आउट ऑफ कोर्स

#ललित #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

आउट ऑफ कोर्स

- मृण्मयी रानडे

त्या शनिवारी अपूला सुटी होती पण गिरीशला मात्र कामावर जावं लागलं होतं. ती आणि सासू स्वयंपाकघरातलं काचेचं कपाट आवरत होत्या. तेवढ्यात शेजारच्या बिल्डिंगमधल्या महेशचा फोन आला,
'अपू, कॅन कात्यायनी कम फाॅर काॅफी टू युअर प्लेस इन द इविनिंग?'
'येस, व्हाय नाॅट. पण तू असं का विचारतोयस?'
'शी इज आउट ऑफ कोर्स यार, अम्मा आप्पा नाहीयेत घरी दोनतीन दिवस. मीही ऑफिसात आहे आज नेमका.'
'व्हाॅट?'
'आउट ऑफ कोर्स...'
'अरे ए, काय म्हणायचंय काय तुला?'
'ओह, दॅट वुमन थिंग यार.'
'ओ माय गाॅड, गाॅट इट. अोके, टेल हर प्लीज.'
'थँक्स यार अपू.'
'हं.'
काही क्षण ती गोंधळून गेली. आपण ऐकलं ते खरंच होतं की काहीतरी गफलत झालीय, तिला ठरवता येईना. काॅफी प्यायला कात्यायनीला आपल्या घरी का यायचं असेल, त्यांच्या घरची संपलीय का, की तिला एकटीला प्यायचा कंटाळा येतो... छ्या, काहीच सुचेना तिला.
'आई, काय असेल हो? मला कळतच नाहीये महेश असं का म्हणाला ते.'
'अगं, त्यांच्याकडे पाळतात ना, अडचण असेल तिची.'
'मग काॅफीचा काय संबंध?'
'अगं, स्वयंपाकघरात नाही जाऊ देत त्यांच्याकडे.'
'काय?' अपू जवळजवळ ओरडलीच. म्हणजे कोकणात तिच्या आजोळी हे तिने पाह्यलं होतं, पण इकडे मुंबईत इतक्या शिकल्यासवरलेल्या घरातसुद्धा?
'तसेच असतात ते लोक, नावाला आधुनिक, प्रत्यक्ष वागणं पुरातन काळातलंच.'
'अहो, पण कात्यायनी मला कधी म्हणाली नाही तसं.'
'तिला वाटलं असेल त्यात काय बोलायचं. किंवा आपल्याकडेही तशीच पद्धत असेल, असं वाटलं असेल.'
'बाप रे आई, आपल्याकडे असं असतं तर माझी खैर नव्हती.' आणि मनात म्हणाली, तुमचीही.
'होतं, काही वर्षांपूर्वी होतं आपल्याकडेही. गिरीशची आजी होती तोपर्यंत. पण मलाही ते पटायचं नाही, माझ्या माहेरी नव्हतं असलं काही. मुलगी नाही मला, त्यामुळे पुढे चालू राहण्याचा प्रश्नच नव्हता. आणि तू इतकी गुणाची घरात आल्यावर तुला असं बाजूला बसायला लावणं माझ्याच्याने नसतंच झालं.'
'ओह आई, थँक्यू सो मच.'
मग विसरायच्या आत तिने फिल्टरमध्ये काॅफी पावडर घातली, वरून उकळतं पाणी घालून ठेवलं. फिल्टर काॅफी आवडायची तिलाही.
जेवून मागचं आवरल्यावर तिने फोन हातात घेतला नि कात्यायनीचा नंबर लावायला घेतला. पण ती थांबली. काय बोलायचं, काय विचारायचं. बिचारी आधीच वैतागलेली असेल, येईल तेव्हा बोलू असा विचार करून ती आडवी झाली.
सहा महिन्यांपूर्वीच महेशशी लग्न होऊन कात्यायनी या वसाहतीत आली होती. ती मूळची बंगळुरूची. अपू नि ती शेजारशेजारच्या इमारतींत राहायच्या. अपूचा नवरा गिरीश आणि महेश लहानपणापासूनचे मित्र. त्यामुळे महेशच्या लग्नात अपूगिरीशने खूप कामही केलं होतं, आणि धमालही. तीन दिवस चालणारं तामिळ पद्धतीचं लग्न पाहायला मिळणार इतक्या जवळून म्हणून लग्न ठरल्यापासूनच अपू खूष होती. लग्नाच्या आधी कात्यायनी एकदाच मुंबईत आली होती, साखरपुड्याला. शांत सावळीशी कात्यायनी तेव्हाच अपूला आवडली होती. कात्यायनी चित्रकार होती. पुढे काय करायचं, ते ठरत नव्हतं तिचं अजून. त्यामुळे तिला आणि अपूला मधूनच वेळ मिळायचा भटकायला. अपू ऑफिसमधनं निघताना फोन करायची, दोघी चेंबूर स्टेशनपाशी भेटायच्या. हिरव्यागार भाज्या आणि फळं मिळणारी पुलाखालची मंडई हा दोघींचा फेवरिट स्पाॅट. तामिळ स्वयंपाकासाठी लागणारे छोटे कांदे, कोहळा, लाल सालीची केळी, आणि बाकीच्या भाज्या तिथे मिळायच्या त्यामुळे कात्यायनीही खूष असायची. खेरीज तिथे मिळणारी, बंगळुरूहून येणारी मल्लिगेची फुलं. अहाहा. आठपंधरा दिवसांतनं तिथे फेरी मारल्याशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही. तिथला पाणीपुरीवाला अपूचा फेवरिट. तिनेच कात्यायनीला त्या तिखट पाणीपुरीची सवय लावली होती. नाकाडोळ्यातून येणारं पाणी पुसता पुसता कात्यायनी आणि अपूर्वा चारपाच प्लेट पाणीपुरी तरी हादडायच्याच. त्या दोघींच्या एरवी सरळसोट असलेल्या आयुष्यातल्या दुर्मीळ अशा अनिर्बंध काळामधले हे काही तास असायचे. ती आंबटतिखट, गोडाचा लवलेशही नसलेली, पाणीपुरी हायहुय करत खायची, आणि गप्पा मारत, भाजीच्या पिशव्या सावरत घरी यायचं.
या दोघींचं मैत्र जुळल्याने त्यांचे नवरेही खूष होते. विशेषत: महेश. कारण अपूने कात्यायनीला मुंबईशी, घराशी जुळवून घ्यायला खूप मदत केली होती.
घर म्हणजे चेंबूरमधली एक पन्नासेक वर्षं जुनी वसाहत. बहुतांश मराठी, तामिळ, मल्याळी मध्यमवर्गीय वस्ती. एखाददुसरं गुजराती कुटुंब, पण मराठी लोकांत सहज खपून जाणारं. तीनमजली पाच इमारती. तीन खोल्या आणि दोन छोट्या खाेलीएवढ्या बाल्कन्या असे फ्लॅट. प्रत्येक मजल्यावर मोठी मोकळी जागा. इमारतींच्या मधोमध अंगण. पोराटोरांना खेळायला. झाडं होती भरपूर, त्यांच्याखाली बाकं. प्रत्येक इमारतीला छानशी गच्ची. मुंबईतलं पुनर्विकासाचं वारं याही वसाहतीत घुसलं होतं, परंतु शहाण्यासुरत्या ज्येष्ठांनी डोकं ताळ्यावर असलेल्या तरुणांना हाताशी धरून ते हुसकावून लावलं होतं. इमारती बऱ्यापैकी मजबूत होत्या, आणखी पंचवीसेक वर्षं तरी काळजी नव्हती.

कात्यायनीला आता हिंदीची थोडी सवय झाली होती. तशी ती भाषांच्या बाबतीत हुशार म्हणायची. मातृभाषा तामिळ, बंगळुरूमध्ये वाढल्याने कन्नडही यायचं बऱ्यापैकी. इंग्रजी तर ती उत्तम बोलायची. आता अपूमुळे मराठीचाही थोडा वापर करू लागली होती. दोघी तासनतास गप्पा मारायच्या नाहीत, कारण अपूला इंग्रजीत अशा जवळच्या गप्पा मारायला नको असायचं. कात्यायनीच्या घरचं वातावरणही साधारण तामिळ कुटुंबांमध्ये असतं तसं, पारंपरिक, काहीसं आपल्याआपल्यात रमणारं. परंतु, तरीही दोघींचं जमलं होतं खरं.
मागच्या वीकेंडलाच मुंबईतल्या आर्ट गॅलरी पाहायला म्हणून दोघी गेल्या होत्या. चेंबूरहून सीएसटीपर्यंत लोकलने प्रवास करताना कात्यायनीला इकडे बघू की तिकडे, असं झालं होतं. स्टेशनांची नावं वाचूनही तिला बरेच प्रश्न पडत होते. मग सीएसटीला उतरून दोघी बसची वाट पाहू लागल्या. अपू मुद्दाम डबलडेकरसाठी थांबली. जहांगीरपर्यंत तसा थोडाच होता प्रवास, टॅक्सी मिळालीही असती सहज; तरीही १ नंबरच्या बसमध्ये वरच्या डेकवर बसूनच जायचं होतं तिला. अपूला स्वत:लाच तसा प्रवास आवडायचा, तिच्या लहानपणची आठवण करून द्यायचा. कात्यायनी तर खूषच झाली एकदम.
जहांगीरची दालनं, बाहेर पदपथावर लावलेली चित्रं, समोरच असलेली NGMA असं सगळं फिरून त्या थकून गेल्या. खूप काही पाहिल्यानं, अनुभवल्यानं माणूस थकताे तशा.
'चल, दिल्ली दरबारमध्ये जाऊया, बिर्याणी हाणू. खूप दमलोय.'
'ए, मी नाॅनव्हेज नाही खात, विसरलीस?'
'अरे यार! ठीकेय, आज राहू दे, पण एकदा तरी मी तुला खिलवणारच ती, बघच तू.'
मग कुलाबा काॅजवेवर थोडं पुढे जाऊन त्या कामतमध्ये गेल्या. फ्रेश झाल्या नि पावभाजी ऑर्डर केली.
'आवडल्या गॅलऱ्या?'
'अफ कोर्स, थँक यू सो मच अपू. तुला चित्रांत कसा इतका रस गं?'
'काढायचे मी चित्रं पूर्वी, शाळेत इंटरमिडिएट वगैरे परीक्षा पण दिल्या होत्या, पेन्सिलचं काम मला आवडायचं बऱ्यापैकी. पण नंतर नाही करावंसं वाटलं काही. अनेक वर्षांत ब्रश, पेन्सिल हातातही घेतलं नाहीये. पण चित्रं पाहायला अजूनही आवडतात मला. विशेषकरून रंग.'
'एकदा ये माझ्याकडे, माझ्या कागदांवर काढ काहीतरी छान.'
'चल गं, वाया जाईल सगळं उगाच.'
'काहीतरीच काय, वाया कसं जाईल, प्रयत्न तर कर.'
'बघू नंतर, आता खा पटापट, जाम भूक लागलीय.'
संध्याकाळची लोकलची गर्दी असह्य होण्याआधी त्या निघाल्या.
घरी येताना अपूच्या डोक्यात चित्रं आणि रंग घोळत होते. याआधी तिला कधी वाईटबिईट नव्हतं वाटलं, आपली चित्रकला मागे पडली, नाहीतर काय काय केलं असतं, वगैरे. पण आज कात्यायनीच्या नजरेतून गॅलऱ्यांमधली चित्रं पाह्यल्यानंतर तिला पुन्हा हातात पेन्सिल घ्यावीशी वाटू लागली होती.
वसाहतीत शिरता शिरता, ती कात्यायनीचा हात घट्ट धरून म्हणाली, 'थँक्यू.'
कात्यायनी म्हणाली, 'गॅलऱ्या फिरवल्याबद्दल मी तुला थँक्यू म्हणणार तर तूच काय म्हणतेयस, मी काय केलंय?'
'जाऊ दे, सांगेन कधीतरी.'
रात्री गिरीशला दिवसभराचा वृत्तांत अगदी छोट्या छोट्या तपशिलांसकट सांगताना मात्र तिने याबद्दल काहीही बोलायचं टाळलं. आधी काही तरी करू, आणि ते दाखवूच त्याला. बोलून पोपट नको व्हायला.
'मॅडम खूश दिसतायत आज फार,' असं तो म्हणाला, तेव्हा फक्त गोडसं हसली ती.
आठवड्याभरात तिने पेन्सिल घेतली खरी हातात, पण नीट काही उतरत नव्हतं. फारच मोठा काळ कोरडाठाक गेला होता.

ठरल्याप्रमाणे साडेचारला कात्यायनी आली. तिने काॅफी टाकली सगळ्यांसाठीच. आईबाबांचा दुपारचा चहा साडेतीनला झाला होता रोजच्याप्रमाणेच. पण काॅफीही आवडायची त्यांना.
दोघी काॅफीचे मग हातात घेऊन बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसल्या.
'नाउ टेल मी.'
'व्हाॅट?'
'हेच, आउट ऑफ कोर्स आणि काॅफी वगैरे...'
'उस में क्या बोलने का?'
'अगं ए, मला हे सगळं फारच धक्कादायक आहे. आमच्याकडे असं काही नसतं गं बाई, त्याशिवाय का महेशने तुला इकडे यायला सांगितलंन?'
'आय नो. पण मला वाटलं तुला माहीत असेल. आमच्याकडे मी किंवा आई पीरिअड्स सुरू असताना स्वयंपाकघरात पाऊलही टाकत नाही. सगळं महेश किंवा आप्पा करतात.'
'तरीच, त्याला स्वयंपाक येतो बऱ्यापैकी करता.'
'हो. आज नेमके ते दोघे नाहीत. महेशने माझं जेवण, पाणी वगैरे काढून ठेवलंन. पण काॅफी गार होऊन गेली असती ना. एरवी अम्मा देते सगळं.'
'अगं पण, तुला काही कमी पडलं, पाणी संपलं/सांडलं तर?'
'तर काय, काहीच नाही करू शकत. सहन करायचं. आमच्या घरी असं नाहीये गं अजिबात, माझे अम्मा आप्पा अगदी मोकळ्या मनाचे आहेत, दोघेही शिक्षक आहेत, हे त्यांना मानवणारंच नाहीये.'
'बापरे, अगं पण मग तू का सहन करतेयस? सांग की अम्माला, आणि महेश काही म्हणत नाही का? थांब त्याला पाहाते भेटेल तेव्हा.'
'नाही गं, तो म्हणाला अम्माला दोनदा. ती म्हणाली, बघू.'
'गाॅश.'
'जाऊ दे गं, इतकं काय मनाला लावून घेतेस, तू लकी आहेस हे लक्षात ठेव फक्त.'
'इंडीड. आय डू काउंट माय ब्लेसिंग्स एव्हरी नाइट बिफोर आय गो टू स्लीप, मस्ट ॲड धिस टु द लिस्ट.'

त्या रात्री चौघांनी सिनेमाला जायचं ठरवलं. महेश कात्यायनी दोघंच असणार होते घरी नाहीतरी, मग अपूनेही रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करून दिली सासूला, आणि तयार झाली. कात्यायनीला अनेक दिवसांपासून मराठी सिनेमा पाहायचा होता, म्हणून ते मुंबई पुणे मुंबई २ ला गेले. महेशला मराठी उत्तम येत होतंच, आणि सबटायटल्समुळे कात्यायनीची सोय झाली.
सिनेमा पाहताना दोघींच्या डोळ्यांत घळाघळा अश्रू. तर दोघे टाेणगे कधी हसतायत, कधी चुळबुळतायत. इंटरव्हलमध्ये त्यांनी विचारलंच, 'अगं, रडताय काय दोघी अशा, तिला काय सासुरवास होतोय का?'
'गपा हं तुम्ही, तुम्हाला नाही कळणार. हो की नाही गं कात्यायनी?' अपूने दटावलं दोघांना.
कात्यायनी मात्र गप्पच होती. महेशला ते लक्षात आलं, त्याने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर ओठ टेकले. तिला आणखीच रडू फुटलं, मोठ्या कष्टाने ती सावरली.
रात्री झोपताना मात्र तिला राहावलं नाही.
'त्या गौरीला इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन आलं होतं लग्नानंतर त्या बदलतील म्हणून. ती तिच्या आईला ते बोलूनही दाखवते. माझं काय झालं असेल बंगळुरूहून इथे येताना, कधी विचार केलास का? आज काॅफी प्यायला अपूकडे गेले तर तिने मला प्रश्न विचारून भंडावून सोडलं नुसतं. का मी सहन करायची अशी वागणूक? माझा इतका अपमान होतो दर महिन्याला, नको ते पीरियड्स असं वाटतं.'
'अगं हो हो, किती चिडशील? अपू एक दिवस काही म्हणाली तर इतका राग?'
'अपू म्हणाली आणि मी गप्प बसले, इतकाच फरक.'
'अगं, पण आपल्याकडे आहे तसं, मी तरी काय करू? मी बोललो नाही का अम्माला दोनदा? ती ऐकायलाच तयार नाही. एरवी ती तुझ्याशी इतकी छान असते, दोघींचं जमलंय बऱ्यापैकी. मग याचा इतका त्रास का?'
'अरेच्चा, असं कसं म्हणतोस तू? एक तासभर असं अस्पृश्य असल्यासारखं बसून दाखव आणि मग बोल.'
'ओहो, आज दोघंच आहोत घरी अनेक दिवसांनी तर भांडणात घालवणारेस का रात्र?'
फुरंगटलेल्या कात्यायनीची कळी खुलवायला महेशला बरेच प्रयत्न करावे लागले.
तिकडे अपूही सिनेमा पाहून विचारात पडली होती. गौरीला लग्नाच्या आदल्या रात्रीपर्यंत प्रश्न पडत होते, आपण योग्य निर्णय घेतोय की नाही, सगळं ठीक होईल ना, लग्नानंतर वाद झाले तर काय करायचं, वगैरे. आपल्याला पडले होते का हे प्रश्न? की आपण त्यांना मागे ढकलत राह्यलो? वेळ येईल तेव्हा पाहू, असा सोयीस्कर विचार केला. किती किती काय काय बदललंय, याची यादी करायला गेलं तर तास अपुरा पडेल. तरीही अशी कात्यायनीसारखी वेळ आली असती आपल्यावर तर काय केलं असतं, हा विचार तिचा पिच्छा सोडेना.
गिरीशच्याही लक्षात आलं, मामला गडबड है. आत्ता या वेळी विषय काढावा की नाही, असं त्याला वाटत होतं. विचारावं तर काय ऐकावं लागेल ठाऊक नाही. नाही विचारलं तर माझ्याकडे लक्षच नाही तुझं, ही भुणभुण पुढचे अनेक दिवस ऐकावी लागणार, अशा दुविधेत तो पडला होता. पण अपू नवऱ्याला पुरेपूर ओळखून होती. त्यामुळे तो काही बोलायच्या भानगडीत पडणार नाही हे तिला चांगलं ठाऊक होतं. जाऊ दे, आज नको वाद उगीच, अशी मनाची समजूत काढून ती अंथरुणावर पडली खरी, पण तिला झोप येत नव्हती. गिरीश काहीतरी सांगत होता, ती हं हं करत होती फक्त. अखेर तो कंटाळून झोपी गेला. काही मिनिटांतच अपू एका निश्चयाने उठली. बाहेरच्या खोलीत जाऊन दिवा लावला. तिच्या कपाटातले कागद काढले, लाल पेन्सिल घेतली आणि झरझर काही तरी रेखाटू लागली. पंधरा मिनिटांत तीन कागद भरले होते. अचानक तिला थकवा आला, पण ती दमली नव्हती. शांत वाटत होतं तिला. कागद तसेच ठेवून ती आत गेली आणि गिरीशला जवळ ओढून झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी सकाळी गिरीश सवयीप्रमाणे सहा वाजता उठून फिरायला जाण्यासाठी तयार होत होता तर बाहेर टीपाॅयवर ठेवलेली चित्रं त्याला दिसली.
'वाॅव.'
पटकन त्याच्या तोंडून उद्गार निघाला. रक्ताने माखलेली बाई, रक्तात लडबडलेला गर्भ, रक्त भाळावर मिरवणारी अष्टभुजा...
कधी केलं हे अपूने? रात्री तर काहीच नव्हतं. झोपली नाही की काय ही बाई रात्रभर?
पण त्या चित्रांनी त्याचा ठाव घेतला होता. फिरून येईपर्यंत त्याला थोडा थोडा अंदाज आला होता अपूच्या डोक्यात काय चक्रं फिरत असतील रात्रभर याचा.
घरी आला तर फिल्टर काॅफीचा दरवळ. नाॅर्मलला आल्यात बाई म्हणजे...
अपू झोपाळ्यावर बसून काॅफीचा मग हातात घेऊन पेपर वाचत होती. त्याची काॅफी थरमाॅसमध्ये त्याची वाट पाहात होती. रविवारची सुरुवात तर प्रसन्न झाली होती. पण खरी गंमत नंतर होती, महेशच्या हातचे नीर दोसे खायचं आमंत्रण होतं अपूगिरीशला.
आंघोळ करून तयार होऊन दाेघे तिथे गेले तर महेशने जय्यत तयारी करून ठेवली होती. ताजी नारळाची चटणी, त्यावर उडदाची डाळ, कढीलिंब व लाल मिरचीची फोडणी, वर तरंगणारी मोठी मोहरी त्यात. अपूला अतिशय असणारं सांबारही होतं, नीर दोशाबरोबर सांबारची जोडी खुद्द महेशला पसंत नव्हती तरी. गिरीशला तर नीर दोसा नुसताच आवडायचा.
खाता खाता दोघींची काहीतरी नजरानजरी झाली. नवरेबुवांच्या काही ते लक्षात आलं नाही. ते कालच्या हुकलेल्या टी२० मॅचचा रिकॅप पाहून त्यावर बोलण्यात गर्क होते. हळूच दोघी आत गेल्या, थेट स्वयंपाकघरात.
'अगं, आपण इथे काय करतोय, तुला यायचं नाहीये ना?'
'श्शू, हळू बोल.'
'बाप रे, काल रात्रीत काय जादू केलीस गं महेशवर, बिच्चारा भोळा शंकर आमचा!'
'कसली जादू गं, इतकी चिडले होते मी. खूप सुनावलं त्याला. त्याचं म्हणणं होतं मी तेवढं एक सहन करावं. मी म्हटलं का, मग बरंच वाजलं. त्या सिनेमामुळे माझ्या विचारांना जरा वारा मिळाला. सकाळी म्हणाला, ये चल चटणी करायला मदत कर. म्हटलं, ठीकेय सुरुवात तर करू आज. अम्मा आली की पाहू.'
'अरे वा, बरीच प्रगती आहे.'
'मला काही फार अपेक्षा नाहीये, पण आता मला गप्प बसून शांत राहता येणार नाहीये हं अपू. इतके दिवस मला त्रास व्हायचाच या सगळ्याचा, पण आपलं बोलणं झाल्यावर ते जास्तच डाचायला लागलंय. बघू.'
महिन्याभरात पोंगल होता, कात्यायनीचा लग्नानंतरचा पहिला. नेमकी तेव्हाच आली पाळी तर काय करायचं, सणाच्या दिवसांत वादही नको वाटतात, आपली बाजू कितीही बरोबर असली तरी. पण असं बाजूला बसायची वेळ आली तर? विचार करूनच कात्यायनीचं डोकं भणभणून गेलं. आणि ज्या अर्थी ती इतका विचार करत होती, त्या अर्थी पाळी पाेंगलच्या आदल्या दिवशी येणं स्वाभाविकच म्हणायचं. सकाळी उठली रोजच्या वेळी, पण तिला बेडरूमच्याही बाहेर यावंसं वाटेना. महेशही विचारात पडला की, आता काय करायचं.
तेवढ्यात बेडरूमचं दार वाजलं. महेशने दार उघडलं उठून, कात्यायनी पडून राहिली डोक्यावर पांघरूण घेऊन.
'काय रे, ऑफिस नाही का आज? वाजले किती?'
'अं हो, आहे ना, ती...'
'काय झालं कात्यायनी?'
'अम्मा...'
ताेंड वाकडं करून अम्मा स्वयंपाकघरात निघून गेली. महेशच्या डब्याची तयारी तिलाच करावी लागणार होती आता. जाता जाता कॅलेंडरकडे नजर गेलीच तिची. नेमकी आजच यायला हवी होती हिची पाळी. आता उद्याचं सगळं आपल्यालाच करावं लागणार, या विचाराने ती आत्ताच थकल्यासारखी झाली. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय असं काहीतरी होतंय आपलं हे तिच्या चांगलंच लक्षात आलं होतं. पण काय करावं ते सुचेना.
महेश गेल्यावर तिने कात्यायनीला काॅफी दिली तिच्या खोलीतच. दुपारी सांबारभाताचं ताट ठेवायला गेली तर काॅफी तशीच, जेमतेम तोंड लावलेली. काहीतरी बिनसलंय हे अम्माला कळलं. पण काय बोलावं, हे कळेना. जेवली की बोलू, असा विचार करून ती बाहेर आली आणि तिची रोजची सीरियल पाहायला बसली. त्यातही मजा येईना. आप्पा म्हणालेही तिला, 'काय झालंय, आज गप्प बसून टीव्ही पाहतेयस ते?'
'तुम्ही दोन्ही बाजूंनी बोला. मी बोलले तरी त्रास, गप्प बसून पाहतेय तरी त्रास.'
'अय्यो अम्मा…'
'मग काय, वैतागलेय एक तर कामं करून सकाळपासून. त्यात तुम्ही.'
'कामं करावी लागतायत ही माझी चूक आहे का? की कात्यायनीला तू येऊ देत नाहीयेस?'
'माहीत आहे मला, काही शिकवायची गरज नाहीये.'
हा प्रश्न काही लगेच सुटण्यातला नाही, हे जाणून आप्पा भिंतीकडे तोंड करून झोपी गेले.
अम्माच्या डोळ्यांसमोर सीरियल सुरू होती, पण तिला दिसत होतं तिचं तरुणपण. जरी लहानपणापासून माहेरीही सवय होती बाजूला बसायची, तरी सासरी नवीन घरी आल्यावर तसं करणं अडचणीचं वाटायचं, अजिबात आवडायचं नाही. पण सासूसमोर पर्याय नव्हता. आजेसासूही असायची अनेकदा आलेली. ती तर शेवटपर्यंत माडिसर (तामिळ पद्धतीची नऊवारी) नेसणारी, तामिळखेरीज इतर कोणत्याही भाषेचा गंधही नसणारी. तिला बिलकुल चालायची नाही अशी ढवळाढवळ. लग्नानंतर एखाद्या वर्षातच अम्मा आप्पा मुंबईला आले होते, तरीही घरातली परंपरा म्हणून हे पाळलंच होतं तिने. त्यामुळे अनेक वेळा सणावाराला आपण अशाच बाहेर असायचो. एरवीही, नवऱ्याची चिडचिड व्हायची सगळी कामं आटपून वेळेवर ऑफिस गाठताना, ते आठवलं तिला.
तरीही हे असं कसं अचानक थांबवायचं, काही झालं तर, अशी भीती तिला वाटतच होती. या अस्वस्थतेमुळे तिला झोपही लागेना. कात्यायनीच्या खोलीत डोकावली तर थोडासा भात खाऊन ती झोपली होती.
संध्याकाळी रोजच्यासारखी अम्मा फिरायला बाहेर पडली. पंधरावीस मिनिटं फिरून परत येताना गिरीशची आई भेटली. मुलगे एकमेकांचे घट्ट मित्र, पण या दोघींची मैत्री म्हणावी अशी नव्हती. भाषेचा अडसर नाही म्हटलं तरी होताच दोघींमध्ये. तरी एकमेकींना पाहून दोघी थांबल्याच.
'कैसी है आप, कल पोंगल ना, तयारी हो गयी?'
'चल रही है।'
'बहू ठीक है ना, आयी थी उस दिन काॅफी पीने.'
'काॅफी पीने? याने?'
'पाळी होती ना तिची, महेशने तिचा स्वयंपाक केला होता, पण संध्याकाळची काॅफी प्यायला आली होती आमच्याकडे. गिरीशला हक्काने सांगू शकतो ना महेश असं.'
'हाे, हो, म्हणाली खरं तसं काहीतरी.'
'आमच्या अपूला धक्काच बसला होता ते ऐकून. तिला वाटलं नव्हतं मुंबईतही असं पाळत असतील. मला किती वेळा म्हणाली असेल तसं.'
'हो, महेशही म्हणाला मला, अम्मा आता बंद कर हे, कात्यायनीला नाही सहन होत.'
'मी काय सांगू तुम्हाला वेगळं, पण या मुली अशा वातावरणात नाही वाढलेल्या ना. शिवाय शाळाकाॅलेजात विज्ञान शिकताना त्यांना त्यातला फोलपणाही कळलेला असतो. आणि आपण तर घरीच असतो, तसा काही त्यांच्यावर कामाचा मोठा बोजा नसतो की, आरामाची गरज वाटावी.'
'हो, खरंय तुम्ही म्हणताय ते.'
'असो, चला, उशीर होतोय. अपू यायची वेळ झालीय, तिच्यासाठी थालिपिठाचं भिजवून ठेवलंय, येते ती भुकेजलेली असते बिचारी.'
'हाे हो, निघू या.'
अम्मा घरी आली ती थेट कात्यायनीच्या खोलीतच. दारावर टकटक करून दार ढकललं. कात्यायनी पुस्तक वाचत लोळत होती. अम्माला पाहून एकदम धडपडत उठून बसली.
'इकडे ये.'
अम्मा काय म्हणतेय ते कळलंच नाही तिला.
'अम्मा…'
'ये म्हटलं ना मी.'
कात्यायनी चुपचाप उठून गेली. अम्माने तिला जवळ घेतलं, म्हणाली, 'चल आवर, फ्रेश हो, उद्याची खूप तयारी करायचीय आपल्याला.'
'पण अम्मा, तुम्हाला तर चालत नाही असं.'
'चालत नव्हतं. आता चालणारेय.'
'पण, का? काय झालं?'
'मला माझा पहिला पोंगल आठवला. आम्ही तेव्हा आपल्या गावच्या घरी होतो. मला तर अम्माला सांगावंही नाही लागलं की पाळी आलीय, कारण मला त्रासच खूप व्हायचा. जेमतेम १८ वर्षांची तर होते, नाजूक होते. महेशच्या अम्मम्मांनी माझी रवानगी कोपऱ्यातल्या खोलीत केली, ती थेट तीन दिवस. कसला पोंगल, कसली मजा नि काय. खायलाप्यायला मिळालं ते नशीब. सकाळी तुझं तोंड पाहून तेच आठवलं मला. आणि आत्ता गिरीशची आई भेटली होती, तुझ्याबद्दल थेट नाही म्हणाली काही, पण मला लक्षात आलं तिला काय म्हणायचंय ते. त्यांच्याकडेही पूर्वी होतं की असंच, मलाही आठवतंय. गिरीशची आजी होती तेव्हा. पण ती काळानुसार बदलली, मी तशीच चिकटून राहिले जुन्या कल्पनांना. तू काहीच कधीच बोलली नाहीस, मला वाटलं, तुला चालतंय सगळं. महेश म्हणाला दोनदा, पण तू काही बोलत नव्हतीस म्हणून मी लक्ष नाही दिलं त्याच्याकडे.'
'तसं नाही अम्मा.'
'अगं, मलाही असं अचानक इतक्या वर्षांचं सगळं सोडून द्यायला कठीण वाटत होतं. पण गिरीशच्या आईशी बोलल्यावर मलाच कसंतरी वाटायला लागलं स्वत:बद्दल. वाटलं, अपू नुसतं हे ऐकून इतकी अस्वस्थ होऊ शकते, तर कात्यायनीचं काय झालं असेल? अशाने तू मला, आप्पांना, या घराला कधीच आपलंसं नाही म्हणणार, अशी भीती वाटली मला.'
'अम्मा...'
'अगं खरंच, तुम्ही आमच्या सोबत राहाताय याचा आम्हाला किती आधार वाटतो, कसं सांगू? आपल्याच किती नातलगांना या वयात एकटं राहताना पाहतो ना आम्हीही. मग, तुमच्यासाठी एवढं करायला काय हरकत आहे, असं मला वाटलं. थोडी धाकधूक वाटेल मला, पण तेवढी सहन करेन मी. माझ्यासाठी तुम्हा दोघांचा आनंद महत्त्वाचा आहे.'
कात्यायनीचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. दिवसभराचा थकवा आणि कंटाळा कुठल्या कुठे पळाला होता. अम्माला तिने मिठी मारली घट्ट, 'थँक्यू सो मच,' म्हणाली आणि बाहेर पळाली.
अम्मामध्ये असा बदल नक्की कशामुळे झाला, हा प्रश्न तिला आणखी काही दिवस तरी नक्की सतावणार होता. आत्ता मात्र केव्हा एकदा अपूला फोन करून हे सांगतेय असं तिला झालं होतं. पण त्याआधी महेशला सांगायला तिने फोन हातात घेतला.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

खरं तर, पूर्वी मला असल्या प्रकारच्या 'माहेर' मधल्या कथा आवडायच्या, पण पुढे वात्रट लोकांच्या संगतीने प्रत्येक गोष्टीची चेष्टा करायची संवय लागली. तशी इथेही थोडी करुन घेतो.
दोन छोट्या खाेलीएवढ्या बाल्कन्या हे वाचताना आधी 'बाल कन्या' असं वाचलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0