नपेक्षा

अशोक शहाणे ह्यांचा कुठेतरी उल्लेख वाचून त्यांच्या "आजकालच्या (म्हणजे १९६०सालच्या) मराठी वाड्मयावर क्ष किरण" अशा चमत्कारिक आणि म्हणूनच लक्षात राहिलेल्या लेखाबद्दल कुतूहल निर्माण झालं. "नपेक्षा" ह्या पुस्तकात हा लेख असल्याचे समजल्याने ते पुस्तक मागवलं होतं.

पुस्तकाची पहिली ६ पानं वाचून चूक केली असं वाटून ते पुस्तक पुन्हा उघडलंही नव्हतं.
आज अचानक पुन्हा ते पुस्तक हाती लागलं आणि मागून सुरुवात केली.
संपूर्ण पुस्तक वाचून झाल्यावर त्यात बरंच काही आहे हे जाणवलं, आणि पुन्हा वाचलं. थोडासा गोंधळलो.

शहाण्यांच्या पुस्तकाचं स्वरूप त्यांचे लेख, भाषणं आणि वर्तमानपत्रातील सदरं ह्यांचं एक संकलन- असं आहे. ही सगळी संपदा १९६० ते १९९७ पर्यंतची असल्याने त्यात त्यांनी घेतलेला मराठी जगताचा (लेखक/साहित्य/संस्कृती इ.) आढावा - ही पुस्तकाची साधारण थीम आहे.

पहिल्यांदा नम्रपणे सांगावसं वाटतं ते म्हणजे संपादकीय संस्कारांचा अभाव. अनपेक्षित रित्या जेवताना तोंडात आलेल्या ह्या खड्यांचा उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. अर्थात हा लेखकाचा दोष नाही परंतु वाचकाला जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे मुद्रणदोष.

"संस्कृतीचे गौड्बंगाल" हा अनुभव १९९५ दिवाळी अंकातील लेख वाचताना "१९४५ साली कर्झनसाहेबाने केलेली बंगालची फाळणी ती पहिली. ४७ साली रँंड क्लिफने नकाशावर कात्री चालवली ती जवळपास ही कर्झनची रेघ पकडूनच" हा उल्लेख खटकतो. तसंच पुढे "ब्रिटिश मंडळींनी इथं पाय नीट रोवले ते प्लासीच्या लढाईनंतर. म्हंजे १९५७ साली, आणि कलकत्त्यातील एकूणच हालचालींना ऊत आला" हे असो. इतरही काही उल्लेखनीय मुद्रणदोष आहेत. तेव्हा हे वाचका - सांभाळून.

पुढे ह्याच लेखात "१९७५ साली राजकीय कारणासाथी बंगालशी महाराष्ट्राने जुळवलेला धागा नंतर परत कधी जोडताच आला नाही" हे वाक्य १९०५ च्या वंगभंग आंदोलनाबद्दल आहे की १९७५च्या आणीबाणीबद्दल हे मला नक्की समजलं नाही. असो.

शहाणेंच्या लेखांत त्यांनी बऱ्याच थीम्सचा उल्लेख केला आहे आणि त्यातले काही संदर्भ पुन्हा पुन्हा येत रहातात. जेमतेम १९० पानांच्या पुस्तकात एकाच गोष्टीचे उल्लेख निराळ्या लेखांत वारंवार आल्याने भयानक वैताग येतो. म्हणजे १९६५ साली केलेल्या भाषणामधला उल्लेख पुन्हा नंतरच्या एका लेखात आणि पार १९९५ साली वर्तमानपत्रात लिहिलेल्या सदरातही तोच उल्लेख त्याच संदर्भात तसाच आल्याने वैताग येतो.
संपादक म्हणून कुणी असेल तर त्यांनी एवढं पाहायला नको का?

ज्ञानेश्वरांची कवितेबद्दलची कल्पना (बिजेची चंद्रकोर फांदीमागून दिसते तद्वत कवितेतले शब्द झाडाच्या फांदीप्रमाणे असतात) ही "कवितेचे बडवे" (आपलं महानगर १९९९) ह्या लेखात आणि "आजकालचे मराठी वाड्मय" (भाषण १९६५) ह्यामधे येऊन जाते.

संयुक्त महाराष्ट्र समितीच्या कार्यकारिणीचे ठराव इंग्रजीत व्हायचे. अन कार्यकारिणीत मराठी नसलेला एकच माणूस होता - नौशीर भरूचा ("आजकालचे मराठी वाड्मय" (भाषण १९६५) आणि ("कविता ही डेंजर गोष्ट आहे" महाराष्ट्र टाईम्स १९९४)

श्रावणीनिमित्त ब्राह्मणांना देण्यात येणाऱ्या पैशांतून नवनवी पुस्तकं लिहिणाऱ्या लोकांना बक्षिस देण्याची सोय केली होती. पण पेशव्यांच्या दक्षिणा देण्यात अन "दक्षिणा प्राईझ कमिटी"च्या बक्षिसे देण्यात काही फरक नव्हता ("आजकालचे मराठी वाड्मय" (भाषण १९६५) आणि ("मराठी तरिही अभिजात" अनुभव दिवाळी अंक १९९६)

कलकत्त्यातल्या १० दिवसाच्या पुस्तकजत्रेत उलाढाल ४ कोटींवर गेली. इकडे मुंबैत आझाद मैदानवरच्या जत्रेत मोजायला एका हाताच्या बोटाचीसुद्धा बोटं लागू नयेत इतका शुकशुकाट ("तीस वर्षांची पुस्तकी हालहवाल" महाराष्ट्र टाईम्स १९९२) आणि ("संस्कृतीचं गौडबंगाल" अनुभव दिवाळी १९९५)

राजा राममोहन रॉय ह्यांनी फ्रेंचांना पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्याबद्दल पाठवलेलं पत्र ("संस्कृतीचं गौडबंगाल" अनुभव दिवाळी १९९५) आणि ("रंगल्या भिंती अशा" महाराष्ट्र टाईम्स १९९५) => दोन्ही १९९५चेच लेख, आणि तरीही त्यात पुन्हा पुनरावृत्ती? वा!

लोकमान्य टिळकांनी रविंद्रनाथ टागोरांना उद्देशून म्हटलेलं "श्रीमंत कवी आहेत झालं!" ("संस्कृतीचं गौडबंगाल" अनुभव दिवाळी १९९५) आणि "आजकालचे मराठी वाड्मय" (भाषण १९६५)

गौतम बुद्धाचा मृत्यू आणि अनुशंगिक वर्णन ("गौतम नावाचा माणूस" महाराष्ट्र टाईम्स १९९५) आणि ("दोन गोष्टी" आज दिनांक १९९३) हे लेख एकामागे एक टाकले आहेत. सुंदर, म्हणजे उजळणी करायला बरे.

मुद्दा असा, की ह्या पुस्तकातलं हे रिपिटेशन वाचून कुणाचाही असा समज व्हावा की लेखकाकडे एवढंच सांगण्यासारखं आहे तेव्हा तेच ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखांतून येतंय.

अशोक शहाण्यांचं विनोबांवर विशेष प्रेम दिसतं तर लोकहितवादींवर राग. निरनिराळ्या लेखांतून त्यांनी लोकहितवादींवर असलेली स्वत:ची नाराजी (अँटी-लोकहितवादी थिअरी) स्पष्ट केली आहे.
तद्वत भारत सोडून इतरत्र गेलेल्या लोकांवर केलेली टीका (थोडी झोंबलीच मला-करतो काय?) हीसुद्धा दोन-तीन लेखांतून प्रकट झाली आहे.

आणखी एक समान सूत्र म्हणजे अस्सल भारतीय विचाराचा अभाव. सुधारक (लोकहितवादी-आगरकर-फुले इ.) ह्यांनी केलेले प्रयत्न हे काहीतरी अभारतीय आणि विजोड होते.
त्याच्या उलट सनातनी लोकांनी भारतीय समाजाला ३% ब्राम्हणी जोखडाला जुंपून खऱ्या ज्ञानापासून दूर ठेवले - अशी काहीशी मांडणी करून लेखक दोहोंवर यथेच्छ टीका करतो.
पण ह्या दोहो मार्गांना टाळून नक्की काय करायला हवं होतं ते पुरेसं स्पष्ट होतंच नाही.
ज्ञानेश्वर -तुकाराम-टागोर-नेमाडे-दुर्गा भागवत-विनोबा- नामदेव ढसाळ-तस्लिमा नसरिन ह्यांचं कौतुक लेखांत जाणवतं. पण त्यांना पकडणारं कोणतं समान सूत्र लेखकाला अपेक्षित आहे ते नक्की समजत नाही. "देशीवाद" हे सूत्र ते असावं अशी माझी समजूत, पण हा शब्द ह्या पुस्तकात नाही. तो नेमाडेंनी बहाल केला असेल तर कल्पना नाही.
पण काहीतरी निव्वळ परदेशी म्हणून अनुकरू नये आणि निव्वळ पूर्वापांर चालत आलेलं असं समजून ते निर्विवाद स्विकारूही नये. नवी मांडणी करावी पण ती अस्सल भारतीय वळणाची असावी- ही लेखकाची अपेक्षा आहे असं दिसतं आणि त्या कसोटीवर (लेखकाच्या मते) वर उल्लेखलेली मंडळी खरी उतरत असावीत.

कित्येक लेख फार सुंदर आणि नवनवी माहिती देणारे आहेत. तेव्हा वर दिलेल्या त्रुटी आणि अपूर्ण मांडणीचा धोका पत्करूनही मला आवडलेल्या काही गोष्टी -

१. "लिटिल मॅगेझिन्सच्या चळवळीविषयी" आणि "लघुनियतकालिके अथर्व वगैरे" - ह्या दोन लेखांतून मला भालचंद्र नेमाडेंच्या "बिढार" आणि "जरिला" वगैरे मधले अनेक तपशील कुणावर बेतले आहेत ही माहिती मिळाली.
कामिनी मासिक आणि रामराव हे रहस्यरंजन मासिक आणि नाना काकतकरांवर बेतले आहेत.
नारायण हा बहुधा दिलीप चित्रेंवर बेतला आहे? हे चूक असू शकतं.
शंकर हे क्यारेक्टर शंकर घाणेकरांवर असावं.
रत्नागिरिकर हे युनिव्हर्सिटीत काम करणाऱ्या लेखकाचं पात्र चिं.त्र्यं खानोलकरांवर बेतलं आहे. गंमत म्हणजे लेखक ह्यात उघडपणे असं म्हणतोही-

"नेमाडेला बहुधा जरा त्याच्याबद्दल (खानोलकर) आकस होता. कोकणात खाणावळ चालवून चरितार्थ चालवणाऱ्या चिंतूचं घर मुंबैत कविता लिहून कसं चालणार? म्हणून त्याने मुंबै विद्यापीठात नोकरी पत्करली होती. ....... नेमाडेच्या समजूतीप्रमाणे चिंतू नेहेमी तक्रारीचा सूर लावून असायचा. आपण कवी न आपल्याला इथे कारकुनी करावी लागते. लिहिण्यावर लक्ष एकवटता येत नाही असलं काहीतरी"

बाळ्या (बाळ्या उत्तरेला जाउन गाणं बिघडवूनच आला) हे जितेंद्र अभिषेकींवर (पुस्तकातला उल्लेख-गंपू).

शिवाय बिढारमधल्या एकदोन वाक्यांचा प्रत्ययही आला. त्यात चांगदेव पाटील म्हणतो -

" मराठीतले सगळे लेखक गाढव आहेत. ट्रॅश लिहितात" वगैरे.
मग त्याला समोरून कुणी सभ्य पारशी मुलगी म्हणते - " तुम्ही खूप वाचल्याने तसं तुम्हाला वाटत असेल".
मला एकदम त्या सुसंस्कृत रेशमीपणाचा फटका बसला. आम्ही मित्र कायम ज्या आक्रस्ताळीपणे चर्चा करायचो ती मला आठवली.

अशोक शहाण्यांची ह्या पुस्तकातली अनेक लेखकांवर केलेली टीका बघून मला चांगदेवच्या ह्या वाक्याचा उगम कळला असं वाटतंय!

२. मुंबई नगरी बडी बांका-
ह्या उण्यापुऱ्या २० पानांच्या लेखात शहाणे आपल्याला मुंबैचा इतिहास आणि मुंबैच्या ऱ्हासाची तार्किक कारणं सांगतात. लेख वाचण्यासारखा आहे- तपशील आणि वेगवान धाटणीमुळे तो एखाद्या डॉक्युमेंटरीसारखा आदळतो.

ह्याच थाटाचा "मराठी, तरीही अभिजात" हा लेख महाराष्ट्राच्या जडणघडणीचे भौतिक पैलू चाचपून पहातो- खाणं,पिणं, कपडेलत्ते, चित्रकला,सिनेमे ह्यात महाराष्ट्राचं काय आणि कसं योगदान (नाही) ते थोडफार स्पष्ट करतो.

३. पेपर!पेपर!!
मराठी आणि एकूणच भारतीय इतिहासात काहीच कसं नोंदलेलं नाही! हा प्रश्न कधीकाळी सगळ्यांना छळतोच. त्याचं कारण म्हणजे आपल्याला कागदच माहिती नव्हता- इतकं सोपं आणि सरळ आहे. त्याबद्दल केलेला उहापोह गमतीशीर आहे.

४. क्ष किरण वाला प्रसिद्ध लेख -
एकंदरीत मला ही सगळी सिनिकल टीका वाटते आहे. कशात दम नाही हे शहाणे पुष्कळदा सांगतात पण काय हवं आणि ते कसं असेल हे मात्र गुलदस्त्यातच रहातं.
नपेक्षाकडून ह्यापेक्षा जास्त अपेक्षा होत्या. एवढंच.

नपेक्षा
लेखक: अशोक शहाणे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

थोडे लेख, माहिती हाताला लागली. ती वाचून मत देतो.
हा लेखक कधी वाचला नाही. पण या लेखाने चावी बसली आहे. कधीकधी लेखक "मी इतर अमुकतमुकपेक्षा कमी कसा नाही किंवा जास्त कसा" या विचारात भोवऱ्यात असेल तर हा प्रकार होऊ शकतो. किंवा ते भले मोठे लेखन बाड प्रकाशकाकडे सोपवत असावेत पण प्रकाशक नोकरीवर ठेवलेल्या कुणास पाने कमी करायचं काम देत असेल तर असं होऊ शकतो. इकडे लेखक विचार करत असेल की माझ्या बाडाचे चार पैसे आले हे काय कमी आहे?

सर्वच खुशवंत सिंग कसे होतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रस्तुत पुस्तक मी वाचलेले नाही, कदाचित वाचणारही नाही, परंतु...

शहाणेंच्या लेखांत त्यांनी बऱ्याच थीम्सचा उल्लेख केला आहे आणि त्यातले काही संदर्भ पुन्हा पुन्हा येत रहातात.

तोचतोचपणा हा काही आक्षेपाचा मुद्दा होऊ शकत नाही. या रेटने उद्या आमच्या लिखाणावर आक्षेप घ्याल!

आमचे एक वेळ सोडा, परंतु, तसेच पाहायला गेले, तर पु.लं.च्या, किंवा, फार कशाला, आमच्या लाडक्या वुड्डहौससाहेबाच्या लिखाणात सुद्धा, नीट पाहिलेत, तर तोचतोचपणा आढळेल. प्रचंड प्रमाणात आढळेल. माणूस लिहितो, म्हटल्यावर, सूनर ऑर लेटर त्याच्या लिखाणात तोचतोचपणा येणारच; ते अटळ आहे. ज्याच्या लिखाणात तोचतोचपणा नाही, असा मनुष्य मला दाखवा, आणि मी तुम्हाला अंगठाछाप मनुष्य दाखवेन! तेव्हा, मुद्दा तो नाही; मुद्दा तो होऊच शकत नाही.

मुद्दा हा आहे, की तोचतोचपणा नॉटविथस्टँडिंग, इतर काही रिडीमिंग फॅक्टर्स आहेत की नाहीत. तेव्हा, त्या निकषावर पुनर्मूल्यन करा, असे सुचवू इच्छितो.

बाकी, उसंडुंसंबंधीचे तुमचे आक्षेप ग्राह्य आहेत.

==========

बाकी,

आणि तरीही त्यात पुन्हा पुनरावृत्ती? वा!

पिवळा पितांबर?

(आपण सांगे लोकांला, नि...?)

गौतम बुद्धाचा मृत्यू आणि अनुशंगिक वर्णन

आनुषंगिक. बाकी चालू द्या.

मुद्दा असा, की ह्या पुस्तकातलं हे रिपिटेशन वाचून कुणाचाही असा समज व्हावा की लेखकाकडे एवढंच सांगण्यासारखं आहे तेव्हा तेच ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लेखांतून येतंय.

१. रिपीटीशन. repetition.

२. पुन्हा, पुस्तक लिहितानाच्या क्षणापर्यंतचे (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठल्याही दिलेल्या क्षणापर्यंतचे) लेखकाचे आयुष्य हे कालबद्ध तथा त्या अनुषंगाने मर्यादित असणार, आणि, त्यायोगे, त्याच्याकडे असणाऱ्या सांगण्यासारख्या गोष्टी याही मर्यादितच असणार. त्यामुळे, कधी ना कधी त्यांपैकी काही गोष्टींची पुनरावृत्ती झाल्यास नवल नाही. ही मर्यादा किती कमी किंवा किती अधिक, हा प्रश्न होऊ शकेलही कदाचित (जो, माझ्या मते, व्यक्तिनिष्ठ असावा), परंतु, अशी मर्यादा असूच नये, ही अपेक्षा अतिरेकी आहे.

==========

असो. हे श्री. अशोक शहाणे यांचे समर्थन नव्हे. त्यांचे वकीलपत्र मी घेतलेले नाही, तथा त्यांचा माझा काही संबंधही नाही. हा निव्वळ तुमच्याशी विनाकारण पंगा घेण्याचा माफक तथा चावट प्रयत्न आहे, इतकेच.

==========

तद्वत भारत सोडून इतरत्र गेलेल्या लोकांवर केलेली टीका (थोडी झोंबलीच मला-करतो काय?) हीसुद्धा दोन-तीन लेखांतून प्रकट झाली आहे.

अवांतर कुतूहल: श्री. अशोक शहाणे यांना सकाळीसकाळी पिसाळलेले अच्युत गोडबोले चावले असावेत, की श्री. अच्युत गोडबोले यांना सकाळीसकाळी पिसाळलेले अशोक शहाणे चावले असावेत?

बाकी, तुम्हीसुद्धा नको त्या लोकांना भाव देऊन उगाच झोंबवून घेता, झाले. अहो, मते आणि ढुंगणे प्रत्येकास असायचीच; तुम्हाला आहेत, मला आहेत, तशी त्यांनाही आहेत. त्याकडे काय एवढे लक्ष द्यायचे?

तसेही, भारत सोडून गेलेल्यांच्या, झालेच तर अनिवासी भारतीयांच्या नावाने खडे फोडण्याची पद्धत काही विशिष्ट गोटांत आहेच. थोड्याफार फरकाने साधारणतः त्याच गोटांत गांधी-नेहरूंना शिव्या देण्याचाही प्रघात आहे. (गांधी आणि नेहरू हेसुद्धा भारत सोडून गेले होते, हा एक विलक्षण योगायोग. पुढे ते परत आले, ही गोष्ट वेगळी. परंतु ते एक असो.) तेव्हा, असतात एकेकांच्या प्रथा, म्हणून सोडून द्यायचे, झाले.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

लेखनात तोचतोचपणा असणं हे सर्वस्वी ग्राह्य आहे - पण जेमतेम २०० पानांच्या एका पुस्तकातच एवढे सगळे संदर्भ पुन्हापुन्हा येत रहातात.
मग वाटतं - अरे हे तर मगाशीच (१० पानांपूर्वी) वाचलं आहे.
मला ही अशोक शहाण्यांची मर्यादा वाटत नाही - ज्याने कुणी पुस्तकात हे लेख ह्या क्रमाने निवडलेत त्यांची चूक आहे.

शहाण्यांचं इतर लिखाण वाचायला आवडेल - त्यांची शैली मस्त आहे आणि मजकूरही नेहेमीपेक्षा निराळा.
----------------
पुन्हा पुनरावृती Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्यांदा नम्रपणे सांगावसं वाटतं ते म्हणजे संपादकीय संस्कारांचा अभाव. अनपेक्षित रित्या जेवताना तोंडात आलेल्या ह्या खड्यांचा उल्लेख करणं अतिशय गरजेचं आहे. अर्थात हा लेखकाचा दोष नाही परंतु वाचकाला जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे मुद्रणदोष.

आजवरच्या आयुष्यात कधी अनपेक्षित रीत्या जेवण्याचा प्रसंग न आल्याकारणाने, ठळक केलेल्या वाक्यखंडातील अनुभवाशी रिलेट करू शकलो नाही. दोष अर्थात सर्वस्वी माझा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कुणा पात्राच्या स्वभावात बसवता येईल.
( आमच्याकडे शहाण्यांनाही सल्ले देण्यात येतात. एक वेळ खात्री करा.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

( आमच्याकडे शहाण्यांनाही सल्ले देण्यात येतात. एक वेळ खात्री करा.)

"शाहण्याने आपुले थडगे खणावे
आणि खणताना पुन्हा, गाणे म्हणावे"

(श्री. अरुण दाते यांनी गायलेले एक भयाण गाणे. कवी कोण आहे, कल्पना नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

परवाच काही मैत्रिणींशी बोलताना मी म्हणाले की, ऐसी आणि फेसबुकवरचा चहाटळपणा वगळता मी अजिबात, काही मराठी वाचत नाही. कारण मला कंटाळा येतो. मग चुकून काही बरं सापडलं, नंदा खऱ्यांनी पुस्तक लिहिलं की जरा बदल घडतो, तेवढंच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशोक शहाणेंसारखा अतिसामान्य वकुबाचा आणि तुच्छतावादी लेखक मराठीत दुसरा नसेल. फालतू!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

...अतिसामान्य वकूब तथा तुच्छतावाद हा (वर्णनात्मक म्हणून ठीकच आहे, परंतु) आक्षेपाचा मुद्दा कसा काय होऊ शकतो? (फालतू असण्याबद्दलसुद्धा तेच.)

या रेटने उद्या आमच्याबद्दलसुद्धा आक्षेप घ्याल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात तुमचा तुच्छतावाद दिसतो बरं का Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

I stand chastised!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

मुळात अशोक शहाणे हे लेखक आहेत का- ते ठाउक नाही. जरा नीट पाहिलं तर हे त्यांचं एकमेव प्रकाशित पुस्तक आहे असं दिसतं.
बरं, १०० वाचनीय पुस्तकांच्या यादीत त्याला स्थान मिळाल्याने शहाणे हे "वन फिल्म वंडर"सारखे "वन बुक वंडर" असावेत.

नेमाडेंचं टीकास्वयंवर वगैरे १९९० साली प्रसिद्ध झालं तेव्हा त्यातही किती नावीन्य आहे ते माहिती नाही, पण प्रस्तावना आणि पहिला लेख बघून निदान "नपेक्षा"सापेक्ष बरं वाटतं आहे.
-----------------------------------------------
विलास सारंग ह्यांची पुस्तकं शोधायला हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0