बिग् सिटी ब्ल्यूज
लघु चित्रपट म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारल्यास चित्रपटाची लांबी वा चित्रपटाची कालावधी वा थोडक्यात सांगितलेली सिनेकथा असे सामान्यपणे सांगितले जात असते. चित्रपट निर्मिती व वितरण यांचे डिजिटायजेशन होण्यापूर्वी 10-12 रीळ असलेल्या चित्रपटांना ढोबळपणे लघु चित्रपट असे म्हटले जात होते; व आता सुमारे 40 मिनिटापेक्षा कमी कालावधी असलेल्या चित्रपटांना लघु चित्रपट म्हटले जाते. परंतु लघु चित्रपट व पूर्ण लांबीचा चित्रपट यांची तुलना अनुक्रमे कथा व कादंबरी असे करता येईल. वाचकांची उत्कंठा वाढविणाऱ्या मोजक्याच प्रसंगाभोवती कथा विणली जाते; तर, कादंबरीचा पट भरपूर मोठा असतो. अगदीच क्षुल्लक वाटणाऱ्या क्षणांनासुद्धा मनाच्या मायक्रोस्कोपखाली बघण्यास चांगले लघु चित्रपट भाग पाडतात. कदाचित कालरेषेवरील काही अत्युच्च क्षण पकडण्याचा हा प्रकार असावा. त्या क्षणापूर्वीच्या वा त्यानंतरच्या क्षणाबद्दल काहीही कल्पना नसतानासुद्धा त्या क्षणात प्रेक्षकांना गुंगून ठेवण्याची किमया चांगले लघु चित्रपट करू शकतात. लघुकथेप्रमाणे लघुचित्रपटामध्ये सर्जनशीलतेला भरपूर वाव असतो. फक्त त्या माध्यमावर/कलाप्रकारावर प्रभुत्व असायला हवे. वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या स्थितीत, वेगवेगळ्या स्वप्नवत प्रसंगदृश्यात त्या व्यक्त करता असतात. बहुतेक श्रेष्ठ लघुचित्रपटात थोडक्यात सांगितलेली कथा, उत्कृष्ट अभिनय, कल्पनेला वाव व डोळे दिपवून टाकणारे दृश्य हे गुणविशेष आढळतात. यांची क्रमवारी करणे तितकेसे सोपे नाही. कदाचित प्रेक्षकांची चित्रपट बघतानाची मनस्थितीच याचे निर्णय घेऊ शकेल.
बिग सिटी ब्ल्यूज हा असाच एक 1962 साली प्रदर्शित झालेला 24 मिनिटाचा उत्कृष्ट लघु चित्रपट आहे. चार्ल्स लिंडेन (1909-1987) या डच चित्रपट दिग्दर्शकाची ही चित्रकृती आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला शहराबाहेरील एका अर्धवट बांधलेल्या बहुमजली इमारतीच्या दरवाज्यापाशी एक अम्ब्युलन्स उभी असून काही कर्मचारी वरच्या मजल्यावरून स्ट्रेचर घेऊन येत आहेत. एका गौरवंशीय तरुणाला आणि बेड्या घातलेला व हातात ट्रम्पेट घेतलेला एक कृष्णवर्णीय तरुणाला अजून एका गाडीत बसविले आहेत. गाड्यांच्या भोवती जमलेल्या गर्दीत एक आठ-दहा वर्षाचा मुलगा या सर्व गोष्टी पहात उभा आहे. येथूनच फ्लॅशबॅकमधून या पूर्वी घडलेली हकीकत सांगितली जात आहे.
हा मुलगा त्या निर्जन इमारतीपाशी एक ससा घेऊन येतो. त्याच्या पाठीमागे एक 14-15 वर्षाची मुलगी त्याच्या हातातील सशाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. तो ससा यांच्या हातातून निसटून इमारतीच्या पायऱ्यावरून इकडून तिकडे पळू लागते. हा मुलगा व मुलगी त्याचा पाठलाग करत एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जातात. तितक्यात ससा दिसेनासा होतो. मुलगा या पळापळीत थकून जातो. मुलगी मात्र सशाला शोधत इकडून तिकडे, एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पळत पळत जात असते. तेथेच एका मजल्याच्या भितीला पाठ टेकून एक गौरवर्णीय व दुसरा निग्रो तरुण बसलेले असतात. जमीनीवर एक-दोन दारूच्या रिकाम्या बाटल्या इतस्ततः पडलेले असतात. तरुणांचे डोळे तारवटलेले. गौरवर्णीय तरुण धडपडत उठतो व मुलीचा पाठलाग करू लागतो. मुलगी त्याच्या हातातून निसटण्यासाठी इतस्तत इकडून तिकडे, तिकडून इकडे पळू लागते. पळत असताना इमारतीच्या आतील बाजूस उभ्या केलेल्या लाकडी फळ्यांच्यावर पडून तिचा जीव जातो. तरुणीची किंचाळणे ऐकून लहान मुलगा तिला शोधत शोधत येतो. निग्रो तरुण हातातील ट्रम्पेटवर एक शोकगीत वाजवत जिन्याच्या कठड्यावर बसलेला असतो. गौर वर्णीय तरुण पळून जाण्याच्या पावित्र्यात असतो. ससा एकदा दिसून नंतर दिसेनासा होतो. एका बाजूला मुलगा, दुसऱ्या बाजूला मेलेली मुलगी व अजून एका बाजूला ट्रम्पेटवर शोकगीत वाजविणारा तरुण. येथे फ्लॅशबॅक संपतो.
पुन्हा एकदा आपल्याला अम्ब्युलन्स उभी असलेली दिसते. अजून एका गाडीत ते दोन्ही तरुण, त्यांच्या भोवतालची गर्दी असे दृश्य दिसते. गाड्या तेथून जावू लागतात.....परत एक मुलगा ससा घेऊन आलेला असतो. त्याच्या हातातील सश्याला हिसकावून घेण्यासाठी एक मुलगी येते. ससा त्या भग्न इमारतीत पळून जातो... व येथे चित्रपट संपतो.
हा चित्रपट प्रेक्षकांना अगदीच वेगळ्या प्रकारचा अनुभव देतो. पूर्ण चित्रपटभर एकही संवाद नाही; एकही शब्द उच्चारला जात नाही. एक निग्रो वादक, सश्याला हातात घेतलेला एक मुलगा, पांढरे फ्रॉक घातलेली मुलगी व निर्जन, अर्धवट बांधलेली भग्न इमारत. एखाद्या स्वप्नातील चार घटक असल्यासारखे ते वाटतात. व जेव्हा त्या एकमेकात मिसळतात तेव्हा एक भयानक अशी घटना घडते. शेवटचे दृश्य बघत असताना प्रेक्षक डोळे चोळत खडबडून जागा होतो व परत सुरुवातीचे शॉट्स बघतो. आपण कुठून सुरुवात केली, हेच त्याला कळेनासे होते. दिग्दर्शक आपल्याला कोड्यात टाकतो. जाझ या पाश्चिमात्य संगीत प्रकारातील ब्ल्यूज या गाण्याचा खुबीने वापर केल्यामुळे चित्रपट अविस्मरणीय ठरतो. ब्ल्यूज ही धून आप्रिकेतील निग्रोंच्या वेदना, दुःख, त्यांच्यावरील वेदना यांचे प्रतीक असते. चित्रपटात वर्णद्वेषावर, गुन्हेगारीच्या वारंवारतेवर, मुलांच्यातील निरागसतेवर, तरुणांच्या औदासीन्यतेवर दिग्दर्शक काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटू लागते. वास्तव व स्वप्न ही दरी पुसण्याचा प्रयत्न करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. हे जाणवते.
हा चित्रपट एका पातळीवर शहरांचा बकालपणा, हरवलेली संवेदनशीलता व दुसऱ्या पातळीवर माणसातील कामेच्छा व त्यासाठी काहीही करण्याची तयारी दाखविण्याचा प्रयत्न करते. सुसंस्कृततेचा टेंभा मिरवणाऱ्या वातातवरणात एका कोवळ्या मुलीवर अत्याचार करणारी क्रूरता, व प्रत्येक गुन्ह्याच्या मागे काळ्या वंशाचीच माणसं असतात हा समज व हे चक्र असेच सतत होत राहणार इत्यादी गोष्टीवर दिग्दर्शक भर देत आहे, हे लक्षात येते
चार्ल्स लिंडेन यानी आपल्या चित्रपट करीअरची सुरुवात बर्लिन येथील पॅरामाउंट वृत्तचित्रासाठीच्या कामातून केली. नंतरच्या काळात पॅरिस येथून अमेरिकन चित्रपटांची फ्रेंच आवृत्तीचे काम त्यानी केले. 1936च्या सुमारास त्यानी एक पूर्ण लांबीचे ‘यंग हार्टस्’ या चित्रपटाची निर्मिती केली. तो बॉक्स ऑफिसवर आपटला. परंतु चित्रपट समीक्षकाच्या पसंतीस उतरल्यामुळे त्याचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले. जवळ जवळ पन्नास वर्षे तो वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची निर्मिती करत होता. त्यानी दिग्दर्शित केलेल्या ‘डच इन सेव्हन लेसन्स’ या चित्रपटामध्ये आड्री हेपबर्न या अभिनेत्रीने काम केले. ‘धिस टायनी वर्ल्ड’ या त्याच्या डॉक्युमेंटरी चित्रपटाला 1973 सालचे ऑस्कर पारितोषक मिळाले.