अॅन अकरन्स अॅट औल क्रीक ब्रिज
कथा-कादंबरीतील कल्पनारम्यतेला दृक्-श्राव्याची जोड दिल्यामुळे चित्रपट माध्यमाला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला हे आपण नाकारू शकत नाही. गेली शंभर वर्षे हे माध्यम तगून आहे. तंत्रज्ञान अगदीच प्राथमिक स्वरूपात असतानासुद्धा काही सर्जनशील सिनेनिर्मात्यानी धक्कातंत्र वापरून प्रेक्षकांना चकित केले आहे, एवढेच नव्हे तर वास्तवापासून दूर पळणाऱ्या प्रेक्षकांना वास्तवाची जाणीव करून देण्यातही ते यशस्वी झालेले आहेत. रॉबर्ट एन्रिको हा त्यापैकी एक नावाजलेला दिग्दर्शक. फ्रान्स येथील पटकथाकार व चित्रनिर्माता, रॉबर्ट एन्रिको (1931-2001) यानी अँब्रोज बीयर्स या अमेरिकन लेखकाच्या अमेरिकन यादवी युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या अॅन अकरन्स अॅट औल क्रीक ब्रिज (An Occurrence at Owl Creek Bridge) नावाच्या कथेवरून या लघु चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट आजही चित्रपट क्षेत्रातील मैलाचा दगड असा मानला जातो.
अमेरिकेतील यादवी युद्धाचा तो काळ होता. दक्षिणेत कॉन्फेडरसी व उत्तरेत युनियन असे दोन तट एकमेकावर तुटून पडले होते. अलाबामा राज्यात धमासान लढाई चालू होती. युनियनचे सैनिक जिवाची पर्वा न करता लढत होते. ठिकठिकाणी सैनिक तळ ठोकून होते. तेथील एका खाडीच्या रक्षणाची जबाबदारी असलेले सैनिक तात्पुरत्या उभारलेल्या रेल्वेच्या लाकडी पुलाचे रक्षण करत होते. ‘पुलाजवळ येऊन टेहळणी करणाऱ्यांना मृत्युदंड दिले जाईल.’ असे बोर्ड लावलेले होते. तेथील एक नागरिक, फारुखार, सैनिकांच्या तावडीत सापडतो. सैनिक त्याचे हात बांधून पुलावरून नेत असतात. पुलाच्या मध्यभागी फाशीचे दोर लटकावण्यासाठी एक तुळई व पायाखालच्या बाजूला एक फळी सरकवलेली असते. एक सैनिक पुलाबाहेरच्या फळीच्या टोकावर फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याचे पाय बांधून उभा करतो. दुसरा सैनिक फळीच्या पुलाच्या आतील बाजूवर पाय रोऊन उभा राहतो. पाय काढले की फळी घसरेल व लटकवलेल्या दोरीमुळे कैद्याचा गळा आवळला गेल्यामुळे तो मरून पाण्यात पडेल अशी व्यवस्था केलेली होती. सर्व काही सैनिकीच्या शिस्तीने एकही अवाक्षर न उच्चारता केले जात होते. कैद्याच्या गळ्यातील स्कार्फ काढून त्याच्या गळ्यात दोर आवळले फारुखार क्षणभर डोळे मिटतो. घरातले डोळ्यासमोर दिसतात. त्याच्या खिशातील घड्याळ काढून घेतले जाते. सैनिकाचा प्रमुख ऑर्डर देतो. तितक्यात ...
फरुखार डोळे मिटतो. फाशीची दोरी तुटते व तो पाण्यात पडतो. हाता-पायातील दोरी सोडवून घेतो. गळ्यातील दोरी सोडवून घेतो. पाण्यात गटांगळ्या खात पुढे पुढे जातो. पाण्यात साप वळवळत असतात. तोफेच्या/बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज येत असतो. तो कसाबसा जीव मुठीत धरून पाण्याच्या आतूनच पोहत पोहत पुढे जातो. भरपूर झाडे झुडपे दिसत असतात. पक्षी चिवचिव करत असतात. कोळी जाळे विणत असतो. तेवढ्या स्थितीतसुद्धा तो फुलाचा वास घेतो. गोळ्यांचा आवाज काही थांबत नाही. पुढे पुढे तो जात असतो. हाताला जखम झालेली असते. पुलापासून लांब कुठे तरी खाडीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर दमून, थकून येतो व निपचित पडून राहतो. मृत्युच्या दाढेतून सुटल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतो. झाडा-झुडपातून तो घराच्या गेटपाशी येतो. समोर बायको दिसते. बायको कवेत घेण्यासाठी पुढे येते. फरुखारही हसत-रडत पुढे जात असतो.
आणि...तितक्यात फळी निसटल्याचा आवाज येतो व फाशीच्या दोरीवर लटकलेले त्याचे प्रेत दिसते. दोर तुटल्यापासून ते बायकोला कवेत घेईपर्यंतचे सर्व काही त्याच्या मृत्युच्या क्षणावेळचे व मृत्युपासून सुटका करून घेण्याचे मनाचे खेळ असतात. येथे चित्रपट संपतो.
न्यायाचे नाव घेत एक माणूस दुसऱ्याला माणसाला मारून टाकणाऱ्या भयानक क्रूरतेविषयी फार मार्मिकपणे दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे टिप्पणी करत आहे. एका माणसाला मारून टाकणे म्हणजे 5-6 फुटाच्या शरीराचा नाश नसून त्याचे स्वातंत्र्य, त्याच्या आशा-आकांक्षा, जिवंतपणी त्यानी विणलेली स्वप्ने, निसर्गाविषयी इतर जीव-जंतुविषयी असलेले त्याचे प्रेम, जगण्यातील उत्कटता, त्यातील व्याकुळता, इतरावरील भावनिक गुंतवणूक इत्यादी सर्व गोष्टींचा नाश होतो हे उमजूनच घेतले जात नाही. त्याचे मरण म्हणजे त्याच्या ‘जगा’लाच नष्ट करणे. माणसाला हा अधिकार कुणी दिला हा प्रश्न उपस्थित करणारी ही एक उत्कृष्ट कलाकृती आहे.
प्रतिक्रिया
फिल्म उपलब्ध
फिल्म इथे उपलब्ध आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
माझाही एक प्रतिसाद
नानावटींच्या धाग्यांवर कुणी प्रतिसाद देत नाही म्हणून त्यांना वाईट वाटू नये यास्तव मी हा प्रतिसाद बियरच्या अंमलाखाली देत आहे.
अर्थात फ्रेंच दिग्दर्शकाची फिल्म असल्याने जंतूंचा प्रतिसाद तो बनताही था. (बियर म्युनिकची आहे त्यामुळे मीही हात चालवून घेतो.)
या प्रतिसादाच्या निमित्ताने नानावटींचा लेख दोन ओळी वाचून (इतर ऐसीकरांसारखा) स्किप न करता पूर्ण वाचेन याची मी ग्वाही देतो.
----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला
अरे वा!
बियरचा मी विशेष षौकीन नाही, जाणकार तर नाहीच नाही, परंतु...
इतकी स्ट्राँग असते का म्युनिकची बियर? मग एकदा तरी ट्राय करायलाच पाहिजे!
(एनी रेकमेंडेशन्स?)