जी.एंची निवडक पत्रे -सुरुवात
आमच्या घरात चांगली दोन अडीचशे पुस्तकं होती- लहान मुलांची सोडून. एक पुस्तकांचं कपाट ह्या मोठ्यांच्या पुस्तकांनी भरलं होतं आणि माझं पुस्तकांचं एक छोटं कपाट होतं, आणि त्यात आदिम काळातल्या डायनोसॉरपासून ते बोक्या सातबंडेपर्यंत सगळे गुण्यागोविंदाने रहात. टारझन, गोट्या, चिंगी, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे अशा यत्ता पार करून झाल्यावर मग मला पुढला स्टॉप कुठला ते काही काळ उमगेना. विज्ञानकथा होत्या, पण त्या पुरेशा पडत नसत. ज्यूल्स व्हर्न, नारळीकर, निरंजन घाटे ह्यांची पुस्तकं इतक्या वेळा वाचून मग नवीन काहीतरी हवं असं वाटे.
मग पु.ल. हाती लागले - आणि काही महिने आनंदात गेले. पार कंटाळा येईस्तोवर कॅसेट्स आणून ऐकून सगळ्या व्यक्ती-वल्ली वगैरे पाठ झाल्यावर पुन्हा खा-खा सुटलीच. पण आता माझ्या कपाटात काही नवीन उरलं नव्हतं.
मग माझं लक्ष बाबांच्या कपाटाकडे गेलं - त्यातली गलेलठ्ठ पुस्तकं बघून निवडत निवडत मी एका निळ्या कव्हरच्या पुस्तकावरचं चित्र बघून थांबलो. चित्राचा अर्थ काहीकेल्या कळत नव्हता- (चित्राला अर्थ असलाच पाहिजे ही प्रामाणिक समजून अजूनही कधीतरी डोकं वर काढते आणि मग ते निळ्या कव्हरचं पुस्तक आठवतं). पण चित्र तर आवडलं होतं. आजवर असा प्रकार मी अनुभवला नव्हता. निव्वळ पुस्तकाचं कव्हर आवडलं म्हणून मी ते पुस्तक वाचायलाघेतलं. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लिहिलेलं होतं -
If a man does not keep pace with his companions,
perhaps it is because he hears a difference drummer.
~Thoreau
त्या पुस्तकाचं नाव होतं काजळमाया आणि लेखकाचं नाव होतं कुणीतरी जी.ए. कुलकर्णी.
ही जी.एंशी झालेली पहिली ओळख. अर्थात पहिल्यांदा वाचून मला ते पुस्तक काही समजलंच नाही.पूर्वी जी.एंवर झालेल्या टीकेत म्हटल्याप्रमाणे "मोठ्यांसाठीचा चांदोबा" अशी काही समजूत झाली, त्यामुळे त्यातल्या चमत्कृतीपूर्ण गोष्टी आवडल्या (दूत, गुलाम, कळसूत्र, रत्न, ठिपका). मग बाबांशी बोलताना ते म्हणाले की अरे तू विदूषक वाचलीच नाहीस -वाच आणि बघ काय वाटतं ते.
मग मी विदूषक वाचली आणि "आवडून घेतली"- पण अर्धीच. त्यात असलेली दिव्ये, कोडी आणि पुन्हा चांदोबामय वातावरण हे सगळं आवडलंच, पण मधेमधे येऊन असह्य बडबड करणारे लोक ह्या कथांमध्ये बाधा आणत होते. तो प्रकार सोडला तर जी.एंची काजळमाया हे माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी एक होऊन बसलं.
जवळपास १० वर्ष उलटल्यावर पुन्हा अचानक काही कारणाने जी.ए. हाती लागले - आणि मग त्यांची इतर पुस्तकं वाचायचा योग आला. ह्या खेपी मात्र वेगळं काहीतरी वाटलं - समजलं पूर्ण नाहीच, पण हा प्रकार तरी काय असावा अशी एक ओढ लागून राहिली. अपूर्ण- दु:खी - अतृप्त- निराशाजनक- असल्या त्या Genre मध्ये मी रमून गेलो. तरीही जी.ए. लेखक म्हणून मला फार भावले नव्हते, भलत्या वयात भलतं वाचून ते कितपत रुचेल काय ठाऊक?
माझ्या आजोबांच्या एका मित्राने बहुधा, माझ्या १५-१६व्या वाढदिवसाला मला "गीताई" पुस्तक भेट दिलं होतं- आता ज्या वयात प्लेबॉय हाती हवा तेव्हा गीताई वाचून कसं व्हावं? तद्वत जी.ए. एका मर्यादेपर्यंतच भावले- म्हणजे आता मला त्यांच्या शैलीदार लिखाणाची मजा अनुभवता आली, चमत्कृतीपूर्ण घटना वगैरे थोड्या गिमिकी वाटल्या आणि मग "ह्यांनी हे असं का लिहिलं असेल" असे प्रश्नही पडले. अजूनही त्यांच्या सामान्य माणसांच्या कथा मला तितक्याशा पसंद पडल्या नाहीत.
माणूस जसा वयाने मोठा होतो, तसा त्याचा स्वतःच्या मर्त्य असण्याचा संदर्भ अधिकाधिक रुतत जातो. लहानपणी मृत्यू, शारीरिक वेदना, आजार, आयुष्य असल्या गोष्टी ठाऊकच नसतात. गद्धेपंचविशीत असल्या फालतू गोष्टींकडे बघायला वेळ नसतो. मग थोडं पुढे गेलं की आपण स्थिरावतो, हार्मोन्सही कमी उसळतात, आतूनच कुठेतरी स्थैर्याची ओढ लागते. अशा वेळी मग पुन्हा नव्याने मागे बघू शकू एवढा पल्ला गाठलेला असतो. आपल्या आधीची पिढी आता अस्ताकडे जाताना दिसत असते- आणि त्या आधीची पिढी किंबहुना संपलेली असते. मग आजूबाजूला एका नव्या कोऱ्या जाणीवेचं अस्तित्व उमगू लागतं - दुःख. लांबून कुणाच्यातरी आयुष्यात आलेले दुःखाचे प्रसंग ऐकून ह्या दुःखाची कल्पना येत नाही, पण स्वतः असं काही अनुभवलं की मग इतरांच्या दुःखाशी सहानुभूती वाटते.
मला वाटतं जी.एंच्या कथा मला सर्वाधिक भिडल्या त्या ह्या काळात. त्यांची शैली आणि इतर सगळ्या झगमगाटापलीकडे जाऊन त्यांच्या गोष्टींमधली माणसं आणि त्यांच्या वेदना थोड्याफार आपल्या वाटल्या .
"रात्र झाली गोकुळी" कथेतल्या दाजीप्रमाणे कित्येकदा असं वाटून गेलं की एवढी रात्रच आहे आपल्यासोबत. तेवढा वेळ आनंदात जावा- मग पुन्हा सकाळ झाली की आहेच नेहेमीचा गाडा. अर्थात माझं आयुष्य काही भयानक खडतर आहे, त्यात मी पिचून गेलोय अशातला भाग नाही. पण नेहेमीचंच "तेच ते आणि तेच ते" करताना कधीतरी खाचखळगे येतात तेव्हा दिवस नकोसे होतात. मला स्वतःला नक्की काय होतंय हे सांगता आलं नसतं पण "रात्र झाली गोकुळी" वाचून एक सहानुभवी कुणीतरी मिळाल्याचं समाधान लाभलं.
अशा अनेक कथा आहेत- ज्यातलं थोडकं काहीतरी मला आता आणखी भावतं. इतक्या वेळा "लई नाही मागणं" ही कथा वाचली, पण दर वेळी धडल बांदाचार्याच्या बहिणीबद्दल वाचून गलबल होते - पण त्यात फक्त त्याची बहीणच नसते- माझं स्वतःचं काहीतरी त्यात आठवत असतं.
>"नंतर त्याला त्याची धाकटी बहीण पद्मा आठवली. ती पाच वर्षांची असताना वीरभद्राच्या जत्रेत हरवली. कुठे गेली कुणास ठाऊक! हातात काडीला लावलेला साखरेचा कोंबडा, चिकट तोंड, गोऱ्या तोंडावर येणाऱ्या आखूड झिंज्या; त्याचा सदरा सारखा ओढणारी. तिचा कुठे पत्ताच लागला नाही. बंडाचार्याला तिच्या आठवणीने रडू आवरले नाही. त्याने हाताने तोंड घट्ट दाबून धरले व आवाज दाबत तो स्वतःशी हुंदके देऊ लागला."
- लई नाही मागणे (रक्तचंदन)
आयुष्याच्या ह्या टप्प्यावर तरी जी.एंच्या कथेतल्या व्यक्ती आणि परिस्थिती ह्यांची आता मला सोबत वाटते. हे सगळे लोकं शेवटी कुठेतरी दुःखीच असतात, कथेत निराशा भरलेली असते, काहीच चांगलं होत नाही- अशी टीका रास्त आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही - पण तरीही स्वतःच्या आयुष्यात बरेचदा जे काही छोटे आणि क्वचित मोठे धक्के खावे लागतात तेव्हा ते भोगलेली ही सगळी मंडळी मला आणखीच आपलीशी वाटतात. तेवढं त्यांचं माझ्यावर ऋण आहे. आणि म्हणून जी.एंचं सुद्धा - मी त्याबद्दल जी.एंचा आभारी आहे.
अशा लेखकाबद्दल त्याच्या कथा सोडून आपल्याला इतर काहीच माहीत नाही- ही गोष्ट मला परवा परवा फार त्रास देऊ लागली. ना त्यांची मुलाखत, ना काही लेख. आत्मचरित्र वगैरे तर फारच लांब राहिलं - आणि ते लिहून तरी काय होणार म्हणा? खरेखुरे जी.ए. थोडीच भेटणार त्यातून आपल्याला? दळवींसारखं मोकळं आणि प्रामाणिक लिहिणारे कुणे असले तर गोष्ट वेगळी. पण जीएनी स्वतः कथा-अनुवाद सोडून काहीच लिहिलं नाही.
"माणसे आरभाट आणि चिल्लर" वाचायचा योग नाही- पण तेही अप्रत्यक्ष लिखाण आहे.
मग "जी.एंची निवडक पत्रे" असा प्रकार आहे हे समजलं, त्याचेही पुरे चार खंड! "कडेमनी कंपाउंड, धारवाड" अशी सही टाकून ह्यांनी काय लिहिलं असेल बघूया तरी- अशा भोचक कुतूहलाने मी ही पुस्तकं मागवली आणि वाचायला सुरुवात केली. एक कबूल करतो की फाजील उत्सुकता- ह्यापलीकडे काही साध्य होईल ह्याची मला कल्पना नव्हती. फार फार तर जी.ए बद्द्ल आणखी काहीतरी माहिती मिळेल एवढाच माफक (आणि थिल्लर.) उद्देश होता.
पण हे पुस्तक वाचल्यावर मी बराचसा उडालो - इतक्या तब्येतीने आणि जोरकस मांडणीने लिहिलेली पत्रं मला अपेक्षित नव्हती. अर्थात लेखकाची पत्रं म्हटल्यावर त्यात तसा मजकूर असणारच पण काही मजकूर तर पुस्तक म्हणून छापला तरी वाचनीय असेल असा आहे -
उदा. अमेरिकेतल्या ग्रँड कॅन्यनची स्तुती करता करता मधेच जी.ए लिहून जातात -
("एक चमत्कारिक क्षणदेखील आला - अगदी सरवटेंनी व्यंगचित्र काढावं तसा. भोवतालच्या खडकांनी काळवंडलेल्या एका अत्यंत शांत, भव्य डोहाचादेखील एक फोटो आहे. क्षणभर वाटले, अगदी अंग चोरून तेथून जात असताना, अचानक लाल कंदिलासारखे डोळे असणारा दहाबारा हातांचा एक मानवापूर्व प्राणी त्यातून बाहेर आला. त्याने मला थांबविले व सारी घळई भरून टाकणाऱ्या आवाजात विचारले, "काय रे, आज भारतीय दिनांक काय?". माझी फार पंचाईत झाली..... असले धोकेदेखील त्या grand canyn मध्ये आहेत, हे त्या पुस्तकात सांगितलेले नाही!)
हे असलं काही अफलातून ह्या पत्रांत सापडेल ह्याची मला सुतराम कल्पना नव्हती. हे तर केवळ फुलबाजे म्हणावेत असं लिखाण पत्रांत आहे, त्याबद्दल पुढल्या भागांत.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
उत्सुकता आहे.
पर्वणीच. पहिला खंडही मिळो.
पुस्तकाचं नाव 'जी.एंची निवडक पत्रे' खंड पहिला असंच आहे का? कुणी प्रकाशित केलं, केव्हा?
होय, हे पहा - जी. एं. ची
होय, हे पहा - जी. एं. ची निवडक पत्रे : खंड १
मौज प्रकाशन, पहिला भाग १९९५ साली आला, आणि मग उरलेले त्यानंतर ९८,२००५, २००६ बहुतेक.
(ह्या खंडांची प्रस्तावनाही सुंदर आहे- म्हणजे पुस्तकाप्रमाणे त्यावरचं हार्ड्बाउंड कव्हरसुद्धा चांगलं असलं की कसं वाटतं तसं)
बाकी खुद्द जीएंनी (श्री.पु.भागवतांना) लिहून ठेवलंय की -
आपलं वाचकांचं भाग्य की श्रीपुंनी हे ऐकलं नाही -(अर्थात सगळीच पत्रं प्रकाशित केली असावीत असं वाटत नाही, कारण तेवढे गट्स माझ्यामते मराठी वाचकांत नाहीत.)
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हिरवे रावे
हिरवे रावे वाचतोय.
:)
काय वाटलं ते नक्की लिहा - आवड/नावड जे काय असेल ते.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
माझ्या आठवणीप्रमाणे या चारही
माझ्या आठवणीप्रमाणे या चारही खंडांच्या तळटीपा मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिलेल्या आहेत. हे काम छान असणार आणि ते कष्टाचं अर्थातच असलं तरी त्या जर का जीएंच्या चाहत्या असतील (बहुदा असाव्यात. मौज परिवारातल्या आहेत. आता मौजच्या प्रमुख संपादिका आहेत.) तर ते कष्ट न वाटतां आनंदाचं आणि ज्यातून भरपूर शिकायला मिळेल असं काम झालं असणार.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.
तळटीपा
मराठीचे प्राध्यापक अनंत देशमुख आणि मोनिका अशा दोघांनी टीपा लिहिलेल्या आहेत. पहिल्या खंडात या दोघांचा उल्लेख आहे.
This too shall pass!
पत्रे
केव्हाही वाचायला घ्यावी, कुठूनही सुरुवात करावी अशी ही पत्रं. जीए नकळत्या वयात वाचले, वेड लागल्यासारखे वाचले. पण त्यातला काहीच कथा मला आवडणाऱ्या, आता कदाचित ते मत बदलेलही. पण ही पत्रं बराच काळ वाचली जातील हे नक्की. त्यांचा सुनीताबाईंशी असलेला पत्रव्यवहारही असाच वाचनीय. आणि रंजकही.
This too shall pass!
.
कुठल्या कथा आवडल्या?
==================
भूतकाळातील आस्वल्य.