दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग (भाग ३) - झाले मोकळे आकाश...

दूर गेल्यामुळे जवळून दिसलेले जग
हेमा पुरोहित

भाग तिसरा आणि अंतिम - “झाले मोकळे आकाश...”

ते ४० तास...

दुपारी १ला फोन आला तुमची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आहे. डोक्यातील चक्रे वेगाने सुरू झाली. चक्रधर शोधण्यापासून तयारी करायची होती. बोटं वेगाने फिरू लागली. ग्रुपमध्ये फोना फोनी झाली आणि जेवण झाल्यानंतर लगेच खाली अडीच वाजता जमायचे ठरले. ९ पुणेकर उत्साहाने खाली आलो होतो. ठराविक अंतर राखून मास्क लावून प्लॅन सुरू झाला. ट्रॅव्हल कंपनीला फोन करून टेम्पो ट्रॅव्हलर तर टेम्पो ट्रॅव्हलर बुक झाली.आणि लाईनीत उभे राहिलो. भर उन्हात खाली येऊन दीड तास झाला होता पण सगळे सोपस्कार गरजेचे होते. डिस्चार्ज स्लिप, ट्रान्झिट पास, गेट पास आणि USA हुन दिल्लीत आल्यानंतर २२ मार्चपासून त्यांनी ताब्यात घेतलेला पासपोर्ट हातात पडला तेव्हा कुठे हुश्श झालं. भराभर बॅग्ज भरून, मोबाईल चार्ज करून सगळे साडेसहालाच खाली. मेन गेटपर्यंत दोन दोन बॅग्ज ओढणेही कष्टाचे नव्हते तेव्हा. साडेसात वाजता, “आली आली आपली गाडी आली” असे झाले. लहान मुलांच्या ट्रिप सारखा आनंद होता तो. १७ दिवस फक्त एकेका खोलीत प्रत्येक जण वेगवेगळे बंद. (compulsory quarantine. ती गरज होतीच) गरजेपुरते आणि वैद्यकीय तपासणीसाठीच तळमजल्यावर जाणे नाहीतर चार भिंती आणि एक छप्पर फक्त. माणसाच्या गरजा परिस्थितीने कमीसुद्धा होऊ शकतात आणि स्वीकाराव्या पण लागतात. हसत हसत स्वीकाराव्यात. त्रास होत नाही. Smile
गेट पास देऊन मेन रोडवर मोकळा श्वास घेतला. नरेलाचा तो एवढा मोठा कॅम्प. बाय बाय करून गाडीत बसलेले पुणेकर आम्ही. गणपतीबाप्पा आणि मारुतीरायाचा जयजयकार हवाच. हनुमान जयंती होती ना ती...

२३ मार्चला पहाटे अडीचला एअरपोर्टवरून इथे येताना रस्त्यात होती तीच सामसूम आत्ता पण जाणवली. कुत्री मात्र मनसोक्त विहरत होती...
रात्री रस्त्यात पावभाजी मिळाली एक ठिकाणी. ते खाताना वाटलं नव्हतं त्यानंतर आता पुण्यात पोचण्यानंतरच जेवण मिळेल असं, पण तसंच होणार होतं. असो. त्या रात्रीची गाडीत मधूनच लागणारी झोपही वेगळी वाटली. सकाळी एका पेट्रोल पंपवर गाडीला पेट्रोल आणि आम्हांला वॉशरूम मिळाली. गाडीच्या खाली उतरताना आपला हॅन्डवॉश, सॅनिटायझर अशी सगळी आयुधं घेऊनच उतरायचे. आता कोणतीही रिस्क नको होती. गाडी फक्त पेट्रोल पंपवर थांबवणे. खाणेपिणे मिळणे शक्यच नव्हते. सरकारचे आदेश पाळले जात असल्याचे द्योतक होते ते त्यात समाधानही होते.

सकाळची वेळ असल्याने एका धाब्यावजा ठिकाणी कटिंग चहा मिळाला. जवळची बिस्किटं हातात घेतली आणि... आणि जवळचे एक कुत्रं शेपूट हालवत जवळ आले, त्याला बिस्कीट दिल्यावर आजूबाजूच्या ५ / ६ गाईपण जवळ यायला लागल्या. My God... डोळ्यांत पाहिली त्यांच्या भूक. सगळ्यांच्या जवळची बिस्किटं त्यांना दिली, रात्रीचे शिल्लक असलेले पाव दिले. (त्या बिस्किटासाठी होणाऱ्या मारामारीत कुत्रं सरस होत असल्याचे ही पाह्यलं.) पण भूक संपत नव्हती. “मुकी जनावरं” म्हणजे काय ते आज जाणवले. Sad (शेवटी ते बघताना डोळ्यांत पाणी तरळलेच, पण आतही ढकलता आले, १६ दिवसांत सवय झाली होती ना!!!) डोळ्यांद्वारे एका आत्म्याचा दुसऱ्या आत्म्याशी असलेला संवाद होता तो. पण आमचाही नाईलाज होता, गाडीत जाऊन बसलो, पुढचा संवाद साधायला.

आता जवळची चॉकलेट्स, सटरफटर खाल्लं जाऊ लागलं. अजूनपर्यंत पाणी तरी भरपूर होते जवळ... “जल ही जीवन है”...

बऱ्याच ठिकाणी चेकिंग खूप स्ट्रिक्ट होते, टेम्परेचर बघणे, ट्रान्झिट पास चेक करणे, फोटो काढणे हे सगळं स्वीकारूनच पुढे जावे लागत होते. खिडकीतून उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या, त्यामुळे चेकिंगच्या वेळी शरीराचे तापमानही वाढलेले येत होते. पण घरी जायचा आनंद त्याहून जास्त जाणवत होता. दुपारी ३ वाजता गाडीतल्या एकाच्या स्थानिक मित्राने खाकरे, पापड्या, शंकरपाळे असे काहीसे वाटेत थांबवून दिले. आणि आमची जेवायची सोय झाली. जास्त वेळ कुठे थांबू ही शकत नव्हतो, ड्रोन कॅमेऱ्यामुळे पेट्रोल पंपावरील माणसांना उत्तरं द्यावी लागली असती ना. त्याही गोष्टीचा स्वीकार!!! Acceptance कसा वाढवावा आपोआपच शिकायला मिळत होते. अर्थात शिकायचे असेल तर!!! आता पाणीही संपत आलेले. तिथल्याच एका देवळाजवळच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतील पाणी भरून घेतले. बिसलेरीची किंमतही त्यामुळे कळली...

परत पेट्रोल पंप, आणि वॉश रूम, चेकिंग. त्यांना पटवून द्यायचे आम्ही खबरदारी म्हणून विदेशातून आल्यानंतर काही त्रास नव्हता तरी १६ दिवस विलगीकरणात राहून टेस्ट करून निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन निघालो आहोत. कायदा होता. स्वीकारणे हितकारक होते, Candle light dinner ला सुद्धा खाकरे, शंकरपाळे होते. “अन्न हे पूर्णब्रह्म” प्रवासाने माणूस शिकतो म्हणतात. अध्यात्म जास्त शिकलं जातं, जी आहे ती परिस्थिती स्वीकारून शांतपणे पुढे जायचे शिकवतो प्रवास. असो.

एव्हाना ड्रायव्हर्स २ असूनही दमले होते. Non stop driving आणि त्यांनाही उपवास. पण आमच्याकडेच नव्हते. त्यांना काय देणार? तेही खाकरे, पापड्या खाऊनच चालवत होते. शेवटी “माझा महाराष्ट्र” सुरू झाल्यावर एका ठिकाणी थोडयावेळ गाडीतच त्यांना झोपू दिले. बिचारे लगेच घोरायला लागले होते. फोनचे चार्जिंग संपत आलेले. त्यामुळे घरी फक्त मेसेज करून गावाचे नाव कळवायचे.

पहाट झालेली जाणवायला लागली आणि मरगळलेली मनं परत प्रफुल्लित झाली, चला आता काही तासच उरले घरी पोचायला. एक्सप्रेस हायवे फक्त जड वाहनांना. अजून थोडा वेळ लागणार. आणि मग देहूरोडवरून परत एक्सप्रेस हायवेवरून येऊन एकेक जण मागचे ४० तास विसरून घरी परतू लागला. Home sweet home.

या ४० तासांच्या प्रवासात माझे मानसिक आधार - गाडीतील ८ पुणेकर, Smile आणि quarantine कॅम्पपासूनचे माझे मानसिक आधार माझा सख्खा भाऊ विवेक पुरोहित, दिल्लीत पोस्टिंग असलेला मावसभाऊ Inspector General of Police प्रमोद फळणीकर आणि आमचे नौशिर गुरुजी.

झाले मोकळे आकाश...

(समाप्त)
---

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet