पिंपळपान


#ललित #संसर्ग #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२०

पिंपळपान

- प्रकाश बाळ जोशी
चित्रश्रेय - प्रकाश बाळ जोशी

घरातून बाहेर पडल्याबरोबर तो सरळसरळ गावाच्या बाहेर पडला. गावाबाहेर पिंपळाच्या झाडाखाली एक लहानसं मंदिर होतं. त्याला वळसा घालून डाव्या हातानं तो जवळच्या टेकडीकडे जायला लागला. वाढलेलं खुरटं गवत आणि काही रानटी झुडपं सोडली तर त्या टेकडीवर एकही झाड नव्हतं. टेकडी फार उंच नव्हती. पण पसरट असल्यामुळे बरंच अंतर चालून थोडं वर आल्यासारखं वाटत होतं. त्यानं मागे वळून बघितलं त्या वेळी तो गावाच्या किंचित वर आल्याचं त्याला जाणवलं. गावातल्या सगळ्या घरांची छपरं आणि धाबे दिसायला लागलं होते. तो सरळ पुढे चालत गेला. काही अंतर कापल्यानंतर तो हळूहळू टेकडीच्या माथ्यावर पोहोचला. तो माथासुद्धा बऱ्यापैकी पसरट होता. तिथे क्रिकेटचं ग्राऊंड होऊ शकलं असतं. आणखी पुढे चालत राहिला असता तर परत उतार सुरू होऊन झाडी लागली असती, आणि समोरचा उंच पहाड नजरेला आला असता. पण त्या जंगलाकडे गावातलं कोणी जात नाही. एखादी कोणाची गाय किंवा म्हैस चुकून त्या जंगलाकडे हरवली तरच लोकं त्या बाजूला जातात. जाताना दोन-चार इतर लोकांना बरोबर घेऊन जातात. एकटं-दुकटं कोणी जात नाही. जंगली श्वापदाचा वावर असतो, केव्हाही जीवघेणा हल्ला करू शकतात, असं जुने लोक सांगत आल्यामुळे कोणी तिकडे फारसं वळत नाही. तो माथ्यावरच थांबला. पश्चिमेला सूर्य मावळत होता. आकाशपण धुरकट झाल्यासारखे दिसत होते. पूर्वेकडचा भाग मात्र स्वच्छ निळा रंग घेऊन चांदण्याच्या प्रतीक्षेत उभा होता. त्यानं अंगातला शर्ट काढला, बनियान काढली, आणि हातांनी थोडी जमीन साफ करून तिथे मांडी घालून बसला. सूर्याचा तेजस्वी गोळा क्षितिजाला टेकलेला नव्हता तरी त्याचा प्रखर दाह कमी झालेला होता. दोन्ही हात मांड्यांवर ठेवून तो काही क्षण तांबड्या गोळ्याकडे बघत राहिला. बघता बघता सूर्याच्या बिंबात हालचाल झाली, असा भास त्याला झाला. एकटक बघताबघता त्यानं डोळे बंद केले. तरीही सूर्याचा लाल बंद ठिपका दोन्ही डोळ्यांच्या मध्ये स्थिरावलेला. मधूनच मंद वाऱ्याची झुळूक आल्यामुळे कपाळ्यावरचा घाम न पुसताही वाळून चालल्याचं त्याला जाणवत राहिलं. लालबुंद गोळ्याच्या अवतीभोवती काळोख दाटतदाटत लाल गोळ्याचा एक लाल बिंदू तयार झाला, आणि बघता बघता नाहीसा झाला. किती वेळ डोळे मिटून बसलो आहोत, याचं भानसुद्धा राहिलं नाही. गाव खूप लांब पडलेलं. त्यामुळे कसलेच आवाज कानावर आदळत नव्हते. मधूनच काही मोठे पक्षी आपल्या घरट्याकडे परततानाचा फडफडाट ऐकू येत होता तेवढाच. त्यानं हळूहळू डोळे उघडले. तेव्हा सूर्य क्षितिजापलीकडे बुडालेला होता. क्षितिजावरची लालिमा हळूहळू कमी होत चाललेली. तो उठून उभा राहिला आणि त्यानं गावाकडे बघितलं. अजून अंधार पडलेला नसला तरी रस्त्यावरचे दिवे लागलेले.

पिंपळपान

त्यानं हातातली कॅरीबॅग खाली ठेवली. लॉकर नंबर २०४. खिशातून किल्ली काढली. लॉकरचं कुलूप उघडलं. खिशातलं पाकीट, हातावरचं घड्याळ, आणि मोबाईल फोन काढून आत ठेवले. सोप बॉक्स बाहेर काढला, आणि कुलूप लावलं. बॅग उचलून भिंतीला लागून ठेवलेली. सोफ्यावर बॅग ठेवली. एक-एक करत सगळे कपडे काढले. आणि सोफ्याच्या वर असलेल्या खुंटाळ्यावर टांगून ठेवले. बॅगेतला रुमाल काढला. स्विमिंग कॉसच्युम घातलं. टॉवेल, सोपकेस, वॉटर, गॉगल आणि स्विमिंग कॅप बरोबर घेऊन तो शॉवरखाली गेला. थंड पाण्याचा शॉवर सुरू करताच एकदम अंगावर शहारे आले. साबणानं अंग स्वच्छ करून स्विमिंग कॅप डोक्यावर चढवली. रुमाल, आणि सोप केस बॅगच्या जवळ ठेवून तो बाहेर आला. स्विमिंग रॅकवर नेहमीसारखी गर्दी होती. तो १६ फुटी तलावावर गेला आणि एक सूर मारून पलीकडच्या काठावर पोहोचला. नेहमीच्या जागी उभा राहून त्यानं मोठा श्वास घेतला, आणि तळापर्यंत खाली गेला. स्विमिंग गॉगल घातल्यामुळे त्याला डोळे उघडे ठेवून पाण्याखाली गेल्यानंतरसुद्धा बघता येत होतं. जसा खाली गेला तसाच तो दुप्पट वेगानं वर आला. पहिलाच सूर असल्यामुळे त्याला धाप लागल्यासारखं वाटलं. दुसऱ्यांदा खाली गेल्यावर तो जास्त वेळ खाली थांबला. जास्त वेळ म्हणजे काही सेकंदच. खाली उभं राहून त्यानं वर बघितलं. हिरव्यागार पाण्यात अंधार दाटून आलेला होता आणि मध्यभागी वरच्या आकाशाचं अंधुक प्रतिबिंब पडलेलं. तिथल्या हिरवेपणाला थोडी निळी झाक. पायानंच तळाला रेटा देऊन तो जसाजसा वर आला तशी वरच्या भागात होणाऱ्या जलतरणपटूंची हालचाल त्याला दिसायला लागली. हातपायांच्या हालचालींचे सपसप आवाजसुद्धा किंचित कानावर यायला लागले. पाण्यातून डोकं बाहेर येताच मानेला झटका देऊन त्यांनी केसावरचं पाणी झटकलं. अजूनही सूर्य तिरकाच होता. तो वर येईपर्यंत पाणी काळसर दिसत होतं. डोळे मिटून परत पाण्यात बुडी घेताना हलकाच, घुंगरांचा मंद आवाज त्याच्या कानांवर पडला. पाण्याखाली घुंगरं कुठे, असा विचार त्याच्या मनात येऊन गेला; आणि तो परत पाण्याबाहेर येऊन स्तब्ध उभा राहिला. पाण्याबाहेर आल्यानंतरसुद्धा त्याला कानात त्या घुंगरांचाच आवाज येत राहिला.

पाण्याखाली बुडी मारून वरचं आकाश कसं दिसतं ते बघायला त्याला आवडायचं . पाण्यात तर चारी बाजूंना मंद झिरपणारा प्रकाश किंवा मिट्ट शेवाळी काळोख. त्यात पाण्याखाली श्वास कोंडून धरलेला. वर येण्याची सतत धडपड. तळाशी जाऊन वरचं आकाश म्हणजे झिरपत येणारा प्रकाश; तो कसा दिसतो, तो पाण्याचाच रंग घेऊन येतो की, आकाशातली निळाई सभोवताली पसरतो. खालून वर बघताना एक अंधुक प्रकाशाचं विवर, तेसुद्धा कमी-जास्त बदलणारं. जसा प्रकाश डोक्यावर बदलेल तसं बदलत जाणारं. अगदी सूर्य डोक्यावर असेल त्या प्रखर प्रकाशात उथळ पाण्याचा तळसुद्धा दिसेल. आणि वर बघताना मलूल झालेला प्रकाशाचा तांबडा गोळा पृष्ठभागावरचं पाणी हलताना त्यासोबत दिसेल. स्थिर सूर्याला हलकेहलके लाटा आपल्यात सामावून घेताना दिसू शकतात. करड्या, हिरव्या रंगाच्या शेवाळ्याची पाती हलत नसली तरी खडकातून वाहणाऱ्या पाण्याचा हलका आवाज, खळखळ कानांवर पडतेच. त्यानं परत एकदा आजूबाजूला बघितलं. बरेच लहानमोठे, आपआपल्या पद्धतीनं पाण्यात हातपाय मारताना, काहींच्या गळ्यात न काढलेल्या सोन्याच्या साखळ्या, त्याला लोंबकणारी पदकं. पोहोताना चुकून कोणाच्या हाताची किंवा पायाची बोटं जर साखळीत अडकली तर त्यातून बाहेर काढणं मुश्कीलच. त्या धडपडीत दोघंही पाण्याचा तळ गाठू शकतात. वरून पाण्यात बघताना त्याची खोली काही जाणवत नाही. पण दीर्घ श्वास घेऊन पाण्यात डुबकी मारली. हातानं पाणी वर खेचलं की, गुरुत्वाकर्षणानं खालीखाली जात, खोलवर कुठे तरी, पायाला तळ लागतो. त्या तळात वाळू, माती, काही क्षार, पाषाण, शेवाळ, पाणगवत आणि मधूनमधून तळपायाचा चावा घेणाऱ्या छोट्या छोट्या मासोळ्या. पायांनी तळ रेटून वर प्रकाशाच्या दिशेनं हात मारताना परत एकदा घुंगरांचा अस्पष्टसा आवाज. त्याचे डोळे उघडेच असतात. मान वर करून समोर वर बघताना समोर चकाचकणारा स्विमिंग कॉस्च्यूम घालून कोणीतरी आपल्याही पुढे, अधिक वेगानं वर जातंय आणि त्याच बाजूनं आवाज येतोय. एवढंच त्याला जाणवत राहतं. पाण्याबाहेर आल्यानंतर केसातलं पाणी झटकून डोळ्यांवरचा गॉगल काढून तो आजूबाजूला बघतो. तर बरेचजण पाण्यातून बाहेर पडून सूर्यस्नान घेताना, आपलं शरीर टॉवेलनं पुसून कोरडे करताना दिसतात. परत पाण्यात बुडी मारण्याचा विचार सोडून तो बाहेर पडण्यासाठी जवळच्या शिडीकडे एक उसळी घेऊन जातो, आणि वर येऊन कपडे बदलण्यासाठी आला तिकडे परत जातो. खाली जाऊन साबण लावून आंघोळ करताना डोक्यावर पडणाऱ्या पाण्याबरोबर त्याला घुंगरांचा आवाज ऐकू येतो. हा खरा आवाज नसून मगाशी ऐकलेला आवाज होता. परत एकदा भास होतोय. शॉवरचं पाणी बंद करून तो टॉवेलनं अंग कोरडं करतो आणि बाहेर येऊन परत एकदा कपडे घालतो. खिशातल्या किल्लीनं लॉकर उघडतो. आतला कंगवा काढून भांग पाडतो आणि कंगवा आतमध्ये ठेवून, पाकीट, मोबाईल खिशात ठेवून लॉकरचा दरवाजा बंद करतो. लावलेल्या कुलपावरून पाणी वाहत आहे आणि त्या पाण्याच्या झुळकेबरोबर आपला आकार बदलतोय, हे बघून तो आपलेच डोळे चोळतो. आपण पाण्याबाहेर पडलेलो आहोत आणि निघायच्या तयारीत आहोत याची खात्री करून घेतो.

पिंपळपान

बाहेर पाऊल टाकलं आणि एकदम प्रचंड धुरळा उडून डोळ्यात गेला. डोळे बारीक करून तो बघत होता. प्रचंड तापलेलं. उन्हात संबंध धूळ आणि धुळीसकट वाळलेली पानं, कचरा, छोटेछोटे कागदाचे कपटे. आवर्तन होत गोलगोल घिरट्या मारत होते. थोड्या वेळातच तो धुरळा खाली बसत बसत शांत झाला. कोपऱ्यावर उभं पिंपळाचं झाड, जे वावटळीत दिसेनासे झालं होतं, ते हळूहळू आकार घेऊन डोळ्यांसमोर उभं राहिलं. वाऱ्याच्या प्रचंड वेगानं ते अजूनही कोणीतरी गदागदा हलवतंय. रस्त्यावर एकही वाहन नाही. माणूस नाही. चिटपाखरू नाही. असं सगळं गेलं कुठे, असा स्वत:शीच विचार करत तो बाहेर पडला. थोडं चालून पुढे जातोय तोच किंकाळ्या, आक्रोश, विव्हळणं त्याच्या कानांवर पडलं. आणि तिथल्या शांततेला ब्रेक बसताना होणारा आवाज ऐकून तो दचकलाच. धूळ जरी खाली बसली असली तरी झाडाची वाळकी पानं मात्र अजूनही भोवताली, वर भिरभिरत होती. पाच-दहा पावलं टाकल्यावर भिरभिरणाऱ्या पानांकडे बघत तो रस्त्यावर बघायला लागला. रस्त्याच्या रक्तवाहिन्या साकळून ठिकठिकाणी बुडबुडे बाहेर येताना पाहून तो जागच्या जागी थिजला. रस्त्यावर दूरपर्यंत काहीतरी चकाकणारं ओलसर द्रव पसरलेलं. झाडांच्या मागून धुळीच्या ऐवजी काळोखाचे लोट अंगावर चालून येतायत. समोरची झाडं हलके हलके त्या काळोखात विलीन. रस्त्यावरची चकाकी हळूहळू विझून निस्तेज होऊन, त्यावर एक वेगळीच काळोखी साठत गेली. त्यानं पुढे जाण्यासाठी उजवा पाय उचलला. परंतु त्या पायाला काहीतरी चिकटल्यानं तो सहजासहजी वर उचलला जात नाही. त्यानं खूप ताकद लावून तो खेचण्याचा प्रयत्न केला. तरीही तो मोकळा होत नाही, डाव्या पायावर भर देऊन उजवा पाय उचलल्यामुळे डावा पाय आणखीनच रुतून बसला आहे. पायावर सारखा भार पडून गुडघे दुखायला लागले. हातातल्या बॅगेसकट खाली पडतो की काय असं वाटत असतानाच झाडाच्या मागून लुकलुकणारे दोन डोळे त्याला दिसायला लागतात. फार दूर अंतरावर नसल्यामुळे ते डोळे जवळ जवळ येताना दिसतात. मध्येच थांबून ते इकडेतिकडे बघतात आणि कोणी नाही असं बघून ते पुढे पुढे येतात. अगदी जवळ आल्यानंतर एक छोटा उंदीर आपल्याच बाजूला येतोय, पण करणार काय? त्याचे तर पाय उचलत नाहीयेत. तो पुढेही जाऊ शकत नाही आणि मागेही जाऊ शकत नाही. जसाजसा तो उंदीर जवळ येतो तसतशी त्याला एक अनामिक भीती चाटून जाते. लांबवर बघितलं तर आणखी काळोख दाटून येतोय. त्याच्या आजूबाजूला मेंढ्यांचा कळप कधी येऊन उभा राहिला, त्याला समजलं नाही. काही मेंढ्यांच्या डोळ्यांवर पोहोण्याचे गॉगल लावलेले आहेत तर काही मेंढ्यांनी चट्ट्यापट्ट्याच्या कपड्याचे स्विमिंग सूट घातलेलं आहेत. हळूहळू तो उंदीर उजव्या पायाजवळ आला. पायाभोवती त्यानं तीन प्रदक्षिणा घातल्या. आणि अंगठ्यापासून सुरुवात करून चारी बाजूने पायाभोवती विणल्या गेलेला रक्तवाहिन्या सपासपा कापून टाकल्या. पण पाय उचलून बघावं, असं काही त्याला वाटलं नाही. उजव्या पायाकडून वळून तो उंदीर दक्षिण पायाकडे वळाला, आणि तो पायही त्यानं मोकळा केला आणि बघता बघता तो उंदीर आणि चकाकणारे डोळे नाहीसे झाले. चार पावलं चालून तो पुढे गेला.

---

जसजसा तो पुढे जात राहिला तसतसा अंधार थोडा थोडा कमी झाला. रस्ता पाण्यानं धुतल्यासारखा स्वच्छ झाला. काळोख जरी कमी झाला तरी आकाशात अंधारच होता. रस्त्यावरचे दिवे मलूल होते. समोरचं पिंपळाचं झाड उसळून शांत झाल्यासारखं निपचित पडलं. तो जसजसा झाडाच्या जवळ येत गेला तशीतशी झाडाची सावली मागेमागे जात गेली. त्यानं खाली बघितलं. रस्त्यावर एक वाळलेलं पिंपळपान पडलेलं दिसलं. हिरव्याचा पिवळा रंग झाला असला तरी त्याच्यावरचं तांबडं टेंगूळ मात्र लाल रंग सांभाळून होतं. वडाच्या पानावर त्यानं अशा प्रकारचे लाल फुगवटे पाहिले होते पण पिंपळाच्या पानावर पहिल्यांदाच त्यानं असा अर्धमण्यासारखा, तांबड्या, भडक रंगाचा ठिपका बघितला होता. पिवळ्या रंगावरचा तो तांबडा ठिपका पाहून त्याला ते हातात उचलून घ्यावंसं वाटलं. पान घेण्यासाठी तो खाली वाकला. पान पकडण्यासाठी त्यानं जसा हात पुढे केला तसं ते पान वाऱ्याच्या झुळकेनं उडून दोन पावलं पुढे गेलं. तो आणखी दोन पावलं चालून पान उचलण्यासाठी परत खाली वाकला. तर ते पान आणखी पुढे गेलं. तो पानाच्या मागे परत उचलण्यासाठी वाकला. शांत पडल्या पानाला पकडण्यासाठी त्याने झटकन हात पुढे केला. त्याच्या कपाळावर आठ्या चढल्या. हे पान असं वाऱ्यानं सारखं कसं उडतं! झाडाची पानं मात्र स्तब्ध होती. त्यामुळे आजूबाजूला फार वारा असण्याची शक्यता नव्हती. त्याच्यापासून दहा पावलांवर उडून खाली पडलेल्या पानाकडे बघत राहिला, आणि एकदम देहभान हरपून वेगानं ते पान पकडण्यासाठी तो पुढे झेपावला. पण त्याच्यापेक्षा जास्त वेगानं ते पान उडून आणखीन पुढे जाऊन बसलं. तो होता त्या जागेवरच खिळून उभा राहिला. हे पान आपल्याशी मस्करी करतंय काय? आपण पकडायला जावं तर ते पुढे उड्या मारत जाऊन बसतं. आपण पान पकडण्यासाठी हात पुढे केला, नेमकी त्याच वेळी वाऱ्याची झुळूक कशी काय येते? पण खरंच वाऱ्याची झुळूक येते की ते पान स्वतःच उडी मारून पुढे जातं; का या पानात जीव आहे, जो स्वत:हून उड्या मारत पुढे पुढे जातोय. त्या पानाचा नाद सोडून द्यावा; असंही क्षणभर त्याला वाटून गेलं. पण त्याचबरोबर लाल अर्धमणी त्याला खुणावत होता. हातातली बॅग त्यानं खाली ठेवली आणि आता काही करून ते पान पकडायचंच असा निर्धार करून तो त्या पानाच्या मागे लागला. त्याच्या धावण्यामुळे पान एका ठिकाणी स्थिर न राहता त्याच्या पुढे समोर उडत राहिलं. तो दमून थांबल्यानंतर ते पान खाली पडलं आणि परत त्याची वाट बघायला लागलं. हे पान स्वत:च कसं काय पुढे पुढे उडतंय. हे एक कोडंच आहे. पान पकडण्यापेक्षा हे नेमकं काय आहे हे समजून घ्यावं. पण ते समजण्यासाठी पान तर हातात असायला हवं. त्याशिवाय नेमकं काय आहे, हे समजणं अशक्यच. चालत चालत, पानाच्या मागे मागे येत, तो पिंपळाच्या झाडापासून खूपच पुढे आला. समोर काळाकुट्ट अंधार असला तरी चांदण्यांच्या उजेडात वाहणारं खळखळ पाणी त्याला आपल्याकडे खेचून घेत राहिलं.

पिंपळपान

तो पुढेपुढे चालत राहिला. ते पान तर कुठे दिसत नव्हतं. पण आपल्या पुढे उड्या मारत चाललं आहे असं त्याला वाटत राहिलं आणि तो पुढेपुढे चालत राहिला. पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. पण कुठेही समोर पाणी दिसत नव्हतं. त्या अंधुक प्रकाशातच रस्त्याच्या कडेला कोणीतरी बसलंय असं वाटून तो थांबला. स्पष्ट काही दिसत नव्हतं. तरी रस्त्याच्या कडेला कोणीतरी बसलाय, असा एक अस्पष्ट आकार दिसत होता. जसजसा तो पुढे आला तसतशी ती धूसर आकृती स्पष्ट होत गेली. त्या काळोखात तो पांढरा दिसणारा ठिपका हळूहळू स्पष्ट होत गेला. पांढरे स्वच्छ कपडे घातलेला कोणीतरी मैलाच्या दगडावर बसलेला. मान खाली घातलेली, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि मान गुडघ्यात घातलेली. त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. तो जरा झपझप चालत, कोण बसलंय हे बघण्यासाठी पुढे आला. त्या व्यक्तीचे केसही भरपूर अस्ताव्यस्त वाढलेले. वेणी घालता येईल एवढे मोठे, खांद्यांवरून ओघळणारे. जणू काही अंधारात चमकणाऱ्या आकाशातून उतरलेल्या पारंब्या. तो जवळ येऊन उभा राहिला. तरी त्या बसलेल्या व्यक्तीला भान नव्हतं. तो एकदम दचकला. त्या बसलेल्या माणसाच्या हातात ते पान अलगद अडकलेलं. तांबडा अर्धमणी वरच्या बाजूला. त्यानं ते पान रस्त्यावरून उचलण्याचा प्रयत्न केलेला. पण ते उडत उडत या वृद्धाच्या बोटात अडकलेलं. जणू काही ते पानच त्याला या वृद्धाकडे घेऊन आलेलं. त्याची त्या पानाविषयी आणि बसलेल्या माणसाविषयी उत्सुकता वाढली. रात्र अंधारी असल्यानं काहीशी भीतीची लहरही त्याच्या मनातून उमटून गेली. हा माणूस बसल्याबसल्या झोपलाय की, त्याची तंद्री लागली. कसं समजणार? त्याला हात लावून उठवावं की हाका मारून उठवावं, असा विचार करत करत त्यानं बॅग खाली ठेवली आणि हातानं दोन-चार टाळ्या वाजवल्या. त्याच्या आवाजानं आजूबाजूची शांतता भंग पावली. त्या टाळ्यांचा आवाज स्विमिंग पुलपर्यंत आणि तिथल्या जीवरक्षकांपर्यंत पोहोचेल आणि ते काय झालं हे बघायला बाहेर येतील. तरी बसलेल्या माणसांची काहीच हालचाल दिसली नाही.

शेवटी त्यानं हलकेच त्याच्या खांद्यावर हात ठेवून 'अहो' असं दोन-तीन वेळा बोलून उठवायचा प्रयत्न केला. ते करताना त्याचं लक्ष त्याच्या हाताच्या पानाकडे होतं. शेवटी न राहवून त्यानं त्याला हलवून उठवलं. बसलेला माणूस मांडीवरचे हात मागे घेऊन ताठ होऊन बसला आणि त्यानं चेहरा वर करून डोळे उघडले. हा त्याच्याकडे पाहत बसला. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या, त्यांची जाळी, त्यात खोल गेलेलं डोळे. किचिंत मिटलेल्या पापण्या. त्यामुळे ही व्यक्ती केवळ जिवंत आहे एवढंच त्याला जाणवलं. मानेवर रुळणारे पांढरे केस दाटच. त्यामुळे त्याला वयाचा नेमका अंदाज लागला नाही. हात मागे घेतल्यामुळे बोटात अडकलेलं पान पण किंचित मागे झालेलं. पानावरचा तांबडा, रक्तवर्णी अर्धमणी त्याच्या बोटातल्या अंगठीतला आहे की पानावरचा. पानाचा रंगही आणखीनच पिवळट, पांढरा झालेला. हिरवेपणाचा मागमूसही नाही. त्याच्या केसाचा रंग आणि पानाचा रंग एकच झालेला. त्यानं पानाकडे इतक्या वेळा निरखून बघितल्यानं बसलेला माणूसही 'एवढं काय टक लावून बघतोय' म्हणून पानाकडे बघायला लागला. त्याच्या डोळ्यातली पानाबाबतची उत्सुकता आणि लालसा या दोन्ही गोष्टी त्या वृद्धाच्या लक्षात आल्या असाव्यात. त्यानं पान धरलेला हात त्याच्यापुढे केला. त्यामुळे तो एकदम दचकला. या पानाच्या मागे तो इतका धावत आलेला. ते पान असं समोर आल्याबरोबर तो दचकला.

"हे घे पान," असं तो आपल्याला सांगतोय म्हणून ते पान घेण्यासाठी त्यानं हात पुढे केला, आणि ते पान चिमटीत धरणार यापूर्वीच ते पान बोटातून गळून परत जमिनीवर पडलं. जमिनीवर पडलेलं पान घेण्यासाठी तो आणखीन खाली वाकला. पान पालथं पडलं होतं. तांबडा अर्धमणी जमिनीच्या बाजूला असल्यामुळे नजरेआड झालेला होता. त्याचा हात पानापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याच्या पाठीत एक चमक येऊन गेली. पान हातात यायच्या आधी वाऱ्यांची एक झुळूक येऊन ते आणखी पुढे जाऊन जमिनीवर पडलं. पडताना पान उलटं होऊन तांबडा अर्धमणी वरच्या बाजूला आलेला दिसला.

त्या बसलेल्या माणसाला कसं सोडू?

पिंपळपान

तो पानाच्या मागे दोन दोन पावलं टाकत गेला. पाण्याचा खळखळाट वाढला होता. नदी जवळच असावी. कारण पाण्याच्या आवाजाबरोबरच त्या अंधारात वाहत्या पाण्याची चमक दिसत होती. ते पडलेलं पान घेण्यासाठी तो परत एकदा वाकला. पण पान काही हातात आलं नाही. ते परत उडून पाण्यावर पडलं असावं. कारण ते हलताना दिसत होतं. तो पाण्याच्या जवळ गेला. तसं पाण्यावरचं पान वाहून न जाता पाण्यात बुडालं. तो बराच वेळ काठावर बसून राहिला. परत मागे वळून त्या बसलेल्या माणसाला जाऊन विचारावं असं त्याला वाटलं, पण पावलं काही मागे वळली नाहीत. त्यानं मागे वळून एक-दोन वेळा बघितलं. पण त्या अंधारात त्याला काहीच दिसणं शक्य नव्हतं. वरचं आकाश काळकुट्ट होतं. एकही चांदणी किंवा तारकांचा पुंजका कुठेच दिसत नव्हता. खळाळणाऱ्या पाण्याची चमक सोडली तर काहीही दिसत नव्हतं. पाणी किती खोल आहे. याचाही अंदाज येत नव्हता. सूर्यादयाची वाट बघत तो तसाच बसून राहिला.

खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकत कधी डोळा लागला, त्याला कळलंही नाही. अचानकपणे खरखर असा आवाज ऐकून त्यानं डोळे उघडले. कोणीतरी झाडत असताना खराट्याचा आवाज येत होता. त्यानं हळूच डोळे किलकिले करून बघितलं. तर तो एका बाकावर झोपलेला होता. समोर रस्त्याच्या मध्ये एक वर्तुळाकार बगीचा होता. तो उठून बाकावर बसला. आणि मागे वळून बघितलं. तर तिथे एक कॉफी शॉप असावं. कारण आत-बाहेर जाताना लोकं दरवाजा उघडताना कॉफीचा दरवळ त्याच्यापर्यंत पोहोचत होता. आपल्याला प्रचंड तहान लागली आहे हे त्याच्या लक्षात आलं. आणि अचानक तो दचकला. त्याला आठवलं रात्रीचा प्रवास, स्वत: उड्या मारून समोर पळणारं पान, समोरच्या पाण्याचा झरा आणि रात्री त्या झऱ्याच्या काठी आपण बसलो होतो. आणि अचानक इथे कसे आलो हेच त्याला कळेना.

त्यानं आजूबाजूला बघितलं. समोरची बाग, आजूबाजूच्या इमारतीमागचं कॅके सगळंच नवीन आणि अपरिचित होतं. कधी या शहरात आल्याचं त्याला आठवलं नाही. परत त्यानं सगळीकडे नजर फिरवली. खळखळ आवाजही येत नव्हता. आणि आजूबाजूला कोणी माणसंपण दिसत नव्हती. तो उठला. त्यानं कपडे झटकलं आणि कॅफेचा काचेचा दरवाजा ढकलून तो आता आला. आत काहीसा मंद प्रकाश होता. काउन्टरवर एक मुलगी कॉम्प्युटरमध्ये बघून टाईप करत होती. पूर्ण कॅफेत एकच माणूस खिडकीजवळच्या टेबलावर बसून शांतपणे कॉफी पीत होता.

याला कुठेतरी पाहिलं आहे असं वाटत असतानाच त्या माणसानं कॉफीचा कप खाली ठेवून मानेला झटका दिला. तसे खांद्यापर्यंत वाढलेले केस कानामागून समोर आले. ते पाहताच तो दचकला. अरे, हा तर काल रात्री मैलाच्या दगडावर बसलेला वृद्ध माणूस. पण काल जसा तो वृद्धत्वाकडे झुकलेला वाटला तसा आज दिसत नाही. आज मात्र तो एकदम ताजातवाना दिसतोय. तो त्याच्याकडे बघत राहिला. हा कोण, इथे कसा? का त्यानंच आपल्याला इकडे आणलंय. याचा घोळ मनात चालू असताना काउन्टरवरची मुलगी प्रश्नार्थक नजरेनं त्याला म्हणाली,
'यस, प्लीज?'
मग काउन्टरवर येऊन त्यानं तिला पैसे दिले.
"एक कॉफी."
ती म्हणाली, "आप बैठिये, मैं लाती हूं!"
तो मागे वळून कुठल्या बाकावर बसावं याचा विचार करत असतानाच त्याची पावलं अचानकपणे तो माणूस जिथे बसला होता त्या टेबलाकडे वळाली. तो जसा टेबलाच्या जवळ आला तसा त्या माणसानं त्याला हातानंच समोर बसायची खूण केली. खुर्ची मागे ओढून त्याच्या समोर तो बसला. काय बोलावं आणि काय विचारावं याविषयी तो विचार करत होता. पण त्याला काही सुचलं नाही.
"काय विचारायचे ते विचार," तो वृद्ध त्याला म्हणाला.
"काय विचारू?"
"काहीही विचारा."
"तुमचा जन्म कुठला?"
"हा काय प्रश्न झाला काय!"
तो काहीच बोलला नाही.
"अलाहाबादचा."
"इतक्या लांब?"
"आईचे आईवडील तिकडे पोस्टात होते. त्यामुळे पहिलं बाळंतपण तिकडंच झालं. आणि माझा जन्मही."
"तुमचं पाळण्यातलं नाव काय?"
"म्हणजे काय?"
"म्हणजे पाळण्यात ठेवलं तेव्हा वेगळं नाव असतं आणि हाक मारायचं नाव वेगळं असतं."
"काही माहीत नाही. आईला विचारायला हवं."
"सगळं आईलाच काय विचारता?"
"मग कोणाला विचारणार?"
"मला तर काय आठवत नाही. तुमचे प्रश्न असे आहेत की, त्यांची उत्तरं फक्त माझी आईच देऊ शकते. दुसरं कुणी नाही."
"तुमची आई कुठे असते?"
"आता आई नाही."
"म्हणजे काय?"
"दोन वर्षांपूर्वी ती आजारी पडली होती. त्यातच ती वारली."
"मग तिला कसं विचारणार तुम्ही?"
"ती जरी नसली तरीही मी तिच्याशी बोलू शकतो. आणि मी विचारलेल्या प्रश्नांना ती उत्तरं देते."
तो बराच वेळ शांत बसला. त्यानं काही प्रश्न विचारला नाही आणि हा पाहत राहिला.
"कॉफी घ्या, थंड होईल."
तो एकदम भानावर आला आणि कॉफी प्यायला लागला.
थंड झाली होती.

कॉफी पीत पीत तो कुतूहलानं पांढऱ्या केसाच्या त्या माणसाकडे बघत होता. रात्रीचं त्याला काही आठवलं नाही. पण निश्चितपणे याच माणसानं आपल्याला इकडे आणलं असावं, अशी त्याची खात्री झाली. कोण आहे हा, याचं नाव काय.

हा असा अंधाऱ्या रात्री कसा भेटला; ते पान आपल्यासमोर नेमकं कसं पुढे चालत गेलं; असा विचार करत राहिला. कॉफी पिता पिता त्यानं विचारले. "तुमचं नाव काय?"
"मला नाव नाही."
"असं कसं शक्य आहे."
"गेल्या कित्येक दिवसांत माझा कोणाशी संबंध नाही. मला कोणी हाकपण मारली नाही. मी माझं नावच विसरून गेलो आहे."
"ठीक आहे. कुठले राहणारे तुम्ही? गावाचं नाव तरी आठवतंय का?"
"नाही. मी बरेच दिवस प्रवास करत करत खूप दूरवर आलो आहे. हे कुठलं गाव आहे माहीत नाही."
"मला तरी कुठे माहिती आहे. इथे कोणी माणसंही दिसत नाहीत. वाहनंपण फिरताना दिसत नाहीत. तुम्हीच मला घेऊन आलात ना इथे?"
"मी कशाला आणू! मी कोणाला बरोबर घेत नाही. कोणाच्या मागे जात नाही. तूच माझ्या मागेमागे चालत आला असशील."
"मला तर काहीच आठवत नाही. मी त्या झऱ्याच्या जवळ बसलो होतो. बसल्या बसल्या डोळा लागला. सकाळी उठलो. बाकावर जाग आली."
"मला काय माहिती तू कुठे बसला होतास! कुठे झोपला होतास आणि कुठे उठलास!"
तो परत गप्प झाला. त्याच्या नेमकं लक्षात येईना, की आपण इथे कसं आलो. मगातली कॉफी संपली होती. ती त्यानं समोर ठेवून दिली आणि तो उठून उभा राहिला.
"खाली बस. तुला अजून बरंच काही विचारायचं आहे."
उठलेला तो परत खालीच बसला.

समोरच्या माणसाविषयी त्याच्या मनात एकदम भीती दाटून आली. म्हणजे हा कोण आहे, तो आपल्या मेलेल्या आईबरोबर बोलू शकतो? त्याच्या मनात शब्दांचं काहूर माजलं. पण त्याला काही विचारावं असं मात्र त्याला वाटलं नाही. आणखी प्रश्न विचारून त्याची माहिती करून घ्यावी असं काही त्याला वाटलं नाही. परत उठावं असं मनात आलं, पण त्यांची नजर आपल्यावरच खिळली आहे हे त्याला जाणवलं. ती नजर चुकवण्यासाठी त्यानं बाहेर बघितलं. ऊन कडक होण्याऐवजी काहीसा अंधार दाटून आल्याचं त्याला दिसलं. बगीच्या वरच्या आकाशाकडे त्यानं बघितलं. तर सगळीकडे काळे ढग जमायला लागलेले . ढगांच्या लाटा समोरून त्या रेस्टॉरन्टकडे वेगानं येतायत असं त्याला वाटलं. बघता बघता समोरचा बगीचासुद्धा हळूहळू दाट ढगांत नाहीसा होत गेलेला त्याला दिसला. पटकन त्याला हातातल्या बॅगेची आठवण झाली. ती कुठे ठेवली होती. उठलो तेव्हा बाकावर होती. आतमध्ये येताना ती आत आणली की नाही, हेही काही त्याला आठवलं नाही. त्यानं आजूबाजूला बघितलं. तर त्याला काहीच दिसलं नाही. तो झटकन उठून बाहेर आला. काचेचा दरवाजा उघडताच प्रचंड वेगाने वारा आणि धूळ आत आली. तो तसाच धडपत बाकापर्यंत गेला. बाकावर कुठेही बॅग नव्हती. त्या बॅगेत टॉवेल, स्विमिंग कॉस्च्यूम, साबणाची वडी, डोक्यावरची कॅप, पाण्याखालचा गॉगल एवढ्या गोष्टी असल्याचं त्याला आठवलं. पण नेमकं आपण कशामुळे अस्वस्थ झालो आहोत, आपण काय शोधतोय, हे काही त्याच्या लक्षात आलं नाही.

पिंपळपान

त्या अंधारातही त्यानं बाकाखाली वाकून बघितलं. तिथेपण बॅग नव्हती. ती बॅग म्हणजे त्याचा पत्ता होता. या अज्ञात स्थळी, अनोळखी गावात कुठे आलो आहोत हे कळायला काहीच मार्ग नाही. त्या पांढऱ्या केसांच्या माणसाला विचारण्यात काही अर्थ नाही. त्याला स्वत:चं नावच लक्षात नव्हतं. जो दर दिवशी गाव बदलतो तो काय सांगू शकणार? वाऱ्याचा वेगही वाढला आहे. दोनचार मोठे थेंबही खाली पडतायत. मोठा पाऊस येईल असं दिसतंय. जवळ तर छत्री, रेनकोट काहीच नाही. म्हणून तो काचेचा दरवाजा ढकलून परत आत शिरला. लांब केसांचा माणूस हनुवटीवर हात ठेवून तसाच बसलेला होता. रिसेप्शनवर कॉफी घेणाऱ्या माणसाला विचारावं, म्हणून तो रिसेप्शनवर गेला. तर त्या माणसाचा पत्ताच नव्हता. कोणी दिसत नव्हतं. फक्त कुठेतरी बेसिनमधला नळ चालू असल्याचा आवाज येत होता. त्या दिशेला त्यानं पाहिले. तिथे एक स्त्री बेसिनमध्ये नळाच्या पाण्याखाली काहीतरी धूत होती. तिनं एप्रन घातला होता. त्याची गाठ खांद्यावर आणि कंबरेवर बांधली होती. तसंही त्या ढगाळलेला वातावरणातून झटक्यात आत आल्यामुळे त्याला दम लागला होता. त्यामुळे काही न बोलता तो रिसेप्शनच्या टेबलावर हात ठेवून त्या पाठमोऱ्या मुलीकडे बघत राहिला. बघता बघता ती प्रौढ स्त्री नसून वयात आलेली मुलगी आहे, हे तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून त्याच्या लक्षात आलं होतं. उभ्या उभ्या त्यानं परत एकदा त्या लांब केसाच्या माणसाकडे नजर टाकली. पण ज्या ठिकाणी तो बसलेला होता. ती जागा रिकामी होती. बाहेरचा काळोख वाढला होता. तो इतक्यात उठून कुठे गेला असेल, असा विचार करून तो बघत होता. बाहेर कुठे तो दिसतो का? पण बाहेरचा काळोख इतका वाढला होता की आतला मंद दिवासुद्धा प्रखर वाटायला लागला. तो माणूस दाराचा आवाजही न करता कसा नाहीसा झाला की, तो अजूनही आतमध्येच कुठे आहे! पण त्या छोट्या रेस्टॉरन्टला रिसेप्शनला मागचा दरवाजा सोडला तर दुसरा कुठलाही दरवाजा दिसला नाही. आत येण्यासाठी काचेचा दरवाजा तेवढा एकच दरवाजा आत यायला आणि बाहेर जायला. इतक्या काळोखात पावसाळी वातावरणात तो कुठे गेला. कळायला काही मार्ग नाही. त्याला तिकडे सोडून तो परत बेसिनच्या दिशेने बघू लागला. नळाचा आवाज बंद झालेला. पण एप्रन घातलेली पाठमोरी मुलगी कुठेच दिसली नाही. बेसिनमधलं काम संपल्यानंतर, मागे वळल्यावर आपण उभे आहोत हे तिला दिसलं असणारच. मात्र काहीही न बोलता ती मागचा दरवाजा उघडून आतमध्ये गेली असावी. पण आतून काहीही आवाज येत नाही. एकाएकी निस्तब्ध शांतता त्या रेस्टॉरन्टमध्ये निर्माण झाली. त्याला अस्वस्थ वाटायला लागलं आणि भीतीची लहर सर्रकन त्याच्या अंगातून निघाली. पिंजाऱ्यात अडकलेल्या एखाद्या जनावरासारखा रेस्टॉरन्टच्या भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे तो सैरभैर होऊन बघायला लागला.

काही वेळ गेल्यानंतर त्याचे डोळे आतल्या अंधाराला सरावले. तो त्या किलकिल्या दरवाजातून आत बघायला लागला. आतला मंद दिवा चालू असल्याचं त्याला दिसलं. तो त्या रिसेप्शनच्या टेबलातून आतमध्ये जाण्याचा रस्ता कुठे आहे शोधत चारी बाजूंनी बघायला लागला. त्याच्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यातली एक फळी उचलता येत असावी, असं वाटून त्यानं तो भाग वर उचलण्याचा प्रयत्न केला; तर तो भाग आरामात उचलून रिसेप्शनच्या आतल्या बाजूला जाणारा रस्ता तयार झाल्याचं बघून तो चटकन आत घुसला. त्यानं सोडताच त्याच्या हातातली ती फळी धपकन खाली पडली. त्या आवाजानं तो थोडा दचकला पण तसाच पुढे दारापर्यंत गेला. दार उघडून तो मागच्या खोलीत प्रवेश करता झाला. खोलीत अंधार होता. त्याही अंधारात त्याला ती मगाचची मुलगी वाकून काहीतरी उचलतेय असं वाटलं. पण ती सरळ झाल्यावर तिच्या हातातला कपडा तिनं अंगावर चढवला. तिनं वरचा कोट तसाच ठेवून स्कर्टच्या जागी पांढरा पायजमा चढवला. त्याला बघताच तिनं मंद स्मित केलं. त्याची जणू ती वाटच बघत होती. तो आत येऊन बाजूला असलेल्या टेबलाला टेकून उभा राहिला. बऱ्याच दिवसांत त्या टेबलाला कुणाचा हात लागलेला नसावा. कारण हात ठेवताच हाताला खूप धूळ लागल्याची त्याला जाणीव झाली.

त्यानं हात झटकला. ती त्याच्याकडे चालत आली. तिनं फक्त त्याला मागे येण्याची खूण केली. काही न बोलता तो तिच्या मागून चालत राहिला. त्या अडगळीच्या दुसऱ्या टोकाला त्याला घेऊन गेली. तिथून बाहेर पडायला मार्ग असेल असं त्याला वाटलं. पण तिकडे पूर्ण भिंतच होती. भिंतीला लागून काही शेल्फ उभे केलेले होते. त्या भिंतीला कुठेही दरवाजा दिसला नाही. ती एका शेल्फच्या पुढे येऊन उभी राहिली. त्याला काही कळायच्या आतच तिनं ते शेल्फ सहजपणे बाजूला केलं. शेल्फच्या जागेवर त्याला जमिनीत जाणारा जिना असल्याचं दिसलं. पहिली पायरी सोडली तर खालचा जिना काहीच दिसत नव्हतं. तिनं कुठून तरी एक मोठी मेणबत्ती हातात धरली. आणि खालच्या पायऱ्या स्पष्टपणे दिसायला लागल्या. तो आपल्या मागे येतोय हे तिनं एकदा बघून घेतलं, आणि हळूहळू पायऱ्या उतरू लागली. सुरुवातीला हवेत एक प्रकारचा दमटपणा आहे, असं त्याला वाटलं. पण आजूबाजूच्या भिंती नुकत्याच रंग दिलेल्या होत्या; त्यांवर रंगाच्या नवेपणाची झलक दिसत होती. थोडं खाली गेल्यानंतर पायऱ्या संपल्या. ती किंचित थांबली. तसा तोपण पुढे न जाता तिच्या मागे पायरीवर उभा राहिला. तिनं कोटाच्या खिशातून किल्ली काढली. त्याचा किंचित आवाजही झाला. त्यावरून तिनं खिशातून किल्ल्या काढल्या, असा अंदाज त्यानं केला. किल्ली फिरवून तिनं दार उघडताच लख्ख प्रकाश आत आला. त्या उजेडाची प्रखरता इतकी होती की त्यानं क्षणभर डोळे मिटून घेतले. ती पुढे गेल्यावर लगेच तो तिच्या मागून आत गेला. मोठी खोली असल्याचं त्याला जाणवलं. तो थोडा पुढे आल्यावर ती परत त्या जिन्याच्या दाराकडे वळली. दरवाजा बंद करून तिनं हातातली किल्ली दरवाजाच्या कुलपात घालून एकदा डावीकडे, दोनदा उजवीकडे फिरवली. दरवाजा बंद झाल्याची तिनं खात्री करून घेतली. आणि ती वळल्यावर त्यानं झटकन बाजूला होऊन तिला पुढे जाण्यासाठी वाट करून दिली. त्या खोलीतून पुढच्या दालनात येताच त्याच्या कानांवर पियानोचे सूर पडले. पुढच्या खोलीतल्या लोकांच्या हसण्याचा आवाजही कानावर पडला. आता भरपूर उजेड असल्यामुळे समोर चालणारी मुलगी त्याला स्पष्ट दिसली. पण यापूर्वी कधी तिला बघितल्याचं मात्र त्याला आठवलं नाही. ही अनोळखी मुलगी या अपरिचित तळघरात आपल्याला कुठे घेऊन चालली आहे, म्हणून त्यानं आजूबाजूला बघितलं. सगळीकडे निरनिराळ्या रंगांचे दिवे लावलेले होते, आणि पुढच्या दालनामध्ये आणखी प्रखर प्रकाश असावा असं त्याला दाराकडे बघून वाटलं. तो आजूबाजूला बघत असताना ती त्याच्यापुढे मोठ्या दालनात गेलेली होती.

चुकामूक होऊ नये म्हणून तो दार उघडून चटकन हॉलमध्ये शिरला. एकदम एक वेगळाच भपकारा त्याच्या नाकात शिरला. नेहमीचं सेंट किंवा अत्तर नसून हा वेगळाच गंध अवतीभोवती पसरला आहे. त्यानं हॉलवरून नजर फिरवली. छोट्या मोठ्या वर्तुळाकार टेबलावर अनेक जण बसून हास्यविनोद करत होते. प्रत्येक टेबलावर खाण्याचे पदार्थ, पेयांसाठी पेले ठेवलेले होते. आखूड आणि तंग कपडे घातलेल्या मुली लगबगीनं इकडून तिकडे फिरत होत्या. त्यांच्या हातांतल्या तबकांमध्ये पेयांचे ग्लास आणि खाण्याचे पदार्थ. त्या सगळ्यांना आग्रहानं देण्याचा प्रयत्न करत इकडून तिकडे बागडत होत्या. मध्यभागी असलेलं टेबल इतर टेबलांपेक्षा मोठं होतं. त्याभोवती दहा-बारा पुरुष आणि स्त्रिया बसून मोठमोठ्यानं एकमेकांशी काहीतरी बोलत होत्या. त्या हॉलमध्ये खूप कोलाहल होता. घोंगावणाऱ्या आवाजात आणि कोपऱ्यातल्या पियानोच्या लयबद्ध संगीतामुळे कोण, काय बोलताहेत हे शेजारी बसलेल्या माणसालासुद्धा ऐकून समजत नव्हतं. हे निरीक्षण चालू असतानाच आपल्याला ज्या मुलीनं इकडे आणलं तिचा मागोवा घेत तिच्या मागूनमागून तो त्या हॉलमधल्या घोळक्यातून पुढेपुढे सरकत होता. तिची चुकामूक झाली तर नेमकं काय करायचं हे त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे तो तिची पाठ सोडत नव्हता. थोडं अंतर ठेवून तिच्या मागेमागे तो जात राहिला. ती ज्या दरवाज्यानं आत आली त्याच सरळ रेषेत चालत राहिली. समोर दुसरा दरवाजा आल्यावर तो उघडून ती आत शिरली. ती आत शिरली तसा तोही आत शिरला. दरवाजा आपोआप बंद झाला. दरवाजा बंद होताच त्या हॉलमध्ये संगीत, त्या हॉलमधला कोलाहल, सगळंच एकदम बंद होऊन एक नीरव शांतता अवतीभोवती निर्माण झाली. त्या हॉलमधून बाहेर पडताच समोर एक खूप मोठा लांबच लांब बोगद्यासारखा कॉरिडॉर होता. पहिला जिना उतरताना जसा कोंदट आणि कुबट उग्र दर्प जाणवला, तसाच काहीसा उग्र दर्प त्या कॉरिडॉरमधून चालताना त्याला जाणवत राहिला. उजव्या बाजूला फोटो फ्रेम टांगण्यासाठी तयार केलेले महिरप चौकोन एकामागून एक दिसत होते. त्याचबरोबर डाव्या हाताला पुस्तकांची मोठमोठी कपाटं रांगेत मांडून ठेवलेली होती. दिवेसुद्धा फार झगमगाटी नव्हते. नेहमीसारखा उजेड त्या कॉरिडॉरमध्ये पसरलेला होता. कॉरिडॉरच्या दरवाजावर हात ठेवून अर्ध्या उघड्या दारातून तो चटकन आत शिरला. कॉरिडॉरमधून आणखी एका मोठ्या दालनात आपण प्रवेश करत आहोत हे त्याच्या लक्षात आलं. पण आधीच्या हॉलमध्ये जसा गोंगाट, हास्यविनोदाचे फवारे उडत होते. तसा प्रकार इकडे दिसला नाही. उजेडसुद्धा फार प्रखर नव्हता. तरीदेखील डाव्या बाजूच्या कोपऱ्यावर एक मोठं व्यासपीठ दिसत होतं. त्या व्यासपीठावर पाच-सहा माणसं बसलेली होती, आणि त्याचीच वाट पाहत असावी, असं त्याला वाटून गेलं. व्यासपीठाच्या समोरच्या खुर्च्यांवर अनेक स्त्री-पुरुष बसलेले होते. त्यांच्या हातांत काही कागदपत्रं दिसत होती. तो पुढे गेल्यानंतर स्टेजच्या जवळ्या रांगेतून एकजण उभी राहिली. तिनं कागदांचा एक गठ्ठा त्याच्यासमोर चालणाऱ्या मुलीच्या हाती दिला. रांगेतल्या एका मोकळ्या खुर्चीवर बसायची त्याला खूण केली. तो ते कागद हातात घेऊन रिकाम्या जागेवर बसला ते पाहून त्याला नमस्कार करून ती मुलगी मागे वळली आणि तरातरा निघून गेली.

---

पिंपळपान

तो आजूबाजूला बघत खाली बसला. समोर स्टेजवर मागच्या बाजूला एक मोठा पडदा होता. त्यावर काही हलकीफुलकी दृश्यं दिसत होती आणि मंद संगीतही चालू होतं. स्टेजवर खुर्च्या मांडलेल्या होत्या पण त्यांवर कोणी बसलेलं नव्हते. डाव्या कोपऱ्यात एक पोडियम होते. त्यावर माईक हातात घेऊन एक तरुण उभा होता आणि तो पडद्यावरील दृश्यांकडे बघत होता. त्यानं काहीही कॉमेंट्री करण्याचं टाळलं होतं. पडद्यावर उजव्या हाताला एक साधूपुरुष बसलेला होता. त्याच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. हातामध्ये चाफ्याच्या फुलांच्या गजरा होता. मानेवर लांब रुळणारे पांढरे शुभ्र केस. समोरच्या सोफ्यावर एक स्त्री हात जोडून आदबीनं बसली होती. ती मधूनमधून हात पुढेमागे करून त्यांना काही प्रश्न विचारत असावी. ती नेमकं काय विचारत आहे, हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. हॉलमध्ये शांतता असली तरी नेमकं कळत नव्हते. शब्द मध्येच हवेत विरत होते. कदाचित तो अचानक आत आल्यामुळे आणि मागचा संदर्भ माहीत नसल्यामुळे नेमकं काय चाललं आहे, याचं आकलन त्याला होत नसावं.

त्याची नजर परत एकदा समोर बसलेल्या साधूच्या प्रतिमेकडे गेली. त्याच्या मानेवर रुळणारे केस त्यानं ज्या पद्धतीनं मागे झटकले त्यावरून त्याला एकदम धक्का बसला. काल रात्री अंधारात रस्त्याच्या काठी बसलेला आणि सकाळी रेस्टॉरेंटमध्ये बसून कॉफी पिणारा तोच तर हा नव्हे असा प्रश्न त्याला पडला. समोर बसलेल्या माणसानं स्वच्छ रेशमी कपडे परिधान केले होते. थोड्या वेळापूर्वी त्याच्या समोरून नाहीसा झालेला माणूस अजागळ, अस्ताव्यस्त होता. तरीही चेहऱ्यांत भरपूर साम्य असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे किंचित दचकून तो आजूबाजूला बघायला लागला. हातात दिलेले कागद वाचण्यात आणि समोरच्या पडद्यावरचा साधू काय बोलतोय हे ऐकण्यात लोक मग्न झालेले दिसत होते. म्हणजे हे तळघर, ते रेस्टॉरन्ट, ती वस्ती याच माणसाची आहे की काय! झऱ्याकाठी बसलेला असताना या माणसांनी भूल घालून तर इथे आणलं नाही ना, असा प्रश्न त्याला पडला. हा माणूस आपल्याला इकडे कशाला घेऊन येईल. आपणच झोपेत चालत या वस्तीत आलोय असं तो स्वत:ची समजूत घालत बसला आणि समोरचा माणूस काय बोलतोय हे कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करायला लागला. काहीच नीट ऐकायला येत नसल्यामुळे तो थोडा वैतागला आणि त्या उजेडात कागदांवर काय लिहिलं आहे हेसुद्धा धड वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यानं हातातले कागद खाली ठेवून डोळे मिटून घेतले.

थोड्या वेळानं ग्लानी गेल्यानंतर कोणीतरी आपल्याला मागून खांद्यावर हलकेच बोटांनी हलवत आहे, असा त्याला भास झाला आणि त्यानं डोळे उघडले. तो समोरचा माणूस तावातावानं काहीतरी बोलत होता. त्याचं भाषण अजूनही संपलेलं नव्हतं. परत एकदा मागून बोटानं टोचल्यासारखं वाटल्यामुळे त्यानं मागे वळून बघितलं. तर एक बाई त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असल्याचं त्याला जाणवले. त्यानं एक स्मित जरी दिलं, तरी 'या कोण' हा प्रश्न त्याला पडला. खूप आठवायचा प्रयत्न करूनही आपण यांना कुठे बघितलं आहे, किंवा यांना कसं ओळखतो हे मात्र त्याला काही केल्या आठवत नव्हतं. मागे वळून बोलणंसुद्धा अवघडच असल्यामुळे तो परत समोर बघून स्टेजवरचा माणूस काय बोलतोय हे ऐकण्याचा प्रयत्न करत होता. पण हॉलमध्ये इतका प्रचंड कोलाहल होता की, समोरचा माणूस काय बोलतोय हे त्याला धड ऐकू येत नव्हतं. तिकडून उठावं आणि चालू लागावं असं त्याला वाटत होतं. पण आजूबाजूचे सर्व लोक बसलेले होते. कोणीही मधून उठताना दिसत नव्हतं. त्यामुळे तो तसाच बसून राहिला. आपली जिमची बॅग आपल्याजवळ नाही, ती नेमकी कुठे आहे. हे त्याला काही आठवेना. त्या रेस्टॉरंटमध्ये कॉफी प्यायलो तेव्हा तिथेच विसरलो की, रेस्टॉरंटच्या बाहेरच्या बाकाखाली तशीच विसरून आलो हे त्याच्या लक्षात आलं नाही. आपण ती बॅग घ्यायला जायला पाहिजे असं वाटून तो उभा राहिला आणि आपल्या रांगेतून हळूहळू भिंतीच्या कडेला जाऊन उभा राहिला. नेमकं कुठं जावं. हे त्याला काही सुचत नव्हतं. तेवढ्यात ती रेस्टॉरंटमधली मुलगी आपल्याच दिशेला चालत येत आहे, हे त्याला दिसलं.

ती त्याला म्हणाली, "हे काय, आपण मध्येच कशाला उठलात?"
"माझं महत्त्वाचं काम आहे आणि मला गेलं पाहिजे. बाहेर पडायचा रस्ता कुठे आहे?"
"इथून बाहेर पडायचा एकच रस्ता आहे. पण सरांची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही."
"कोणते सर?"
त्याचा प्रश्न ऐकून ती त्याच्याकडे बघत राहिली. "ते काय समोर बोलताय ते सर. त्यांनीच तुम्हाला इकडे आणलं ना?"
त्याला आठवेना यांना आपण कुठे पाहिलंय. नंतर हळूहळू त्याच्या लक्षात आलं की, रात्री आपल्याला दाढीवाला माणूस भेटला होता. तो आणि स्टेजवर बोलणारा एकच आहे.

काय करावं त्याला समजेना. त्याची परवानगी तरी कशी काढणार; ते तर समोर स्टेजवर भाषण देत आहेत आणि त्या हॉलला इतके दरवाजे होते की कुठून बाहेर पडावं हे समजण्यासारखं नाही. ती मुलगी त्याला बाहेर जाण्यासाठी मदत करू शकली असती पण सरांच्या परवानगीशिवाय ती काही हालचाल करणार नव्हती. त्यामुळे तो इकडेतिकडे बघत बाजूच्याच एका रिकाम्या खुर्चीवर बसला. परत मागे जाऊन बसलेल्या पाच-दहा लोकांना ओलांडून आपल्या खुर्चीपर्यंत जाणं त्याला योग्य वाटलं नाही. तो खाली बसलेला बघून ती मुलगी लगबगीनं कुठेतरी निघून गेली. बसल्यावर स्टेजवरचा माणूस काय बोलतोय हे ऐकण्याचा त्यानं प्रयत्न केला. पण मगाचचा कोलाहल आणखी वाढला होता. तो शांतपणे बसून समोर बोलणाऱ्या माणसाचे हावभाव आणि हातवारे बघत बसला. त्यानं आजूबाजूला एक नजर टाकली. त्याच्यासारखेच बरेच स्त्री-पुरुष बसलेले होते. आणि एकाग्रपणे समोरच्या स्टेजवर बोलणाऱ्या माणसाचे शब्द कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होते. काही अधूनमधून एकमेकांशी बोलतही होते. मधूनच आपसांतलं बोलणं बंद करून समोरच्या माणसाचं बोलणं ऐकतोय, असं किमान दाखवत तरी होते. तो आजूबाजूला बघून कंटाळला. डोळ्यांवर झोप येतेय, असंही त्याला क्षणभर वाटून गेलं. पण अशा अनोळखी ठिकाणी इतक्या लोकांमध्ये बसल्यावर जड झालेल्या पापण्या उघड्या ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात रांगेच्या दुसऱ्या टोकाकडून, हातात ट्रे घेऊन कुणी त्याच्या बाजूला यायला लागलं. तबकातला काचेचा ग्लास काढून ती बसलेल्या प्रत्येकाच्या हातात देताना दिसत होती. त्या काचेच्या ग्लासमध्ये निरनिराळ्या रंगांची चमकणारी पेयं होती. ती बसलेल्या लोकांना देत होती. कुणाच्या हातात लाल, कुणाला हिरवे, कुणाला निळे, तर कुणाला चंदेरी रंगाची पेयं मिळत होती. पेयाचा ग्लास हातात धरून लोकं समोरच्या माणसांकडे बघत होती. परंतु कोणीही आपल्या हातातले ग्लास तोंडाला लावलेले नव्हते. काय असेल त्या पेल्यांमध्ये असा विचार तो करतोय तोपर्यंत ती मुलगी त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. आणि काही न बोलता तिनं आपल्या हातातला ग्लास त्याच्या हातात ठेवला. आणि पुढच्या माणसाकडे ती वळली आणि रांगेतून बाहेर पडून नाहीशी झाली. त्यानं आजूबाजूला बघत आपल्या हातातला पेला तसाच धरून ठेवला. पेल्याच्या आकाराच्या मानाने तो जास्तच जड वाटत होता. हिरव्या रंगाचं पेय आतल्या आत ढवळलं जातंय हे त्याला दिसत होतं. त्यातून गरम वाफाही बाहेर येताना दिसत होत्या. पण हातातला ग्लास मात्र एकदम गारेगार होतात. एकदा त्या पेल्यात बोट बुडवून बघावे आणि ते पेय गरम आहे की गार आहे याची खात्री करावी असं त्याच्या डोक्यात आलं. पण एका हातानं ग्लास धरलेला होता आणि दुसऱ्या हातात त्या मुलीने दिलेलं माहितीपत्रक होतं. त्यात बुडवण्यासाठी कुठलंच बोट रिकामं नव्हतं. बाकी सगळे पेय हातात घेऊन समोरच्या माणसाचं प्रवचन ऐकत होते. हा मात्र त्या पेयाच्या रंगात पूर्णपणे बुडला होता. ना धड हिरवा, ना पोपटी असा तो रंग कुठे तरी बघितला आहे असं वाटत असतानाच स्टेजवरचा माणसाचं भाषण संपलं. त्यानं दोन्ही हात वर करून सगळ्यांना अभिवादन केलं आणि त्या हॉलमध्ये आनंदाचा एकच जल्लोष झाला.

आजूबाजूच्या लोकांनी हातातला ग्लास ओठाला लावला. तो परत एकदा त्या पेल्यातल्या पेयाकडे बघून प्यावं का नाही असा विचार करायला लागला. पण त्या पेयाचा सुगंध त्याला जाणवला आणि त्यानं तो प्याला ओठांना लावला आणि हळूहळू ते पेय प्याला. आजूबाजूच्या लोकांनी रिकामी पेले हातात ठेवले. ते बघून त्यानंही आपला रिकामा पेला हातात धरला. पेय पोटात गेल्यानंतर त्याला एकदम थंड काहीतरी पोटात गेल्याचं जाणवलं. तेवढ्यात मगाचीच मुलगी रिकामा ट्रे घेऊन आली आणि सगळ्यांनी आपापले पेले ट्रेमध्ये ठेवलं आणि ती मुलगी चटकन नाहीशी झाली. लोकांकडून रिकामे ग्लास गोळा करण्यात आले. स्टेजवर भाषण देणारा माणूस खुर्चीवर जाऊन बसला. त्यालाही एका मुलीनं एक ग्लास आणून दिला. त्यात अनेक रंगांचं मिश्रण असलेलं पेय दिसत होतं, ते तो प्याला आणि उभा राहिला तोपर्यंत एक मधुर संगीत सर्व हॉलमध्ये घुमायला लागलं होते. आजूबाजूचे उभे असलेलं लोक हात वर करून स्टेजवरच्या माणसाला अभिवादन करत होते. इतक्या वेळ त्याच्यावर साठलेली मरगळ जाऊन तो एकदम उल्हसित झाला. त्यानंही हात वर करून त्या दाढीवाल्या माणसाला अभिवादन केलं. आणि सगळे लोक त्या संगीताच्या तालावर डोळे बंद करून डोलायला लागले. त्यानंही डोळे बंद केलं आणि एकाएकी त्याला आपण हलके झाल्याचा भास झाला. तो पण त्या तालावर डोलायला लागला. आपण कुठून आलो, काय करतोय, आपल्याला बाहेर पडायचं होतं त्याचं काय झालं, हे सगळे विचार मनातून जाऊन तो त्या संगीतात पूर्णपणे दंग झाला. आपण घेतलेल्या पेयाचा तर हा परिणाम नाही ना. अशी एक शंका त्याच्या मनात आली. पण ती त्यानं पालीसारखी झटकून टाकली, आणि त्या संगीताच्या तालावर हलकेहलके पुढची पावलं पडू लागली. उचललं पाऊल परत जमिनीवर ठेवलं तरी ठेवलं जात नाही, आपण हवेतच तरंगतोय असा भास त्याला झाला. रांगेत उभ्या असलेल्या सगळ्यांनी आपल्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तींचा हात हातात घेऊन, संगीताच्या तालावर पुढेमागे करायला सुरुवात केली. त्याचेही हात त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तींनी हातात घेऊन ते पुढेमागे हलवायला सुरुवात केली. आपल्या शेजारी नेमकं कोण उभं होतं ते आठवत नव्हते, आणि डोळे उघडे करून ते कोण आहेत, हे बघावं असंही त्याला वाटलं नाही. डाव्या हाताला कोणीतरी राकट माणूस असावा असं त्याला वाटलं. उजवा हात ज्याने धरला आहे तो हळूवारपणे धरलेला आहे, म्हणजे ती बहुधा स्त्री असावी असा अंदाज काही क्षण मनात येऊन गेला. पण डोळे न उघडता संगीताच्या तालावर आणि सोबतच्या लोकांबरोबर काही वेळ तो तसाच डोलत राहिला. एक विलक्षण आनंदाची लहर त्याच्या सर्वांगातून चमकून गेली. असा अनुभव त्याला कधी आल्याचे आठवत नव्हते. संगीताची लय जशी हळूहळू वाढत गेली तशीच ती हळूहळू कमी होत गेली. पण ते लक्षातही आलं नाही. त्याच्यासकट हॉलमधले सर्वजण पहिल्याच उत्साहानं नाचत राहिले. हळूहळू मंद होत गेलेलं संगीत जेव्हा पूर्णपणे थांबलं. त्यावेळी आपोआप सगळे डोलायचे थांबले आणि एकमेकांचे धरलेले हात पण कसे आपोआप सुटले तेही ध्यानात आलं नाही. डोळे बंदच होते. ते हळूहळू उघडले. हॉलमधला उजेडही मंद झाला. त्याची नजर समोर स्टेजवर गेली तर स्टेजवर भाषण करणारा माणूस तिथून निघून गेल्याचं त्याच्या लक्षात आलं.

हळूहळू मंद झालेले दिवे परत एकदा प्रकाशमान झाले, आणि परत एकदा हॉल लख्ख प्रकाशात उजळून गेला. त्यानं आजूबाजूला पहिलं . त्याच्या आजूबाजूला काही जण आपसांत बोलत, निघण्याच्या तयारीत दिसले. त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून तो एकदम दचकला. त्यांचे चेहरे वेगवेगळ्या रंगाच्या छटा धारण केल्यासारखे दिसत होते. त्यानं दचकून स्वत:चे हात समोर करून बघितले. पण चेहरा काही बघता आला नाही. त्यांच्यासारखा आपला चेहराही रंगीत झालाय असं वाटून त्याच्या अंगातून भीतीची एक लहर गेली. बघता बघता त्या हॉलमधले लोक बाहेर निघून जात होते. पण कुठेही एका ठिकाणी थांबून राहिल्याचे दिसत नव्हते. हॉलबाहेरच दारं असावीत आणि त्यांतून लोक बाहेर पडत असावेत असं त्याला जाणवलं. लोकं जात असताना आपण कुठल्या बाजूला जावं, याचा विचार करत तो थिजून एकाच जागी उभा होता आणि आजूबाजूचे लोक सरकताना दिसत होते. तेवढ्यात ती मगाचची मुलगी लगबगीनं त्याच्याकडे येताना दिसत होती. जवळ आल्यावर तिनं नजरेनंच 'चला' असं खुणावलं आणि तो तिच्या मागून चालायला लागला. ज्या दारानं तो आत आला होता त्याच दारानं बाहेर पडला. तीच दालनं मागे टाकत तो शेवटच्या खोलीत पोहोचला. खोलीला दुसरा दरवाजा दिसत नव्हता. ती मुलगी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. तिनं नेमकं काय केलं ते कळलं नाही, पण तिच्या मागे भिंतीमध्ये एक दरवाजा उघडलेला दिसला. तिनं त्याच्याकडे बघून मागून येण्याची खूण केली आणि तो त्या दरवाजाने आत शिरला. इथे फक्त दोन माणसांना उभं राहता येईल एवढीच जागा होती. तो आज शिरला, दरवाजा आपोआप बंद झाला आणि मंद प्रकाशात त्याला समोर पायऱ्या वरच्या बाजूला जाताना दिसल्या. दरवाजा बंद होताच ती एकएक पायरी चढू लागली, आणि तिच्या मागोमाग भिंतीचा आधार घेत तोही सावकाश एकएक पायरी चढायला लागला. जिना खूपच अरुंद आणि उंचीला कमी असल्यामुळे किंचित वाकूनच त्याला वर चढायला लागत होतं. डाव्या हाताला आधारासाठी एक लाकडी कठडा खालून वरपर्यंत गेलेला होता. त्याचा आधार घेत घेत तो तिच्यामागून वर चढत होता. पंधरा-वीस पायऱ्या झाल्यानंतर ती अचानक थांबली. तो पण तिच्यामागे थांबला. आधाराचा दांडा त्यानं हातात धरून ठेवला होता. अंधार असल्यामुळे सवय होऊनसुद्धा काही दिसत नव्हतं. तिनं परत काय केलं समजलं नाही. पण तिच्यासमोर भिंतीमधून पलीकडे जाण्यासाठी एक दरवाजा उघडल्याचं त्याला दिसायला लागलं. तोच गार वाऱ्याची मंद झुळूक त्याच्या अंगाला स्पर्श करून गेली. तिच्यामागोमाग वाकून तो आत आला. आतली खोली बरीच उजळलेली होती. परंतु एकदम अंधारातून प्रकाशात प्रवेश केल्यामुळे त्या उजेडाला डोळे सरावण्यासाठी थोडा वेळ गेला.

खोली लहानच होती. पण सजवलेली होती. एका बाजूला बसायला कोच होते. समोर एक काचेचा टीपॉय होता आणि त्याच्या खाली बरेच रंगीबेरंगी दगड बांधून ठेवलेले होते. डाव्या बाजूला एक छोटंसं, टीपॉयच्या उंचीचं टेबल होतं. खुर्ची होती. बाजूला भिंतीला लागून असलेल्या शेल्फवर काही व्यक्तींचे मुखवटे रांगेत मांडून ठेवलेले. त्यांवर खास उजेड पडेल अशा पद्धतीनं दिवे लावलेले. त्यामुळे त्या खोलीत शिरताक्षणी ते मुखवटे डोळ्यांत भरत होते, आणि त्यानंतर खाली बसलेल्या व्यक्तीकडे नजर जात होती. तो भाषण देणारा माणूस तिथे खुर्चीवर बसलेला. त्यानं डोळे मिटलेले. हात मांडीवर ठेवून ताठ कण्यानं खुर्चीला न टेकता तो बसलेला होता. तिनं मागे वळून त्याला समोरच्या टेबलावर बसण्याची विनंती केली. स्वत: खुर्चीच्या बाजूला जाऊन डाव्या हाताला उभी राहिली. कोचावर बसून तो समोरच्या माणसाकडे टक लावून बघत बसला. हा तोच माणूस का जो काल रात्री आपल्याला रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला, रेस्टॉरंटमध्ये बसून कॉफी पिताना प्रश्न विचारणारा, खालच्या हॉलमध्ये भाषण देणारा? मग हा जर तोच असेल याच्या चेहऱ्यात इतके बदल होताना कसे दिसतात? रात्री तो खूप वृद्ध वाटला. कॉफी पिताना कमी वयाचा वाटला. आणि भाषण देताना तर एखाद्या तरुणाला लाजवेल अशा जोषात बोलत होता आणि आता हा शांतपणे समोर बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता आणि आनंद जाणवतोय. चेहऱ्याचा रंगही कापडी कागदासारखा नसून सगळ्याच रंगांचं मिश्रण करून चेहरा वेगळ्याच प्रकारे चकाकताना दिसतोय. अगदी शेल्फवर ठेवलेल्या मुखवट्यांसारखा. फक्त मुखवटे निर्जीव आहेत. डोळे बंद असूनही याच्या चेहऱ्यातून जीवन ओसंडून वाहत आहे. आता डोळे उघडेल, मग डोळे उघडेल अशी वाट बघत तो काही काळ त्याच्या चेहऱ्याकडे आणि काही काळ त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या मुलीकडे बघत राहिला. किती वेळ गेला याचं भानही त्याला राहिलं नाही. त्याच्या मागच्या भिंतीत आरसा जरी नव्हता तरी तिथल्या चकचकीतपणामुळे समोरच्या बाजूचं प्रतिबिंब पडलेलं दिसत होतं. एका कोनातून स्वत:चं प्रतिबिंबही दिसतंय असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्याचा चेहरा सोडून त्याच्या मागच्या भिंतीवरचं आपलंच प्रतिबिंब बघण्यात तो गढून गेला.

आपला चेहरा त्या प्रतिबिंबात थोडा हिरवट दिसतोय, असं त्याला वाटलं आणि दचकून त्यानं आपले हात वर करून जवळून न्याहाळले. तर ते नेहमीसारखेच दिसत होते. पण स्वत:चा चेहरा मात्र जवळपास कुठेही आरसा नसल्यामुळे बघणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो आणखीनच अस्वस्थ झाला आणि समोरच्या भिंतीवरचं स्वत:चं प्रतिबिंब परत एकदा निरखून बघायला लागला. पण एक तर चेहराही व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामुळे कोणता रंग कुठे आहे हे पण नेमकं, स्पष्टपणे दिसत नव्हतं. ती अंधुक, अस्पष्ट प्रतिमा एकटक पाहिल्यामुळे त्याच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं. त्याला नेमकं काय झालं हे समोर उभ्या असलेल्या मुलीला काही समजलं नाही. ती उठून त्याच्याजवळ उभी राहिली.
"काय झालं?" तिनं त्याच्याकडे बघत विचारलं.
ती शेजारी येऊन उभी राहीपर्यंत ती आपल्याजवळ आली आहे हेसुद्धा त्याच्या लक्षात आलं नव्हतं. तो एकदम दचकून भानावर आला आणि तिचा प्रश्न समजून म्हणाला, "कुठे काय, काही नाही". त्यानं मनगटानं दोन्ही डोळे पुसले.
तिचा चेहरा निर्विकार होता आणि डोळे गारगोट्यांसारखे थंड. तिच्या गळ्यात एक पदक लटकत होतं आणि त्यात त्याला चेहरा स्पष्ट दिसला. त्याचा चेहरा या प्रतिबिंबात पूर्णपणे पोपटी-हिरवा झाल्याचं त्याला दिसून आलं. ती काय बोलतेय ह्याकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. आपल्या चेहऱ्याला हात लावून तो हिरवा झाल्याचं त्या प्रतिबिंबात बघत बसला. ती त्याला काही विचारण्याचा प्रयत्न करत होती. पण तो आपल्याच विचारात गर्क आहे, आणि आपण काय म्हणतोय याच्याकडे त्याचं काहीच लक्ष नाही हे तिच्या लक्षात आलं.

पिंपळपान

तिनं खाली वाकून त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि किंचित हलवल्यासारखं केलं. ती त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसली. त्याच्या डोळ्यासमोरून तिच्या गळ्यातलं पदक नाहीसं झाल्यावर तो एकदम आपल्या तंद्रीतून जागा झाला, आणि तिला बघून काही बोलणार एवढ्यात समोरच्या दाढीवाल्या माणसांचा चेहरा हळूहळू हलतोय, तो डोळे उघडत आहे, हे बघून त्याचं लक्ष दाढीवाल्याकडे खिळलं. आपल्याशेजारी बसून आपल्याशी बोलणाऱ्या मुलीला तो विसरला.

त्यांनी डोळे उघडून ओळखीचं मंद स्मित केलं. त्यानंही प्रतिसाद दिला पण त्याच्या मनात प्रश्नांचं कल्लोळ माजला. तो काही बोलायच्या आतच दाढीधारी मनुष्य तिला म्हणाला, "यांना वर घेऊन जा आणि बाहेर सोडून ये."

गुडघ्यावर बसलेली ती उठून उभी राहिली. तिनं आपला हात पुढे करून त्याचा हात हातात घेतला. दुसरा हात पाठीवर ठेवून त्याला हलकेच उभे केलं, आणि काही न बोलता, त्याला सोफ्यातून उठवून समोरच्या दाराकडे घेऊन निघाली. निघताना त्या दाढीधारी व्यक्तीला हात जोडून निघावं असं त्याला वाटून गेलं. पण एक हात हातात धरलेला असल्यामुळे दोन्ही हात जोडणं त्याला शक्य नव्हतं. म्हणून डोळ्यानंच आणि मान खाली वाकवून त्यानं निरोप घेतला. त्याला अतिशय हलकं वाटत होतं आणि पाऊलसुद्धा धड पडेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. म्हणूनच तिनं त्याचा हात धरला आहे हे त्याच्या लक्षात आलं. तिच्या मागून तो दरवाजा उघडून दुसऱ्या खोलीत आला. त्या वेळी त्याच्या लक्षात आलं, रेस्टॉरंटच्या आतल्या दारानं तो याच खोलीत आला होता. पण जिना उतरताना मात्र दुसऱ्या दारानं उतरला होता. त्या वेळी दाढीधारी बसलेल्या माणसाची खोली त्याला लागली नव्हती. तो दरवाजा उघडून रेस्टॉरंटमध्ये आला. बाजूची फळी उघडून दोघेही काउंटरमधून बाहेर पडले आणि रेस्टॉरंटमध्ये शिरले. ते रिकामंच होतं. बाहेर स्वच्छ ऊन पडलेलं होतं. बगीच्यातली फुलं उजेडात उजळून निघाली होती. तो बाहेर बघत असतानाच तिनं त्याला हाताला धरून खुर्चीवर बसवलं.

"बसा, मी कॉफी आणते," असं म्हणून त्याच्या उत्तराची वाट न बघता ती आत निघून गेली. आपण खाली बसलो ते बरं झालं, असं त्याला वाटलं. आपलं सगळं शरीर पिसासारखं हलकं झालं असून कशावरचं आपला ताबा नाही हे त्याच्या डोक्यात पूर्णपणे शिरलं होतं. आता आपण ज्या खुर्चीवर बसलेलो आहोत त्याच खुर्चीवर तळघरात जाण्यापूर्वी बसलो होतो. समोरच्या खुर्चीवर दाढीवाला माणूस बसून आपल्याशी बोलत होता. तो परत आपल्यासमोर येऊन बसला आहे, असा त्याला भास झाला. पण हा भास आहे की तो दाढीधारी प्रत्यक्ष समोर येऊन बसला आहे हे त्याच्या लक्षात आलं नाही. तेवढ्यात तिनं कॉफीचा मग त्याच्यासमोर आणून ठेवला. त्याचा कितीतरी पटीने प्रचंड मोठा आवाज झाला. तो दचकलाच. दुसरा मग तिनं त्याच्या समोरच्या खुर्चीजवळ ठेवला आणि ती स्वत: त्या खुर्चीवर बसून त्याच्याकडे बघायला लागली. तरीही त्याच्या डोळ्यांसमोरून तो दाढीवाला काही हलत नव्हता. कधी दाढीवाला तर कधी कपाळ्यावरच्या बटा कानामागे खोवणारी ती त्याला दिसत होती आणि एका संभ्रमावस्थेत तो अडकला.
"कॉफी घ्या."
काही न बोलता त्यानं कॉफीचा मग तोंडाला लावला. काही बोलावं, विचारावं असं त्याला वाटलं नाही. तो स्वत:च्याच विचारांत मग्न झाला होता. काही हालचाल करू नये; कुणाशी काही बोलू नये; नुसतं पडून राहावं असं त्याला वाटत होतं.

"कसा काय वाटला आमचा कार्यक्रम?"
त्यानं कॉफीचा मग खाली ठेवला, आणि तिच्याकडे बघत तो म्हणाला, "मला काही समजलं नाही. नीट ऐकू येत नव्हतं. तू दिलेले कागद वाचताही आले नाहीत. तिकडे उजेडही नव्हता, आणि तिथेच ते परत येताना हातातून खाली पडले."
"हरकत नाही. एकाच बैठकीत सर्व काही कळेल असं नाही. त्यासाठी दोन-चार वेळा तरी यावं लागेल. तेव्हा थोडाफार विषय समजू शकेल. ते काय बोलतात हे समजण्यापेक्षा त्याचा अनुभव घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यासाठी थोडा वेळ जायला लागेल."

तिच्या बोलण्यानं तो आणखीनच अस्वस्थ झाला. कॉफी पिता पिता तो रेस्टॉरंटमधून बाहेर बघायला लागला. बाहेरचा चौक रिकामाच होता. तिथे कसलीही वर्दळ नव्हती आणि समोरची बाग जशीच्या तशीच होती. वाऱ्याची साधी झुळुकही नसल्यामुळे पानही हलत नव्हतं. ती बाग बघितल्यानंतर एकदम त्याच्या लक्षात आलं की आपण कुठे आहोत हेच आपल्याला माहीत नाही. तो परत एकदा तिच्याकडे बघायला लागला. ती कॉफी पिण्यात गर्क होती. कॉफीचा मग खाली ठेवून समोर बघताच तो आपल्याकडे रोखून पाहत आहे हे तिच्या लक्षात आलं आणि ती परत खाली बघायला लागली.
"अहो, मला तुम्ही कुठे आणलंय? हे गावपण माझ्या ओळखीचं नाही. त्याचं नावही माहिती नाही. कुठे आणलंत मला?"
"आम्ही तुम्हाला कुठेही आणलेलं नाही. तुम्हीच माझ्यामागे येत राहिलात आणि रात्र समोरच्या बाकावर झोपून काढली."
ही आपल्याला काल कुठे दिसली होती, त्याला काही आठवेना; नदीकाठी पोहोचेपर्यंत फक्त तो दाढीवाला वृद्ध गृहस्थ भेटला होता आणि ते स्वतःच पुढे पुढे जाणारे पान.
"मी मागे मागे आलो काय किंवा तुम्ही मला इथे घेऊन आलात, काहीच फरक पडत नाही. पण मी कुठे आलोय हे तरी तुम्हाला माहीत असेल ना?"
"हो. तुम्ही आमच्या राज्यात आला आहात."
"आमच्या राज्यात म्हणजे कुठे ? काहीतरी नाव असेल ना त्याला."
"नाव असलं तरी ते तुम्हाला माहिती नाही. कारण तुम्हाला आमचं जगच माहिती नाही."
"तू अशी कोड्यात का बोलतेस? तू काय बोलतेस ते मला कळत नाही. समजेल असं सांग."
"ते आपण नंतर बघू. आधी तुम्हाला कुठे राहायचं ती जागा दाखवते. तुम्ही थोडी विश्रांती घ्या. मग तुम्हाला न्यायला परत येईन."

असं म्हणून ती उभी राहिली आणि दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर सगळा शुकशुकाट होता. ती बागेच्या बाजूला वळसा घेऊन सरळ निघाली. एक बिल्डिंग सोडून दुसऱ्या बिल्डिंगच्या प्रवेशद्वारातून आत शिरली. तिनं पायरीवर पाय ठेवताच काचेचा दरवाजा आपोआप उघडला. तिच्या बरोबर तोही आत आला. लॉबीमध्ये कोणीही दिसत नव्हतं. ही निवासी बिल्डिंग आहे की, हॉटेलसारखं वसतीगृह आहे, असा विचार त्याच्या मनात आला. पण तिथे कुठेही स्वागतकक्ष नव्हता. ती सरळ जाऊन एका लिफ्टजवळ उभी राहिली. काही क्षणातच लिफ्टचा दरवाजा उघडला. दोघे आत गेले. तिनं समोरचं एक नंबरचं बटण दाबलं. लिफ्टमधून बाहेर पडताच डाव्या बाजूला एक स्वागत कक्ष होता. त्याच्या मागे एक मुलगी उभी होती. ती त्यांना बघताच पुढे आली. त्याच्या पुढे तिनं एक फॉर्म ठेवला. हातात पेन दिलं आणि काही न बोलता ती परत आपल्या समोरच्या कॉम्प्युटरवर बघण्यात गर्क झाली. त्यानं फॉर्म हातात घेऊन आपल्या बरोबर आलेल्या मुलीकडे बघितलं.
"फॉर्म भरा."
"कशाला मला थांबायचं नाहीय. मला घरी परत जायचं आहे."
"हो, बरोबर आहे. पण आधी इथल्या सर्व फॉरम्यॅलिटीज तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील."
तो खूप चिडला. कोण ही मुलगी इतका रुबाब दाखवतेय? या अनोळखी प्रदेशात एकटाच सापडल्यामुळे तो खरं तर घाबरला होता. चिडून करतोय काय.

त्यानं आपलं नाव, पत्ता, वय, शिक्षण लिहून त्यावर सही करून तो परत केला. तिनं घेऊन तो वाचला आणि एका मशिनमध्ये टाकला. ड्रॉवरमधून एक चौकोनी बॉक्स बाहेर काढला आणि त्याच्या समोर टेबलावर ठेवला. त्याला उजव्या हाताचा पंजा त्या बॉक्सवरच्या काचेवर ठेवायला सांगितला. हात काचेवर ठेवताच काचेखालून हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर येतोय असं त्याला दिसलं आणि हॉलमध्ये ज्या रंगाचं पेय प्यायला होता, त्याची त्याला आठवण झाली. बहुधा बोटांचे ठसे त्या यंत्रात नोंदवले असणार. त्यानं हात काढल्यानंतर तिनं त्याला डावा हात काचेवर ठेवण्याची खूण केली. आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्यानं उजवा हात काढून डावा हात त्या काचेवर ठेवला. पण काचेखालून कुठल्याही रंगाचा उजेड आलेला त्याला दिसला नाही. तिनं तो बॉक्स मागच्या बाजूला ड्रॉवरमध्ये ठेवून दिला, आणि ती परत खुर्चीत बसून तिच्या कॉम्प्युटरकडे बघायला लागली. काही क्षणातच कुठेतरी खट्ट असा आवाज आला. ती परत उभी राहिली, आणि मागच्या बाजूचा एक कप्पा उघडून तिनं त्यातून व्हिजिटींग कार्डच्या आकाराचं एक कार्ड काढून ते एका छोट्या पाकिटात घालून त्यावर खोली क्र. ९०६ लिहून त्याच्या हातात दिलं. ते हातात घेऊन त्यातलं कार्ड काढून तो बघत राहिला. त्याच्यावर त्याचा फोटो आणि नाव लावलेलं होते. पुढे काय करायचं याचा विचार करत असताना त्याच्याबरोबर आलेली मुलगी त्याला म्हणाली,
"चला."
तिच्या मागोमाग तोही ते कार्ड घेऊन चालायला लागला.

रिसेप्शनच्या दोन्ही बाजूंना लॉबीज होत्या. ती डाव्या हाताच्या लॉबीमध्ये शिरली. त्या लॉबीचं काचेचं दार उघडण्यासाठी तिनं आपल्या हात बाजूच्या सीटवर ठेवला. त्याबरोबर समोरचं काचेचे दार उघडले. तिच्या मागोमाग तोही आत शिरला, खोलीवरचे नंबर बघत बघत ते रूम नंबर ९०६जवळ आले. तिनं त्याच्या हातून कार्ड घेतलं आणि दरवाज्याच्या समोर धरून दरवाजा आत ढकलला. ती आणि तिच्यामागे तो खोलीत शिरले. खोली बऱ्यापैकी मोठी होती. दाराच्या समोर भिंतीवर वरपासून खालपर्यंत पडदा होता. बहुदा त्याच्यामागे खिडकी असावी. उजव्या हाताच्या भिंतीला लागून एक सिंगल कॉट होती. कॉटच्या समोर एक टेबल आणि बाजूला बसायला खुर्ची होती. टेबलावर पाण्याचा जग आणि आजूबाजूला काही वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या.

"आपण आराम करा. बाथरूम बाजूला आहे. वाटल्यास स्नान करा. नंतर आराम करा. मग मी तुम्हाला न्यायला येईन."
"आता कुठे नेणार आहात? मला घरी जायचं आहे. इथून केव्हा सोडणार आहेत? मला तर अगदी कैदेत ठेवल्यासारखं वाटतंय."
"कैद वगैरे काही नाही; उलट इथे तुमची राहण्याची चांगली व्यवस्था केलेली आहे. तुम्हाला काही लागलं तर फोनवरून तुम्ही ते मागवू शकता. उगाच विचार करून डोक्याला त्रास देण्याऐवजी थोडा आराम करा. रात्रभर बाकावरच पडून होता. त्यापेक्षा हे बरं. रात्री कदाचित झोपही लागली नसेल."

त्यानं काही न बोलता मान डोलवली. ती त्याच्या उत्तराची वाट न बघता मागे वळून बाहेर पडली. बाहेर पडण्यापूर्वी तिनं त्याचं कार्ड टेबलावर ठेवून दिलं. ती गेल्यानंतर तो कॉटच्या कडेवर बसून आजूबाजूला खोलीत काय आहे, याचं निरीक्षण करायला लागला. खोलीत मंद प्रकाश होता. तरीही त्या पडद्यामागे काय आहे हे शोधण्यासाठी उठून तो पडदा लावलेल्या भिंतीकडे गेला आणि पडदा बाजूला करून बघितल्यावर त्याला त्याच्या अपेक्षेप्रमाणे काचेची खिडकी काही दिसली नाही. उलट पडद्यामागे भिंतच होती, आणि वरच्या बाजूला एक लांबलचक झरोका होता. पण तोही तिरका असल्यामुळे त्याला त्यातून बाहेरचं काही दिसलं नाही. भिंतीवर पडदा कशासाठी लावला याचा विचार करत करत तो बाथरूमपर्यंत आला. बाथरूमचा दरवाजा उघडून त्यानं आत डोकावून बघितले. सगळी व्यवस्था नीट असल्याची खात्री करून तो परत कॉटवर येऊन बसला, आणि बसल्या बसल्या भिंतीला टेकून ठेवलेल्या उशीवर डोकं ठेवून आडवा झाला. त्याला किंचित थकल्यासारखं वाटत होतं. डोळे मिटल्या मिटल्या ताबडतोब झोप येईल असंही वाटत होतं. पण आंघोळ करून झोपावं, का झोप काढून आंघोळ करावी, अशा द्विधा मन:स्थितीत तो शांतपणे परत एकदा खोलीची पाहणी पडल्यापडल्या करायला लागला. समोर टेबल, त्याच्या बाजूला खुर्ची, पाण्यानं भरलेला टेबलावरचा जग, त्याच्या बाजूचा काचेचा ग्लास… समोर किंचित वर बघताच तो किंचित दचकला. टेबलाच्या बरोबर वर एक चौकोनी आकाराची फळी, त्यावर एक अर्ध पुतळा; त्या पुतळ्याचा चेहरा बघताच तो दचकला.

ती मूर्ती नेमकी कशाची आहे हे लक्षात येत नव्हतं. एकाला एक धरून ठेवलेल्या पट्ट्या कोरून चेहऱ्याचा आकार बनवलेला असावा. चेहऱ्याचा अर्धा ते पाव इंच जाडीचा थर उंच-सखल भागासारखा कोरलेला होता, आणि अशा पट्ट्या एकत्र ठेवून त्यातून चेहऱ्याचा पूर्ण आकार उभा केलेला होता. त्या पट्ट्या लाकडी आहेत का धातूच्या आहेत केवळ डिझाईन म्हणून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या तयार केलेल्या आहेत, हे लक्षात येण्यासारखं नव्हतं. कारण सगळा चेहरा काळसर चंदेरी रंगात रंगवलेला होता. खोल गेलेले गालसुद्धा खुबीनं दाखवलेले होते, आणि भरघोस दाढीसुद्धा त्या चेहऱ्यावर उठून दिसत होती. त्यावरून हा अर्धपुतळा आपल्याला भेटलेला भाषण करणाऱ्या माणसाचा आहे, हे त्याच्या लक्षात आलं. त्या चेहऱ्यावरून नजर हटत नव्हती. आणि डोळ्यांच्या खोबणीतले दोन घारे डोळे चटकन लक्ष वेधून घेत होते. बाकी चेहरा मृतवत असला तरी ते विलक्षण चकाकणारे डोळे जिवंत असल्याचा भास होत होता. त्या मूर्तीवरून नजर हटवून तो खोलीत उगाच इकडेतिकडे बघत बसला. पण बघता बघता परत नजर त्या दोन डोळ्यांकडे जाताच ते डोळे जिवंतपणे आपल्याकडे टक लावून बघत आहेत, असा भास त्याला होत राहिला आणि केवळ दचकण्यापुरता परिणाम न राहता त्याची जागा एका अनामिक भीतीनं घेतली. आपण खोलीत काय करतो हे बघितलं जातंय, असं वाटून तो आणखीनच अस्वस्थ झाला. एका कडेला वळून त्यानं घट्ट डोळे मिटून घेतले. आपण कुठे आलेलो आहोत; हे लोक कोण आहेत; दाढीवाला बाबा कोण आहे; त्यानं कोणत्या विषयावर भाषण दिलं; आपल्याला इथे अशा प्रकारे का डांबून ठेवलेलं आहे; अशा प्रश्नांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं. जिममधून बाहेर पडल्यापासून ते नदीच्या काठी येईपर्यंत समोरून उडणाऱ्या पिंपळाच्या पानापासून ते दाढीवाल्याने पुढे केलेल्या हातापर्यंत सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारख्या सरकून गेल्या. पण त्या भयाण रात्री, त्या नदीच्या पाण्यात बघत आपण कसे पुढे निघालो हे त्याला फार विचार करूनसुद्धा आठवलं नाही. तसं ते त्याला सकाळी बगिच्यातल्या बाकावर असतानासुद्धा आठवलं नव्हतंच.

पिंपळपान

असं आठवता आठवता त्याचा डोळा लागला आणि काही मिनिटांतच त्याला जाग आली. म्हणजे झोप लागली होती की नाही; किती वेळ लागली होती; काही समजण्यासारखं नव्हतं. कारण त्या खोलीत कुठेही घड्याळ नव्हतं. नेहमीच मनगटावर असणारं घड्याळ त्यानं जिमच्या बॅगेत ठेवलं होतं, आणि ती बॅग तर कुठे गेली, कुठे विसरला हे त्याला काहीच आठवत नव्हतं. जाग येता येता आपण नेमकं कुठे आहोत याचंही भान त्याला राहिलं नाही. जाग येताच, आपण कुठे आहोत, याचा विचार करत त्यानं डोळे उघडले तर समोर तो अर्धा पुतळा त्याच्याकडे बघून मंद स्मित करत आहे, असा भास त्याला झाला.

तो गडबडून जागा झाला आणि उठून बसला त्या पुतळ्याकडे आणि त्या पुतळ्याच्या हिरव्यागार डोळ्यांकडे बघून आपण खूप मोठ्या संकटात सापडलो आहोत अशी त्याला जाणीव झाली. पण काय करणार, कुठे आहोत, हेच त्याला माहीत नव्हतं; त्यात तो दाढीधारी आणि इतर लोकं कधीच न भेटलेली. त्यामुळे तो पूर्णपणे गोंधळात पडलेला. खोलीतून बाहेर पडला तरी त्या गेस्ट हाऊसमधून कुणालाही न समजता बाहेर पडणं जवळजवळ अशक्य आणि बाहेर पडला तरी जाणार कुठे आणि करणार काय, हेही प्रश्नच. कारण त्या रेस्टॉरन्टमधून गेस्ट हाऊसमध्ये येईपर्यंत रस्त्यावर किंवा चौकात त्याला चिटपाखरूही दिसलेलं नव्हतं; एकही वाहन इकडेतिकडे जाताना आढळलं नव्हतं. सकाळी बगिच्यातल्या बाकावर झोपून उठल्यानंतर जो सन्नाटा त्यानं अनुभवलेला होता तोच कायम. त्यामुळे बाहेर पडण्याचा विचार मनातून काढून टाकला. कॉटवरून खाली उतरून त्यानं इकडेतिकडे दोन-चार फेऱ्या मारल्या. परत एकदा पडद्याजवळ जाऊन तो बाजूला करून बघितला आणि भिंत दिसल्यामुळे परत सोडून दिला. लक्ष मूर्तीकडे गेल्यानंतर तिची नजर आपल्याकडेच आहे हे त्याच्या लक्षात आलं. तशी थोडी भूकही लागलेली होती, पण अंगात आळसही होता. त्यामुळे तो दरवाजा उघडून बाथरूममध्ये आला. तिथे टॉवेल, साबण, कंगवा आणि वर हँगरवर शर्ट आणि पॅन्टचा नवीन जोड टांगलेला होता. आधी अंघोळ करून घेऊ आणि नंतर पुढचा विचार करू, असा विचार करून त्यानं पाण्याचा नळ सुरू केला. वरच्या शॉवरमधऊन पाणी येतं की नाही बघितले. बऱ्यापैकी गरम पाणी, चांगल्या वेगानं षटकोनी शॉवरमधून खाली पडत होतं. ते बंद करून तो पाण्यापासून दूर झाला. अंगातले कपडे काढून त्यानं परत एकदा शॉवर सुरू केला. चेहऱ्यावर पाणी पडल्यावर त्याला जरा बरं वाटल. साबण लावण्यापूर्वी त्या शॉवरमधून पाण्याबरोबरच काहीतरी वाफ बाहेर येताना त्याला दिसली. पाणीमात्र पहिल्याइतकंच गरम होतं. बघता बघता त्या वाफेनं पूर्ण वॉशरूम भरून गेली. दाट धुक्यात जसं हाताच्या अंतरावरच्या वस्तूही दिसत नाहीत, तशी त्या वॉशरूममधली कुठलीही गोष्ट त्याला दिसत नव्हती. फक्त कोपऱ्यात वरच्या बाजूला जळणारा बल्ब तेवढा दिसत होता. त्याला घुसमटल्यासारखं वाटलं नाही. श्वास नेहमीसारखाच चालू राहिला. अंगावर पडणाऱ्या पाण्यानं तो हातपाय, खांदा सगळं धुवत राहिला. बघताबघता धुक्यासारखा धूरही विरत गेला, आणि खोलीत असलेली एकेक गोष्ट त्याला स्पष्टपणे दिसायला लागली. बेसिनवरचा आरसा वाफेमुळे पूर्णपणे धुरकटल्यासारखा झालेला. त्यात त्याला कसलंही प्रतिबिंब दिसलं नाही. छोटा टॉवेल हातात घेऊन त्यानं तो आरसा साफ केला. आरश्यावरची वाफ पूर्ण पुसल्यावर चकचकीत आरश्यात त्याला स्वत:चा चेहरा आणि शरीर हळूहळू दिसायला लागले. तो चेहऱ्यावरची हिरवी झाक बघत राहिला.

काही क्षण तसाच उभा राहिल्यावर तो भानावर आला. टॉवेलनं सगळं अंग पुसून काढलं आणि शेल्फवरचे कपडे घालून तो बाहेर आला. ते कपडे घातल्यावर त्याला, आपण कैदी आहोत, असं वाटायला लागलं. तसं पाहिलं तर ते कपडे तलम, रेशमी होते. पण आपल्याला ते कैद्याचे का वाटताहेत, हे त्याला लक्षात आलं नाही. कदाचित त्या हाफ शर्टाला दोन खिसे असल्यामुळे त्याला तसं वाटलं असावं. ते कपडे घालून तो बाहेर आला. त्याला भूक तर लागलेली होती पण सांगणार कोणाला! त्यानं टेबलावर बघितलं पण कुठेच टेलिफोन वगैरे दिसला नाही. कुठे बेल आहे का बघितलं पण लाईट आणि पंखा यांशिवाय दुसरा कुठलाही स्विच खोलीत नव्हता. परत एकदा तो कॉटवर येऊन बसला. त्यानं समोर बघितलं. बसल्यावर, समोर टेबलाच्या खाली कपाटासारखं काहीतरी आहे हे बघून तो परत उठला आणि टेबलाकडे गेला. टेबलाखाली लहान फ्रिज असावा, असं वाटून त्यानं त्या छोट्या कपाटाचं दार बाहेर ओढलं. तसा दरवाचा उघडला आणि एक गार झुळूक त्याचा चेहरा चाटून गेली. तो खाली बसला आणि त्यानं फ्रिजमध्ये काय आहे ते बघितलं.

एक बाटली होती. त्याच्या बाजूला एक वाडगं होतं आणि त्यात काहीतरी पदार्थ होता. वाडग्याच्या शेजारी एक चमचा होता. ते बघून त्यानं दरवाजा बंद केला आणि तो परत खुर्चीवर येऊन बसला. भूक तर लागलेली होती. पण त्या वाडग्यात नेमकं काय आहे हे माहीत नव्हतं. थोडा वेळ वाट बघून कंटाळल्यावर त्यानं परत एकदा फ्रिज दार उघडून तो वाडगा टेबलावर ठेवला आणि त्याच्या बाजूला चमचाही काढून ठेवला. वाडगा टेबलावर ठेवल्यावर त्यात काय आहे ते त्यानं चमच्याने हलवून बघितलं. कुठल्यातरी फळ्याच्या फोडी होत्या, आणि आईसक्रीमसारखी हिरव्या रंगाची पेस्ट होती. परत एकदा हिरवा रंग बघू तो दचकला; पण इतकी भूक लागलेली होती की, त्याला राहवलं नाही. त्यानं चमच्यात थोडा पदार्थ घेऊन चाटून बघितला. नेमकी चव लक्षात आली नाही; थोडंसं गोड आणि आंबट यांचं मिश्रण होतं. ते लक्षात आल्यावर बघता बघता वाडग्यातील सर्व पदार्थ त्यानं खाऊन फस्त केला. आणि बाटलीचं झाकण उघडून त्यातलं पेय तो गटागटा प्यायला. त्या पेयाला काही चव नव्हती; आपण सुगंधी दुधासारखं काहीतरी पितोय असं वाटलं. ते वाडगं आणि बाटली टेबलावर ठेवून तो परत कॉटकडे वळला. पोटात अन्न गेल्यावर त्याला बरं वाटलं आणि तो कॉटवर आडवा झाला आणि बघता बघता परत एकदा त्याचा डोळा लागला.

दारावरची बेल वाजल्यावर तो जागा झाला. त्यानं पुढे होऊन दरवाजा उघडला ती मगाचची मुलगी दरवाज्यात उभी होती.
"फ्रेश दिसताय. काही खाल्लं की नाही?"
त्यानं फक्त मान डोलावली.
तिनं विचारलं, "झोप झाली का?"
"हो."

तो परत जाण्याविषयी काही विचारणार त्यापूर्वीच ती म्हणाली, "चला आपल्याला गेलं पाहिजे", आणि त्याच्यापुढे तिनं काळ्या रंगाचा एक कापडाचा तुकडा ठेवला. तो त्यानं हातात घेतला. तो खूपच मऊशार आहे हे त्याला जाणवलं. 'हे काय आहे', म्हणून तो विचारणार पण तीच त्याला म्हणाली, "तो मास्क आहे. नाक आणि तोंड झाकण्यासाठी. दोन्ही बाजूला लावलेल्या दोऱ्या कानात अडकवल्या की तो मास्क तोंडावर फिट बसतो आणि नाक आणि कान चांगले झाकले जातात." तिनं आपल्या पर्समधून तसाच एक लाल रंगाचा मास्क काढला आणि स्वतःच्या तोंडावर लावला. तिचं बघून त्यानंही आपल्या हातातला काळा मास्क तोंडाला लावला.

किती वाजले याचा काही अंदाज येणं शक्य नव्हतं. तो रिसेप्शनच्या दिशेनं चालायला लागला. ती त्याच्या पुढेच होती. मधला दरवाजा उघडून ते लॉबीत आले. रिसेप्शनपर्यंत परत येऊन त्यानं हातातली किल्ली रिसेप्शनवर ठेवली. आंघोळ झाल्यानंतर घातलेलं कपडे घालूनच तो बाहेर आला होता. त्यामुळे तिकडे परत यावं लागणार होतं. परत आलेल्या मार्गानं ते लिफ्टपर्यंत गेले. तिनं लिफ्टचे बटन दाबलं तशी लिफ्ट खाली जायला लागली. दरवाजा उघडल्यानंतर तिच्या मागोमाग तोही बाहेर पडला. पण येताना ज्या हॉलमधून तो वर आला होता त्याऐवजी वेगळ्याच मजल्यावर ते बाहेर पडले होते. तिथे रिसेप्शनच्या लॉबीऐवजी एक लांब-रुंद हॉल होता आणि त्याच्यासारखे कपडे घातलेले, मास्क लावलेले बरेच लोक तिकडे बसलेले होते. तिनं त्याला असंच एका रांगेमध्ये नेऊन बसवलं. समोर एक दरवाजा होता. त्यावर एक डिसप्ले बोर्ड होता आणि थोड्या थोड्या वेळाने त्यावर वेगळे नंबर दिसत होते. तिनं त्याच्या हातात एक बिल्ला दिला. त्यावर ९६ नंबर लिहिलेला होता.
"समोरच्या दारावर हा नंबर आला की तुम्ही आतमध्ये जा."
"आत कोण आहे. मी आतमध्ये जाऊन काय करू?"
"मलाही आतली काही माहिती नाही. आत गेल्यानंतर काय करायचे आहे ते सांगितलं जाईल. तुम्ही ते सांगतील त्या सूचनांचं पालन करा. तुमचं सर्व काम आटोपल्यावर मी तुम्हाला घेऊन जाईन," असं म्हणून ती मुलगी मागे वळून दिसेनाशी झाली.

त्यानं आजूबाजूला बघितलं. त्याच्यासारखेच कपडे घालून आणि मास्क लावून लोक आजूबाजूला बसलेले होते. प्रत्येकाच्या हातात एक बिल्ला होता. इथे सगळे मास्क लावून बसल्येत, पण आपण खाली जिथे हॉलमध्ये बसलो होतो त्यांपैकी कुणीही मास्क लावलेला नव्हता. हे कसं काय, त्याच्या लक्षात आलं नाही. सगळे जण आपल्या हातातल्या बिल्ल्याकडे बघत आणि वर डिसप्ले बोर्डकडे बघत वेळ काढत होते. ज्यांचा नंबर येईल ते उठून खोलीत जात होते. अशा पाच-सहा खोल्या त्याच्या समोरच्या बाजूला होत्या. आपला नंबर केव्हा येईल, याची वाट बघत तो बसून राहिला. किती वेळ झाला काही समजायला मार्ग नव्हता. जवळपास कुठे घड्याळ दिसत नव्हतं. हॉलमध्ये पडणाऱ्या सावल्यांवरून सूर्य किती कललेला आहे हे समजावून घेण्याचा तो आणि इतर काही लोक प्रयत्न करत होते. एकदा ९६ हा आकडा दारावरच्या डिसप्ले बोर्डावर दिसला आणि तो उठून उभा राहिला, त्या खोलीच्या दिशेनं जायला लागला.

---

दरवाजा उघडून तो आत आला. त्या वेळी आतली खोली बरीच मोठी होती. दाराकडे तोंड करून एक तरुण गृहस्थ बसलेला होता. त्याच्यासमोर एक मोठं ऑफिस टेबल होतं. त्यावर टेबल लॅम्प, कागद, फायली, पेन स्टॅण्ड अशा गोष्टी पसरलेल्या होत्या. त्याच्या मागच्या बाजूला एक किंचित उंचशी कॉट होती. आणि त्याच्या डाव्या हाताला एक स्त्री उभी होती. ती बहुधा त्याची साहाय्यक असावी. तिनंसुद्धा त्याच्याबरोबर नेहमी फिरणाऱ्या मुलीसारखेच कपडे घातलेले होते. छातीवर एक पितळी प्लेट लावलेली होती. पण त्यावर काय लिहिलंय ते मात्र त्याला वाचणं शक्य झालं नाही. कारण कुठल्या भाषेत त्या प्लेटवर लिहिलं होतं ते शब्द त्याच्या परिचयाचे नव्हते. समोर बसलेल्या तरुणाच्या कोटावरसुद्धा एक पितळी प्लेट होती. परंतु तीही काय आहे, ते नाव वाचणं त्याला शक्य झालं नाही. परत एकदा आपण एखाद्या अज्ञातात प्रवेश केल्याची जाणीव त्याला झाली. छातीतली धडधड वाढली, असं त्याला जाणवत राहिलं. तो खोलीत येऊन टेबलाजवळ उभा राहिला, तरी समोरच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव दिसले नाहीत. स्वागताचं स्मितही नाही; किंवा बसा अशी खूणही नाही. तो टेबलापाशी उभा राहिला. बाजूला उभी असलेली स्त्री मागे वळून तिथल्या कपाटात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतेय हे त्याला नजरेच्या कडेतून दिसत होतं. पण सगळं लक्षमात्र समोर बसलेल्या माणसाकडे लागलेलं. त्यानं हातातलं पुस्तकं चाळून बाजूला ठेवलं आणि नवीन फाईल हातात घेऊन चाळायला सुरुवात केली.

तो फक्त उभा राहून बघत राहिला. काय करावे हे त्याला सुचेना. तो तसाच उभा राहिला. दहा-बारा फायलींमधून त्यानं एक फाईल निवडली, आणि उघडून त्यातले कागद तो चाळत राहिला. पेपर बघता बघता त्यानं हातानंच त्याला बसण्याची खूण केली. तो बाजूची खुर्ची ओढून खाली बसला, आणि त्यानं एक दीर्घ सुस्करा सोडला. ती स्त्री कपाटातून काही कागद घेऊन आली, आणि तिनं समोरच्या माणसाकडे ते कागद दिले आणि परत लगबगीने ती मागच्या बाजूला गेली. कागद कसले असावेत हे त्याला समजणं अवघड होतं. ते काहीतरी फॉर्म असावेत असं त्याला वाटलं. समोरच्या माणसानं त्याच्या हातातली फाईल वाचून संपवलेली होती, आणि त्याच्याकडे बघून त्यानं पहिल्यांदाच स्मितहास्य केलं, आपला हात समोर करून शेकहॅण्ड केला. त्याला काहीतरी ओळख पटली असावी, त्याच्या वागण्यात बदल झाला. काही बोलायच्या आत ती स्त्री टेबलाजवळ आली. तिच्या हातात एक लहान वाटी आणि दुसऱ्या हातात पाण्याचा पेला होता. तो तिनं त्याच्यासमोर ठेवला. वाटीत एक निळ्या रंगाची चमकणारी गोळी होती. ते बघून 'हे काय आहे', असं त्यानं विचारलं. त्याला उत्तर न देता समोरच्या तरुणानं 'ही गोळी घ्या', असा हातानंच इशारा केला. त्याच्या डोळ्यात इतकी पेंग होती, की त्यानं काहीही न बोलता उजव्या हातात वाटी घेतली, डाव्या हातात पाण्याचा पेला पकडून ती गोळी तोंडात टाकली आणि वर गटागट पाणी प्यायला.

गोळी घेतल्यानंतर आपल्यावर काही परिणाम होतोय काय असं त्याला वाटलं; पण तसं काही झालं नाही.
तो समोर बघत बसला आता, तो काय सांगतोय.
"तुम्ही व्यायाम करता?"
ते काय विचारताहेत हे पटकन त्याच्या लक्षात आलं नाही. "हो."
"व्यायामशाळेत जाता?"
"नाही, जिमला जातो."
"काय फरक आहे?"
"व्यायामशाळेत दंड-बैठका काढाव्या लागतात; उस्ताद असतात ते कुस्ती शिकवतात."
"जिममध्ये?"
"तिथे फिजिकल ट्रेनर असतात; लोखंडी वस्तू असतात, डंबेल प्लेट्स, वगैरे."
"अच्छा. पण उद्देश एकच आहे ना?"
"माहीत नाही."
"व्यायाम न करता तुमची बॉडी जर चांगली राहिली तर?"
"म्हणजे? समजलं नाही?"
तो काही वळला नाही त्यानी त्याला हातानंच 'माझ्यामागे ये' अशी खूण केली. मागे ठेवलेल्या कॉटकडे तो चालायला लागला. कॉटजवळ गेल्यानंतर आता आपली तपासणी करणार असं त्याला वाटलं. म्हणून कॉटजवळच्या छोट्या स्टुलावर पाय देऊन तो कॉटवर बसला. काही सांगायच्या आधीच कॉटवर आडवा झाला, आणि डोळे बंद करून काय होतंय याची वाट बघायला लागला. तो डॉक्टर असावा असं वाटलं. तशा काही खाणाखुणा त्याला सापडल्या नाहीत. त्याच्या गळ्यात किंवा टेबलावर कुठेही स्टेथोस्कोप दिसला नाही. किंवा त्याच्याबरोबर असलेल्या स्त्रीनं नर्ससारखे कपडेही घातलेले नव्हते. उलट तिचे कपडे एखाद्या रिसेप्शनिस्टला शोभेल असेच आहे. विचार करता करता आपल्याला एक प्रकारची ग्लानी येत आहे असं त्याला वाटायला लागलं. झोप म्हणता येणार नाही पण डोळे मिटल्यावर त्याला एकदम हलकं वाटायला लागलं. बघता बघता आपण कॉटवर झोपलेलो नसून हलके हलके हवेत तरंगतोय, असा त्याला भास झाला. एवढ्यात त्या तरुणानं त्याचं मनगट हातात घेऊन, त्याच्या नाडीवर आपलं बोट ठेवलं, त्यावेळी त्याच्या हृदयातली धडधड जास्तच वाढली. बघता बघता तो झोपेच्या आधीन झाला, आणि आपण कुठे आहोत याचं भानही त्याला राहिलं नाही. अर्धवट जागा असल्यासारखा तो अवस्थपणे पडून राहिला. पडल्या पडल्या त्याला आपण त्या नदीकिनारी चालतोय असा भास झाला. चालता चालता त्यानं पाण्यात डोकावून पाहिलं. जे पान वाऱ्यानं उडून पाण्यात बुडालं होतं ते हळूहळू पाण्यातून वर येताना दिसत होतं. आपण झोपेत आहोत की गोळी घेतल्यामुळे असे भास होत आहेत...

तो निरखून त्या पाण्याकडे बघत राहिला. पाणी पुढेपुढे वाहत होतं. ते पान मात्र प्रवाहाबरोबर न वाहता प्रवाह छेदून पाण्यातून वरवर तरंगत येताना दिसत होतं. जसंजसं ते पान पाण्याच्या पृष्ठभागाकडे येत होतं तसे त्याचे अंधुक व फिकट दिसणारे रंग हळूहळू गडद होताना दिसत होते. पान जसं पाण्याच्या पृष्ठभागावर आलं तसं एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. बुडताना वाळलेल्या पानात नवीन प्राण भरला आहे, फिकट पिवळ्या रंगाची जागा गडद हिरव्या रंगाने घेतली आहे, त्यावर एक चकाकणारी निळाई पसरली आहे. वाहत्या पाण्यावर ते पान नांगर टाकलेल्या जहाजासारखं वाहत्या पाण्यात स्थिर राहिलेलं होते. त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्यात ते पान स्थिर कसे काय आहे, असा प्रश्न त्याला पडला. पान हातात पकडणार तेवढ्यात पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते झटकन पुढे सरकलं, आणि प्रवाहाबरोबर वाहत जायला लागलं. पान पकडण्याच्या नादात त्याचा हात पाण्यात बुडला. एकदम शॉक बसावा तसा थंड पाण्याचा स्पर्श झाला आणि त्यानं हात झटकन मागे घेतला. पाणी इतकं थंड आहे, अशी त्याला अपेक्षा नव्हती. वाहणाऱ्या पाण्याकडे बघत त्यानं शर्टाला हात पुसला आणि हात पुसत पुसतच तो भानावर आला. तो त्या कॉटवर झोपलेला होता आणि झोपल्या झोपल्या हात आपल्या शर्टाला पुसत होता. त्याच्या कॉटशेजारी उभा असलेल्या तरुण आणि स्त्री त्याच्याकडे रोखून बघत होते आणि आपण वेड्यासारखे कोरडा हात शर्टावर काय पुसतोय असा विचार येऊन तो खजील झाला. पण ते दोघे मात्र त्याच्याकडे खूप लक्ष घेऊन होते. आपल्याला काय होतंय हे न समजल्यामुळे त्यानं परत एकदा डोळे मिटून घेतले. तोही त्या नदीच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला. पान तर कुठे दिसत नव्हते. पण तो मात्र त्या पानासारखाच, दिशाहीन, गटांगळ्या खात पुढेपुढे सरकत राहिला. ती कॉट, ती खोली, त्या खोलीतलं दोघेपण, या सगळ्यांचा त्याला विसर पडला. डोळे मिटून, निश्चलपणे तो पाण्यावर पडून तरंगत राहिला.

किती वेळ असा पडून होता आठवत नव्हतं. डोळे उघडले तर आपण नेमके कुठे आहोत हे समजेना... ते दोघं बाजूला उभं राहून आपल्याकडे बघत होते आणि आपण पाण्यावर तरंगत होतो असं अंधुक आठवतंय. हाताला एकदम थंडगार दगडाचा स्पर्श झाला. त्याच्या लक्षात आलं, आपण दगडावर असलो आहोत. पाण्याचा खळखळ आवाजही कानावर पडतोय, म्हणजे आहोत कुठे आपण! गार वारा कानाला स्पर्श करतोय. आजूबाजूला शांतपणे बघितल्यावर त्याच्या लक्षात आलं आपण नदीकिनारी दगडावर बसलेलो आहोत. ती कॉट, ते दोघं, ती खोली, काहीच दिसत नाही. संथपणे वाहणाऱ्या पाण्यात त्यानं परत एकदा डोकावून बघितलं. कुठं ते हिरवेपण दिसत आहे का? पाणी शांत वाहत आहे, तळपण दिसतोय पण पान काही दिसत नाही.

तो उठून उभा राहिला. चांगलंच उजाडलं होता आणि सगळं स्पष्ट दिसत होतं. रात्रीचा अंधार नाहीसा झाल्यामुळे गावाबाहेर, नदीच्या कुठल्या भागात उभे आहोत ते त्याच्या लक्षात आलं. तो परत जायला निघणार तेवढ्यात त्याचं लक्ष पायाजवळच्या जिमच्या बॅगेकडे गेलं. अरे, ही बॅग सापडत नव्हती म्हणून तो अस्वस्थ झाला होता आणि ही तर इथे पायाशी आहे! खूपच गोंधळला तो.

जिममधून निघून पिंपळाच्या झाडापर्यंत आलो. पिंपळाची उडणारी पानं, दाढीवाला वृद्ध, इतकं सगळं आठवतंय. पुढे ते कॅफे, तो हॉल, ती खोली, ते दोघे, ती कॉट, सगळं आठवतंय. पण ते स्वप्न होतं की वास्तव? खूप थकल्यासारखंही वाटतंय. केव्हा एकदा घरी जातोय असं त्याला झालं. विचार करतच तो बॅग उचलून चालायला लागला.

दुरूनच त्याला पिंपळाचं पान आणि त्याच्या जवळच मंदिर दिसलं. चालत तिथून घर फार दूर नाही. तो चालत राहिला आणि परत एकदा विचार करत राहिला, त्या अद्भुत जगाचा जिथून तो नुकताच बाहेर पडला होता. नदी किनाऱ्यापासून आपल्याला कुणी कॅफेशेजारी घेऊन गेला आणि त्या कॉटवर पडल्या पडल्या ग्लानी आल्यावर इथे कुणी आणून सोडलं की आपण कुठेच गेलो नव्हतो, आणि फक्त बसल्या बसल्या आपला रात्री डोळा लागला आणि सगळं स्वप्नातच बघत होतो. रोजची स्वप्नं नीट आठवत नाहीत, पण हे मात्र स्वच्छपणे डोळ्यांसमोर दिसत आहे.

चालत चालत त्याचे पाय दुखायला लागले. किती दूर आहे अजून, समोर दिसतंय, रस्ताही सरळ आहे आजूबाजूला झाडंझुडपं आहेत पण अजून येत कसं नाही! उन्हं वर यायला लागली होती. निघालो तेव्हा ऊन कोवळं होतं, आता जरा तेज झालंय. बॅग खाली ठेवून तो जरा उभा राहिला आणि समोर पिंपळाच्या झाडाकडे बघत राहिला. काल किती हलत होतं झाड, आज एकदम चिडीचूप, पानपण हलत नाहीये.

कपाळावर घाम आल्यासारखं वाटल्यामुळे त्यानं उजव्या हाताच्या मुठीने तो पुसण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी याचा स्पर्श तोंडावर लावलेल्या मास्कला झाला, आणि तो एकदम दचकला. त्या वेळी लावलेला मास्क अजून तोंडावरच आहे. म्हणजे पाहिलं ते स्वप्न नव्हतं. ते सगळं घडून गेलेलं आहे. तरीही ती कोण माणसं होती; तिकडे कोण घेऊन गेलं; सगळंच अनाकलनीय होतं. तो प्रचंड तणावाखाली आला. काय चाललंय हे त्याला अजिबात समजत नव्हतं. पटकन त्याचं लक्ष हाताकडे गेलं, ते हिरवे तर पडलं नाहीत ना असं क्षणभर वाटून गेलं. चेहराही बघितला पाहिजे, पण इकडे बघणार कुठे!

एकदम तो तिरीमिरीत झपाझप चालायला लागला. आता त्याला तोंडावरचा मास्क जाणवत होता. किती वेळ झाला, तो चालतच आहे. पण ते समोरचं पिंपळाचं झाड काही येत नाहीये. समोर बघितलं की ते दिसतं, पण येत का नाही, केव्हा येणार आहे ते पिंपळाचं झाड, ते आल्याशिवाय घराकडे जाणारा रस्ता लागणार नाही.

तो चालत राहिला, किती चालणार, दिवसाउजेडी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारून आलं. थांबता कामा नये, की हा पण आभासच आहे! कधी संपणार हा रस्ता! सांगता येत नाही. विचारायलापण कुणी नाही. हा तर नेहमीचा, नदीवर जाणारा रस्ता, अजून कुणीही कसं दिसत नाही. दिवसाउजेडी एखाद्या अंधाऱ्या बोगद्यातून चाललोय असं त्याला वाटलं. कधी संपेल की संपणारच नाही हा दिवसाउजेडीचा अंधार! मास्क तोंडावरच आहे, हे त्यानं हातानं चाचपून बघितलं आणि समोर दिसणाऱ्या पिंपळाकडे बघून तो पुढे चालतच राहिला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी ही गोष्ट फार चिकाटीने वाचली.
मला काही काही वाक्यं आवडली - पण एकंदरीत एखाद्या गल्लीत घुसल्यावर नुसतंच अडकल्यासारखं वाटतं तसं झालं.
शेवटी बाहेर पडल्यावर आधी काय पाहिलं ते लक्षात राहिलं नाही - पण बाहे पडून रस्ता पुन्हा सापडल्यावर हुश्श वाटलं.
-------------------
स्थळ-काळ ह्यांचा मिलाफ आणि रूपांतर काही वेळा विलक्षण जमलं आहे पण त्यापलिकडे मला उमगलं नाही काही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहवेदना बोलून दाखवल्याबद्दल आभार. अंक निघण्याआधी अदितीतैंच्या आग्रहावरून ह्या कथेवर संपादकीय संस्कार करण्याचा अयशस्वी प्रयत्न मी केला होता. पण मग शेवटी चित्रं कुठे टाकायची इतकेच निर्णय घेऊन भागवलं. ते निर्णय कसेही घेतले असते तरी बहुतेक फरक पडला नसता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)