बाधा

संकल्पना #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

बाधा

- सन्जोप राव

दादा उलटा गुरुवार करत. म्हणजे सकाळी नेहमीप्रमाणे जेवून ते रात्री एक प्लेट खिचडी आणि कपभर दूध घेत. महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या आधी कधीतरी ते वाडीला जाऊन येत. पावसाळ्यात कृष्णेच्या पुरामुळे देव वर आलेले असतील तर तेथूनच दर्शन घेत. तेही जमले नाही तर भोजनपात्रातूनच हात जोडून परत येत. येताना पावशेर पेढ्याचा पुडा मात्र नक्की आणत. वाट्याला येणार्‍या एका फिक्या पेढ्याच्या चवीने दादा आज वाडीला जाऊन आले हे कळत असे. उसाचे बिल आले असले की किंवा आडत्याकडे विक्रीला लावलेल्या जोंधळा, गहू, सोयाबीन अशा धान्यांची पट्टी आली असली तर कधीतरी दादा पाव शेर कवठाची बर्फी आणत. करदंट ही काचेच्या स्वच्छ बरण्यांमध्ये मांडून ठेवलेली चीज अप्रूपाने बघण्याचीच होती. सठीसामाशी एखादा तुकडा खायला मिळे. वाडीचा अंगारा बाकी भुवयांच्या मध्ये लावून घ्यावाच लागे.

त्या काळात प्रवास भलता कठीण होता. एस्टीशिवाय दुसरे वाहन नव्हते आणि एस्टीच्या फेर्‍याही अगदी मर्यादित असत. दुचाकी वाहने फक्त मोजक्या लोकांकडे असत. स्वत:च्या मालकीचे चारचाकी वाहन असलेली व्यक्ती माझ्या परिचयात सोडाच, पाहाण्यातदेखील नव्हती. मोटारीतून प्रवास बहुदा एखाद्या कौटुंबिक आपत्तीच्या प्रसंगातच घडत असे. त्या वेळी, मला वाटते, धनिक वर्ग असा नव्हताच. खाऊनपिऊन सुखी लोक, गरीब लोक आणि अतिगरीब लोक अशीच काहीशी समाजाची रचना होती. शिक्षणाचे वारे वाहून वाहून आता पडले होते. तरीही एकूण समाजावर शिक्षणाचा काही फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. समाज मागासलेलाच होता. आर्थिक गरिबीच्या जोडीला वैचारिक मागासलेपण फार होते. धार्मिकता आणि कर्मकांडे तर होतीच, पण बाबा, गुरुजी, आण्णा, मामा यांचे पीक जोमात होते. माझ्या बघण्यात जोमात असलेले पीक हे असे एवढेच. बाकी ताणात असलेल्या गव्हावर तांबेरा पडे, काळ्याभोर उसाला ड्वण्णी लागे आणि पोटरीला आलेल्या मक्यावर साखर पडे.

हातातोंडाशी आलेले पीक कोळपून जाणे हे शेतकर्‍याला नवीन नव्हते. त्यामुळे शेतकर्‍याच्या घरी एकूण परिस्थिती हलाखीचीच असे. तरीही माझ्या घरात सगळे सणवार, कुळाचार कटाक्षाने पाळले जात. सवाष्ण, ब्राह्मण, श्राद्ध, पक्ष, श्रावणातले शुक्रवार, श्रावणी सोमवारचा उपास, गुढीपाडवा, गणपती, होळी, दिवाळी हे सगळे अगदी रीतसर केलेच पाहिजेत असा आजी-आजोबांचा, विशेषत: आजीचा, आग्रह नव्हे अट्टाहास होता. हे सगळे, आताच्या शब्दांत म्हणायचे तर 'नॉन निगोशिएबल' होते. शिवाय वार्षिक सत्यनारायण असे, अनंताची पूजा असे. सोयर-सुतकाचे तर प्रस्थच होते. मृत व्यक्तीचा दहावा, अकरावा, तेरावा हे दिवस वाडीला जाऊन करावे लागत. त्यांसाठी कुठले कुठले नातेवाईक लांबलांबून रजा टाकून, गैरसोय करून पोराबाळांच्या शाळा बुडवून कधी रखरखत्या उन्हाळ्यात तर कधी पावसापाण्याच्या दिवसांत येत असत आणि मरणाचे गांभीर्य न समजण्याच्या त्या वयात ती एक मध्येच आलेली सुटीच असे. मग उदकशांत, गोडाचे जेवण हे तर गावजेवणाचेच प्रकार असत. शेतावर काम करणारा एखादा गडी गावभर हिंडून तेराव्याच्या जेवणाचे आमंत्रण देत असे. 'पुरणाला आणि मरणाला नाही म्हणून चालत नाही' अशी त्या काळात म्हणच होती. एकूण काय चालते आणि काय चालत नाही, याबाबत समाजाच्या स्पष्ट कल्पना होत्या, आणि त्यांच्याबाहेर पाऊल टाकण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती.

महिन्यातले चार दिवस आईला शिवायचे नसे. त्याचा 'विटाळशी बसणे' असा स्वच्छ उल्लेख होत असे. मग त्याला 'लहान मुलांनी शिवलं तर चालतंय, नवीन कपडे घातलेले असताना शिवलं तर चालतंय' अशा पळवाटा आल्या, पण त्याही चोरटेपणानेच. तोंडावर सण असला आणि घरातल्या बायकांची अशी 'अडचण' होणार असली तर ते त्यांना प्राणसंकट वाटत असे. काही विशेष न कळण्याच्या त्या वयात त्या कसल्याशा गोळ्या घरातल्या बायकांनी लपूनछपून घेणे ही काय भानगड आहे ते कळत नसे. पतीच्या निधनानंतर केशवपन करण्याची प्रथा बंद झाली असली तरी गावात सोवळ्या बायका होत्या. एवढे कशाला, आमच्या घरातच एक लाल आलवण नेसणारी, परसात राहाणारी आणि पुरुषांच्या समोरसुद्धा न येणारी म्हातारी काकू असल्याचे मला आठवते. विधवा स्त्रिया कुंकू लावत नसत, बांगड्या घालत नसत आणि कोणत्याही मंगल प्रसंगी त्यांना उपेक्षित ठेवले जात असे. 'पांढर्‍या कपाळाची' अशा शब्दांत त्यांची संभावना केली जात असे. मूल न होणार्‍या स्त्रियांचीही फार वाईट अवस्था होती.

एकूण समाजावर अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा होता. एखाद्याचा आजार बरा होत नसला की ते काहीतरी 'बाहेरचे' आहे असेच लोकांना वाटत असे. मग ते उतरून टाकण्यासाठी कुणाकुणाला कायकाय करावे लागत असे. लिंबू-मिरच्या, नारळ, गुलाल, दहीभात, काळी बाहुली हे लोकांच्या आयुष्याचा भाग होऊन गेलेले घटक होते. एखाद्या 'झाडाची' भूक मोठी असली तर उलट्या पिसाची काळी कोंबडी आणि असले कायकाय त्याला द्यावे लागत असे. अमावस्या- पौर्णिमा हे फार महत्त्वाचे दिवस होते. नवस बोलणे आणि फेडणे हे तर नित्याचेच होते, पण अगदी एखाद्या लहान मुलाचा ताप हटत नसला किंवा एखादी म्हैस विताना रेडकू आडवे आल्याने मेली तरी लोकांच्या मनात पहिला विचार 'कुठल्या देवाचं काय करायचं राहिलंय काय बघा' हाच येत असे. माडगूळकरांच्या लेखनात 'एखादी वस्तू सापडत नसली की ताईबाईला नारळ वाढवला जात असे आणि मग नंतर डाव्या-उजव्या हाताने ठेवलेली ती वस्तू सापडत असे' असे वर्णन आहे. हे सगळे माझ्या आसपास घडलेले आहे. त्या काळात जगताना रूढी, परंपरा, गतानुगतिकता, कर्मकांडे यांची जाड ओली चादर पांघरल्यासारखे दमट, कोंदट वाटत असे.

दादांना डॉक्टर व्हायचे होते. परिस्थितीने त्यांना डॉक्टर होणे तर जमले नाहीच, पण महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणेही शक्य झाले नाही. पण जितके दिवस ते शिकण्यासाठी म्हणून शहरात राहिले त्या वेळी त्यांनी जगाकडे डोळे उघडून पाहिले असावे असे मला वाटते. वैज्ञानिक दृष्टीकोन हा शब्दप्रयोग मी फार नंतर वाचला, पण शहरातल्या त्या वास्तव्यात दादांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची बाधा झाली असावी. असली बाधा हे जिवावरचे दुखणे असते. आयुष्यभर ही बाधा साथ सोडत नाही. दादांना विज्ञान या विषयाची आवड होतीच. हा संसर्ग झाल्यानंतर आपल्या भोवतालच्या लोकांकडे, त्यांच्या वर्तनाकडे, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धांकडे बघण्याची त्यांची नजर पार बदलून गेली असावी. त्यामुळे निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला. मला आठवते, नवजात बालकांना लस देण्याबद्दल त्या काळात लोकांमध्ये फार नकारात्मक दृष्टीकोन होता. दादा बाकी कुणाला मूल झाले की त्या माणसाला, बाईला 'ते डॉक्टर सांगतील तेवढं टोचून घ्या बरं का पोराला' असे सांगत असत. आमच्या शाळेतही वर्षातून एक-दोनदा 'टोचण्याच्या' खेपा होत असत. 'आज शाळेत 'टोचायला' आले होते' असेच म्हटले जात असे. दंडावर टोचलेले देवी-गोवराचे चांगल्यापैकी दुखत असे. दुसर्‍या दिवशी कधी काखेत आवधाण येत असे तर कधी कणकण येत असे. पण ते आम्ही, किंवा सगळ्यांनीच टोचून घ्यावे याबाबत दादा आग्रही असत. इम्युनिटी हा शब्द त्यांना माहीत होता की नाही कुणास ठाऊक, पण प्रतिकारशक्ती हा शब्द त्यांच्या बोलण्यात नेहमी येत असे. फळे, फळांचा रस यांवर त्यांचा विश्वास होता. फ्लूने, टायफॉइडने आजारी पडणे त्या काळात नेहमी होत असे. त्या काळातले एम.आर.पी. डॉक्टर अशा दुखण्यांत आधी खाणे बंद करायला सांगत. मुसंब्याचा रस काढायचे एक काचेचे दातेरी भांडे घरात होते. त्याने काढलेल्या मुसंब्याच्या रसात दोन मोठे चमचे ग्लुकोज पावडर घालून दादा ते आजारी माणसाला प्यायला देत असत. पावसाळ्यात पाणी गाळून, तुरटी फिरवून, थोडा वेळ ठेवून मग ते पिण्यासाठी वापरणे, सगळ्या भाज्या खाणे, रोज थोडा तरी व्यायाम करणे अशा त्या काळात माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही दादांकडून शिकलो. तेव्हा पालेभाज्या खायला अगदी नको वाटत असे. पण त्या खाण्याची सवय दादांमुळे लागली.

आमच्या शेतातल्या एका वाटेकर्‍यांशी आमचे अगदी घरगुती संबंध होते. त्यांच्यातला कर्ता मुलगा - आम्ही त्यांना तात्या म्हणायचो - दादांच्या बरोबरीचा होता. तात्यांचे लग्न होऊन चारपाच वर्षे झाली तरी त्यांना काही मूलबाळ झाले नव्हते. सगळे अंगारे-धुपारे, नवस-सायास झाले. तात्यांची आणि त्याच्या बायकोची समाजात होणारी अवहेलना दादांना बघवेना. शेवटी ते स्वत: त्या दोघांना पुढे घालून कोल्हापुरला एका स्त्रीरोगतज्ज्ञ बाईंकडे घेऊन गेले आणि त्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी करून घेतली. तपसणीत तात्यांमध्ये काही दोष नाही, पण त्याच्या बायकोमध्ये मोठा दोष असल्याने तिला बाकी मूल होऊ शकणार नाही असे निष्पन्न झाले. दादांनी त्या बाईला सांगितले की 'हे बघ, तात्याच्या वंशाला दिवा पाहिजे आणि तुला तर मूल होणे शक्य नाही. तर आता मी याचे दुसरे लग्न लावून देणार आहे. पण तुला हा माणूस अंतर देणार नाही याची मी खात्री देतो. आणि मी आहेच. मी तुला बहिणीसारखं सांभाळीन. पण हे असं करणं भाग आहे. त्यामुळे तू आता फार त्रागा न करता या गोष्टींचा स्वीकार करशील तर बरं.' त्या बाईने कुरकुर केली, पण शेवटी पुढे ते सगळे तसे झाले. तात्यांचे दुसरे लग्न झाले, त्यांना दोन मुले झाली. आज तात्या नाहीत, दादा नाहीत आणि तात्यांची दुसरी बायको नाही. तात्यांची मुले त्यांच्या सावत्र आईला आई म्हणतात.

हा सुमारे साठ वर्षांपूर्वीचा काळ आहे. त्या काळात तर्कशुद्धतेचा दादांना झालेला संसर्ग मला म्हणून विशेष वाटतो. असले विचार असूनही दादांना न पटणार्‍या अनेक गोष्टी कराव्या लागल्या, पण त्या त्यांनी केवळ संघर्ष टाळायचा म्हणून केल्या असणार. दादा नास्तिक होते का? बहुदा नाही. पण त्यांनी आपल्या श्रद्धेला विवेकाचा लगाम घालून काबूत ठेवले होते. महिन्यातून एकदा वाडीला जाणे हे केवळ आपली आई सांगते म्हणून आणि ते तसे केले नाही तर घरात वादावादी होईल म्हणून दादांनी केले असावे. पुढे वाडीला एक झणझणीत पदार्थ मिळणारे हॉटेल उघडले. तिथला कटवडा दादांना आवडत असे. मग वाडीला जायचे, देवदर्शन करायचे, प्रसाद म्हणून पेढे घ्यायचे आणि स्टँडवर कटवडा खाऊन 'गोपाळकृष्ण'मधली कपभर बासुंदी पिऊन परतीच्या गाडीने गावाकडे जायचे असे ते करू लागले. आई म्हणते म्हणून, बायको म्हणते म्हणून ते देवळांत गेले, त्यांनी अभिषेक केला, रोजची झटपट देवपूजाही केली, पण कुणी आजारी पडले तर पहिल्यांदा दवाखान्याचा रस्ता धरला. शेती करत असताना मातीचे परीक्षण करून त्याप्रमाणे पिकांना खते घातली, त्या काळात गोबर गॅस वापरायला सुरुवात केली. (गोबरगॅस आणि संडासची टाकी एकच म्हणून त्या गॅसवर शिजवलेले काहीही न खाणारे, अगदी त्यावर केलेला चहाही न पिणारे लोक त्या काळात होते.) जैविक खते वापरली. आणि गावात गणपतीचे देऊळ नाही तर ते बांधायला म्हणून देणगी द्या असे सांगणार्‍या लोकांना 'गावात आहेत त्या देवळांची अवस्था काय आहे ते बघा, कशाला नवीन देऊळ? त्यापेक्षा गावातल्या शाळेला एक नवीन खोली बांधा, मी दहा हजार रुपये देतो,' असे म्हणून स्थानिकांचा काहीसा रागही ओढवून घेतला.

कुटुंबप्रमुख झाल्यावर त्यांनी घरातली कर्मकांडे कमी कमी करत आणली. आईची तब्येत जशी बिघडू लागली तशी त्यांनी एका सुटसुटीत जीवनशैली स्वीकारली. आजोबांच्या आणि आजीच्या वर्षश्राद्धाला गुरुजींना घरी बोलावून ग्लासभर दूध आणि एक्कावन्न रुपये देणे त्यांनी सुरू केले. पुढे त्यांनी तेही बंद करून टाकले. अनंताचे उद्यापन करून ते त्यातून मुक्त झाले. गौरी-गणपतीचे घरात केवढे प्रस्थ होते, तेही त्यांनी कमी करून टाकले. आपल्या मृत्यूनंतर आपल्या मृतदेहावर कोणतेही 'संस्कार' करू नयेत हे त्यांनी आपल्या हयातीतच आपल्या मुलांना सांगून ठेवले होते. आपले दिवस, श्राद्ध वगैरे काही करू नयेत असाही त्यांचा आग्रह होता.

एका पिढीकडून दुसर्‍या पिढीत काय जाते? काही गोष्टी गुणसूत्रांतून संक्रमित होतात. काही गोष्टी संस्कारांतून येतात. काही माणूस बघून बघून शिकतो. दादांना झालेला वैज्ञानिक दृष्टीकोनाचा संसर्ग मी माझ्या खांद्यांवर घेतला आहे असे मला वाटते. नास्तिकता तर मला वाटते माझ्या रक्तातच होती, पण पुढे विज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मी कट्टर नास्तिक झालो. जीवशास्त्राची आवड दादांकडून मला मिळाली असावी. मानवी शरीर म्हणजे काही लिटर पाणी आणि क्षारांची एक पिशवी हे दादांनी मला कधी सांगितले नसले तरी मला ते त्यांच्याकडूनच कळाले. सुदैवाने - येथे सुदैवाने हा शब्द दाभोळकर ज्या अर्थाने वापरत त्या अर्थाने घेतला पाहिजे – मला खूप चांगले शिक्षक लाभले. त्यांनी माझा हा दृष्टीकोन विकसित केला. प्रत्येक गोष्ट तर्काच्या आधारावर पारखून घ्यायची आणि जे तर्काच्या कसोटीवर टिकत नाही ते सत्य असू शकत नाही, हीच एकमेव श्रद्धा असली पाहिजे हे इतके अवघड शब्द कदाचित माहितीही नसलेल्या माझ्या वडलांनी मला त्यांच्या आणि माझ्या नकळत शिकवले.

पुढे आयुष्याने खूप वळणे घेतली. अनेक बरेवाईट प्रसंग समोर आले. अगदी जिवाभावाचे असे जे वाटले होते अशा लोकांनी ऐन मोक्याच्या वेळी संगत सोडली, काहींनी गळाही कापला, पण विज्ञानाने माझी कधी साथ सोडली नाही. तरुण वयात तीक्ष्ण असलेली मते पुढे बोथट झाली. तडजोड म्हणून दादांनी जशा काही गोष्टी स्वीकारल्या, तशा मीही स्वीकारल्या. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात मी अनेक वेळा गेलो पण वाढूळ वयात केलेले देवळात जाऊन देव्हार्‍यात न जाण्याचे कृत्य मी नंतर केले नाही. त्या काळात ती मला क्रांती वाटली होती. आता तो खुळचटपणा वाटतो. 'जगातले सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण विज्ञानाने देता येईल, पण त्याला काही अर्थ नसेल,' हे आईनस्टाईनचे वाक्य मला गद्धेपंचविशीत पटले नव्हते, पण आज ते पटते. पण हा बदल वरवरचा आहे. आतला साचा तोच आहे. मूस मोडलेली नाही. दादांकडून मला झालेल्या या संसर्गाने मी आजही बाधित आहे. पॉझिटिव्ह आहे.

असे तर्काधिष्टित जगणे सोपे नसते, सुखाचे तर मुळीच नसते. मी बीफ, गाईचे मांस, खाल्ले आहे, आणि ते मला आवडले नाही म्हणून (आणि ते खाणे आता बेकायदा आहे म्हणून) मी आता खात नाही हे उघडपणे सांगणे ही आजही ब्रह्महत्या आहे. मंदिर पाडून मशीद बांधणे आणि पुन्हा मशीद पाडून पुन्हा मंदिर बांधणे यात तत्त्वत: काही फरक नाही आणि हे दोन्ही तितकेच निरर्थक आहे हे उघडपणे सांगणारा, बुतपरश्ती करणारा आणि ती करणार्‍याला काफिर म्हणणारा या दोघांत काही फरक नाही असे मानणारा आजही समाजविघातक आहे. 'संस्कार' या नावाखाली जे काही चालते त्यातले काहीही न करणारा आजही बहिष्कृत आहे. कोणत्याही देवळात, मशिदीत, चर्चमध्ये किंवा आणखी कुठेही मला कोणत्याही अमानवी शक्तीचे अस्तित्व कधीही जाणवले नाही असे सांगणे हे तर धाडसाचेच काम आहे. असे करणारे लोक समाजापासून तुटत जातात, एकटे पडतात. म्हटले तर ही फार मोठी किंमत आहे. म्हटले तर हा स्व-विलगीकरणाचा, स्वत:ला क्वारंटाईन करण्याचा भाग आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (4 votes)

प्रतिक्रिया

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेहमीप्रमाणे उत्तम आणि दमदार, संजोपरावसाहेब.
हे वर्णन कुठल्या भागातील ? छोट्या शहरातील की अजून कुठले ? तुमच्याच काळातील प्रथमपुरुषी आहे असे गृहीत धरतो.
अशीच रिफ्लेक्शन्स पुन्यामुंबईतीलतील कुणी लिहिली तर मजा येईल.
वाचायला मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखात वर्णन केल्यापेक्षाही जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन आमच्या घरांत असल्याने आम्ही इतर नातेवाईकांपेक्षा वेगळे ठरले होतो. लहानपणी, इतर घरी गेल्यावर आम्हाला समजले की घरांत देव ठेवलेले असतात. तेच नसल्यामुळे, कुठले धार्मिक कुळाचार नाहीत की गणपतीसारखी स्तोमं नाहीत. आयुष्य खूपच सुटसुटीत झालं आमचं आईवडिलांमुळे! देवाची भीति न दाखवताही चांगलं वळण लावता येतं. वडील नेहमीच सांगायचे की चांगलं वागणं हे कोणाला तरी भिऊन नसावं, तर तेच योग्य आहे म्हणून तसं वागलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक2
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक समान सूत्र ठेउन, आठवणी फार छान ओवलेल्या आहेत. लेखाचा आशय आणि याची मांडणी दोन्ही आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर भाषेत लिहिलेला सुंदर लेख. ‘बुतपरश्ती’ आणि (त्याच्या उलट) ‘बुत्शिकन’ हे शब्द गेलेच आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सुंदर भाषेत लिहिलेला सुंदर लेख

अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुरेख मांडणी आणि विचार!
- कुमार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0