एका लोककथेचा जन्म !

वातावरणात अजून उकाडा हुता. दोन-तीन डाव हजरी लावून पाऊस गायब झाल्ता. वर आभाळात ढगांची दाटी हुयाची, तळ्यात कळपानं निवांत फिरणाऱ्या बदकांगत ढग सरकत ऱ्हायचे. गावात शेताच्या कामांना जोर आला हुता, नांगरणीसाठी माणसांची धांदल उडाली हुती. समदं घरदार कामाला जुपलं हुतं. सूर्य खालतीकडं कलला, न भितीशेजारी चटई हातरून पडलेल्या म्हातारीला आपसूकच जाग आली. पडल्या पडल्या तिनं डोळं किलकिलं करून म्होरच्या भितीवर लावलेल्या फोटोकडं बघितलं. तिज्या डाव्या डोळ्यात फूल पडलेलं, उजव्या डोळ्यान जवळचं दिसायचं नाय. नाय म्हणलं तरी आता म्हातारी नव्वदीला टेकलेली, पाठीत वायची वाकलेली पर खाऊन पिऊन धड हुती. हाताला रेटा देऊन म्हातारी उठली, तशीच मागं जाऊन तोंड खंगाळून आली. मग डोळ्यावर तिजा चष्मा अडकवून काठी टेकत टेकत अंगणातल्या गुळभेंडीच्या झाडाबुडी जाऊन बसली. सांच्याला म्हातारीला तिथं बसायला आवडायचं, तिज्या नातसूनेनं काळा चा आणून म्हातारीला दिला.
“अक्का, बर हायसा नव्हं?”
तिनं काळजीपोटी इचारलं. म्हातारीनं निस्ती मान हालवली न चा बशीत वतला.

सकाळधरनं म्हातारी गप गप हुती, दुपारच्याला बी एवढा एवढा दूधभात खाऊन उठली, म्हणून सुनेनं सवाल केल्ता. म्हातारी तशीच म्होरं बघत बसून राह्यली. एका बारक्या टेकाडावर तेंचं घर हुतं, गुळभेंडीच्या झाडाखालनं गाव दिसायचं. गावाच्या मावळतीला खंडोबाचा डोंगुर हुता, रोज सूर्य त्या डोंगरामागं बुडी घ्याचा. अत्ताबी सूर्य इतभर वर राह्यला हुता, आभाळात उगं दोनचार ढग हुतं. मोठ्ठ्या निळ्याशार कुरणावर चरणाऱ्या गयांवाणी ती भासत हुतं. घरापासनं जरा डावीकडं तिरकी वाट खाली उतरली हुती, पुढं बारीक वळसा घेऊन घराच्या बरोब्बर समोर ती गावात उतरायची. म्हातारीची नजर त्या वाटंवर लागलेली! तिला काय दिसत हुतं कुणाला ठाव, पर गुळाला मुंग्या चिकटल्यावाणी तिजी नजर तिथंच चिकटलेली! एवढ्यात तिजी पतवंड तिज्या गळ्यात येऊन पडली. धाकटी सोनी न थोरला गुंड्या! दोघंबी बासंगं रानात गेलेली, परत आली तशी तेंनी म्हातारीकडं धाव घेतली. गुंड्या धा वर्षांचा हुता न सोनी सात! सोनीला जवळ घीऊन म्हातारीनं तिजा मुका घेतला. सोनीला म्हातारीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवायला आवडायचा, म्हातारीचं कातडं तिला एकदम दुधाच्या साईवानी मऊसुत वाटायचं. सोनी तशीच तिज्या मांडीवर बसली, तिज्या बापाने तिला हटकलं. तशी म्हातारीच म्हणली,
“आसू दे रं!” एवढ्या थोरल्या गुळभेंडीला दोन कवळ्या पानांचं वझ्झं हुतं व्हय ?"
गुंड्यानं तिला इचारलं, “अक्का, सांच्याला हितं का म्हणून बसतीस गं?”
आक्का नजर न काढताच म्हणली, “सोने, सूर्य मावळायच्या न उगवायच्या येळला आभाळ असं तांबडंलाल का हुतं माहित्ये का?”,

“क्च!” सोनीन मान हालवत आवाज काढला. तिज्या बाचं बघून सोनी ही नवीनच शिकली हुती. बाजूला गुंड्या हुबाच हुता, म्हातारीनं तेला हाताला धरून शेजारी बसवला. सोनी वर आभाळाकडं बघत हुती, सूर्याच्या कडेनं आता केशरी झाक येऊ लागलेली ! म्हातारीनं तिकडं एकडाव बघितलं, जाड भिंगाआड तिजं डोळं चमकलं न ती बोलली,
“आरं ह्यो सूर्य आपला बाप हाय.”
गुंड्यानं म्हातारीकडं वळून बघितलं, “ह्या, असं कसं?”
म्हातारी तेज्या डोक्यावर हात फिरवत म्हणली, “आपला म्हंजी सगळ्यांचा, समद्या माणसांचा, झाडांचा, गुराढोरांचा!”

सोनीला हेजी गंमत वाटली, “आणि आय कोण मग?”
म्हातारीनं राबराबून घट्ट पडलेला तिजा हात अलवार भुईवरनं फिरवला.
गुंड्याला अजुनबी काय कळत नव्हतं, “आक्का, असं का?”
“आरं, त्यो बाबा आपल्याला उजेड देतो. तेज्यामुळं आपल्या डोळ्यास्नी दिसतं. म्हणून त्यो बाप. आन, आपल्याला तिज्या पोटात पिकवून खायला घालती म्हणून भुई आपली माय.” मागनं गुंड्याच्या बानं बघितलं तर म्हातारी न पोरं गुंग पार गुंगलेली!
म्हातारी फुडं सांगायला लागली, “आता त्यो बाबा कामाला जातो म्हणून तर हितं उजेड पडतो नव्हं. तुमचा बा कसं नौकरीला जाऊन पैसं आणतो कं नाय?” गुंड्यानं मान हालवली. “म्हंजी, सूर्य रातच्याला काम करून उजेड घिऊन येतो व्हय?” म्हातारीनं मान डोलवली.

“आपल्या एवढ्या एवढ्या घराचा पसारा बगताना आपल्याला फुरं हुतं. ह्या दोघास्नी तर समद्या दुनियेला बघायचं हाय नव्हं. मग काय हुतं माहित्या का? इळभर दोघंबी कामाला जुपलेली, बसून दोन सबुद बोलावं म्हणलं तरी टाईम घावत नाय.”
पोरं आता गुतली हुती, पोरांनी पुढं सवाल केला नाय. सूर्य अजून उतरला हुता, खंडोबाच्या डोंगराला जवळ जवळ टेकला हुता. वर भला मोठ्ठा गुलमोहर फुलल्यागत झालं हुतं, मगासचे दोन चुकार ढग आता दिसत नव्हतं.
“मस बोलावसं वाटतं दोघांनाबी, पर करणार काय? पर जसजशी जायची येळ जवळ येती कं नाय, तशी दोघंबी कासावीस हुत्यात. म्हणून जाताना सूर्य असं आभाळ रंगवून जातो, जाता जाता भुईला सांगून जातो की मी येतो बरंका, आल्यावर बोलूया. तीच परत येताना, त्यो याच्या आधीच भुईला कळावं त्यो याला लागलाय म्हणून आभाळाच रूपडं रंगात न्हातं.”
आक्का एवढं बोलून गप झाली. पोरं समोर बघण्यात गुतलेली! म्होरच्या डोंगरामागं सूर्य जवळ जवळ डुबलेला, वरचा गुलमोहर अजून गडदलाल झालेला तेजी तांबूस सावली भुईवर सांडली हुती. म्हातारीची नजर खेचल्यागत वाटेकडं वळली.

रघु शिकारीत वस्ताद गडी! गोरं सायब हुते तवा त्याला हमखास बोलावनं याचं. डोंगरामागल्या जंगलात जनावरं हुती. रघु शिकारीला गेलाय न मोकळ्या हातानं परत आलाय, असं कधी झालं नव्हतं. मग सायब गेला तरी मानसं रघुला पिकांच्या राखणीला बोलवायची. मधी मधी तर रानडुकरं लई माजली हुती. रघु शेतात जायला लागला की सखूच्या काळजात चर्र व्हायचं, पर बोलायची सोय नव्हती. कामाच्या रगाड्यात मान वर करायला सवड मिळायची न्हाय. त्यादिवशी सांच्यालाच त्यो रानात निघाला, डोंगर उतारावर रान हुतं. सखू मागं म्हशीची धार काढत हुती, चर्र चर्र करत चरवीत उतरणारी दुधाची धार तिज्या कानावर उमटत नव्हती. तिजा जीव भलतीकडं अडकलेला! आज जाऊ नका म्हणून तिला सांगायचं हुतं. पर तसं तर रोजच वाटायचं, तेंनी जायची येळ जवळ आली की पोटात कालवून यायचं. म्होरं वाघ्या भुकल्याचा आवाज आला. तेज भुंकनं जरा लांबवर गेलं तसं सखू उठली. चरवी बाजूला ठेऊन घराला वळसा घालून फुडं आली. समोर सूर्य डोंगरामागं गेला हुता. अंगणातलं गुळभेंडीच झाड चांगलंच रूजलेलं, आता छातीपातुर आलेलं! त्या झाडापाशी ती यिऊन थांबली. रघु वाट उतरला हुता, तेनं एकदा मान वळवून बघितलं, “येतो बरंका” अस नजरंनंच म्हणून तो गावात दिसंनासा झाला. समोर सूर्यानं डोंगरामागं बुडी मारलेली! वर आभाळाचं रंग उतरायला सुरुवात झालेली!

करड्या रातीचं पांघरून वातावरणावर पसरत हुतं, न सोनीच्या आवाजानं म्हातारी भानावर आली, “आक्का, मग ती दोघं कधी म्हंजी कधीच बोलत न्हाईत?” म्हातारीनं निस्ती मान हालवली न सोनीचा मुका घेतला.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

कथेचा ग्रामिण ढंग / बाज मस्त उतरलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! काय भारी लिहिलंय! या कथेवर एखादा छान लघुपट होऊ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हातारी गोड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.