ट्रम्प मतदारांची कैफियत

ट्रम्प मतदारांची कैफियत

भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक हे बहुतांशी डेमोक्रॅटिक पार्टीचे समर्थक आहेत [पाहा : Substantial majority of Indian-Americans support Democrats, 72% of registered voters back Joe Biden: Survey आणि How Will Indian Americans Vote? Results From the 2020 Indian American Attitudes Survey]. सेंट्रिस्ट किंवा डाव्या बाजूला झुकणारे हे लोक एका बाजूला भारतातल्या उजव्या मोदी सरकारचे समर्थकही आहेत! परंतु २०१६ साली "अब की बार ट्रम्प सरकार"ची घोषणा देणारे आणि ट्रम्प यांच्या बाजूने भारतीय वंशाच्या मतदारांचा कल निर्माण करणारे शलभ (शली) कुमार हेही २०२० साली मात्र ट्रम्प यांना समर्थन द्यायला कमी उत्सुक होते असं दिसलं. याच्या मागे अनेक कारणे असू शकतील - ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय वंशाच्या लोकांचा प्रश्न सोडवण्याबद्दल ठोस आश्वासन न मिळणे, ट्रम्प यांनी कोव्हीड काळात मास्क न वापरणे, CAA, ३७० अशी कारणे असावीत असे कयास बांधले गेले आहेत. शली कुमार यांना भाजप प्रशासनानेही थोडं दूर सारलेलं असावं असे संकेत आहेत [पाहा : Two reasons why BJP govt could be delaying framing rules under CAA].

ते जरा बाजूला ठेवूयात. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले आहेत असं चित्र सध्या आहे. ट्रम्प यांनी 'निवडणुकांमधे गैरप्रकार झाले आहेत आणि जर अवैध मते मोजणीतून वगळण्यात आली तर आपला दणदणीत विजय झालेला दिसेल' असा पवित्रा घेतलेला आहे. त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ते आपलं मत वारंवार सांगतही आहेत -

ट्रम्प यांच्या पराजयात डेमोक्रॅटिक पार्टीत (आणि पर्यायाने भारतीय वंशाच्या अमेरिकन लोकांमधे) एक प्रकारचे अति-प्रबुध्द (Woke) असे एकमत तयार झाले आहे ज्याच्या मते ट्रम्प समर्थक बिनडोक, समाजावर भारभूत असलेले, अडाणी, गावठी आणि वंशभेद करणारे लोक आहेत, आणि पर्यायाने या लोकांना अशी विशेषणे दिल्यामुळे आपण पूर्ण निर्दोष आणि गुणसंपन्न (virtuous) आहोत. असे एकसुरी, पूर्णतया निःशंक एकमत एक frightening consensus दर्शवतो ज्याने स्लाव्हॉय झिझेक यांची आठवण होणे अपरिहार्य आहे त्यांनी भयंकर एकमताच्या विरोध म्हणून २०१६ साली "हिलरी ऐवजी आपण ट्रम्प यांना मत देऊ" असं म्हटलं होतं!

झिझेक हे डावे विचारवंत आहेत. त्यांचे ट्रम्प यांना समर्थन हे एक व्यूहरचना (strategy) स्वरूपाची खेळी होती [पाहा : Slavoj Žižek: The Hillary Clinton Consensus Is Damaging Democracy]. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत इतकं वाईट घडेल की त्याच्या विरुध्द प्रतिक्रिया होऊन डाव्या मतांना जास्त जनाधार मिळेल अशी काहीशी त्यांच्या व्यूहरचनेमागची अपेक्षा होती. झिझेक यांची उद्दिष्टे ट्रम्प समर्थकांच्या उद्दिष्टांपेक्षा अगदी विरुध्द असली तरीही ट्रम्प यांना २०१६मध्ये मिळालेला मोठा जनाधार आणि अजूनही मिळणाऱ्या समर्थनाला समजण्यासाठी त्यांचे विश्लेषणात्मक विचार उपयुक्त ठरतात. विचारांचे एकसुरी, पूर्णतया निःशंक एकमत होणे हे सरतेशेवटी त्या विचारांनाच विनाशकारी ठरतं असा अनुभव आहे. ट्रम्प मतदारांची कैफियत समजून घेणे याच कारणासाठी आज आवश्यक आहे.

“वेल्फेअर क्वीन्स!”

निवडणुकीनंतर माझी काही मित्रांबरोबर चर्चा सुरु आहे. एक मित्र तेलगू आहे आणि अटलांटामधे राहतो. त्याचे तिथल्या श्वेतवर्णीय ट्रम्प समर्थकांबद्दल अतिशय प्रतिकूल मत आहे. ट्रम्प यांनी अजून निवडणुकीत पराभव स्वीकारलेला नाही याबद्दल त्याला अस्वस्थता वाटते आहे. ट्रम्प यांनी खिलाडू वृत्तीने पराभव स्वीकारला नाही म्हणून तो त्यांची टर उडवतो आहे. पण त्याचबरोबर ते राजकीय बंडाळी (coup) करण्याच्या प्रयत्नात आहेत असा त्याचा ग्रह आहे. ट्रम्प हे खोट्या बातम्या (Fake News) पसरवत आहेत. त्यांचे समर्थक इलेक्शनमधे गैरव्यवहार (फ्रॉड) झालेत असा ठाम समज करून त्याविरुद्ध निदर्शनं करत आहेत. जॉर्जियाचे अधिकृत निवडणूक निकाल जाहीर करणाऱ्या रिपब्लिकन सरकारी अधिकारी ब्रॅड रॅफेनस्पर्गर (Brad Raffensperger) यांच्यावर इतर रिपब्लिकन लोक दबाव आणत आहेत आणि निवडणुकीचे निकाल दमदाटी करून उलथवायला बघत आहेत असं त्याचं म्हणणं होतं. आणि यात नवीन काहीही नाही. सगळ्याच डाव्या किंवा मध्यममार्गी वाहिन्या अशा प्रकारच्या काळज्या व्यक्त करणाऱ्या बातम्या निवडणुकीनंतर सतत देत आहेत. ट्रम्प यांनी निवडणूक हरल्याचे मान्य न केल्यामुळे आणि कोर्टात अनेक दावे दाखल केल्याबद्दल त्याला आक्षेप आहेत, यातले बरेचसे दावे जजेस फेटाळत आहेत हे कळल्यावर तो त्या दाव्यांबद्दल ते किती फुसके आहेत असंही म्हणतो आणि रिपब्लिकन जजेससुध्दा हे दावे फेटाळत आहेत हे तो आवर्जून सांगतो. पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टात ट्रम्प यांनी आपले तीन conservative जजेस नेमले आहेत आणि ते ट्रम्प यांच्या बाजूने निकाल देतील अशी भीती त्याला वाटते आहे. एक तामिळ मित्र मिनियापोलीसला राहतो. तोही डेमोक्रॅटिक पक्षाचा समर्थक आहे. दुसरा एक तामिळ मित्र पोर्टलन्डला राहतो. तो कट्टर ट्रम्प विरोधक आहे आणि ट्रम्प यांच्याबद्दल विखारी गोष्टी बोलत असतो. एक मराठी मित्र फ्लॉरिडात जॅक्सनविलला राहतो, तो मध्यममार्गी आहे पण ट्रम्प जिंकला नाही म्हणून त्याला हायसं झालं आहे. या सगळ्याच राज्यांत जिथे श्वेतवर्णीय मोठ्या संख्येने आहेत तिथे असलेल्या देशी लोकांना ट्रम्प समर्थकांच्या वर्णविद्वेषीपणाबद्दल खात्री आहे. ट्रम्प यांचा विजय झाला तर श्वेतवर्णीय आपल्याशी आणखी वर्णद्वेषाने वागतील अशी त्यांना धास्ती होती. या ग्रुपमधे ब्रूकिंग्स इन्स्टिट्यूशन या सेन्ट्रिस्ट / लिबरल थिंक टॅंकच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टवर बोलकी प्रतिक्रिया आली - "ट्रम्प समर्थकच खरे welfare queens आहेत!"

GDPला हातभार

म्हणण्याचा रोख हा की व्यवस्थेवर भार होतो म्हणून welfareला विरोध करणारे रिपब्लिकन, ट्रम्प समर्थक, हे आज फार कमी प्रमाणात GDPला हातभार लावत आहेत म्हणजे तेच खरे व्यवस्थेवर भारभूत आहेत.

पण हे खरं आहे का ? गेल्या पन्नास वर्षात अमेरिकेचा औद्योगिक पाया कसा बदलला आहे, त्याची किती पडझड झाली आहे आणि याच्यावर अवलंबून असलेल्या किती लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम झाला आहे ते बघणं आवश्यक आहे. १९७२ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनला भेट दिली आणि माओ यांच्या कम्युनिस्ट चीनशी संबंध पुनर्प्रस्थापित केले. माओ यांच्या निधनानंतर १९८० साली चीनचे राष्ट्रप्रमुख दंग शाओपिंग यांनी कम्युनिस्ट राज्यव्यवस्था न बदलता व्यापारी अर्थव्यवस्थेचा अंगीकार केला. औद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या चीनला अमेरिकेने औद्योगिक प्रगती करण्यासाठी अनेक प्रकारे साह्य केलं. जागतिक व्यापारी व्यवस्थेत चीनचा समावेश करून कम्युनिस्ट रशियाला शह देण्यासाठी हे केलं गेलं.

जागतिकीकरणाचा अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांनाही खूप फायदा झाला. प्रदूषण उत्पन्न करणारे रासायनिक उद्योग चीनला पाठवले गेले. कमी खर्चात, दूर देशीच्या कामगारांना अत्यंत कमी पगार देऊन उत्पादन केल्यामुळे नफा खूप वाढला. अमेरिकेच्या औद्योगिक वर्चस्वाला मात्र गळती लागली. अनेक उद्योग बंद पडायला लागले. स्वस्त आयात केलेल्या उत्पादनाशी स्पर्धा करणं अशक्य होतं. कामगारांच्या नोकऱ्या जात होत्या. पण एक स्वप्न दाखवलं जात होतं की बेरोजगार झालेल्या कामगारांना पुनर्प्रशिक्षण देऊन (re-training) आधुनिक, अधिक पगार देणाऱ्या आयटी उद्योगासारख्या इंडस्ट्रीमधे सामावून घेतलं जाईल. प्रत्यक्षात हे दिवास्वप्नच ठरलं! एच-वन बी व्हिसावर स्वस्त मिळणारे कर्मचारी आयटी उद्योगासाठी आयात केले गेले. अमेरिकेचा औद्योगिक पायाच या ग्लोबलायझेशनने उध्वस्त केला आहे. वरील चित्र एक प्रकारे अमेरिकेचा औद्योगिक पाया उध्वस्त होण्याचे द्योतक आहे. मात्र अमेरिकेच्या दोन्ही सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या शहरी आणि नवउदार अर्थव्यवस्थेचे लाभार्थी असलेल्या विचारवंतांनी एकविसाव्या शतकाच्या ग्लोबलायझेशनचे उत्साही स्वागत केले नसते तरच नवल! २००५ साली प्रसिद्ध झालेले थॉमस फ्रीडमन यांचे "द वर्ल्ड इज फ्लॅट" हे पुस्तक या दशकाच्या सकारात्मकतेचे आणि जागतिकीकरणाच्या फसफसत्या उत्साही स्वागताचे ठळक उदाहरण आहे.

ग्लोबलायझेशनबरोबरच बिल क्लिंटन यांच्या काळात वित्तसंस्थांवरचं नियंत्रण शिथिल करण्यात आलं. बँका आणि गुंतवणूक संस्था यांच्यामधे अंतर ठेवणारा Glass-Steagall कायदा त्यांनी शिथिल केला, आणि वित्तसंस्था भराभर फुगायला लागल्या. ही वाढ एक फुगवटा होता हे पुढच्या काळातल्या IT bubble, Housing Bubble आणि शेवटी झालेल्या वित्तीय संकटावरून (Financial Crisis) उघडकीला आलं. या कारणांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं वित्तीयकरण (Financialization) झालेलं आहे. प्रत्यक्ष उत्पादन न करणाऱ्या, निरुत्पादक अशा वित्तीय संस्था नफ्यातला २५ टक्के नफा हस्तगत करतात. या वित्तीय सेवा देणाऱ्या संस्था एका प्रकारे बराच नफा शोषून घेत आहेत. अशा प्रकारच्या संस्थांना अर्थतज्ज्ञ rent seeking ही संज्ञा देतात. बायडेन भागाचा GDP फुगलेला दिसतो आहे याच्या मागे वित्तीयकरण (Financialization) हे कारण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या वित्तीय संस्था फक्त ४ टक्के लोकांना रोजगार देतात आणि सुमारे २५ टक्के नफा फस्त करतात. वॉलस्ट्रीटचे डोळे विस्फारणारे पगार आणि बोनस या शोषलेल्या नफ्यातून येतात.

याच्या विरुध्द दुसऱ्या बाजूला गेल्या पन्नास वर्षात आपले जीवनमान खालावत गेलेले बघणारे अमेरिकन कामगार आणि ग्रामीण भागातली अमेरिका आहे. या जनतेचा जॉर्ज बुश यांच्या रिपब्लिकन प्रशासनाने सुध्दा अपेक्षाभंग केला आहे. neo conservative असलेल्या आणि श्रीमंत स्तरातल्या जॉर्ज बुश यांना या लोकांचा पाठिंबा तर मिळाला पण त्यांनी या वर्गासाठी काहीही केलं नाही. अमेरिकन औद्योगिक पायाचा ऱ्हास झालेला पाहून अमेरिकेला गतकाळात असलेली ताकद परत यावी याकरता त्या सगळ्या लोकांनी ट्रम्प यांच्या Make America Great Again या घोषणेला प्रतिसाद देऊन त्यांना २०१६ला निवडून दिलं. या जनतेचा प्रश्न खरोखरीच त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे त्याआधी कोणीही मान्य करत नव्हतं. अगदी कामगार युनियन्सचा पाठिंबा असलेली डेमोक्रॅटिक पार्टीसुध्दा वॉलस्ट्रीटकडून देणग्या मिळाल्यामुळे, ग्लोबलायझेशनबद्दल कमाल उत्साही झालेली होती. हे चित्र बदलून अमेरिका डाव्या विचारांबद्दल जास्त प्रामाणिक होईल, डाव्या विचारांकडे वळेल अशी आशा स्लाव्हॉय झिझेक यांना होती. अमेरिकन माणूस डाव्या विचारांकडे किती साशंकतेने बघतो याची त्यांना कल्पना नसावी!

आपल्या खालावलेल्या परिस्थितीबद्दल स्वतःला अपमानित झालेलं समजणारा हा वर्ग मानी आहे. त्याची Welfare Queen अशी संभावना करणं सुशिक्षित असलेला भारतीय अमेरिकन कसा काय करू शकतो? याचं फार आश्चर्य वाटतं. एक उदाहरण - माझ्या नात्यातल्या एका तरुण मुलाची गर्लफ्रेंड ग्रामीण जॉर्जिया भागातील आहे. हे लोक त्यांच्या कितीतरी एकर शेतीवर स्वावलंबी जीवन जगतात. आपल्या प्रॉपर्टीवर हरणांची शिकार करतात, शेतावर कोंबड्या, गायी पाळतात. त्यांना सरकारी welfare नको असतो आणि त्यांना सरकारने त्यांच्या जगण्यात हस्तक्षेपही करायला नको असतो!

ट्रम्प समर्थकांचे प्रश्न हे रोजीरोटीचे प्रश्न आहेत हे डेमोक्रॅटिक समर्थकांना मान्य नाही असं नाही. माझा मिनियापोलीसचा तामिळ मित्र म्हणतो "मला त्यांचे प्रश्न आर्थिक आहेत हे कळतं, पण हे लोक कसं बोलतात! त्यांचं बोलणं रेसिस्ट असतं" - मी म्हटलं की हे लोक आपलं फ्रस्ट्रेशन व्यक्त करत आहेत, त्याला इतकं वाईट का समजायचं ? तर तो म्हणाला "हे लोक गुलामगिरीच्या काळातले व्हाईट सुप्रीमसीच्या विचारांचे समर्थक आहेत म्हणून मला ते आवडत नाहीत". मी म्हटलं "गुलामगिरी संपून किती वर्षं झाली आहेत? सुमारे १५८. मान्य आहे की साठच्या दशकापर्यंत अमेरिकेत कायद्याने वांशिक भेदभाव होता. समाजात भेदभाव अजूनही आहे हे कोणीही अमान्य करणार नाही. पण गुलामगिरीची परिस्थिती संपून खूप काळ लोटला आहे. आता परिस्थिती फार वेगळी आहे यात शंका नाही. गुलामगिरीच्या जवळपास जाणारी काही गोष्ट आज अस्तित्वात असली तर थर्ड वर्ल्ड देशांत गुलामीसदृश अत्यल्प पगारावर राबवून घेणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत! पण त्यांचे मालक, मोठे समभागधारक coastal liberal आहेत आणि त्यामुळे निष्पाप, निर्दोष धरले जावेत, आणि ज्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे अशा लोकांनी "अशिष्ट" आणि "असभ्य" भाषा वापरल्याबद्दल त्यांना दोषी आणि रेसिस्ट ठरवलं जावं हा मोठा विरोधाभास आहे, आणि आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या लोकांना (म्हणजे कृष्णवर्णीयांना) आकसाने, पूर्वग्रहाने वागणूक देण्याबद्दल ट्रम्प समर्थकांना दोषी ठरवणारे, लिबरल भारतीय वंशाचे अमेरिकन स्वतःच त्या अख्ख्या समाजाकडे prejudice (पूर्वग्रह, आकस) घेऊन बघतात हा देखील एक विरोधाभासच आहे!"

ट्रम्प समर्थकांच्या रोजीरोटीचा प्रश्न लक्षात आल्यानंतरही डेमोक्रॅटिक समर्थकांना त्यांच्याबद्दल सहवेदना (empathy) निर्माण होत नाही ही खरी शोकांतिका आहे. त्यांच्याकडे मध्य अमेरिकेच्या या प्रश्नावर काही उपायही नाही. मध्य अमेरिकेने नामशेष व्हावं हाच उपाय यांच्या मते आता उरलेला आहे. तुमच्या नामशेष होण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांबद्दल ट्रम्प समर्थकांना तरी बंधुत्वाची, आपलेपणाची भावना कशी निर्माण होऊ शकेल? त्या बाजूने का समजून घेतलं जाऊ शकत नाही हे आपण कदाचित जास्त समजून घेऊ शकतो, कारण यांच्या अस्तित्वाचाच हा प्रश्न झाला आहे.

“स्टॉप द स्टील”

नोव्हेंबर ३च्या निवडणुकांचा अहवाल मी लिबरल विचारांचा बालेकिल्ला NPRवर पाहत होतो. डेमोक्रॅटिक पक्षाला मोठे बहुमत मिळेल अशी या गटाची अपेक्षा होती. परंतु त्या दिवशी निकाल जसे जसे येत गेले तसे तसे चित्र स्पष्ट होत गेलं की ट्रम्प यांना जोरदार पाठिंबा आहे. तेव्हा असंच चित्र दिसत होतं की ट्रम्प परत निवडून येतील. Judy Woodruff या एका फिलाडेल्फियामधल्या कृष्णवंशीय रिपोर्टरशी बोलत होत्या. त्यांचा अविश्वास आणि झालेला अपेक्षाभंग स्पष्ट दिसत होता. त्या विचारत होत्या "पण काळ्या लोकांनी इतक्या प्रमाणात ट्रम्प यांना का मत दिलं असेल? त्यांच्या वंशामुळे त्यांनी असं करायला नको होतं!" ती कृष्णवंशीय रिपोर्टर माफक हसली आणि म्हणाली कदाचित त्यांना त्यांच्या नोकरी-उद्योगाची जास्त फिकीर असेल, म्हणून त्यांनी असं केलं असेल. कृष्णवंशीय लोक आपल्या हिताचे उमेदवार निवडूच शकत नाहीत, त्यांना तितकी बौद्धिक क्षमताच असू शकत नाही, आणि agencyही असू शकत नाही, असा वुडरफ यांचा समज जणू काही ती त्यांना न दुखवता दूर करायला बघत होती. आणि खरोखरीच कोणत्याही रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षाला इतकी काळ्या लोकांची आणि हिस्पॅनिक लोकांची मतं याच्या आधी मिळालेली नाहीत. मात्र त्या पहाटे चित्र बदललं असं सकाळी कळलं, आणि यावेळेस अविश्वासाची प्रतिक्रिया ट्रम्प समर्थकांची झाली होती. त्यानंतर आजमितीला पॉप्युलर व्होटमधे बायडेन हे ७९.८ मिलियन (दशलक्ष) मते घेऊन ट्रम्प यांच्या ७३.८ मिलियन मतांपेक्षा ६० लाख मतांनी पुढे आहेत. पण डेमोक्रॅटिक पार्टीच्या समर्थकांनी याबद्दल फार आत्मसंतुष्ट होऊ नये. हा सगळा फरक एकट्या कॅलिफोर्निया राज्याची कमाल आहे. न्यू यॉर्क, न्यू जर्सीने जे पॉप्युलर मताधिक्य बायडेन यांना दिलं ते इतर सगळ्या राज्यांनी नष्ट करत आणलं. आणि शेवटी कॅलिफोर्नियाने हा फरक निर्माण केला. कोव्हिडची आपत्ती नसती तर ट्रम्प यांचा सहज आणि मोठा विजय झाला असता असं म्हणायला वाव आहे.

आणि इतर वृत्त संस्थांनी बायडेन यांनी निवडणूक जिंकली आहे असं जाहीर केलं, मात्र ट्रम्प यांनी पराभव झाला आहे हे अद्याप तरी (नोव्हेम्बर २३, २०२० पर्यंत हा लेख लिहीत असल्यापर्यंत) मान्य केलेलं नाही. ट्रम्प यांनी पराभव मान्य न केल्यामुळे GSAचे सत्तांतरणासाठी दिले जाणारे पैसे (सुमारे ९.९ मिलियन डॉलर्स) हे बायडेन यांना दिले जाऊ शकत नाहीत आणि या प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो आहे असं बायडेन यांच्या वकिलाचं म्हणणं आहे. हे अर्थातच पूर्ण सत्य नाही. सत्तांतरण पुढच्या वर्षी जानेवारी २०ला होईलच (ट्रम्प सत्ता बळकावून पद सोडणार नाहीत ही भीती अनाठायी आहे असं मला वाटतं) २०१२ सालच्या बुश विरुद्ध गोर या निवडणुकीत फक्त फ्लॉरिडा राज्याच्या निवडणुकीबद्दल प्रश्नचिन्ह होतं, आणि तेव्हाही Al Gore यांनी कायदेशीर प्रक्रिया होऊन पराभव मान्य करायला तब्ब्ल ३६ दिवस लागले होते! यावेळी तर ट्रम्प आणि बायडेन यांच्या मतसंख्येत दोन राज्यात अगदी कमी फरक आहे आणि चार राज्यांबद्दल त्यांचे कोर्टात दावे असतील असं वृत्त आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांनी मीडियापुढे मान तुकवून खिलाडूपणे पराभव स्वीकारावा ही अपेक्षा अनाठायी आहे.

मिशिगन राज्यात Wayne County Board of Canvassers हे २-२ अशा अनिर्णित अवस्थेत अडकले. या बोर्डात दोन रिपब्लिकन आणि दोन डेमोक्रॅट असतात आणि सहसा एकमताने हा निर्णय घेतला जातो. हा आणखी एक नाट्यमय प्रसंग यावेळेस घडला. पुढे त्या दोन रिपब्लिकन मेम्बरांनी मत बदललं आणि ४-० असा निर्णय झाला. पण या मेम्बरांना ट्रम्प यांनी जातीने फोन केला. त्याच्या आधीच यांनी आपली दिलेली संमती परत घेतली कारण याबद्दल ऑडिट केलं जाईल अशी त्यांची अपेक्षा होती पण डेमोक्रॅट नंतर म्हणाले की ऑडिट करणं बंधनकारक नाही (त्यांनी आधी दिलेली संमती कायदेशीररीत्या मागे घेता येत नाही). ट्रम्प यांनी मिशिगन राज्याच्या आमदारांना भेटीस बोलावलं जे या काळात अयोग्य मानलं गेलं. त्या आमदारांद्वारे ते राज्याचे निकाल उलटवू पाहत आहेत असं म्हटलं गेलं.

रात्री असलेली परिस्थिती पहाटे अचानक बदलल्यामुळे ट्रम्प यांना मोठ्या मताधिक्याने बहुमत मिळालं आहे, पण डेमोक्रॅटिक पक्षाने गैरव्यवहार (फ्रॉड) करून हे बहुमत चोरलं आहे असं मत तयार झालं. बहुसंख्य (६१ टक्के) ट्रम्प समर्थकांचा याच्यावर विश्वास बसला आहे असा सर्व्हे आला आहे. याच सर्व्हेत पक्षाशी संलग्न नसलेले २९ टक्के लोकही असं मानतात की या निवडणुकीत बायडेन गैरव्यवहार करून जिंकले आहेत! यातून "स्टॉप द स्टील" (निवडणुकीची चोरी थांबवा) ही घोषणा घेऊन ट्रम्प समर्थकांनी निदर्शनं केली आहेत.

Stop the Steal!

ट्रम्प यांची निवडणुकीला आव्हानं कोणत्या प्रकारची आहेत? यात अनेक प्रकारचे आरोप आहेत. पोस्टात कर्मचाऱ्यांनी मागच्या तारखेचे शिक्के मारून मतपत्रिका पाठवाव्या जेणेकरून त्या ग्राह्य धरल्या जाव्यात, मृत व्यक्तींच्या नावाने मतदान केलं गेलं आहे, किंवा मतपत्रिका चोरून खोट्या सह्या करून मतपत्रिका भरल्या गेल्या आहेत (Ballot Harvesting). ऍरिझोना राज्यात बॉल पॉईंट पेन ऐवजी Sharpie मार्कर पेन मतदारांना देऊन त्यांची मतपत्रिका मोजली जाणार नाही अशी सोय करण्यात आली असाही आरोप केला गेला. हे बहुतेक सगळे आरोप फेटाळले गेले आहेत. दुसऱ्या राज्यात आता स्थाईक झालेल्या लोकांच्या नावाने नेव्हाडा राज्यात मतपत्रिका पाठवल्या गेल्या असा आरोप आहे, तो मात्र खरा असावा.

ट्रम्प यांची लीगल स्ट्रॅटेजी अतिशय बेशिस्त वाटते. त्यांनी रुडी जुलियानी (Rudy Giuliani) यांना मुख्य वकील नेमलं आहे पण जुलियानी यांनी अनेक वर्ष कायद्याची प्रॅक्टिस केलेली नाही . जुलियानी यांच्या फोर सीझन्स लँडस्केपिंगच्या पार्किंग लॉटमधल्या वार्ताहर परिषदेची बरीच टिंगल झाली आहे. पण एवढ्यात त्यांनी टेक्ससच्या वकील सिडनी पॉवेल (Sidney Powell) यांना पाचारण केलं आहे आणि त्यांच्याबद्दल थोडा जास्त आदर वकील बिरादरीत दिसतो. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांना हॅक करून ट्रम्प यांची मतं बायडेन यांना दिली असा खळबळजनक आरोप सिडनी पॉवेल यांनी केला आहे आणि आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि ते आपण लवकरच कोर्टात सादर करणार आहोत असा दावा केला आहे. प्रत्यक्षात त्यांच्याकडे कोणता पुरावा आहे वगैरे सांगणं कठीण आहे. काळ ठरवेल की हे वक्तव्य खरं आहे की नाही. आणि जर पुरावा असला तर न्यायालय ठरवेल की हा पुरावा भक्कम आहे की नाही. २३ तारखेला सकाळी Sidney Powell या ट्रम्प यांच्या लीगल टीमशी संबंधित नाहीत असं निवेदन त्यांच्या लीगल टीमने केलं आहे. सिडनी पॉवेल यांनी आपली याला सहमती आहे असंही निवेदन आलं आहे! पॉवेल यांच्याकडे असलेला पुरावा न्यायालयात सादर करण्या एवढा भक्कम नाही हे यातून स्पष्ट होतं. त्या मात्र आज आपल्या #Kraken आणि आता #KrakenOnSteroids या हॅशटॅगद्वारे आपण जे करतो आहोत ते चालू आहे असं सूचीत करत आहेत. ट्रम्प यांची लीगल स्ट्रॅटेजी नक्की काय आहे? अशी काही स्ट्रॅटेजी अस्तित्वात तरी आहे की नाही? असा प्रश्न आहे.

निवडणुकीत गैरव्यवहार झाले असावेत का? तर याचं उत्तर हे आहे की प्रत्येक निवडणुकीत गैरव्यवहार होत आले आहेत. ते निकाल उलटवण्यातके जास्त प्रमाणात आहेत का? याची उत्तरं निरनिराळी येतात. डेमोक्रॅटिक समर्थक म्हणतात गैरव्यवहार अजिबात होत नाहीत किंवा अत्यल्प होतात. पण २०१२ साली मतदार यादीत १८ लाख मृत व्यक्तींची नावं होती आणि २४ लाख मतदार एकापेक्षा जास्त राज्यांच्या मतदार यादीत होते - पूर्वी पत्राने मतदान काही राज्ये वगळता फारसं होत नव्हतं. मृत व्यक्ती मतदान केंद्रात जाऊन मतदान करत नाहीत, आणि एक व्यक्ती दोन राज्यात प्रवास करून जाऊन सहसा दोनदा मतदान करणार नाही, आणि तेव्हा मतसंख्येतला फरकही खूप जास्त असायचा, त्यामुळे हा फ्रॉडचा प्रश्न याआधी फार आलेला नाही. यावर्षी कोव्हीडमुळे मोठ्या प्रमाणावर पत्राद्वारे मतदान झालं आहे. आणि अशा प्रकारचे गैरव्यवहार होण्याची शक्यता अर्थातच बरीच जास्त आहे. प्रश्न हा आहे की असा गैरव्यवहार जर झाला असेल तर तो पकडता येऊ शकतो का? तर यासाठी काही व्यवस्थाच अस्तित्वात नाही. त्यामुळे अर्थातच कोर्टात हा प्रश्न सिध्द करणं फार कठीण आहे.

अकाउंट्समधे वापरला जाणारा बेनफर्डचा (Benford) कायदा वापरून यातले काही अनालिसिस केले गेले आहेत. या analysisमधून आलेल्या निष्कर्षांबद्दल एक व्हिडियो चांगल्या प्रकारे थोडक्यात गोषवारा सांगतो तो बघण्यासारखा आहे.

बेनफर्डचा प्रतिवादही केलेला दिसतो. मला यात सगळ्यात जो रोचक भाग दिसतो तो हा आहे की असा analysis करणारी एक ओपन सोर्ससारखी volunteer माणसं तयार झाली आहेत, जी आपला डेटा आणि analysis करण्याच्या scripts प्रसिध्द करतात. त्यांचा प्रतिवाद होतो आणि त्याबद्दल उहापोह होतो. पण हे सगळं मेनस्ट्रीम मीडियाच्या बाहेर सुरु आहे . मेनस्ट्रीम मीडियाला अस्थिरतेचे फार भय आहे आणि ते फेक न्यूज म्हणून या सगळ्या गोष्टीवर पडदा पाडायला इतके घाईला आलेले, तत्पर झाले आहेत की त्यांच्या विश्वसार्हतेला त्याने तडा जाऊ शकतो. एक इंटरेस्टिंग अनालिसिस डॉ शिवा अय्यादोराई यांनी केलेला आहे ज्यातून ट्रम्प यांची मतं बायडेन यांना दिली गेली असू शकतील असा निष्कर्ष निघतो.

या अनालिसिसचा प्रतिवाद नईम कबीर यांनी चांगला केला आहे. अर्थात काही प्रश्न तरीही उरतातच.

या निवडणुकांतून काही स्पष्ट झालं असेल तर व्होट बाय मेल या पद्धतीतल्या त्रुटी कळल्या. काही विचार असे आहेत :

 1. इतक्या मोठ्या प्रमाणावर 'व्होट बाय मेल' करण्यास अजून आपण तितके तयार नाही आहोत.
 2. मशीनने वाचल्या न जाऊ शकणाऱ्या मतपत्रिकांना Ballot Duplication ही प्रक्रिया वापरून त्यांची प्रतिलिपी करून परत मशीनला फीड करतात अशी प्रोसिजर आहे हे नव्याने कळलं. ही प्रक्रिया जास्त चांगल्या तंत्रज्ञानाने नक्कीच काढून टाकता येईल.
 3. 'व्होट बाय मेल'ऐवजी strong cryptography वापरून आणि biometric identification वापरून रिमोट व्होटिंग करता येईल. याने फ्रॉडची शक्यता बरीच कमी होऊ शकेल.
 4. मतदान गुप्त रहावं यासाठी जॉर्जियासारख्या राज्यात पद्धत अशी आहे की, एकदा लिफाफ्यावरच्या सहीची शहानिशा केली की मतपत्रिकेचा लिफाफा आणि मतपत्रिका वेगळे केले जाते. त्यानंतर परत सहीची शहानिशा होऊ शकत नाही कारण मतपत्रिका आणि लिफाफा यांना परत एकत्र करण्यासाठी कोणतीच माहिती ठेवली जात नाही. सह्यांची शहानिशा कशी झाली? ती नीट झाली की नाही याबद्दल माहिती घेणं शक्य असायला हवं होतं. पण जॉर्जिया राज्यातल्या consent decreeमुळे ते शक्य होणार नाही.
 5. या निमित्ताने canvassing आणि counting या संज्ञा समजल्या. लिफाफ्यावरची मतदाराची सही त्याचीच आहे ना? हे पडताळून पाहणं म्हणजे canvassing आणि मतपत्रिकेची मोजणी म्हणजे counting. re-canvassing न करता re-count करणे यात फार हशील नाही, जेव्हा फार कमी फरकाने निकाल असतो तेव्हा re-canvassing करता येणे गरजेचे आहे.
 6. राष्ट्रीय वोटर आयडी आणि निवडणुकांचे राष्ट्रीय स्तरावर केले जाणारे एकसमान कायदे आवश्यक आहेत, पण ते कधीही घडणार नाही कारण अमेरिकन लोकांना वोटर आयडी किंवा राष्ट्रीय आयडी नको आहे. त्यांना त्यांच्या सरकारवर विश्वास नाही. राज्यांना वेगळे अधिकार अमेरिकन राष्ट्रपद्धतीत आहेत. राज्ये आपल्या निवडणूक कायद्याचा संकोच होऊ देणार नाहीत.
 7. निवडणूक मशीनचं मार्केट फक्त तीन कंपन्यांची मोनोपॉली आहे. हे खरंच वाईट आहे. आणि ही यंत्रं विंडोज वापरतात! काय म्हणाल आता? Hardware root of trust वापरून hardening केलेलं हार्डवेअर वापरून, ओपन सोर्स कोड, लिनक्स वापरून, सिक्युरिटी रिव्ह्यू केलेली यंत्रं नॅशनल लॅबोरेटरीला डिझाईन करून, तयार करून घेणं अवघड नाही. हे घडण्याची शक्यता फार कमी आहे.

अनेक चांगल्या कल्पना लोकांनी या प्रश्नावर विचार केला तर येऊ शकतील. सगळं आलबेलच आहे असं म्हटलं तरी प्रश्न नाहीसे होत नाहीत हे संबंधितांनी लक्षात घेणं मला गरजेचं वाटतं

“फेक न्यूज”

कोस्टल लिबरल्स यांच्या मनात ट्रम्प समर्थकांची एक प्रतिमा अशी आहे की ते फेक न्यूजवर विश्वास ठेवणारे मूर्ख लोक आहेत. इथेही झिझेकचं विश्लेषण मला उपयुक्त वाटतं. ट्रम्प सपोर्टर्स खरोखरीच फेक न्यूजवर विश्वास ठेवत नाहीत असा निर्वाळा तो देतो.

असे फेक न्यूजवर विश्वास ठेवणारे लोक एक अल्प प्रमाणात अस्तित्वात असतीलही, मात्र ११:४८ ला ते म्हणतात त्याप्रमाणे लोक खरोखरीच फेक न्यूजवर विश्वास ठेवतात असं नाही, पण या सुन्न करणाऱ्या, संवेदना बधीर करणाऱ्या frightening consensusपेक्षा त्यांना या फेक न्यूजमधे जगाचं जास्त परिपूर्ण दर्शन घडतं आणि सद्य परिस्थितीबद्दल या consensusपेक्षा वेगळ्या, आणि अंतर्यामी फेक न्यूज असूनही त्यात एक सत्यतेचा अंश असल्याची, ऑथेन्टिसिटी असल्याची खूण त्यांना दिसते, जी मानवी अनुभव आणि त्यांचा अन्वयार्थ लावण्यासाठी या जिवंत माणसांना आवश्यक वाटते. त्यांची मूल्यं अतिशयोक्त पोलिटिकल करेक्टनेसखाली दडपली जाताना त्यांना दिसतात. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या जीवनपध्दतीबद्दल या कोस्टल एलिट लोकांची घृणा त्यांना दिसते, हे एलिट आपल्या विनाशावर टपले आहेत असं त्यांना वाटतं आणि ते काही अंशी खरंही आहे. झिझेक म्हणतो खूप जास्त दमन असल्याच्या काळात माणसं उठाव करत नाहीत, ती उठाव अशाच वेळेस करतात जेव्हा शासकांची व्यवस्थेवरची पकड थोडी सैल पडलेली असते. आपण विरोधाभासाने भरलेल्या अशाच काळात जगत आहोत. एकीकडे आजच्या सगळ्या समाजात व्यक्तिगत स्वातंत्र्य खूप आहे, मात्र त्याचबरोबर पोलिटिकल करेक्टनेसच्या भ्रामक कल्पनांमुळे माणूस त्याच्या भावना व्यक्तही करू शकत नाही. कोंडीत सापडलेल्या या लोकांचा ट्रम्प हाच निर्विवादपणे chaos candidate होता आणि आहेही!

उपसंहार

मतदार याद्यांचे संशोधन करणं अगत्याचं आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे. मतदार यादीतल्या लोकांनी मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं तर त्यांची आयडी चेक केली जाते. पोस्टाने पाठवलेल्या मतपत्रिकांच्या लिफाफ्यांवर असलेल्या सह्यांची शहानिशा तितकी चांगली नाही. मतदानाच्या गुप्त राहण्यासाठी एकदा या लिफाफ्यातून मतपत्रिका काढली की ते लिफाफे आणि मतपत्रिका यांचा मेळ काही ठिकाणी घालणं अशक्य आहे. संशोधित नवीन स्टॅटिस्टिक्स उपलब्ध नाहीत पण २०१२ साली मतदार याद्यांमधे १८ लाख दिवंगत मतदारांची नावे यादीत होती, आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार यादीत नाव असलेले लोक २४ लाख इतके होते. त्यानंतरची स्टॅटिस्टिक्स उपलब्ध नाहीत. मतदार याद्या संशोधित करण्यास डेमोक्रॅटिक पार्टीने सतत विरोध केलेला आहे, या कारणाने की काळ्या आणि मायनॉरिटीच्या लोकांना कागदपत्रं दाखवण्यात अडचणी येऊन त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ शकतो (थोडक्यात "हम कागज नहीं दिखायेंगे"). पोस्टाने मतदान मोठ्या प्रमाणावर झाल्याने २०२०च्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचा फायदा झाला असं दिसून येतं आहे.

पोस्टाने मतपत्रिका पाठवल्यावर त्या मतदारांनी त्या परत पाठवताना लिफाफ्यावर सही करायची असते. सामान्यतः पध्दत अशी आहे की सही मतदार यादीतल्या किंवा ड्रायव्हर्स लायसन्सवरच्या सहीशी पडताळून बघायची असते. परंतु प्रत्यक्षात सगळ्याच राज्यांत ही सहीची शहानिशा करण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी शिथिल आहे. त्यामुळे या इलेक्शनमधे अवैध मतदारांनी मतदान केलं असण्याची शक्यता आहे. पण अवैध मतदानाची पडताळणी, संख्यात्मक मोजणी करणे अतिशय अवघड किंवा जवळजवळ अशक्य झालेलं आहे. दोन उमेदवारांमधला मतांतला फरक अनेक राज्यात इतका कमी आहे की या अवैध मतपत्रिकांनी निकाल बदलला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात याबद्दल आता काहीही करता येणं फारच कठीण आहे. या परिस्थितीत मतदानात गैरव्यवहाराचे आरोप झाल्यावर किती गोंधळ उडाला आहे हे आपण पाहतच आहोत. मध्य-न्यूयॉर्कमधल्या एका हाऊस सीटच्या चुरशीत मतांतला फरक फक्त १२ मतांचा होता. त्यानंतर ५५ मतपत्रिका अचानक सापडल्या आणि आणखी गोंधळ उडाला. ट्रम्प आणि बायडेन यांच्या मतांतला फरक इतका कमी नसला तरी चुरशीच्या राज्यांत १० हजारांच्या आसपास आहे.

पुढच्या निवडणुकीसाठी मतदार याद्या संशोधित केल्याशिवाय आणि पोस्टाने मतदान करण्याचं प्रमाण मर्यादित ठेवल्याशिवाय (किंवा त्या मतांच्या वैधतेची नीट शहानिशा करण्यासाठी कायदे केल्याशिवाय) निवडणुक प्रक्रियेच्या खरेपणावर असेलेले प्रश्नचिन्ह कदाचित परतपरत उपस्थित केलं जाऊ शकेल. मतदार याद्या संशोधित करण्यावरून डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांमध्ये पुढे अनेक वर्षे संघर्ष होत राहणार आहे. पश्चिम किनाऱ्यावर वॉशिंग्टन आणि इतर पाच राज्यात सार्वत्रिक पोस्टाने मतदान सर्व लोकांना २०११ सालापासून उपलब्ध आहे. ही पध्दत निवडणुकीत गैरव्यवहार होण्यासाठी एक मोठे कारण आहे असं रिपब्लिकन पक्षाचं म्हणणं आहे. ट्रम्प यांनीसुध्दा एका ट्विटमधून असं मत प्रदर्शित केलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाला या पध्दतीचा फायदा होत आलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की या पध्दतीत गैरव्यवहार होत नाहीत. डेमोक्रॅटिक पार्टी आपल्या फायद्याकडे लक्ष ठेवून सगळ्याच राज्यात सार्वत्रिक पोस्टाने मतदान आणू पाहील, आणि रिपब्लिक पक्ष याचा हिरीरीने विरोध करेल अशी चिन्हं आहेत.

ट्रम्प हा वाईट राष्ट्राध्यक्ष नव्हता. त्याच्या काळात अर्थव्यवस्था चांगली होती. त्याने अमेरिकन उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न थोडेफार केले होते (त्याचीही एक निराळीच चित्तरकथा आहे पण तो एक वेगळा विषय होईल). अमेरिकेला आपला औद्योगिक बेस परत पक्का करावा लागेल. औषधनिर्मितीसारख्या strategic उद्योगांना आऊट सोर्स करून चालणार नाही याची कुठे कुठे जाणीव आता व्हायला लागली आहे. कोव्हिडबद्दल त्याचे काम operation warp speed चांगला आणि परिणामकारक निर्णय ठरतो आहे, कोव्हिडची हाताळणी ठीकच होती, पण त्याचे कोव्हिडबद्दल बेजबाबदार बोलण्याची परिणती निवडणूक हरण्यात झाली असू शकेल, हे ट्रम्प यांना जाणवत असेल का? खनिज तेलाच्या बाबतीत अमेरिकेला स्वयंपूर्ण करून त्याने मध्यपूर्वेचं महत्व बरंच कमी केलं आहे (बायडेन हे मिळवलेलं सगळं यश, अचिव्हमेंट त्यांच्या "न्यू ग्रीन डिल" मृगजळामागे धावून घालवून बसतील). आणि काळ्या मतदारांना विशेष जिव्हाळ्याचा विषय फौजदारी कायद्यातल्या सुधारणा (Criminal Justice Reform) ज्याने कृष्णवर्णीय लोकांवर कायदा-व्यवस्थेत होणारा भेदभाव कमी करण्यासाठी कार्य झाले आहे. (इथे उल्लेखनीय हे आहे की ओबामा काळातही या सुधारणा होऊ शकल्या नव्हत्या. त्या ट्रम्प काळात त्यांच्या प्रशासनाला घडवून आणता आल्या आहेत.) त्याच्या बेछूट वागण्यामुळे चीन वचकून राहिला होता. भारतीय वंशाच्या अमेरिकनांना हा काळ चांगलाच होता असं म्हटलं पाहिजे. त्याचं सगळ्यात मोठं यश काही असलं तर त्याने या frightening consensusने झालेली कोंडी फोडली आहे. रिपब्लिकन पक्षाला ट्रम्प समर्थकांची कैफियत ऐकणं भाग पडलं आहे. पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरचे एलिट जेव्हा या consensusमधून बाहेर पडतील तेव्हा त्यांनासुध्दा ही कैफियत ऐकू जाईल.

समाप्त

field_vote: 
0
No votes yet

निवडणूक मशीनचं मार्केट फक्त तीन कंपन्यांची मोनोपॉली आहे. हे खरंच वाईट आहे. आणि ही यंत्रं विंडोज वापरतात! काय म्हणाल आता? Hardware root of trust वापरून hardening केलेलं हार्डवेअर वापरून, ओपन सोर्स कोड, लिनक्स वापरून, सिक्युरिटी रिव्ह्यू केलेली यंत्रं नॅशनल लॅबोरेटरीला डिझाईन करून, तयार करून घेणं अवघड नाही. हे घडण्याची शक्यता फार कमी आहे.

Hardware root of trust वापरून hardening केलेलं हार्डवेअर/ओपन सोर्स / लिनक्स ह्याचा आणि सिक्युरिटीचा संबंध समजला नाही.
जे काही यंत्र आहे त्याची सुरक्षा (हार्डवेअर) आणि संगणकावरचं सॉफ्टवेअर ह्याची सुरक्षा ह्या वेगळ्या बाबी आहेत.
जे काही क्रिप्टोग्राफी वगैरे अल्गोरिथम ह्या सॉफ्टवेअरसाठी वापरले जातात ते बहुमानित आणि प्रमाणित असल्याशी मतलब.

की विंडोज पापिलवार असल्याने त्याचं हॅकिंग लिनक्सपेक्षा जास्त सोप्पं आहे- हा मुद्दा आहे?

बाकी पास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख तुमच्या कन्झम्प्शनसाठी नाही, हे उघड आहे. तेव्हा... समजले ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही म्हणजे ...
हार्डवेअर -सॉफ्टवेअर वगैरे आलं म्हणून म्या इचारलं.
बाकी तात्या समर्थ आहेतच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

याला अनेक पदर आहेत. विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टीम सिक्युरिटी साठी प्रसिद्ध नाही (किंवा वाईट अर्थाने प्रसिध्द आहे). विंडोज मधे अनेकदा Zero Day Vulnerabilities [ https://www.techrepublic.com/article/what-is-a-zero-day-vulnerability/, https://beebom.com/google-windows-zero-day-exploit/] सापडलेल्या आहेत. आणि हे नवीन व्हर्जन्स बद्दल आहे, जुन्या unsupported व्हर्जन्स ची सिक्युरिटी तर आणखीनच "रामभरोसे" असते कारण त्याचे exploits (म्हणजे त्यातला दोष वापरून मशीन काबीज करण्याची, Pwn करण्याची क्लृप्ती) जगभरात माहिती असतात, आणि ते फिक्स करण्यासाठी पॅचेस पण नसतात. डोमिनियन कंपनीची मतदानाची मशीन्स अजूनही Windows ७ वापरतात ज्याला मायक्रोसॉफ़्ट आता सपोर्ट करत नाही [ https://www.theverge.com/2019/7/13/20692952/us-presidential-election-202... ]. दुसरा मुद्दा हा की डोमिनियन ही मशीन्स इंटरनेट शी जोडलेली ठेवत आलेलं आहे [ https://www.nbcnews.com/politics/elections/online-vulnerable-experts-fin... ] याने तुमच्या मशीन ला हॅक करण्याची शक्यता अनेकपट वाढते आणि हॅक सहजपणे जगाच्या दुसऱ्या भागात बसून करता येऊ शकतो. फायरवॉल या हॅकर्स साठी फार मोठा अडथळा नसतो. या इलेक्शन मधेही मशीने ऑनलाईन होती असे क्लेम्स आहेत. मशिन्स चे ऑडिट झाल्याशिवाय या क्लेम्स ची पडताळणी होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट ही की विंडोज चा सोर्स कोड प्रसिद्ध केलेला नसतो, त्यात निरनिराळी उपकरणं (उदाहरणार्थ USB drives) यांचे ड्रायव्हर्स (firmware, software) हे त्या त्या कंपन्यांचं proprietary असतं, तेही सहसा ओपन सोर्स नसतं. ओपन सोर्स कोड असला तर सगळं जग ते बघतं आणि त्यातले दोष, vulnerabilities बाहेर येतात आणि त्या फिक्स केल्या जातात. Closed source च्या कोड मधे अनेक दोष असू शकतात. हॅकर लोक या गोष्टींची माहिती ठेवतात आणि हॅक करतात. अनेकदा कंपन्यांना त्यातले दोष कोणी सांगतही नाही. आणखी एक मुद्दा आहे डिझाईन. विंडोज मधे सिक्युरिटी हा एक नंतर आलेला विचार आहे (afterthought). या ऑपरेटिंग सिस्टीम मधे पायाभूत सिक्युरिटी फार नंतर टाकली गेली आहे. हा मुळात डिझाईन चाच दोष आहे. या मतदानाच्या मशीन्स ना USB जोडण्याची सोय ठेवण्यात आलेली आहे. USB ने प्रॉब्लेम येऊ शकतात. जगातल्या गुप्तचर संस्था USB हॅकिंग बद्दल माहिती ठेवून आहेत. इराण च्या युरेनियम शुध्दीकरण यंत्रांमधे बिघाड निर्माण करणारी Stuxnet ही malware प्रणाली याचं एक उदाहरण आहे [ https://www.mcafee.com/enterprise/en-us/security-awareness/ransomware/wh... ]

चांगल्या सिक्युरिटी साठी मशीन ला वापर होत असतांना कोणतेही कनेक्शन ठेवत नाहीत - JTAG, UART, USB वगैरे सुध्दा हार्डवेअर मधे ठेवत नाहीत. या ठिकाणी उल्लेखनीय हे आहे की भारतात ECIL ने तयार केलेली मशीन्स इंटरनेट ला जोडता येत नाहीत. कनेक्शन्स ठेवत नाहीत कोणतीही. सिक्युरिटी सिस्टीम च्या सुरक्षितते चे डिझाईन करतांना Threat Modeling नावाचा analysis केला जातो. Threat Modeling मधला सर्वप्रथम नियम हा आहे की Attack Surface कमीत कमी ठेवायचा. इंटरनेट वर मशीन कनेक्ट न केल्याने JTAG, UART, USB आणि इतर interfaces न ठेवल्यामुळे Attack Surface (ज्यामधून हल्ला होऊ शकतो असे क्षेत्र) कमी होतो

सगळ्या सिक्युरिटी चा पाया हा secure root of trust असतो. हे एकप्रकारचं पासवर्ड असतं जे manufacturing च्या वेळेस चिप मधे टाकलं जातं. याला चिप सिक्रेट अशी संज्ञा आहे. या चिप सिक्रेट ला फोडायला फार कठीण असतं आणि या हार्डवेअर मधे अनेकदा कोणी ते सिक्रेट काढायला बघेल तर चिप सिक्रेटला self-destruct करण्याची सोय असते. या चिप सिक्रेट ने encrypted असलेला bootloader हा त्या सिक्युरिटी प्रणालीतली दुसरी कडी. हा bootloader signed असतो. त्यात कोणी फेरफार केले तर मशीन चालूच होत नाही. bootloader signed नसेल किंवा त्याला हॅक केलं तर Rootkit टाकता येतात. Rootkit शोधणं अतिशय कठीण, जवळ जवळ अशक्य असतं [ https://www.lifewire.com/what-is-a-rootkit-2487272 ] Bootloader च्या नंतर ऑपरेटिंग सिस्टीम येते. लिनक्स सारख्या ऑपरेटिंग सिस्टिम्स ओपन सोर्स असतात, त्यांचा कोड लोक खूप लोक बघत असतात. त्याचे डिझाईन मधे सिक्युरिटी अंगभूत होती त्यामुळे ती जास्त सरस आहे. अशा मशीन्स ना hardening करतात. सिक्युरिटी ची इतकी काळजी घेतली म्हणजे हॅक होणार नाही असं नाही. डिझाईन, हार्डवेअर, root of trust, secure bootloader, secure OS, hardening वगैरे सगळे असले तरी जर सिक्युरिटी प्रोसिजर्स नीट नसतील तर vulnerabilities तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ मतपत्रिकाची chain of custody महत्वाची आहे. या निवडणुकीत जॉर्जिया मधे ही chain of custody काही ठिकाणी पाळली गेली नाही असं वृत्त आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सांख्यिकीदृष्ट्या मला ह्या सगळ्यातच मजा अशी वाटते की बहुतेकशी मतं बायडन का ट्रंप अशीच असतात. (इतर उमेदवार असतात, पण त्यांना मिळणारी मतं छाटछूट असतात.) म्हणजे ही मतं अशी नसतात -
अर्थकारणाबद्दल ट्रंपला किती मार्क देणार, आणि बायडनला किती? कोव्हिडबद्दल कुणाला किती मतं देणार? ओबामाकाळात संसर्गजन्य रोगांना अटकाव करण्यासाठी सुरू केलेली यंत्रणा ट्रंपनं पहिल्या दोन वर्षांत मोडून काढली, ह्याबद्दल कुणाला किती मार्क देणार ... किंवा काही.

किंवा ट्रंपला मी २ मार्क देते, आणि बायडनला ६ आणि बाकी उमेदवारांना २; अशीही सोय नसते. मग त्यातून मोठमोठ्या मुद्द्यांबद्दल एवढे खात्रीशीर निष्कर्ष कसे काढणार, ह्याबद्दल मला कुतूहल वाटतं. सांख्यिकी म्हणून.

उलट, उदाहरणार्थ बॅनर्जी-दुफ्लो त्यांच्या Good Economics for Hard Timesमध्ये लिहितात की ज्या राज्यांमध्ये स्थलांतरित, गौरेतरांचं प्रमाण कमी आहे, तिथे वंशवाद पसरण्याचं किंवा 'मेक्सिकन पुरुष बलात्कारी असतात' असं मानण्याचं प्रमाण फार जास्त आहे. इथे हे सांगायचं कारण असं की विवक्षित मुद्दा घेऊन कुणी अभ्यास केला तर मग त्या मुद्द्यातले बारकावे पटतात.

माझ्या जिमच्या एका ट्रेनरचं आडनाव आहे लिंबाँ; ते वाचून रश लिबाँची आठवण झाली मला. पण तो मुलगा अत्यंत मिलेनियल-उदारमतवादी आहे. पण मी त्याच्याकडे बघून निमशहरी भागातून आलेल्या आणि आता शहरात नोकरी करणाऱ्या गोऱ्या तरुणांबद्दल निष्कर्ष काढू शकत नाही.

वंशवादाबद्दल दुसऱ्या बाजूची गंमत बघायची असेल तर यू.एस. ओपन टेनिसचं औपचारिक फेसबुक पान पाहा. तिथे नेओमी ओसाकाबद्दल चिकार गरळ ओकलेलं सापडतं. नियमितपणे. कारण ती अर्धी काळी, हैतीची आहे; तिनं जिला हरवलं ह्या वर्षी ती सरीना विल्यम्स स्वतः काळी असली तरी 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'बद्दल काही बोलत नाही; आणि ओसाकानं त्यांच्या समर्थनार्थ मास्क यू. एस. ओपनच्या वेळेस घातले होते. पोलिसी हिंसेत मारल्या गेलेल्या काळ्या लोकांची नावं असणारे मास्क. लोकांनी कितीही आचकट-विचकट बडबड केली तरी आपण ट्रोल होऊ नये, हे बरोबरच. पण मुळात वंशवादी ट्रोल आहेत, हे नाकारता येत नाही. आणि त्यात ट्रंप-का-बायडन अशा सोप्या पर्यायांमुळे मुळात व्यवस्थाच लोकांचं ध्रुवीकरण करणारी आहे. माननीय आणि जाऊ घातलेले राष्ट्राध्यक्ष त्याला अतीव प्रेमादरानं त्या ध्रुवीकरणाला खतपाणी घालतात.

ट्रम्प हा वाईट राष्ट्राध्यक्ष नव्हता.

हे मत मांडण्यामागची भूमिका स्पष्ट केलीत ते बरंच झालं. कारण राष्ट्रप्रमुखाकडून मी बऱ्याच जास्त अपेक्षा ठेवते. लोकांना बंदुका घेऊन कायदे मोडायला उद्युक्त करू नये; लोकांना सवंग नावं ठेवू नयेत; आपल्या प्रशासनात काही बेवनाव असतील तर त्याचा ट्विटरवर तमाशा करू नये; वंशवादी विधानं ('चायना व्हायरस' हे एक उदाहरण) करू नयेत; मुलं आणि पालकांची ताटातूट करून त्यांना निरनिराळ्या तुरुंगात टाकण्याचा पायंडा पाडू नये; आणि अनेक.

कालच मी एका इच्छुक इंटर्नची मुलाखत घेतली. 'तिच्या वयाच्या मानानं ठीक कोड लिहिला' असा शेरा त्यावर लिहिला. माझा मॅनेजर (किंवा मीसुद्धा) मजेशीर कोड लिहितो तेव्हा त्याबद्दल जाहीर चर्चा आणि विनोद होतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरोबर. स्टॅटिस्टिकल अनालिसिस, बेनफर्ड वगैरे हा सांख्यिकी, स्टॅटिस्टिकल डेटा वरच केला जात आहे, यात anecdotes सांगोवांगीच्या गोष्टी धरत नाहीत. ऑडिट झाले आणि मतदान मशीन मधला timestamp असलेला raw डेटा जर संशोधकांना दिला गेला तर अधिक चांगले अनालिसिस होऊ शकतील.

आणखी एक प्रकारचं अनालिसिस matching records मतदानाचे रेकॉर्ड आणि लोकांचे स्थलांतरणाचे मेळ लावणं (राज्य किंवा कौंटी बदलून जाण्याचे रेकॉर्ड) आणि त्यातले अवैध मतदान शोधणे, मुत्यू चे रेकॉर्ड आणि मतदानाचे रेकॉर्ड यांचे मेळ बसवणं, मतदार याद्या संशोधित करून त्यातले एका पेक्षा जास्त राज्यात रजिस्टर्ड मतदार, दिवंगत मतदार काढून टाकणं इ साठी उपयोगात आणलं जाऊ शकतं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ती सगळी माहिती अद्ययावत ठेवली पाहिजे, याबद्दल दुमत नाहीच. पण ह्या सगळ्या अवैध मतदारांच्या नावानं मतदान झालं का, हा प्रश्न घोटाळा होता का ह्यासाठी महत्त्वाचा आहे.

आपले जाऊ घातलेले राष्ट्र्ध्यक्षही फ्लोरिडातले मतदार आहेत; आणि टपाली मतदान करणाऱ्यांतले आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ह्या सगळ्या अवैध मतदारांच्या नावानं मतदान झालं का, हा प्रश्न घोटाळा होता का ह्यासाठी महत्त्वाचा आहे. >> याबद्दल थोडं न्यूज मधे आलेलं आहे
(विशेषतः जॉर्जिया बद्दल. Voter Integrity चे Matt Braynard यांनी ते analysis केले आहेत. Matt Braynard बद्दल : https://arstechnica.com/tech-policy/2020/11/us-govs-ciso-takes-leave-to-...)

सिडनी पॉवेल यांचा (क्रॅकेन) जॉर्जिया बद्दल दावा दाखल केला होता. अनेक स्पेलिंगच्या चुका या फिर्यादीत होत्या, मिशिगन बद्दल त्यांचा दाव्यात
इतरही बऱ्याच चुका होत्या [ https://hotair.com/archives/ed-morrissey/2020/11/26/krakens-released-pow... ]

जॉर्जिया दाव्यातल्या चुका आता त्यांनी दुरुस्त केलेल्या दिसतात. [ https://www.courtlistener.com/docket/18694655/pearson-v-kemp/ ]
त्यांनी जॉर्जिया च्या निवडणुकीत गैरव्यवहार झाले आहेत आणि ते रिझल्ट चूक असल्यामुळे रोखून धरले जावेत असा relief आपल्या दाव्यात मागितला होता.
कोर्ट डॉकेट बघितलं की एक दाव्यासाठी किती तयारी लागते, किती टप्पे असतात हे लक्षात येतं. अनेक राज्यांमध्ये अनेक दावे लावणं अशक्यप्राय आहे.

अनेक आरोप त्या फिर्यादीत होते, पण त्यातल्या दोन आरोपांची शहानिशा सहज करता येऊ शकते असं वकील हरमीत धिल्लन यांनी ट्विट द्वारे म्हटलं होतं. हरमीत धिल्लन या ट्रम्प यांच्या २०२० निवडणूक कॅम्पेन च्या कायदेविषयक सल्लागार आहेत. [https://twitter.com/pnjaban/status/1331850866442190850]

"Further, as calculated by Matt Braynard, there exists clear evidence of 20,311 absentee or early voters in Georgia that voted while registered as having moved out of state. (See Id., attachment to report).Specifically, these persons were showing on the National Change of Address Database (NCOA) as having moved, or as having filed subsequent voter registration in another state also as evidence that they moved and even potentially voted in another state." दुसरा मुद्दा "Mr. Braynard also found a pattern in Georgia of voters registered at totally fraudulent residence addresses, including shopping centers, mail drop storesand other non-residential facilities"

डिसेंबर ७ ला फेडरल कोर्टाने जॉर्जिया बद्दल दावा फेटाळला आहे [ https://www.cnbc.com/2020/12/07/judge-dismisses-sidney-powell-lawsuit-ch... ]. मिशिगन च्या दाव्यात त्रुटी दिसून आलेल्या होत्या आणि तो आधीच फेटाळला गेला होता.

जॉर्जिया दाव्यात मात्र कोर्टाने आरोपांची शहानिशा करण्याचा प्रश्न हाती घेतला नाही याचं कारण फिर्यादींना या कज्ज्यात standing (locus standi) नाही असा निर्वाळा कोर्टाने दिला आहे. केसच्या merits मधे न जाता कोर्टाने फेडरल कायद्यात मागितलेला relief देण्यासाठी फेडरल कायद्यात कोणतीही तरतूद नाही असं सांगितलं आहे. हा दावा पॉवेल यांनी खालच्या कोर्टात (जिथे त्यांना कोर्टाला jurisdiction असणार) तिथे का दाखल केला नाही ?हे समजत नाही. कदाचित त्या कोर्टाच्या टाइमलाईन ने safe harbor deadline पेक्षा उशीर झाला असता. वकील, appellate election law चे तज्ञ सांगू शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या सगळ्या अवैध मतदानाचं घोडामैदान जवळ आहे. तोवर हवेत दांडपट्टे कशाला फिरवायचे, नाही का?

अपडेट - प्रतिसाद लिहिला आणि तासाभरात बातमी समजली. टेक्सासच्या अटर्नी जनरलनं तात्यांच्या बाजूनं दाखल केलेला खटला न्यायालयानं निकाली काढलाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

फेसबुकावर डाळ शिजली नाही म्हणून ऐसीवर येऊन स्नेक ऑईल विकायचे! असलं काही तरी फक्त तात्यांचे समर्थकच करू जाणे!

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि हो, गेल्या चार वर्षांत 'द न्यू यॉर्कर'नं गरीब-गोऱ्या अमेरिकी लोकांबद्दल चिकार लेखन छापलं आहे. किनारी भागातलं उदारमतवादी साप्ताहिक आहे न्यू यॉर्कर. पॉश, स्नॉब, उदारमतवाद्यांमध्ये चवीचवीनं वाचलं जातं ते. तीच गत 'द न्यू यॉर्क टाईम्स'चीही.

एरवी विस्कॉन्सिनमधले दूधविक्रेते शेतकरी तात्यांच्या चीनवर आयातकर लावण्याच्या धोरणामुळे देशोधडीला लागले आहेत; आणि 'रस्ट बेल्ट'मधल्या लोकांना दारिद्र्याच्या उंबरठ्यावर असूनही NHSसारखी सुंदर आरोग्यसेवा का नको असते, हे मला समजलं नसतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि हो, गेल्या चार वर्षांत 'द न्यू यॉर्कर'नं गरीब-गोऱ्या अमेरिकी लोकांबद्दल चिकार लेखन छापलं आहे. किनारी भागातलं उदारमतवादी साप्ताहिक आहे न्यू यॉर्कर. पॉश, स्नॉब, उदारमतवाद्यांमध्ये चवीचवीनं वाचलं जातं ते. तीच गत 'द न्यू यॉर्क टाईम्स'चीही. >> Smile तुम्ही कदाचित नकळत सत्य सांगून गेला आहात. केवळ चवीचवीने वाचण्यासाठीच हे लेख छापलेले असतात, किनारी भागातल्या Woke लिबरल क्लास चे आर्थिक हितसंबंध ग्लोबलायझेशन शी, आणि वित्तियकरण (Financialization ) शी अत्यंत घनिष्ठपणे निगडित आहेत. अशा लेखांत केलेला analysis पटून अमेरिकन औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी हा क्लास स्वतःची आर्थिक झळ सोसून काही करेल का ? ती शक्यता फार कमी आहे. कोस्टल लिबरल्स चा वितंडवाद हा Overton Window चा प्रकार असतो [ https://en.wikipedia.org/wiki/Overton_window ] नोम चॉम्स्की यांनी म्हटलं आहे त्याप्रमाणे त्या मीडियात ते काय बोलणं, कशाबद्दल बोलणं हे acceptable आहे याच्यावर पूर्ण कंट्रोल ठेवतात, आणि त्या चौकटीच्या आत खूप उहापोह होऊ देतात ज्यामुळे असा समज दृढ होतो की मीडियात खूप विचारांचे स्वातंत्र्य आहे, आणि सगळी मतं मांडली जात आहेत. प्रत्यक्ष हेतू आणि परिणाम त्या चौकटीचा मतप्रवाह बळकट करण्यात असतो, आणि चौकटी बाहेरचे विषय fringe, extreme, cultist आणि त्यामुळे सभ्य चर्चेच्या बाहेरचे आहेत असं मत पक्कं केलं जातं

एरवी विस्कॉन्सिनमधले दूधविक्रेते शेतकरी तात्यांच्या चीनवर आयातकर लावण्याच्या धोरणामुळे देशोधडीला लागले आहेत; >> Industrial Base ला गळती लावून मध्य अमेरिकेतल्या कामगार वर्गाला या परिस्थितीत टाकण्यासाठी अनेक administrations जबाबदार आहेत. त्याची सुरुवात चीन ला जागतिक व्यापारी व्यवस्थेत आणल्यापासून झाली. बिल क्लिंटन यांच्या काळात याचा वेग पुष्कळ वाढला, GWB यांनी financialization सुरु ठेवलं कारण त्यांना त्यांची युध्द करायची होती. ओबामा यांची कारकिर्द तर युद्धखोरीच्या बाबतीत GWB यांच्या पेक्षा वेगळी नव्हती. आजही कामगारांच्या, युनियन्स च्या पाठिंब्यावर मोठ्या झालेल्या डेमोक्रॅटिक पार्टीला अगदी शहरी कामगार वर्गाने सुध्दा फार थोडा कौल दिला, ग्रामीण ब्लू कॉलर वर्ग तर बराचसा रिपब्लिकन पक्षाकडे वळलेला आहे [ https://www.nytimes.com/2020/12/05/us/politics/biden-blue-collar-voters...., https://www.nytimes.com/2020/11/27/opinion/trump-democrats-coronavirus.html ]

'रस्ट बेल्ट'मधल्या लोकांना दारिद्र्याच्या उंबरठ्यावर असूनही NHSसारखी सुंदर आरोग्यसेवा का नको असते, हे मला समजलं नसतं. >> कारण सरळ आहे. अमेरिकन मतदाराला त्यांच्या गव्हर्नमेंट बद्दल प्रचंड mistrust आहे! "I'm From The Government And I'm Here To Help" या वाक्याने सुरु होणाऱ्या गोष्टीबद्दल किती स्केप्टीसिझम जनतेत आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ही अगदी gut reaction असली तरी विचारांती सुध्दा सरकारी क्षेत्रात वैद्यकीय सेवा ठेवणे (nationalization, socialization of medicine) यात अनेक त्रुटी आहेत. अशा सगळ्या सिस्टिम्स खूप पैसा शोषतात आणि corruption, economic malinvestment आणि waste
हा अशा सिस्टीम मधे खूप जास्त होतो (कारण कोणाच्याच खिशातून ते पैसे जात नसतात) जोपर्यंत हा पैशाचा ओघ अव्याहतपणे सुरु असतो तोपर्यंत अशा सरकारी यंत्रणा
रुटूखुटू तरी चालतात. पैसे आटायला लागले की अशा यंत्रणा साफच कोलमडतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

पण गेली चार वर्षं काही उदारमतवादी माध्यमं हे आणि ह्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचं वास्तवही छापत आली आहेत. म्हणजे गरीब-गोऱ्या लोकांना एनेचेससारखी सुंदर व्यवस्था का नको असते, ह्याचं उत्तर तुम्ही म्हणता तसं सरळ आणि साधं असतं असं ते म्हणत नाहीत. त्यातली मानवी स्वभावाची गुंतागुंत माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तेही त्या व्यवस्थेत काम करणाऱ्या डॉक्टरकडून लेखन करवून घेतात. वर पुन्हा 'आम्ही म्हणतो तेवढ्यावरच विश्वास ठेवू नका; आणखी चार माध्यमांमध्ये काय म्हणलं जातंय तेही वाचा' असंही तात्या निवडून आल्याआल्या म्हणत होती.

मग तुम्ही नवीन काय सांगत आहात, आणि ते कशाच्या आधारावर असा प्रश्न पडला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Overton Window - दुसरं काय ? तुम्ही म्हणताय त्या प्रकारचा "उदारमतवादी" मीडियात केला गेलेला उहापोह Nuance (बारकावे, गुंतागुंत) यांनी भरलेला आणि त्यामुळे बौध्दिक दृष्ट्या complete वाटणारा आणि satisfying वाटत असेल. हे सगळे Overton Window मधले बौध्दिक घुसळणी चा आभास करणारे debates असतात. आणि त्यातून मिळणारं बौध्दिक समाधान सुध्दा हे एक फसवं समाधान आहे.

ज्या लोकांच्या मतांच्या बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, त्यांच्याबद्दल रिसर्च आणि कॉमेंटरी करणाऱ्या मेनस्ट्रीम लिबरल मीडियाच्या प्रिझम मधून, त्यांच्याकडून तुम्हाला किती समजणार आहे नक्की ? Analogy सांगतो - भारतात असलेला पुरोगामी वर्ग हा मुख्यत्वे सवर्ण आहे. या लोकांनी केलेल्या रिसर्च आणि अनालिसिस यावरून दलित समाजाचं चित्रण पूर्ण होऊ शकतं का ? तर ते अर्थातच होऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला दलित नॅरेटिव्ह्स वाचणं गरजेचं असतं.

त्याच प्रमाणे मध्य अमेरिकेच्या attitudes, त्यांचे choices त्यांची मूल्यं आणि प्रश्न त्यांच्याकडूनच ऐकले पाहिजेत आणि त्याकरता मेनस्ट्रीम मीडियाच्या परिघा बाहेर डोकावणे गरजेचे आहे. याचा अर्थ तुम्ही त्या मेनस्ट्रीमच्या बाहेरच्या नॅरेटिव्ह ला Gospel Truth समजून चालावे असा अजिबात नाही. तिथेही तुमच्या तर्कबुध्दीला जे पटेल तेच तुम्ही घेणे अपेक्षित आहे. या नॉन मेनस्ट्रीम मीडियातल्या कॉन्स्पिरसी थियरीज वगैरे यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, किंवा त्या लक्षात घेऊन थोड्या बाजूला ठेवता आल्या पाहिजेत, कारण तसं जर केलं तर खरोखरीच खरे मुद्दे जे आहेत (उदा आर्थिक, रोजीरोटीचे मुद्दे) ते आपल्याला समजू शकतात. मध्य अमेरिका जिथे आपले अनुभव सांगते आणि दृष्टिकोन पुढे ठेवते अशा मेनस्ट्रीम बाहेरच्या इंटरनेटवरच्या आणि सोमि वरच्या मीडिया बद्दल "नकोच ते, मी ते वाचणारच नाही" असं म्हणून चालणार नाही. अशी प्रतिक्रिया त्या लोकांच्या बद्दल एक प्रकारच्या prejudice मधून आणि भयांतून येणारी आहे हे स्वतःशी मान्य करता यायला पाहिजे, recognize करता आलं पाहिजे. वेगळे मतप्रवाह वाचून बघण्याइतके तरी आपण intellectually ओपन असलं पाहिजे. असं केलं तर एक निराळा समन्वय साधणारा दृष्टिकोन (synthesis) आपण मिळवू शकतो असं माझं मत आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला नीटसं समजलं नाही. किंवा उदारमतवादी माध्यमं काय म्हणतात - आमचंच काय ते खरं मानून चालू नका - हे तुम्हाला फारसं समजलंयसं दिसत नाही. ते असो.

दोन-चार दिवसांतून एखादा हफिंग्टन पोस्टवरच्या विरोधकांच्या प्रतिक्रिया, यू. एस. ओपन आणि एनपीआरच्या फेसबुक पानांवरच्या प्रतिक्रिया मी हौशीनं वाचते. तिथेही पुरोगामी, उदारमतवादी लोक वंशवादी, जनरल किंवा सर्वद्वेष्ट्या प्रतिक्रिया लिहीत असतील असं मला वाटत नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर खरंच असेल. मला फार काही समजत नाही त्यातलं.

माझ्या मते तोच द्वेष ओरिगिनल आहे; ती उदारमतवादी वा पुरोगाम्यांची चाल वाटत नाही. आणि त्यामागच्या रागाची कारणं कुणी चमच्यानं भरवण्यापेक्षा थेट वाचणं आणि त्यानुसार आपलं मत बनवणं सोयीचं वाटतं.

तशी मी राणा अय्युबचं ट्वीटर फीड आणि तिथला मुसलमानद्वेष/राणा-अय्युब-द्वेषही हौशीनं वाचते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.