अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या.
आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.)
असं अनेकदा होतं. काही गाणी आपण रेडिओ, टीव्ही, सीडी. इ. माध्यमांतून पुनः पुन्हा ऐकतो, पुनर्प्रत्ययाच्या आनंदासाठी. काही गाणी तर इतकी लवकरच का संपून जातात असंही वाटतं. 'नखरेवाली' या गाण्यात किशोर कुमारला अजून एक तरी कडवं का नाही इथपासून 'किरवाणी' या रागातली गीतं कितीही ऐकली तरी अधुरीच का वाटतात (आणि मनात तो राग रेंगाळतच का राहतो) असे प्रश्न मला वारंवार पडत आले आहेत.
याउलट काही गाणी रेडिओ, टीव्ही, कॅसेट, सीडी, मोबाईल, युट्यूब कुठूनही ऐकू आली की आपल्याकडून त्यांना बदलणं किंवा बंद करणं या क्रिया घडवण्यासाठीच तयार केली जातात का?
कधी कधी मला असं वाटतं की रसग्रहणाचेही कदाचित तीन प्रकार असावेत.
पहिलं साधं-सोपं रसग्रहण. उसाचा रस पिण्यासारखं. निव्वळ आनंद. कितीही वेळा घ्यावा. आपली भूमिका फक्त घेणाऱ्याची.
दुसरं रसग्रहण म्हणजे, गाणं चवीनं ऐकणं किंवा पुस्तक चवीनं वाचणंच; पण त्याबरोबरच त्यातली सौंदर्यस्थळं जाणून घेऊन. त्या रागांच्या, कवितांच्या किंवा नाटकांमधल्या संवादांतल्या खुब्या लक्षात घेऊन केलेलं. बालगंधर्वांनी भीमपलासमध्ये लावलेल्या शुद्ध निषादासारखं. (अर्थात, या गोष्टीचा विषाद वाटणारेही काही महाभाग होतेच.)
तिसरा 'रसग्रहणा'चा अर्थ - रसाला लागलेलं ग्रहण - असा असेल का?... असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो. (आता अर्थात, प्रश्न पडतो हे म्हणणं मला खरं तर पटत नाही. तो तर उभा असतो... 'खडा सवाल' म्हणून आणि आपल्याला टोचत असतो, आपल्या विचारधारेत - की रसात - खडा आल्यासारखा.) या रसग्रहणात 'चंद्रग्रहण' म्हणजे चंद्राला लागलेलं ग्रहण, सूर्यग्रहण म्हणजे 'सूर्याला लागलेलं ग्रहण'; त्याचप्रमाणे 'रसग्रहण' म्हणजे रसाला लागलेलं ग्रहण असं अभिप्रेत आहे.
असो. रसग्रहण कुठलंही असो, विषय गोड असला म्हणजे झालं. पेरू खाणाऱ्याला बियांचं वावडं नसावं.
अन्नू मलिकबद्दलचं रसग्रहण हे दुसऱ्या प्रकारातलंच आहे हे तरीही मला सुरुवातीलाच (म्हणजे नमनाला घडाभर तेल झाल्यावर) नम्रपणे, नमून, नमूद करावंसं वाटतं.
"अन्नू मलिक यांच्याबद्दल मला एक चांगली गोष्ट सांगायची आहे, " एका कार्यक्रमात एक निवेदक म्हणाला होता, "की ते सरदार मलिकांचे चिरंजीव आहेत." या वाक्यावर सगळे श्रोते हसले आणि अन्नू चिरंजीव असला तरी त्याचं संगीत कसं चिरंजीव नाही याची त्यांना जाणीव झाली. वास्तविक, 'सारंगा तेरी याद में' हा एक रंग सोडला तर मला तरी सरदारांचे इतर रंग काही फारसे याद किंवा ज्ञात नाहीयेत. अन्नूचे मात्र अनेक राग-रंग बघितले आहेत. पण काय आहे, जुन्या लोकांसारखा अन्नू मलिकला कुणी वाली (किंवा राममित्र सुग्रीव) नसल्यामुळे कुणीही माकडं त्याची चेष्टा करू शकतात. वास्तविक हिंदीत 'चेष्टा' म्हणजे 'प्रयत्न'. तशी संगीताची चेष्टा अन्नू मलिकनं खूपच केलेली आहे, याबद्दल कुणाचं दुमत नसावं!
'एखादी गोष्ट पडणे म्हणजे त्याचा अण्णू गोगट्या होणे' हे जसं पु.ल. 'अंतू बर्वा'त म्हणून गेले होते, तसाच काहीसा समज माझा अन्नू मलिकबद्दल झाला होता. ‘एखादे गाणे न आवडणे म्हणजे ते अन्नू मलिकचे संगीत असणे' असं मला अनेक दिवस वाटत आलं होतं.
'त्यासाठी रसिकता म्हणजे काय हे तुम्हांला आधी कळलं पाहिजे' असं माझे एक विद्वान मित्र म्हणाले. मी त्यांना पु. लं. च्या 'गाठोड्या'तली सामंतांच्या घरची मासे खाण्याची 'रसिकता' सांगण्याचा मोह आवरला. आता त्यांच्यासारखं (म्हणजे आमच्या मित्रवर्यांसारखं - सामंत वैनींच्या बांगड्याच्या आमटीसारखं नाही -) रसग्रहण जर मी करायला लागलो तर माझी काही खैर नाही.
"१९६० नंतर संगीत संपलं." (वास्तविक आमच्या मित्रांचा तेव्हा जन्मही झाला नव्हता.) "शास्त्रीय संगीतात फक्त आमिर खान आणि बडे गुलाम अली खान, तर चित्रपट संगीतात नौशाद, सज्जाद आणि सुरुवातीचा मदन मोहन यांपलीकडे काही दम नाहीये", असा त्यांनी एकदा मला सज्जड दम भरला होता. (आता सज्जादचा नौशादवर फार राग होता हे त्यांना माहिती होतं की नव्हतं याची शहानिशा मी न करता फक्त त्यांच्यासमोर 'ये हवा ये रात ये चांदनी' हे माझं सर्वांत आवडतं गाणं आहे अशी कबुली दिली होती.)
सज्जादचं जाऊ द्या; पण नौशाद किंवा शमशादवरसुद्धा लिहिण्याची कुणाची बिशाद आहे? शिवाय, जुन्या कुठल्याही विषयावर काही लिहायचं म्हणजे हे मित्र सोडून अनेक इतर व्यक्ती-प्रकृतींनाही सामोरं जावं लागतं. म्हणून आमचा बिचारा अन्नू बरा. आता साधी गोष्ट घ्या. 'बैजू-बावरा'तलं प्रत्येक गाणं (आमिर खान यांच्या गाण्यांचा अपवाद वगळता) 'हो जी हो' नं सुरू होतं. म्हणून आम्ही ते संगीत चांगलं या म्हणण्याशी 'हो ला हो' करतो. 'बचपन की मुहब्बत को' आळवतो. पण अन्नूच्या 'बाली उमर ने मेरा हाल वो किया' ला नावं ठेवतो. वास्तविक दोन्ही चित्रपटांच्या गीतांमध्ये लता मंगेशकर आहे. आता बैजूमधल्या बावऱ्या महंमद रफी ऐवजी इथे अजीजीनं गायलेल्या महंमद अजीजचाच काय तो फरक.
याखेरीज, अगदी बडे गुलाम अली खान किंवा आमिर खान नसले तरी गुलाम अलीच्या आवाजात त्याच चित्रपटात गीत ध्वनिमुद्रित करूनही अन्नू 'चमकता चांद' होण्याऐवजी 'आवारगी'च 'टूटा हुआ तारा' ठरला. हीच त्याची गत पुढे (चालू काळातल्या) आमिर खानला घेऊन केलेल्या 'अकेले हम, अकेले तुम' नं केली. आमिर खान हा एक अयशस्वी संगीतकार असतो अशी ती कथा होती आणि अन्नू(अण्णू)नं ती, अत्यंत सहजपणे, अत्यंत यशस्वीरित्या सादर केली होती.
'१९४२-अ लव्ह स्टोरी' च्या काळात आर. डी. बर्मनचं निधन झालं आणि पुढच्या 'करीब' या चित्रपटासाठी विधुविनोद चोप्रांनी अन्नूला जवळ केलं. त्याची गाणी लोकप्रिय झाली असतील, पण नवीन आर. डी. सापडला असं कुणी म्हटलेलं अन्नूच्या नशिबात काही आलं नाही. 'बॉर्डर'नं सोनू निगमचा उदय झाला आहे हा संदेसा दिला, तर 'रेफ्युजी'नं जावेद अख्तरच्या शब्दांनाच जास्त भाव दिला. 'अशोका'च्या संगीताची त्याच सुमारास आलेल्या 'लगान' मार्फत रहमाननं विकेट काढली आणि 'उमराव जान' ऐकताना लोकांना नवीन अन्नू स्मरणात राहण्यापेक्षा जुना खय्यामच आठवत राहिला.
अन्नूनं तरीही आपल्या अख्ख्या कारकीर्दीत कधी डगमगण्यात किंवा हिरमुसण्यात वेळ घालवला नाही. 'बाजीगर' नंतर आपला पथच नाही, तर आपला 'विजयपथ' कोणता आहे हे त्यानं 'राहों मे उन से मुलाकात हो गयी' म्हणत स्पष्ट केलं. आधीच्या 'सोनी महिवाल' किंवा 'मर्द'वर लक्ष्मीकांत-प्यारेलालचा प्रभाव असेल, पण आता चलती असलेल्या नदीम-श्रवणच्या संगीत-संयोजनाशीही आपण कशी सलगी करू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. पुढे नदीम-श्रवण आटपले/आपटले, पण अन्नू 'फिर तेरी कहानी याद आयी', 'सोल्जर', 'बादशहा', 'डुप्लिकेट', 'सर' पासून 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.', 'मै हूं ना' पर्यंत लोकप्रियच होत राहिला आणि आपलं संगीत-संयोजनही काळाप्रमाणे बदलत राहिला.
'मास अपील' मिळालं; त्याला फक्त साधलं नाही ते 'क्लास अपील'. अर्थात, त्या मोहातही तो पुढे कधी पडला असेल असं वाटत नाही. आपलं संगीत 'उरलो उपकारापुरता' या भावनेनं 'दम लगाके हैश्शा' करत तो ढकलत बसला आणि 'चमत्कार' झाला! (हा १९९२ मधला 'प्यार हो जाएगा' हे गीत असलेला त्याच्या उमेदवारीच्या काळातला 'चमत्कार' नव्हता.) 'मोह मोह के धागे' हे गीत त्यानं संगीतबद्ध केलं आणि कधी नव्हे ते अन्नू मलिकला अनुल्लेखानं मारणारेच त्याचं गुणगान गाऊ लागले.
'सम्हाला है मैने बहोत अपने दिल को, जुबांपर तेरा फिर भी नाम आ रहा है' ही अन्नूची ओळ आळवायची पाळी आता त्या बिचाऱ्यांवर आलेली होती!
'रास्ते आस्ते चल जरा' एवढंच अन्नू यानंतर त्यांना म्हणाला, मनातही आणि जनातही. त्यानं आपलं धोरणही चालूच ठेवलं - 'बत्ती गुल, मीटर चालू'...

- कुमार जावडेकर
(माझ्या 'निवडक अ-पुलं' या इ-पुस्तकातून https://www.amazon.in/dp/B086YZNVWH)

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

"विरासत" या एकाच सिनेमाचे संगीत दिग्दर्शन अन्नू मलिक ने केले असते तरी तो उत्कृष्ठ संगीतकार ठरला असता. या चित्रपटातील जवळपास सगळीच गाणी सुंदर आहेत, विशेषत: "तारे है बाराती" आणि "पायलें झुनमुन झुनमुन".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरं आहे, विरासत ची ही दोन गाणी सुरेख आहेत. 'विरासत' चा उल्लेख करायला हवा होता मी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
- कुमार

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त 'तारे है बाराती' साठी जसपिंदर नरुलाचा आवाज वापरायला नको होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जसपिंदर निरुलाचा आवाज हे मला त्या गाण्याचे बलस्थान वाटते.

खरं तर तब्बूच्या व्यक्तिरेखेसाठी चित्राचा आवाज आणि पूजा बात्राच्या व्यक्तिरेखेसाठी जसपिंदरचा आवाज ही निवड मला फार चपखल वाटली. गेल्या तीसेक वर्षांत हिंदी चित्रपटांत आलेल्या स्त्री पार्श्वगायिकांमधले हे दोन सर्वांत authentic आवाज आहेत असं मला वाटतं. बाकी बहुतेक साऱ्याच स्त्री पार्श्वगायिका “लता घराण्यातल्या” आहेत. ते घराणे थोर आहेच, पण त्याच्या कक्षा मर्यादित आहेत. पूर्वी गीता दत्त आणि शमशाद बेगम तग धरून होत्या. लता घराण्याच्या बाहेरच्या थोर गायिका पुढे यायला हव्यात!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'विरासत' हा चित्रपट 'थेवर मगन' ह्या तमिऴ चित्रपटाची हिंदी / उत्तर भारतीय आवृत्ती आहे. त्या सांस्कृतिक फरकामुळे मूळ चित्रपटातली इलैयाराजांनी संगीत दिलेली अनेक गाणी जशीच्या तशी हिंदीत आली नाहीत. 'पायली छुनमुन' हे एकच गाणं अन्नू मलिकनी इलैयांनी दिलेली चाल साफसूफ नि गुळगुळीत करून हिंदीत आणलं आहे.

मला स्वत:ला मूळ चालच अधिक गोड वाटते. विशेषत: कडव्यातली तिसरी ओळ आणि पाचव्या ओळीपासूनची तीन ओळींच्या चालींची पुनरावृत्ती होत समेवर येणं फारच उत्कृष्ट. ते सगळं हिंदीत गायब आहे. कडवं छोटं केल्याने असेल बहुधा.

'थेवर मगन'मधले हे दोन वेगळ्या प्रसंगांतले दोन आविष्कार -
१. https://youtu.be/hrH7Sqqc10E (गायिका : एस्. जानकी)
२. https://youtu.be/xqEy3ctx47I (गायक : कमलहासन, एस्. जानकी, मिनमिनी ('दिल हैं छोटासा'वाली))

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

“पायलें” ची चाल चोरलेली आहे हे मला ठाऊक नव्हते. Annu stands downgraded to that extent!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'सारंगा तेरी याद मे..' हे गाणे ऐकताना अतिशय गूढ असे उदासवाणे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0