माझे गुरू : शेजारचे अण्णा
कालच अण्णांचा वाढदिवस झाला, अठ्ठयांशीवं संपून त्यांना आता एकोणनव्वदावं लागलं म्हणून त्यांना भेटायला गेले होते आणि मनापासून ''शतायुषी भव '' असं म्हणाले. आता आम्ही अण्णांच्या शेजारी रहात नाही. पण अण्णांचा शेजार मला खूप काही देऊन गेला. अण्णा म्हणजे कुणी साऊथ इंडियन व्यक्ति नाही, अण्णा म्हणजे श्री. दत्तात्रय गणेश कोल्हटकर, आमचे एकेकाळचे शेजारी ! ही गोष्ट आहे २०००-२००१ सालची. अण्णांचं वय असेल तेंव्हा ६७ - ६८.
अण्णा माझे इंग्लिशचे गुरू कसे झाले हे सांगण्यापूर्वी , अण्णांबद्दल थोडंसं . पहाटे साडेपाचला त्यांचा दिवस चालू व्हायचा , सकाळची आन्हिकं , योगासनं, टाइम्स ऑफ इंडियाचं न चुकता वाचन वगैरे वगैरे ... तेंव्हा ते एकटेच होते , पासष्ठाव्या वर्षी त्यांच्या पत्नी निवर्तल्या. विशेष म्हणजे त्यानंतर त्यांनी सिम्बिओसिस लाँ स्कूलमध्ये रोज जाऊन L.L.M केलं, आणि वकिली व सायबर लाँ /फॉरिन एक्सचेंज ऍक्टमधे प्रोफेसरशिप चालू केली.
माझे आई-बाबा दोघही नोकरी करणारे, त्यामुळे अण्णांशी फक्त हाय - हॅलो एवढाच त्यांचा संबंध. मी तेंव्हा नुकतीच चौथीतून पाचवीत कर्नाटक शाळेत गेले होते. मराठी मिडियम मधून एकदम इंग्लिश मिडियममध्ये गेल्यामुळे , मला काही ते झेपत नव्हते.
एके दिवशी दुपारी मी शाळेतून घरी आले ते रडत - रडतच, माझ्या इंग्लिशच्या टिचरनी मला अजिबात काही इंग्लिश येत नाही म्हणून खूप झापले होते आणि पेरेंट्सना बोलवून घेते म्हणाल्या होत्या. घरी कुणी नव्हते ,त्यामुळे घराच्या गेटपाशीच दप्तर टाकून, मी हमसून - हमसून रडत बसले होते, दोन्ही गुडघ्यांत डोकं खुपसून.
पण मला कुणीतरी दोन्ही हातांना धरून उठवलं . बघतेय तर शेजारचे अण्णा ! ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले , प्यायला पाणी दिलं आणि मोठया सहानुभूतीनं विचारलं ''काय झालं ?''. मी भडाभडा सर्व काही मनातलं बोलून टाकलं, तर त्यावर ते जोरजोरात हसायला लागले आणि म्हणाले ,'' हात्तिच्या , एवढंच ना ! अगं इंग्लिशचा एवढा बाऊ करायचं काही कारण नाही, मी शिकवीन तुला इंग्रजी ! पण एक लक्षात ठेव, चांगलं इंग्लिश येणं हेच काही आयुष्याचं सर्वस्व/ ध्येय नाही. आपल्याकडे हुशारी, श्रीमंती, सुशिक्षीतपणाचे, उच्चभ्रूपणाचे मानक म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते , आपली मुलं इंग्रजी शाळेत जातात म्हणूनच त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल असा विश्वास बाळगणारे पालक आहेत, त्याला शिक्षकांचंही खतपाणी असतं. आज जपान, चायना, जर्मनी, फ्रांस, इस्रायेल अशा आपल्या भाषेवर प्रेम असणाऱ्या देशांमधल्या लोकांची इंग्लिश खूप काही चांगली नाही, पण त्याचा ते बाऊ करत नाहीत, पण आज त्यांची सर्वांगीण प्रगती केवढी कौतुकास्पद आहे !‘’ अण्णा बरंच काही पोटतिडीकेनं बोलत होते. माझ्यासारख्या पाचवीतल्या मुलीला त्यातलं थोडंसंच समजलं पण त्यांचं बोलणं खूप छान वाटत होतं. मला ह्याचच खूप हायसं वाटलं कि ते मला शिकवणार म्हणून!
मग बहुधा माझा मूड थोडा हलका व्हावा म्हणून त्यांनी त्यांचे दोन अनुभवाचे किस्से मला सांगितले ते त्यांच्याच भाषेत असे होते : ---
‘’ सुमारे 3० वर्षांपूर्वीचा तो काळ होता. इंग्लंडच्या हिथ्रो एयरपोर्टवर मी उतरलो. मला माझ्या कामासाठी लंडनला जायचे होते. गोऱ्या साहेबांच्या जन्मभूमीत जायची माझी पहिलीच वेळ. दबकत दबकत चालू लागलो. ज्यांनी आमच्यावर दीडशे वर्षं सत्ता गाजवली - त्या गोऱ्या लोकांच्या देशाला भेट.
तेथे समोरच मोठठे टॉयलेट कम वॉशरूम बघितले आणि हायसे वाटले. त्वरित आत शिरलो. बघतो तर काय ! तेथे एक मध्यवयीन पंजाबी स्त्री साफसफाई करीत होती. मला मोठा अचंबा वाटला. माझा जन्म जरी पुण्याचा,जरी मी अस्सल पुणेकर होतो तरी दिल्लीत नोकरीनिमित्त वीस वर्षे वास्तव्यास होतो. त्यामुळे पंजाबी लोकांचा सहवास मला लाभला होता. मी त्वरित त्या महिलेला अदबीनं म्हणालो '' बहेनजी, आप यहाँपर ये क्या कर रही हो ? ''
त्यावर चमकून तिने मजकडे बघितले. मी भारतीय असल्याची खात्री वाटून ,ती आत्मविश्वासाने मला अस्खलित इंग्लिशमध्ये म्हणाली " काय करू ? पोटा -पाण्यासाठी करावं लागतं. १९४७ च्या फाळणी नंतर माझे आजी-आजोबा पंजाबातली आमची छोटीशी शेती-वाडी विकून इकडे ह्या परक्या देशात आले. त्यावेळी मी अवघी ६ - ७ वर्षाची होते. अगदी बालपणापासून ते थेट आजतागायत, मी येथेच काम करत आले आहे ,जगण्यासाठी दोन घास मिळावेत ; मला आणि आई - वडिलांना म्हणून .’’
तिचं इंग्रजी बोलणं ऐकून मी थक्क झालो होतो, तरीपण काहीतरी विचारायचे म्हणून विचारलं '' पण मग शिक्षणाचं काय ? '' तिचं आता थेट पंजाबीतून उत्तर '' पोट आधी का शिक्षण आधी, भाईसाब ? शिक्षणाकडे लहानपणापासूनच पाठ फिरवून बसल्ये, मला अजिबात लिहिता - वाचता येत नाही ! "
फाड-फाड , अस्खलित, शुध्द इंग्रजी बोलणारी अशिक्षित / निरक्षर महिला मी आयुष्यात प्रथमच बघितली आणि अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहिले .
दुसरा किस्सा असा आहे, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ,पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सरदार स्वर्णसिंग यांची संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक केली आणि त्यांना इंग्लंडमधील डिफेन्स सेट-अपचा अभ्यास करून या, असे सुचवले. त्याबरहुकूम सरदार स्वर्णसिंग इंग्लंडला रवाना झाले. परत फिरून भारतात आल्यावर पंडितजींना भेटले आणि इंग्लंडच्या डिफेन्स सेट-अपबद्दल सर्व काही सांगितले व त्या अनुषंगाने आपला सेट-अप कसा आखायचा याबद्दल विवेचनही केले.
स्वर्णसिंग हे पंडितजींचे खूप जवळचे विश्वासू सहकारी होते, त्यामुळे त्यांनी दिलखुलासपणे हसत सरदार स्वर्णसिंगना विचारलं '' चलो, ये तो सब ठीक है, -- लेकिन मुझे ये बताओ की इंग्लंडमें होते हुए आपको ऐसी कौनसी बात बडी अचरज की लगी, जो हमने इस देशमे लानी चाहिये ?'' त्यावर सरदार स्वर्णसिंग पंडितजींना म्हणाले '' पंडितजीं , क्या कहूँ ! मुझे वहां होते हुए, ये देखके इतना बडा अचरज हुआ कि, पंडितजीं , केवल पांच - छे उम्र के बच्चे लोग वहां पर फ्लुएंट इंग्लिश बोल पाते हैं ! ''
अण्णांचे हे दोन अनुभव/ किस्से मला बरंच काही शिकवून गेले, इंग्लिशची माझी भीती कुठल्याकुठं पळून गेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ रोज वाचत जा, अवांतर वाचन कर, जे के रोलींगचे हॅरी पॉटरचे सगळे भाग, डिकन्सचं ग्रेट एक्सपेक्टेशन, ऑलिव्हर ट्विस्ट वाच, सुरवातीला शेजारी डिक्शनरी घेऊन बसलीस तरी चालेल. अडलेले शब्द वहीत लिहून ठेव ,वाक्यरचना कशा लिहिल्यात हयाकडे लक्ष दे , असं बरंच काही मार्गदर्शन वेळोवेळी अण्णा मला करत होते.
मी बदलत गेले,घडत गेले, इंग्लिश बोलण्यात, लिहिण्यात प्रभुत्व येऊ लागले. ह्याचा परिणाम माझ्या इतर विषयांच्या अभ्यासावरपण झाला. शाळेत असताना दहावीपर्यंत मी पहिला क्रमांक कधी सोडला नाही. आंतरशालेय आयत्या वेळच्या इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसं मिळवली.
आज हे सगळं आठवलं की डोळे आनंदाने पाणावतात, फक्त माझे नाही , माझ्या गुरूंचे पण ! पुन्हा एकदा देवापाशी प्रार्थना करते, ''माझ्या गुरूंना ,अण्णांना शंभर वर्षे आयुष्य दे ! ''
प्रतिक्रिया
.
हे नक्की कोणी लिहिले आहे? लेखातील बहुतेक धातुरूपे ही प्रथमपुरुषी स्त्रीलिंगी आहेत. लेखक पुल्लिंगी आहे, अशी आजवर समजूत होती, म्हणून विचारले...
आणि, अण्णा म्हटल्यावर ती व्यक्ती आपोआप, बाय डीफॉल्ट, साउथ इंडियन होते, हे येथे बहुधा कोणाचेही मत नसावे. (चूभूद्याघ्या.) अण्णासाहेब किर्लोस्करांपासून ते पार आमच्या पुण्याच्या भाजपच्या माजी खासदार अण्णा जोश्यांपर्यंत (व्हाया शाहीर अण्णाभाऊ साठे, एसेम अण्णा, नि आमच्या (भूतपूर्व) नारायण पेठेतले मिसळवाले अण्णा बेडेकर) असे अनेक अस्सल मराठमोळे अण्णा महाराष्ट्राने पाहिलेले नि पचविलेले आहेत. (फार कशाला, आमच्या अस्सल मराठमोळ्या, बॉर्न-अँड-ब्रॉट-अप-इन-कोल्हापूर तीर्थरूपांनासुद्धा (ईमृशांदे) त्यांच्या मित्रमंडळीत अण्णा या संबोधनाने पुकारले जात असे.)
त्यामुळे, 'अण्णा म्हणजे कुणी साऊथ इंडियन व्यक्ति नाही' हे स्पष्टीकरण या लेखात अस्थानी तथा अनावश्यक वाटते. (झापडबंद मुंबईकर वगळल्यास) उभ्या महाराष्ट्रात कोणाचा असा गैरसमज होईल (की जेणेकरून असे स्पष्टीकरण द्यावे लागावे), याबद्दल निदान मी तरी साशंक आहे. उगाच शब्दसंख्या वाढविणारा अनावश्यक शब्दभरणा याहून अधिक महत्त्व त्यास निदान मी तरी देऊ इच्छीत नाही.
असो, चालू द्या.
कोडं
धातुरूपे ही प्रथमपुरुषी स्त्रीलिंगी आहेत. लेखक पुल्लिंगी आहे,
हा प्रश्न मलाही पडलाच. कारण प्रस्तुत लेखकाचे आधीचे लेखन पुल्लिंगी क्रियापदे वापरुन आहेत. पण आपण खोल चिकित्सा करु नये. लेखकाने ही एक कथा म्हणून लिहिली असेल तर त्याला कोणतेही रुप घेण्याचे स्वातंत्र्य आहे.
(झापडबंद मुंबईकर वगळल्यास) हा सरसकट आरोप आपण कोणत्या आधारावर केलात ? आम्हीही मूळचे मुंबईचे आहोत आणि कुणी अन्ना म्हटलं तरच आम्हाला ती व्यक्ति सौदिंडियन असेल असे वाटेल. पण तेही ती व्यक्ति बोलायला लागेपर्यंतच. त्याक्षणी तो अन्ना आहे की अण्णा हे समजेल. म्हणजेच आम्ही मुंबैकर झापडबंद नाही हे सिद्ध होते.
माणसाला अनेक बाजू असतात. पण अगणित असतात, हे माहीत नव्हतं.
आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.
आपला मुद्दा रास्त आहे.
'झापडबंद मुंबईकर' हे वर्णन सरसकट आहे, हे मान्य. चूक माझी.
'काही झापडबंद मुंबईकर' म्हटल्यास फरक पडेल काय?
(यावरून एक विनोद आठवला.
एकदा एक इंजिनियर, एक भौतिकशास्त्रज्ञ, आणि एक गणिती, असे तिघेजण इंगलंडातून झुकझुकगाडीने उत्तरेच्या दिशेने चाललेले असतात. गाडी इंग्लंडची हद्द ओलांडून स्कॉटलंडमध्ये प्रवेश करते.
इंजिनियर खिडकीबाहेर बघतो. त्याला एक मेंढी कुरणात चरताना दिसते. "स्कॉटलंडमधल्या मेंढ्या काळ्या असतात", तो लगेच उद्गारतो.
भौतिकशास्त्रज्ञ खिडकीबाहेर बघतो, नि म्हणतो, "चूक. स्कॉटलंडमधल्या काही मेंढ्या काळ्या असतात, असे म्हणता येईल."
आता गणिती खिडकीबाहेर बघतो आणि काहीश्या त्रासिकपणे म्हणतो, "स्कॉटलंडमध्ये किमान एक कुरण आहे, ज्याच्यात किमान एक मेंढी आहे, जिची किमान एक बाजू काळी आहे, इतकेच म्हणता येईल फार तर.")
----------
तसा तांत्रिकदृष्ट्या (बोले तो, डाउनटाउन गिरगांवातील जन्माच्या अपघाताने) मीही मूळचा मुंबईकर आहे, असा दावा करता येईल. मात्र, संस्काराने, दीर्घकालीन प्राथमिक रहिवासाने तथा कर्माने मी स्वतःस पुणेरी अमेरिकन मानतो. असो.
गणिती विधान
ज्याच्यात किमान एक मेंढी आहे, जिची किमान एक बाजू आत्ता इथून काळी दिसत आहे, इतकेच म्हणता येईल फार तर
...
बरोबर. ध्येय नाही. सर्वस्व तर नाहीच नाही. केवळ, मार्ग आहे.
ध्येय म्हटले, तर एकदा ते गाठले, की जो थांबला, तो संपला. आणि, सर्वस्व म्हटले, की एकदा ते गाठल्यावर काही करायलाच नको. मग उरलेले आयुष्यभर हॅरी हॅरी करत निवांत बसावे!
अर्थात, ध्येय हे याच्या बरेच पुढचे, याच्याहून खूपच उच्च असले पाहिजे, हे पटण्यासारखेच आहे.
पण मार्गावरून गेल्याशिवाय तर ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही ना, गुरू!
हा एक अत्यंत बोगस मुद्दा आहे, असे माझे प्राथमिक मत आहे. याबद्दल सविस्तर नि विचारपूर्वक असे जमल्यास मागेपुढे कधीतरी सवडीने लिहीन.
नाही, प्राथमिक-माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून घेऊ नये, असे माझे मुळीच म्हणणे नाही. (माझे स्वत:चे शालेय शिक्षण, काहीश्या अनिच्छेने का होईना, परंतु, मिक्स्ड-बॅग पद्धतीने झालेले आहे. बोले तो, चौथीपर्यंतचे शिक्षण (सदाशिव पेठेत, परंतु) इंग्रजी माध्यमातून. त्यानंतर, पाचवीपासून आमची उचलबांगडी काहीही कारण नसताना (सदाशिव पेठेतल्याच) मराठी माध्यमाच्या शाळेत झाली. (तीर्थरूपांची लहर, दुसरे काय!) मात्र, आता मागे वळून पाहिले असता, दोन्हींमुळे माझा काही विशेष फायदा अथवा तोटा झाल्याचे लक्षात येत नाही. माझे मराठी आणि इंग्रजी दोन्ही तसे चांगले आहे. (म्हणजे, असे निदान मी तरी समजतो.) मात्र, यापैकी कशाचेही श्रेय मी माझ्या मराठी किंवा इंग्रजी, कोठल्याच माध्यमाच्या शाळेला देऊ इच्छीत नाही. त्याकरिता इतरच - आणि बहुतांशी कौटुंबिक - घटक कारणीभूत आहेत. त्यामुळे, शालेय शिक्षण कोठल्याही माध्यमातून घेतले, तरी त्याचा पुढील आयुष्यावर मूलगामी परिणाम होण्याचे काही कारण नसते - आणि, मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना शालोत्तर जीवनात निदान सुरुवातीच्या काळात तरी जो एका प्रकारचा न्यूनगंड असलेला अनेकदा दिसून येतो, तो बहुतांशी विनाकारण असतो; तो फार काळ सहसा टिकत नाही, हे सुदैव! - इथवर मान्य करायला मी तयार आहे.)
मात्र, स्वभाषेवरील प्रेम म्हणजे इतर भाषांप्रति अनास्था नव्हे. किंबहुना, इंग्रजीच नव्हे, तर स्वत:च्या फायद्याकरिता (किंवा हौशीखातरसुद्धा) मनुष्याने जमतील तेवढ्या भाषा शिकाव्यात, असे माझे मत आहे. अगदी प्रावीण्य मिळवता नाही आले, जुजबीच राहिले, तरी चालेल, परंतु प्रयत्न जरूर करावा. अन्यथा, एकाच भाषेवर - टू द एक्स्क्लूजन ऑफ ऑल अदर्स - 'प्रेम' केले, इतर भाषांना दारीसुद्धा उभे करायचे नाही म्हटले, की मनुष्य आम्हां (सामान्य) अमेरिकनांसारखा झापडबंद होतो; नि मग त्याची प्रगती खुंटते. (माझी स्वत:ची प्रगती या बाबतीत अगदीच नगण्य आहे - केवळ आरंभशौर्य दाखवून सोडून दिलेले अनेक प्रयत्न तेवढे जमेस आहेत, हे येथे नमूद करणे दुर्दैवाने भाग आहे. अर्थात, यात अभिमानाने सांगण्यासारखे काहीही नाही, याचीसुद्धा नम्र जाणीव आहे, ही बाब अलाहिदा. परंतु ते असो.)
इंग्रजी जमत नसलेल्या मुलीला धीर देणे ही एक गोष्ट. ते योग्यच आहे. परंतु, 'येत नाही ना? त्यात काय मोठे? त्या अमक्यातमक्यालासुद्धा येत नाही, परंतु आज पहा ते कुठच्या कुठे आहेत!' यासारखे disingenuous (मराठी? अप्रामाणिक??), फसवे, तथा घातकी, स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेणारे लॉजिक दुसरे नसेल. त्याने फक्त प्रयत्न न करण्याची - प्रयत्न नाही केला, तरी चालेल, अशी - वृत्ती बळावते. दुर्दैवाने, हिंदुस्थानातल्या एका विशिष्ट पिढीत 'राष्ट्राभिमाना'च्या नावाखाली ही वृत्ती सर्रास आढळत असे. इंग्रजी न येण्याच्या न्यूनगंडाने नव्हे, तर या वृत्तीने हिंदूंच्या पुढच्या पिढ्यांचे नुकसान केले. पण लक्षात कोण घेतो?
('त्या अमक्यातमक्याला येत नाही, परंतु तरी त्याचे काही अडले नाही; आज पाहा, तो कोठल्याकोठे आहे!', ही एक शुद्ध पळवाट आहे. अरे, आधी त्या अमक्यातमक्यासारखे कोठल्याकोठे जाऊन दाखवा, नि मग बाता करा, की इंग्रजी न आल्याने आमचे काही अडले नाही, म्हणून! स्वत: राहायचे इथल्याइथेच ('ठेविले अनंते, तैसेचि'), नि दाखले द्यायचे ते कोठल्याकोठे गेलेल्या अमक्यातमक्याचे, याला काय अर्थ आहे? आणि त्यापेक्षासुद्धा, ज्याला एखादी गोष्ट जमत नाही, त्याला ती जमविण्याकरिता उत्तेजन द्यायचे, की 'त्यावाचून तुझे काही अडले नाही' म्हणून 'अमक्यातमक्या'चे दाखले द्यायचे? अरे, मग, तुम्हाला जमले आहे का कोठल्याकोठे जायला, त्या 'अमक्यातमक्या'सारखे? नि (इंग्रजी न येतासुद्धा) त्या 'अमक्यातमक्या'सारखे कोठल्याकोठे कसे जायचे, हे शिकविणार आहात काय? पोकळ बाता नुसत्या! आणि, तो अमकातमका कोठल्याकोठे जो गेला, तो इंग्रजी न आल्यामुळे, की इंग्रजी न आल्याच्या बावजूद? ('In spite of'करिता मराठी प्रतिशब्द काय? की, हे भाषेच्या दौर्बल्याखाती मांडायचे?))
फाडफाड इंग्रजी बोलणारी अशिक्षित, निरक्षर व्यक्ती आणि फाडफाड अस्खलित मराठी/हिंदी/उर्दू/तमिळ/कोठलीही भाषा बोलणारी निरक्षर व्यक्ती यांच्यात क्वालिटेटिव फरक नक्की काय? आणि, यात आश्चर्य वाटण्यासारखे नक्की काय आहे?
भाषेवरचे प्रभुत्व हे प्राथमिकत: श्राव्य-एक्स्पोझरचे फलित आहे. (शिक्षणाशी त्याचा काहीही संबंध नाही. मातृभाषा/प्रथम भाषा 'फाडफाड' बोलणारे तीनचार वर्षांचे मूल हे 'शिक्षित' नसते; 'सुशिक्षित' तर, निदान त्या वेळेस तरी, नसतेच नसते; 'साक्षर'ही बहुधा नसते.) तर, उलटपक्षी, साक्षरता हे प्रामुख्याने दृक्-एक्स्पोझरचे (आणि कदाचित अल्प अंशी शिक्षणाचे) फलित आहे. दोन पूर्णपणे स्वतंत्र गोष्टी आहेत त्या!
इंग्रजी माहौलात भाग्यवशात् फेकले गेल्यावर, निव्वळ श्रवणभक्तीने (पाण्यात पडल्यावर आपोआप पोहायला शिकतो माणूस, म्हणतात तसे) व्यवहारापुरते का होईना, परंतु अस्खलित इंग्रजी बोलावयास येणे शक्य आहे. ('पाण्यात पडल्यावर माणूस आपोआप पोहायला शिकतो', हे प्रत्यक्षात कदाचित तितकेसे खरे नसले, तरीही.) मात्र, साक्षरता कोणीतरी (प्राथमिक स्वरूपात का होईना, परंतु) शिकवावी लागेल. आणि, 'सुशिक्षित' होण्याकरिता शाळाकॉलेजांतून कदाचित काही काळ - आणि काही पैसे - खर्च करावे लागतील. पैकी दुसरी आणि तिसरी (पक्षी: साक्षरतेची आणि शाळाकॉलेजात जाण्याची) संधी नसेल मिळाली त्या बाईला. पण म्हणून पहिली गोष्ट (पक्षी, अस्खलित इंग्रजी बोलता येणे) हे तिला जमणार नाही, याला आधार काय?
(जुने हिंदी/हिंदुस्तानी चित्रपट पाहून, अगदी सखोल, 'फाडफाड' म्हणण्यासारखे नाही, तरी उर्दूचे जुजबी ज्ञान आपल्यापैकी अनेकांना (नाही म्हटले तरी) असते. थोडे उर्दू माहौलास एस्पोझर मिळाले, बरी उर्दू कानांवर सतत जर पडत राहिली, तर अस्खलित उर्दू बोलता येणे हेसुद्धा अगदीच अशक्य नसावे. परंतु त्याने उर्दू लिहितावाचता येणार नाही; ते वेगळे, आणि मुद्दाम प्रयत्न करून, शिकावे लागेल. अन्यथा, (अस्खलित उर्दूत बोलता येऊनसुद्धा) आपण उर्दूमध्ये अनपढ़, निरक्षरच राहू. तसेच आहे हे.)
आणि हो, ती पंजाबी बाई (इंग्रजी येत नसूनसुद्धा) 'कोठल्याकोठे' गेली. (फॉर व्हॉटेव्हर दॅट मे बी वर्थ. ती अस्खलित इंग्रजी बोलावयास तेथे गेल्यानंतर शिकली, ही बाब अलाहिदा.) फार कशाला, आमच्या न्यूजर्सीतल्या एडिसनात नाहीतर आमच्या अटलांटाच्या डिकेटरात इंडियन ग्रोसरी स्टोअर चालविणारा नाहीतर अमेरिकेच्या आडगावांत जाऊन मोटेल चालविणारा जो 'पटेल' असतो, तोसुद्धा इथे येतो, तेव्हा त्याला इंग्रजी (येत असलेच, तर) तितपतच येत असते. इथे येऊन ते तो शिकतो/न शिकतो, ही गोष्ट वेगळी. परंतु, कष्टाने त्याने नाव जरी नाही काढले, तरी धंद्यात तो अनेकदा यशस्वी होतो. पण त्या पंजाबी बाईच्या/पटेलाच्या इथे 'कोठल्या कोठे' येण्यामागे (नि अनेकदा यशस्वीसुद्धा होण्यामागे) जी धमक आहे, जी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी आहे, ती तुमच्यात आहे काय? मुख्य म्हणजे, तशा मार्गांनी (आणि, त्या मार्गांत काही गैर आहे, असा दावा नाही.) 'कोठल्या कोठे' जाण्याची तुमची इच्छा / मानसिक तयारी आहे काय? मग कशाला फुकाच्या गप्पा?
हा किस्सा, स्वतंत्र भारताचे पहिले संरक्षणमंत्री सरदार बलदेवसिंह यांजपासून ते आजमितीपर्यंतच्या भारतीय राजकारणात काही महत्त्वाचे पद भूषविलेल्या कोणत्याही शीख सद्गृहस्थाच्या नावे खपविता यावा. (आम्ही तो भारताचे एके काळचे गृहमंत्री आणि नंतर राष्ट्रपती श्री. ग्यानी झैलसिंह यांच्या संदर्भात ऐकलेला आहे.) त्यामुळे, हा एक तद्दन कपोलकल्पित असा, सरदारजी-विनोद-जॉन्रमधला किस्सा असावा, अशी आम्हांस दाट शंका आहे.
असो. या विनोदाचे या लेखातील स्थान - पक्षी, यातून नक्की कोणता मुद्दा मांडायचा आहे, हे - कळले नाही.
नाही, म्हणजे, बाकी सर्व मुद्दे ठीकच आहेत. दोनच मुद्दे तेवढे खटकले.
(१) स्वातंत्र्यपूर्व काळात वाढलेल्या मंडळींमध्ये इंग्रजी सुधारण्याकरिता टाइम्स ऑफ इंडियाच्या वाचनाचे मोठे प्रस्थ होते. त्या काळाकरिता कदाचित ते ठीक असेलही, आणि, त्या अनुभवातून सदर सद्गृहस्थांनी तो सल्ला दिलेला असणे समजू शकते. मात्र, हा सल्ला जर २००१च्या इसवीत दिलेला असेल, तर तोपर्यंत टाइम्स ऑफ इंडियामधील इंग्रजीचा दर्जा अत्यंत खालावला होता. (किंबहुना, तसा तो साधारणत: १९८०च्या दशकातच खालावू लागला होता; मजकुरात इंग्रजीच्या धडधडीत चुका सर्रास सापडत असत.) अण्णा जर २००१च्या इसवीत स्वत: टाइम्स ऑफ इंडिया वाचत असते, तर खुद्द त्यांच्या हे लक्षात आले असते, नि त्यांनी असा बदसल्ला कधीही दिला नसता. त्यामुळे, तेव्हा अण्णा स्वत: टाइम्स वाचीत नसावेत, आणि त्यांनी हा पारंपरिक सल्ला (कदाचित प्रामाणिकपणे नि सद्हेतूने, परंतु फारसा विचार न करता) तसाच (ढकलपत्रासारखा) पुढे ढकलला असावा, अशी शंका येऊ लागते.
(२) इंग्रजी सुधारण्याकरिता डिकन्स वाचण्याचा सल्ला पारंपरिक असेलही, परंतु आजमितीस इंग्रजी सुधारण्याकरिता उपयुक्त खासा वाटत नाही. किंबहुना, आधीच इंग्रजीचे भय असणाऱ्या विद्यार्थिनीस त्यातून अधिकच दडपण न आल्यासच नवल.
(नाही, कोणी निव्वळ हौस म्हणून / पुरातन इंग्रजी वाङ्मयाचा अभ्यास म्हणून / एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडातील इंग्रजी भाषेच्या बाजाचा परिचय म्हणून / किंवा अगदी गंमत म्हणून, त्या विचित्र भाषेला खदाखदा हसण्यासाठीसुद्धा डिकन्स वाचला, तरी त्याबद्दल मला कोणताही प्रत्यवाय असण्याचे काहीही कारण नाही. वाचोत बापडे, नि मजा करोत! मी वाचणार नाही कदाचित - माझा तो चहाचा कप नाही - परंतु, to each, his/her own. परंतु, आजमितीस इंग्रजी सुधारण्याच्या दृष्टीने ते अत्यंत बोजडच नव्हे, तर निरुपयोगी ठरावे. हे म्हणजे, मराठी सुधारण्याकरिता ज्ञानेश्वरी वाचण्यासारखे झाले. (एकअक्षरकळेलतरशपथ. इतकेच नव्हे, तर आजमितीस बोलली जाणारी मराठी आत्मसात करण्याकरिता अत्यंत निरुपयोगी.) त्यामुळे, त्यातून होतकरू विद्यार्थिनीस यदाकदाचित धडकी जरी नाही भरली, तरी, उपयोग होणार नाही निश्चित. तेव्हा, हा सल्लासुद्धा फारसा विचार न करता (केवळ परंपरा म्हणून) ढकलला गेला असावा, अशी शंका येते.)
असो.
तत्कालीन सदाशिव पेठेतील
तत्कालीन सदाशिव पेठेतील इंग्लिश माध्यमाची शाळा कुठली बुआ ?
प्रभुकृपा की अजून कुठली ?
?
प्रभूकृपा???
हे काय असते?
तुमचे प्रतिसाद जबरी असतात.
...
You know, sometimes I think I was born with a leak, and any goodness I started with just slowly spilled out of me and now its all gone. And I'll never get it back in me.
~ BoJack Horseman
ऐसीवर येण्याचे कारण.
ठणठणपाळाने ललितात लेखन थांबवल्यावर जीएंनी खरमरीत पत्र धाडले होते संपादकांना. "हे सदर येणार नसेल तर वर्गणी का भरायची आम्ही?"
श्रेणी
एकाच वेळी दोन मार्मिक आणि माहितीपूर्ण देण्याची सोय हवी. खुद्द नबां'ना आणि काही जणांना श्रेणी देताही येत नाहीत तिथे मी दोन मागणे जरा जादाच आहे. असो.
तर लेख आणि नबांचा प्रतिसाद भारीच.
मलाही जाणवलं लेखक तो आहे का ती. पण असो.
लेखकाने एका लहान मुलीच्या भूमिकेतून अण्णांचं व्यक्तिचित्रण लिहिल्याने चुका झाल्या असतील.
बाकी अण्णांची मदत करण्याची वृत्ती आणि इंग्रजीचे गुरू कसे झाले ते लिहिलं आहे. काही नशिबवानांना असे परोपकारी गुरू शेजारी मिळतात. अण्णांच्या दिर्घायुष्याचे रहस्य समजले नाही पण एकशेवीस नक्कीच गाठोत. एकूण अण्णा मनमिळावू आणि आनंदी वाटतात.
इंग्रजीबद्दल सल्ले म्हणाल तर ते एक प्रातिनिधीक पात्र म्हणता येईल. त्यांच्या विचारांचे असंख्य लोक त्याकाळी होते. इंग्रजी कशी शिकावी वगैरे.
एक विनोद सांगून संपवतो. William Darlymple त्याच्या एका हिस्टॉरिक ट्रेलवर टर्कितल्या हॉटेलातल्या वेटरशी बोलत असतो. "कुठून आला?"- "इंग्लड." "दे स्पीक बेटर इंग्लीश." "येस, दे ह्व गॉट टू."
...
हे इंग्लंडाबाबत कदाचित खरे असेलही. आमच्या अमेरिकेची परिस्थिती किंचित वेगळी आहे.
बोले तो, आमच्या येथे इंग्रजी बोलली जाते, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. किंबहुना, आम्ही जे काही बोलतो, त्यास 'इंग्रजी' असे संबोधून - 'हिणवून' म्हणा ना! - तो गैरसमज सर्वत्र पसरविण्यास आम्हीच कारणीभूत आहोत.
माझी अटकळ अशी आहे, की भारत आणि अमेरिका - जगातील दोन थोर लोकशाही देश! परंतु ते असो. - हं, तर या दोन्हीं देशांना स्वातंत्र्य जे मिळाले, ते एकाच कारणामुळे: इंग्रज आपल्या भाषेवरील अत्याचार सहन करू शकला नाही, म्हणून. भारतीयांच्या दृष्टीने त्यातल्या त्यात समाधानाची बाब इतकीच, की इंग्रज भारतात त्या मानाने बऱ्याच अधिक काळापर्यंत - जवळजवळ पावणेदोनशे वर्षे अधिक! - टिकून राहू शकला. (तरीही अनेक भारतीयांना इंग्रजीबद्दल इतका न्यूनगंड का असतो, कळत नाही.)
या निमित्ताने एक विनोद आठवला. एकदा युरोप भटकणारी एक अमेरिकन भवानी एका दुकानात घुसते, आणि जवळजवळ अगतिकपणे किंचाळते, "Does anyone speak English here? Does anyone speak English in this @#$*&~^% country?"
कौंटरपलीकडून तिला तितक्याच थंडपणे उत्तर मिळते, "Madam, you're in England."
----------
आणखी एक:
If you speak three languages, you're trilingual. If you speak two languages, you're bilingual. If you speak only one language, you're American.
(वस्तुतः, हे तितकेसे खरे नाही. एकाहून अधिक भाषा बोलणारे अमेरिकनसुद्धा असतात. ते सामान्यतः दोन प्रकारांत मोडतात: (१) (आमच्यासारखे) फर्स्ट जनरेशन इमिग्रंट्स, आणि (२) हिस्पॅनिक मंडळी. (यांची घरात/आपसात बोलायची भाषा स्पॅनिश असते.))
इंग्रजी विषय शिकवणे - महाराष्ट्रात
हे प्रकरण म्हणजे आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांतून जसे शिकलो त्यातला विनोदीपणा एका उडपीकडच्या माणसाने सांगितला. त्याचं इंग्रजी ( लेखी)फारच चांगलं होतं. तो म्हणाला "मराठी शाळेत सुरुवातीला इंग्रजी घोटवून घेतात त्याची फार गंमत वाटते." आइ -गो, वुइ गो, यू गो, ही? गोsssज. शी गोsssज." "त्याची काय गरज? पुढे काही सरकतच नाही. लेट् द स्टूडंट्स पिकप द लँग्विज."
आणखी बरेच फ्लेवरस आहेतच.
----------
ज्योक्स मस्तं न'बा.
तपशील...
आणखी एक गोष्ट. सरदार स्वर्णसिंह हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री म्हणून कधीही नव्हते. ते इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते. (तत्पूर्वी ते नेहरूंच्या - आणि शास्त्रींच्यासुद्धा - मंत्रिमंडळांत होते, असे कळते, परंतु संरक्षणमंत्री म्हणून नव्हे.)
नेहरूंच्या मंत्रिमंडळातील पहिले संरक्षणमंत्री सरदार बलदेवसिंह होते.
(परंतु, हा सरदारजी काय, नि तो सरदारजी काय, सगळे सारखेच, नाही काय? याच, याच वृत्तीमुळे शीख लोक भडकतात! पण लक्षात कोण घेतो?)
असो चालायचेच.
तरुण थी मय
माझी इंग्रजी आता बरी आहे. कॉलेजात असताना बाबांचे एक मित्र मला ढोस देत होते. "इंग्लिश सुधारायला पाहिजे", छापाचे. मला तेव्हा इंग्लिश वाचायचा कंटाळा येत असे. (हल्ली मराठी वाचायचा येतो, पण ते असो.) तेव्हा मी बाणेदार उत्तर दिलं होतं, "काय ठेवलंय इंग्लिशमध्ये? इंग्लंडमधल्या कचरा उचलणाऱ्या लोकांनाही इंग्लिश येतं. कदाचित आपल्या सगळ्यांपेक्षा चांगलं. तरीही कचराच उचलावा लागतो ना!"
तेव्हा तरुण थी मय. आता लक्षात येतं की कचरा उचलणाऱ्या लोकांपेक्षा माझी इंग्लिश फार वाईट नाही.
शिवाय हल्ली मराठी लोक जी काही मराठी बोलतात, लिहितात, त्यापेक्षा त्यांचं इंग्लिश लेखन परवडतं. साधी भाषा असते, त्यात काही हिणवण्यासारखं नाहीच. पण मध्येमध्ये निष्कारण संस्कृत, ग्रीक, फारसी वगैरे शब्द घुसडत नाहीत. मराठीत इंग्लिश शब्द घुसडतात, मराठी वाक्यरचना इंग्लिशसारखी करतात, तशी. शिवाय चुका दाखवल्या तर कधीमधी सुधारणेची तयारीही दाखवतात. मराठीतल्या चुका दाखवल्या की सबबसाम्राज्य मिळवण्याची जोरदार तयारी सुरू होते.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किस्से आवडले.
किस्से आवडले.