आवर्तन

कादंबरी: आवर्तन

लेखिका: सानिया

प्रकाशन: मौज प्रकाशन गृह

'आवर्तन' ही कादंबरी पूर्ण वाचून झाली आणि कित्येक दिवस कथेतली पात्रं मनात रेंगाळत राहिली, मन त्या कथेचं आवर्तन करत राहिलं. मग अधूनमधून वाटू लागलं निनीला ‘जादू की झप्पी’ देऊन तिचा कडकपणा जरा शीतळ करावा, तर कधीकधी, श्रीरंगच्या निर्णयामुळे सुरूचीला किती त्रास झाला ते त्याला सांगण्यासाठी मनात तळमळ होऊ लागली, श्रीरंगच्या प्रेमात पडण्याआधी, स्वतःचा मनस्ताप करण्यापासून सुरूचीला थांबवावं अशी इच्छा होऊ लागली. मग सगळ्या पात्रांचा विचार करून झाल्यावर शेवटी मध्यवर्ती पात्राला विमुक्त केल्यामुळे ते लेखिकेचं मनोमन आभार व्यक्त करत राहिलं. असं थोडे दिवस तरी चालत राहिलं, हे त्या कादंबरीच्या प्रभावाची कमालच म्हणावी लागेल.

समाजाच्या चाकोरी बाहेर जाऊन अनेक घटक आपलं आयुष्य बहरू पाहतात. मग तो आंतरजातीय संबंध असो, लैंगिकतेबाबतीत असो, किंवा अंधश्रध्दा निर्मुलनासारखा असो. प्रेमविवाह ह्या विषयावरून लोकांच्या भिवया उंचवायच्या त्या नव्वदीच्या दशकात लेखिका सानिया ह्यांनी 'लिव्हीनसारखा' विषय ‘आवर्तन’ ह्या कादंबरीत सादर केला. हो, सादरच केला म्हणावं लागेल कारण पात्रांमधील प्रत्येक संवाद इतका जिवंत झालाय की त्या कथेचा आस्वाद घेत आपण एखादा चित्रपटच पाहतोय की काय असा भास होत राहतो सारखा. मला ही कादंबरी अतिशय आवडली.

ही कादंबरी म्हणजे एका जोडीदारानं तिच्या जोडीदाराच्या आठवणीत शब्दांत गुंफलेलं भावविश्वाचं आवर्तनच की. एकशे सोळा पानांची ही कादंबरी वाचायला सुरुवात केली तर ती एका बैठकीत वाचून होईल, इतकी गुंतवून ठेवणारीये.

ह्या कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्या विचारांशी, मतांशी ठामपणे उभं राहण्यासाठी स्वतःशी तरी जगडतयं किंवा समाजाशी तरी.

कादंबरीची सुरुची हे मध्यवर्ती पात्र, श्रीरंग तिचा प्रियकर. दोघे एकमेकांना कॉलेजच्या दिवसांत ओळखू लागले, एकमेकांच्या प्रेमात पडले, एकाच घरी नांदू लागले पण लग्न मात्र केलं नाही, का? तर श्रीरंगला लग्नाच्या बंधनात पडायचं नव्हतं. का? तर त्याच्या बहिणीवर आणि आईवर त्याच्या बाबांनी केलेल्या अन्यायामुळं त्याला कुठल्याही गोष्टींशी, व्यक्तींशी नातं जोडावंसं वाटलं नाही, म्हणून आणि अनेक कारणांमुळे, म्हणा. पण मग सुरुचीला तर लग्न करायचं होतं. ते काही होत नाही. का? सुरूचीला एकटेपणाची टोचणी सतावत असायची आणि लग्न झाल्यावरच तो पूर्णपणे आपला होईल अशी तिनं स्वतःची समजूत करून घेतली होती. पण श्रीरंगचे विचार वेगळे होते. प्रेम करण्याचा पुरावा म्हणजे लग्न करणं हे त्याला मान्य नव्हतं. श्रीरंगचं त्याच्या बाबांबरोबर कधी पटलं नाही. पण सुरुचीशी ते चांगले वागले. मग श्रीरंग आणि त्याच्या बाबांमध्ये कुठला गैरसमज होता? की श्रीरंग त्याच्या बाबांना समजू शकला नाही, आणि त्याचे बाबाही त्याला समजू शकले नाहीत. अशा वेळी, संवाद साधून दोघांच्यातला कडवटपणा मिटला असता?

सुरूचीची मैत्रीण इला. अन्याय झालेल्या स्त्रियांसाठी ती लढायची. ती व्यावहारिक होती. आणि सुरूचीला आपल्याबरोबर काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहायची. पण सुरूचीनं जरी अशा बायकांसाठी मदतीचा हात पुढं केला तरी इला इतकी तळमळ आणि टोकाची भूमिका घेण्याची तिला इच्छा मात्र नव्हती.

तर दुसरीकडे, परदेशात वाढलेली, तिथल्या लोकांमध्ये वावरलेली सुरुचीची धाकटी बहीण स्वरूप. पण तिचे विचार वेगळे होते. स्वरूप सुरूचीहून लहान होती, खूप समंजस होती, व्यावहारिक होती, आणि परिस्थितीच्या चौकटीत अडकून राहण्यापेक्षा ती तिचा स्वीकार करायची आणि तिच्या इच्छेप्रमाणे मस्त जगायची.

तर, आपल्या तत्वांना जपून, समाजानं टाकलेल्या बायकांना हात देणारी निनी जरी कडक शिस्तीची असली तरी ती तिच्या मनाला तिच्या ताब्यात ठेवू शकली नाही, त्याला शिस्तीचं वळण लावू शकली नाही. ही बंडखोर घटकं फक्त स्त्रियांपुरतंच मर्यादित न राहून त्यात त्यांच्या मित्राचादेखील वाटा होता.

पण तरीही वरून साध्यासोप्या भासणाऱ्या अडचणी, प्रश्नांची उत्तरं सहज माहीत असून परिस्थितीची, मनाची इतकी गुंतागुंत का? ही सारी गुंतागुंत, परिस्थितीची जाणीव, कादंबरीतल्या संवादांतून उलगडत जाते, आणि प्रश्न फक्त उत्तरं मिळवण्याचा राहत नाही, तर त्यातली भावनिक गुंतागुंत उलगडण्याचाही होतो, हे कळत जाते. ही कादंबरी वाचताना आपण स्वच्छंदपणे एका गमतीशीर राईडवरून भूतकाळ आणि वर्तमानकाळात उड्या मारत चाललोय की काय असं वाटू लागतं. मुख्य पात्र जेव्हा स्वतःशीच झगडतं, बोलतं, मत मांडतं तेव्हा नकळत आपली मते तयार होत जातात. कधीकधी तर आपणही तिच्या संवादात शिरून जातो, पुढं ती काय विचार करणार ह्याचा कयास बांधू लागतो.

अशाप्रकरे लेखिकेनं वाचकांना पात्राच्या अंतरंगात घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं पात्राच्या मनस्थितीचा ठाव लागतो, सुरुचीनं स्वतःशीच केलेल्या संवादाचा, त्या संवादातून स्वतःला सावरण्यासाठी केलेली धडपड लक्षात येते. ही कथा स्त्रीवादाच्या वळणावर जात नसून, स्त्रियांचं अंतर्विश्व समजून घ्यायला मदत करते. ह्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे लेखिका स्वतःचं मत किंवा कुठल्याही प्रकारे वाचकावर एखाद्या विषयाचा प्रभाव पाडत नाही, पण जी स्थिती आहे ती तशीच मांडते आणि वाचकांना त्या विषयी स्वतःचं मत असण्याचं स्वातंत्र्य देते.

ह्या कादंबरीनं रुढीबंधनातून मुक्त होत आपल्या इच्छेप्रमाणे जगू पाहणाऱ्या बंडखोर व्यक्तींच्या मनातली तळमळ, त्यांचं वेगळेपण पाहण्याची दृष्टी दिली. ही कादंबरी वाचून झाल्यावर वाटू लागलं समाजानं रेखाटलेली अदृश्य चाकोरी कायमस्वरूपी मिटवावी आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही ना ह्याची काळजी बाळगत दिलखुलासपणे जगावं प्रत्येकानं.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)