सिंधुआज्जी आणि म्हैसमाळावरचे कांगारू

(पूर्वप्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०१९)

औरंगाबाद शहरालगतच्या म्हैसमाळ पठारावर तुम्ही सहलीला गेलात, तर मजेमजेनं उड्या मारताना तुम्हाला कांगारूंचे कळप दिसतील. या अजब चमत्काराला कारणीभूत आहेत सिंधुआज्जी.

आता सिंधुआज्जींची ओळख करून देणं क्रमप्राप्त आहे.

आमच्या सोसायटीत तळमजल्यावरच्या एक बि-हाडात सिंधुआज्जी एकट्याच राहतात. म्हणजे त्या आणि त्यांचे पाळीव प्राणी. सिंधुआज्जींकडे एक काकाकुवा, फिशटॅन्कमधले मासे, एक पांढरीधोप मनीमाऊ आणि एक झिपरं अस्वल आहे. काही माणसं आपल्या मुलाचं नाव “मानव” ठेवतात, तसंच सिंधुआज्जींनीही आपल्या अस्वलाचं नाव “स्लॉथ्या” असं ठेवलं आहे. (त्याचं पाळण्यातलं नाव “जांबुवंत” आहे, पण ती बाब अलाहिदा.)

स्लॉथ्या नावामागचं आज्जींचं स्वतःचं तर्कट आहे. अस्वलाच्या बऱ्याच प्रजाती आहेत. भारतात आणि इतर काही देशांत स्लॉथ बेअर या प्रजातीची अस्वलं आढळतात. हिमालयातल्या अस्वलापेक्षा आकारानं लहान असली, तरी स्लॉथ बेअर प्रजातीची अस्वलं बेभरवशाची आणि आक्रमक असतात. नामसाधर्म्य असलं तरी दक्षिण अमेरिकेत आढळणारा स्लॉथ हा प्राणी अस्वलापेक्षा पूर्णच निराळा असतो. स्लॉथ्या अस्वलाचे खेळ करून (मृत्यूगोलात मोटारसायकल चालवणं, वॉटरपोलो, मिक्स्ड मार्शल आर्ट्स आणि सापशिडी) त्या स्वतःच्या टाईमपासची सोय करतात. अर्थार्जनासाठी त्यांच एक प्रोटेक्शन रॅकेट आहे.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे सिंधुआज्जींचं ब्रीदवाक्य आहे. पेस्टल कलर्सची मऊसूत नऊवारी पातळं आणि तपकिरी बॉम्बार्डियर जॅकेट हा त्यांचा नेहमीचा पेहराव. रणगाडाविरोधी ग्रेनेड ठेवण्यासाठी कमरपट्टा आणि पोटॅशियम सायनाईड लावलेले भाले आणि अशुलियन परशु ठेवण्यासाठी पाठीवर भाता, यांनी त्यांचा गेट-अप पूर्ण होतो. अशुलियन परशु हे आजकालच्या कुऱ्हाडींसारखे नसत. लाखो वर्षापूर्वी आदिमानव दगडाची हत्यारं वापरत. लाकूड किंवा प्राण्याची शिंगं वापरून दगडाला आकार देण्याच्य तंत्राला अशुलियन (Acheuleun) संस्कृती म्हणतात.

सिंधुआज्जी आपला बटवा घेतल्याखेरीज कधीही घराबाहेर पडत नाहीत. मोसमाप्रमाणे सुंठ, गुलकंद, आवळा सुपारी वगैरे गोष्टी त्या बटव्यात ठेवतात. त्याशिवाय कुठे व्यापार किंवा उदीम करायची गरज भासली, तर असावेत म्हणून मिठाचे खडे, रंगीत मणी आणि हस्तिदंत या चीजवस्तू त्या नेहमी बाळगतात. स्वत:साठी आणि स्लॉथ्यासाठी गंगावनं, स्वसंरक्षण आणि धाकदपटशा यांसाठी रामपुरी चाकू, आणि चहा प्यायची तलफ भागवण्यासाठी तुळशीची आणि धोत्र्याची पानं या गोष्टी त्यांच्या बटव्यात नेहमी असतात.

सिंधुआज्जींची विचार, उच्चार आणि आचार यांची पद्धत तुमच्या-आमच्यापेक्षा काहीशी निराळी आहे. त्यांना जे योग्य वाटेल ते आणि फक्त तेच त्या करतात. उदाहरणार्थ, शाळेला उन्हाळी सुट्टी असताना त्या सहलीवर जातात ते केवळ उत्तर गोलार्धात. त्या वेळी दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि उन्हाळी सुट्टीत हिवाळा असलेल्या प्रदेशात जाणं हा कायदेभंग आहे, अशी त्यांची ठाम धारणा आहे. सिंधुआज्जींचे फंडे खूप क्लीअर असतात!

शाळेत वाचलेले इतिहास, भूगोल (ज्याला सिंधुआज्जी भू-जिऑईड म्हणतात) आणि विज्ञान हे विषय सिंधुआज्जींना अजूनही आठवतात आणि त्यांचा पुरेपूर वापर करून घेण्याची त्यांची सदैव महत्त्वाकांक्षा असते. त्यांना भाषाही बऱ्याच येतात. मराठी, इंग्रजी, उर्दू याशिवाय सिंधुआज्जी चिनी, स्वाहिली, कोबोल, पोर्तुगीज या भाषाही अस्खलित बोलतात.

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला छंद हा हवाच. सिंधुआज्जींचे दोनच छंद - प्रवास आणि वाचन. (हे आपलं चारचौघांत सांगायला. खरंतर त्यांना बेळगावी कुंदा खाणं, मायक्रोब्रुवरीमधली उत्तम बियर पिणं आणि डब्लूडब्लूईच्या कुस्त्या पाहणं हेदेखील आवडतं. कुणीही मल्ल भेटला, तर “स्टोन कोल्ड स्टीव्ह ऑस्टिन आणि तुम्ही माझे आदर्श मल्ल आहात” अशी गटणीय तारीफ त्या आवर्जून करतात. असो.) तर या दोन्हीं छंदांची सांगड घालणारी प्रवासवर्णनं त्यांना आवडत असतील, तर त्यात आश्चर्य ते काय!

एकदा काय झालं, व्यंकटेश माडगूळकरांच्या एका लेखात त्यांच्या उत्तर ऑस्ट्रेलियातल्या प्रवासाबद्दलचं वर्णन सिंधुआज्जींनी वाचलं. त्यानंतर एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका आणि तसेच इतर फुटकळ संदर्भग्रंथ वाचून त्यांनी उत्तर ऑस्ट्रेलियाबद्दल अधिक माहिती मिळवली. उत्तर ऑस्ट्रेलियामध्ये उंट, घोडे, गाढवं, म्हशी अशा प्राण्यांचे फेरल ऊर्फ मोकाट कळप भटतात, हे वाचून सिंधुआज्जींना महदाश्चर्य वाटलं आणि परमानंद झाला.

महदाश्चर्य आणि परमानंद यांत समाधान मानतील, तर त्या सिंधुआज्जी कुठल्या? हा अद्भुत नजारा स्वतः पाहायचा त्यांनी निर्धार केला, आणि त्या कंबर कसून ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या तयारीला लागल्या.

तसंही सिंधुआज्जी आणि ऑस्ट्रेलिया यांचे जुने ऋणानुबंध होते. बऱ्याच वर्षापूर्वी सिंधुआज्जींनी ऑस्ट्रेलियात वसंत व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. क्लीअर फंडा # १: व्याख्यानमाला सप्टेम्बरमध्ये होती. (इट्स द दक्षिण गोलार्ध, माय फ्रेन्ड. तिथे वसंत सप्टेम्बरमध्ये फुलतो. मराठी सिनेमासारखा हृदयामध्ये नाही.) क्लीअर फंडा # २: वसंत व्याख्यानमालेची पुष्पं सादर करायला आमंत्रित केलेले साहित्यिक होते - वसंत बापट, वसंत कानेटकर, वसंत शिरवाडकर आणि वसंत सबनीस.

थोर हेर डाळ* यांच्याकडून स्फूर्ती घेऊन (आणि त्यांचा बालसा लाकडाचा तराफादेखील ओस्लोजवळच्या एका शिपयार्डमधून विकत घेऊन) सिंधुआज्जींनी तयारीचा श्रीगणेशा केला. तराफ्यात काही जुजबी फेरफार करून झाल्यावर त्यांनी तराफ्याच्या नावातही जुजबी फेरफार केले आणि त्याचं नाव कॉर्न टिक्की असं ठेवलं.

(*यांचा एक तोतया Thor Heyerdahl नावानं वावरत असे, असं म्हणतात. त्यानं कॉर्न टिक्की या तराफ्याचादेखील तोतया बनवला होता, Kon Tiki या नावानं.)

लांबच्या प्रवासासाठी आवश्यक अशा सर्व चीजवस्तू विकत घेण्यात एक पंधरवडा गेला. अखेरीस नकाशे, रडार, मासेमारीचं जाळं, हारपून, सापशिडी, नुस्ती शिडी आणि तहानलाडू-भूकलाडू (कुंदा, बियर, नवलकोल, सेव्हन सीज कॉड लिव्हर ऑईल) तराफ्यावर ठेवून एका प्रसन्न सकाळी सिंधुआज्जींनी सस्लॉथ्या प्रस्थान केलं.

कॉर्न टिक्कीवर सिंधुआज्जींचा वैयक्तिक ध्वज मोठया डौलानं डोलकाठीवर फडकत होता. या ध्वजामुळेच सिंधुआज्जींनी कित्येक सागरी लढाया जिंकल्या होत्या. पूर्ण पांढरा ध्वज हे शरणागतीचं निशाण खरं, पण त्यावर लिंबाचा रस ओतल्यास अदृश्य शाईनं रेखाटलेली कवटी आणि हाडं काळ्या रंगात दृगोचर होत. साक्षात सिंधुआज्जी आपल्याला शरण आल्या, अशा समजुतीनं उल्हासित झालेल्या शत्रूला भांबावून जाण्याखेरीज पर्याय नसे. आणि सिंधुआज्जी विजयी मुद्रेनं खंडणी (लाल गुंजा, चिंचोके, किंवा गोगलगायी) वसूल करून मगच त्याला सोडून देत. क्वचितप्रसंगी लाल गुंजा, चिंचोके, किंवा गोगलगायी ठेवण्यासाठी तराफ्यावर जागा नसलीच, तर सिंधुआज्जी ध्वजाची दुसरी बाजू शत्रूला दाखवत. पिवळ्या रंगाचा ध्वज म्हणजे संसर्गजन्य आजाराची खूण हे ठाऊक असलेला शत्रू वेळीच पोबारा करी आणि हे ठाऊक नसलेला शत्रू निळ्या अक्षरांत लिहिलेलं “ज्लखिण्न्ठप्थॉभ्री” हे सिंधुआज्जींचं ब्रीदवाक्य वाचून बुचकळ्यात पडून पोबारा करी. वास्तविक या शब्दाचा अर्थ कुणालाही ठाऊक नाही, अगदी सिंधुआज्जींनादेखील.

कॉर्न टिक्कीवरील नाहीकायंत्र आणि कुकाणू कुशलतेनं हाताळत सिंधुआज्जी हिंदी महासागरातून मजल दरमजल करत चालल्या होत्या. विषुववृत्त पार करताना मात्र त्यांना विशेष काळजी घ्यावी लागली. उत्तर गोलार्धात असताना उजव्या हातानं सर्व कामं करणाऱ्या सिंधुआज्जी दक्षिण गोलार्धात गेल्यावर मात्र कटाक्षानं डावखुऱ्या होतात, त्यामुळे त्यांना विषुववृत्त ओलांडल्यावर खांदेपालट करावा लागला.

अथांग सागराच्या लाटांवर आरूढ होऊन कॉर्न टिक्की आपल्या गंतव्यस्थानाकडे आगेकूच करत होता. सिंधुआज्जी आपल्या दुर्बिणीतून चहूकडे टेहेळणी करत होत्या. कोकोस बेटांजवळून जाताना शूर श्रीलंकन स्वातंत्र्यसैनिक ग्रेटिएन फर्नान्डो याच्या स्मृतीला अभिवादन करायला त्या विसरल्या नाहीत हो! (श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळावं यासाठी बंड करणा-या सैनिकांचा हा प्रमुख होता. कोकोस बेटावर केलेलं बंड मोडून काढण्यात आलं आणि बंडाळीच्या आरोपाखाली ग्रेटिएन फर्नान्डो याला मृत्युदंड देण्यात आला.)

प्रवासाचा थोडा शीण आल्यामुळे सिंधुआज्जी जरा वेळ दक्षिणकुक्षी करत होत्या. (उत्तर गोलार्धात असताना त्या इतरांप्रमाणे वामकुक्षी करतात.) सूर्य पश्चिमेला झुकू लागला, तेव्हा त्याच्या किरणांनी सिंधुआज्जींना जाग आली. आणि समोर बघतात तो काय, काळ्या पार्श्वभूमीवर पांढरी कवटी आणि हाडं मिरवणारा चाच्यांचा झेंडा - जॉली रॉजर !

सिंधुआज्जींनी स्मितहास्य केलं, सोमाली चाच्यांनी त्यांना गाठलं होतं.

चाच्यांचा म्होरक्या उडी मारून सिंधुआज्जींच्या तराफ्यावर आला आणि म्हणाला, “सरप्राईज!” सिंधुआज्जींना पाहून चाच्यांना फार आनंद झाला होता. सिन-धू आज्जींचा सहवास लाभल्यास आपली पापं धुऊन निघतात, ही त्यांची श्रद्धा होती. उगाच नाही सोमालिया आणि सोमालीलॅन्डमध्ये सिंधुआज्जींना “पापक्षालन आज्जी” म्हणत!

सिंधुआज्जींचा तराफा आणि चाच्यांचं जहाज यांनी अरबी समुद्रात अपोलो-सयूझ केलं. (अंतराळात सामंजस्य आणि परस्परसाहाय्य यासाठी अमेरिका आणि सोविएत संघ यांनी अपोलो-सयूझ चाचणी प्रकल्प (असचाप्र) १९७५ मध्ये अमलात आणला होता. अमेरिकेचे अपोलो हे अंतराळयान आणि सोविएत संघाचं सयूझ हे अंतराळयान अंतराळात एका विवक्षित ठिकाणी नेऊन त्यांची जोडणी करण्यात आली होती आणि दोन्ही देशांचे अंतराळवीर एकमेकांना भेटले होते.)

त्यानंतर उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून जंगी मेजवानी करण्याचं त्यांनी ठरवलं. मेजवानीला आपला हातभार म्हणून थोडी मासेमारी करावी, असं सिंधुआज्जींनी ठरवलं. हारपून हातात घेऊन त्या सज्ज झाल्या. थोडया वेळात त्यांना बांगड्यांचा कळप दिसला. बांगड्यांचा आवाज होऊ न देता सिंधुआज्जींनी हारपून फेकून बांगड्यांची शिकार सुरू केली. भान हरपून हारपून फेकत त्यांनी पुरेसे बांगडे टिपले आणि ते आचाऱ्यांना दिले.

हसतखेळत जेवणं झाली. गाणीबजावणीही झाली. “सिंधु के चाचा ने, सिंध की चाची को, चांदी के चमचे से चटणी चटायी” या भावगीतावर सोमाली बेंद्रेनं नृत्य केलं. त्याला अनेक वन्स मोर (आणि वहिनी लांडोर) मिळाले. अखेरीस चाच्यांचा भावपूर्ण निरोप घेऊन सिंधुआज्जी पुढे मार्गस्थ झाल्या,

सिंधुआज्जींचा मूळ बेत तडक उत्तर ऑस्ट्रेलियातलं एखादं बदर गाठायचं असा होता. पण हिंदी महासागरात अपेक्षित वादळ न आल्यामुळे कॉर्न टिक्कीचा मार्ग बदलला आणि एका प्रसन्न सकाळी सिंधुआज्जी पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात जाऊन पोचल्या.

कॉनं टिक्कीचा नांगर टाकून आणि पासपोर्ट कन्ट्रोलच्या हातावर तुरी आणि मसूर देऊन सिंधुआज्जी आणि स्लॉथ्या शहरात आले. सिंधुआज्जींनी थोडी फोनाफोनी केली आणि दहा-बारा राईड कॅन्सल केल्यानंतर कृष्णा महापात्रा नामक चालकाची उबेर गाडी बुक केली. पर्थसारथी कृष्णानं त्यांना शहराच्या सीमारेषेपर्यंत नेऊन सोडलं. त्यानंतर मात्र त्याचं पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही संपले, आणि सिंधुआज्जींनी मटिल्डा वॉल्ट्झायला सुरुवात केली. (वॉल्टझिंग मटिल्डा (Waltzing Matilda) हे ऑस्ट्रेलियन संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं लोकगीत आहे. वॉल्टझिंग मटिल्डा या वाक्प्रचाराचा अर्थ ऑस्ट्रेलियाच्या तुरळक लोकवस्ती असलेल्या दुर्गम भागांमध्ये एकटंच चालणं असा होतो.)

त्या गीताशी तादात्म्य पावत सिंधुआज्जींनी एक मेंढरूही पकडलं, पण पोलिस वगैरे न आल्यामुळे त्यांची घोर निराशा झाली. शेवटी नदीच्या पात्रातल्या एका खोल डोहात- म्हणजे बिलाबॉन्गमध्ये - पोहून त्यांना जरा बरं वाटलं. “यू विल कम अ-वॉल्टझिंग मटिल्डा विथ मी” हे वाक्य रेकॉर्ड करून, इनफायनाईट लूपमध्ये ते वाक्य लावून, त्यांनी टेपरेकॉडर डोहाच्या काठी ठेवला आणि एक काम नीट पूर्ण केल्याच्या समाधानात त्या पुन्हा मार्गस्थ झाल्या.

मानवी लोकवस्तीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या ऑस्ट्रेलियन बाहेरपाठीत विविध प्राण्यांचा अधिवास होता. कांगारूसारखे मूळचे ऑस्ट्रेलियन प्राणी तर होतेच, पण त्याहून कितीतरी अधिक संख्येनं फेरल - म्हणजे मोकाट - घोडे, गाढवं आणि म्हशी होत्या. ते प्रचंड कळप धावताना त्यांच्या खुरांनी जणू पृथ्वी हादरत असे. आणि असे प्राणी पाहिल्यावर स्लॉथ्याही त्यांच्यामागे चौखूर धावत सुटे. त्याला आवरता आवरता सिंधुआज्जींच्या नाकी अठरा आले.

दिवसभर प्रवास करून थकल्यावर सिंधुआज्जी संध्याकाळी बार्बेक्यू करत असत. स्लॉथ्यानं काही शिकार केली तर उत्तम, नाहीतर नवलकोल बार्बेक्यू करून, त्यावर कॉड लिव्हर ऑईलचं ग्लेझिंग करून सिंधुआज्जी आणि स्लॉथ्या मेजवानी करत असत. नंतर कोआलेकुई ऐकत ते निद्राधीन होत.

अशी मजल दरमजल करत काही आठवडे गेले. मानवी सभ्यतेच्या खुणा कुठेच दिसत नव्हत्या. (सिंधुआज्जींना या दिवसांत दिसलेले तुरळक मानव असभ्य होते का, हा प्रश्न गैरलागू आहे.) आणि एका प्रसन्न सकाळी सिंधुआज्जींना अचानक एक इमारत दिसली. स्लॉथ्याला टाईमप्लीज देऊन त्या त्या इमारतीत गेल्या. एका षटकोनी टेबलाभवती पाचजण बसले होते. एक खुर्ची रिकामी होती. सिंधुआज्जी खोलीत आल्यावर सर्वांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली.

स्वतःची ओळख करून देत एकजण म्हणाला, “आम्ही फॉरेस्ट रेन्जर्स आहोत. मोकाट जनावरांमुळे गवत संपतंय आणि आमचे मूळ ऑस्ट्रेलियन प्राणी उपाशी राहतायेत. पर्यावरणाची हानी होतेय. या मोकाट जनावरांना कसं पकडता येईल, याबद्दल आम्ही चर्चा करतोय, पण काही सुचत नाहीये. तुम्ही काही मदत कराल का?”

सिंधुआज्जी हसल्या. कुणीतरी दिलेल्या फॉस्टरच्या कॅनमधून मोठा घोट घेऊन त्या म्हणाल्या, “हा तर माझ्या उजव्या हातचा खेळ आहे. फक्त मला आवश्यक ती सामुग्री आणण्यासाठी पुरेसे पैसे द्या.” ते बजेट तात्काळ मंजूर झालं आणि सिंधुआज्जी तयारीला लागल्या.

सर्वप्रथम त्यांनी आपल्या सोमाली मित्रांसोबत फेसटाईम करून विशिष्ट वाहनं मागवून घेतली. त्यानंतर त्यांनी फॉरेस्ट रेन्जर्सना कामाला लावून झाडं तोडवून घेतली आणि त्यांचे मोठे ओंडके कापवून घेतले. यादरम्यान त्या “जंगल बुक” आणि “दक्षिण आशियातले पाळीव हत्ती” या पुस्तकांचं वाचन, मनन आणि चिंतन करण्यात गुंग होत्या. (स्लॉथ्या फॉरेस्ट रेन्जरांसोबत सापशिडी खेळून आपला वेळ व्यतीत करत होता.)

काही दिवसांनी सिंधुआज्जींनी मागवलेल्या सहा वाहनांचा ताफा येऊन हजर झाला. मोकाट प्राणी पकडण्याच्या कामासाठी ती वाहनं सुसज्ज व्हावीत म्हणून त्याच्या इन्जिनात फेरबदल करण्यात आले आणि त्यांना चिलखती आवरणंदेखील चढवण्यात आली. त्यानंतर, ओंडक्यांचं एक मोठे रिंगण उभारण्यात आलं. त्या रिंगणाला एकच प्रवेशद्वार होतं आणि ते वरून खाली सोडलं, की आतले प्राणी बंदिस्त होतील, असं डिझाईन करण्यात आलं होतं. या प्रवेशद्वारापर्यंत पोचतील अशा, ओंडक्यांच्या दोन रांगा उभारण्यात आल्या. रांगांमधलं अंतर रिंगणाच्या प्रवेशद्वाराजवळ केवळ वीस फूट होतं, पण रांगा सुरू होतात त्या ठिकाणी हे अंतर पन्नास फूट होतं. (सिंधुआज्जी प्रसिद्धिपराङ्मुख असल्यानं या परिच्छेदात पॅसिव्ह व्हॉइस वापरावा, असा आग्रह केला गेला.)

सर्व तयारी झाली. आणि एका प्रसन्न सकाळी सिंधुआज्जी , स्लॉथ्या आणि फॉरेस्ट रेन्जर्स आपल्या मोहिमेवर निघाले.

म्हशींचा एक मोठा कळप त्यांना दिसला. तीन-तीन चिलखती ऑटोरिक्षा कळपाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला गेल्या. त्यांनी पोझिशन घेतल्यावर सिंधुआज्जी आणि स्लॉथ्या कळपावर चाल करून गेले. बिथरलेल्या म्हशी डावी-उजवीकडे पळू लागल्या, पण चिलखती ऑटोरिक्षामधल्या फॉरेस्ट रेन्जर्सनी त्यांना कोंडी फोडून पळून जाऊ दिलं नाही.

पिन्सर मूव्हमेन्टमध्ये अडकलेल्या म्हशी सरळ पळू लागल्या. शेरखानला खिंडीत पकडण्यासाठी मोगलीनं म्हशींच्या कळपाचा वापर केला, तीच स्ट्रॅटेजी सिंधुआज्जींनी वापरली होती. ओंडक्यांच्या रंगांच्या मधून चौखूर दौडत म्हशींचा कळप रिंगणामध्ये गेला. प्रवेशस्वरापाशी सज्ज असलेल्या फॉरेस्ट रेन्जरने दरवाजा खाली पाडला आणि म्हशी कैद झाल्या. हत्ती पकडण्याच्या खेडा पद्धतीचा सिंधुआज्जींनी केलेला अभ्यास अशा रीतीनं उपयुक्त ठरला.

पुढील काही आठवड्यांमध्ये याच रीतीनं सिंधुआज्जी, स्लॉथ्या आणि फॉरेस्ट रेन्जर्सनी शेकडो म्हशी, घोडे आणि गाढवं पकडली. यथावकाश म्हशींना तबेल्यामध्ये नेण्यात आलं आणि घोडे आणि गाढवं यांना सिडनी हार्बर येथे नेऊन पर्यटनासाठी त्यांचा वापर सुरू करण्यात आला.

सिंधुआज्जींच्या मदतीनेच हे झालं याबद्दल कृतज्ञ फॉरेस्ट रेन्जर्सनी त्यांना आपल्या कॉन्फरन्स हॉलचं उदघाटन आणि नामकरण करण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेला मान देऊन सिंधुआज्जींनी हॉलची फीत कापली आणि फॉरेस्ट रेन्जर्सच्या कॉन्फरन्स हॉलचं नामकरण "वनमाळी सभागृह" असं केल्याचं घोषित केलं.

स्लॉथ्याला घराची आठवण येऊ लागल्यामुळे सिंधुआज्जींनी भारतात परतायचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन फॉरेस्ट रेन्जर्सनी त्यांना फूल ना फुलाची पाकळी म्हणून कांगारूंचा मोठ्ठा कळप भेट म्हणून दिला. "कॉर्न टिक्की" ला ट्रेलर लावून सिंधुआज्जी कांगारूंचा कळप भारतात घेऊन आल्या, पण आता त्यांना कुठे ठेवायचं? सिंधुआज्जींच्या बिऱ्हाडात तर तेवढी जागा नव्हती.

कांगारूंच्या म्होरक्याकडे बघत सिंधुआज्जी म्हणाल्या, "तुझं काय करायचं? तुझं काय, शेपूट म्हणजे पाचवा पाय!" आणि अचानक त्यांना कल्पना सुचली. कांगारूंच्या देशात म्हशी राहत होत्या, मग म्हैसमाळावर कांगारू राहिले तर काय हरकत आहे?

सिंधुआज्जींनी स्वत:च्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी केली आणि कांगारूंचा कळप त्यांनी म्हैसमाळावर नेऊन सोडला. कालांतरानं कांगारुंची संख्या वाढून अनेक कळप झाले. वर उल्लेख केल्याप्रमाणे, म्हैसमाळ पठारावर तुम्ही सहलीला गेलात, तर मजेमजेनं उड्या मारताना तुम्हाला कांगारूंचे कळप दिसतील.

जर तुम्हाला तिथे जाऊनही कांगारूंचे कळप दिसले नाहीत, तर त्याचं कारण एकच असू शकतं. तुम्ही सहलीला गेलात तेव्हा मजेमजेनं उड्या मारत नव्हता.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आता सिंधुआज्जींची ओळख करून देणं क्रमप्राप्त आहे.

काय??? 'माहेर'च्या वाचकांना सिंधुआज्जी ठाऊक नाहीत??????

(कसलेकसले लोक असतात जगात!)

मराठी, इंग्रजी, उर्दू याशिवाय सिंधुआज्जी चिनी, स्वाहिली, कोबोल, पोर्तुगीज या भाषाही अस्खलित बोलतात.

इतक्या भाषा येऊनसुद्धा उपयोग काय?

त्यांच्या जागी दुसरा कोणी असता, तर त्याने येणाऱ्याजाणाऱ्याला येताजाता ऐकवण्यासाठी म्हणून कोबॉलमधल्या अर्वाच्य शिव्या काकाकुवाला पढवून ठेवल्या असत्या. तेवढीच सांस्कृतिक देवाणघेवाण! परंतु तुमच्या सिंधुआज्जी पडल्या मानवी सभ्यतेच्या भोक्त्या! त्यामुळे, कसले काय?

(अवांतर: मानवी सभ्यतेचे संकेत काकाकुवासारख्या मानवेतरांना का लागू असावेत?)

(अवांतर: एकदा एका बाईसाठी दार उघडे धरणाऱ्या एका सभ्य सद्गृहस्थास प्रस्तुत बाईने, "You don't have to hold the door open for me, just because I am a lady!" असे अत्यंत बाणेदारपणे सुनावले होते. त्यावर प्रस्तुत सद्गृहस्थ, "Not because you are a lady, Ma'am, which you are obviously not; but because I am a gentleman." असे प्रत्युत्तरला होता, अशी एक आख्यायिका आहे. सिंधुआज्जींचे तसे तर काही नसावे ना? बोले तो, "काकाकुवा भले मानवेतर असेलही, परंतु मी तर मानव आहे ना?", असे काहीतरी?)

(अतिअवांतर: सिंधुआज्जींना 'मानव' कोण म्हणेल?)

----------

असो. बाकी चालू द्या. लेख वाचून दिवाळी (उशिराने का होईना, परंतु) सार्थकी लागली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याची मलाही उत्सुकता आहे पण लोकलज्जेस्तव विचारलं नाही. भाडिपा हे प्रकरणही उशीरा कळलं. नेटवरवावर फार नंतर(२०१६ जिओमुळे डेटा रेट कोसळल्यावर) सुरू झाला. म्हणजे ओरकुटपर्यंत २०१०ला गेला तरीही विडिओ आवाक्यात नव्हते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(ऑस्ट्रेलियाबाहेर) म्हैसमाळावर कांगारूंचे कळप वगैरेंवरून आठवले. फारा वर्षांपूर्वी, आमच्या अटलांटानजीक डॉसनव्हील नावाच्या गावी एका दांपत्याने असा एक प्रकल्प खाजगी स्वरूपात (तिकिटे लावून, वगैरे) खरोखरच राबविला होता. 'ऑस्ट्रेलियाबाहेरची सर्वात मोठी कांगारूसंख्या' अशी एके काळी त्याची ख्याती होती. वेगवेगळ्या प्राणिसंग्रहालयांना कांगारू पुरविण्याचे उद्योगसुद्धा ते करीत. कांगारूंव्यतिरिक्त इतरही मानवेतर तेथे असत.,

चांगला होता प्रकल्प. किमान दहाएक वर्षे तरी चालला असावा. मात्र, पुढे दुर्दैवाने, ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेत, पुरेश्या आर्थिक पाठबळाअभावी तो बंद पडला. चालायचेच.

----------

तिकीटविक्री केंद्रापाशीच बाहेर मोकाट सोडलेले एक अतिमाणसाळलेले हरिणाचे पिल्लू होते.१अ वास्तविक, त्याला खाऊ घालू नये अथवा त्याचे फाजील लाड करू नयेत, अशी तिकिटेच्छूंना सक्त ताकीद होती. मात्र, तिची अंमलबजावणी करणे ही अशक्य कोटीतील गोष्ट होती. कारण, तुमची इच्छा असो वा नसो, तुमच्याजवळ एखादी पिशवी, पर्स, अथवा बॅग असेल, तर ते सरळ तुमच्याजवळ येऊन थेट त्या पिशवीत (अथवा पर्समध्ये, अथवा बॅगेत) काहीतरी खायला सापडेल, अशा अपेक्षेने तोंड घालीत असे. अशा वेळेस आपण काय करणार?

१अ वास्तविक, एखादे हरिणाचे पिल्लू तेथे आढळणे ही काही फारशी सुरस अथवा चमत्कारिक गोष्ट नव्हती.१अ१ कांगारूंचे अप्रूप होते; हरिण ही एक अतिसामान्य बाब होती.

१अ१ आमच्या जॉर्जिया राज्यात हरिण हे श्वापद सर्रास आढळते. खास करून ग्रामीण भागांत जेथे मुबलक प्रमाणात झाडी आहे तेथे, परंतु क्वचित्प्रसंगी उपनगरीय अटलांटातसुद्धा, नदीच्या काठी जेथे जंगले आहेत, अथवा जुनी झाडी हटवून बिल्डरलोक जेथे नवीन सब्डिव्हिजने (मराठीत: सोसायट्या) उठवितात, अशा ठिकाणी. (माझ्या एका मित्राचे घर उपनगरीय अटलांटातच परंतु नदीपासून फार लांब नाही अशा अंतरावर आहे, त्याच्या बॅक्यार्डात कुंपणावरून उडी मारून हरिणे घुसल्याच्या कथा त्याने ऐकविल्या आहेत.) अत्यंत निर्बुद्ध श्वापद! (हरिण. माझा मित्र नव्हे.) हरिणग्रस्त भागांतून हायवेवरून गाडी चालविताना यांचा धोका असतो. कधी त्यांना अचानक डावीकडे-उजवीकडे न पाहता धावत हायवे क्रॉस करण्याची हुक्की येईल, सांगवत नाही. मग काय, धडक खातात, नि मरतात, नि काय! आणि, रात्रीची वेळ असेल, तर त्याहूनही वाईट. हायवे क्रॉस करणारे एखादे हरिण, दुरून येणाऱ्या वाहनाच्या हेडलाइटांना बावरून जागच्या जागी थिजते, नि येणाऱ्या वाहनाकडे शिंगे रोखून उभे राहते. मग धडक खाते. स्वतः मरते, नि मरता मरता धडक मारणाऱ्यालासुद्धा मारून जाते. तर असे हे श्वापद!१अ१अ

१अ१अ विधात्याने उत्तर अमेरिकेत (१) हरिण आणि (२) रकून/रॅकून हे दोन प्राणिविशेष खास करून (अनुक्रमे) (१) गाडीची धडक लागून आणि (२) गाडीखाली चिरडून मरण्यासाठीच जन्मास घातलेले आहेत. पैकी, रकून गाडीखाली चिरडून मेल्यास वाहनचालकास कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नसावी, ही त्या प्रभूचीच कृपा! असो.

त्या हरिणाच्या पिल्लाव्यतिरिक्त इतरही कांगारवेतर मानवेतर (विशेषेकरून खगगण) तेथे आढळत. मात्र, कांगारूंप्रमाणेच, त्यांना पाहण्याकरिता तिकीट काढून आत जावे लागत असे. ते हरिणाचे पिल्लू तेवढे बाहेरच, आणि म्हणून मोफत/बोनस, असे.२अ

२अ शंकराअगोदर नंदीचे अथवा घाट उतरण्याअगोदर शिंगरोबाचे दर्शन घ्यावेच लागते, त्यातलाच प्रकार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तिकडेच कुठेतरी एकाने उंट पाळले होते आणि शेवटी ते सर्व चौदा उंट देऊन बंद केले. आर्थिक कारण नव्हे तर त्याची बायको कटकट करायची नवऱ्याच्या उंटप्रेमाने. (आमच्याकडे उंट नसले तरी कटकटीला इतर कारणे मुबलक आहेत. खटपटरिपेरिंगसाठी जमा केलेल्या जुन्या वस्तू वगैरे.) असो. चालायचेच.

तर त्या उंटांंना हगरट लागायची सुरुवातीला. एका अरबाला बोलावले. तो म्हणाला - अरे शहाण्या, प्रेमाने तू त्यांना हिरवा चारा खाऊ घालतो आहेस. पण त्याने हगरट लागते. वाळकं खरखरीत गवत घाल.

उंटाचं बघणं म्हणजे तो आपल्याला बघतो तो भाव कीव करणारा असतो. कसे हे अजागळ प्राणी कपडे घालून येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेहमीप्रमाणे, देवदत्त विनोद!

मला वाटायचं की सगळेच परशू अशूलियन असतात. कारण शूळ निराळा आणि परशू निराळा. पण हे काही नवंच प्रकरण दिसतंय.

तिथे वसंत सप्टेम्बरमध्ये फुलतो. मराठी सिनेमासारखा हृदयामध्ये नाही.

आणि दक्षिण गोलार्धात खांदेबदल, दक्षिणकुक्षी वगैरे ...
Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पर्थसारथी कृष्णा. (हे लक्षात यायला थोडा वेळ लागला.)

आय रेस्ट माय केस.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो, हो, हे पण.

शिवाय पर्थ हे पृथ्वीवरचं सगळ्यात एकाकी शहर समजलं जातं; इतर कुठल्याही शहरापासून फार लांब असल्यामुळे एकाकी. ते शहरच निवडणं हासुद्धा देवदत्तपणा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लहानपणी मला गाढवाचा आवाज तंतोतंत काढता येत असे. एकदा एका जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला गेलो असताना तो नवरामुलगा आम्हां चिमुरड्यांना घेऊन टाईम पास करत बसला होता. (मुहुर्त उशीराचा असावा बहुतेक) तो प्रत्येक मुलाला गाणं म्हणायला लावत होता. माझी पाळी आल्यावर मी गाढवाचा आवाज काढून दाखवला. सगळे हंसले. त्यामुळे चेकाळून जाऊन, दर पांच मिनिटांनी मी गाढवासारखं ओरडायला लागलो. नवरदेवाने भीडेपोटी तीन चारदा हंसून कौतुक केले. पण नंतर प्रकरण आवाक्याबाहेर गेल्यावर त्याने तिथून पळ काढला.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मी कित्येकदा त्या दोन-तीन फूट (रूंद-खोल) खड्डेमय रस्त्यावरून गजग्यांची खंडणी द्यायला गेलो पण सिंधूताई मठ्यातच येत नाही, बहुतेक ब्रम्हांडात एलियन पकडायला गेली असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी