मला दिसलेला दत्ता इस्वलकर

अंदाजे आठ नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. नरीमन पॉईंटमधल्या कुठल्या तरी इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून ॲडव्हर्टायझिंग एजन्सीतल्या मित्रांबरोबर एका जाहिरातीवर मराठीतून बोलत आम्ही लिफ्टमधून खाली निघालो. बाहेर पडताना लिफ्टमनचा आवाज ऐकू आला : 'मुलाला कुठं नोकरी मिळू शकेल का?' एकदम चर्र झालं. उलटा फिरलो. लिफ्टमन खूप वयस्कर होते. आयुष्यात पूर्णपणे विझलेला माणूस दिसत होता तो. मी विचारलं 'दादा, किती वर्ष लिफ्टमनचं काम करताय?' खूप कोरडेपणानं म्हणाले 'जास्त नाही.' मान खाली घालून नंतर आवंढा गिळत म्हणाले 'आधी गिरणीत होतो.' मी चटकन त्यांचा हात धरला. आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही. तोपर्यंत दुसरी माणसं लिफ्टमध्ये शिरली. मी त्यांचा हात थोपटून बाहेर आलो. या लिफ्टमनकाकांची वेदना आणि त्यांनी खूप काही सोसलेलं मला भाजल्यासारखं जाणवलं, याचं कारण दत्ता इस्वलकर.

Datta Iswalkar
(प्रतिमा आंतरजालावरून साभार)

मुंबई शहरानं देशाला मोठे मोठे कामगार नेते दिले. कामगार चळवळीचा जन्मच मुंबईतला. आणि कामगार म्हणजे गिरणी कामगार. स्वातंत्र्यानंतर मुंबई शहराचे नेते हे कामगार नेते होते. अशोक मेहता, कॉ. डांगे, जॉर्ज फर्नांडीस यांना या शहरानं भरभरून प्रेम दिलं. जॉर्ज फर्नांडीस दिल्लीच्या राजकारणात गुरफटल्यावर डॉ. दत्ता सामंत मुंबईतल्या कामगारांचे नेते बनले. इंजिनिअरींग उद्योगात डॉ. सामंतांचा जबरदस्त प्रभाव होता. दीर्घ काळ संप आणि भरघोस पगारवाढ ही डॉ. सामंतांची वैशिष्ट्यं होती. गिरणी कामगारांनी डॉ. सामंतांना आपले नेते बनवलं आणि १९८२ साली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप सुरू झाला.

गिरणगावात विविध विचारांच्या संघटना काम करत होत्या. राष्ट्र सेवादल आणि समाजवादी मंडळी पूर्वीपासून होती. मॉडर्न मिलमधल्या एका जॉबरचा मुलगा दत्ता इस्वलकर सेवादल आणि समाजवादी मित्रांच्यात रमला. १९७०नंतर दत्ता इस्वलकर वडिलांच्या मिलमध्येच कामाला लागला. मिल मजदूर सभेच्या प्रभाकर मोरेंबरोबर त्याची जवळीक होती. आणीबाणीच्या काळात भूमिगत कामं करणाऱ्या समाजवादी गटात तो सहज सामावला गेला. त्यानंतरच्या काळात राष्ट्र सेवादलाच्या चौकटीच्या पलीकडे काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या महाराष्ट्रातल्या तरुणांचा वेगळा गट 'समता आंदोलन' म्हणून स्थापन झाला. दत्ता इस्वलकर त्यामध्ये होताच. 'समता आंदोलना'च्या स्थापनेपासून दत्ता गिरणी कामगारांचे विविध प्रश्न संघटनेत मांडत होता. १९८७ मध्ये दत्ताच्या नेतृत्वाखाली 'समता आंदोलना'च्या मंडळींनी एकंदर वस्त्रोद्योग उद्योगाचा अभ्यास सुरू केला. मार्गदर्शक होते बगाराम तुळपुळे. त्याची फलश्रुती म्हणजे 'समता आंदोलना'ने आयोजित केलेली वस्त्रोद्योग परिषद. परिषदेच्या अध्यक्षस्थानी बगाराम तुळपुळे होते आणि उद्घाटन डॉ. दत्ता सामंतांनी केलं होतं. अजूनही गिरण्या फायद्यात चालवून कामगारांनाही योग्य वेतन देता येईल अशी मांडणी या परिषदेत केली गेली.

गिरणी संप पूर्ण फसला होता. संप कधी मागे घेतला गेलाच नाही. गिरणी कामगार खचला. मालकाकडून मिळतील तेवढे पैसे घेऊन तो देशोधडीला लागला. गिरण्या बंद पडल्या. गिरणगाव उखडला गेला. दीड-पावणेदोन कोटी लोकसंख्येच्या शहरातले दहा लाख लोक उपासमारीत ढकलले जात होते. तो काळ फार कठीण होता. त्याचवेळी ठाणे-तळोजा पट्ट्यातले केमिकल उद्योगही बंद पडत होते. गिरणी संपात पोळलेल्या अडीच लाख कामगारांचं भवितव्य काय, याबद्दल कोणत्याच राजकीय पक्षाकडे किंवा युनियनकडे उत्तर नव्हतं. कामगार हताश होऊन विझत चालला होता. त्या काळात दत्ता इस्वलकर अनेकांशी बोलत होता. त्यातूनच २ ऑक्टोबर १९८९ रोजी दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 'बंद गिरणी कामगार संघर्ष समिती'ची स्थापना केली. त्याचे सोबती त्याच्यासारखेच गिरणी कामगार होते. या समितीत अतिडाव्यांपासून सेनेपर्यंत सर्व विचारांची मंडळी होती. दत्ता इस्वलकर समितीचे अध्यक्ष होते. आतापर्यंतच्या कुठल्याही कामगार आंदोलनापेक्षा 'बंद गिरणी कामगार संघर्ष समिती' पुढची आव्हानं अत्यंत खडतर होती. एकतर ते मुळातच लढाई हरलेले होते. कामगार जगण्यासाठी मिळेल तो रोजगार करत होते. अनेकजण गावाकडे परतले होते. कोणाला घेऊन लढाई करायची? आणि हरलेल्या लढाईनंतर आपल्या मागण्या कोणत्या असतील? या दोन मोठ्या समस्या होत्या. मुंबई शहरात जमिनींच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या. गिरण्यांच्या मालकीची सहाशे एकर जमीन मध्य मुंबईत होती. गिरणीमालकांना घसघशीत लॉटरी लागली होती. गिरणीमालकांना जमीन विकण्यासाठी शासनाची परवानगी हवी होती. ही मुंबई गिरणी कामगारांच्या घामातून घडली आहे; बंद गिरण्यांच्या जमिनीवर फक्त मालकांचा हक्क नाही, तर गिरणी कामगारांचादेखील आहे; त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, म्हणून गिरणी कामगारांना हक्कानं स्वस्त दारात घरं मिळायला हवीत अशी मागणी मांडली गेली.

या लढाईत गिरणी कामगार मिलच्या गेटवर भेटणार नव्हते. सगळे कामगार विखुरले होते. जवळपासच्या कामगारांना भेटता येत होते. गावाकडे गेलेल्या कामगारांना भेटण्यासाठी दत्ता आणि त्याच्या सोबत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. या कामात महाराष्ट्रातल्या पुरोगामी संघटनांची मदत घेतली गेली. कामगारांशी संपर्क होत गेला. संघटन उभे राहिले. मात्र आंदोलन किंवा मोर्चासाठी कामगारांना आताचा रोजगार बुडवून येणं शक्य नव्हतं. रोजगार बुडवणं म्हणजे घरात चूल न पेटणं असा अर्थ होता. तरीही आपल्या मागण्यांमध्ये सातत्य टिकवणं, हरलेल्या कामगारांचं मनोधैर्य टिकवणं, आपल्या मागण्या विविध मार्गांनी पुढे रेटत राहणं ही अतिशय कठीण कामं दत्तानं अथकपणे केली. दत्ता इस्वलकर मॉडर्न मिलमध्ये साधा क्लार्क होता. आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी भाषण करणारा असं काही त्याच्यात नव्हतं. आक्रमकपणा तर अजिबात नव्हता. मात्र त्याची कामाबद्दलची तळमळ अफाट होती. सखोल राजकीय जाण आणि आपल्या मागण्यांबद्दलची स्पष्टता यामुळे दत्ता इस्वलकरांना टाळणं कुठल्याही राजकीय नेत्याला जमलं नाही. गिरणी मालक असो वा मुख्यमंत्री, दत्ता बोलायला लागल्यावर समोरच्याच्या मनात अपराधीपणाची बोच निर्माण होई. त्यामुळे दत्ताचं मागणं रास्त आहे, त्याला बाहेर काढता येणार नाही याची जाणीव त्यांना होई. त्याच्या मागण्यांना थेट नकार मिळाला नाही. दत्ताची चिकाटी अफाट होती. गेल्या तीस वर्षांतल्या सर्व मुख्यमंत्र्यांकडे त्याने आपल्या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. प्रत्येकवेळी थोडी प्रगती होत असे. आपल्या भागातल्या आणि ओळखीच्या आमदारांना तो सभागृहात प्रश्न विचारायला लावत असे. शासनावर दबाव आणण्यासाठी उपोषणासह अनेक कल्पक मार्गांचा वापर त्याने केला. लहान मुलांनी घरच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्रं लिहिली. मुलांचा मोर्चा निघाला. घर चालवणाऱ्या गृहिणींचे मोर्चे निघाले. ऑगस्ट क्रांतीच्या सुवर्ण महोत्सवाच्या समारंभात चड्डी बनियन मोर्चा काढून 'गांधीजींचे खरे वारसदार आम्हीच आहोत' असं जाहीर केल्यावर पोलिसांनी लाठीमार केला. मात्र त्यामुळे त्यानं शासनाला खडबडून जागं केलं. अतिडाव्यांपासून सेनेपर्यंत सगळ्या विचारांचे सदस्य समितीत असूनही आंदोलन कायम शांततामय मार्गानं केलं गेलं. महंमद खडस आणि गजानन खातू या जेष्ठ समाजवादी साथींनी दत्ताला कायम साथ दिली.

मुंबईत गिरणी कामगारांसाठी कायम सहानुभूती होती. गिरणगाव हे मुंबईचं एके काळचं सांस्कृतिक केंद्र होतं. या दोन्हींचा मिलाफ करत दत्ता इस्वलकरांनी मुंबईच्या सहानुभूतीला योग्य वळण लावलं. मुंबईतले नाट्य- आणि सिनेकलावंत, लेखक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते 'बंद गिरणी कामगार संघर्ष समिती'च्या मागण्यांना पाठिबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. सामाजिक भान असलेली विविध क्षेत्रातली प्रतिष्ठित मंडळी आंदोलनाचा आधार बनली. बाहेरून मिळणाऱ्या या पाठिंब्यामुळे कामगारांना उभारी मिळाली. मागण्यांची योग्य काटेकोर पद्धतीने मांडणी करण्यासाठी व्यावसायिक मित्रमैत्रिणींची मदत झाली. शासनाने जमिनीच्या एकतृतीयांश वाटा गिरणी कामगारांचा ठरवला आणि त्यातून टप्प्याटप्प्याने स्वस्त दरात घरं उपलब्ध करून देण्याचं मान्य केलं. दत्ता इस्वलकर आणि सोबत्यांचा हा मोठा विजय होता.

न्यायालयात अर्ज करून हा हक्क मिळविता आला असता का? कोर्टात जाणं म्हणजे कोणाच्या तरी विरुद्ध जाणं होणार. निकाल कोणाच्याही बाजूने लागू दे, दुसरा पक्ष वरच्या कोर्टात जाणार. हे सुप्रीम कोर्टापर्यंत चालणार. फायनल निकालाला किती वेळ लागेल सांगणं कठीण. तसंच समजा गिरणी कामगारांच्या विरुद्ध निकाल लागला तर सगळेच दरवाजे बंद झाले असते. त्यापेक्षा दत्ता आणि त्याच्या सोबत्यांनी संवादाचा आणि शासनावर विविध मार्गांनी दबाव टाकण्याचा मार्ग अवलंबला. कॉंग्रेस, सेना, भाजप सर्वांनाच समजावण्याचं काम त्यांना करावं लागलं. त्यामुळे त्यांना शत्रूपक्ष नव्हता.

दत्ता इस्वलकर 'बंद गिरणी कामगार संघर्ष समिती'चे अध्यक्ष होते. त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगली असती तर? कदाचित आमदार झालेही असते. पण प्रश्न सुटण्याला अडचण निर्माण झाली असती. कुठल्याही पक्षात गेल्यावर त्या पक्षाचे नियम पाळावे लागतात. तसंच तुम्ही एका पक्षात आहात म्हणजे इतरांच्या विरोधी असता. कुठल्याही राजकीय आकांक्षा नसलेल्या व्यक्तीशी संवाद साधणं सत्ताधाऱ्यांना नेहमीच सोपं जातं, थेट प्रश्नापर्यंत पोचता येतं याची जाण दत्ताला होती. संपाच्या वाताहतीत राजकीय पक्षांचा काय वाटा होता ते दत्तानं जवळून पाहिलं होतं. दत्तानं जाणीवपूर्वक प्रश्न सोडवण्याकडे लक्ष केंद्रित केलं. आजपावेतो पंधरा हजारांपेक्षा जास्त गिरणी कामगारांना स्वस्त दरानं म्हाडाची घरं मिळाली आहेत. त्यापुढच्या कामगारांसाठी घरांची लॉटरी काढण्याचं काम चालू आहे.

बंद पडलेल्या गिरण्यांच्या कंपाउंडमधल्या चाळींमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांना घरं खाली करण्याच्या नोटिसा गिरणीमालकांनी दिल्या. दत्ता इस्वलकरांनी हा प्रश्न लावून धरला. कामगारांचा चाळीत राहण्याचा हक्क मान्य करण्यात आला.

इथे लिहिताना मी काही वेळा एकेरी नावाने लिहिलं आहे तर काही वेळा आदरार्थी पद्धतीने लिहिलं आहे. खरंच मी गोंधळलो आहे. माझ्यासारख्या अनेकांसाठी दत्ता इस्वलकर कितीही मोठा झाला तरी तो दत्ताच होता. त्याचं वागणं अगदी पूर्वीसारखंच राहिलं. आमच्या दोघांमध्ये जवळजवळ एका पिढीचं अंतर होतं. मला ते कधीच जाणवलं नाही. दत्ता अतिशय दिलखुलास आणि मिश्कील असला तरी या सगळ्याला एक मोहक मालवणी छटा होती. किस्से खुलवून सांगण्यात त्याची हातोटी होती. त्याच्या पारदर्शक प्रेमळपणातून अनेक मित्र जोडले गेले. दत्ताला व्यक्तिगत लाभाची कुठलीच अपेक्षा कधीच नसल्याने मैत्रीमध्ये अकृत्रिमपणा जोडला जाई. म्हणूनच गिरणी कामगारांच्या घरांसाठी लढणारा दत्ता मॉडर्न मिल कंपाउंडमधल्या जुन्या सिंगल रूममध्ये राहिला.

तसा गिरणगाव, गिरणी संप आणि माझा संबंध आला नसता. घरातल्या वातावरणामुळे सेवादलात गेलो. तिकडे दत्ता भेटला. त्याच्या नजरेतून गिरणगाव पाहिला.

गिरणी संपानंतर मुंबई पार बदलली. लालबाग, परळ बोलायची लाज वाटू लागली म्हणून 'अप्पर वरळी' हे नवीन नाव तयार झालं. मॉल आले. गगनचुंबी इमारती सर्वत्र दिसू लागल्या. डेकोरेशन म्हणून काही ठिकाणी गिरण्यांच्या चिमण्या जतन करून ठेवल्या. संप संपल्यावर पुढे काय याचं उत्तर पाठ्यपुस्तकात सापडत नाही आणि नवीन उत्तर शोधण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. गिरणी संपानंतर सगळे राजकीय पक्ष आणि संघटना नवीन मार्ग न शोधल्याने परिस्थितीशरण होते. दत्ता आणि त्याच्या साथीदारांनी नवा मार्ग शोधला. तुमच्या मालमत्तेत आमचाही वाटा आहे हे त्यांच्याकडून मान्य करवून घेतलं. हे सगळं करत असताना दत्ताला दुर्धर व्याधी जडली. हालचालींवर मर्यादा आली. तरीही त्याचं काम अखंड चालूच होतं. सामान्य माणूस कल्पकतेनं विचार करून एक मुलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो, त्यासाठीची मागणी तयार करून, त्यासाठी चिकाटीनं लढून जिंकू शकतो हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं. पुढचा काळ अधिक कठीण आहे. लढाया अधिक खडतर होणार आहेत. त्यावेळी पुस्तकापेक्षा कल्पकतेला अधिक महत्त्व राहणार असल्याने दत्ताची आठवण कायम येत राहील.
.....
विजय तांबे (vtambe@gmail.com)
(लेखकाचा अल्पपरिचय : तरुणपणापासून समाज परिवर्तनाच्या चळवळींमध्ये सक्रिय. राष्ट्रीयकृत बँकेत ३० वर्षे नोकरी करून स्वेच्छानिवृत्ती. तीन कथासंग्रह प्रकाशित.)

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. ८२च्या गिरणी कामगार संपाच्या काळात कामगारांचे हालहाल झाले होते हे आठवतंय. पण सुखवस्तू मध्यमवर्गीय घरातला मुलगा असल्यामुळे त्या परिस्थितीशी जवळून संबंध आला नव्हता. या वाताहतीतून निदान काहींना मदत व्हावी यासाठी जिवाचं रान करणाऱ्या व्यक्तीचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विशेषतः इस्वलकरांनी ज्या पद्धतींनी गिरणी कामगारांच्या मागण्या लावून धरल्या त्याची मीमांसा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख फार आवडला. गिरणी संप आदि संदर्भात खूप जवळचे किस्से ऐकून आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख आवडला. गिरणी कामगार संपासंबंधीच्या पुस्तकांतून दत्ता इस्वलकरांच्या कामाशी ओळख झाली होती. श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

गिरणी संपानंतर मुंबई पार बदलली. लालबाग, परळ बोलायची लाज वाटू लागली म्हणून 'अप्पर वरळी' हे नवीन नाव तयार झालं. मॉल आले. गगनचुंबी इमारती सर्वत्र दिसू लागल्या. डेकोरेशन म्हणून काही ठिकाणी गिरण्यांच्या चिमण्या जतन करून ठेवल्या. संप संपल्यावर पुढे काय याचं उत्तर पाठ्यपुस्तकात सापडत नाही आणि नवीन उत्तर शोधण्याचा कोणी प्रयत्न केला नाही. गिरणी संपानंतर सगळे राजकीय पक्ष आणि संघटना नवीन मार्ग न शोधल्याने परिस्थितीशरण होते. दत्ता आणि त्याच्या साथीदारांनी नवा मार्ग शोधला. तुमच्या मालमत्तेत आमचाही वाटा आहे हे त्यांच्याकडून मान्य करवून घेतलं. हे सगळं करत असताना दत्ताला दुर्धर व्याधी जडली. हालचालींवर मर्यादा आली. तरीही त्याचं काम अखंड चालूच होतं. सामान्य माणूस कल्पकतेनं विचार करून एक मुलभूत मुद्दा उपस्थित करू शकतो, त्यासाठीची मागणी तयार करून, त्यासाठी चिकाटीनं लढून जिंकू शकतो हे दत्ता आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं. पुढचा काळ अधिक कठीण आहे. लढाया अधिक खडतर होणार आहेत. त्यावेळी पुस्तकापेक्षा कल्पकतेला अधिक महत्त्व राहणार असल्याने दत्ताची आठवण कायम येत राहील.

या शेवटच्या परिच्छेदात लेखाचं सार सामावलं आहे. डॉ. दत्ता सामंतांनी गिरणी कामगारांचा संप पुकारला ते ठीक, पण त्यांनी तो नको तितका ताणला केवळ स्वतःच्या इगोतून. गिरण्या बंद करण्यासाठी सबब शोधत असणाऱ्या मालकवर्गाला आणि राजकारण्यांना ती आयतीच मिळाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0