लाकूडतोड्याच्या गोष्टी

फार फार वर्षांपूर्वी, एक लाकूडतोड्या लाकडे तोडायला जंगलात गेला होता. त्याला चकवा पडला, आणि तो वाट चुकला.

उपाशीपोटी रस्ता शोधत शोधत शेवटी तो एका तळ्यापाशी पोहोचला. तळ्याच्या काठावर एक झोपडी होती. लाकूडतोड्याने दार ठोठावले. एका खाष्ट म्हातारीने दार उघडले. "काय पाहिजे?" ती करवादली.

"आजी, मी रस्ता चुकलो आहे. खूप भूक लागली आहे. काही खायला मिळेल का?" लाकूडतोड्याने विचारले.

"मी गरीब म्हातारी काय देणार तुला? माझ्याकडे काssही नाही." म्हातारी पटकन म्हणाली.

लाकूडतोड्याने दीर्घ श्वास घेतला. "बरं, मग तुमच्या पडवीत बसून मी कुऱ्हाडीची खीर केली तर चालेल ना?" त्याने विचारले.

म्हातारीला आश्चर्य वाटले. कुतुहल तिला स्वस्थ बसू देईना. "कर बाबा," ती म्हणाली.

लाकूडतोड्याने थोडा लाकूडफाटा तोडला. म्हातारीकडून एक पातेलं घेऊन तो तळ्यावर गेला आणि पाणी भरून आला. तीन दगडांची चूल पेटवून त्याने पाणी उकळत ठेवले आणि त्यात आपली कुऱ्हाड ठेवली, आणि तो ढवळू लागला.

थोड्या वेळाने म्हातारीने विचारले, "झाली का कुर्‍हाडीची खीर?"

लाकूडतोड्या म्हणाला, "थोडा वेळ लागेल. थोडं दूध असतं तर चव अजून छान लागली असती."

म्हातारी म्हणाली, "इलुसं दूध असेल माझ्याकडे," आणि तिनं वाडगाभर दूध लाकूडतोड्याला दिलं. ते पातेल्यात ओतून तो पुन्हा ढवळू लागला.

थोड्या वेळाने म्हातारीने विचारले, "झाली का कुर्‍हाडीची खीर?"

लाकूडतोड्या म्हणाला, "थोडा वेळ लागेल. थोड्या शेवया असत्या तर चव अजून छान लागली असती."

म्हातारी म्हणाली, "असतील माझ्याकडे," आणि तिनं बचकाभर शेवया लाकूडतोड्याला दिल्या. त्या पातेल्यात टाकून तो पुन्हा ढवळू लागला.

थोड्या वेळाने म्हातारीने विचारले, "झाली का कुर्‍हाडीची खीर?"

लाकूडतोड्या म्हणाला, "थोडा वेळ लागेल. थोडी साखर असती तर चव अजून छान लागली असती."

म्हातारी म्हणाली, "साखर असेल माझ्याकडे," आणि तिनं डावभर साखर लाकूडतोड्याला दिली. ती पातेल्यात टाकून तो पुन्हा ढवळू लागला.

असंच हळूहळू लाकूडतोड्याने म्हातारीकडून मनुका, बेदाणे, काजू वगैरे घेऊन पातेल्यात टाकले. शेवटी म्हातारीचे लक्ष नसताना त्याने पातेल्यातून आपली कुऱ्हाड काढली आणि लपवून ठेवली. त्याने म्हातारीला हाक मारली आणि म्हणाला, "आजीबाई, झाली हो कुऱ्हाडीची खीर."

म्हातारी म्हणाली, "तू हातपाय धुवून ये, तोवर मी खीर वाढते." लाकूडतोड्या तळ्यावर जाऊन हातपाय धुवून आला. बघतो तर काय, खीर गायब!

तो रागावून म्हणाला, "आजीबाई, कुर्‍हाडीची खीर कोणी खाल्ली?"

म्हातारी म्हणाली, "मला काय माहीत? माझ्या बापडीवर तुझा विश्वास नसेल, तर जलदेवतेला विचारूया."

लाकूडतोड्या तयार झाला. दोघे तळ्याकडे गेले.

म्हातारी एका घागरीवर उभी राहून तळ्यात गेली, आणि मोठ्याने म्हणाली, "मी कुर्‍हाडीची खीर खाल्ली तर बुड बुड घागरी!"

पण खीर कुर्‍हाडीची नव्हतीच! खीर होती दूध, शेवया, साखर, मनुका, बेदाणे, काजू यांची.

जलदेवता कोपली नाही, घागर बुडली नाही!

म्हातारी विजयी मुद्रेने काठावर आली, आणि तिने तृप्तीचा ढेकर दिला.

लाकूडतोड्याने हार मानली, आणि आपली कुर्‍हाड घेऊन तो मार्गस्थ झाला.

===========================================================================================
फार फार वर्षांपूर्वी, एक लाकूडतोड्या लाकडे तोडायला जंगलात गेला होता. त्याला चकवा पडला, आणि तो वाट चुकला.

उपाशीपोटी रस्ता शोधत शोधत शेवटी तो एका तळ्यापाशी पोहोचला. तळ्याच्या काठावर एक झोपडी होती. लाकूडतोड्याने दार ठोठावले. एका खाष्ट म्हातारीने दार उघडले. "काय पाहिजे?" ती करवादली.

"आजी, मी रस्ता चुकलो आहे. खूप भूक लागली आहे. काही खायला मिळेल का?" लाकूडतोड्याने विचारले.

"मी गरीब म्हातारी काय देणार तुला? माझ्याकडे काssही नाही." म्हातारी पटकन म्हणाली.

लाकूडतोड्याने दीर्घ श्वास घेतला. "बरं, मग तुमच्या पडवीत बसून मी कुऱ्हाडीची खीर केली तर चालेल ना?" त्याने विचारले.

म्हातारीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, "कर बाबा. पण आधी ती कुर्‍हाड स्वच्छ धुऊन ये. जंगलात कुठेकुठे वापरली असशील कोणास ठाऊक."

लाकूडतोड्याने मान डोलावली, आणि तो कुर्‍हाड घेऊन तळ्यापाशी गेला.

लाकूडतोड्या कुऱ्हाड धूत होता तेवढ्यात त्याचा हात निसटला आणि कुर्‍हाड तळ्यात पडली. लाकूडतोड्या बिचारा रडू लागला.

लाकूडतोड्याचे रडणे ऐकून तळ्यातील यक्ष बाहेर आला. त्याने लाकूडतोड्याला विचारले, "तू का बरे रडतो आहेस?"

लाकूडतोड्या रडतच म्हणाला, "माझी कुऱ्हाड तळ्यात पडली. आता मी लाकडे कशी तोडू आणि उपजीविका कशी करू?"

यक्ष म्हणाला, "रडू नकोस. मी तुझी कुऱ्हाड आणून देतो." त्याने तळ्यात बुडी मारली आणि एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही," लाकूडतोड्या म्हणाला.

यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि एक चांदीची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही," लाकूडतोड्या म्हणाला.

यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि लाकूडतोड्याची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "धन्यवाद, हीच माझी कुऱ्हाड," लाकूडतोड्या म्हणाला.

यक्ष म्हणाला, "तुझी सचोटी पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुला बक्षीस म्हणून या तिन्ही कुऱ्हाडी घे."

लाकूडतोड्याला अत्यानंद झाला. त्याने तिन्ही कुऱ्हाडींचा स्वीकार केला व यक्षाला प्रणाम करून त्याचे आभार मानले.

अत्यानंदापायी लाकूडतोड्याची तहानभूक हरपली. म्हातारी, कुऱ्हाडीची खीर वगैरेंचे त्याला पूर्ण विस्मरण झाले. आपल्या तिन्ही कुर्‍हाडी घेऊन, गाणे गुणगुणत तो मार्गस्थ झाला.

============================================================================================

खूप खूप वर्षांपूर्वी, एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता. एके दिवशी तो लाकडे तोडण्यासाठी जंगलात तळ्याजवळ गेला.

दुपार पर्यंत लाकडे तोडून तो खूप दमला होता. भाकरतुकडा खाऊन तो घटकाभर झाडाच्या सावलीत विसावला.

लाकूडतोड्या जागा झाला, तेव्हा त्याला त्याची टोपी दिसेना. तो इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात त्याला झाडावरून आवाज आला. पाहतो तर काय आश्चर्य, एका माकडाने त्याची टोपी घातली होती.

लाकूडतोड्या रागावून माकडावर ओरडला. माकडानेही उलट ओरडून त्याला प्रत्युत्तर दिले. लाकूडतोड्याने एक दगड उचलून माकडावर भिरकावला.

माकडानेही एक फळ तोडून लाकूडतोड्यावर भिरकावले. लाकूडतोड्याने आपली कुऱ्हाड उचलली आणि माकडाच्या दिशेने फेकली. पण त्याचा नेम चुकला आणि कुऱ्हाड तळ्यात पडली. लाकूडतोड्या बिचारा रडू लागला. इथे त्याला पाहून माकडानेही झाडाची एक फांदी तोडली आणि तळ्यात फेकली.

लाकूडतोड्याचे रडणे ऐकून तळ्यातील यक्ष बाहेर आला. त्याने लाकूडतोड्याला विचारले, "तू का बरे रडतो आहेस?"

लाकूडतोड्या रडतच म्हणाला, "माझी कुऱ्हाड तळ्यात पडली. आता मी लाकडे कशी तोडू आणि उपजीविका कशी करू?"

यक्ष म्हणाला, "रडू नकोस. मी तुझी कुऱ्हाड आणून देतो." त्याने तळ्यात बुडी मारली आणि एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही," लाकूडतोड्या म्हणाला. यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि एक चांदीची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी कुऱ्हाड नाही," लाकूडतोड्या म्हणाला. यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि लाकूडतोड्याची कुऱ्हाड घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी कुऱ्हाड," तो म्हणाला. "धन्यवाद, हीच माझी कुऱ्हाड," लाकूडतोड्या म्हणाला. यक्ष म्हणाला, "तुझी सचोटी पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुला बक्षीस म्हणून या तिन्ही कुऱ्हाडी घे." लाकूडतोड्याने तिन्ही कुऱ्हाडींचा स्वीकार केला आणि तो घरी जाण्यास निघाला.

इथे माकड रडू लागले. यक्षाने माकडाला विचारले, "आता तू का बरे रडतो आहेस?" माकड म्हणाले, "माझी फांदी तळ्यात पडली." यक्ष म्हणाला, "रडू नकोस. मी तुझी फांदी आणून देतो." त्याने तळ्यात बुडी मारली आणि एक सोन्याची फांदी घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी फांदी," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी फांदी नाही," माकड म्हणाले. यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि एक चांदीची फांदी घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी फांदी," तो म्हणाला. "नाही नाही, ही माझी फांदी नाही," माकड म्हणाले. यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि माकडाची फांदी घेऊन तो बाहेर आला. "ही घे तुझी फांदी," तो म्हणाला. "धन्यवाद, हीच माझी फांदी," माकड म्हणाले. यक्ष म्हणाला, "तुझी सचोटी पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुला बक्षीस म्हणून या तिन्ही फांद्या घे." माकडाने तिन्ही फांद्यांचा स्वीकार केला. यक्ष अंतर्धान पावला.

माकडाला फांद्यांचे काय करावे काही सुचले नाही. तिन्ही फांद्या तशाच टाकून ते झाडावर उड्या मारत निघून गेले.

आजसुद्धा जर तुम्ही त्या जंगलातील तळ्याजवळ गेलात तर तुम्हाला सोन्याच्या आणि चांदीच्या फांद्या दिसतील. (चांदीची फांदी काळवंडली असेल. माकडाची मूळ फांदी मात्र दिसणार नाही कारण ती कुजून गेली असेल.)

================================================================================================

खूप खूप वर्षांपूर्वी, एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता. एके दिवशी तो लाकडे तोडण्यासाठी जंगलात तळ्याजवळ गेला.

लाकडे तोडताना त्याचा तोल गेला, आणि त्याच्या खिशातील मोबाईल फोनचा चार्जर तळ्यात पडला. बिचारा लाकूडतोड्या रडू लागला.

लाकूडतोड्याचे रडणे ऐकून तळ्यातील यक्ष बाहेर आला. त्याने लाकूडतोड्याला विचारले, "तू का बरे रडतो आहेस?"

लाकूडतोड्या रडतच म्हणाला, "माझा चार्जर तळ्यात पडला. आता मी काय करू?"

यक्ष म्हणाला, "रडू नकोस. मी तुझा चार्जर आणून देतो."

त्याने तळ्यात बुडी मारली आणि एक आयफोनचा चार्जर घेऊन तो बाहेर आला. "हा घे तुझा चार्जर," तो म्हणाला. "नाही नाही, हा माझा चार्जर नाही," लाकूडतोड्या म्हणाला.

यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि एक वनप्लसचा चार्जर घेऊन तो बाहेर आला. "हा घे तुझा चार्जर," तो म्हणाला. "नाही नाही, हा माझा चार्जर नाही," लाकूडतोड्या म्हणाला.

यक्षाने पुन्हा तळ्यात बुडी मारली आणि लाकूडतोड्याचा नोकियाचा चार्जर घेऊन तो बाहेर आला. "हा घे तुझा चार्जर," तो म्हणाला. "धन्यवाद, हाच माझा चार्जर," लाकूडतोड्या म्हणाला. यक्ष म्हणाला, "तुझी सचोटी पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुला बक्षीस म्हणून हे तिन्ही चार्जर घे."

लाकूडतोड्या कुऱ्हाड उगारून म्हणाला, "च्यायला माझ्याकडे फोन नोकियाचा आहे, तर हे बाकीचे दोन चार्जर घेऊन मी काय त्यांचं लोणचं घालू?"

लाकूडतोड्याचा एकूण रागरंग बघून यक्ष वेळीच अंतर्धान पावला.

बिचार्‍या लाकूडतोड्याला नवीन चार्जर विकत घ्यावा लागला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा.

छान..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या गोष्टींमधली नवी बाजू दिसेपर्यंत आम्ही काहीच प्रतिक्रिया देणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झाडाची फांदी बुडी मारून का काढावी लागली असा प्रश्न लेखकाला नसेल पण यक्षाला पडला नाही?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाण्यातून बाहेर काढलेला मोबाइल चार्जर हा सेफ्टी हॅझर्ड नाही काय?

प्लगइन केल्यावर घरी दिवाळी झाली असती ना राव! तडतडी, फुलबाजे, फटाके, द होल (फायर)वर्क्स!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२०२०मध्ये नोकियाचा चार्जर वापरणाऱ्यांचं असंच होतं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बऱ्याच वेगवेगळ्या बालकथांना एकत्र करण्याची कल्पना आवडली. (मिक्स्ड मेटॅफरसारखी मिक्स्ड फेअरी टेल?)

आम्ही बुवा या गोष्टीची अत्यंत बाळबोध व्हर्जन ऐकली होती. त्यात अमिताभ बच्चन तळ्याच्या काठी रडत होता, बायको पाण्यात पडली म्हणून. मग तळ्यातल्या यक्षाने/जलदेवतेने/गणपतीने/व्हॉटेव्हर तळ्यात बुडी मारून त्याला अनुक्रमे परवीन बाबी, रेखा, आणि जया भादुड़ी पाण्यातून काढून दिल्या, आणि सरतेशेवटी त्याच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न होऊन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बाईचं वस्तुकरण करण्याला बाळबोधपणा म्हणण्यात होणारं नुकसान विचारात घेतलं पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कदाचित या बाबतीत बाईची कुऱ्हाडीशी तुलना केल्याने तिचे सबलीकरण अभिप्रेत असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीवादाबद्दल रोजच्या रोज शिकवण्या घेणं गरजेचं आहे; पण मला बालवाडी शिकवायचा कंटाळा येतो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कदाचित या बाबतीत बाईची कुऱ्हाडीशी तुलना केल्याने तिचे सबलीकरण अभिप्रेत असावे.

कुऱ्हाडीशी तुलना केल्याने बाईचे सबलीकरण होण्यात मुळात तिचे (कुऱ्हाडीहून) दुर्बल असणे अभिप्रेत आहे. (थोडक्यात, हा स्त्रीत्वाचा गौरव नसून (नॉट-सो-सटल) अपमान आहे.)

अर्थात, तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला एवढी शिंपल गोष्ट न समजणे हे अपेक्षितच आहे. (एखाद्या लेडीकडून मात्र ही बाब अक्षम्य ठरली असती.)

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण बाईचं वस्तुकरण करण्याला बाळबोधपणा म्हणण्यात होणारं नुकसान विचारात घेतलं पाहिजे.

...गंमत म्हणजे, प्रस्तुत विनोद मी (अनेक वर्षांपूर्वी) ऐकला, तो एका (तेव्हा) शाळकरी लहान मुलीच्या तोंडून. (तेव्हा(सुद्धा) मी एक मोठा बाप्या होतो, ही बाब अलाहिदा.) ज्या अर्थी तिने हा विनोद मला (मोठ्या उत्साहाने) सांगितला, त्या अर्थी तो तिला (१) समजला, आणि (२) अप्रीशिएट झाला; आणि त्यावरून (आणि तेवढ्याच मर्यादित अर्थाने) या "बाळबोध" कॅटेगरायझेशनचे प्रयोजन.

तसे पाहायला गेले, तर या विनोदात लाकूडतोड्याच्या गोष्टीशी साधर्म्य, एवढी एकच बाब विनोदी नाही. त्या माध्यमातून इतरही कंटेंपररी गोष्टींवर साटल्यत्वे भाष्य ही त्यातील एक महत्त्वाची खुबी आहे, ज्यापरत्वे (किंबहुना, ज्यापरत्वेच) तो खुलून येतो. (उदाहरणार्थ, अमिताभचे जया भादुड़ीशी लग्न झालेले असताना त्याची परवीन बाबी आणि रेखा यांच्याबरोबरची (तथाकथित) लफडी, वगैरे. तथाकथित एवढ्याचसाठी, की अशी लफडी खरोखरच होती की नाही, हे तपासायला मी गेलेलो नाही; परंतु, ती होती, असे लोक म्हणतात, म्हणून. आणि, या लफड्यांत नक्की कोणी कोणाचे आणि कसे वस्तुकरण केले (असावे), हा प्रश्न रोचक जरी असला, तरी सध्याचा तो विषय नव्हे. असो.) ही अशी खुबी (तिला इतर कोणत्या गाळण्यातून न गाळता) समजून तिच्यावर हसता येण्याकरिता बहुधा एखाद्या लहान मुलीचीच (मुलाचीसुद्धा चालेल!) निरागस दृष्टी लागत असावी. (ते 'प्रौढत्वी निजशैशवास जपणे' वगैरे आम्हां बिगरकवींना अंमळ कठीणच.)

म्हणून "बाळबोध". इतकेच. अधिक काही नाही.

(स्त्रीवादपुरस्करिणीषु विनोदविच्छेदनं शिरसि मा लिख, मा लिख, मा लिख| (शाळेतल्या संस्कृतात मलाही पन्नासांपैकी पन्नास मार्क असत; सबब, व्याकरणातली घोडचूक गृहीत धरावी.))

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या कारणामुळे बाळबोध हे विशेषण मान्य आहे.

(बाकी लिहिण्यासारखं बरंच आहे, पण इथे अवांतर नको. देवदत्त-विनोदांना प्रतिसादांमधूनही देेवदत्त विनोदी प्रतिसाद आलेत. तिथे हे नको.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लाकूडतोड्या तिन्ही कुऱ्हाडी घेऊन घरी आला. जेफ बेझॉस, जॅक मा, मस्कइत्यादींचे टेड टॉक्स बघून तो प्रेरित झाला.टाऊन हॉल मधून त्याने लगेच जंगलाचा नकाशा आणला, आणि लगेच त्या नदीकाठी जाऊन आजूबाजूच्या बर्याच मोठ्या जागेवर स्टेक लावले, एक छोटं खोपट बांधलं आणि लगेच सरकारी कार्यालयात जाऊन आपला होम्सटेड रजिस्टर केला.

त्याचे नशीब चांगले होते, कि हे यक्ष (nymphs) हे झाडं, किंवा एखादी जागा यांच्याशी बांधले असतात, आणि सोडून जाऊ शकत नाहीत, हे त्याने लहानपणी गोष्टीत ऐकले होते.

लाकूडतोड्या दररोज कुऱ्हाड पाण्यात टाके आणि प्रामाणिक उत्तर देऊन चांदी आणि सोन्याची कुऱ्हाड उकळे. यक्ष शॉर्ट टर्म मेमरी लॉस विकार पीडित होता, हे माकडाच्या उदाहरणावरून आपल्याला माहीतच आहे.

कालांतराने लाकूडतोड्या म्हातारा झाला. त्याने आपला बिझनेस मुलाला चालवायला दिला. मुलगा MBA होता, त्याने ताबडतोब बिझनेस कॉर्पोरेटाइझ केला, आणि "The Dumb but Benevolent Nymph Co. Pvt. Ltd." असे नाव दिले. आणि बिझनेस कसा सुधारावा म्हणून त्याला एक कल्पना सुचली, रोज रोज कुऱ्हाड टाकणे, हाऊ ईनेफिशियन्ट. त्यामुळे त्याने सरळ एक क्रेन आणि ७० किलोचा गोळा आणला, आणि तो गोळा रोज पाण्यात टाकू लागला. त्याला आणखी एक आयडिया सुचली. त्याने "जगातले सर्वात मौल्यवान धातू" म्हणून एक लेख प्रिंट काढून, वाटरप्रूफ करून त्या यक्षाला वाचायला म्हणून पाण्यात टाकला. तेव्हापासून ऱ्होडियम, पालाडीयम, प्लॅटिनम, मग सोने, मग चांदी आणि मग नॉर्मल गोळा असे पर्याय येऊ लागले.

(या सर्व प्रगतीकडे लाकूडतोड्या लिटल वुमन मधल्या श्रीमती मार्च कश्या शेवटी आपल्या मुलींकडे आणि त्यांच्या पोरापोरींकडे अभिमानाने पाहतात, तसे पाहात आहे.)

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यक्ष शॉर्ट टर्म मेमरी लॉस विकार पीडित होता...

इथे बांध फुटून हसले ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आत्तापर्यंत यक्षाला परिस्थितीचे आकलन झाले होते. त्यामुळे एक दिवस गोळा तलावात टाकल्यावर, यक्षाने ला.तो. च्या वंशजाला घेऊनच बुडी मारली. आणि परत एकदा, ला.तो. के भूत बातोंसे नही मानते, ही म्हण सिद्ध झाली.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटच्या गोष्टीत जर मी यक्षी असते तर मे म्हंटले असते "बरं झालं तसच पाहिजे तुला. सोशल मीडिया लाकूड तोडीस घातक आहे."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटली गोष्ट बेष्ट!
================================

खूप खूप वर्षांपूर्वी, एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता. एके दिवशी तो लाकडे तोडण्यासाठी जंगलात तळ्याजवळ गेला.

लाकडे तोडताना त्याचा तोल गेला, आणि त्याच्या खिशातील क्रेडिट कार्ड तळ्यात पडलं. बिचारा लाकूडतोड्या रडू लागला.

लाकूडतोड्याचे रडणे ऐकून तळ्यातील यक्ष बाहेर आला. त्याने लाकूडतोड्याला विचारले, "तू का बरे रडतो आहेस?"

लाकूडतोड्या रडतच म्हणाला, "माझं क्रेडिट कार्ड तळ्यात पडलं. आता मी काय करू?"

यक्ष म्हणाला, "रडू नकोस. आत्मनिर्भर बन." असं म्हणून यक्ष इतरांना फुकटचे सल्ले देण्यासाठी निघून गेला.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0