क्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती?

#संकल्पनाविषयक #मन्वंतर #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२१

क्विअर डेटिंग ॲप्स - एक 'Indian' क्रांती?

- मूळ लेखक - अनिकेत गुळवणी

- भाषांतर - सई केसकर

अनिकेत प्राईड परेडमध्ये
लेखक - अनिकेत गुळवणी

लग्नसंस्था भारतीयांच्या जिव्हाळ्याची. त्यातही ठरवून केलेली लग्नं, ज्यांच्या भोवती जातीची आणि धर्माची करकचून कुंपणं घातलेली असतात, भारतीयांना जास्त आपलीशी वाटतात. इतकंच काय, ‘आपल्यातला नवरा/बायको बघ’ असा सल्ला कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन नवीन प्रकारचं स्वातंत्र्य अनुभवू पाहणाऱ्या मुलामुलींना घरूनच दिला जातो. त्यामुळे सुज्ञपणे प्रेमविवाह करणारे लोकही या कुंपणांमध्ये राहूनच प्रेमात पडतात. या कुंपणांमध्ये एक अतिशय गृहीत धरलेलं, इतकं की ते सहज दिसतही नाही, असं एक कुंपण आहे. ते म्हणजे भारतीय समाजाचा लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन. तिथे फक्त भिन्नलिंगी लैंगिकतेला स्थान आहे. स्त्री आणि पुरुषच एकत्र येणार हे गृहीत धरून विवाहसंस्था रचलेली आहे. भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पारंपरिक विवाहसंस्थादेखील स्त्रीपुरुषसंयोगकेंद्री (heteronormative) आहेत. पण लग्नाशिवायही लोक एकत्र येतात आणि अशा नात्यांत मात्र फक्त स्त्री-पुरुष असं एकाच प्रकारचं वर्गीकरण होत नाही. LGBTQIA समूह, म्हणजेच लेस्बियन (समरती स्त्रिया), गे (समलिंगी पुरुष), बायसेक्शुअल (स्त्री किंवा पुरुष दोहोंशी लैंगिक संबंध ठेवायची इच्छा असणारे), ट्रान्सजेंडर (जन्मतः मिळालेले लैंगिक अवयव आणि लिंगभाव यामध्ये विसंगती अनुभवणारे), क्विअर (आधी आलेल्या सर्व प्रकृती अपुऱ्या आहेत असं वाटणारे आणि स्वतःला कुठल्याच वर्गात ठामपणे बसवू न शकणारे, किंवा लिंगभाव वर्णपटासारखा एक 'स्वभावपट' आहे असं मानणारे), intersex (जन्मतःच शरीराच्या आतली/बाहेरची जननेंद्रियं किंवा लिंगविषयक गुणसूत्रं ही सामान्य स्त्री-पुरुषांच्या जननेंद्रियांपेक्षा वा गुणसूत्रांपेक्षा वेगळी असणारे) asexual (अलैंगिक) - अशा विविध प्रकारच्या प्रकृती असणारे लोक आपल्या समाजात आहेत. वर दिलेल्या व्याख्या या फक्त लैंगिक संबंधांबद्दल असल्या, तरी मानवी नात्यांमध्ये लैंगिकतेबरोबर येणाऱ्या सगळ्या जाणिवा, संवेदना इथे आणि पुढे जिथे हे संदर्भ येतील तिथे गृहीत धरल्या आहेत. स्त्री-पुरुष वर्गीकरणाच्या बाहेर असलेल्या या जगाचं अस्तित्व समाजाने सतत नाकारलं आहे.

लग्न जमवण्याचे, म्हणजेच समाजाला मान्य असलेल्या पद्धतीनं जोडीदार निवडण्याचे, अनेक पारंपरिक मार्ग आहेत. मध्यस्थ, विवाहनोंदणी संस्था, वर्तमानपत्रात जाहिरात देणं, विविध जातींतल्या उपवर मुलामुलींचे मेळावे आणि ओळखीतून येणारी स्थळं - असे मार्ग पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या मार्गांना समाजमान्यता आहे कारण हे सगळे मार्ग स्त्रीपुरुषसंयोगकेंद्री आहेत, तसंच जातीची आणि धर्माची बंधनं मान्य करणारे आहेत. गेल्या काही वर्षांत, आंतरजालाशी आणि स्मार्टफोनशी भारतीयांची मैत्री झाली आणि लग्न जमवण्यासाठी अनेक संकेतस्थळं वापरली जाऊ लागली. लग्न जमवायच्या पारंपरिक मार्गांना आंतरजालीय संकेतस्थळांनी बघता बघता मागे टाकलं. अर्थात, इथेही परंपरेनं घालून दिलेल्या चौकटीतच शक्यतो वधूवरसंशोधन होताना बघायला मिळतं. यांच्या जोडीला अनेक डेटिंग ॲप्ससुद्धा जन्माला आली, जिथे पारंपरिक अपेक्षा थोड्या शिथिल झालेल्या बघायला मिळतात.

डेटिंग ॲप्समुळे घडलेली खरी क्रांती मात्र भारतात LGBTQIA समूहाने अनुभवली. आंतरजालावरून जोडीदार शोधण्याची सोय नव्हती तेव्हा या समूहांतील व्यक्तींना आपल्यासारख्याच लैंगिक इच्छा असलेल्या लोकांना भेटण्यासाठी जोखीम पत्करावी लागायची. सार्वजनिक उद्यानं, हमरस्ते, रस्त्यांकडेचे अंधारे आडोसे, अगदी सार्वजनिक शौचालयंदेखील अशा भेटींचा अड्डा असायची. अनेक वेळा, पहिल्यांदाच भेटलेल्या व्यक्तीबरोबर घाईघाईत अशा जागांवर लैंगिक संबंध ठेवावे लागायचे. तिथवर पोहोचण्यासाठी घरी खोटं सांगून आणि आपण अशा ठिकाणी कुणा ओळखीच्या व्यक्तीला दिसणार नाही याची सतत खबरदारी घेत त्यांना वावरावं लागे. समलिंगी नसलेल्या व्यक्तीशी चुकून फ्लर्ट केल्यानं अनेकदा त्यांना शिवीगाळीला किंवा शारीरिक हिंसेलाही तोंड द्यावं लागे. यातही, स्त्रियांवर मुळातच असलेल्या सामाजिक बंधनांमुळे अशा सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर मर्यादित असे. सार्वजनिक जागा अस्वच्छ असल्याने रोगसंसर्ग होण्याची जोखीमही पत्करावी लागे, तसंच असं वातावरण प्रणयासाठी अनुकूल नसे. अशा वेळी लैंगिक संबंधांची सुरक्षितता राखण्यासाठी 'निरोध' वापरणं नेहमीच शक्य होत नसे. कारण पकडलं जाण्याची भीती आणि त्यामुळे होणारी घाई यांत सुरक्षिततेला प्राधान्य नसे. आपल्यासाठी सर्वार्थानं योग्य असा लैंगिक आणि भावनिक जोडीदार शोधण्याच्या संधी या समूहाला सहजसाध्य नसत. त्यामुळे अनेकदा पुरेशी पारख न करता ठेवलेल्या संबंधांमुळे आर्थिक फसवणूक, धमक्या देऊन पैसे उकळणं, शारीरिक हिंसा अशा अडचणींनाही तोंड द्यावं लागे. अशा प्रकारचे संबंध नुसतेच समाजमान्य नव्हते असं नाही, पण ते अनेक वर्षं बेकायदेशीर असल्यामुळे अशा प्रकारे फसवणूकीला किंवा हिंसेला तोंड दिल्यावर पोलिसांकडे तक्रारही करता यायची नाही. तसंच लैंगिक जोडीदार शोधण्याला भौगोलिक मर्यादा होत्या. इतर शहरांतील, देशांतील लोकांना भेटायच्या संधी उपलब्ध नव्हत्या. बाहेरून आपल्या शहरात आलेल्या लोकांचाही शोध सहज घेता यायचा नाही.

टिंडर, ग्राइंडर, ब्लूड अशी आंतरजालीय डेटिंग ॲप हळू हळू पाश्चात्त्य जगात वापरली जाऊ लागली आणि ओघानं त्यांचा भारतातही वापर होऊ लागला. स्वस्त डेटा-पॅक असलेल्या स्मार्टफोनमुळे अश्या ॲप्स वापरून या समूहातील व्यक्तींना सुरक्षितपणे जोडीदाराचा शोध घेता येऊ लागला. भारतीय व्यवस्थेत राहताना धोपटमार्ग सोडून केल्या जाणाऱ्या सगळ्या निषिद्ध गोष्टींबद्दल टोकाचे भयगंड आणि अपराधी भावना निर्माण केल्या जातात. अशा परिस्थितीत डेटिंग ॲप्स सुरक्षितता आणि हवाहवासा खाजगीपणा घेऊन आल्या. याबरोबरच, बाहेर वावरताना वापरायचा एक मुखवटा अबाधित ठेवायची सोयही या ॲप्समुळे वापरकर्त्यांना मिळाली. ज्यांची नकाराच्या भीतीनं पावलं अडखळायची, त्यांची भीड या डिजिटल मुखवट्यामुळे चेपली आणि अनेकांना भेटीचं आमंत्रण देण्याचं धाडस त्यांना करता येऊ लागलं. तरीही सुरुवातीची काही वर्षं अनेक क्विअर लोक आपला चेहरा दिसणार नाही असेच फोटो आपल्या प्रोफाईलवर लावत असत. कालांतरानं हेही बदललं आणि या समूहातले लोक मोकळेपणानं चेहरा दिसतील असे फोटो वापरायला लागले. अर्थात, हा बदल आंतरजालावरून इतर देशांतल्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे आणि त्यांचं अनुकरण करता आल्यामुळे झाला. हा बदल या समूहातील लोकांच्या सबलीकरणातील एक महत्त्वाची पायरी म्हणता येईल. कारण एखाद्या समूहातील अनेक जण जेव्हा अशा प्रकारचं पाऊल उचलतात, तेव्हा तो त्यांच्या वैयक्तिक आयुष्याइतकाच समाजासाठीदेखील एक महत्त्वाचा बदल असतो.

फेसबुकसारखी समाजमाध्यमं, आणि सर्वांना खुल्या अश्या 'टिंडर'सारख्या काही डेटिंग ॲप्स जरी घराबाहेर पडून जोडीदार शोधण्यापेक्षा अधिक सुरक्षित असल्या, तरी त्या वापरताना अनेक गोंधळ होताना दिसायचे. या गोंधळाचं मुख्य कारण पुन्हा सामाजिक गृहीतकांशी निगडित आहे. जोवर एखादी व्यक्ती आपणहून ती समलिंगी आहे असं सांगत नाही, तोवर ती भिन्नलिंगीच आहे असं गृहीत धरलं जातं. भारतासारख्या देशात भिन्नलिंगी, समलिंगी, तसंच ओळखीतले अनेक लोक असलेल्या फेसबुकसारख्या माध्यमावर आपली लैंगिक ओळख जाहीर करणं समलिंगी वापरकर्त्याना अडचणीचं होई. त्यामुळे अनेकदा आपल्याला जिच्यात रस वाटतो ती व्यक्ती समलिंगी आहे किंवा नाही हे ओळखणं अवघड असायचं. तसंच भिन्नलिंगी व्यक्तींना समलिंगी व्यक्तींकडून आमंत्रणं यायची. या गोंधळातून हळूहळू असा मार्ग निघाला, की भिन्नलिंगी व्यक्ती त्यांच्या ओळख देणाऱ्या माहितीत त्या 'स्ट्रेट' आहेत असं जाहीर करू लागल्या.

या पुढची पायरी म्हणजे फक्त क्विअर लोकांसाठी तयार केलेली डेटिंग ॲप्स. अशा ठिकाणी क्विअर लोक निर्धास्तपणे वावरू लागले. आपण एखाद्या भिन्नलिंगी व्यक्तीला निरोप तर पाठवत नाही ना, या सततच्या चिंतेतून मुक्त झाल्यामुळे या समूहातील लोकांचा वावर अधिक सहज झाला. आधी बिचकत, घाबरत जोडीदार शोधणाऱ्या लोकांना अचानक सगळं जगच खुलं झालं, आणि अनेक पर्यायांमधून निवड करण्याचं स्वातंत्र्यही मिळालं. ही ॲप्स वापरताना आपण भिन्नलिंगी आहोत असं भासवण्याचा किंवा आपण क्विअर आहोत हे लपवूनच ठेवण्याचा ताण वापरकर्त्यांवर यायचा नाही. बाहेरच्या जगात त्यांच्या कुटुंबांत, मित्रपरिवारांत हवी तशी ओळख ठेऊन या सुरक्षित ॲप्सवर त्यांना त्यांचा खरा चेहरा दाखवता येऊ लागला.

जरी आंतरजालीय ॲप्समुळे या समूहाचं सबलीकरण होत असलं आणि इतर अनेक सकारात्मक बदल त्यांना जाणवत असले, तरी या जागा भेदभावांपासून आणि विकृतींपासून अलिप्त अर्थातच राहू शकल्या नाहीत. तशा त्या राहतील ही अपेक्षाच अस्थानी आहे. लवकरच, इतर सोशल साईटप्रमाणेच इथेही विकृत मनोवृत्तीच्या काही लोकांनी बनावट प्रोफाइल बनवून पैसे उकळायला सुरुवात केली. एखाद्या व्यक्तीची बाहेरच्या जगासाठी गोपनीय असलेली माहिती काढून घेऊन तिला धमकी देणं, खाजगी फोटो मिळवून ते प्रसिद्ध करणं, किंवा कुटुंबातील सदस्यांना पाठवायची धमकी देणं, भेटायला बोलावून छुप्या कॅमेरातून त्यांची चित्रफीत तयार करणं अशा अनेक पद्धतीनं गुन्हे घडू लागले.

आपल्याला भेटायची इच्छा इतरांना व्हावी म्हणून प्रोफाइलवर वापरकर्ते फोटो, उंची, वजन, वांशिकता, बांधा, लिंग, लैंगिक संबंधांमध्ये आवडणारी शारीरिक स्थिती (समलिंगी लोकांमध्ये टॉप - शिरकाव करणारा (penetrative partner) आणि बॉटम (शिरकाव करून घेणारा) अशा दोन स्थिती असतात. त्यातली कुठली सवयीची वाटते ती), त्यांना संबोधताना वापरायचे त्यांच्या आवडीचे सर्वनाम, त्यांना आवडणाऱ्या लैंगिक कृती, आणि जोडीदारामध्ये त्यांना काय हवं आहे अशी सगळी माहिती लिहू लागले. याव्यतिरिक्त, त्यांच्या इतर आवडीनिवडीदेखील प्रोफाईलवर येऊ लागल्या.

इतर वापरकर्त्यांना ही माहिती वाचून निवड करणं सोपं जात असलं, तरी यातूनही एक प्रकारचा भेदभाव आपसूक होऊ लागला. सौंदर्याच्या रूढ असलेल्या कल्पनांमध्ये बसणारे उंच, गोरे, व्यायाम करून शरीर कमावलेले आणि तरुण लोक जास्त लक्षवेधी ठरू लागले आणि या तुलनेत रूढ सौंदर्यात कमी पडणारे लोक दुर्लक्षित होऊ लागले. तसंच या तुलनेत कमी पडणाऱ्या लोकांचा, त्यांना टोमणे मारून किंवा त्यांची टर उडवून, छळही होऊ लागला. अनेक जण त्यांच्या प्रोफाइलवर 'नो फॅट (लठ्ठ) - फेम (बायकी) - ओल्ड (वयस्कर)' अशी असंवेदनशील वाक्यं लिहू लागले जेणेकरून या वर्णनाच्या लोकांनी त्यांना निरोपच पाठवू नयेत. त्यामुळे अशा सौंदर्याच्या चौकटीत न बसणाऱ्या, खास करून वयानं कमी असलेल्या वापरकर्त्यांना त्यांच्या शरीरांबद्दल गंड निर्माण होऊ लागले. 'इन्स्टाग्राम'सारख्या समाजमाध्यमावरल्या चकचकीत प्रतिमांशी स्वतःची तुलना करून निराश होणाऱ्या किशोरवयीन वापरकर्त्यांवर बरंच संशोधन झालं आहे.आणि त्या प्रतिमाही चकचकीत कशा, तर मागाहून नीटनेटक्या करून, सजवून देणार्‍या अ‍ॅप्स वापरून केलेल्या बेगडी अशा! अशा ॲप्सचे परिणाम सगळ्यांवरच होताना दिसतात. पण LGBTQIA डेटिंग ॲप्सवर या परिणामांचे वेगळे पैलू बघायला मिळतात. कारण शारीरिक सौंदर्याच्या बाबतीत या समूहातील लोकांच्या अपेक्षा भिन्नलिंगी लोकांपेक्षा अधिक जाचक असतात असं सर्वसाधारण निरीक्षण आहे.

स्त्रीपुरुषसंयोगकेंद्री लग्नव्यवस्थेत जे जातींचे आणि धर्मांचे भेद आहेत, तेही हळूहळू या डेटिंग ॲप्सवर दिसायला लागले. सदस्यनामांमध्ये 'जाट-टॉप' किंवा 'ब्राम्हिन/राजपूत मर्द' अशी नावं सररास बघायला मिळतात. ज्या पुरुषसत्ताक आणि धार्मिक संस्थांनी या समूहांचा कायम विरोध केला आहे, त्यांच्याच चौकटीचं आणि नियमांचं पालन करताना इथले सदस्य दिसू लागले. उदाहरणार्थ, अनेक सदस्य आपल्याच जातीतल्या जोडीदाराला प्राधान्य देताना दिसतात. त्याचबरोबर इतर जातींबद्दल आणि धर्मांबद्दल द्वेषपूर्ण लेखन प्रोफाइलमधून दिसू लागलं.

ग्राईंडर चॅट

भारतीय पुरुषसत्ताक संस्कृतीनं रुजवलेल्या पौरुषाच्या समजुतीदेखील इथे रुजू लागलेल्या दिसतात. उदाहरणार्थ, बायसेक्शुअल पुरुष स्वतःला समलिंगी किंवा ट्रान्स पुरुषांपेक्षा वरचढ समजतात. किंवा आधी सांगितल्याप्रमाणे 'टॉप' किंवा 'बॉटम' लैंगिक स्थितीत संभोग करणाऱ्या पुरुषांमध्ये जे 'टॉप' ची सवय/आवड असणारे, म्हणजेच स्त्री-पुरुष संभोगात पुरुषाचं स्थान असणारे पुरुष, स्वतःला 'बॉटम' स्थिती असलेल्या पुरुषांपेक्षा वरचढ समजतात. अशा प्रकारचे पुरुषी समज मग उघडपणे प्रोफाइलवर 'अल्फा', 'मर्द', 'मास्टर' अशा सदस्यनामांमधून बघायला मिळतात. याहीपुढे एक पायरी म्हणजे, काही बायसेक्शुअल/विवाहित/टॉप पुरुष मुद्दाम इतरांवर आपली सत्ता गाजवण्यासाठी ह्या ॲप्स वापरतात अशी कबुलीही देतात. ते स्वतःला क्विअरही म्हणत नाहीत. भिन्नलिंगी लोकांना समलिंगी लोकांच्या लैंगिक भावना समजून घेता न आल्यामुळे त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आकस निर्माण होतो. याला होमोफोबिया म्हणतात. जसा भिन्नलिंगी लोकांना होमोफोबिया असतो तशाच प्रकारचा 'ट्रान्सफोबिया' क्विअर समुदायातील काही बायसेक्शुअल किंवा समलिंगी लोकांमध्ये बघायला मिळतो. हा द्वेष जितका त्या समुदायातील लोकांना समजून घेण्यात कमी पडल्यामुळे होतो, तितकाच तो त्यांच्या तुलनेत आपण वरचढ आहोत या भावनेतूनही येतो. जसा अनेक श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीयांबद्दल द्वेष वाटतो तसाच.

ग्राईंडर चॅट

शहरी भागांत इंग्रजी भाषेवरची पकड आणि आर्थिक कुवत हेही भेदभावास कारणीभूत ठरताना दिसतात. महागड्या हॉटेलात डेटिंगला जाणं, सफाईदार इंग्रजी न येणं अशा कारणांमुळे उच्चभ्रू वापरकर्ते इतरांना तुच्छ लेखताना दिसतात. याव्यतिरिक्त बुद्धिजीवी/विद्याविभूषित असणं/नसणं हीदेखील भेदभावाची निमित्तं असतात - जे अर्थात या ॲप्सच्या बाहेरील जगाचंच प्रतिबिंब आहे. मात्र खेड्यातून आलेल्या आणि प्रादेशिक भाषांमधून शिकलेल्या LGBTQIA वापरकर्त्यांना या अडचणींची तीव्रता जास्त भासते, कारण जोडीदार शोधण्याच्या संधी भिन्नलिंगी लोकांना जितक्या मिळतात, तितक्या त्यांना त्यांच्या खेड्यात/छोट्या गावात उपलब्ध नसतात. याबरोबरच खेड्यातील वापरकर्त्यांना इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. स्वतःचा स्वतंत्र असा स्मार्टफोन नसणं, एकच फोन अनेकांनी वापरणं आणि त्यामुळे अशी ॲप फोनवर कायमची ठेवता न येणं. लहान गाव असल्यानं ओळखी अधिक असणं आणि त्यामुळे आपली लैंगिक ओळख लपवून ठेवायचा अधिक ताण येणं - अशा प्रकारच्या अडचणींना ग्रामीण भागातील वापरकर्त्यांना तोंड द्यावे लागते. खेड्यातून शहरात येणाऱ्या क्विअर लोकांना जास्त मोकळीक आणि मानसिक शांतता अनुभवण्यास मिळते असं अनेक जण कबूल करताना दिसतात.

या समुदायातील काही शब्दही आता या ॲप्सच्या वापरामुळे रूढ झालेले आहेत. काही शॉर्टफॉर्म, उदाहरणार्थ ASL (Age/वय, Sex/लिंग, Location/मुक्काम), HH (High/नशेत and Horny/कामोत्सुक), DDF (Disease and Drug Free/रोगमुक्त आणि निर्व्यसनी) असे सगळ्या भौगोलिक भागातील वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. तसंच 'कोठी' किंवा 'पन्ति' हे स्त्रैण किंवा पुरुषी वागण्याबद्दल असलेले ग्रामीण शब्द आता शहरी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. 'टॉप', 'बॉटम', 'व्हर्सटाईल' आणि 'किंकी' असे शब्द ग्रामीण वापरकर्त्यांना समजले आहेत. असे शब्द त्या त्या भौगोलिक भागात नव्या पद्धतीनंही वापरले जातात त्यामुळे आंतरजालाच्या मध्यस्थीनं या समूहाची व्यक्त होण्याची भाषा समृद्ध होते आहे असंही म्हणता येईल.

सगळ्यांसाठी खुल्या असलेल्या टिंडरसारख्या ॲपचे काही तथाकथित भिन्नलिंगी पुरुष वापरकर्ते हे समलिंगी, क्विअर किंवा ट्रान्स पुरुषांकडे आकर्षित होतात. अशा पद्धतीच्या आकर्षणाचे रूपांतर नेहमीच उघडपणे लैंगिक संबंध ठेवण्यात होत नाही. असे पूर्णपणे भिन्नलिंगी नसलेले, पण तसं कबूल न करणारे पुरुष, क्विअर पुरुषांना स्त्रीवेषात बघण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. हे एका अर्थानं जरी पुरुषसत्ताक व्यवस्थेत असलेल्या स्त्री-पुरुष भूमिकेचं अनुकरण असलं, तरीही एका प्रकारे लैंगिकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची क्रियाही यातून होत असते. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडू शकतात ही यातली गुंतागुंतीची बाब आहे. जगभरातले क्विअर समुदाय ढोबळ मानानं एक वाटत असले, तरीही प्रत्येक संस्कृतीत त्यांची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यंही असतात. भारतात, स्वतःला गे किंवा बायसेक्शुअल समजणाऱ्या पुरुषांव्यतिरिक्त अनेक पुरुष अधूनमधून इतर पुरुषांशी संभोग करतात. भारतातील असे एमएसएम, म्हणजेच 'मेल्स हॅविंग सेक्स विथ मेल्स' (पुरुषांशी संभोग करणारे पुरुष) हे स्वतःला समलिंगी समजत नाहीत. पाश्चात्त्य देशांमध्ये पुरुषांशी संभोग करणारे पुरुष स्वतःला भिन्नलिंगी समजत नाहीत. पण भारतात भिन्नलिंगी पुरुष अनेकदा स्त्री जोडीदार न मिळाल्यानंही पुरुषांबरोबर संभोग करतात. त्यामुळे पाश्चात्त्य देशांत या प्रकारच्या लैंगिक कृतीला जितकं काटेकोरपणे क्विअर प्रकृतीत गणलं जातं तितकं भारतात होत नाही. आंतरजालाच्या वापरामुळे अशी वैशिष्ट्यं जगासमोर येतात. तसंच, भिन्नलिंगी लोकांना या जगाविषयी अधिक माहिती देण्याचं कामही करतात.

ग्राईंडर चॅट

काही निषिद्ध मानल्या जाणाऱ्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती/किळस निर्माण करणाऱ्या लैंगिक कृती ज्यांना अनुभवायला आवडतात, त्या वापरकर्त्यांना आंतरजालीय ॲप्समुळे त्यांच्यासारखे इतर लोक शोधायची मुभा मिळाली. उदाहरणार्थ, BD/SM (Bondage / शरीराला बंधनांत अडकवणं, Discipline / धाक दाखवणं, Dominance / सत्ता गाजवणं, Submission / अशा प्रकारच्या बळजोरीला स्वेच्छेनं शरण जाणं) SadoMasochism (सेडो-मसोकीझम, म्हणजेच दुसऱ्याला किंवा स्वतःला वेदना देण्यातून उत्तेजित होणं), Roleplay (काल्पनिक भूमिका वठवून प्रणयक्रीडा करणं), poly amorous / multiple partner sex (एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर वेगवेगळ्या किंवा एकाच वेळी संभोग करणं आणि अशा अनेक प्रेमाच्या नात्यांमध्ये एकाचवेळी अनेकांबरोबर असणं), interracial sex (वेगळ्या वंशाच्या जोडीदाराशी संभोग करणं) अशा प्रकारच्या अनेक गोष्टी, ज्या इतर वेळी फक्त पॉर्नमध्ये बघायला मिळतात, त्या या प्रकारच्या ॲप्समुळे वापरकर्त्यांना अनुभवायला मिळायला लागल्या. त्यामुळे अशा लैंगिक कृतींबद्दल समाजात असलेली भीती कमी होण्यास काही अंशी मदत झाली.

ज्यांना गुप्तरोग आहेत त्यांनाही या ॲप्सच्या माध्यमातून त्यांना आपलंसं करतील असे जोडीदार शोधायची सोय झाली. आणि हे करत असताना त्यांची खाजगी माहिती उघड होणार नाही याची हमी मिळाली. एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले पण औषधांच्या आधारे तो विषाणू इतरांत संक्रमित करू न शकणारे वापरकर्ते त्यांच्यासारख्या इतर वापरकर्त्यांना इथे सहज शोधू शकतात. तशी सोय असल्यानं या आजाराचा बाऊ कमी होतो आणि पॉझिटिव्ह लोकांना चारचौघांसारखं आयुष्य जगता येतं. अनेकदा एचआयव्ही निगेटिव्ह लोकही पॉझिटिव्ह लोकांशी संबंध ठेवताना दिसतात. यामुळे अशा आजारांबद्दल समाजात असलेली भीती कमी होण्यासाठी मदत होते.

कधी कधी मात्र अशा ॲप्सच्या माध्यमातून मेथँफेटमीन किंवा मेफ्रडोनसारखे झटकन व्यसन लावणाऱ्या अमली पदार्थांचं एकमेकांच्या संगतीतून व्यसन लागतं. अशा पदार्थांच्या अमलाखाली संभोग करण्याच्या प्रथाही रूढ आहेत. कधी कधी अशा घटनांमधून गरजेपेक्षा अधिक पदार्थ घेतल्यानं भान हरपणं, त्यातच फसवणूक होणं, चोरी होणं असेही प्रकार बघायला मिळतात. अशा पदार्थांच्या सततच्या सेवनामुळे नैराश्य येऊन आत्महत्यादेखील केल्या जातात.

गमतीची बाब म्हणजे ह्या ॲप्स जरी लैंगिक जोडीदार शोधण्यासाठी उदयाला आली असली, तरी यांचा वापर व्यावसायिक कामं मिळवणं, रूममेट मिळवणं, व्यवसाय वाढवणं अशा गोष्टींसाठीही केला जातो. क्विअर लोकांना इतर क्विअर लोक अर्थातच समजून घेऊ शकणारे, म्हणूनच रूममेट म्हणून सोयीचे वाटतात. तसंच, व्यवसायातही इतर क्विअर लोकांबरोबर काम करण्यामध्ये एक प्रकारची सहजता अनुभवायला मिळते. त्यामुळे ह्या ॲप्स अशाही गोष्टींसाठी वापरली जातात. याव्यतिरिक्त अर्थातच, आपल्याला समजून घेणारे मित्र भेटतील म्हणूनही ॲप्स वापरताना दिसतात.

एखादं माध्यम जेव्हा लोकांच्या हातात येतं, तेव्हा वापरकर्ते त्या माध्यमावर, आभासी का असेना, एक नवं जग रचत असतात. हे जग नेमकं कुठल्या दिशेनं जाईल यावर अनेकदा मध्यमकर्त्यांचं नियंत्रण नसतं, किंवा माध्यमांमधून घडू शकणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींची माध्यमकर्त्यांना सुरुवातीला कल्पना नसते. पण खऱ्या जगात ज्या ज्या विकृती असतात त्यांचे पडसाद कधी ना कधी आभासी जगात उमटताना दिसतात. आभासी जगातही जेव्हा लोकांचे गट तयार होतात, तेव्हा खऱ्या जगात ज्याप्रमाणे बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांची छळवणूक होते, तशी इथेही बघायला मिळते. त्याचप्रमाणे भावनिक, आर्थिक फसवणूक होणं या गोष्टी फसवणूक करण्याऱ्याला न भेटताही होऊ शकतात. अशा नकारात्मक गोष्टींची तीव्रता मात्र खऱ्या जगात असे प्रकार घडतात तेवढ्यांइतकीच किंवा कदाचित त्यापेक्षा जास्तही असल्याचं दिसतं. याचं कारण आपल्या सगळ्यांनाच, वेगवेगळ्या प्रमाणात स्मार्टफोनचं व्यसन लागलेलं आहे. फोन सतत हातात असल्यामुळे त्यावर चालणाऱ्या नकारात्मक गोष्टींपासून सुटका करून घेणं जास्त अवघड झालं आहे. एखाद्या गटात अशा प्रकारे काही व्यक्तींची छळवणूक किंवा फसवणूक होणं हे काही जगावेगळं असं नाही. कारण अनेक लोकांचा समूह जिथे तयार होतो तिथे आपोआप एक 'सोशल ऑर्डर' तयार होताना दिसते. आणि ओघानं तिथे भेदभाव आणि सत्तासंघर्षही होऊ लागतो. पण अशा वेळी माध्यमांनी हस्तक्षेप करून ते आटोक्यात आणावं किंवा नाही हा आज सगळ्याच आभासी सोशल मीडियाबद्दल विचारला जाणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याला कुठलंही माध्यम अपवाद नाही.

आंतरजालीय डेटिंग ॲप्समुळे भारतातल्या LGBTQIA समूहानं जसा बदल अनुभवला आहे तशाच प्रकारे 'टिकटॉक'सारखी माध्यमंही भारतातील खेड्यापाड्यात पोचली आहेत. आज एखाद्या खेड्यात, घरात प्रचंड बंधनं असणारी एखादी तरुण मुलगी, घरातल्या एखाद्या कोपऱ्यातूनच तिला हवे तसे कपडे घालून टिकटॉकसारख्या माध्यमांतून जगासमोर येऊ शकते, आणि टिकटॉक-तारकाही बनू शकते. भारतात अलीकडे झालेल्या मोठ्यामोठ्या आंदोलनांमध्येही आंतरजालीय ॲप्स मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या आहेत. त्यांचा प्रभाव इतका आहे, की कुठेही आंदोलन व्हायला लागलं, की सरकार आधी तिथला आंतरजाल पुरवठा बंद करतं. ज्यांना पिढीजात सुबत्तेच्या, शिक्षणाच्या आणि देशाटनाच्या संधी उपलब्ध नाहीत अशा असंख्य लोकांना स्वतःचा शोध घेण्याच्या संधी या माध्यमांनी प्राप्त करून दिल्या. ही या माध्यमांच्या वापरातले तोटे बाजूला ठेवायला लावण्याइतकी महत्त्वाची बाब आहे इतकं नक्की!

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

इंटरेष्टिंग विषय आहे. ‘कोठी’ आणि ‘पंती’ हे शब्द कसे वापरतात याबद्दल उत्सुकता आहे. विशेषण? क्रियाविशेषण?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

कोठी is bottom
पंती is top.
त्या शब्दांचा मूळ संदर्भ लेखकाला माहिती नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फक्त सायबर fraud पासून स्वतःचे रक्षण करा. dating करा पण स्वतः ला प्राणघातक संकटात टाकू नका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बागेत भेटणे, एका बाकड्यावर बसून शेंगदाण्याची पुली संपवणे किंवा अधिक डेटिंग + , ++ ,डेटिंग शार्प?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगदंब जगदंब! अवघड आहे बुवा हे पचवायला.डेटिंग ऎप्स म्हणजे फसवणूक असण्याची घनदाट शक्यता असे बातम्यांवरुन वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

... तुमच्यापर्यंत पोहोचतात त्या फक्त बातम्या असतात, माणसं नसतात; त्यामुळे त्या सनसनाटीबद्दलच असतात. लोक एकमेकांना भेटले, त्यांना मजा आली, ते आनंदात राहिले, समाधान मिळालं, वगैरे गोष्टी बातम्यांत सांगत नाहीत.

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारी लेख. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असे लोक इथे वाढताहेत म्हणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वाढायला काय कुठला विषाणु आहे कि काय? आहे हे असं पुर्वापारपासुनच आहे, आता फक्तं उघडपणे दिसायला लागलंय; जे आधिच व्हयला हवं होतं!

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-अनामिक

मूळ इंग्रजी लेख मी वाचलेला नाही, पण भाषांतरात मराठी / संस्कृत प्रतिशब्दांचा प्रचंड गोंधळ उडालाय. त्याबद्दल सविस्तर लिहावे लागेल.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

खूप माहिती देणारा (वेगळ्या विषयावरचा तर आहेच) लेख. 'हे सगळे पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे वाढत चाललेले चाळे आहेत' इथपासून decriminalization of section 377 पर्यंतच्या प्रवासाचा हा पुढचा टप्पा आहे असे मला वाटते. स्ट्रेट असणे यात प्रौढी मिरवण्यासारखे काही नाही आणि तसे नसणे यात लज्जास्पद काही नाही एवढे जरी तूर्त समाजाने पचवले तरी पुरे. मग अशा सोयी ज्याला हव्या त्याला उपलब्ध असणे हे त्यातले पुढचे पाऊल. धोका म्हणाल तर आन्तरजालावर तुम्ही एक पोस्ट टाकली किंवा एक पोस्ट लाईक केली किंवा एक ई मेल खाते उघडले, की तेथून पुढे धोका सुरु होतोच. आंतरजालावर वावर करताना प्रत्येकालाच हे ठाऊक असायला हवे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक2
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

माझा जन्म १९८३ चा. मी १५ वर्षांची असताना घरात इंटरनेट आलं. त्यानंतर मी अनेकवेळा इंटरनेटवर (चॅट रूममध्ये) ओळख झालेल्या अपरिचित लोकांना भेटले आहे. मी बाहेर शिकायला गेले तेव्हा रूममेटही मी असेच शोधले. अर्थात याची सवय व्हायला वेळ लागतो तसं याची सवय होत असताना समोरच्या माणसाचे त्याला न भेटता अंदाज बांधायची सवय लागते. माझी आंतरजाल वापरल्यामुळे आजवर एकदाही फसवणूक झाली नाही.
मी स्वतः डेटिंग ॲप्स फारसे वापरले नाहीत. पण मध्यंतरीच्या काळात ऑर्कुट होतं तेव्हा अनेक ममव मुलांशी "डेट" या कॅटेगरीत बसतील अशा भेटी घडल्या आहेत. नंतर अनेकवेळा क्रेग्ज लिस्ट वरून समान विकत घेणे वगैरे केलेलं आहे. नवीन देशात कुणी ओळखीचं नसताना जात असताना आंतरजालाचा आधारच वाटला आहे. त्यामुळे लांबच्या कुठलातरी नातेवाईक शोधून त्याच्या आणि माझ्या मनात नसताना त्याच्याकडे राहणे वगैरे awkward प्रकारही टळले आहेत.
आता फेसबुकवरही अनेक लोक भेटले आहेत. त्यांना अगदी सहज जाऊन भेटण्याचा आत्मविश्वास आला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Fb,what's ऍप वर गंभीर आरोप पण आहेत.
लोकांची गुप्त माहिती फोडणे,समजत द्वेष निर्माण करण्यात हातभार लावणे असे गंभीर आरोप पण आहेत आणि ते सत्य पण आहेत.
कोणावर कधीच विश्वास न ठेवणे हे सर्वात उत्तम
विचारवंत,लेखक,संशोधक ह्यांच्या वर खात्री केल्या शिवाय विश्वास ठेवू च नये.
कोणाचा तरी propganda ते पैसे घेवून चालवत असतात
धंदा पण असू शकतो त्यांचा.
साधे आणि सरळ.
मला रिअल लाईफ मध्ये चार मैत्रिणी आहेत रोज भेटतो.
मी कशाला एफबी आणि dating side var नको ते रिकाम टेकडी उद्योग करून
मला रिअल लाईफ मध्ये असंख्य मित्र आहेत,खूप मोठे नातेवाईक ची संख्या आहे दैव contact मध्ये आहेत.
मी कशाला abhasi विश्वात आधार शोधेन).
खडूस स्वभाव मुळे,सामाजिक भान नसल्या मुळे.
जी लोक एकटी पडलेली असतात .कोणी च त्यांचे मित्र,मैत्रीण,नातेवाईक नसतात.असे नैराश्यात असलेल्या लोकांना हे fb किंवा बाकी ऍप ची गरज असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ1

?

 • ‌मार्मिक8
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

ते फक्त फुकटचे लाच,फसवणूक,बेकायदेशीर धंदे करणारे,लायकी पेक्षा जास्त पगार घेणारे ,(अमेरिकेत असणारे सॉफ्टवेअर वाले)सरकारी नोकर फुकट पैसे कमावतात ते..
एकंदरीत लबाडी करून धन कमावणाऱ्या लोकांसाठी आहे .
बहुसंख्य जनता प्रामाणिक पने काम करून पैसे कमाविते .ते असले भिकार उद्योग करत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी2
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक3
 • पकाऊ1

विवाह संस्था ह्या वर प्रश्न चिन्ह उभे करतो.त्या व्यक्ती नी मुलांचे संगोपन शिक्षण पूर्ण होई पर्यंत म्हणजे मुलाच्या २५ वर्ष पर्यंत कोणी करायचे ह्याचे उत्तर द्यावे
सेक्स पार्टनर नी,मुलाच्या आई नी, की मुलाच्या biologically असलेल्या वडिलांनी.
२५ वर्ष दुसऱ्या कोणाच्या तरी आर्थिक ,मानसिक मदती वर च माणसाच मुल स्वतःच्या पायावर उभे राहते.
जे करोडो रुपये मुलावर खर्च होतात .ते कोणी करायचे ज्या स्त्री पुरुषाचे असंख्य सेक्स patrner आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ1

भारतातील एमएसएम, म्हणजेच मेल्स हॅविंग सेक्स विथ मेल्स (पुरुषांशी संभोग करणारे पुरुष) स्वतःला समलिंगी समजत नाहीत.

हायला, हे नवीनच कळलं! म्हणजे भारतातले एमएसएम बायसेक्शुअल नसतील, आणि फक्त पुरुषाशी संभोग करणारे असतील तरीही स्वतःला समलिंगी समजत नाहीत??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

अमेरिकन समाजातील काही निम्नस्तरांत (त्यातसुद्धा विशेषत: कृष्णवर्णीयांत) down low नावाची एक जीवनपद्धती होती/आहे असं उडतउडत ऐकलेलं आहे. हे तशासारखं काही असू शकेल. अधिक माहिती नाही. उत्सुकांनी गूगल करून पाहावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

सहमत.
अमेरिकेतील Down low आणि भारतातील "कधीमधी समलिंगी संभोग करतो, तरी बाकी मर्दांसारखा स्त्री-पुत्र-कुटुंबेच्छुक आहे" समांतर आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही तसं नसेल. भारतात स्वतःला समलिंगी म्हणवून घेतात किंवा त्यांना आपण समलिंगी आहोत हे मान्य आहे. आणि जे bisexual आहेत आणि मान्य करतात, त्यांच्या subset च्या बाहेरही एम एस एम आहेत जे अशी गरज म्हणून संभोग करतात.
हा भाग बहुतेक थोडा संपादित करावा लागेल. मी संध्याकाळी अनिकेतशी बोलून करते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चांगला आढावा घेतलेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनिकेत गुळवणी यांचे काल अकाली निधन झाले आहे असे फेसबुक वरून कळले. कारण "cardiac failure" हेही कॉमेंट्सवरून समजले.
त्यांना श्रद्धांजली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला