास्टरला म्हणालो-चलो...

मास्टरनी शीटी मारली, रेग्युलेटर उचलला...आणि आम्ही कोल लोड वॅगन घेऊन निघालो.

त्यादिवशी झोप नसती उघडली तर...

हे सगळं कुणी सांगितलं असतं...!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त लिहिलं आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात रुळांवर झोपायचेच कशाला?

रुळांमधल्या लाकडी पट्ट्यांना 'स्लीपर' म्हणतात, याचा अर्थ त्या त्यांच्यावर झोपण्यासाठी बनविलेल्या असतात असा होत नाही, एवढे सामान्यज्ञान अधिक कॉमनसेन्स तर रेल्वेबाहेरच्या अडाणचोट 'सिव्हिलियन्स'नासुद्धा असतो आजकाल.

की 'चलता है, हिन्दुस्तान है' ॲटिट्यूड?

आणि, रुळांवर झोपायचेच होते, तर निदान स्वतःचे इंजिन ज्या लायनीवर पार्क केलेले आहे, त्या रुळांवर नाही झोपायचे? त्या लायनीवर (तुमचे इंजिन पार्क केलेले असताना) दुसरे इंजिन धडधडण्याची शक्यता (होपफुली) कमी. उगाच नसता शूरवीरपणा करून दुसऱ्या लायनीवर कशास झोपायचे ते आणखी?

रुळांवर निजणाऱ्यान् डोक्यावरून स्टीम इंजिन धडधडते म्हणून बोंबलून कसे चालेल?

त्यादिवशी झोप नसती उघडली तर...

हे सगळं कुणी सांगितलं असतं...!

छे हो! एवढे कोठले आमचे नशीब?

----------

(सवांतर/अवांतर शंका:)

- त्या फळकुटांना 'स्लीपर' असे नक्की का म्हणतात? नक्की कोणाला झोपविण्यासाठी असतात त्या?

- (त्याच धर्तीवर,) वायुसेनेतल्या एका उच्च अधिकारीपदास 'एअर कमोडोर' असे नाव का आहे? संबंधित अधिकाऱ्यावर विमानातले कमोड साफ करण्याची कोणतीही जबाबदारी नसताना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

मुळात रुळांवर झोपायचेच कशाला...?

खरंंय, तुम्ही देखील (वाचकांनी देखील) ट्रेननी बराच प्रवास केला असेल...तुमचंहि लक्ष गेलं असेलच की आजूबाजूच्या परिसराच्या मानाने दोन रुळांमधील स्लीपर स्वच्छ असतात...अगदी ठळक स्वच्छ दिसतात...लाकडी स्लीपर असोत किंवा सीमेंटचे. हे पहिलं कारण...

दुसरं म्हणजे इंजिनसमोर झोपलो नव्हतो हो... पहुडलो होतो...पण संध्याकाळ पासून सतत कामामुळे आलेल्या थकव्यामुळे झोप लागली...

तिसरं महत्वाचं कारण म्हणजे ड्राइवरच्या डोळयासमोर होतो...त्यांनी आवाज देताच उठायला...इंजीनच्या केबिनमधे टार्च मारला की ड्राइवरला स्टीम इंडीकेटर, गेज ग्लास दिसत होता...त्यात स्टीम, पाणी कमी झालं की ते आम्हाला आवाज द्यायचे...
...अंगार देख लो...पानी कम हो गया...मग उठून फायरबाक्स मधे कोळसा घालून इंजेक्टर लावायचा...

इंजीन समाेर झोपल्याने तिथपर्यंत आवाज पोहचत नसे. कारण स्टीम इंजीनचाच आवाज मोठा असायचा...

शूरवीरपणा कुठला हो...कामाने दमलेल्या माणसाला कंबर सरळ करण्या साठी तेवढीच (एका स्लीपरच्या रूंदीची) जागा लागते...

प्रसंग 1988 सालचा...तो लिहिला 2020 साली म्हणजे तब्बल 32 वर्षानंतर...लिहितांना आपला शूरवीरपणा दाखवायचा उद्देश्य नाहीच...

प्रत्येकाच्या जीवनात असे प्रसंग येतात...ते कुणीच सांगत नाहीत...
मी तो प्रसंग प्रामाणिकपणे लिहिला...एवढंच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रवींद्र दत्तात्रय तेलंग