वाकड्या अंगणात नाचली जाई पण तिला कुणी पाहिलं नाई....

पाय फुटल्यापासून ताल धरून नाच करणाऱ्यांपैकी मी कधीच नव्हते. आपलं लठ्ठ शरीर हलतडुलत एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवणं हे माझ्यासाठी एक काम होते. आज्जी मला मैद्याचा गोळा उगाच नाही म्हणायची. मग मोठी होताना तो मैद्याचा गोळा बागेत या फ्रेंच ब्रेडसारखा ताणूनताणून लांब आणि बारीक कधी झाला हे कळलंच नाही. स्वत:च्या कोंबडीसारख्या काडी झालेल्या पायांवर एक दिवस मी घुंगरू बांधले. ते वाजतच राहावे केवळ या अट्टाहासानं मी नाचत राहिले. त्यांचा नाद मला कधी एकटी पडू द्यायचा नाही. जेव्हा ते पायांवर बांधता यायचे नाहीत तेव्हा ते पिशवीत टाकून सायकलवरून गावभर फिरायचे. शाळेत, लायब्ररीत, मैदानात सगळीकडे घुंगरू यायचे. बाजूला ठेवले की शांत बसून ते माझं बागडणं बघायचे आणि हात लावला की मगच गायचे. ते घुंगरू मी पायांवर घट्ट घट्ट बांधायचे. इतके घट्ट की पायांत रुतून खोल वळ उठायचे. “मी नाचताना त्यांना माझे पाय सोडून फिरून यायची लहर आली तर?” अशी भीती बसल्यानं त्यांना भरपूर गाठी बांधायचे. बांधायला अर्धा तास, सोडायला अर्धा तास असा चेंगटपणा केल्याने नाचाचे सर करवादायचे. पण ती सवय सुटली नाही. कुणी नाचताना घुंगरू “मी नाही ज्जा!” असं ओरडत, आपल्या पायांवरचे त्यांचे हात सोडवत स्वत:ला लांऽऽऽऽब फेकून दिलेले पाहिले आहे का? फार वाईट वाटतं तसं झालं की. खास घुंगरांसाठी बनवलेली मऊ गुलाबी पिशवीदेखील मला नजरेआड नको असे. आता मी नर्तिकाच बनणार अशी खात्री पटून आई-बाबांनी लांब बंगलोरला पाठवायची तयारी सुरू केली. पण मग आयुष्य त्याला नाऽऽऽही म्हणाले. सर्जरीच्या निमित्तानं सहा महिने नाच थांबला आणि परत सुरू केला तेव्हा काहीतरी बिनसलं होतं. मी अजूनही तितकीच वेडी होते पण नाचाचे मास्तर कुठेतरी आयुष्यावर हिरमुसले होते. पूर्वीइतके भरभरून हातवारे करत नव्हते किंवा पुढच्या परीक्षेची तयारीही करवून घेत नव्हते.

मी नाचत राहिले. शाळा संपली की लांब केस सोडून घरभर जागा मिळेल तशी नाचत सुटणं चालू ठेवलं. पण त्याला दिशा मिळेना. कुठेतरी चुकल्यासारखं वाटणं थांबेना. याच काळात पुस्तकांचा सहवास वाढला. घुंगरांइतकेच शब्दही पुस्तक उघडले की गुणगुणतात आणि पुस्तक मिटलं की ते निपचित पडून राहतात ह्याचा विस्मय वाटू लागला. ते शब्द सतत टोचून जागे करावे आणि हवे तेव्हा गायला लावावे हा उद्योग होऊन बसला. घुंगरांनी मला जसं चालायला, पळायला आणि त्यांच्या लयीवर घर-बाग explore करायला भाग पाडलं तसं पुस्तकांतल्या शब्दांनी माझ्या दोन वेण्या बखोटीस धरून दूर जाऊन जग बघायला शिकवलं, दुसऱ्यांचं आयुष्य उसनं घेऊन जगायला लावलं. आता जाईन तिथे घुंगरू आणि पुस्तकं एकत्र माझ्याबरोबर यायला लागली. शाळा, नाच आणि वाचन यांमध्ये बाकी काही आड आणून दिलं नाही, अगदी अभ्यासही नाही.

बागेतल्या झाडांना नाचून दाखवायचे तसेच पुस्तकं वाचून दाखवायला लागले. पुस्तकांनी वेड एवढं लावलं की काळ-वेळ विसरून लायब्ररीयननं, “ऊठ बाई, घरी जा” असं बजावल्याशिवाय माझं बूड हलेना. मग अशात नाचायची वेळ विसरायला व्हायला लागली. एक दिवस मास्तरांनी चिडून नाचणं आणि वाचणं यांतलं एकच काहीतरी निवड असं धमकावलं. मला निवड करण्याचा मनापासून तिटकारा होता. कुणी तसं करायला भाग पाडलं की, डोकं सणकलेल्या मांजरानं इतक्या वर्षांत कधीही हात न लावलेल्या काचेच्या भांड्याला एक दिवस उगाचच धक्का देऊन खाली पाडावं तसं मी “नाच सोडला” असं जाहीर केलं. आई-बाबा ‘नको असं करू’ अशा विनवण्या करत असूनसुद्धा हट्टानं घुंगरू कपाटाच्या एका कोपच्यात टाकले आणि पुस्तकांच्या घरात स्वतःला बंदिस्त केलं. ते पुस्तकांचं कवच घेऊन जगभर हिंडले आणि या देशात आल्यावर मात्र माझ्या शरीराला fantom-limb सारख्या, पूर्वी माझ्या सर्वांगाचा भाग असलेल्या नाचाच्या कळा येऊ लागल्या. कुठेतरी गाडलेल्या हालचालींनी डोकं वर काढायला सुरुवात केली. फ्रान्समध्ये असताना पिना बाऊश या नर्तिकेचा ऊर फुटवणारा नाच बघायची संधी मिळाली होती. मी excitementनं थरथरत तिकीट काढलं पण त्या तारखेच्या काही दिवस आधी जबरदस्त आजारी पडले. पिना शहरात येऊन गेली आणि काही आठवड्यांतच वारली. ती नाचली तेव्हाही ती आजारी होती. मला तिचा शेवटचा नाच बघता आला नाही.

पण तिनं जाताना नाचाचा virus पुन्हा जिवंत केला असावा. तो dormant असूनही जिवंत राहीला आणि आजतागायत शरीराला टोचत राहीला.

इथे conceptual modern dance करायला लागल्यावर नाचाचं ठणकणं कमी झालं. या नाचात स्वत:च्या शरीराच्या परिसीमा चाचपडणं, आपलं शरीर कसं कसं वळवता येईल, त्याच्या कुठल्या भागांमधून ऊर्जेचे पाट वाहवता येतील, त्या पाटांचं वाहणं आपल्या आजूबाजूच्या हवेवर, लोकांवर, वस्तूंवर कसं परिणाम करतं याचा अभ्यास म्हणजे conceptual modern dance. या नाचात एकच एक स्टेप करत राहून ती पक्की करणं हे ध्येय नाही. किंवा शरीराला नाचाचं पाठांतर करायला लावलं जात नाही. तुमच्या शरीराची स्मरणशक्ती तुम्हाला वाटते त्यापेक्षा कितीतरी तीक्ष्ण आहे; शरीराला जुन्या हालचाली फक्त स्मरण्यासाठीच नाही तर नवीन कोंब स्फुरावेत म्हणून नाचा, असा ह्याचा आशय. पुस्तक वाचून त्यातील धडे लक्षात ठेवून ते घडाघडा बोलणं आणि स्वत:ची कविता किंवा कादंबरी लिहिताना नवीन शब्द, आवाज, आकार यांना धिटाईनं जन्म देणं ह्यांतला फरक हा नाच करताना कळतो. लहान मुलं काही शब्दांचा मुद्दामच अपभ्रंश करून बोलतात आणि आपल्याच creativityवर खूश होऊन जोरजोरात हसून दाद देतात असंच हे काहीसं. भाषा अक्षरं, आपले उच्चार आणि त्यातून निर्माण केलेले अर्थ नियंत्रित करते पण ते नियंत्रण बाजूला ठेवून केवळ शब्दांच्या उच्चारांचे अबाधित तुषार अनुभवण्यासाठी किंवा त्यांच्या कागदावरील आकारांची नक्षी अनुभवण्यासाठी लिखाण, वाचन आणि वक्तव्य केलं तर?

पुन्हा नाचायला लागल्यापासून शरीराच्या भाषेबरोबरच मी शिकलेल्या इतर भाषांकडेही फिरून नव्यानं पाहू लागले. पण प्रत्येक शरीराची भाषा असते आणि ती बोली भाषांप्रमाणेच शिकून घेतली जाते हे लक्षात यायला लागलं. लहान असताना कथक शिकायला लागल्यावर स्वतःचं शरीर आपसूकच गोलाई साधण्यात धन्यता मानायला लागलं हे आता लक्षात येतं. समाजानं अपेक्षिलेलं स्त्रीत्व हे उपजत नसून ते कथकसारख्या कवायतीमधून शिकून घोटवलं गेलं होतं. कथक नसेल तर त्याची जागा घ्यायला अनेक इतर उपक्रम आहेत. साडी, चुडीदार असे घोळदार पेहराव करून त्यांचा पदर किंवा ओढणी वर्षानुवर्षे सांभाळल्यावर स्त्रीत्व कुठे जाईल झक मारायला? ते आपोआप आपल्या शरीरात घर करतं! शिवाय हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम आणि त्यात अपेक्षित असलेला ब्राह्मणी नाजुकपणा अंगावर वावरायची सवय होते. पण अंगाचे हे हेल, हे उच्चार आणि अंगाच्या अशा विचार करण्याच्या सवयी मोडायला प्रयत्न करावे लागतात किंवा अशा कामांची सवय लावून घ्यावी लागते, जिथे अशा नाजुकपणाला जमिनीवर लोळण घ्यावी लागते. मला कथक, भरतनाट्यम् किंवा बॅले कितीही आवडले तरी त्यांनी घालून दिलेल्या मापदंडांचा जाच वाटतो. असं मानलं जातं की नाच स्वतःच्या शरीरानं आजूबाजूची जागा पुनर्निर्मित करतो. मग असं असेल तर खुद्द आपल्या शरीराची भाषा आणि तिच्यावर पडलेले जात, वर्ग, लिंग यांचे प्रभाव तपासून घ्यायची गरज न वाटताच नाच का करावा? आणि बाकी लोकांनी घालून दिलेल्या पायवाटेवर सतत चालून, आपण नाचाद्वारे एकाच पठडीतले जग निर्माण नाही का करणार? मग अशा एकाच प्रकारच्या जगाच्या निर्मितीची वाहवा आपण किती वर्षं करत राहणार आणि त्यातून काय साध्य होणार? अर्थातच जगात प्रयोग झाले असे नाही. असंख्य कलाकारांनी आपल्या शरीरातून वेगवेगळ्या जागांची निर्मिती केली. परंतु खंत याची वाटते की त्यांनी केलेल्या प्रयोगांची, निर्मितीची बातमी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोचायला खूप वेळ लागला. शरीर आणि स्पर्श यांच्या भाषेचा वापर खूपच मर्यादित गोष्टीपुरता केला गेला. त्यांचे कंगोरे कधी तपासले गेले नाहीत.

या सगळ्यांत स्पर्श ही घटना आपल्यावर किती मोठा परिणाम करते हे जाणवत गेले. भारतासारख्या समाजात बिन बुलाये स्पर्श सतत सहन करावे लागतात. माणसांच्या गोळीबंद पाकाच्या गर्दीत पोहताना असे स्पर्श टाळणार तरी कसे? अमेरिकेत मात्र ते स्पर्श लुप्त होतात. सगळेच सगळ्यांना हाताच्या अंतरावर ठेवतात. हातमिळवणी हीच काय ती स्पर्शाची देवाणघेवाण. एरवी आपल्या प्रियकर-प्रेयसीला, मुला-बाळांना कवटाळणारे लोक कामाच्या ठिकाणी आपल्या कलीगला, परक्या व्यक्तींना जंतूंनी भरलेल्या पिशवीसारखी वागणूक देतात. हात लावतात तो असा की पिशवीचे तोंड उघडता कामा नये. मग शरीराला सर्वच स्पर्श दूषित आणि दुष्ट वाटायला लागतात. पाळणाघरात बाळाचं दुपटं बदलताना कडक नियम लावले जातात, शाळेत लहान मुलांना मैदानात खेळ शिकवतानादेखील चूकून स्पर्श झाला तर शिक्षक दहा वेळा माफी मागतात. स्पर्श हा फक्त शारीरिक सुखासाठीच असतो ही भावना बळकट होत जाते आणि शरीर एक-दोन लोकांचे स्पर्श सोडल्यास इतर सर्वांना भ्यायला लागतं. अशा एकट्या पडलेल्या शरीराला हा नाच करताना लक्षात येतं, “अरे, आपण आपल्या कित्येक आवडत्या लोकांना वर्षांनुवर्षे स्पर्श केलेला नाही. मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहिणी, पालक यांना फक्त शब्दांच्या ताकदीवर बांधून ठेवलं.”

Group dance करताना पूर्ण परक्या व्यक्तींशी फक्त आणि फक्त स्पर्शाच्या भाषेत बोलण्याचा सराव करावा लागतो. न बोलता आणि कधी कधी व्यक्तीला न पाहताही (मी कधी कधी डोळे बांधून नाचते) त्यांना आपला कुठला स्पर्श पचतो, पटतो, कळतो, फुलवतो हे लक्षात यायला लागतं. प्रत्येक व्यक्तीची स्पर्शिक भाषा वेगळी असते हे समजतं. परकी व्यक्तीदेखील आपल्या कुठल्या स्पर्शानं किंचित नापसंती दर्शवण्यासाठी डोळ्यांना दिसणारही नाही अशा तऱ्हेने ताठरते वा शहारते किंवा कुठल्या स्पर्शानं गलबलते याचं भान यायला लागतं.

शिक्षिका कधी कधी abstract आकृतिबंध मनात ठेवून वाचायला सांगतात. आपण हृदयाच्या ठोक्याच्या आलेखाची रेष आहोत असं समजून नाचणं; आपण सर्वजण एखाद्या द्रव्यातले अणूरेणू आहोत जे उष्णतेने वा थंडीने दूर जातो आणि जवळ येतो अशी कल्पना मनात धरून नाचले जाते. रसायनशास्त्राच्या पुस्तकांमधल्या केमिकल्सच्या साखळ्या मनात ठेवून माणसांच्या विविध रचना केल्या जातात. या रचना करताना स्पर्शाची साखळी न तोडता पूर्ण ग्रूपला स्पेस explore करायला लावली जाते. आता पुढे जायचं की मागे सरकायचं, पाठीवर पडायचं की चवड्यांवर बसून पुढे जायचं हे निर्णय एकमेकांशी न बोलता, एकमेकांचा चेहराही न बघता केवळ स्पर्शाच्या भाषेतून घेतले जातात. आपल्या बरोबर नाचणाऱ्या व्यक्तीला केवळ हातानंच नाही तर गुडघ्यानं, टाचेनं, मानेनं, डोक्यानं स्पर्श करून नवीन साखळी निर्माण करावी लागते. अशा वेळी आपल्या सायकलीला, कपड्यांना, जिममधल्या यंत्रांना, बाथरूममधल्या साबणाला आपण जितक्या मोकळेपणाने स्पर्श करू किंवा त्या वस्तूंचा स्पर्श आपल्याला होऊ देऊ तितक्याच निखळपणानं एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवून नाचाची एक लय तयार करावी लागते. कधीकधी ग्रूप आहे त्या पोझिशनमध्ये, आणि आहे त्या साखळीमध्ये निपचित पडून राहायचं ठरवतो. तो निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही तर सर्व व्यक्तींचं बनलेलं एक अंग घेतं. त्या अंगाचं वेगळंच मन असतं. माझं व्यक्तिमत्व तिथे गळून पडतं आणि मी त्या मोठ्या अंगाचा एक अवयव बनते. मोठं अंग काय सांगत आहे हे स्पर्शाचे कान उघडे ठेवून ऐकावं लागतं.

मनुष्य म्हणून जगताना दोन पायांवर ताठ चालणं हे आपल्या अंगात इतकं भिनलेलं असतं, की पडण्याची कला शिकून घ्यावी लागते; याचा विचार मी आधी कधी केला नव्हता. मुद्दामून गुरुत्वाकर्षणाच्या आधीन होत जमिनीवर पडणं ही नाचातली सगळ्यांत कठीण स्टेप आहे असं मला वाटतं. पडणं म्हणजे लागणं आणि लागणं म्हणजे दुखणं हा हिशेब बाजूला टाकून स्वतःला जमिनीवर झोकून देणं आणि मणक्याशिवाय हलायला आणि पुढे जायला शिकणे म्हणजेच आपल्या भवतालाकडे नवीन दृष्टीनं बघायला शिकणं आहे.

आज पृथ्वीतलावरील बहुतांश जीवसृष्टी लोप होत चालली आहे; याला sixth mass extinction म्हणले जाते. एकेकाळी वेगवेगळ्या जिवांनी समृद्ध असलेल्या या पृथ्वीवर जेव्हा जैवविविधतेचा शुकशुकाट निर्माण होतो, तेव्हा प्रजाती म्हणून एकट्या पडलेल्या मानवाला आपल्या बरोबर अनेक शतकं राहण्याऱ्या जीवांची स्पर्श आणि शरीर भाषा जाणून घेण्याची गरज नाचाद्वारे वाटायला लागते. पारंपरिक नाचामध्ये सुंदर, लयबद्ध समजल्या जाणाऱ्या प्राण्यांची नक्कल केली जाते; जसे मोर, मैना, नाग वगैरे. परंतु आपल्या शरीराचा ताठा सोडून कोंबडीसारखे मान हलवत दाणे टिपण्यात, गांडूळासारखे वळवळण्यात, बदकासारखे पळण्यातही केवढं सौंदर्य आहे हे अशा नाचातून तयार झालेल्या देहभानामुळे लक्षात येतं.

वेगळ्या जीवांची चाल पकडणं आणि त्यांचं अस्तित्व आपल्या नाचाद्वारे समजून घेणं म्हणजे वेगळ्या पद्धतीची जीवनशैली समजून घेणं आहे. नाच हा सगळ्यात कमी साधने वापरणारी आणि कचरा न निर्माण करणारी कलाकृती आहे. तुम्हाला फक्त तुमच्या शरीराची गरज आहे. नाच करताना आपले शरीर काय निर्माण करू शकतं आणि काय समजून घेऊ शकतं याची प्रचिती येते. मी आता नाच करताना आपण बरोबर करतो आहोत की चूक याचा विचार ना करता "अरे, आपला पाय असाही वळू शकतो" या शक्यतेच्या आनंदानं नाचते. कोव्हिडच्या काळात जिम, ग्रंथालय, रेस्टॉरंट अश्या सर्व जागा बंद पडल्यावर मी राहते त्या शहरात काही बायकांनी मोकळ्या पटांगणात जाऊन संध्याकाळी नाचायचं ठरवलं. त्या नाचण्यानं कठीण काळात मला तरून धरलं. माझं लहानपणीचे केस सोडून, घुंगरू बांधून अंगणात बेबंद नाचणं आता कुठे मला कळायला लागलं आहे. आपलं चुकतं की काय ही लागलेली तेव्हाची रुखरुख आता किती अनावश्यक होती ते कळत आहे. आता असं वाटतं की त्या घरात परत जावं आणि झाडांना आणि घराला प्रेक्षक मानून त्यांच्यासाठी परत नाचावं.

-जाई आपटे

MANIFESTO ANIMAL / contemporary choreography / Carolina Cantinho -
Use this code for this clip. Can embed it in the text itself -

Animal manifesto- choreography by Kelvin Klein

https://www.youtube.com/watch?v=6gWbatcM7OA

Wynton Marasalis’s Spaces (Jazz and modern dance)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

… या जाईबाई बोले तो पूर्वीच्याच जाईबाई काय? (बोले तो, असंख्य वर्षांपूर्वी या संस्थळावर ‘जाई’ हा आयडी कार्यरत होता, परंतु संबंधित सदस्या पुढे संस्थळ सोडून गेली होती.)

तसे असल्यास, पुनश्च मनःपूर्वक स्वागत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही. मी इथे पहिल्यांदीच आली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाई

आताच संपलेला कलर्सवरील रिअलटी नाचाचा शो घरी बघितला सर्वांनी आणि त्यातील पाच ते सत्तर वयातील स्पर्धक आणि त्यांचे नाच आवडले होते. कारण दीड मिनिटांचा नाच आणि वेगवेगळे प्रकार. आपले नेहमीचे नाचप्रकार अर्धा पाऊण तास बघायचा कंटाळा येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>>लहान असताना कथक शिकायला लागल्यावर स्वतःचं शरीर आपसूकच गोलाई साधण्यात धन्यता मानायला लागलं हे आता लक्षात येतं. समाजानं अपेक्षिलेलं स्त्रीत्व हे उपजत नसून ते कथकसारख्या कवायतीमधून शिकून घोटवलं गेलं होतं. कथक नसेल तर त्याची जागा घ्यायला अनेक इतर उपक्रम आहेत. साडी, चुडीदार असे घोळदार पेहराव करून त्यांचा पदर किंवा ओढणी वर्षानुवर्षे सांभाळल्यावर स्त्रीत्व कुठे जाईल झक मारायला?<<<

हे अगदी पटलं!
खरंतर नाच करताना जगाचा विसर पडतो. समोर कोण आहे याची पर्वा न करता नाच करण्यात त्यातली खरी गंमत आहे. पण शरीर हे सादरीकरणाचे मध्यम असल्याने, आणि त्यामुळे ते कसं असावं/दिसावं/ त्यातून काय भाव उमटतात याबद्दल ठराविक अपेक्षा असल्याने भारतीय नृत्यप्रकार बांधून टाकणारे वाटतात हे खरं आहे.
नुसतीच शरीराच्या हलचालींची गोलाई नव्हे तर भरतनाट्यम, कथकमध्ये असणारी पारंपरिक काव्यंदेखील स्त्रीला सतत समर्पण आणि त्याग शिकवणारी असतात.
पण हल्ली सोशल मीडियावर अनेक प्रयोगशील नर्तिकांनी पारंपरिक नृत्य नवीन पद्धतीनं सादर करायला सुरुवात केली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सई. हो, तुम्ही अधोरेखित केल्याप्रमाणे पारंपरिक नृत्यांच्या थिमही स्त्रीला बांधून ठेवणाऱ्या असतात. नवीन प्रयोगांबद्दल मला फारशी माहिती नाही. कलाकारांचे नाव कळल्यास मी त्यांचे काम शोधेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाई

सुंदर आणि पर्सनली माझ्यासाठी फार महत्वाचा लेख आहेय हा.
का ते थोडं सवडीने इथे लिहीन.

पण ब्राव्हो!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद नील! तुमचा detailed प्रतिसाद वाचायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाई

बेकेट म्हणतो तसे माणसाने आधी नाचावे आणि नंतर 'विचार' करावा आणि हे असे करणे पुर्णतः निसर्गाला धरुनच असते. आपण आधी नाच शिकलात आणि त्यानंतर पुस्तकांत रममाण झालात त्यामुळे तेही नैसर्गिकतेला धरुनच होते असे म्हणतो. Ethnochoreology ह्या शब्दाला मराठीत शब्द नाही पण तुमचा मराठीतला लेख अन्या पिटरसन रॉइस ह्यांच्या 'द अँथ्रॉपोलॉजी ऑफ डान्स' ह्या ग्रंथात आलेल्या माहितीशी पुरक आहे त्यामुळे त्याचे विशेष कौतुक करावेसे वाटते. आपले लिखाण असेही अभिजात दर्जाचे असते त्यात बर्‍याच दिवसानंतर आणखी काही वाचायला मिळाले ह्याचे प्रचंड समाधान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अमेरिकेत मात्र ते स्पर्श लुप्त होतात. सगळेच सगळ्यांना हाताच्या अंतरावर ठेवतात. हातमिळवणी हीच काय ती स्पर्शाची देवाणघेवाण. एरवी आपल्या प्रियकर-प्रेयसीला, मुला-बाळांना कवटाळणारे लोक कामाच्या ठिकाणी आपल्या कलीगला, परक्या व्यक्तींना जंतूंनी भरलेल्या पिशवीसारखी वागणूक देतात.

अगदी असेच नाही काही. बायका हगतात एकमेकींना अनेकदा. बोले तो, रोज ऑफिसात येणाऱ्याभेटणाऱ्या कलीगला हगणार नाहीत अर्थात, परंतु, नोकरी सोडून गेलेली एखादी जुनी एक्स-कलीग बऱ्याच दिवसांनी जर ऑफिसात भेटायला आली, तर मग अनेकदा हगवणीला ऊत येतो. (मजजवळ अर्थात कोणतेही स्टॅटिस्टिक्स अथवा 'विदा' म्हणण्यासारखे असे काही नाही, परंतु, आमच्या दक्षिणी कृष्णवर्णीय बायकांत याचे प्रमाण बहुधा विशेष जास्त असावे, असे उगाचच वाटते. मात्र, हे केवळ दक्षिणी कृष्णवर्णीय स्त्रियांचे राखीव कुरण असावे, असेही वाटत नाही. असो.)

पुरुषांना मात्र असे सार्वजनिक ठिकाणी हगताना पाहिल्याचे आठवत नाही खरे. (कोणास ठाऊक, हगत असतीलही कदाचित; परंतु, निदान मी तरी पाहिलेले नसल्याकारणाने, आपला पास.)

पाळणाघरात बाळाचं दुपटं बदलताना कडक नियम लावले जातात, शाळेत लहान मुलांना मैदानात खेळ शिकवतानादेखील चूकून स्पर्श झाला तर शिक्षक दहा वेळा माफी मागतात.

त्याला कारण आहे. इथे अमेरिकेत कोण कोठल्या प्रकारचा/ची पर्व्हर्ट असेल, याचा काही भरवसा देता येतो काय? (म्हणजे, हिंदुस्थानात नसतात, असे मला मुळीच म्हणायचे नाही. परंतु, हिंदुस्थानात या बाबतींत अवेअरनेस पहिल्यापासून तसा कमीच आहे.) अहो, साधे क्रिसमसटाइमला मॉलमधल्या सँटाच्या मांडीवर लहान मुलाला द्यायची सोय नसते - बोले तो, सोय असते, परंतु, भरवसा देता येत नाही.

म्हणून मग कडक नियम येऊ लागतात. तशीच काही भानगड झाल्यास आस्थापने संबंधित व्यक्तीस काढून टाकू शकतात खरी, परंतु तरीही, नंतर कायद्याच्या नि कोर्टकचेरीच्या कचाट्यात सापडण्यापेक्षा, अगोदरच ग्राउंड रूल्स क्लियर करण्याकडे भर देतात.

स्पर्श हा फक्त शारीरिक सुखासाठीच असतो ही भावना बळकट होत जाते

स्पर्श हा फक्त शारीरिक सुखासाठीच नसतो. परंतु, (१) स्पर्श केवळ शारीरिक सुखासाठीच करू पाहणारे लोक असतात, आणि, (२) कोणत्याही स्पर्शाचा, तो केवळ शारीरिक सुखासाठीच आहे, असा (बरोबर किंवा चुकीचा) अर्थ लावला जाऊ शकतो. इथे सगळी गोची होते.

(आणि, आय डेअरसे हे फक्त अमेरिकेतच होते, अशातला भाग नाही. मुंबईत किंवा दिल्लीत गर्दीने ओथंबलेल्या बसमधून किंवा आगगाडीतून प्रवास करावा लागणाऱ्या स्त्रियांना - आणि प्रसंगी पुरुषांनासुद्धा - हे नवीन नसावे.)

----------

बाकी, एकंदर लेख आणि त्याच्या विषयाबद्दल: इदं न मम| त्यामुळे, आपली हाताची घडी, तोंडावर बोट.

असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

एकंदर लेख आणि त्याच्या विषयाबद्दल: इदं न मम| त्यामुळे, आपली हाताची घडी, तोंडावर बोट.

हे प्रत्यक्ष अंमलात आणलं असतं तर बरं झालं असतं!

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

उद्धृत वाक्याच्या अगोदर 'बाकी' असा (साधारणत: 'हॅविंग सेड दॅट' अशा अर्थाने वापरलेला) एक शब्द होता. (थोडक्यात, शतमूषकभक्षणोत्तर...)

त्याव्यतिरिक्त, 'आपली' आणि 'हाताची' या दोन शब्दांदरम्यान 'या विषयावर' अशी ठळक ठशातली अधोरेखित पुस्ती जोडली असती, तर म्हणण्याचा अर्थ कदाचित अधिक स्पष्ट होण्यास मदत झाली असती, असे वाटते. माझी त्रुटी! असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1