एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र – जागृती आणि प्रगती – भाग ३

अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती

सुधीर भिडे

इतिहासाची भुते वर्तमानाच्या पाठुंगळी बसतात.

१८१८ ते १९२० या दरम्यान असे काय घडले की ज्याचे समाजावर दूरगामी परिणाम झाले, हा आपला विषय आहे. त्या विषयाची सुरुवात करण्यापूर्वी त्या काळाच्या सुरुवातीला स्थिती काय होती याची माहिती करून घेणे आवश्यक आहे. १८१८ साली जी स्थिती उद्भवली ती त्याच्या आधीच्या शतकातील – १७२० ते १८१८ – घटनांचा परिणाम होती. अठराव्या शतकातील राजकीय घडामोडींविषयी दुसऱ्या भागात विचार केला. या भागात अठराव्या शतकातील सामाजिक स्थिती कशी होती ते पाहू. पुढच्या भागांत शासकीय यंत्रणा आणि धर्माची स्थिती याचा विचार करू.

जाती

या शतकात समाजात जातीव्यवस्था प्रबळ होती. ब्राह्मणांचे प्रमाण लोकसंख्येच्या ५% तर कुणबी आणि मराठा समाज ३०% होता. जातीव्यवस्था मनूच्या वर्णव्यवस्थेतून बनली असे मानले जाते.

ब्राह्मण

शिवाजी महाराजांच्या काळापासूनच शासनात ब्राह्मणांना स्थान होते. पेशवाईतही शासनात ब्राह्मण बऱ्याच प्रमाणात राहिले. पहिल्या बाजीरावाने समाजातील सर्व वर्गांना पुढे करून महाराष्ट्राबाहेर मराठी सरदार उभे केले. त्यांचे प्रमुख सरदार होते शिंदे, होळकर आणि पवार. यानंतर पहिले माधवराव सोडता पुढील पेशव्यांत ते कर्तृत्व दिसले नाही. नानासाहेब पेशव्यांच्या काळात विंचुरकर, पटवर्धन, पेठे, गोखले यांसारखे ब्राह्मण सरदार पुढे आले. उत्तर पेशवाईत पानिपतच्या लढाईनंतर पुढील तीस वर्षे नाना फडणवीसांच्या हातात शासन राहिले. तसेच शिंदे, होळकर आणि पवार हे जास्त स्वतंत्रपणे वागू लागले. तसेही त्या तिघांची राज्ये महाराष्ट्राबाहेर होती. या सर्वांचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रांत ब्राह्मणांचे प्राबल्य राहिले. पहिल्या माधवरावांनी शहरात कोतवालीची व्यवस्था चालू केली. सन १७६५ नंतरच्या पन्नास वर्षांतील पुण्यातील कोतवालांची नावे पाहिली तर एक-दोन कोतवाल सोडून सर्वच ब्राह्मण होते. (पेशवेकालीन पुणे शहरातील कोतवाली, डॉक्टर शास्त्री, अपरांत प्रकाशन, पृष्ठ ११२). पुण्यातील पुष्कळसे सावकार ब्राह्मण होते - भिडे, थत्ते, दातार, चिपळूणकर (पेशव्यांचे विलासी जीवन, डॉक्टर शिरगावकर, काँटिनेंटल प्रकाशन, पृष्ठ १०). अशा प्रकारे १८१८च्या आधीच्या शतकात सैन्य, शासन, सावकारी, धर्म, सर्वच क्षेत्रांत ब्राह्मणांचे प्राबल्य राहिले.

मराठा

मराठा ही संज्ञा कशी आली? (द मराठाज, स्टुअर्ट गॉर्डन, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस, अनुवाद र. कृ. कुलकर्णी)

महारठ्ठा किंवा मरहट देश असे या भूभागाला पहिल्या शतकापासून संबोधिले जाते. बहामनी साम्राज्यानंतर पाच शाह्या अस्तित्वात आल्या. या राज्यांच्या लष्करांत मराठी भाषिक सैनिकांच्या तुकड्यांना मराठा ही संज्ञा वापरण्यात आली असावी. हे सैनिक समाजातील कुणबी, लोहार, सुतार अशा जातींतून आले. प्रथम काही कुलांना लष्करातील नोकरीमुळे वेगळी ओळख मिळाली. स्थानिक पातळीवर त्यांच्या प्रतिष्ठेत भर पडली. हळूहळू त्यांचे आपापसांत विवाह होऊ लागले. मग त्यांच्यातील कुलाचार इतर जातीपेक्षा निराळे होऊ लागले. चौदाव्या शतकात मराठा संज्ञेचा वापर आढळतो.

मराठा जातीत दोन सामाजिक श्रेणी आढळतात. ९६ कुळी आणि कुणबी. मराठा जातीतील ९६ कुळे उच्च समजली जातात. शिवाजी महाराजांच्या काळापासून वतनदारांचा उल्लेख आढळतो. वतनदारांपैकी काही पाटील होते तर काही देशमुख, जहागीरदार होते. राजकीयदृष्ट्या मराठ्यांना वजन आल्यावर ही कुळे बनली.

बारा बलुतेदार

गावातून बलुते व्यवस्था होती. बलुतेदार गावात निरनिराळ्या सेवा पुरवीत. त्याबद्दल बलुतेदारांना धान्य मिळत असे. इंग्रजीत ज्याला बार्टर इकॉनॉमी म्हणतात, त्या प्रकारची वस्तुविनिमय अर्थव्यवस्था होती. सोनार, जोशी, गुरव, न्हावी, कुंभार, सुतार, लोहार, तेली, आणि परीट अशी गावकुसात राहणारी बलुती असत. गावाबाहेर चांभार, ढोर, मांग, वडार आणि महार हे अस्पृश्य बलुतेदार राहात.

अस्पृश्य

भारतीय समाजात अस्पृश्यता कशी आली? अनिल कठारे यांनी त्यांच्या महारांचा इतिहास या पुस्तकात या प्रश्नाचा आढावा घेतला आहे.

आर्यांच्या टोळ्या जेव्हा भारतात पसरल्या तेव्हा येथील आदिम लोक त्या वस्त्यांच्या बाजूस राहू लागले. गावातील लोकांची कामे करू लागले. सुरुवातीस आर्य गायीचे मांस खात. साधारण दोन हजार वर्षांपासून आर्य गायीला पूज्य मानू लागले. परंतु गावाबाहेर राहणारे हे लोक आर्यांचा धर्म पाळीत नसत त्यामुळे गायीचे मांस खाणारे हे लोक अस्पृश्य झाले. मनुस्मृती साधारण याच काळात रचली गेली. मनूच्या लिखाणाप्रमाणे मनुष्यात ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ. शिकणे, यज्ञ करणे आणि करविणे, शिकविणे आणि दान घेणे ही ब्राह्मणाची कर्मे. प्रजेचे रक्षण करणे आणि यज्ञ करणे ही क्षत्रियाची कर्मे. पशुपालन करणे आणि व्यापार ही वैश्याची कर्मे. वरील तिन्ही वर्णांची सेवा करणे ही शूद्रांची कर्मे. अतिशूद्रांच्या बाबतीत मनू लिहितो – त्यांनी गावाबाहेर राहावे. फुटक्या भांड्यात जेवण करावे, प्रेतावरची वस्त्रे घालावीत. गावात येताना त्यांनी चिन्ह धारण करून यावे. कालांतराने ब्राह्मण इतर वर्णातील लोकांस शूद्र म्हणू लागले. शिवकालापर्यंत समाजात ब्राह्मण, शूद्र आणि अस्पृश्य असे तीन भाग झाले. अस्पृश्यांमद्धे महार, मांग आणि चांभार या जाती राहिल्या.

आदिवासी

महाराष्ट्रात भिल्ल, गोंड, कोलाम, कोरकू, महादेव कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी, पावरा, ठाकूर (ठाकर), वारली, अंध, कातकरी या प्रमुख आदिवासी जमाती त्या काळात होत्या आणि आजही आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे ९% आदिवासी लोकसंख्या आहे. त्या शतकातही साधारण तेवढीच लोकसंख्या होती.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वारली ही आदिवासी जमात आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील मध्यप्रदेशाला लागून असलेल्या भागात भिल्ल ही जमात आढळते. विदर्भाच्या पूर्व भागात गोंड राहतात. दक्षिण पूर्वेला, आंध्र प्रदेशाला लागून कोलाम या जमातीचे प्राबल्य आहे. हे लोक तेलुगुसारख्या भाषेत बोलतात. मेळघाटात अमरावतीच्या बाजूला कोरकूंची वस्ती आहे. या लोकांची भाषा मात्र एकदम निराळी आहे (मेळघाट : शोध स्वराज्याचा, मिलिंद बोकील, साधना प्रकाशन, २०२१).

अठराव्या शतकात या जमाती जंगलांमध्येच रहात असत. या जमाती पूर्णपणे स्वयंकेंद्रित होत्या. प्रत्येक आदिवासी जमातीची निराळी भाषा असे. त्यांची स्वतःची पंचायत असे. न्यायनिवाडा पंचायतच करी. आपण विचार करीत आहोत त्या शतकात (१७२० ते १८१८) समाजाने आदिवासींकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते.

भिल्ल ही सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. आर्यांच्या आगमनापूर्वी भिल्ल राज्य करीत होते असे समजले जाते. रामायणात आणि महाभारतात या जातीचा उल्लेख आढळतो. राम दंडकारण्यात शबरीला भेटला आणि शबरीने बोरे दिली. ही शबरी भिल्ल समजली जाते. या जमातीचे लोक महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात आढळून येतात. धनुष्य-बाण हे या लोकांचे मुख्य आयुध असते. त्यांची स्वतःची भिल्ली भाषा आहे. पण इतक्या मोठ्या प्रदेशावर पसरल्यामुळे त्या भाषेत जागेप्रमाणे बदल होत जातो. जंगलात राहणारी ही माणसे जंगलात मिळणारी फळे, कंदमुळे आणि जंगलातील प्राणी, पक्षी खातात. थोड्या प्रमाणात मक्याची शेतीही करतात. भाटीदेव (साप), बाबादेव (ग्रामदेवता), तेजाजी, लोठा माई, काजलदेव, वाघदेव अशा देवांची हे लोक पूजा करितात. भिल्ल गावात एक बडवा असतो जो जादूटोण्याने आजार बरे करतो. बहुतेक भिल्ल स्वतःला हिंदू समजतात.

संस्कृती

या काळात पंतकवींनी काव्य रचले. पंतकवींचे शिरोमणी, मोरोपंत याच काळातील. पंतकाव्य कवितेच्या भावाकडे लक्ष न देता, कवितेच्या बाह्य स्वरूपाकडे जास्त लक्ष देणारे होते. छंद आणि यमक यांनाच प्राधान्य होते. त्यामुळे तो शब्दखेळ वाटतो. काव्याचे विषय पौराणिक कथांवर बेतलेले असत.

त्या काळात शास्त्रीय संगीत अस्तित्वात होते. आधीच्या शतकातील विजापूरचा इब्राहीम आदिलशाह याने दखनी भाषेत किताब-ए-नवरस या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे (डॉक्टर लबडे, म. टा., २९ नोव्हेंबर २०२०). देवी सरस्वतीचे वंदन करून कवी पुस्तकाची सुरुवात करितो. संगीतावरील प्राचीन ग्रंथांपैकी हा एक ग्रंथ आहे. या पुस्तकाचे मराठी भाषांतर आता उपलब्ध आहे. ध्रुपद गायकीवर आधारित पन्नासच्या वर गीते निरनिराळ्या रागांवर रचलेली आहेत. सतराव्या शतकात लिहिलेल्या या ग्रंथावरून एक गोष्ट लक्षात येते की शास्त्रीय संगीताचा प्रचार त्या काळात चांगलाच झालेला होता. दुसरे म्हणजे एका मुस्लीम राजाने सरस्वतीवर श्लोक लिहिला होता.

तमाशा आणि लावणी

पेशव्यांचे विलासी जीवन, डॉक्टर वर्षा शिरगावकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन या पुस्तकातून खालील माहिती घेतली आहे.


घाशीराम कोतवाल नाटकातील दृश्य
घाशीराम कोतवाल नाटकातील दृश्य

मुघलांच्या छावणीच्या जवळ येथील स्त्रियांनी नाचगाण्याने सैनिकांची करमणूक करणे चालू केले. यातून तमाशाचा जन्म झाला असे मानले जाते. तमाशा हा अरबी शब्द आहे. तमाशाचे लिखाण करणारे शाहीर हा फारसी शब्द आहे. ऐतिहासिक कागदपत्रांत शाहीरांचे खेळ अशी नोंद आढळते. पुढे तमाशाचा संच बनला. गौळण, लावणी आणि मुजरा अशा तीन भागांत तमाशा सादर होऊ लागला. तमाशातील पात्रांचे संभाषण कंटाळवाणे होऊ नये म्हणून मध्ये चटकदार गीत चालू झाले ती लावणी.

हळूहळू लावणी हा प्रकार बैठकीत नृत्यासह सादर होऊ लागला आणि तमाशापासून स्वतंत्रपणे सादर होऊ लागला. लावणीच्या रचनाकारांना शाहीर म्हणू लागले. होनाजी बाळा, रामजोशी, प्रभाकर, अनंतफंदी, सगनभाऊ हे त्याकाळातील प्रसिद्ध शाहीर होते. प्रभाकरच्या एका लावणीत सवाई माधवरावाच्या महालात सातशे नाटकशाळा होत्या असा उल्लेख येतो. शाहीर कवींनी पोवाडे हा काव्यप्रकारही या काळात रचला.

दुसऱ्या बाजीरावाच्या काळात शृंगारिक लावण्या बीभत्सतेकडे वळल्या. बाजीरावाविषयी सगनभाऊ लिहितो – रावबाजीचे शहर नमुना पुणे ग्राम वस्ती! अहोरात्र अहोदिवस होती इष्काची कुस्ती! यावरून साधारण पद्याची गुणवत्ता लक्षात येते.

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकातील चलनाची आजची किंमत

आता थोडे विषयांतर जरुरीचे आहे. या संपूर्ण लेखमालेत काही ठिकाणी १७०० ते १९०० या काळातील खर्च किंवा उत्पन्न यांचे उल्लेख येतील. या रकमा किती वजनदार आहेत हे समजण्यासाठी सोन्याच्या किमतीतील बदल विचारात घेतला आहे. १९२५ सालापर्यंत सोन्याच्या किमतीत जास्त बदल झाला नाही. १७२० साली दहा ग्राम सोन्याची किंमत १४ रुपये होती. १९२५ साली ती १८ रुपये झाली आणि २०२०मध्ये ती ५०००० रुपये झाली. त्या काळातील खर्च किंवा उत्पन्न यांचा आजच्या काळातील किमतीत अंदाज घ्यायचा असेल तर २७००ने गुणावे लागेल (५०००० / १८). त्या काळातील दहा रुपये म्हणजे आजच्या काळातील २७००० रुपये.

हे गणित इतके सरळ नाही हे माहीत आहे. सोन्याप्रमाणे इतर वस्तूंत आणि चलनात त्याच प्रमाणात वाढ होते असे नाही. आपण थोडा खालच्या बाजूलाच विचार करून आजच्या किमतीचा अंदाज बांधण्यासाठी २७०० ऐवजी २०००ने त्या वेळच्या रकमांना गुणू.

सण आणि उत्सव

माहिती पेशव्यांचे विलासी जीवन, डॉक्टर वर्षा शिरगावकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, या पुस्तकातून घेतली आहे.


शनिवारवाड्यातील गणेशोत्सव – चित्रकार जेम्स वेल्स, येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट म्युझियम, येल विद्यापीठ
शनिवारवाड्यातील गणेशोत्सव – चित्रकार जेम्स वेल्स, येल सेंटर ऑफ ब्रिटिश आर्ट म्युझियम, येल विद्यापीठ

पुण्यात गणेशोत्सव नानासाहेब पेशव्यांनी चालू केला. शनिवारवाड्यात एक गणेश महाल बांधण्यात आला. या महालातच गणेशोत्सव दहा दिवस चाले. त्यावेळी एक गणपतीची मूर्ती विकत आणली जाई. दहा दिवस चालणाऱ्या उत्सवात कीर्तन, संगीत कार्यक्रम, कलावंतिणींचे नाच असा कार्यक्रम होई. एका दहा दिवसाच्या उत्सवात २,६८२ रुपये खर्च झाले (५३ लाख रुपये, आजच्या किमतीने). सवाई माधवरावाच्या काळात हा खर्च दुपटीने वाढला असे दिसते.

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन केल्यावर पेशवे खास दरबार भरावीत. त्या दिवशी अधिकाऱ्यांना आणि राजदूतांना पोशाख देत. पेशव्यांनाही सरदार पोशाख पाठवीत. १७९४मध्ये पेशव्यांना जे नजराणे मिळाले त्याची किंमत २ लाख २० हजार इतकी होती (आजच्या हिशोबाने ४४ कोटी).

होळीचा सण शिंद्यांनी उत्तर भारतातून आणला. होळीपासून रंगपंचमीपर्यंत रंगोत्सव चाले. हे पाच दिवस शनिवारवाड्यासामोर तमाशे सादर होत. नर्तकींच्या घोळक्यात सवाई माधवराव रंग खेळत. निरनिराळ्या उत्सवांत पर्वतीवर दारूकाम सवाई माधवरावनेच सुरू केले. रंगविलासाशिवाय या पेशव्याने काही कर्तबगारी दाखविली नाही.

निरनिराळ्या व्रतांच्या उद्यापनासाठी ब्राह्मणभोजने सारखी चालूच असत.

हिंदू-मुस्लीम संबंध

सामान्य लोकांत हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ नव्हती. पुढच्या शतकात जोतिबा फुल्यांना जाती बहिष्कृत केल्यावर त्यांना एका मुसलमानाने आसरा दिला. दोन धर्माच्या राजांत युद्धे झाली तरी सामान्य जनात संबंध बिघडलेले नसत. मुसलमान राजाचे हिंदू सैनिक असत आणि हिंदू राजाचे मुसलमान सैनिक असत.

शास्त्रीय दृष्टीचा अभाव

भारतीय समाजात सर्वात मोठी उणीव म्हणजे शास्त्रीय दृष्टीचा अभाव. अठराव्या शतकात युरोपमध्ये शास्त्रीय ज्ञानात मोठी भर पडली होती. नवे शास्त्रीय शोध लागत होते आणि त्याचा उद्योग आणि शस्त्राच्या तंत्रज्ञानात मोठा परिणाम दिसत होता. भारत या बाबतीत पूर्ण अंधारात राहिला. अंधश्रद्धा आणि जातिभेदांच्या अंधारात भारत बुडून गेला होता.

याच काळात युरोपमध्ये काय शोध लागत होते?

  • १७२४ – थर्मामीटर
  • १७५७ – जमिनीच्या सर्वेक्षणासाठी सेक्सटंट यंत्र
  • १७६८ – कापड उत्पादनासाठी स्पिनिंग मशीन
  • १७६९ – स्टीम इंजिन,
  • १७७४ – इलेक्ट्रिक टेलिग्राफ
  • १७७५ – स्टीम शिप
  • १७८५ – कापड उत्पादनासाठी पॉवर लूम मशीन
  • १७९१ – सायकल
  • १७९२ – रस्त्यावर गॅसचे दिवे
  • १७९६ – जेन्नर यांनी देवीची लस शोधली
  • १७९७ – धातूकामासाठी लेथ मशीन
  • १७९९ – ड्राय सेल

नैतिक अधःपतन झालेला समाज

कुणबिणी या प्रथेचा उगम मनुस्मृतीत दिसतो. मनुस्मृतीत दासांविषयी काय लिहिले आहे ते पाहू –

मनुस्मृती (८/ ४१०/१४) – सात प्रकारचे दास असतात – लढाईतून जिंकून आणलेला, उपासमारीमुळे दास झालेला, दासीपुत्र, विकत घेतलेला, भेट मिळालेला, वडिलांपासून आलेला, शिक्षेमुळे दास झालेला.

वा. कृ. भावे यांनी पेशवेकालीन महाराष्ट्र या नावाचे पुस्तक १९३५ साली लिहिले. त्या पुस्तकात 'दास आणि दासी' असे एक प्रकरण आहे. या प्रकरणात ते कुणबिणीच्या प्रथेविषयी ते लिहितात. आजच्या काळात दासांना आपण गुलाम असे म्हणतो. आपण कुणबिणींविषयी जी माहिती घेऊ त्यावरून त्या व्यक्ती गुलाम होत्या हे दिसेल. दुर्दैवाने असे वाटते की आपल्या समाजातील सर्व वाईट प्रथांचा उगम मनुस्मृती हा होता. किंवा असे म्हणता येईल की काळाप्रमाणे समाजात जो बदल होणे जरूर आहे तो ब्राह्मणांनी होऊ दिला नाही. जो समाज काळाप्रमाणे बदलत नाही तो लयाला जातो.

सरदार, अधिकारी, सावकार, व्यापारी तसेच पुरोहित यांचे घरी कुणबिणी बाळगण्याची प्रथा होती. या घरात काम करणार्‍या कुणबिणी शूद्र जातीतील असत. घरात ठेवल्यानंतर त्या अस्पृश्य जातीतील निघाल्या तर प्रायश्चित्त घ्यावे लागे. काही वेळा घरात पोरगे ठेवीत. हे पोरगे स्त्री वेशात करमणूक करणारे तरुण असत. पोरगे आणि कुणबिणी हे गुलामच असत. कुणबिणींची खरेदी-विक्रीही चालत असे. साठ ते शंभर रुपयांपर्यंत किंमत असे. (आजच्या काळात एक ते दोन लाख.)

पेशव्यांचे गुरु ब्रह्मेंद्र स्वामी यांच्याकडेही अनेक दासी होत्या. शाहू महाराजांनी पेशव्यांना पाठविलेल्या एका पत्रात ते सांगतात – कोकणस्थाच्या आठ-दहा वर्षाच्या तीन-चार मुली पाठवाव्या. पेशव्यांकडे शे-दोनशे कुणबिणी असत. वेदशास्त्रसंपन्न पंडित यांचे घरी एक कुणबीण दोन वर्षे होती. त्यानंतर ती गर्भारशी राहिली आणि नाहीशी झाली.

खालील माहिती पेशव्यांचे विलासी जीवन, डॉक्टर वर्षा शिरगावकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २००१, या पुस्तकातून घेतली आहे.

मुलगी कुणबीण म्हणून विकण्याचे मुख्य कारण दारिद्र्य असे. बदकर्म अथवा व्यभिचार केलेल्या स्त्रियांनादेखील कुणबीण बनविले जायचे. ब्राह्मण व मराठा अधिकारी, हरीदास, भिक्षुक, पुराणिक घरात कुणबीण ठेवत. श्रीमंत घरातील कुणबिणीही आपल्या हाताखाली कुणबिणी ठेवीत. भावाभावांत वाटणी झाली तर इतर जिनसाप्रमाणे कुणबिणींचीही वाटणी होई. १८१८ साली पेशव्यांचा पाडाव झाल्यावर गुलामांच्या संख्येचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी राज्यात १५,००० गुलाम होते अशी नोंद झाली.

नाटकशाळा

खालील माहिती पेशव्यांचे विलासी जीवन, लेखक डॉक्टर वर्षा शिरगावकर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, २००१ या पुस्तकातून घेतली आहे.

एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याला भाळून अशा स्त्रीला आपल्या महालात उपस्त्री म्हणून ठेवणे ही प्रथा पेशवाईच्या आधीपासून राजघराण्यात राहिलेली आहे. अशा स्त्रियांना पेशवाईत नाटकशाळा असे संबोधिले जाई. पहिल्या बाजीरावांनंतर ही प्रथा जोमाने पुढे आलेली दिसते. नानासाहेब पेशवे आपल्या दिल्लीतील कारभाऱ्याला पत्र लिहून दहा वर्षांच्या दोन-चार सुंदर हिंदू मुली खरेदी करून पाठवून देण्यास सांगतात. रघुनाथरावाकडे सात स्त्रियांची नोंद आहे. रघुनाथरावाने त्यांना पुण्यात घरे बांधून दिली होती. याशिवाय रघुनाथरावांनी नर्तकी ठेवल्या होत्या. त्यांना महिना १६० रुपये पगार होता. (आजचे ३ लाख) या सात नाटकशाळा आणि नर्तकी यांचा खर्च सरकारी खजिन्यातून चाले. दुसर्‍या बाजीरावाच्या काळात नाटकशाळांवर अचाट खर्च झाला. एका महिन्यात ८०० रुपये (आजच्या हिशोबाने १६ लाख रुपये ) नाटकशाळांवर खर्च झाल्याची नोंद दिसते. काही सरदारांच्या बायका बाजीरावाच्या खास मर्जीत होत्या असे दिसते. विवाहित स्त्रियांशी संबंध राखणे आणि नंतर त्यांच्या पतीची त्याबद्दल बढती करणे हे सामान्य होते. ज्या सरदारांनी आपल्या पत्नींस बाजीरावकडे पाठविण्यास नकार दिला अशा सरदारांना बाजीरावाने त्रास दिला. यावरून बाजीरावाचे आयुष्य किती बदफैली झाले होते याची कल्पना येते.

नाटकशाळांशी संबंध ठेऊन जर त्यांना मुले झाली तर त्यांना सरसकट शिंदे हे आडनाव दिले जाई. (पृष्ठ ३५)

सन १८६८ मध्ये ना. वि. जोशी यांनी पुणे शहराची माहिती या नावाने एक पुस्तक प्रसिद्ध केले. त्याची पुनरावृत्ती श्री. महाजन यांनी २००२ मध्ये प्रकाशित केली. या पुस्तकातून हा उतारा घेण्यात आला आहे.

त्या वेळच्या लोकांची स्थिती म्हटली म्हणजे सुग्रास खावे आणि रिकामटेकड्या गप्पा मारीत बसावे. शूरत्वाविषयी म्हणावे तर ते लोकांस अगदी नव्हते. शेवटील बाजीरावाने लोकांस अगदी नादान करून विषयनिमग्न करून सोडले होते. निर्लज्ज, अशक्त, अविश्वासू आळशी पुष्कळ खाणारे असे केले. जसे एखादे घर कुजके, पडीक, खिळखिळे होते तसे राज्य झाले.

जहागीरदार मनास येईल तशी आपल्ये जहागिरीत वर्तणूक करी. रयतेवर जुलूम, लूट, दंगा करीत आपापसांत तंटा करीत. होळकरांचे लुटीची आठवण पुण्यातील लोकांस होती. होळकरांच्या शिपायांनी लोकांच्या घरांत जाऊन पैसा मागावा आणि जर पैसा नाही दिला तर मालकाचे अतिशय हाल करावेत. कितीक बायकांनी होळकरांचे शिपाई अत्याचार करतील या भीतीने विहिरीत उड्या मारल्या.

राज्य बेकायदा झाले. कोण कोणास लुटील याचा भरवसा नव्हता. शिपाई निरुपयोगी पोटभरू लोक होते. लष्कर बेबंद, बेहिमत झाले. बाहेर पडले म्हणजे रयतेस लुटावयास मात्र तयार. पेशवे शिपायांस पगारही वेळचे वेळेस देत नसत, त्यामुळे लष्कर बेफाम झाले.

लोकांचे धर्म आणि नीती अगदी बुडाली होती. रांडेपणाची श्रीमंती, भडवेपणा हलकी कामे मोठ्यालोकांच्या घरी होती. घरातील स्त्रियांची अब्रू जाऊन देणार्‍यास पेशवे चांगला म्हणत.

लोकात अज्ञान फार होते. कोणास ठाऊक नव्हते की इंग्रज कोठले. विलायत कलकत्यात आणि कलकत्ता विलायतेत असे म्हणत.

याप्रमाणे लोकांचे व राज्याची स्थिती झाली ते कसे बुडणार नाही? या प्रकारे बाजीरावाचे कारकीर्दीत राज्याचे वर्णन आहे.

सन १८६८ मध्ये ना. वि. जोशी यांनी महाराष्ट्रातील समाजाचे केलेले वर्णन आपण वर पाहिले. आता एका इंग्रज माणसाने येथील समाजाचे केलेले वर्णन पाहू. जेम्स मिल या गृहस्थाने History of British India हे पुस्तक १८१७ साली लिहिले. त्याला भारतीय समाज कसा वाटला –

Hindu has general disposition to deceit and perfidy. In truth Hindu, like eunuch, excels in quality of a slave, treacherous and mendacious, which surpasses even uncultivated society. Hindu in physical sense is disgustingly unclean in person and in houses.

मिलचे वर्णन आणि जोशींचे वर्णन यात पूर्ण विरोधाभास नाही.

निष्कर्ष

अठराव्या शतकात समाज जातींत विभागाला होता. अस्पृश्यांना समाजात काही स्थान नव्हते. आदिवासींचे अस्तित्व तर खिजगणतीत नव्हते. भारताबाहेर कोणत्या समाजात अशी जातीव्यवस्था आहे? सुब्रमनियम शंकर हे हवाई युनिवर्सिटीत इंग्लिशचे प्राध्यापक आहेत. त्यांनी Just like India, America has its own caste system हा लेख Conversation या मासिकात लिहिला आहे. तो वाचनीय आहे. हे लिहिण्याचा उद्देश असा की सर्वच समाजात असे निरनिराळे प्रश्न असतात. त्या प्रश्नांकडे समाजाने दुर्लक्ष केले तर अवघड समस्या निर्माण होतात.

समाजातील सर्वात मोठी उणीव म्हणजे शास्त्रीय दृष्टीचा अभाव. युरोपात या काळात नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले जात होते. आपण आपापसात भांडत राहिलो.
उत्तर पेशवाईत नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला. १८१८ साली समाज पूर्णपणे सडला होता.

पुढच्या भागात – भाग ४ – अठराव्या शतकात शासन यंत्रणा कशी होती ते पाहू.

१ - कुणबीण हा शब्द आताच्या काळात जातिव्यंजक व निंदाव्यंजक मानला जातो. तसा तो वापरणे हे इथे अभिप्रेत नाही. त्या काळात आणि त्या काळच्या संदर्भांत मात्र तो त्या काळातील अर्थाने वापरला जात असे. कालोचिततेसाठी तो तसाच ठेवलेला आहे.

मागचे भाग -

भाग १ - एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र - जागृती आणि प्रगती
भाग २ - अठराव्या शतकातील राजकीय घडामोडी

लेखकाचा अल्पपरिचय :
१९६७ साली पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. १९७३ साली आयआयटी पवई येथून धातु अभियांत्रिकी (Metallurgical Engineering) विषयात पीएच.डी. ४० वर्षे अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत. आता निवृत्त होऊन पुणे येथे स्थायिक. विविध विषयांत वाचनाची आवड.

सुधीर भिडे यांचे सर्व लिखाण.

सुधीर भिडे

field_vote: 
0
No votes yet

'नाटकशाळा' या वाक्प्रयोगाचा उद्गम काय असावा? (तसेच, या लेखात उल्लेख आलेला नाही, परंतु, 'अंगवस्त्र' या वाक्प्रयोगाचाही?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठा जातीत दोन सामाजिक श्रेणी आढळतात. ९६ कुळी आणि कुणबी. मराठा जातीतील ९६ कुळे उच्च समजली जातात.

माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे (चूभूद्याघ्या), राजपुतान्यातील राजपूत क्षत्रियांची ९६ कुळे स्थलांतरित होऊन महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाली, आणि स्वत:स 'मराठा' म्हणवून घेऊ लागली. त्या मूळ ९६ कुळांपैकी लोकांचे वंशज म्हणजे ९६कुळी मराठे. पुढे मग (आपण म्हणता तसे) या लोकांच्या अनुषंगाने म्हणा, की अनुकरणाने म्हणा, लष्करांतील मराठीभाषक परंतु इतरजातीय (कुणबी, लोहार, सुतार, वगैरे) मंडळीसुद्धा स्वत:स 'मराठा' म्हणवून घेऊ लागली. (बहुधा ९६कुळींची काही आडनावेदेखील उचलली असावीत. खात्री नाही.) त्यामुळे मग "आम्ही 'त्यांच्यातले' नव्हे; आम्ही 'उच्चकुलीन', 'मूळच्या ९६ कुळांतले', 'क्षत्रिय' मराठे" हे ठसविण्यासाठी ९६कुळी मराठे मंडळी स्वत:चा उल्लेख (विशेषेकरून बेटीव्यवहाराच्या संदर्भात) आवर्जून '९६कुळी मराठे' असा करू लागली.

(९६कुळी) मराठ्यांच्या काही आडनावांत नि राजपुतांच्या काही आडनावांतसुद्धा मला वाटते हा कार्यकारणसंबंध दिसून येतो. (चौहान --> चव्हाण, परमार --> पवार, वगैरे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बर्‍याच गोष्टी नवीन होत्या.

शेवटच्या पेशव्यांची अनैतिकता बाजूला ठेवली तरी, सामाजव्यवस्था शतोकानुशतके अशीच असावी. जी काही राजकीय व्यवस्था इथे होती ती, वरच्या २०-३०% वर्गासाठी होती. जे इतर संस्कृतीतही आढळते. युरोपात जरी सुधारणा होत असल्या तरी व्हिक्टोरिअन काळात मजूर वर्गासाठी हाल अपेष्टाच जास्त होत्या. लंडन शहरात रस्त्यावरचे घोड्याचे लिद गोळा करून आणणारे, शौचाची व्यवस्था लावणारे, दूर प्रवासातले कोचमन, कारखान्यातले कामगार, समाजातले अनाथ इ. यांच्या राहण्याच्या-खाण्या-पिण्याच्या व्यवस्था कमालीच्या हालाखीच्या होत्या. त्यामुळे रोगराई पण जास्त होती. तर अमेरिकेत गुलामगिरी होती. जोपर्यंत राजकिय व्यवस्थेत या वर्गाला वाटा मिळत नव्हता तो पर्यंत या वर्गाने हालअपेष्टा सहन केल्या.

एकंदर समाजाच्या अर्थव्यवस्थेचे चक्र (भारतात/महाराष्ट्रात), खास करून अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टींच्या संदर्भात, नेमके कसे चालायचे हा प्रश्न पडला. अगदी त्याच काळासाठीच नाही, त्या अगोदरच्या काळातही.

सगळेच व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीने व्हायचे की, शिवराई (वा इतर कुठली करन्सी) काही प्रमाणात बहुजनांकडून वापरली जायची?

निवारा एकवेळ समजण्याजोगं आहे. बहुजन मातीची, फार फार तर विटांची घरं स्वतः बांधत / शाकारत असावीत.

ब्रिटीश पूर्व काळात देशांतर्गत वस्त्रोद्योग कसा चालायचा? कारखानदारीमुळे साहेबाने तर ह्या व्यवसायात बदल आणला. पण त्यापूर्वी भारतीय कापडाला (कॅलिको) युरोपात मागणी होती. भारतातून कापड निर्यात होत होते. कपडाव्यापार हा इंग्रजाचा महत्त्वाचा व्यापार होता. बंगाल-ढाका हे केंद्र होते. (पैठण/येवला/सोलापूर/सुरत ही नावं माहित आहेत. तिथे पेशवेकाळात किती कापड तयार होत होते). आणि देशांतर्गत व्यापार (डोमॅस्टीक कन्सम्शन) कसा होता? खास करून बलुतेदारी व्यवस्थेत कापड शेवटच्या गिर्‍हायिकापर्यंत कसे पोहोचायचे.

बहुजनांसाठी समजा रोजच्या वाणसामानातल्या मिठापासून ते मसाल्यापर्यंतच्या सगळ्या जिन्नसांचे व्यवहार वस्तू-विनिमय पद्धतीने होत असेल ते फार किचकट आहे. बहुजनांच्या रोजच्या जेवणात नेमके कुठले पदार्थ असावेत. अशा गोष्टींचे उत्पादन आणि वितरण कसे व्हायचे (सप्लाय चैन).

अन्न, वस्त्र आणि निवार्‍याव्यतिरिक्त, खाणव्यवसाय-धातूची युद्धातली हत्यारे आणि साधने आणि कागद यांची उत्पादने मोठ्या प्रमाणावर (मास प्रॉडक्शन) एकाच ठिकाणी व्हायचे की ती छोट्या प्रमाणावर गावागावत व्हायची?

अर्थात अधिक वाचनासाठी पुस्तके सुचविल्यास आभार.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1975 च्या आसपास च काळ.तेव्हा मी 5 वर्षाचा असेन तो काळ मला अजून पण आठवत आहे.
म्हणजे जाती व्यवस्था,बलुतेदार ही पद्धत बदल होण्याचा काळ.
1)घटना लागू होवून २५ वर्ष झाली होती.
२) जाती व्यवस्था .
म्हणजे लग्नात जेवणाची व्यवस्था दलित लोकांसाठी वेगळी असायची. बाकी पंगती पासून लांब.
त्यांना आमंत्रण असण्याची शक्यता कमीच पण येईल त्याला जेवण दिले जायचे.
२) बारा बलुतेदार हा प्रकार काही प्रमाणात चालू होता.
सुतार,न्याहवी,कुंभार , चांबार आणि इतर जाती ना
धान्याच्या बदल्यात सेवा द्यावी लागत होती.
पण ही प्रथा संपत आली होती.
३) घर बांधणे,विहीर खणणे ही काम घरगुती च त्या अगोदर होत होती म्हणजे पहिली पिढी सांगायची. विटा,कौल ,घरीच बनवली जायची..
४) वस्तू च्या बदल्यात वस्तू हे मी बघितले आहे.
म्हणजे कोकणातील लोक शिकेकाई वैगेरे घेवून यायचे आणि त्या बदल्यात ज्वारी वैगेरे घेवून जायचे.
चलन वापरले जायचे नाही.
४) बैल घरचे,लाकड घरची,शेणखत घरचे, बारा बलुतेदार त्यांची काम करायची.
चलन खूप कमी वापरले जायचे.आणि लोकांच्या गरजा पण खूप च कमी होत्या.
५)पण राज्य घटनेने सत्तेत सहभाग वाढावा म्हणून राजकीय आरक्षण दिले होते.त्याचा परिणाम हळू हळू दिसू लागला.
आणि दलित आणि बारा बलुतेदार असणाऱ्या जाती सत्तेत आल्या.
जात निर्मूलन होण्यास ह्यांचा सत्तेत सहभाग वाढला हे अत्यंत महत्वाचे कारण आहे

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0