कोविड डायरी (दुसरा सप्ताह) : डॉ . तुषार पंचनदीकर

कोविड डायरी : भाग ३
कोविड डायरी : दुसरा सप्ताह
संवादी आठवडा
Sweeping corona

दिनक्रम म्हणजे दिनचर्या आणि मग उरलेल्या वेळात येणारे अनुभव यांचं मिश्रण. आन्हिके वेळेवर उरकली की पुढ्यात येणाऱ्या घटनांना विचारपूर्वक वेळ देता येतो आणि त्या घटनांना सामोरे जाता येते. याचा प्रत्यय मला प्रकर्षाने दुसऱ्या सप्ताहात आला आणि म्हणूनच आठवडा करोनाशी संवादी झाला.

पेशंटशी, पेशंटच्या नातेवाईकांशी बोलणे (ॲडमिशन झाल्यापासून ते डिस्चार्ज देईपर्यंत), विविध तपासण्या करणे आणि त्यापरत्वे उपचार करणे, रेसिडेंट डॉक्टरांशी नवनवीन मार्गदर्शक तत्त्वे कशी अवलंबता येतील याबाबत चर्चा करणे ही दिनचर्या होती आणि उरलेल्या वेळात कोविड संवाद करता येत होता.

महाभारतात यक्षाने धर्मराजाला शंभरएक प्रश्न विचारले होते आणि धर्मराजाने समर्पक उत्तरे देत आपल्या भावंडांना बेशुद्धावस्थेतून बाहेर काढले होते.

माझ्यापुढे करोना नावाचा बाधित यक्ष प्रश्न विचारत होता आणि धर्मराज नसल्याने मी माझ्यापरीने उत्तरे देत होतो आणि मग वारंवार मूर्च्छितावस्थेत पण जात होतो.

ही प्रश्नोत्तरे माझी वैयक्तिक होती आणि अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.

१. करोना – कोविड १९ विषाणूची जन्म कहाणी काय असावी?
दर दहा वर्षांनी येणाऱ्या फ्लू सदृश विषाणू साथीशी निगडित. डिसेंबर २०१९च्या आसपास जन्म.

२. साथ नैसर्गिक का मानवनिर्मित?
काळच ठरवेल. (मूर्च्छितावस्था)

३. करोनाचा प्रसार कशामुळे?
प्रामुख्याने घशातील आणि नाकातील विषाणूमिश्रित फवाऱ्यामुळे (शिंक, सर्दी, खोकला, थुंकणे, पिचकारी) आणि नंतर पृष्ठभागावरील वास्तव्याशी निगडित. (Droplets & Fomites)

४. करोनाचा जगभर फैलाव कशामुळे?
प्रवास : हवाई प्रवासामुळे छोटे झालेले जग, तीव्रता : सुरुवातीला असलेली अनभिज्ञता, दृष्टिकोन : निष्काळजीपणाचा आणि आततायी

५. काही ठराविक देशांत किंवा शहरांत तीव्रता जास्त का?
सामाजिक राहणीमान, लोकसंख्येची घनता

६. तर मग भारतासारख्या महाप्रचंड लोकसंख्या असणाऱ्या महाकाय देशात उद्रेक वा विस्फोट का नाही?
प्रसार खूप आहे पण मृत्यूप्रमाण लक्षात घेता उद्रेक नाही कारण (मूर्च्छितावस्था) .... कदाचित नैसर्गिक प्रतिकारशक्ती

७. करोनाची भयानकता किती खरी धरावी?
पहिला टप्पा – सौम्य ... दुसरा टप्पा – फसवा … तिसरा टप्पा - तीव्र

त्यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कमी कालावधीत गुंतागुंत वाढून मृत्यूकडे झेप; म्हणून भयावह

पण त्याचबरोबर वेळेवर उपचार घेण्याने रोगमुक्तता.

म्हणून खबरदारी घ्यायची आणि भीती बाळगायची नाही.

८. प्रतिबंधात्मक उपायांची उपयुक्तता किती?
हँड वॉश, मास्क, वैयक्तिक स्वच्छता, सामाजिक अंतर व भान आणि करोनाग्रस्त झाल्यास विलगीकरण (हॉस्पिटल किंवा घरामध्ये) ही पंचसूत्री अवलंबल्यास करोनामुक्ती मिळू शकते.

९. Lockdownची गरज होती का?
नक्की. करोनाचा प्रसार थांबण्यास उपयोग झाला नाही तरी वैद्यकीय मदत आणि संसाधनांची परिपूर्ती करण्यासाठी त्याची गरज होती असे पूर्वगामी प्रमाणाने वाटते.

१०. वैद्यकीय क्षेत्रात संशोधन कमी पडले का?
नाही. करोना विषाणूंच्या जनुकांमध्ये वारंवार होणारे बदल, विषाणूंचा फुफ्फुसे, रक्तगोठणशक्तीवरील अनपेक्षित परिणाम, रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणाऱ्या घटकांवर होणारा घातक हल्ला यामुळे रोगविशिष्ठ औषध निर्मिती होऊ शकली नाही. परंतु कोविड टेस्टिंगमुळे करोनाची व्याप्ती नक्कीच कळली.

११. मग करोनावरील लशीचे काय?
(मूर्च्छितावस्था)... सुरक्षित आणि बऱ्याच कालावधीसाठी परिणामकारक या दोन निकषांवर ही लस किती उतरेल ते सांगता येणार नाही. तरीसुद्धा फक्त सामाजिक प्रतिकारशक्ती (Herd Immunity) येईलच येईल असे म्हणून हातावर हात ठेऊन बसणे हा एक मोठा जुगार ठरेल. म्हणून लशीबाबत सकारात्मक दृष्टी हवी.

१२. ’आयुष’ उपचारावरील मत?
(मूर्च्छितावस्था)...ज्याचं जळतं त्याला कळतं आणि जेव्हा जळतं तेव्हा कळतं अशी स्थिती आली की सर्व उपचारपद्धतींचा व्यक्तिगत ऊहापोह होतो. कुठल्याही pathyचे tall claims घातकच. करोनाच्या तिसऱ्या टप्प्याला Allopathyशिवाय पर्याय नाही. ‘आयुष’ला आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या सहाणेवर घासून संशोधन निबंध सादर करून जगन्मान्यता मिळवावी लागेल.

१३. करोनाचे योद्धे कोण?
वैद्यकीय क्षेत्र : डॉक्टर्स (विशेषतः ज्युनियर डॉक्टर्स ), संशोधक , नर्सेस , वॉर्डबॉइज , स्वच्छता कर्मचारी , ॲम्ब्युलन्स ड्रायवर्स
सामाजिक क्षेत्र : पोलीस, स्वच्छता कर्मचारी, आरोग्यसेवक, जीवनावश्यक गोष्टी करोनाबाधितांना पोहोचवणारे असंख्य अनामिक स्वयंसेवक आणि सजग नागरिकसुद्धा

१४. आणि घरभेदे?
सामाजिक भान न ठेवणारे नेते, लुटारू व्यावसायिक आणि नैतिकता विसरलेली प्रसारमाध्यमे

१५. करोनाशी लढाई किती काळ चालू राहणार आणि अंत कधी?
आशावादाने अदमासे ४ ते ६ महिने परंतु नंतर लुटूपुटी व झक्काझक्की चालूच राहील २ ते अडीच वर्षे. विषाणूंना अंत कधीच नसतो. पण ते जराजर्जर होऊन निपचित होतात.

१६. मग या काळाला सामोरं कसं जायचं?
“काही नाही ..करोना म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा केलाय सर्वांनी” असं म्हणत?
की
“जगणं मुश्किल होणार आहे. दुसरी काय तिसरीसुद्धा लाट येणार आहे…”
या भीतीच्या सावटाखाली?

या यक्षप्रश्नाला माझं उत्तर होतं -

“ परिस्थितीजन्य व सकारात्मक उर्जेने ”

डायरीची कहाणी सफळ संपूर्ण

॥ शुभं भवतु ॥
© डॉ. तुषार पंचनदीकर

मागील भाग

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet