लायब्ररी ऑफ थिंग्ज

आमच्या बंड्यामामांचं - त्याच, फ्रेंच एक्स्पिरिअन्सवाल्या सागर डिलक्सवाल्या - टुमदार कुटीर आहे. म्हणजे तसा जुना वडिलोपार्जित बंगला आहे, पण त्याला बंड्यामामा "आमची पर्णकुटी" वगैरे म्हणतात. चांगल्या सिमेंटच्या भिंती आणि एव्हरेस्टची कौलं आहेत तरीही.

बंगल्याचं आऊटहाऊस चांगलं प्रशस्त आहे. आधी माळीकाका तिथे राहायचे. नंतर बंगला वाढवला आणि अंगणात सगळ्या टाईल्स लावल्या तेव्हापासून माळीकाका त्यांच्या गावी गेले. मग त्या आऊटहाऊसचं गॅरेज करायचा एक प्रस्ताव होता पण भिंतबिंत पाडायला कोणाचाच एन्थु नव्हता म्हणून ते तसंच राहिलं. ऑफिससाठी म्हणून एकादोघांनी विचारलं, पण त्यासाठी बंड्यामामा तयार नव्हते.

तर एकदा रविवारी मह्या आणि मी तंदूरी मिसळ चापत होतो. सागर डिलक्समध्ये नाही, कोणत्यातरी फ्यूजन रेस्टाॅरंटमध्ये. "भेंजो मिसळ मडक्यात ठेवून त्यात बशीत निखारा सोडायचे शंभर रूपये प्लेटचे म्हणजे जरा जास्तच झाले ना?" मी म्हणालो.

"डेकोरचे पैसेपण असणार ना? प्रत्येक टेबलवर साॅफ्टाॅय ठेवलंय तेपण बघ ना भेंजो." मह्याने पाॅईंट काढला.

"तुला आठवतंय रे, आपल्या काॅलेजात त्या अवंतिकानी साॅफ्टाॅय लायब्ररी काढली होती? पण किती डिमांड असणार. सहा महिन्यात बंद केली लायब्ररी."

मह्या खाताखाता एकदम थांबला, आणि चमचा हातात धरून स्तब्ध बसून राहिला.

"काय रे, मिरची खाल्लीस का?"

"नाय. दोन मिंटं थांब. विचार करतोय," मह्या बोलला. मग दोन मिनिटांनी तो बोलू लागला. "तू परवा इंटरनेट ऑफ थिंग्जचं बोलत होतास ना? आपण लायब्ररी ऑफ थिंग्ज काढूया."

"म्हणजे? आणि हे करायचं कधी आणि कसं?"

"वीकेंड्सना. नोकरीधंदा सांभाळून. ऐक."

मग आम्ही ती तंदूरी मिसळ संपवली आणि प्लॅनिंग करायला सद्गुरू स्टाॅलला गेलो. तिथला चहा प्यायल्याशिवाय स्फूर्ती येत नाही भेंजो.

मग पुढचे काही दिवस सगळी सेटींग केली; आणि मग पॅम्प्लेट छापून एरियात वाटली. "तुमच्या घरात अडगळ करणाऱ्या गृहोपयोगी वस्तू आहेत? आम्ही त्या सुरक्षित ठेवू, तेही बिलकुल भाडं न आकारता! व्हाॅटसॅप करा ××××× ××××× या नंबरवर!"

लोकांचा भरभरून रिस्पाॅन्स आला. त्यांच्या वस्तू आम्ही वर्षभर सेफ ठेवणार, त्या वर्षात वस्तूंचा हवा तसा वापर करणार, आणि वस्तू हरवली नायतर डॅमेज झाली तर एक फिक्स्ड् भरपाई देणार, असा फाॅर्म प्रत्येकाकडून भरून घेतला. भरपाईची रक्कम अडकित्त्याला शंभर रूपये आणि स्टीलच्या शिडीला हजार रूपये अशा रेंजमधे ठरवली. खलबत्ते, पुरणाची यंत्रं, डिनर सेट, गाद्या, जाजमं, स्टुलं, खुर्च्या, शिडी, सायकल, डंबेल्स आणि असं कायकाय मिळालं. मग मह्या आणि मी थोडी साॅफ्टाॅय, पिक्चरफ्रेम, पुस्तकं हे सेकंडहॅन्ड खरेदी करून आलो.

सगळ्या वस्तू कलेक्ट करून बंड्यामामांच्या कुटीराच्या आऊटहाऊसमध्ये नेऊन ठेवल्या. तिकडे साफसूफ करून सगळं नीट सुबकपणे रचून ठेवलं.

मग दुसरी पॅम्प्लेट छापली - "इन्ट्रोड्यूसिंग लायब्ररी ऑफ थिंग्ज! तुम्हाला तात्पुरती गरज आहे पण विकत घ्यायची इच्छा नाही अशा गृहोपयोगी वस्तू भाडेतत्तवावर घ्या. दर शनिवार-रविवारी संध्याकाळी पाच ते आठ. पत्ता ..."

प्रत्येक वस्तूचे फोटो काढून एका सस्त्या सुंदर वेबसाईटवर टाकले. लोकांना व्हाॅटसॅपवर बुक करायचा ऑप्शन दिला. तरूण मुलंमुली तसं बुक करत, पण अंकल आंटी लोक आऊटहाऊसमध्ये येऊन वस्तू निरखून मग घेत. भाडं माफक आणि फुल डिपाॅझिट असा फाॅर्म्युला वापरला. स्विगी डिलिव्हरीवरून चार्जेबल बेसिसवर होम डिलिव्हरीचीही सोय केली.

दीड वर्ष झालं तरी बिझनेस टिकून आहे. फार नाही, पण महिन्याला प्रत्येकी दहाबारा हजार सुटतात. टाईमपासपण चांगला होतो. अजून काय पाहिजे भेंजो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'No ideas, but in things' ला खोट्यात पाडणारी कल्पना! Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सु पी SSSS क

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्लॅनिंग करायला सद्गुरू स्टाॅलला गेलो. तिथला चहा प्यायल्याशिवाय स्फूर्ती येत नाही भेंजो.
पत्ता द्या पत्ता द्या. . चा पितो बक्कळ पण ..स्फूर्तीची वानवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0