टोनी सोप्रानो

आपल्या मनात रेंगाळणार्‍या कथावस्तू. त्यांच्यातलं  वातावरण, त्यातले प्रसंग, त्यातली पात्रं मनात असतात. बर्‍याचदा होतं असं की मित्रमैत्रिणी, सगेसोयरे यांच्यापेक्षा ते अधिक आपल्याला कळलेत असं वाटतं. जवळीक अशी होण्याचा प्रश्नच नसतो. कारण तो काय  संवाद असा  नसतोच. पण काही काही घटनाप्रसंग, पात्रं वगैरेंची भूल पडते खरी. तशी सर्व प्रकारच्या आवडत्या गाण्यांचीही पडतेच म्हणा. घासून घासून खराब होऊ घातलेल्या क्यासेटी नि सीड्या आठवतात.  पुस्तकांची चाळून चाळून जीर्ण झालेली पानं आठवतात.

...तर आज टोनी सोप्रानो बद्दल लिहिण्याचा दिवस उजाडला आहे.  "द सोप्रानोज" सिरियलच्या आठवणी, त्या सिरियलीचं आणि घटनापात्रांचं मनावर पडलेलं प्रतिबिंब - आणि त्यातला सर्वात ठसठशीत तो टोनी सोप्रानो. जेम्स गँडोल्फिनीने रंगवलेला. गँडोल्फिनीचा पुढे काही वर्षांनी अकाली ओढवलेला मृत्यू. या सर्वांच्या दरम्यान मला "द सोप्रानोज"चा माझ्यापुरता झालेला उलगडा. या सगळ्याबद्दल मनात जे अनेक वर्षं सांडलेलं आहे तेच इथे आणायचा अंमळ विरंगुळा.

लेखाचं स्वरूप reminiscing असंच आहे. वैयक्तिक. तुटक. विस्कळित - असंच ते राहाणार.  साकल्याने मांडणी, विहंगमावलोकन, सिंहावलोकन, सम्यक्-आणि-व्यापक वगैरे प्रकार आपल्याला झेपणारे नाहीत.

sopranos2

१९९९ साली अमेरिकेत नवानवा आलेलो होतो. इंटरनेटसुद्धा नवंनवंच होतं. फास्टम फास्ट इंटर्नेट,  स्मार्ट फोन्स, सोशल मिडिया, गूगल-फेसबुक जन्माला आलेले नव्हते. स्ट्रीमिंगचा स्फोट व्हायचा होता. नव्यानव्या आलेल्या माझ्यासारख्या माणसाला नेटवर्क टेलिव्हिजन आणि केबल टेलिव्हिजन यांतला फरक हळुहळू समजायचा होता. "सिनेमॅक्स" आणि "एचबीओ"वर सेक्स-व्हायलन्स-प्रोफॅनिटी असते इतपत समजायला लागलेलं होतं. "सेक्स अँड द सिटी" आणि "द सोप्रानोज" या सिरियली साधारण एकाच वर्षी "एचबीओ" वर आलेल्या होत्या. 

तर  अगदी त्या काळातलंसुद्धा असं आठवतं आहे की "सोप्रानोज"चा बर्‍यापैकी बोलबाला झालेला होता. सोमवार सकाळी कॉफीमशीन भवतालची संभाषणं (हाय...गेले ते ऑफिसला जावं लागण्याचे दिवस. जय करोना.) सोप्रानोबद्दलची आणि फूटबॉलबद्दलची असायची. आम्ही दोन्ही बाबतीत बैल. त्यातल्या त्यात सोप्रानोबद्दलचं कळायचं इतपतच. माझ्या अमेरिकेतल्या, ह्या बाल्यावस्थेत मी या सिरियलचे काही तुकडे पाहिले होते. "ग्यांगस्टर लोकांचं चित्रण" इतपत नोंद घेतली होती. त्यातला मुख्य ग्यांगस्टर टोनी, हा सायकीयॅट्रिस्टकडे जातो इतपत कळलं होतं. ("गुडफेलाज" भारतात असताना पाहिलेला असल्याने त्यातली मेन हिर्विण जी होती ती ही सायकीअ‍ॅट्रिस्ट, इतपत नोंद घेतली होती.)

१९९९ साली सुरू झालेली ही सिरियल २००५-०६च्या सुमारास संपली. या वर्षांत मला ती अस्तित्वात असण्याइतपत माहिती होती. पण ती पूर्ण पाहिली नव्हती. ती पाहिली ती नंतर. बिंजवॉच करत. मूळ सिरियल संपल्यावर सुमारे ८-९ वर्षांनी.  ती पाहाताना नि पाहून झाल्यावर मात्र, हे फारच उत्तम काम आहे याची खातरजमा होत गेली आणि टोनी सोप्रानोचं गारूड जे तेव्हा जमत गेलं त्याची नशा काही अजूनही उतरायला झाली नाही.

म्हणजे, जेव्हा "सोप्रानोज"चा हा इतिहास खरा घडत होता - किंवा पडद्यावर उलगडत होता - तेव्हा आपण नर्मदेतले गोटे राहिलो. आणि नंतर मात्र ती एकसलग बघताना मती गुंग झाल्यासारखे झालो. हे असं का व्हावं तेही आपल्यापुरतं समजावं असा एक उद्देश या लिखाणाचा आहे असं एका अर्थाने म्हणतो. 

ग्यांगस्टरपटांचं आकर्षण हा विषय जुनाच.  अनेक सिनेमे आठवतील. त्यात इंग्रजीबरोबर बरेवाईट हिंदी सिनेमेही  आले. गुन्हेगारी जगाचं आकर्षण, त्यातला हिंसाचार, सेक्स, एकमेकांचा केलेला विश्वासघात, जीवनशैली, श्रीमंती, गुन्हेगारांच्या कुटुंबातील व्यक्तींचे संबंध, टोळीतील व्यक्तींचे एकमेकांशी असलेले संबंध,  त्या त्या काळातल्या, देशातल्या, समाजातल्या पोलिस आणि अन्य घटकांशी गुन्हेगारांशी असलेले संबंध, त्यातल्या उलटसुलट गोष्टी ही मूलतत्वं "सोप्रानोज" मधेही असणं अपरिहार्य होतं. It is like stating the obvious.

विषयच असा मसालेदार असल्याने प्रेक्षक किमान काही प्रमाणात या सिर्यलकडे खेचले जाणं नैसर्गिक होतंच. पण run of the mill अशा अन्य सिनेमे-सिरियलींपेक्षा "सोप्रानोज" वेगळी ठरली.

आता यामागची मीमांसा थोडी गुंतागुंतीची होईल. कदाचित माझ्या सर्व गोष्टी घ्यानात आल्याच असतील असं नाही. ते मी आधीच मान्य केलेलं आहे.

टोनी सोप्रानोचं गारूड आपल्यावर पडतं याची काही कारणं परंपरागत अनेक कारणांपेक्षा वेगळी - आणि प्रसंगी विरुद्ध असलेली आहेत. म्हणजे असं की टोनी सोप्रानो हँडसम नाही. लठ्ठपणामधे वर्गवारी होईल असा,  गुंड वाटावा अशाच शरीरयष्टीचा तो आहे. तो कनवाळू वगैरे नाहीच. (बोलूनचालून तो हिंसेत/खुनाखुनीत आकंठ बुडालेल्या गँगचा बॉस. तो मायाळू कसा असणार.)  माझा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करून सांगायचा तर "गॉडफादर" मधल्या डॉन कॉर्लिऑनसारखी रॉबिनहूड प्रतिमा असलेला, जणू मिथककथेचा नायक असलेला, मार्लन ब्रँडोसारखा "रेनेसां मॅन" अशी प्रतिमा असलेला हा माणूस नाही. गॉडफादरमधले मायकेल, सॉनी वगैरे लोक्स कचाकच लोकांना मारतात पण गॉडफादरकडे मात्र करुणा भाकायला बोनासेरो सारखी माणसं येतात - इत्यादिवगैरे गोष्टींचा वारा टोनी सोप्रानोला लागलेला नाही. तो काही अनपेक्षित ठिकाणी हळुवार होतो. त्याचे डोळे काहींच्या आठवणींनी पाणावतात. काहींना त्रासापासून मुक्ती मिळावी याकरता तो व्याकूळ होतो. पण ही सगळी व्याकुळता आणि करुणा वगैरे त्याच्यात्याच्या सोयी सवडीने तो जोपासतो. या (सोयीने बाळगायच्या आणि चोंबाळायच्या) विमनस्कतेची परिणती जेव्हा पॅनिक अटॅक्समधे होते तेव्हा तो सायकायट्रिस्टकडे जातो. मग तिथे त्याची मूल्यव्यवस्था, त्याचे  अंतर्गत ताणेबाणे उसवले-विणले जातात. 

टोनी सोप्रानो इज *नॉट्* अ लाईकेबल कॅरॅक्टर. तो खुनी आहे. खुनशी आहे. तो ज्यांच्याज्यांच्या आयुष्यामधे आहे - आणि असे डझनावारी लोक आहेत - त्यांच्यात्यांच्यावर त्याचा वचक आहे, त्याची गडद छाया पडलेली आहे. त्यातल्या प्रत्येकाला तो इतक्या प्रकारे नडला आहे. टोनीचा, त्याच्या सत्तेचा लगाम त्या सर्वांच्या नाकातून गेला आहे. सर्व ग्रहउपग्रहलघुग्रहधूमकेतूअशनीआदिइत्यादि जणू टोनी सोप्रानोच्या सूर्यमंडळाचे सदस्य. गॉडाफादर, गुडफेलाज, कसीनो वगैरे पटांमधे असलेलं हँडसमपणाचं, बार्बी-आणि-केन वजा गुलाबी रोमान्सचं अस्तर इथे पहिल्यापासूनच नाही. जिथे ते येण्याची शक्यता आहे ते अलवारपणे कापायच्या ऐवजी ओरबाडून त्यामागचा (प्रसंगी विद्रूपच वाटावा असा) नजारा इथे दाखवला आहे. किंबहुना, हे असं माफियाला (काही अंशी का होईना पण)  गुलाबी चष्म्यातून रंगवण्याचं कपोला, स्कॉर्सेसी वगैरे लोकांचं  सौंदर्यशास्त्र बाजूला ठेवून त्याला वास्तववादाच्या पातळीवर आणणं आणि ते करताना मुख्य पात्रांइतक्याच अन्य पात्रांपर्यंतचं चित्रण हेही स्वप्नील किंवा कॅरिकेचरपासून दूर नेणं हे "सोप्रानोज"चं श्रेय होय असंच मला वाटतं.

"सोप्रानोज" सिरियल म्हणजे शेवटी टोनी सोप्रानो, हे समीकरण काही अंशी खरं असलं तरी सिरियलची थोरवी तितकीच नव्हे. ६-७ वर्षांमधे एकंदर (सुमारे तासाभराचे) ८६ एपिसोड असलेली ही सिरियल. तिला खचितच एका उत्तम दर्ज्याच्या कादंबरीचं स्वरूप आहे. आता इथेही, वर्षानुवर्षं चाललेल्या सिरियल्स, त्यातली पात्रं, घटनाप्रसंग ही काही सोप्रानोजची मक्तेदारी नव्हती. त्यानंतरही अविस्मरणीय सिरियली आल्याच.

मात्र , as far as "Sopranos" goes,  कॅरॅक्टर आर्क्स, स्टोरी आर्क्स वगैरेंबद्दलचं काम चोख आहे. एखादी व्यक्तीरेखा अलगद कथासूत्रामधे प्रवेश करते. कथानकामधे सहज विरघळून जाते. मूळ थीममधे न मिसळणारं, काहीतरी बेसूर, बेचव असं काहीतरी नावाला असणंही अशक्य. एका सबकल्चरमधल्या लोकांची भाषा, त्यांची मूल्यव्यवस्था, त्यांची इटालियन मुळं, त्यांच्या बोलण्यावागण्याची ढब, न्यूजर्सी-न्यूयॉर्क भागातला ॲक्सेंट, त्यातल्या माफिया पार्श्वभूमीचं चित्रण.... अनिमिष नेत्रांनी आपण त्याच्याशी समरस होत जातो.

एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे लोक एकमेकांबरोबर आपल्यातल्याच कुणाबद्दल तरी गॉसिप करतात. आपल्यातल्या इतरांशी असणारे संबंध फूडचेनमधल्यासारखे. मात्र त्या सर्वांवरचा मुलामा मात्र  "धिस थिंग ऑफ आवर्स" - "ल कोसा नोस्ट्रा"च्या पावित्र्याचा.  या पावित्र्यामधे कोवळ्या वयाच्या मुलींना रखेली म्हणून ठेवणं ओके आहे; न्यूड क्लब्स चालवणं ओके आहे; मात्र कुणी होमोसेक्शुअल आहे असं कळलं तर त्याची गच्छंति. पैशाच्या बाबत एकमेकांशी असणारे व्यवहार एका पैशाचीही तमा न बाळगतां केलेले. तिथे क्षमायाचना वगैरे गोष्टींना स्थान नाही. हुकला तो संपला. आपल्यापेक्षा वरिष्ठ असणाऱ्या घटकाच्या विरोधात हूं की चूं केलं तर कपाळमोक्ष अटळ. आणि पैशापैशावरून एकमेकांवर पागल कुत्र्यासारखा हल्ला करणं, नरडीचा घोट घेणं हे प्रत्यहि घडणारं.   

सिरियलच्या प्रत्येक एपिसोडमधे डार्क कॉमेडी आहे आणि तो काळा विनोद समजण्याकरता, त्याचा एक प्रकारे आस्वाद घेण्याकरता त्या वातावरणातल्या व्यक्तिरेखांचं वर्तन, त्यातल्या काहींची  अडाणी वाटेल अशी भाषा, त्यातल्या काहींचं अर्कचित्राप्रमाणे आलेलं चित्रण, अत्यंत निर्घृण प्रसंगांमधेसुद्धा बोलण्यावागण्यात दिसलेल्या विसंगती हे सगळं आपण निराळ्या पातळीवर एंजॉय करत जातो.त्या सगळ्यातली ॲबसर्डीटी प्रत्येक एपिसोडगणिक चढत्यावाढत्या क्रमाने अनुभवायला मिळते. काळ्याशार विहीरीत क्रमाक्रमाने आपण उतरत जातो.

"माफिया काय आता खलास झालेला आहे. अमेरिकन कायदा-सुव्यवस्थेने त्यावर मात केलेली आहे" या विधानातला फोलपणा सिरियलमधून अलगद अधोरेखित होतो.  शंभरपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला हा विषवृक्ष अबाधित राहिलेल्याचं टळटळीतपणे जाणवतं. त्यातल्या खुनशी, विषारी, जळजळीतपणाचं चित्रण बटबटीतपणाचा जराही स्पर्श न होऊ देतां अस्सलपणे येतं.

मैत्री, नातेसंबंध, प्रेमसंबंध, वात्सल्य, नैतिकता, सामाजिक उतरंड, धार्मिकता, भाषा-संस्कृतीची ओळख, समाजाच्या इतर घटकांशी, व्यावसायिकांशी असलेला संपर्क, जीवनशैली, खाद्यसंस्कृती, व्यसनाथीनता, लग्नसंस्था, कुटुंबसंस्था या साऱ्यासाऱ्यासाऱ्या गोष्टींवर एकाच एका चष्म्यातून इथे पाहिलं जातं. ती गोष्ट म्हणजे  माफिया, त्याच्याशी राखावयाचं इमान, त्याबद्दल पाळायची गोपनीयता, ती गोपनीयता मोडली, फंदफितुरी केली तर भोगावे लागणारे रक्तरंजित परिणाम...

अनेकदा मी विचार करतो की सोप्रानो आपल्याला कां आवडते? तर त्याचं *एक* कारण आहे अनपेक्षित अदलाबदल. juxtaposition of things you would least expect.  जिथे क्रौर्य असतं त्याच माणसाबद्दलच्या हळुवार, संवेदनशील भावना येतात. आई-मुलाच्या वत्सल नात्याऐवजी कडुजार-काळ्याकुट्ट गोष्टींनी सगळं बरबटलेलं असतं. आणि हीच आई गेल्यावर तिच्या आठवणींचे तरळलेले अश्रू. कोवळ्या मुलींना रखेल म्हणून वापरून फेकून दिल्यानंतरही तिच्याबद्दलच्या पझेसिव्हनेसपायी केलेली कृत्यं येतात. एखाद्या लाडक्या पुतण्याला, भाच्याला आयुष्यभर लाडाकोडाने वागवून शेवटी तो गैरसोयीचा ठरणार असं दिसल्यावर मूकपणे त्याला मृत्यूच्या दारी पोचवायचे प्रसंग. सोयीसवडीने दाखवलेलं वात्सल्य. मित्रद्रोह. सर्वात जवळच्या नातेसंबंधांमधे दाखवलेला अधाशीपणा, स्वार्थ, शोषण.

एक गोष्ट मान्य करायला हवी. हे सगळं *एकसलग* बघण्याची काही और नशा आहे. तासातासाच्या तुकड्याने, एक आठवडा वाट पाहात हे सर्व बघणं याची मी आता कल्पनाच करू शकत नाही. थोडक्यात बिंजवॉचिंगशिवाय मला हे इतकं आवडलंच नसतं. "The Whole is greater than sum of its parts" या ॲरिस्टॉटलच्या तत्त्वाला मी या बाबत संपूर्णत: शरण आहे..

sopranos1

सोप्रानोजमधे "जरा मजा करावी"  म्हणून केलेल्या अशा हलक्याफुलक्या सिटकॉमवजा एस्केपिझमला वाव नाहीच. त्यात विनोद आहे आणि परत पाहाताना छोट्या छोट्या गोष्टींमधल्या जागांना आपण दाद देतो पण त्यात "केवळ तुम्हाला बरं वाटावं म्हणून जरासा विरंगुळा " असं काहीही नाही. जे आहे ते डोक्याला मुंग्या आणू पाहील असंच.  

 एकंदरीतच एखाद्या बृहद कादंबरीसारख्या मोठ्याशा कथानकाचा आढावा घ्यायला जावं, त्याची थोरवी वर्णायचा प्रयत्न करावा तर  "किती आठवू गा तूंते/किती शब्द बनवूं गा/ अब्द अब्द मनीं येते" हे मर्ढेकरांचे शब्द आठवतात. तशीच अवस्था होते.

 सोप्रानोजमधे आलेलं विशिष्ट परिस्थितीतल्या इटालियन अमेरिकन संस्कृतीचं चित्रण.

सोप्रानोज मधली एकसे एक मासलेवाईक, अविस्मरणीय पात्रं. पात्रांची भाषा. प्रसंगी चुकीचे वाक्प्रचार आणि काहीतरी थोर बोलण्याचा आव आणताना केलेल्या व्याकरणातल्या चुका आणि त्यातून झालेले विनोद.

प्रसंग, व्यक्तिरेखा, वातावरणनिर्मिती यामधे असलेली authenticityआणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांना बाळबोध काहीतरी भरवायच्या ऐवजी निर्माण केलेली सूचकता, less is moreचं राखलेलं उत्कृष्ट भान.

 सोप्रानोज मधल्या गोष्टींची निर्माण झालेली मीम्स.

सोप्रानोजला मिळालेले अनेकोत्तम पुरस्कार. त्यातल्या लेखन-दिग्दर्शन-अभिनय-वातावरणनिर्मितीला मिळालेली दाद.

सोप्रानोजच्या - अप्रिय वाटेल अशा - प्रतिनायकाच्या अभूतपूर्व यशानंतर, तिच्यातून प्रेरणा घेऊन जन्माला आलेली ब्रेकिंग बॅड सारखी उत्कृष्ट मालिका आणि वॉल्टर व्हाईट या अविस्मरणीय प्रतिनायकाच्या व्यक्तिरेखेची निर्मिती. (खुद्द ब्रेकिंग  बॅडच्या कर्त्याने याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आहे : "Without Tony Soprano, there is no Walter White")

अमेरिकेतल्या "गोल्डन एज ऑफ टेलिव्हिजन"चा उगमबिंदू "सोप्रानोज"मधे असल्याचा एकदंर सामान्य समज.


इतपत गुणवर्णन करूनही बरंच काही सांगितलं नाही असंच वाटत राहातं. अनेक पात्र-घटना-प्रसंग आठवतात. वाटतं अजून एखाददा सहज पाहू आपण हे परत, काही वर्षांनी.  

सोप्रानोजचे गारूड उतरत नाही हे खरं आहे.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet