शठे शाठ्यं समाचरेत्

#ललित #मन्वंतर #ऐसीॲक्षरे #दिवाळीॲंक२०२१

शठे शाठ्यं समाचरेत्

- सन्जोप राव

"मूळ प्रश्न असा आहे, न्यायाधीश महाराज," फिर्यादीच्या वकीलांनी विचारलं, "की असं एखादं विधेयक मांडताना त्याचे दूरगामी आर्थिक आणि सामाजिक परिणाम काय होतील, याचा विचार सरकारने केला आहे काय?"

रामशरण दुबे, फहीम करामात, राष्ट्रीय जनहित मंच आणि इतर पंधरा लोकांतर्फे जबलपूर हायकोर्टात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू होती. कुटुंबातली मुलांची संख्या मर्यादित असावी, मर्यादेपेक्षा अधिक मुलं असणाऱ्या कुटुंबांना सवलती दिल्या जाऊ नयेत या आशयाचं 'जनसंख्यानियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण' विधेयक विधानसभेत मांडणार असल्याचं सूतोवाच नुकतंच राज्य सरकारनं केलं होतं. अधिक मुलं असणाऱ्या कुटुंबांना सरकारी लोककल्याण योजनांतून वगळलं जावं, त्या कुटुंबांतील व्यक्तींना निवडणुकांत उमेदवार म्हणून उभं राहाण्याची परवानगी नसावी, त्यांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये भरती केलं जाऊ नये आणि ते आधीपासूनच सरकारी नोकऱ्यांत असतील तर त्यांना बढती मिळू नये अशा तरतुदी या विधेयकात होत्या. सरकारतर्फे वाटप होणारा शिधा हा एका कुटुंबासाठी काही मोजक्या लोकांनाच दिला जावा, मग त्या कुटुंबात कितीही लोक असोत ही त्या प्रस्तावित विधेयकातली आणखी एक तरतूद होती. याचबरोबर कुटुंबातली मुलांची संख्या नियंत्रणात ठेवणाऱ्या लोकांना अतिरिक्त भत्ता, अधिक बढत्या, सवलतीच्या व्याजदरात कर्जं, वीज, पाणी यांवरच्या करांत सवलत अशाही काही गोष्टी या विधेयकात मांडल्या गेल्या होत्या. कमी भावंडं असलेल्या मुलांना शिक्षणासाठी विशेष सवलतींचाही प्रस्ताव होता. स्वेच्छेने एकही मूल होऊ न देणाऱ्या जोडप्यांची निवृत्तीनंतरची सगळी जबाबदारी राज्य सरकार घेणार होतं. ज्येष्ठांच्या वसाहतींच्या धर्तीवर या "डिंक्स" ('डबल इनकम नो किड्स') जोडप्यांच्या खास वसाहती, त्यांना तहहयात आरामात राहाता येईल इतका भत्ता, त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा सगळा खर्च राज्य सरकारतर्फे करण्याची तरतूद, त्यांची प्रकृती साथ देईल तोवर वर्षातून एकदा सरकारी खर्चाने परदेशवारी... ही बरीच मोठी यादी होती. एकूण स्वातंत्र्यानंतर लगेच लक्षात आलेल्या पण नंतर जरा बाजूला पडलेल्या लोकसंख्यानियंत्रण या मुद्द्यावर राज्य सरकारनं आता लक्ष द्यायचं ठरवलेलं दिसत होतं.

"प्रत्येक गावाची, शहराची, राज्याची, देशाची आणि एकूण जगाचीही, न्यायाधीश महाराज", सरकारतर्फे बचाव करणारे वरिष्ठ वकील म्हणाले, "लोकसंख्या सहन करण्याची आपली आपली एक क्षमता असते. आपली संसाधनं, रिसोर्सेस मर्यादित आहेत. सरकारकडे असलेला पैसा, मनुष्यबळ, आपल्या पायाभूत सुविधा यादेखील मर्यादित आहेत. लोकसंख्या वाढत गेली की या व्यवस्थांवर ताण येतो. बरं, आपलं राज्य काही प्रगत राज्यांसारखं नाही. आपल्याकडे औद्योगिकीकरण फारच कमी आहे. त्यामुळे नोकरीच्या संधी..."

"आता हा पण लोकसंख्येचा दोष आहे असं म्हणू नका, वकीलसाहेब," न्यायाधीश महाराज थोडेसे कठोरपणे म्हणाले. "राज्य प्रगत नाही, औद्योगिकीकरण फारच कमी आहे हा काही लोकांचा दोष नाही. सरकारांनी, मग ते राज्य असो की केंद्र असो, आपल्या अपयशाचं खापर इतर कुणावर फोडू नये. राज्याच्या जनतेवर तर नाहीच नाही."

"नाही, नाही, न्यायाधीश महाराज, मला तसं म्हणायचं नव्हतं," सरकारी वकील गडबडीने म्हणाले. "माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आज आपल्या राज्याची लोकसंख्या आठ कोटी आहे. आजपासून आपण प्रयत्न केले तर येत्या पंधरा वर्षांत आपली लोकसंख्या सुमारे बारा कोटींवर स्थिरावेल. मग ती हळूहळू कमी व्हायला लागेल. दरम्यान आपल्या विकासाच्या योजना..."

सरकारी वकिलांनी भलीमोठी आकडेवारी सादर केली. जागतिक आणि देशाचा जन्मदर, राज्याचा जन्मदर, नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार राज्यातील तरुणांची आणि प्रौढांची टक्केवारी, राज्यातला बेकारीचा दर, राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक... राज्य सरकारची तयारी तर जबरदस्त होती. या विधेयकाचं उद्दिष्ट एखाद्या विशिष्ट समाजाला लक्ष्य करणं हे अजिबात नाही, हे सरकारी वकील पुन्हापुन्हा सांगत होते. 'जो आदमी बगैर पूछे जवाब देता है, वो अक्सर झूठ बोलता है,' जुन्या हिंदी सिनेमांची आवड असणाऱ्या फिर्यादी पक्षाच्या वकिलांच्या मनात येऊन गेलं.

"न्यायाधीश महाराज, हे सगळं जरी मान्य केलं तरी हा 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी'सारखा प्रकार आहे", फिर्यादी पक्षाचे वकील म्हणाले. "लोकसंख्यानियंत्रणासाठी सक्ती न करता जनजागृती, शिक्षण आणि संततिनियमनाच्या साधनांची उपलब्धता या गोष्टींवर भर दिला पाहिजे. आज आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश आहे. पण किती ठिकाणी हा भाग मोकळेपणाने आणि तपशीलवार शिकवला जातो? 'सोसायटी फॉर जेंडर अवेअरनेस अँड एज्युकेशन' या संस्थेने आपल्या राज्यात केलेल्या एका अभ्यासानुसार अठ्ठ्याण्णव टक्के शाळांमध्ये हा नववी, आणि दहावीच्या जीवशास्त्र या विषयात असलेला धडा शिकवलाच जात नाही. हा चोरटेपणा का? आपल्या देशात वर्षातले सुमारे दोनशे दिवस लख्ख सूर्यप्रकाश असतो. उष्णकटिबंधीय देशांत मुलगे-मुली लवकर वयात येतात. त्यांना लैंगिकतेची निरोगी ओळख करून देण्यासाठी आपण काय करतो? काही नाही! आजही आपल्या राज्यात बालविवाह सर्रास होतात. गेल्या वर्षीच्या महामारीनंतर शाळा सुरू झाल्या तेव्हा दहावीच्या वर्गातल्या चाळीस टक्के विद्यार्थिनी गळ्यांत मंगळसूत्र घालून शाळेत आल्या होत्या. चाळीस टक्के! जगाच्या तुलनेत आपल्या देशाचा, आणि त्यातही देशाच्या तुलनेत आपल्या राज्याचा, आरोग्यावर होणारा खर्च अगदीच तुटपुंजा आहे. गेल्या वर्षी सात कोटी रुपये आपल्या राज्यातील लोकांना संततिनियमनाची साधने फुकट वाटण्यासाठी खर्च झाले, पण त्या प्रकरणातील भ्रष्टाचार नुकताच समोर आला आहे. आपल्या राज्यात धर्माचा चुकीचा अर्थ लावणारे धर्मप्रचारक खुलेपणाने 'संततिनियमन हे आपल्या धर्माविरुद्ध आहे' असा प्रचार करत असतात. त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही. काही इतर धर्मप्रचारक 'उनके पांच तो हमारे पचास' अशीही भाषणं करत असतात. त्यांच्यावरही काही कारवाई होत नाही. आपली असली अपयशं लपवायला राज्य सरकार असे तुघलकी कायदे आणण्याचा प्रयत्न करत आहे."

"आणखी काही गोष्टी न्यायाधीश महाराज. किती मुलं असावीत यावर बंधनं आली की काय होतं याचे इतिहासात दाखले आहेत. बेकायदा आणि धोकादायक गर्भपातांचं प्रमाण वाढतं. मुलं दत्तक देण्याचं प्रमाण वाढतं आणि सगळ्यात भयानक म्हणजे सत्तेला चटावलेले काही राजकारणी जास्त मुलं असल्यानं आपल्याला निवडणुकीला उभं राहाता येणार नाही या भीतीनं आपल्या बायकांना घटस्फोट देऊन मोकळे होतात. किती हा क्रूरपणा!"

"शेवटची आणि कदाचित सर्वात भीषण गोष्ट, न्यायाधीश महाराज. भारतासारख्या देशात एखाद्या जोडप्याला मूल होणं यापेक्षा 'मुलगा होणं' हे जास्त महत्त्वाचं आहे. वंशाचा दिवा! आणि त्यासाठी कुठल्याही थराला जायची त्या जोडप्याची तयारी असते. हे आपल्या समाजाचं आणि सरकारचं मोठं अपयश आहे. त्यामुळं स्त्री-पुरुष जन्मदराचं देशातलं प्रमाण, जे २०१३ साली दर हजार पुरुषांमागे ९०९ स्त्रिया इतकं होतं ते २०१८मध्ये ८९९पर्यंत खाली आलं आहे. हे धोकादायक आहे. हरियाणा, राजस्थानसारख्या राज्यांत आजही 'दूधपीती'सारखी क्रूर, रानटी हे शब्द अपुरे पडतील अशी प्रथा चालू आहे. बेकायदा गर्भलिंगनिदानाच्या किती घटना या देशात होत असतील याची तर कल्पनाही करणं अशक्य आहे. ग्रामीण कानडीमध्ये एक म्हण आहे, न्यायाधीश महाराज : 'आरतीग वंदु मगळा, कीर्तीग वंदु मगा,' याचा अर्थ घरात आरतीचं तबक धरून उभे राहाण्यासाठी एक मुलगी पाहिजे, आणि घराची कीर्ती वाढावी म्हणून एक मुलगा पाहिजे. लिंगभेदाची विषवल्ली समाजात कुठवर आणि कशी फोफावली आहे याचा हा फक्त एक मासला आहे. राज्य सरकारच्या या प्रस्तावित विधेयकाने किती निष्पाप मुलींचे बळी दिले जातील, याचा विचार विद्वान सरकारी वकिलांनी करावा आणि अशा कायद्याने समाजात स्त्री-पुरुष यांच्या प्रमाणात किती असमतोल निर्माण होईल, याचाही विचार करावा. सगळा समाज, न्यायाधीश महाराज, सगळा समाज कोलमडून पडेल. त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे, की राज्य सरकारला लोकशिक्षण, संततिनियमनाच्या साधनांची उपलब्धता आणि एकूणच समाजात लैंगिकतेविषयी मोकळेपणा आणण्यासाठीचे प्रयत्न यावर भर देण्यासाठी माननीय न्यायालयाने सूचना द्याव्यात आणि हे विधेयक विधानसभेत मांडण्याची त्यांना परवानगी देऊ नये. मी आपला अत्यंत आभारी आहे, न्यायाधीश महाराज."

राज्य सरकारने तयार केलेल्या विधेयकाचा पुनर्विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश जबलपूर हायकोर्टाने दिले. एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली. या विधेयकाचे, जर ते विधेयक विधानसभेत मंजूर झालं तर, आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांची संख्या बघता ते मंजूर होणार यात शंकाच नव्हती; सामाजिक, आर्थिक परिणाम काय होतील यांचा समग्र अभ्यास करून आपला अहवाल या समितीने सहा महिन्यांत सादर करायचा होता. हा अहवाल सहा महिन्यांत पूर्ण झाला नाही तर सहा महिन्यांच्या मुदतवाढीची तरतूद हायकोर्टाने केली होती.

***

"मी फार तांत्रिक तपशील सांगणार नाही याची दोन कारणं आहेत," डॉक्टर दीक्षित म्हणाले. "एक म्हणजे त्याची गरज नाही, आणि दुसरं म्हणजे मी सांगितलं तरी तुम्हाला ते फारसं कळणार नाही. म्हणून जेवढं आवश्यक आहे तेवढंच मी सांगतो.

प्रत्येक निरोगी पुरुषाच्या शरीरात दररोज वीस ते तीस कोटी शुक्राणू तयार होतात. अर्थात हे बोलायला जितकं सोपं वाटतं तेवढं ते सोपं नाही. शुक्राणू तयार होण्याची प्रक्रिया अतिशय जटिल असते. कदाचित सजीवासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया पुनरुत्पादन आहे आणि सजीवांच्यामध्ये सगळ्यात विकसित मानव आहे म्हणून असेल; माहीत नाही. निसर्गाचे स्वत:चे ठोकताळे असतात, हिशेब असतात. आपण त्याबाबत फक्त तर्क करू शकतो. पण शुक्राणू तयार होणं आणि पुनरुत्पादन, प्रत्यक्ष बालकाचा जन्म यांमध्ये खूप पायऱ्या असतात. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आता ही तुम्हाला माहिती नसेल असं म्हणून मी तुमच्या ज्ञानाचा, किंवा खरं तर माहितीचा अपमान करू इच्छित नाही; पण तरीही, मानवी शरीरातल्या प्रत्येक पेशीत सेहेचाळीस गुणसूत्रं, क्रोमोसोम्स असतात. आपले सगळे गुणधर्म, आपलं रंगरूप, काही प्रमाणात आपले विचार आणि आपली बुद्धिमत्ता हे सगळं या गुणसूत्रांवर अवलंबून असतं."

"डॉक्टर दीक्षित..."

"मला माझं बोलणं पूर्ण करू द्या, नवलखाजी. आम्हां प्राध्यापकांना एका लयीत बोलण्याची सवय असते. आमचे विचार सुसूत्रपणे मांडायला आम्हाला त्याची मदत होते. तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील. पण मला तरी अशा पद्धतीने बोलण्यानं मदत होते."

"बोला, डॉक्टर, बोला"

"तर, या सेहेचाळीस गुणसूत्रांपैकी तेवीस पुरुषाच्या शुक्राणूतून येतात आणि तेवीस स्त्रीच्या बीजांडातून. आता आपल्या अडाणी समाजाला माहिती असलेली, पण न समजलेली गोष्ट म्हणजे स्त्रीच्या बीजांडातून येणारी गुणसूत्रं नेहमी 'एक्स' या प्रकारची असतात. पुरुषाच्या शुक्राणूमध्ये मात्र 'एक्स' किंवा 'वाय' प्रकारची गुणसूत्रं असतात. ती जर 'एक्स' या प्रकारची असतील तर फलनानंतर जन्माला येणारं बाळ हे मादी म्हणजे मुलगी असेल. ती जर 'वाय' प्रकारची असतील तर जन्माला येणारं बाळ हे नर म्हणजे मुलगा असेल. याचा अर्थ काय?"

"काय?"

"याचा अर्थ असा, महाशय," डॉक्टर दीक्षितांच्या आवाजातला उपहास लपत नव्हता, "की जन्माला येणारं बाळ हे मुलगा असेल की मुलगी हे नेहमी, सतत आणि कायम पुरुष ठरवत असतो. ठरवतो म्हणजे मुद्दाम ठरवून ठरवत नाही, त्याच्या शुक्राणूंमार्फत ते ठरत असतं. बाई बिचारी नेहमी 'एक्स' प्रकारची गुणसूत्रे देत असते. मी बिचारी हा शब्द इथं का वापरला कुणास ठाऊक, पण कदाचित तोच महत्त्वाचा मुद्दा असेल. असो, तर मुलगी होणं हा जर आपल्यासारख्या अडाणी लोकांच्या दृष्टीनं शाप असेल तर तो शाप मिळतो तो पुरुषाच्या पापामुळं. अर्थात शाप, पाप हे शब्द तुम्ही त्यांच्या फेस व्हॅल्यूवर घेऊ नका, पण तरीही. आपल्या देशांमध्ये हजारो, लाखो, कोट्यवधी विवाहित स्त्रिया सासरच्या, लोकांच्या शिव्याशाप खातात, लाथाबुक्क्या खातात आणि काही बिचाऱ्या आपल्या प्राणाला मुकतात ते निव्वळ अशा अडाणीपणामुळं! आपल्या निर्बुद्ध समाजाच्या मूर्खपणामुळं!" दीक्षितांचा आवाज चढला होता.

"डॉक्टर..."

"सॉरी. भावनेच्या भरात वाहावत जाऊ नये हे खरं, पण काही काही वेळा ते जमत नाही. तर तेही असो. मी तुम्हाला माणसाच्या शरीरात शुक्राणू कसे तयार होतात हे सांगत होतो. ढोबळ मानानं शुक्राणू तयार होण्याच्या दोन पायऱ्या असतात. पहिल्या पायरीत शुक्राणू तयार होतात आणि दुसऱ्या पायरीत ते मॅच्युअर, प्रगल्भ म्हणूया, होतात. मी आधी म्हणालो त्याप्रमाणं ही अतिशय गुंतागुंतीची आणि खरं सांगायचं तर अजूनही पूर्ण उलगडा न झालेली क्रिया आहे. तुम्हाला अगदी रेंज सांगायची झाली तर एखाद्या व्यक्तीवर किती मानसिक ताण आहे इथपासून त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान किती आहे, अशा असंख्य घटकांचा त्यात समावेश असतो. खूप टप्पे असलेली, गुंतागुंतीची आणि नाजूक प्रक्रिया आहे ती. ते तुमच्या हिंदी सिनेमात पाऊस, विजा, भिजलेले हीरो-हिरॉईन आणि लगेच 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं' इतकं सगळं सोपं नसतं."

"ते आलं लक्षात," नवलखा म्हणाले.

"शुक्राणू प्रगल्भ होण्यामध्ये ग्लायकोकॅलिक्स या घटकाचा फार मोठा वाटा असतो, नवलखाजी. हे ग्लायकोकॅलिक्स म्हणजे काय? तर काही प्रकारची प्रथिनं आणि साखरेचे काही रेणू यांनी मिळून तयार झालेला एक गलेलठ्ठ थर. हा नसेल तर शुक्राणू जिवंत राहू शकत नाहीत. शुक्राणू प्रगल्भ होण्याच्या प्रक्रियेत त्यांवर ग्लायकोकॅलिक्सचं एक मोठं गुबगुबीत टोपण बसतं आणि मग ते स्त्रीच्या शरीरात गेले की पोहत पोहत स्त्रीच्या बीजांडापर्यंत पोचतात आणि त्या बीजांडाला फळवतात."

"आय सी."

"नवलखाजी, एक गोष्ट लक्षात येतेय का, आपल्याला एखादी व्यक्ती कितीही मंद वाटली तरी ती व्यक्ती म्हणजे सगळ्यात वेगाने धावलेल्या शुक्राणूची निर्मिती असते!"

"हा हा. हे नव्हतं हं आपल्या डोक्यात आलं."

"आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर - की काही विशिष्ट प्रक्रिया करून हे 'एक्स' गुणसूत्र असणारे शुक्राणू वेगळे करता येतील का? म्हणजे फक्त 'वाय' गुणसूत्र असणारे शुक्राणूच शिल्लक राहातील आणि जन्माला येणारं बाळ हे नर जातीचं, म्हणजे मुलगाच असेल असं करता येईल काय? तर याचं उत्तर 'होय' असं आहे."

"काय सांगता? हे... हे शक्य आहे?"

"जातीच्या प्रज्ञावंताला काय अशक्य आहे नवलखाजी?" दीक्षित अभिमानानं म्हणाले. "'मला एक पुरेशा लांबीची तरफ आणि एक टेकू द्या, मी तुमची पृथ्वी उलथवून दाखवतो,' म्हणणारा वैज्ञानिक आठवतो तुम्हाला? आमचे गोत्र तेच. आम्ही त्याच्याच वंशाचे. आम्हांला पुरेशा सुविधा द्या, संधी द्या, आम्ही बघा जगाचा चेहरामोहरा बदलून टाकतो की नाही ते!"

किती सार्थ अभिमान! किती निर्भेळ निष्ठा! नवलखांच्या मनात आलं.

"नुसतंच तत्त्वत: होय नव्हे तर प्राण्यांमध्ये असं 'स्पर्म सॉर्टिंग' कित्येक वर्षांपासून केलं जातं," दीक्षित सांगत होते. "'एक्स' क्रोमोसोम असलेले शुक्राणू आणि 'वाय' क्रोमोसोम असलेले शुक्राणू यांच्या आकारांमध्ये, घनतेमध्ये आणि त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या विद्युतप्रभारामध्ये काही फरक असतात. ते वापरून असं करता येतं. इलेक्ट्रोफोरेसिस आहे, फ्लो सायटोमेट्री आहे... बरीच तंत्रं आहेत. असं करून, विशेषत: कृत्रिम रेतन पद्धत वापरून गायींमध्ये फक्त कालवडी जन्माला घालता येतात. तसं मानवामध्येही करणं शक्य आहे. पण ते तसं करता येणार नाही, कारण तो गुन्हा आहे. फारच मोठा गुन्हा आहे."

"आय सी."

"आता नवलखाजी, माझा एक प्रश्न. तुमच्यासारखा मोठा उद्योगपती फक्त ज्ञानाची आस म्हणून एवढं सगळं समजून घेत बसेल असं मानण्याइतका मी दुधखुळा नाही. मला आता सांगा की हे सगळं तुम्हाला कशाला पाहिजे आहे? तुमचा काय बेत आहे?"

नवलखाजी हसले. डॉक्टर दीक्षितांना ते हसणं अजिबात आवडलं नाही. "काही कल्पना होत्या मनात डॉक्टरसाहेब," नवलखाजी म्हणाले. "पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर मला सगळाच विचार नव्यानं करायला लागणार असं दिसतंय. धन्यवाद डॉक्टर. एवढा वेळ दिलात तुम्ही. एवढं सगळं नीट समजावून सांगितलंत. फार आभारी आहे मी तुमचा."

नमस्कार करून नवलखा निघून गेले. ते खोटं बोलत होते हे तर उघडच होतं. तो माणूसही दीक्षितांना अजिबात आवडला नव्हता. शास्त्रींनी गळ घातली नसती तर दीक्षितांनी त्यांना वेळही दिला नसता. डॉक्टर दीक्षितांनी खांदे उडवले. लेक्चरची वेळ झाली होती.

***

डॉक्टर शास्त्री आणि त्यांची प्रयोगशाळा या दोघांचेही रूप फसवे होते. शास्त्री हे त्यांच्या आडनावाला शोभेलसे जेमतेम सव्वापाच फूट उंच आणि कृश देहयष्टीचे होते. त्यांचे भित्रे डोळे सतत भिरभिरत असत आणि लोकांशी, विशेषत: अनोळखी लोकांशी, बोलताना त्यांना दोन्ही हातांची कोपरं चोळण्याची विचित्र सवय होती. नीटनेटके कपडे याची शास्त्रींची कल्पना विचित्र होती. कुणीतरी त्यांना शास्त्रज्ञ लोकांनी औपचारिक, फॉर्मल कपडे घालण्याची गरज नसते, त्यांच्या कपड्यांवर त्यांचं कर्तृत्व ठरत नसतं असं सांगितलं होतं आणि शास्त्रींना ते फारच पटलं होतं. त्यामुळे रंगसंगतीचा अजिबात विचार न करता ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अजिबात शोभणार नाहीत असे भडक रंगाचे आणि ढगळ कपडे वापरत असत. आताही नवलखांना भेटताना त्यांनी केशरी रंगाचा एक बिनकॉलरचा टी शर्ट आणि अतिशय घळघळीत अशी एक जीनची पँट घातली होती. शास्त्रींचं मूळचं विनोदी व्यक्तिमत्त्व अजून विनोदी दिसत होतं.

"नुसते शुक्राणू तयार झाले, आणि... काय म्हणाले दीक्षित? हां, ते प्रगल्भ झाले म्हणजे ते स्त्रीबीजाला फलित करू शकतील असं नाही. अजूनही एक आहे. पुरुषाच्या वृषणांशिवाय आणखी एक ग्रंथी पुनरुत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाची असते, आणि ती म्हणजे प्रोस्टेट. शुक्राणूंचे पोषण आणि वहन करण्यासाठी या ग्रंथीतून स्रवणारा द्राव फार महत्त्वाचा असतो. एरवी शुक्राणू कितीही धष्टपुष्ट आणि निरोगी असले तरी प्रोस्टेटमधील द्रावाची भर नसेल तर ते स्त्रीबीजापर्यंत पोचूच शकणार नाहीत," शास्त्री सांगत होते.

"आणि ही प्रोस्टेट. ती प्रत्येक पुरुषात कार्यरत असते? नेहमी?" नवलखांनी विचारलं.

"अं... हो. वयात आलेल्या प्रत्येक पुरुषात. आणि बऱ्याच पुरुषांमध्ये ती मृत्यूपर्यंत जागृत आणि कार्यक्षम राहाते. पुरुषाची शुक्राणू तयार करण्याची क्षमताही बहुदा तहहयात असते. आणि कामवासना काय... ते तर मेंदूचंच कार्य. त्यामुळं टेस्टोस्टेरॉन जोवर शरीरात झिरपत असेल तोवर पुरुष हा प्रजननक्षम असेलच. स्त्रियांना जशी रजोनिवृत्ती असते तशी पुरुषांना... काय म्हणूया? 'शुक्रोनिवृत्ती'? जे काय असेल ते. ती येईलच असं नाही. ऐंशी वर्षांच्या पुरुषाला मुलं झाल्याचं ऐकतोच की आपण."

"अस्सं," नवलखा म्हणाले.

"पण ही फक्त एक थिअरी झाली," शास्त्री उत्साहानं म्हणाले. "प्रत्यक्षात असं फार कमी वेळा होतं. एका ठरावीक वयानंतर पुरुषही प्रजोत्पादनाला अक्षम... सरळ नपुंसक म्हणू का मी? तर तसा होतो. हेही नैसर्गिकच नाही का? हल्ली तर वय होण्याआधीच पुरुषांची प्रजननक्षमता कमी होऊ लागली आहे. ताण, प्रदूषण, जीवनशैली, व्यसनं..."

"हो, ते मी ऐकून, वाचून आहे," नवलखा म्हणाले. शास्त्रींचं ज्ञान प्रचंड होतं आणि म्हणूनच ते बोलू लागले की त्यांना अधूनमधून मार्गावर आणावं लागे. "पण मला सांगा शास्त्रीजी, ही जी काय प्रोस्टेट नावाची ग्रंथी आहे, ती कधीच निकामी होत नाही का?"

"अहो, असं कसं होईल? शेवटी निसर्ग आहे, शरीर आहे. बहुतेक सर्व पुरुषांमध्ये जसजसं वय वाढत जाईल तसतसे त्याच्या शरीरात हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात आणि मग या ग्रंथीचा आकार वाढत जातो. आणि मग ती मूत्राशयातून बाहेर पडणाऱ्या मूत्राचा प्रवाह अडवायला लागते. काही औषधं देऊन काही काळ हा प्रवाह वाढवता येतो. अल्फा ब्लॉकर्स, उदाहरणार्थ. पण नंतर बहुतेक वेळा ही ग्रंथी शस्त्रक्रिया करून काढूनच टाकावी लागते."

नवलखाजी खुर्चीत थोडे पुढे सरकले. "म्हणजे शास्त्रीजी, ही प्रोस्टेट काढून टाकली की माणसाच्या शरीरात कितीही निरोगी शुक्राणू तयार झाले आणि ते कितीही प्रगल्भ झाले तरी तो माणूस पुनरुत्पादन करू शकणार नाही, बरोबर?"

"अं… हो. पण अशा प्रकारचं नपुंसकत्व यायला प्रोस्टेट काढून टाकलीच पाहिजे असं नाही बरं का," शास्त्रीजी उत्तेजित होऊन बोलत होते. एखाद्या गोष्टीतले बारकावे आपल्याला ठाऊक आहेत आणि दुसऱ्याला ठाऊक नाहीत असं कळल्यावर माणसाच्या आवाजात येते ती उत्तेजना त्यांच्या आवाजात आली होती.

"मग?"

"इथं ती दुसरी मजा आहे. मी मगाशी म्हणालो ना ते अल्फा ब्लॉकर्स, ते वाढलेली प्रोस्टेट आणि मूत्राशयाचं तोंड जरा सैल करतात. पण त्यामुळेच पुरुषाचं वीर्य मूत्राशयात जातं. रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन. म्हणजे अशा लोकांमध्ये कितीही गुणी शुक्राणू असले तरी असे लोक पुनरुत्पादन करू शकणार नाहीत. म्हणजे त्यांना समागमाचा आनंद मिळेल, उत्कर्षबिंदूही लाभेल, पण त्यांना मुलं होणार नाहीत."

"अस्सं? मग हे काय तुमचे अल्फा ब्लॉकर्स - त्याच्या गोळ्या पुरुषांसाठी संततिनियमनाच्या गोळ्या म्हणून पण वापरल्या जात असतील की."

शास्त्री हसले. "नाही नवलखाजी. ते इतकं सोपं नाही. अल्फा ब्लॉकर्सचे इतर साईड इफेक्ट्स असतात. आणि काय बोलताय तुम्ही? पुरुषांसाठी संततिनियमनाच्या गोळ्या? अहो, या देशातले कोट्यवधी पुरुष आपल्या आनंदात व्यत्यय नको म्हणून निरोधक साधनं वापरत नाहीत. स्त्रीने काय त्या गोळ्या घ्याव्यात, नाहीतर ती नको असलेली गर्भधारणा अंगावर घ्यावी, गर्भपात करून घ्यावा नाहीतर पोराबाळांचं लेंढार वाढवावं असली मानसिकता असलेले पुरुष आपण." भावनांवर नियंत्रण ठेवणं शास्त्रज्ञांना जड जात असावं का? नवलखांच्या मनात येऊन गेलं. चांगले शास्त्रज्ञ हे चांगले व्यावसायिक का होऊ शकत नाहीत याचं उत्तर कदाचित यात असेल.

"खरं आहे. शास्त्रीजी आता शेवटचा प्रश्न. ही प्रोस्टेटची वाढ तुम्ही जी म्हणालात ती फक्त वाढत्या वयानुसारच होते की त्याला इतरही कारणं असतात?"

"हा म्हणजे मुलाखतीत म्हणतात तसा 'फार चांगला प्रश्न विचारलात तुम्ही'," शास्त्री म्हणाले. "प्रोस्टेटची वाढ होण्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅन्सर. बऱ्याचशा कॅन्सर्सप्रमाणं हा कॅन्सरही का होतो याचं नक्की उत्तर माहीत नाही. वय, जीवनशैली, ताण ही नेहमीची कारणं आहेतच, पण जनुकांमधील बदल हे याचं मोठं कारण मानलं जातं. बीआरसीए१ आणि बीआरसीए२ या जनुकांमधील बदल हे स्त्रियांमध्ये स्तनाच्या कॅन्सरसाठी जबाबदार असू शकतात. पुरुषांमध्ये हे बदल पुरुषांमधील स्तनाचा कॅन्सर, हो, नवलखाजी, पुरुषांमध्येही स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो, आणि मुख्यत: प्रोस्टेट कॅन्सरसाठी कारणीभूत असतात. प्रोस्टेट कॅन्सर झाला की मात्र बहुदा प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याचा सल्ला आम्ही देतो. प्रोस्टेटच गेली म्हटल्यावर पुनरुत्पादनाचा प्रश्नच नाही. एक अशी शक्यता आहे की या बीआरसीए जनुकांमधील बदल हा काही प्रकारच्या किरणोत्सर्गांमुळं होत असावा. पण याबाबत अगदीच तुटपुंजी माहिती उपलब्ध आहे. नक्की असं काहीच नाही."

"काय फॅसिनेटिंग जग आहे हे मानवी पुनरुत्पादनाचं," नवलखा उठले. "हे जर न्यू नॉर्मल नसतं ना, तर तुमचा हात हातात घेऊन घट्ट शेकहँड केला असता मी. आणि तुमचं ज्ञान किती खोल, किती विशाल आहे! माझ्यासारख्या कॉमर्सच्या माणसालासुद्धा सगळं कळेल एवढंच नव्हे त्यात रस निर्माण होईल अशा रीतीनं समजावून सांगितलं तुम्ही. वंडरफुल!"

"प्लेझर, प्लेझर." शास्त्री जरासे ओशाळले. माणूस कितीही मोठा असो, कितीही ज्ञानी असो, स्तुती ऐकली, तीही अशी तोंडावर, की त्याचा इगो सुखावतोच. गाडीत बसताबसता नवलखांच्या मनात येऊन गेलं.

***

निवृत्ती ही एक प्रक्रिया आहे. बहुतेक लोकांना ती त्यांच्या कंटाळवाण्या होत चाललेल्या नोकरीतून होणारी अपरिहार्य पण आनंददायक सुटका वाटते. जातीच्या शास्त्रज्ञाला नोकरीतून निवृत्त होणे म्हणजे दैनंदिन नित्यक्रमात होणारा एक लहानसा बदल वाटतो. डॉक्टर कलशेट्टींना तर निवृत्ती ही कामातून नव्हे तर नोकरीतल्या कंटाळवाण्या प्रशासकीय कामांमधून झालेली सुटका वाटत होती. संस्थेच्या संचालकपदी नेमणूक झाल्यापासून त्यांना आवडीचं वाचन, लेखन आणि संशोधन करायला फारसा वेळ मिळालेला नव्हता. आता निवृत्तीनंतर सकाळचं फिरणं, दुसरा चहा, निवडक वर्तमानपत्रांचं वाचन, बागेत रमतगमत टाकलेली एक चक्कर आणि हलका नाश्ता झाला की कलशेट्टी संदेशवहन आणि बिनतारी संदेशयंत्रणा या त्यांच्या आवडत्या विषयांवरील वाचनात रमून जात. इंटरनेटवर प्रकाशित होणारे नवनवीन रिसर्च पेपर्स, सरकारचे नवीन उपक्रम, आंतरराष्ट्रीय सहयोगातून राबवल्या जाणाऱ्या योजना हे सगळं वाचण्यात त्यांचा वेळ मजेत जात असे. मध्येच संशोधन करणारे काही विद्यार्थी काही शंका विचारायला, सल्ला घ्यायला येत. काही वेळा त्यांच्या हाताखाली काम केलेले आणि अद्यापि नोकरीत असलेले लोक त्यांच्या काही अडचणी घेऊन येत. कलशेट्टींना लेखनाचं अंग होतं. विज्ञानविषयक अंकांमध्ये ते अधूनमधून काही माहितीपर लेख लिहीत. त्यांना वेळ पुरत नव्हता.

नवलखा हे नाव त्यांना परिचित नव्हतं. कित्येक वर्षं त्यांच्या हाताखाली काम केलेल्या उदयनने गळ घातली म्हणून कलशेट्टी नवलखांना भेटायला तयार झाले. दुपारी चारची वेळ. चारला एकदोन मिनिटे कमी असतानाच कलशेट्टींच्या दारावरची बेल वाजली. आपण चहा-कॉफी काही घेत नाही असं सांगून नवलखा नम्रपणे कलशेट्टींसमोरच्या खुर्चीत बसले. पन्नाशीच्या आसपासचं वय. शांत, संयमी चेहरा. उच्च अभिरुचीचे पण साधे कपडे. एकूण भारदस्त, पोक्त व्यक्तिमत्त्व. अनोळखी लोकांना भेटायला उत्सुक नसणारे कलशेट्टी जरा आरामात बसले.

"फार वेळ घेणार नाही तुमचा कलशेट्टीसाहेब," नवलखा बोलू लागले. त्यांचा आवाजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेसा मृदू होता. "मोबाईल फोन्सचा वापर आणि त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम या विषयावरच्या एका पेपरबद्दल मला आपलं मत हवं होतं." कलशेट्टींनी आपल्या हँडबॅगमधून एका रिसर्च पेपरची एक प्रत काढली. कलशेट्टींनी डोळ्यांवर वाचायचा चष्मा चढवला. 'जर्नल ऑफ कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन'. कलशेट्टींना हे जर्नल माहीत होतं. अतिशय उत्तम दर्जाचं संशोधन असलं तरच ते या जर्नलमध्ये प्रकाशित होत असे. हा याच महिन्याचा अंक होता. नऊ पानी लेख. कलशेट्टी लेख वाचण्यात गुंगून गेले.

"वेल, धिस इज इंटरेस्टिंग," डोळ्यांवरचा चष्मा काढत कलशेट्टी म्हणाले. "इंटरेस्टिंग बट नथिंग न्यू. नथिंग कन्क्लूजिव्ह. मोबाईल फोनच्या वापराचे तोटे आपल्याला आधीपासून माहीत आहेतच. या पेपरमध्ये खूप सखोल अभ्यास केलाय त्यांचा. मोबाईल फोन्स वापरल्यानं कोणकोणत्या प्रकारचे आजार, विशेषत: कॅन्सर, होतात, होऊ शकतात यावरचा हा पेपर. अभ्यास म्हणून चांगला आहे. उत्तमच आहे म्हणेन मी. पण हे सगळं अकॅडमिक, नुसतं सैद्धांतिक स्वरूपाचं आहे, नवलखासाहेब. नथिंग कन्क्लूजिव्ह."

"म्हणजे? मला समजलं नाही सर."

"असं बघा, कोणत्याही नव्या तंत्रज्ञानाचे धोके असतातच. मोबाईल फोनच्या धोक्यांवर तर अक्षरश: शेकडो रिसर्च पेपर्स सापडतील तुम्हाला. पण त्यांतून नक्की असं काही सिद्ध झालेलं नाही. कशाकशानं माणसाला कॅन्सर होऊ शकतो यावर तर इतका अभ्यास झाला आहे की ज्याचं नाव ते. पण नवलखासाहेब, तसं बघायला गेलं तर काहीच सुरक्षित नाही. तुम्ही ती कार्सिनोजेनची, म्हणजे ज्या गोष्टींनी कॅन्सर होऊ शकतो अशा गोष्टींची व्याख्या ऐकली असेल - 'एव्हरीथिंग अंडर दी सन, इनक्लूडिंग दी सन.' त्यामुळं यात नवीन असं काही नाही. खूप तपशीलवार अभ्यास आहे, एवढंच. बट ॲज आय सेड, नथिंग कन्क्लूजिव्ह."

"हो, पण ते कॅन्सरचं..."

"च् च्च..." कलशेट्टी थोडेसे कंटाळल्यासारखे म्हणाले. "मोबाईल फोन्समुळे हे सगळं होऊ शकतं असा हा दावा आहे. हा धोका आपल्याला माहीत होताच. ज्या रेडिएशन्समुळं असा धोका असतो ती कमी करण्याचे प्रयत्न मोबाईल फोन तयार करणाऱ्या सगळ्या कंपन्या करत असतातच. मोबाईल फोन वापरणं हे साधारणपणे सुरक्षित, जनरली सेफ आहे असं विज्ञान आज आपल्याला सांगतं. पुढचं कुणी काय सांगावं? स्मार्टफोनचा जन्म होऊन अवघी पंचवीस-सव्वीस वर्षं झाली आहेत. त्यांमधून निघणाऱ्या रेडिएशन्समुळे कॅन्सर किंवा इतर काही होत असेल तर कदाचित ते आतापर्यंत समोर आलेलं नसेलही. मोबाईल फोन्सचे हँडसेट तयार करणार्‍या बहुतेक कंपन्या घातक किरणं फोन वापरणाऱ्यापर्यंत थेट पोचू नयेत म्हणून काही ना काही योजना करत असतातच. त्यामुळं मला विचाराल तर..." कलशेट्टी म्हणाले. 'समारोपाची वाक्यं. म्हणजे आपल्याला 'चला, उठा' अशी सूचना,' नवलखांनी ओळखलं.

"मला विचाराल तर आज या घडीला मोबाईल फोन्स वापरण्यात मला काही धोका वाटत नाही. असलाच तर तो बाहेर उन्हात जाण्यामध्ये जेवढा धोका असेल तेवढाच आहे. आणि खरं सांगायचं तर आपल्या देशातल्या वाहतुकीची अवस्था, रस्त्यावरची वाहनं आणि अपघातांची संख्या हे बघता बाहेर जाण्यापेक्षा घरात बसून मोबाईल फोन वापरण्यात खरं तर धोका कमीच आहे." कलशेट्टी हसले. सरकारी नोकरी आणि क्लिष्ट तांत्रिक स्वरूपाची नोकरी असली म्हणून काय झालं? माणसाची मूळ विनोदबुद्धी शाबूत राहू शकतेच की, कलशेट्टींचा निरोप घेऊन बाहेर पडताना नवलखांच्या डोक्यात हे विचार होते.

***

'सीनियर सुपरिटेंडेंट ऑफ पुलीस' या पदावरच्या माणसाला भेटणं हे सामान्य माणसाला सहजी शक्य होत नाही. एसएसपी अविनाश भांगरे हे त्याला अपवाद नव्हते. शिवाय सरकारी नोकरीत 'प्रोटोकॉल' नावाचा एक अपरिहार्य भाग असतो. त्याला फाटा देणं सहजासहजी शक्य होत नाही. पण तीन वेगवेगळ्या विषयांमधले पीएच.डी. धारक, शिवाय एक ज्येष्ठ निवृत्त सरकारी अधिकारी असं म्हटल्यावर भांगरेंना त्यांची भेट अशी सहजी टाळता आली नाही.

बेताचा गोड असलेल्या चहाचा पहिला घोट दीक्षितांनी घेतला आणि का कुणास ठाऊक त्यांच्या मनात 'भला माणूस दिसतो! इतरावाणी नुसतीच नाही अक्कड!' हे येऊन गेलं. काही क्षणाची अस्वस्थ शांतता संपली ती कलशेट्टींच्या खाकरण्यानं. "तुमचा वेळ महत्त्वाचा आहे, साहेब," ते म्हणाले. "त्यामुळं आम्ही थेट मुद्द्यावर येतो. दोन महिन्यांपूर्वी लोकसंख्यानियंत्रणासाठी विधेयक आणून कायदा करण्याचा प्रयत्न सरकारने केला. त्याला हायकोर्टाने स्थगिती दिली वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहेच. गेल्या दोन महिन्यांत नवलखा नावाची एक व्यक्ती आम्हा तिघांना भेटली. शास्त्रींच्या एका विद्यार्थ्याच्या मार्फत ते आधी दीक्षितांना भेटले, नंतर शास्त्रींना आणि नंतर मला. आमच्याशी त्यांनी, वेल, गप्पा मारल्या असंच म्हणतो मी. वेगवेगळ्या विषयांवर, पण आम्ही लोक ज्या क्षेत्रात काम करत होतो, आहोत त्याच विषयांवर."

"बरं," भांगरे म्हणाले.

"आता त्यांनी आम्हाला सांगितलेलं नाव नवलखा. ते त्यांचं खरं नाव आहे का, माहीत नाही. ज्या कुतूहलानं ते आमच्याशी बोलले त्यानं आम्हाला खूप बरं वाटलं, नो डाऊट. पण नंतर, पश्चातबुद्धी म्हणूया वाटलं तर, आम्हाला थोडी शंकाही आली. तुम्हाला कल्पना असेल साहेब, ज्या विषयांत आमचं सगळं आयुष्य गेलं, ज्या विषयांत आम्ही झपाटून काम केलं, त्याविषयी कुणी आमच्याशी गप्पा मारायला आलं की आम्हाला काय वाटतं ते. आजकाल लोकांना..." कलशेट्टींचा आवाज चोंदल्यासारखा झाला.

"जिगसॉ पझल माहिती आहे ना तुम्हाला भांगरेसाहेब?" दीक्षित कोरडेपणाने नाही पण वस्तुनिष्ठपणाने म्हणाले. "कोड्याचे अनेक तुकडे एकत्र जोडले की पूर्ण चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. झालं तेच. आम्ही तिघे नंतर सहज म्हणून भेटलो. बोलता-बोलता नवलखांचा विषय निघाला, त्यांच्याबरोबर कायकाय बोलणं झालं यावर आम्ही बोललो आणि मग अचानक डोक्यावर वीज पडावी तसा आम्हाला काय चाललंय याचा साक्षात्कार झाला."

"तडिताघात" शब्दकोड्यांची आवड असणारे शास्त्री म्हणाले.

"काय म्हणालात, सर?" भांगरेंनी विचारलं.

"तेच. मी म्हणालो तेच," दीक्षित म्हणाले. "शुक्राणूंची वाढ आणि ते प्रगल्भ होणे यावर माझ्याशी झालेली चर्चा, प्रोस्टेट ग्रंथी, कॅन्सर आणि नपुंसकता यावर शास्त्री सरांशी केलेली बातचीत आणि फाईव्ह-जी तंत्रज्ञान आणि त्याचा आणि कॅन्सरचा संबंध याबाबत कलशेट्टी सरांशी केलेली बातचीत. दिसायला तीन स्वतंत्र, वेगवेगळ्या गप्पा. एखाद्याला वाटेल की बघा, विज्ञानाच्या किती विविध शाखांमध्ये रस आहे या माणसाला! तेही कॉमर्सची पार्श्वभूमी असताना! अर्थात हे सगळंही त्या नवलखा, किंवा जे काही त्याचं नाव असेल ते, त्यानं सांगितलेल्या माहितीवर अवलंबून बरं का. पण एखादं चित्र, नाही का, जवळून बघितलं की अगदी सामान्य वाटतं, पण तेच लांब जाऊन बघितलं की त्यातले बारीक तपशील, न दिसलेले पैलू दिसायला लागतात तसं. या तीन गोष्टींचा संबंध काय असं एखाद्याला वाटेल. पण सुदैवानं आमच्या तिघांमध्ये कलशेट्टी सर होते."

"तुम्हाला माहिती आहेच साहेब, तुमचं तर रोजचं कामच आहे," कलशेट्टी म्हणाले. "ते जे नवलखा किंवा जे कोणी होते, त्यांनी जाताना मला त्यांचं कार्ड दिलं. त्यावर त्यांचा फोन नंबर होता. दुसऱ्याच दिवशी मी त्यांना फोन केला पण दरम्यान त्यांनी सिमकार्ड बदललं होतं. एवढा चतुर माणूस, पण त्यानं हँडसेट तोच ठेवला होता. आयएमइआय नंबर सापडला की मग पुढच्या गोष्टी सोप्या होतात. आता तर काय, एखादी लिंक पाठवूनही पूर्ण फोन हॅक करता येतो, मग तो फोन वापरणाऱ्यानं ती लिंक उघडली नाही तरीही. पुढचे काही दिवस हा नवलखा किंवा जो कोणी आहे त्याने केलेले फोन, त्यांवरची संभाषणं, मग ती कोडेड भाषेत का असेनात, या सगळ्यांवर आम्ही नजर ठेवली. अर्थात यात आमच्यासोबत इतरही काही लोक होते, पण ते महत्त्वाचं नाही. तो सगळा तपशील या फाईलमध्ये आहे. तुम्हाला अधिक काही माहिती लागली तर आम्ही आहोतच. आमचे नंबर फाईलच्या आतल्या पानावर लिहिले आहेत."

"हो, ते मी बघतोच सविस्तर. पण हा काय प्रकार आहे हे सांगाल का, सर?" भांगरेंनी विचारलं. आयुष्यातली भरती संपून गेलेल्या पण आयुष्यात अजून रस शिल्लक असलेल्या त्या तीन वैज्ञानिकांनी एकमेकाकडं बघितलं.

"माणूस हा मोठा विचित्र प्राणी आहे, भांगरेसाहेब," कोपर चोळत शास्त्री बोलू लागले. "माणसाच्या प्रज्ञेनं त्याला विज्ञानाची दारं उघडून दिली. पण विज्ञानाचा फक्त विश्वाच्या भल्यासाठी उपयोग करावा हा विवेक काही प्रत्येक माणसाला कमावता आला नाही. लोकसंख्यानियोजनाचं विधेयक पास होणार नाही म्हटल्यावर हा नवलखा किंवा त्याचे जे कोणी बोलविते धनी असतील त्यांनी फार भन्नाट शक्कल लढवली. फारच भन्नाट. दोन योजना होत्या त्यांच्या मनात. एक म्हणजे काही लोकांना पुनरुत्पादनाला नालायक, नपुंसक, षंढ करून टाकायचं. दुसरी म्हणजे जी मुलं जन्माला येतील ती पुरुष जातीचीच असतील अशी योजना करणं. हे असं ते लोक काही विशिष्ट भागात करणार होते, काही विशिष्ट जातसमूहांबाबत करणार होते की काय, कुणास ठाऊक, पण केवढे अमानुष विचार! कसली क्रूर योजना!"

"मोबाईल फोन्समधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशन्समुळं माणसाच्या शरीरावर काही परिणाम होतात असं म्हटलं जातं. रेडिएशन्स निघतात हे तर सिद्ध झालंच आहे," कलशेट्टी म्हणाले. "काही मोबाईल फोन तयार करणाऱ्या कंपन्या ही रेडिएशन्स कमी व्हावीत म्हणून त्या फोन्सना काही विशिष्ट प्रकारचं कवच घालतात. या कवचांवरूनच नवलखाला किंवा तो ज्यांचा बगलबच्चा म्हणून काम करतो आहे त्यांना ही कल्पना सुचली असणार. इंड्यूस्ड रेडिएशन्स. कृत्रिम किरणोत्सर्ग. मारी क्यूरीची मुलगी इरेन आणि इरेनचा नवरा फ्रेडरिक या दोघांना नोबेल पारितोषिक आहे या विषयातलं. जे धातू निसर्गत: किरणोत्सर्गी नाहीत, त्यांच्यावर काही विशिष्ट किरणांचा मारा केला तर ते धातूही किरणोत्सर्ग करायला लागतात. थोडक्यात सांगायचं तर भांगरेसाहेब, हे लोक मोबाईल फोन्समध्ये काही विशिष्ट धातूंच्या अतिशय पातळ अशा पट्ट्या ठेवण्याचा विचार करत आहेत. हे धातू त्यांनी अगदी फार दांडगा अभ्यास करून निवडलेले आहेत. असे मोबाईल फोन वापरात आले की हे खास निवडलेले धातू, एखादं दैवत जागृत व्हावं तसे जागृत होतील. त्यांच्यांतून किरणोत्सर्ग सुरू होईल आणि या लोकांना आपलं उद्दिष्ट साध्य करता येईल."

"म्हणजे काय होईल?"

"इथं विज्ञानाची खरी गंमत लक्षात येते भांगरेसाहेब," दीक्षित म्हणाले. "आम्हाला अशी शंका, शंका काय, खात्रीच म्हणा, खात्री आहे की या किरणोत्सर्गानं ज्या शुक्राणूंमध्ये 'एक्स' क्रोमोसोम आहे त्यांच्यातलं ग्लायकोकॅलिक्सचं आवरण दुर्बळ होईल. परिणामी हे शुक्राणू बीजांडापर्यंत पोचूच शकणार नाहीत. मग होईल काय? फक्त 'वाय' क्रोमोसोमवाले शुक्राणू बीजांडे फलित करतील आणि जन्माला येणारी सगळी बालकं हे मुलगे असतील. कुणाला काही शंकाही येणार नाही. आणि आलीच, तर पुरुषात दोन्ही प्रकारचे शुक्राणू सापडतील. त्यांचं ग्लायकोकॅलिक्स आवरण तपासावं हे कुणाच्या डोक्यात येणार? कसली प्रतिभा! काय प्लॅनिंग! ब्रिलियन्ट!"

"दुसरा भाग तर अजून धोकादायक आहे, भांगरेसाहेब," शास्त्री म्हणाले. "या मोबाईल्समधील धातू बदलले की त्यांतून बाहेर पडणारा किरणोत्सर्गही बदलेल. आम्हाला अशी शंका आहे की या लोकांनी बीआरसीए१ आणि बीआरसीए२ या जनुकांमध्ये बदल करणाऱ्या किरणांचाही शोध लावला आहे, आणि हे किरण उत्सर्जित करणाऱ्या धातूंचाही. असे मोबाईल्स बाजारात आले आणि त्यांचा वापर सुरू झाला की ते वापरणाऱ्या लोकांमध्ये प्रोस्टेटची अमर्यादित वाढ किंवा प्रोस्टेट कॅन्सर यांची सुरुवात होईल. परिणाम? प्रोस्टेट काढून टाकण्याची शस्त्रक्रिया, किंवा अल्फा ब्लॉकर्स! दोन्हींपैकी काहीही झालं तरी काय होईल? एका मोठ्या जनसंख्येमध्ये येणारी नपुंसकता! परिणाम? वंशक्षय! तळपट!"

"हं... हे सगळं तुम्हाला सिद्ध करता येईल का?" भांगरेंनी विचारलं.

"ते तुमचं काम नाही का भांगरेसाहेब?" दीक्षितांनी किंचित मिष्किलपणानं विचारलं. "हे नेमकं काय षडयंत्र आहे, त्याच्या मागे कोण आहे, त्याची कारणं काय आहेत, ही कोणती विचारधारा आहे आणि हे कसं सिद्ध करायचं हे सगळं शोधून काढणं हे तुमच्या अखत्यारीत येतं आणि तुम्ही हे सगळं करालच. या सगळ्याची पाळंमुळं खणून काढण्यासाठी तुम्हाला जे जे काही लागेल ते सगळे सहकार्य आम्ही करूच."

"जंटलमन, इतक्या वर्षांचं करियर माझं. किती केसेस बघितल्या. सोप्या, गुंतागुंतीच्या, किती प्रकारच्या. माणसांचे किती प्रकार बघितले. बट धिस रियली टेक्स दी केक," भांगरे म्हणाले. "वेल, तुमचे आभार मानण्याचा औपचारिकपणा मी करणार नाही. तुमच्यासारखे जेवढे लोक या जगात असतील तेवढं हे जग अधिक सुरक्षित, अधिक चांगलं होईल असं मला वाटतं," भांगरे म्हणाले.

"आईनस्टाईन म्हणतो तसं..." शास्त्री खुर्चीतून उठत म्हणाले. "संपूर्णपणे अमर्याद अशा म्हणाल तर फक्त दोनच गोष्टी आहेत. ब्रह्मांडाचा विस्तार आणि मानवी मूर्खपणा. आणि ब्रह्मांडाचा विस्तार संपूर्णपणे अमर्याद आहे हे मला ठामपणानं सांगता येणार नाही. मानवी प्रतिभेला जशा मर्यादा नाहीत तशा मानवी विकृतीलाही. पण 'शठे शाठ्यं समाचरेत्!' विज्ञानाला कुणी अशा विकृत हेतूंच्या दावणीला बांधायला लागला तर त्या हेतूंचा पाडाव करायलाही शेवटी विज्ञानाची तलवार आहेच की आपल्याकडे." शास्त्री थोडेसे हसले. "असो. आम्ही येतो भांगरेसाहेब. काही मदत लागली तर केव्हाही फोन करा. थॅंक्स फॉर युवर टाईम."

"अँड टी," दीक्षित म्हणाले.

बंद होणाऱ्या दाराकडं भांगरे थोडा वेळ बघत राहिले. पांढऱ्या केसांची, थकलेल्या शरीराची ही माणसं. पण हे विज्ञानाचे खरे पुजारी. तरुणांच्या हातात देशाचं भविष्य आहे असे आपले नेते म्हणतात, पण आपल्या देशाची खरी संपत्ती ही आहे. असले लोक अजून आपल्या समाजात आहेत म्हणून आपला समाज टिकून आहे. आपलं खरं वैभव हे आहे.

त्यांनी फोन उचलला.

***

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान कथा. आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोष्ट आवडली.
एक दुरुस्ती सुचवावेसे वाटते

>> 'आरतीग वंदु मगळा, कीर्तीग वंदु मगा,' <<
ऐवजी
'आरतीगे वंदु मगळु, कीर्तीगे वंदु मगा,' असे हवे होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Superb! Kudos!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

कदाचित कथेतील काळ फार लांब नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/