करोनाकाळातली मोहरीच्या दाण्याएवढया सद्गुणाची गोष्ट

करोनाकाळातली मोहरीच्या दाण्याएवढया सद्गुणाची गोष्ट
गणेश कनाटे

मला कलेतले, साहित्यातले, विशेषतः कवितेतले वैगुण्य चटकन दिसते आणि नुसते दिसतच नाही तर ते मला मोठे करून बघण्याची एक वाईट सवयच आहे. मात्र माणसांच्या बाबतीत अगदी उलट होते. मला त्यांचे दोष, मर्यादा, त्यांची वाईट वृत्ती, अगदी त्यांच्यातला खुनशीपणाही स्वच्छ दिसतो. लोकांचा अहंकार, त्यांचे आत्ममग्न असणे (अर्थात वाईट अर्थानेच) दिसले की वाईट वाटते. पण त्या व्यक्तीबद्दल एकुणात विचार करताना मात्र मी ते दोष लहान करून बघतो आणि त्यांचे गुण मोठे करून बघतो. यामुळे अनेक माणसं ज्यांना खरे म्हणजे मी कधीच जीवनातून वजा करायला हवे होते, ते अजूनही माझ्या जीवनात आपले स्थान टिकवून आहेत.
मी लहान असताना आचार्य विनोबा भावे यांचे यासंदर्भातील एक मार्गदर्शनपर विधान वाचल्याचे आठवते. ते म्हणायचे की दुसऱ्याचे दोष छोटे करून बघावेत आणि गुण मोठे करून आणि स्वतःचे दोष मात्र मोठे करून बघावेत आणि गुण छोटे करून. या वाक्याचा आणि अर्थात शुभदृष्टी असलेले काही गुरू लाभल्यामुळे असेल कदाचित पण या वृत्तीचा एक संस्कार मनावर झाला असावा. म्हणून एखाद्यावर जाहीरपणे टीका करणे, त्याच्या/तिच्या वैगुण्यावर बोट ठेवणे, जाहीरपणे भांडणे इत्यादी गोष्टींबद्दल माझा हात नेहमी आखुडच असतो.

म्हणूनच कलेच्या बाबतीतही मला वैगुण्य दिसते आणि त्याबद्दल मी जे काही माझ्या अल्पमतीने लिहितो त्यात उदाहरणे द्यायची वेळ आली की माझी ही वृत्ती, स्वभाव, संस्कार काय जे असेल ते आड येते. मग मी मला मांडायचा मुद्दा हळूच सैद्धांतिकतेकडे घेऊन जातो आणि त्यासाठी गरजेचे असलेले नामोल्लेख टाळतो.

पूर्वी मला हा मोठा सद्गुण वाटे पण आजकाल जरा शंका येत असे. वाटायचे की कदाचित विनोबांचा विचार अतिआदर्शवादी असावा आणि म्हणून तो व्यवहार्य नसावा. मी मधूनमधून आपली ही सवय, संस्कार, वृत्ती बदलावी, असा विचार करत असे. आणि तसे केल्याने मला काही फरक पडणार नाही, याचीही खातरी आहेच कारण लोकांकडून काही लाभ मिळावे, हे वाटण्याचे वय, परिस्थिती आणि मनस्थिती मी बरीच मागे टाकली आहे.

हे नमनाला घडाभर तेल ओतण्याचे कारण गेले दोन महिने सतत घडत असलेल्या एका गोष्टीने विनोबांच्या विचारांतली शुभदृष्टी, व्यवहार्यता आणि तिचे महत्त्व माझ्या या जरड मनावर पुन्हा एकदा अधोरेखित झालेले आहे.

तर ती गोष्ट अशी की या कोरोनाकाळात गेल्या दोन महिन्यांत संध्याकाळी एका विशिष्ट वेळी मी माझ्या खिडकीत उभा राहून बाहेर रस्त्याकडे बघत असे. सुरुवातीला ती वेळ संध्याकाळच्या माझ्या कॉफीनंतरची स्वतःला सतत मनाला वेढून टाकणाऱ्या नैराश्य भावनेला पिटाळून टाकण्याची वेळ म्हणून मी ठरवली होती. पण माझ्या असे लक्षात आले की त्याच वेळी आमच्या शेजारच्या बिल्डिंगमधल्या दोन तिशीतल्या स्त्रिया नित्यनेमाने आमच्या बिल्डिंगसमोरच्या रस्त्यावर दोन मोठ्या पिशव्या घेऊन यायच्या आणि त्यात खुप सारे 'डॉग फूड' आणि 'कॅट फूड' घेऊन यायच्या व ते रस्त्यावरच्या बेवारशी कुत्र्या-मांजरांना खाऊ घालायच्या. मला सुरुवातीला वाटायचे की त्या घरातले उरलेले अन्न, किंवा पार्ले बिस्कीट वगैरे आणत असाव्या.

मग एक दिवस मी खाली जाऊन जरा दूर उभे राहून पाहिले तर त्या ब्रँडेड डॉग फूड आणि कॅट फूड आणायच्या, सोबत एका मोठ्या डब्यात चक्क दूधही आणायच्या. दोघींपैकी एक तीन-चार पातेल्यांत दूध ओतायची, दुसरी दुसऱ्या तीन-चार पातेल्यांत खायचे पदार्थ काढायची आणि त्या दोघीही त्या बेवारशी प्राण्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करत खाऊ घालायच्या.

Stray Dog
दोनेक दिवसांनी मी त्यांचे खाऊ घालण्याचे काम आटोपून त्या परत जात असताना त्यांच्याशी बोलायला म्हणून पुढे गेलो.
त्या दोघी तश्या येताजाता दिसणाऱ्या तरुण स्त्रिया आहेत. त्यामुळे त्यांनाही अगदीच अनोळखी माणूस आपल्याशी बोलतोय, असेही वाटले नसावे म्हणून आमचे संभाषण अगदी सहज सुरू झाले आणि नंतर अनेक दिवस ते सुरू आहे.

त्या संभाषणाबद्दल आणि त्याचा माझ्या मनावर झालेल्या परिणामाबद्दल सांगण्याआधी थोडे त्यांच्याबद्दल सांगायला पाहिजे.
त्या दोघीही आमच्या हिरानंदानी इस्टेट या उच्चमध्यमवर्गीय लोकवस्ती असलेल्या टाऊनशीपमध्ये राहणाऱ्या गलेलठ्ठ पगार कमावणाऱ्या नवऱ्यांच्या नोकरी न करता घरसंसार करणाऱ्या पण ग्रॅज्युएट-पोस्टग्रॅज्युएट स्त्रिया आहेत. पूर्वी जेव्हा मी जिमला जात असे तेव्हा तिथे व्यायाम कमी आणि गप्पा जास्त करणाऱ्या बायकांचे एक टोळके होते. या दोघीही त्या टोळक्यात नेहमी दिसायच्या. तसेच आम्ही ज्या पार्लरमध्ये जातो तिथेही ज्या बायका साधारण दोनेक तास घालवूनच परत येतात, त्या या स्त्रिया. थोडक्यात म्हणजे भांडवलशाहीने जो एक चंगळवादी मध्यमवर्ग निर्माण केलाय आणि ज्यांच्याबद्दल बोलताना/लिहिताना विचार करणारे लोक हे नेहमी तुच्छतेने बोलत/लिहीत असतात (त्यात काही प्रमाणात मी देखील मोडतोच) त्याच वर्गाच्या या प्रतिनिधी. गम्मत म्हणजे या बेवारशी कुत्र्या-मांजरांना खायला घालायला घरून निघताना त्या दोघीही अगदी घरच्या कपड्यांत नसतात. त्या छान बाहेर घालायचे सेमी-फॉर्मल कपडे घालून, पायांत रिबॉक/ऍडीडासचे स्पोर्ट शूज घालून, मास्क लावून, हातांत ग्लोव्हज घालून यायच्या/येतात.
त्यांच्याशी बोलण्यापूर्वी माझ्याही मनात थोड्याफार फरकाने त्यांची हीच प्रतिमा होती.

तर या पार्श्वभूमीवर मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली आणि एक वेगळेच विश्व उभे राहायला सुरुवात झाली.

पहिल्या दिवशी तर मी विचारत असलेले प्रश्न बघून एकीने सरळच विचारले, "Are you kind of interviewing us? Do you have doubts about our intentions or what? We are not interested in any publicity and we are also not open for any scrutiny of our deeds or actions."

मी तिची सरळ क्षमा मागून त्या दोघींना सांगितले की माझा हेतू त्यांची मुलाखत घेणे किंवा त्यांच्या कोणत्याही कृतीबद्दल त्यांच्यावर टीका करणे, हा नसून एक साधा विचार करणारा माणूस म्हणून दुसऱ्या 'चांगले काम' करणाऱ्या माणसाच्या प्रेरणा जाणून घेणे आणि ते समजून घेणे, हा आहे. माझ्या या स्पष्टीकरणाने बहुतेक त्यांचे काहीप्रमाणात समाधान झाले असावे कारण मग आम्ही नीट बोलू लागलो.

किंबहुना तिसऱ्या का चौथ्या दिवसापासून मी त्या टीमचा तिसरा सदस्यही झालो. मी त्यांना मदतही करू लागलो.
आमचे सगळे संभाषण इंग्रजीतून झाले आणि अजूनही होत असते पण मी ते मुद्दाम मराठीत मांडणार आहे जेणेकरून ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे.

"तुम्ही आडून-आडून उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही खरंच उच्चशिक्षित, उच्चमध्यमवर्गातल्या नवऱ्याचा संसार करणाऱ्या स्त्रिया आहोत. आम्ही कधीही कुठलेही समाजकार्य किंवा अगदी रोटरी किंवा तत्सम क्लबच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कामांतही भाग घेतला नाही. आमची माहेरंदेखील अशीच सांपत्तिक सुस्थितीत असलेली घरं. लठ्ठ पगार, मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम, हिरानंदानी इस्टेटसारख्या प्रतिष्ठित टाऊनशीपमध्ये स्वतःचा फ्लॅट असलेल्या माणसासोबत लग्न करून, दोन मुलं जन्माला घालून नवरा, मुलं, आणि घरकाम यात गुंतून गेलेल्या आणि कधीही याबद्दल वेगळा विचार न केलेल्या आम्ही दोघी शेजारणी आहोत.

या संकटकाळात घरात कोंडून घ्यायची पाळी आल्यावरही आम्ही दोघी रोज काहीतरी काम काढून खाली पार्किंगमध्ये येऊन, मास्क लावून, थोडे अंतर ठेवून एकमेकींशी बोलायचो. एकदिवस आम्ही दोघी तासभर बोलत उभा होतो आणि अचानक घरी परत जाणार तेव्हा लक्षात आलं की एक कुत्रा पार्किंगमधल्या एका गाडीखाली काहीही हालचाल न करता तासभर नुसताच पडून होता. त्याने काहीही हालचाल केलेली नव्हती. त्याला हाडहूड करून पाहिली पण थोडे डोळे किलकिले करण्यापलीकडे त्याने काहीही केले नाही. आमच्या घरी कुत्री-मांजरं नसल्यामुळे आम्हाला काही अंदाजही करता येईना. पण तरीही मग आम्ही घरी जाऊन थोडं दूध आणि थोडं घरचेच अन्न आणले आणि त्याच्या पुढ्यात ठेवले. अन्न बघून मात्र कुत्र्याने हालचाल केली. आधी तो दूध प्याला आणि नंतर त्याने आणलेल्या अन्नापैकी थोडे खाल्ले. थोड्यावेळाने तो जरा ताजातवाना वाटला.

दुसऱ्या दिवशी तो पुन्हा दिसला तर आम्ही पुन्हा त्याला खायला आणून दिले मात्र त्यादिवशी तो आमच्या चर्चेचा विषयच झाला. आमच्या असे लक्षात आले की यांच्यासारखे पूर्ण इस्टेटमध्ये कितीतरी बेवारशी कुत्री-मांजरं असतील ज्यांना या अचानक ओढवलेल्या लॉकडाउनच्या संकटामुळे खायला मिळणेच बंद झाले असावे. त्यात पूर्ण इस्टेटमध्ये असलेली जवळजवळ पंधरावीस रेस्टॉरंट्सही बंद झालेली ज्यामुळे तिथले शिळे अन्नही।यांना मिळणे बंद झाले असावे.

आपल्या परिवारापलीकडे न बघणारे आपण यांचा कधीच विचार करत नाही पण केला पाहिजे, असे आम्हा दोघींनाही मनापासून वाटले. मग आम्ही आमच्या नवऱ्यांना सुरुवातीला मिळेल त्या किराणा दुकानांतून, औषधांच्या दुकानांतून आणि आता ऑनलाइन ऑर्डर करून डॉग फूड आणि कॅट फूड मागवायला लावले आणि तुम्ही पाहिले तसे शक्य तितक्या बेवारशी कुत्र्या-मांजरांना खाऊ घालायला सुरुवात केली.

एक दिवस भाजी आणायला गेलो असताना त्या दुसऱ्या गल्लीत एकजण आमच्यासारखाच कुत्र्यांना खाऊ घालत होता. आम्ही त्याच्याशी बोललो तेव्हा लक्षात आलं की आमच्यासारखे दहाएक लोक पूर्ण इस्टेटमध्ये हे काम करत आहेत.

आता आमचा एक व्हाट्सएप ग्रुप आहे. त्यात एकूण पंधरा लोक आहोत. आता आम्ही गल्ल्या वाटून घेतल्या आहेत, मित्र परिवारांकडून स्वेच्छेने आलेली आर्थिक किंवा अन्नरूपात आलेली मदत आम्ही गोळा करतो आणि शक्य तितक्या कुत्र्या-मांजरांना खाऊ घालतो."

कोरोना नंतरच्या काळात त्या हे काम सुरू ठेवतील की बंद करतील, या प्रश्नावर ते काही दिवसांनी लॉकडाऊन पूर्ण संपल्यावर ठरवू असेही त्या म्हणाल्या.

"बहुतेक आम्ही हे बंद करणार नाही, असंच वाटत," त्यातली एक अत्यंत आश्वस्त स्वरात म्हणाली.

या दोघीही हे काम पुढे करतील की करणार नाही, हे महत्त्वाचे आहेच पण जर त्यांनी आणि त्यांच्या समूहातील त्या पंधरा लोकांनी हे काम नंतर बंद जरी केले तरी गेल्या तीन महिन्यांत या छोट्याश्या, अनौपचारिकरीत्या एकत्र आलेल्या, पदरचे पैसे खर्च करून जवळजवळ शंभरेक बेवारशी कुत्र्या-मांजरांना जगवणाऱ्या या माणसांतल्या माणुसकीने संकटकाळात आपले दर्शन दिले, एवढे तरी म्हणताच येईल.

त्यांना कुणालाही संस्था काढायची नाही, कुणालाही प्रसिद्धी नको आहे, कुणालाही डोनेशन्स नको आहेत. पण हे सगळे हे काम पुढे करतीलच, याबद्दल मला आशा वाटते.

उद्या ही माणसे समाजाने ज्यांचा गौरव करावा, असे समाजसेवक होणार नाहीत बहुतेक; हे कुणीही खातरीने मार्क्स, गांधी, आंबेडकर वाचणार नाहीत, हे बहुतेक जण आपापले स्वतःचेच संसार स्वतःला झोकून देऊन टिकवतील पण ही माणसं ही कुत्री-मांजरं जगवतील. त्यांना त्यांच्या स्वार्थी जगण्यापलीकडे जगण्याचा काहीएक हेतू सापडलाय आणि माझी आता दोनेक महिन्याच्या अनुभवावरून ही खातरी झालेली आहे की यांना या स्वार्थापलीकडे विचार करायला लावणाऱ्या विचाराचा जो 'संसर्ग' झालाय तो त्यांना आयुष्यभर चिकटून राहील.

मध्यंतरी श्रुती तांबे मॅडम यांनी बंगालमधून पुण्यात येऊन अडकून बसलेल्या एका माणसाची गोष्ट एका फेसबुक पोस्टमध्ये लिहिली होती. त्यावर कमेंट करताना मला अमृता प्रीतम यांच्या 'पिंजर' या प्रसिद्ध कादंबरीतील एक वाक्य आठवलं होतं की 'एक जरी मुलगी सुरक्षित घरी पोचली तरी मला मीच घरी पोचली असं वाटेन.'

या पंधरा लोकांकडे बघतानाही माझी तशीच काहीशी भावना आहे की यांच्यापैकी एकाने जरी हे काम असेच सुरू ठेवले तरी माणुसकीचे हे काम सुरूच राहील, माणुसकीवरचा माझा विश्वास असाच कायम राहील. मला मग ही माणसं उच्चमध्यमवर्गीय आहेत का श्रीमंत आहेत याने काहीही फरक पडणार नाही.

त्यांच्यासोबत सुरू झालेल्या संवादातून काही सकारात्मक घडले तर ठीकच परंतु न घडले आणि ते जर एवढेच काम करत राहिले तरीही त्यांच्याबद्दल माझ्या मनात तितकेच प्रेम आणि आदर असेल.

मी नेहमीच त्यांचा हा एक मोहरीच्या दाण्याएवढा सद्गुण आभाळाएवढा मोठा करून पाहीन आणि विनोबांना ही दृष्टी, हा संस्कार दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद देईन.

Vinoba Bhave

---
गणेश कनाटे
लेखक २२ वर्षे पत्रकारितेच्या व्यवसायात कार्यरत होते. प्रिंट मीडिया आणि टीव्हीसाठी त्यांनी काम केले आहे. आता ते खाजगी कंपनीत आहेत. ते कविता आणि समीक्षात्मक लिखाणही करतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet