मोठी हो म्हणावंसं वाटत नाही/ चिंतन

डिस्क्लेमर - मी काउन्सिलर नाही की मानसोपचारतद्न्य नाही. फक्त एक अनुभव मांडते आहे.

रावपाटील यांची ( मोठी हो म्हणावंसं वाटत नाही) ही कविता वाचली, जी की त्यांनी अन्य एका याच विषयावरील, कवितेवरती 'प्रतिक्रिया' देताना, पोस्ट केलेली आहे. मनात विचारांचे तरंग उमटाले. ही कविता, माझ्या मते 'चाइल्ड ॲब्युझ किंवा गर्दीतील ओंगळ धक्के' या विषयास स्पर्श करते. तसे नसल्यास चू भू द्या घ्या.

पूर्वी, विषयावरती माझ्या मनात, जो कल्लोळ उठायचा, किळस यायची, संताप (हा शब्द थिटा पडावा) अशा भावना धुमसायच्या, त्या विषयावर आता फक्त मनात तरंग उमटतात, ही उत्तम गोष्ट आहे. 'गर्दीतील धक्के/ लहान मुलांचे लैंगिक शोषण' हा अतिशय हीन प्रकार आहे याबद्दल दुमत नसावे. याविषयी इतका तीळपापड होण्याचे कारण हे जे शिकारी (predateos) असतात, हे लहान मुलामुलींना क्वचित विश्वासात घेउन तर कधी भुलवुन, त्यांचा गाफिल क्षणी दावा साधतात. लहान असली मुले तरी त्यांना बरे-वाईट हे कळत असते. त्यात जर वयाने, जरा अधिक मोठी म्हणजे पौगंडावस्थेत असतील तर नक्कीच कळते. लहानपणी एक तर अतिशय तीव्र भावना असतात, मेंदूची जडण घडण होत असते, पौगंडावस्थेत तर रेजिंग हार्मोन्स असतात. त्यामुळे आनंद, दु:ख, राग, घृणा, किळस साऱ्याच भावना, अतिशय प्रखर जाणवतात. आणि त्यांचे अतिशय नकोसे वाटणारे विषारी पडसाद पुढे वारंवार उमटत रहातात. बरं हे विचार, हे पडसाद कसे थांबवायचे हेही कळत नाही. अतिशय नकोसे विचार परत परत येतात, तीच घटना मनात जवळजवळ प्रत्येक वेळी घटते. त्या घटनेमुळे बसलेला मानसिक धक्का पचतच नाही. संपूर्ण जगावरती बालपणी जो आपण विश्वास टाकलेला असतो, तो भंग पावल्याने, असुरक्षित, भेदरल्यासारखे वाटते. बालपण च झाकोळून जाते. याविषयी विशेषत: ज्या भावनांमधुन व्यक्ती (लहान मूल) जाते त्याविषयी जितके बोलावे तितके कमीच आहे. पैकी आऊट & आऊट 'चाइल्ड ॲब्युझ' बद्दल मला काहीही माहीती नाही ना माझे वाचन आहे. हां ल्युसिल क्लिफ्टनच्या या विषयावरच्या अक्षरक्ष: अंगावर काटा आणणाऱ्या, २ कविता मी वाचलेल्या आहेत. परंतु भारतामध्ये बालपण व तेही तीसरीपासून खूप लांब शाळा असल्याने, बसमधून प्रवास करावा लागत असल्याने, हे ओंगळ स्पर्श, शब्द, धक्के मात्र अनुभवलेले आहेत. कोळसा उगाळावा तितका काळाच रहाणार त्यामुळे या बसमधुन खुले आम फिरणाऱ्या ओंगळ पालींबद्दल मला काहीच म्हणायचे नाही. कारण अतिशय कठोर कायदे जोवर अस्तित्वात येत नाही तोवर हा उपद्रव तसाच रहाणार.

मला आठवते, पूर्वी, आजाराची ट्रीटमेन्ट घेताना, मी काउन्सिलिंग सेशनला जात असे. मला तरी तेव्हा काउन्सिलिंगचा उपयोग काहीही झाला नाही पण त्याची कारणे परत वेगळीच आहेत. असो. तर या सेशनमध्ये मी एकदा या विषयावरती बोलण्याचा, व हा धक्क्याचा ओंगळ प्रसंग बोलून दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे मला स्मरते. पण आपण अपेक्षा करावी सुतळीची व टिकलीही निघू नये - असा काहीसा अनुभव मला आला. माझा internalize होउन अक्षरक्ष: fester झालेला अनुभव, पिकलेला, सडलेला अनुभव जेव्हा बाहेर प्रकट झाला, शब्दात मांडण्याची वेळ आली तेव्हा, त्याची एकदम सगळी पॉवरच गेली होती आणि काउन्सिलरला कळलेच नाही की यापूर्वी त्या प्रसंगाचा मला एवढा बाउ मी का केला. तिने तिचेही उदाहरण दिले की एकदा डिस्नी वर्ल्ड ला किणातरी मिकी माऊस चा मॅस्कॉट झालेल्या माणसाने तिला ' feel' करण्याचा प्रयत्न केला होता जो तिने टिचकीसरशी उडवुन लावला होता. बेसिकली कदाचित अमेरिकन असल्याने तिला याहून भयानक, गंभीर केसेस पहाण्याची सवय असेल, कदाचित मलाच इतका गंभीर प्रसंग नीट मांडता आला नाही, कारण काही का असेना, ती माझी व्यथा, किळस, राग समजू शकली नाही.

पण पुढे, मागे वळून पहातेवेळी मला एक जाणवले, ते हे की असा अनुभव आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर जरुर शेअर करावा, अगदी डिटेलवार. बट बी केअरफुल. अशी व्यक्ती जी प्रगल्भ असेल, जी तुम्हाला समजून घेउ शकेल, जी जजमेंटल नसेल अशी तुमच्या जीवाभावाची व्यक्ती. शक्यतो तिऱ्हाईत. कारण आपले नातेवाईक,near & dear ones आपल्यात गुंतलेले असतात. त्यांना अनुभव पचत नाही, किंवा आपल्या काळजीपोटी ते स्वत:च हतबल होतात.तेव्हा आपले नातेवाईक टाळाच असा मी सल्ला देईन. पण तुमच्या लक्षात येइल, हा जो आपल्याला आतलया आत डायनॅसोर वाटणारा अनुभव असतो, हा बाहेर आल्यावरती, एका अळीइतकाही दिसत नाही. म्हणजे त्याची सत्ता फक्त मनाच्या सांदेकपारीत दडून बागुलबुवा निर्माण करण्याएवढीच असते. प्रत्यक्षात आपण जेव्हा काठ्या आपटुन, धूराने कोंडी करुन, हुसकावुन याला बाहेर काढतो तेव्हा, डोंगर पोखरुन उंदीरसुद्धा निघत नाही. मैत्रिणीलाही तसाच अनुभव दुर्दैवाने आला असेल तर हेही लक्षात येते की आपण एकटे तर नाहीच तेव्हा 'व्हाय मी?' ला काहीही अर्थ नाही. तेव्हा गेट अप गेट गोइंग. स्वतःचे स्वतःलाच सावरायचे असते, स्वतःलाच पटवायचे - "दिलमे सूरज उतारना होगा!". शिवाय आजूबाजूला आपले मायेचे लोक असतातच. जगावरती परत विश्वास टाकायला शिकायचे असते. गुड लक!!

वरील, कविता वाचून, हे सर्व मांडावेसे वाटले.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ती कविता ऐसीवर आताच पोस्ट केली आहे. https://aisiakshare.com/node/7643

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे जीवन सुंदर आहे.. Smile