१८९७ माणदेश । औंधातला प्लेग

भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी, अर्थात बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांची थोडीफार ओळख मराठी वाचकांना असेलच. आचार्य अत्र्यांनी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकाची प्रेरणा ज्यांच्यावरून घेतली ते, किंवा व्ही.शांताराम यांचा ‘दो ऑंखे बारा हाथ’ ज्या खुल्या तुरुंगाच्या संकल्पनेवर बेतला होता ती संकल्पना राबवणारे, औंधात हायस्कूल आणि बोर्डिंग काढून त्यात माडगूळकर बंधू, साने गुरुजी, शंकरराव खरात यांच्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांना आश्रय देणारे, किर्लोस्कर, ओगले प्रभृती मराठी उद्योजकांना मदत करणारे, वगैरे त्यांच्या ओळखी अनेक आहेत.

a

भवानरावांनी १९४६ साली स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या महाराष्ट्राबद्दल उत्सुकता असलेल्या प्रत्येकाने हे आत्मचरित्र मुळातूनच वाचावं इतकं ते अप्रतिम आहे. तत्कालीन संस्थानं, त्यातला एकंदर अनागोंदी कारभार, इतकंच नव्हे, तर त्यांच्या पिढीचं - विशेषतः संस्थानिकांचं - कामजीवन, आजार, व्यसने,औषधे, इत्यादी अनेक गोष्टींची माहिती मिळते. या पुस्तकावर विस्ताराने लिहिण्यासारखं खूप आहे, पण ते पुन्हा कधीतरी.

तूर्तास, करोनाच्या पार्श्वभूमीवर औंध संस्थानातल्या प्लेगबद्दल भवानरावांनी लिहिलेल्या आठवणी आठवल्या. शब्दाचाही फेरफार न करता त्या खाली देत आहे. जिथे मला भर घालावीशी वाटेल तिथे कंसात, आणि निळ्या अक्षरांत, घातली आहे.

सुरुवात करण्यापूर्वी थोडी पार्श्वभूमी. भवानरावांचा जन्म १८६८मधला. म्हणजे, खालील वर्णन आहे त्या १८९७च्या प्लेगच्या वेळेस ते तिशीत पदार्पण करत होते. प्रतिनिधीपदी विराजमान असलेले वडील आणि दोन थोरले भाऊ हयात होते, त्यामुळे राजेपद मिळेल असं त्यांना त्याकाळी वाटत नसे. आपल्या भावांच्या तुलनेत भवानराव जास्त शिकलेले (डेक्कन कॉलेजमधून बीए झालेले) होते, आणि दोन वर्षं मुंबईला राहून एलएलबी करायची (अयशस्वी) खटपटही करून झाली होती. सांगायचा मुद्दा असा, की भावांच्या आणि तत्कालीन औंधासारख्या गावंढ्या गावाच्या तुलनेत भवानराव चांगलेच बहुश्रुत आणि जग पाहिलेले होते.

--x--

कऱ्हाडाहून श्री देवी येणार, त्या दिवशी आम्ही त्रिवर्ग बंधु - दादासाहेब, तात्यासाहेब. व आम्हीं - काजळ वडापाशी गेलो. गांवांत सर्व मंडळींनी पेठकऱ्यांनी सडासंमार्जन करून रांगोळ्या घातल्या होत्या. मोठया थाटाने मिरवत मिरवत पालखी गांवांत आली. अनेक सुवासिनींनी कुरवंड्या केल्या. लोकांनी लाह्या, फुले उधळली. अशा समारंभाने श्रीची स्वारी येऊन वाड्यांत दाखल झाली.

पुढे लवकरच नवरात्राचा उत्सव सुरू झाला. उत्सवास औंध मुक्कामी ब्राह्मणांची पंचाईत पडली. सुमारे १२० तरी ब्राह्मण उत्सवास अनुष्ठानाकडे लागत. औंधास सारे ५०-६० मिळाले. तेवढ्यात दोन दोन तीन तीन पाठ प्रत्येकास देऊन कसेतरी भागविलें. कऱ्हाडास उत्सव होत असतांना जशा पाठाबद्दल ब्राह्मणांच्या उड्यावर उड्या पडत, तसे येथे आजपर्यंतसुद्धां झालें नाही. मग काय पाठ करणारे ब्राह्मणच कमी झाले की काय, काही समजत नाही. असो.

उत्सव यथासांग चालला असतांना सुमारे अष्टमीच्या सुमारास 'पटवेकरी याचे घरीं प्लेग केस आहे’ अशी बातमी आली. आमच्याकडे त्यावेळी कोणताही अधिकार नव्हताच. पण नारायण भिकाजी (जोगळेकर, संस्थानाचे कारभारी) यांनी खटपट पुष्कळ केली की, ती केस बाहेर काढावी म्हणून. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. ती बाई मरायची ती मेली आणि हळूहळू गांवांत प्लेग सुरू झाला.

विनायकशास्त्री खानापूरकर यांनी लुच्चेगिरीने काही प्लेगप्रतिबंधक विधान काढले. कोठे उपाध्यायाचे घरी काही जुन्या पोथीची पाने मिळाली, म्हणून थाप मारली. गाढवावर बसलेली देवी, तिच्या हातांत केरसुणी, अशी प्रतिमा करून अनुष्ठान करावे म्हणजे प्लेग नाहीसा होईल व पुन्हां येणार नाही, असे ते म्हणू लागले. सर्व लोकांचा सर्वस्वी या गोष्टीवर भरंवसा बसला नाही. तथापि धर्म-कार्य आहे, त्यापासून झाला तर उपयोगच होईल, अपाय होणार नाही, असें ठरले व यजमानसाहेब यांनी अनुष्ठानास परवानगी दिली. झाले, आठ चार दिवस वीस पंचवीस ब्राह्मण काही जप करीत आणि तूप पोळी यथास्थित खात; त्याने काय प्लेग कमी होणार ? इनॉक्युलेशन, इव्हॅक्युएशन, डिसिन्फेक्शन, असे अनेक उपाय अनेक वर्षे सारखे चालले आहेत, तरी त्याचे पाऊल मुळीच कमी नाही. फक्त वेळेवर झाले तर इनॉक्युलेशन आणि विशेषतः इव्हॅक्युएशनचा मात्र उपयोग होतो. पण हे तत्त्व त्यावेळी मुळीच कोणास समजले नव्हते. त्यावेळी लोकांचे मनावर मृत्यूचा पगडाच जास्त बसे. निम्मी भीति प्लेगची आणि निम्मी भीति खालसा मुलुखांतील (म्हणजे संस्थानी अंमल नसलेल्या, इंग्रजी मुलुखातील) दवाखान्यांत धरून नेणेची ! असो. अनुष्ठान-समाप्ति झाली. काही पाणी मंत्रून सर्व गांवांत शिंपडण्याचे सोंग झाले. दक्षिणा घेतल्या. शास्त्रीबुवांनाही बरीचशी दक्षिणा व सोन्याची प्रतिमा मिळाली.

पण प्लेग दिवसेंदिवस जास्त वाढू लागला. त्याचे पाऊल कांहीं कमी येईना. आमचा भरंवसा या अनुष्ठानावर नव्हता. आम्ही मुद्दाम शास्त्रीबुवांस विचारावें, ‘शास्त्रीबुवा, कसे काय ? तुमचे अनुष्ठान तर यथासांग झाले ? अजून प्लेग कमी होत नाही, हे कसे काय ?’ ‘होईल महाराज, आतां हळूहळू कमी’ असे शास्त्रीबोवांनी हिरमुसले होऊन म्हणावे. शेवटी बिचाऱ्या शास्त्रीबोवाला या सर्व थापांचे आणि फसविण्याचेच की काय कोणाला ठाऊक प्रायश्चित्त मिळालें ! त्यांचा एकुलता एक होतकरू सुमारे बारा वर्षांचा मुलगा प्लेगला बळी पडला !

होता होतां प्लेग फार वाढला व रोज दहा पांच केसीस् होऊ लागल्या. आम्हां सर्वासच अत्यंत भय वाटू लागले. रात्रभर झोप येईना. उगीच काखेत दुखल्यासारखे वाटावें, जांघाडांत दुखल्यासारखे वाटावें, अंग ऊन लागते असें वाटावे, असे होऊ लागले. यजगानसाहेबांस “महाराज, आपण बाहेर राहण्यास जाऊंया” म्हणून आग्रह आमचा, मातोश्रींचा आणि तात्यासाहेबांचा चाललाच होता. त्यांनी मुळीच कबूल करूं नये. “आहे आमची अंबाबाई, ती संरक्षण करण्यास समर्थ आहे. बाहेर जाऊन तरी काय होते आहे ? आम्ही बाहेर गेल्यावर श्रीची व्यवस्था, नैवद्य, वैश्वदेव कोण पाहणार ?” असे म्हणावें, असे चालले होते. काही केल्या ते ऐकेनात.

शेवटी प्रत्यक्ष वाड्यांत उंदीर पडणेस आरंभ झाला. कोठीत अनेक उंदीर पडले. कोठावळा लागला, मेला. दुसरा एक मुलगा ठेवला, तोही पुढे काही दिवसांनी मेला. थोरल्या जामदारखान्यांत उंदीर पडले. नारायण काशीद जामदार, तो लागला व मेला. कोठीत काही दिवस गंगाधर मेहेंदळे कोटणीस याने काम केले. तो लागला व मेला. मग फारच धास्ती वाढू लागली. यजमान साहेब यांच्या जामदारखान्यांत दहा पांच उंदीर एकदम मेले. त्यांचा जामदार नाना चंचणीकर लागला व मेला. असा धडाका सुरू झाला. तथापि यजमान साहेब किन्ईस (‘किन्हई’ या पंतप्रतिनिधींच्या जहागिरीच्या गावात भवानरावांची सावत्र आई - म्हणजे श्रीनिवासरावांची दुसरी पत्नी राहात असे. तिथे प्लेगचा जोर औंधापेक्षा कमी होता.) जाण्याचे कबूल करीनात. फारच पंचाईत येऊन पडली. आतां प्रत्यक्ष घरांतील माणसांवर प्रसंग येऊन पडतो की काय, अशी धास्ती वाढू लागली.

शेवटी एक दिवस सकाळी देवघरचे दिवाणखान्यांत उंदीर मेल्याची घाण येऊ लागली. मग मात्र दम मुळीच निघेना. आम्ही मातुश्रीस विचारले, ‘आता कसे काय करायचे ? आतां येथे वरसुद्धा उंदीर पडले. आतां मुलें माणसे बळी पाडावयाची की काय ?’ मातुश्री म्हणाल्या, ‘मी तरी काय करूं ? यजमान कबूलच करीत नाहीत. आता काय करावे ?’ आम्ही म्हणालों, ‘आता आम्ही व तात्यासाहेब तर एकदम मळ्यांत पुढे जातो. सर्व मुले माणसें नेतो. एकटेच राहिल्यावर कदाचित् यजमानसाहेबही कबूल करतील व येतील. त्यांस आपण दुपारून युक्ति प्रयुक्ति करून घेऊन यावे.’ ‘बरें आहे.’ मातुश्री म्हणाल्या.
नंतर आम्ही देवीस जाऊन आलों व यजमानसाहेबांकडे (भवानराव वडिलांना - म्हणजे श्रीनिवासरावांना ‘यजामानसाहेब’ असे संबोधत.) जाऊन म्हणालों, “सर्व वाड्यांत वर उंदीर मेल्याची घाण येऊ लागली आहे. आम्हास येथे मुळीच चैन पडेनासे झाले आहे. तर आम्हांस आतांच मळ्यांत जाण्याची आज्ञा व्हावी. आजचा आमचा नैवेद्य तेथेच. सरकारनी मागाहून नैवेद्य, वैश्वदेव करून यावे. अशी विनंती आहे.” “काय जगदंबेची इच्छा असेल ते खरे.” महाराज म्हणाले, “तुम्हांला गोड वाटत नाही, तर तुम्ही जा.”

झाले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही उभयतां बंधु बायका व मुले घेऊन मळ्यांत गेलो. गाड्या परत पाठविल्या. आम्ही, सर्व मुलेंलेकरें वाड्यांतून निघून गेल्यावर त्यांना वाड्यांत चैन पडेनासे झाले. शेवटी रोज उदक सोडण्यास मळ्यांतून मातुश्रींनी यावे, असें ठरवून यजमान व मातुश्री दुपारी मळ्यांत आली.

हेच आम्ही पंधरा दिवस आधी आलो असतों, दसरा झाल्याबरोबर आम्ही जाऊन सर्व गांव मोकळा केला असता, तर चाकर माणसें व गांवांतील इतर माणसें फार दगावली, ती कदाचित् गेली नसती. पण भवितव्यता ! त्यास कोणाचा इलाज आहे ? आमच्याबरोबर भालदार, शिंगाडे (शिंग फुंकणारे), हवालदार, शिपाई, हुजरे, वगैरे सर्व आले. पण रोज एकदोन आजारी पडून परत गांवांत जाऊन मरूं लागले. राऊ भालदार मेला, बाळा भाट मेला, दोन्ही शिंगाडे मेले. ब्राह्मण मेले, असा सारखा धडाका चालला होता ! ईश्वरी इच्छेस कोण आळ घालणार ?

पुढे बाबासाहेब (भवानरावांचा काका) प्लेगनें आजारी पडले. नंतर ते रहदारी बंगल्यांत रहावयास गेले. एक गणपतराव त्यांचे चिरंजीव शिवाय करून त्यांचे घरची सर्व मंडळी प्लेगने लागली. पण ईश्वरी कृपा. त्यांच्या घरचे प्लेगनें कोणीही दगावलें नाही.

--x--

सदर पुस्तक बोरीलिब (भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे ऑनलाईन ग्रंथालय) या वेबसाईटवर उपलब्ध आहे. (खंड १, खंड २) या आत्मचरित्रावर जयप्रकाश सावंत यांनी लिहिलेली लेखमाला ‘आपले वाङ्मय वृत्त’ या लोकवाङ्मय गृह प्रकाशनाच्या नियतकालिकात वाचली होती. ‘आपले वाङ्मय वृत्त’चे अंक पूर्वी ऑनलाईन उपलब्ध असत, पण सध्या दिसत नाहीत. (तात्पर्य : आंतरजालावर काही रोचक सापडल्यास त्वरित डाउनलोड करून ठेवावं. कल हो ना हो. असो.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

उत्तम.
आबासाहेब, उत्तम शोध

वरील उतारा फारच उदबोधक आहे. त्याशिवाय मूळ खंडांची लिंक दिल्याबद्दल शतश: आभार.
अजूनही, कोरोना काळांत गांवठी उपचारांवर विश्वास ठेवणारी मंडळी आहेत यांत नवल नाही.

गावठी उपचार म्हणून हासू नये. साध्या थाळी/टाळी वाजवण्यामागे खूप विचार असतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साध्या थाळी/टाळी वाजवण्यामागे खूप विचार असतो.

'विचार' नव्हे. 'शास्त्र'.

गावठी आणि शहरी उपचार असा काही प्रकार असतो का?
असेल तर फरक स्पष्ट करावा.

गावठी उपचार याचा विरुद्धार्थी शब्द शहरी उपचार नसतो एवढे बोलून मी खाली बसतो.

जसे हार्ड वर्क याचा विरुद्धार्थी शब्द सॉफ्ट वर्क नसून हार्वर्ड असतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मराठी माणसाने फसलो, चुकलो तरी ते व्यवस्थित लिहून ठेवावे. पुढच्याला उपयोग होतो.
--------------
उत्तम शोध हो।

भारी!! अतीरोचक!!
या पुस्तकावर विस्ताराने लिहिण्यासारखं खूप आहे, पण ते पुन्हा कधीतरी.
लिहाच!!

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भवानराव पंतप्रतिनिधींच्या आत्मचरित्रातील वरील उतारा सध्याच्या कोविडग्रस्त दिवसांमध्ये अतिशय समयोचित आहे. हे आत्मचरित्र फर्गसनच्या ग्रंथालयामधून आणून मी १९६४-६५ च्या सुमारास वाचल्याचे आठवते.

भवानरावांनी हे आत्मचरित्र अतिशय प्रामाणिकपणे लिहिले आहे आणि त्यात कसलाहि आडपडदा राखलेला नाही असे माझे मत तेव्हा झालेले होते. स्वत:च्या आयुष्यातील अनेक गोपनीय बाबी त्यांनी आत्मचरित्रात मोकळेपणे लिहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अश्लीलता कायद्याखाली कारवाई व्हावी असे काही जुन्या पटडीतील लोकांचे मत होते. राजघराण्यातील बऱ्याच मुलांना वाईट सवयी लागतात कारण त्यांच्या संगोपनाच्या काळात आईवडील त्यांच्यावर पुरेसे ध्यान देत नाहीत आणि मुले दासी-हुजरे ह्यांच्यावर सोडतात असे मत भवानरावांनी नोंदवले आहे असे आठवते.

भवानराव हे प्रागतिक विचाराचे संस्थानाधिपति होते. मोफत शिक्षण, संस्थानामध्ये लोकशाहीचे प्रयोग ह्यासाठी औंध प्रसिद्ध होते. किर्लोस्करांचे नांगराचे लोखंडी फाळ, ओगलेवाडीचा काचकारखाना असे प्रकल्प भवानरावांच्या उत्तेजनामधून उभे राहिले.

स्वातन्त्र्योत्तर काळातील एक वरिष्ठ राजनैतिक अधिकारी (Diplomat) अप्पा पन्त भवानरावांचे चिरंजीव. भवानराव सूर्यनमस्काराचे मोठे पुरस्कर्ते होते. माझी एक आत्या (वय ८८) अशी आठवण सांगते की त्यांच्या शाळेत मुलींचे सूर्यनमस्कार पाहण्यास भावानराव आलेले होते.. मला वाटते की व्यंकटेश माडगूळकरांच्या 'माणदेशी माणसे' मध्ये भवानरावांचे हृद्य वर्णन आहे.

पुण्यातील प्लेगच्या दिवसांचे वर्णन, उंदीर पडणे आणि त्यामुळे पळापळ, गावाबाहेरील माळावर झोपड्या बांधून राहणे हे आहिताग्नि राजवाडे ह्यांच्या आत्मचरित्रातहि आहे.

विनायक पांडुरंगशास्त्री खानापूरकर हे ज्योतिषी आणि भारतीय परंपरेतील ग्रहगणिताचे जाणकार अभ्यासक होते. 'भास्कराचार्यकृत बीजगणित' आणि 'गणिताध्यायाचे सोपपत्तिक भाषान्तर' अशी त्यांची दोन पुस्तके अलीकडच्या काळात वरदा प्रकाशनाकडून पुनर्मुद्रित झालेली आहेत.

रोचक (खरोखरच) धागा आणि प्रतिसाद.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

रोचक या श्रेणीचा कंसात खुलासा द्यावा लागू नये म्हणून अजून एक, पाचक अशी श्रेणी निर्माण करावी.

छान माहिती.

पुस्तकाविषयी लवकर लिहा.

छान आहेत आठवणी !

१८९७ मध्ये इनॉक्युलेशनचा उल्लेख आश्चर्यकारक वाटतो.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डॉ. हाफकीन (ज्याच्या सन्मानार्थ मुंबईतील इन्स्टिट्यूटला हाफकिन यांचे नाव दिले आहे) यांनी १० जानेवारी १८९७ रोजी प्लेगचे vaccine तयार केले(ग्रांट मेडिकल कॉलेजमधे) व लगोलग ह्युमन ट्रायल्स केल्या (मुंबईत, भायखळ्याच्या जेल मधील कैद्यांवर).
इ.स. १९०० पर्यंत भारतात सुमारे ४० लाख लोकांचे लसीकरण करण्यात आले होते. म्हणे.
पंत मंडळी राजे वर्गातील एलिट असल्याने कदाचित त्यांना याची माहिती असू शकेल.

प्लेग १८९७चा असला तरी आठवणी १९४६मध्ये लिहिलेल्या आहेत. तोपर्यंत शब्द रुळलेला असू शकतो.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लिहिल्या असल्या ४६ साली तरी १८९७ मध्ये इनॉक्युलेशन होत होतं हे मला आश्चर्यकारक वाटलं. (पण आता अबापट यांनी खुलासा केला आहे त्या अर्थी असेल त्याही वेळी)

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काही वाचकांनी पहिल्या परिच्छेदातला

कऱ्हाडाहून श्री देवी येणार..

हा संदर्भ समजला नाही असं कळवलं, त्यांच्यासाठी आणखी माहिती.

पूर्वापारपासून कऱ्हाड गाव पंतप्रतिनिधिंच्या जहागिरीतलं महत्त्वाचं गाव होतं. प्रतिनिधि घराण्याची देवीही कऱ्हाडला असे.

१८४७च्या आसपास तत्कालीन इंग्रज सरकारने कऱ्हाड गाव प्रतिनिधींकडून काढून घेतलं आणि त्याबदल्यात किन्हई आणि कुंडल ही गावं प्रतिनिधींना दिली. (हा उद्योग का केला याबद्दल मला माहिती नाही. भवानरावांच्या आत्मचरित्रातही त्याबद्दल काही खुलासा नाही. माझा अंदाज असा : १८३९ साली छत्रपती प्रतापसिंहराजे भोसलेंना पदच्युत करून सातार संस्थान खालसा केलं. पण कोल्हापूर संस्थान अजून चालूच होतं. तर छत्रपती घराण्याच्या या दोन गाद्यांमध्ये इंग्रजी मुलुखाचा काहीतरी बफर हवा, म्हणून हा उद्योग केला असावा.)

काय कारण असेल ते असो, पण प्रतिनिधींची सत्ता कऱ्हाडवरून गेली, पण देवी कऱ्हाडातच राहिली. इंग्रजी मुलुखात असलेल्या देवीचे उत्सवबित्सव म्यानेज करणं प्रतिनिधींना कटकटीचं ठरायला लागलं. पण मूळ ठिकाणाहून देवी हलवायला श्रीनिवासराव प्रतिनिधींचा विरोध होता. शेवटी मुलं कर्ती सवरती झाल्यावर त्यांच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी देवी औंधाला आणली. पहिल्या दोन परिच्छेदांतलं वर्णन या देवीच्या नवरात्राच्या उत्सवाचं आहे. हा उत्सव 'सुपरस्प्रेडर इव्हेंट' ठरला असावा, कारण यादरम्यानच प्लेगचं थैमान औंधात सुरू झालं.

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.