करोना: काही नोंदी आणि निरीक्षणे (भाग 5)

जवळपास साडेसहा महिने झालेत आपलं आयुष्य बदलून गेल्याला. सगळ्यात मोठा फटका आर्थिक बसलेला आहे अनेकांना.
मागे एका मैत्रिणीचा उल्लेख केला होता, पर्यटन व्यवसायात असलेल्या तिच्या नवऱ्याला मेपासून पगार मिळालेला नाही. कधी मिळेल माहीत नाही, अजून काम नीट सुरू झालेलं नाही.
आमच्या घरी जवळपास ४० वर्षांपासून एक मदतनीस दिवसभर येत होती, अर्थात गेले ६ महिने ती येऊ शकलेली नाही कारण ती घाटकोपरला राहते, आम्ही पूर्वी तिथे राहत होतो, १५-१६ वर्षांपूर्वी मुलुंडला आलो. तिला तोवर अजिबात प्रवासाची सवय नव्हती, ती आमच्या घराजवळ राहायची. मुलुंडला आल्यानंतर तिने ट्रेनचा प्रवास सुरू केला आणि इतकी वर्षं येत राहिली. ती अर्थात आमच्या घरची एक सदस्य आहे. माझ्या लेकीचा तिने उत्तम सांभाळ केला आहे, घरही ती सांभाळत आली आहे. २० मार्चपासून मी तिला येऊ नको म्हटलं कारण ट्रेनचा प्रवास जरा धोकादायक वाटू लागला होता. पगार मी तिला पूर्ण देणार होते अर्थातच परंतु ती खात्यात ट्रान्सफर करायला नको म्हणाली. दीडेक महिन्यापूर्वी एकदा येऊन १०,००० रु घेऊन गेली. काळ तिचा फोन आला होता. २०००० रु हवेत म्हणाली. वडील अंथरुणाला खिळले आहेत. त्यांना नक्की काय झालंय ते तपासायची सोया उरलेली नाही, कोणीही डॉक्टर घरी यायला तयार नाही. जवळ पालिकेच रुग्णालय आहे राजावाडी, आणि मुक्ताबाई दवाखाना. पण तिथेही कोविड बंगालात कोणता घेत नाहीयेत म्हणाली. काहीतरी गावठी उपचार सुरू आहेत. त्यांना डायपर लावावा लागतो कायम. भाऊ एका जिममध्ये काम करत होता ते अजून सुरू झालेलं नाही, दुसरी नोकरी मिळाली आहे साकी नाक्याला, तिथे तो रोज चालत ये जा करतो, बससुद्धा परवडत नाही. टीव्ही बंद केलाय कारण केबलचे पैसे परवडत नाहीत. भाचा मोठ्या चांगल्या शाळेत आहे, त्याची फीही बरीच असेल, ती कशी भरली ते विचारेन आता रविवार आली की. बाकी जेवणखाण काय करतात २ वेळा माहीत नाही. मी तिला अधूनमधून विचारात होते पैसे हवेत का, पण ती एकदाच हवेत म्हणाली आणि घेऊन गेली. आता कदाचित पाणी डोक्यावरून गेलं असेल.
आज एका मैत्रिणीशी बोलत होते, ती सांगत होती. तिची बाई हल्ली आठवड्यातून दोनदा येते, तीही अशीच ३-४ किमी चालत. आज तिने बेसनाच्या वड्या केल्या होत्या त्यातल्या काही तिच्या मुलींसाठी दिल्यान. तर तिची बाई म्हणाली, ६ महिन्यात पहिल्यांदा काहीतरी गोड खाणार आहे मुलगी.
भांडी आणि केरलादी करणारी बाई आता २ महिने येते आहे कारण माझं काम जोरदार सुरू झाल्याने सगळं झेपेना मला. ही तामिळ आहे. मोठ्या मुलाला १० वगैरे वर्षांचा होता तेव्हाच तिने भावाकडे गावाला पाठवलं. तो यंदा बारावी झालाय. तिचा धाकटा मुलगा मूकबधीर आहे, नशिबाने मुलुंड पश्चिमेला पालिकेची या मुलांसाठीची शाळा आहे. ती त्याच्यासाठी खूप कष्ट करते. आताही त्याचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत, परीक्षाही झाली नुकतीच. माझा जुना फोन तिला दिला २००० रुपयात, त्याला अभ्यासाला लागतो म्हणून. पगार सगळ्या महिन्यांचा दिला होताच. नवरा रिक्षा चालवतो, पण धंदा अजून निम्माही होत नाहीये. तिची बहुतेक कामं सुरू झाली आहेत, त्यामुळे ती जरा बऱ्या परिस्थितीत आहे. अर्थात उसने घेतलेले पैसे बरेच डोक्यावर आहेतच.
गावी गेलेला इस्त्रिवाला परतला आहे, गेल्या आठवड्यात आला. आता खरं तर इस्त्रीचे कपडे वापरायची वेळ येत नाही पण २-३ कपडे तरी देते कधी कधी.एका वकील मित्राने काम नाही म्हणून भाड्याने घेतलेलं ऑफिस सोडून दिलं आणि लोकांना काढून टाकलं आहे.
एक डेंटिस्ट मैत्रीण आहे, तिला सरकारी नियमांनुसार क्लिनिक सुरू करायचं तर तीनेक लाख खर्च करावा लागणार आहे. तो सध्या शक्य नाही. त्यामुळे ६ महिने ते बंदच आहे. मुलगा कला क्षेत्रात आहे, फार काम नाहीच त्यालाही अर्थात. सुनेला लहानशी नोकरी आहे इतकंच. घरात दोन ८०+ व्यक्ती असल्याने ती काळजी वेगळीच. 
ही परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतात का तुम्हाला? मुंबईकरांना ट्रेन सुरू व्हायचे वेध लागले आहेत पण पुन्हा आजार जोरदार पसरेल अशी भीती वाटते आहे बरोबरीने. आणि ट्रेन सुरू झाल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ.  
ता.क. काल NKGSB बँकेत गेले तिथे दारातच temperature गन ने तापमान तपासलं, sanitiser लावून मगच आत जाऊ दिलं . महाराष्ट्र बँकेत यातलं काहीही नाही दिसलं आज. 

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet