स्त्री विकासाची वाटचाल – १८५० ते १९५०

स्त्री विकासाची वाटचाल – १८५० ते १९५०

सुधीर भिडे

book cover

स्त्री विकासाच्या पाऊलखुणा हे पुस्तक नुकतेच वाचले. हे पुस्तक डॉक्टर स्वाती कर्वे यांनी संपादित केले आहे. १८५० ते १९५० या कालावधीत स्त्री लेखकांनी लिहिलेल्या निवडक लेखांचा हा संग्रह आहे. (प्रतिमा प्रकाशन २००३) संग्रहातील लेख त्या काळात प्रसिद्ध स्त्रियांनी लिहिले आहेत. सर्व लेख वाचनीय आहेत. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील बदल या विषयावर मी एक लेखमाला आधी लिहिली होती. या पुस्तकाचा विषय त्या लेखमालेशी जुळता असल्याने मला पुस्तकाविषयी जास्त कुतूहल होते. साहजिकच पुस्तक वाचल्यावर स्त्रियांच्या परिस्थितीत बदल या दृष्टीने मी पुस्तकाकडे पाहिले. यासाठी या कालखंडाचे तीन भाग केले –

१८५० ते १८९०; १८९० ते १९२०; आणि १९२० ते १९५०.

या तीन कालखंडांत या पुस्तकात कोणत्या विषयांवर स्त्रियांनी लिखाण केले ते पाहिले. विषयांत झालेले बदल स्त्रियांना त्या-त्या काळात काय महत्त्वाचे वाटत होते ते दर्शवितात. त्याच बरोबर समाजात स्त्रियांचे स्थान कसे उन्नत होत गेले ते ही लक्षात येते.

कालखंड १८५० ते १८९०

या कालखंडात हुंड्याचा प्रश्न, बालविवाह, बालविधवांचा प्रश्न यांवर बरेच लेख प्रसिद्ध झाले. मुक्ताबाई या महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या शाळेत शिकलेल्या महार जातीच्या विद्यार्थिनीचा लेख पुस्तकात आहे. १८५५ साली ज्ञानोदय मासिकात त्यांनी हा लेख लिहिला. दलितांमधल्या त्या पहिल्या लेखिका समजल्या पाहिजेत. लेखातील मजकूर वाचून महार-मांगांना समाज किती भयंकर वागणूक देत होता याचे चित्र दिसते. ते वाचून आपल्याला आपली लाज वाटू लागते.

या काळात एक निराळ्या स्वरूपाचा लेख काशीबाई कानिटकरांनी लिहिला. हा लेख एका इंग्रजी लेखाचा भाषांतरित लेख होता. हा लेख १८९० साली मनोरंजन मासिकात प्रसिद्ध झाला. कोणत्याही शाळेत न जाता काशीबाई स्वत: इंग्रजी शिकल्या हे विशेष. मराठीत चांगले ग्रंथ प्रसिद्ध होण्याची गरज आहे याची त्या जाण देतात. त्याच बरोबर ग्रंथलेखनातून अर्थार्जन होत नाही याची खंत व्यक्त करतात. (आजही ते खरे आहे, नाही का!) त्यानंतर त्या भाषांतरित लेख लिहितात. इंग्रजी लेखाचा विषय ग्रंथ लेखन हा आहे.

कालखंड १८९० ते १९२०

या कालखंडात हुंडा, बालविवाह या चाली सुरूच होत्या आणि त्याविषयी लेखिकांनी लिहिले आहे. १९१० साली मनोरंजनच्या अंकात काशीबाई कानिटकर विवाहाच्या वेळी स्त्रीचे वय किमान १४ आणि पुरुषाचे किमान २० असावे असे मत प्रकट करतात.

स्त्री शिक्षणाविषयी बरेच लेख या काळात लिहिले आहेत. आर्य भगिनी मासिकात माणकाबाई चापाजी स्त्रियांना काय शिक्षण द्यावे याविषयी आपले मत मांडतात. या सुरुवातीच्या काळात स्त्री आणि पुरुषांना एकच शिक्षण असावे ही भूमिका नाही. याच विषयावर आनंदीबाई प्रभुदेसाई यांनी महाराष्ट्र महिला अंकात लेख लिहिला आहे. या शिवाय इंदिराबाई पंडित आणि एक जुनी विद्यार्थिनी या नावाने दोन लेख याच विषयावर आहेत. स्त्रियांनी शिवणकाम शिकावे या विषयावर एक लेख आहे.

देवदासींच्या स्थितीवर एका देवदासीने मनोरंजनच्या अंकात १९०१ साली लेख लिहिला आहे.

१९१९ साली गृहिणी रत्नमाला मासिकात सीताबाई सावंत यांनी पहिल्या महायुद्धात स्त्रियांचे योगदान या विषयावर लेख लिहिला आहे. त्या लिहितात –

स्त्रियांनी युद्धकाळात युरोपमध्ये केलेल्या कामामुळे स्त्रियांत एक प्रकारचा मर्दपणा शिरून त्या पुरुषांचे हक्क मागू लागल्या आहेत.

कालखंड १९२० ते १९५०

या कालखंडात लिखाणाच्या विषयांत वैविध्य आले. बालविवाह, विधवा विवाह या प्रश्नांची तीव्रता कमी झाल्याने या विषयांवर लेख नाहीत. हुंडा या विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला.

गृहलक्ष्मी मासिकात इंदिराबाई गद्रे यांनी स्त्री पतन आणि लैंगिक शिक्षणाची गरज या विषयांवर एक लेख लिहिला. स्त्रियांना व्यायामाची गरज असते, आणि स्त्रियांनी खेळात भाग घ्यावा यावर दोन लेख प्रसिद्ध झाले.

स्त्रिया आणि पुरुषांचा सामाजिक दर्जा समान असला पाहिजे हा विचार कृष्णा कुमारी या लेखिकेने गृहलक्ष्मी मासिकात १९२७ साली व्यक्त केला.

स्त्रियांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे असे आवाहन सई रानडे यांनी याच साली केले. नोकरी-उद्योगाबरोबर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत स्त्रियांनी भाग घ्यावा असे अरुंधती आपटे सुचवितात.

गर्भपात कायद्यावर कुमुदिनी प्रभावळकर आपले मत व्यक्त करतात – साल १९३३.

या कालखंडात झालेला बदल लक्ष्मीबाई प्रधान यांच्या वेदवाङ्‌मय या लेखातून दिसतो. हा लेख यशवंत मासिकात १९३० साली प्रसिद्ध झाला. ब्राह्मणांनी १८२०पर्यंत स्त्रियांना शिक्षणाची बंदी केली होती. स्त्रियांनी वेद शिकणे हे पाप होते. १९३० साली एका स्त्रीने वेदांवर लेख लिहिणे हा खरा बदल होता.

जळगाव येथे महाराष्ट्र साहित्य संमेलन १९३६ साली झाले. कविवर्य माधव जुलिअन अध्यक्ष होते. स्वागताध्यक्ष होत्या आनंदीबाई शिर्के. त्यांचे भाषण वाचनीय आहे. त्या काळातील मराठी साहित्यात होणारे बदल याचा आढावा आनंदीबाईंनी घेतला आहे.

धर्मात्मा या चित्रपटाचा रसास्वाद दुर्गा गायकवाड यांनी घेतला. दुर्गा खोटे यांनी त्यांच्या चित्रपटसृष्टीतील अनुभवांवर लेख लिहिला.

पती आणि पत्नीने एका शय्येवर किंवा दोन निराळ्या शय्यांवर झोपावे याची चर्चा सौ. नीलादेवी करतात. लैंगिक विज्ञान परिषदेत शकुंतला परांजपे यांनी केलेले भाषण सवाई जीवन मासिकात १९४२ साली प्रसिद्ध झाले.

लोकहितवादींच्या वाङ्‌मयाचा आढावा मीनाक्षी कोल्हटकर यांनी सत्यकथेच्या १९४७ सालच्या अंकात घेतला. लोकहितवादींच्या कामानंतर शंभर वर्षांनी त्यांना एका स्त्रीने दिलेली ही श्रद्धांजली.

संपादकीय

या कालखंडात स्त्रियांसाठी मासिके सुरू झाली ज्यात वरील लेख प्रसिद्ध झाले. या मासिकांच्या संपादिका स्त्रियाच होत्या. १८८६ साली आनंदीबाई लाड यांनी आर्य भगिनी हे मासिक सुरू केले. आनंदीबाई लाड या पहिल्या स्त्री संपादिका म्हणायला पाहिजे. पुढे हे मासिक बंद पडून परत त्याच नावाने दुसऱ्या संपादिकेच्या अधिकारात चालू झाले. मासिकाची वर्गणी वर्षाला एक रुपया होती.

१८९५ साली सीमंतिनी नावाने एक मासिक चालू झाले. संपादिका माळवणकर मासिकात काय प्रकारचे लिखाण छापले जाईल विषयी लिहितात –

कहाण्या, उखाणे, बायकांची गाणी, शिवणकाम, स्वयंपाक, मुरांबे, रांगोळी, लहान मुलांचे संगोपन.

साहजिकच हे मासिक तत्कालीन गृहिणी लक्षात घेऊन छापण्याचे ठरविले होते. आजच्या तारखेला अशाच थाटाची बायकांची मासिके प्रकाशित होतात.

किर्लोस्करच्या १९२६ मधील अंकात सौ. जांभेकर यांनी स्त्रिया स्वदेशी चळवळीला कसा हातभार लावू शकतात या विषयावर लेख लिहिला.

गृहलक्ष्मीच्या १९२८ सालच्या संपादकीयात तारा टिळक यांनी वेश्याव्यवसायावर सर्व बाजूंनी विचार करणारा एक लेख लिहिला आहे. स्त्री-पुरुषांच्या समान दर्जावर या विषयावर दोन संपादकीये लिहिली गेली.

जननी हा निराळ्या प्रकारचा अंक १९३६ साली सुरू झाला. त्यात आहार, निद्रा, अनुवंशिकता, प्रजनन या विषयावर शास्त्रीय माहिती दिली जाई.

वनिता विश्व या मासिकात १९४९च्या अंकात वारसा हक्काची माहिती देण्यात आली.

समालोचन

१८५० ते १८९० कालखंडात हुंड्याचा प्रश्न, बालविवाह, बालविधवांचा प्रश्न हे महत्त्वाचे विषय होते. साहजिकच त्या काळात स्त्रियांनी त्या विषयांवर बरेच लिखाण केले. १८९० ते १९२० या काळात या प्रश्नांची तीव्रता कमी झाली होती आणि या विषयावरील लेखांची संख्या कमी झाली. १९२० ते १९५० या काळात हुंड्याचा प्रश्न सोडून इतर मुद्द्यांवर लिखाण नाही. दुर्दैवाने हुंडा हा प्रश्न आपल्या समाजातून अजूनही गेलेला नाही.

१८९० ते १९२० या काळात स्त्री शिक्षणाचा विषय चर्चेत आला होता. महात्मा फुल्यांनी १८५० साली स्त्री शिक्षणाची मोहीम चालू केली. त्याची फळे पुढील पन्नास वर्षांत आलेली दिसतात. या काळात स्त्रियांनी काय शिक्षण घ्यावे हा विषय चर्चेत होता. पुरुष आणि स्त्रिया यांना एकच शिक्षण दिले पाहिजे हा विचार अजून रुजला नव्हता.

१९२० ते १९५० या काळात स्त्रियांनी व्यापक विषयांवर लिखाण चालू केले. समाजाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत स्त्रिया काम करू लागल्या होत्या. स्त्री-पुरुष समानतेची मागणी सुरू झाली होती.

मासिकांच्या दर्जाचा विचार करता, सीमंतिनीसारखा एखादा अपवाद वगळता, बऱ्याचशा मासिकांत दर्जेदार लिखाण होत होते. अशा तऱ्हेची स्त्रियांनी स्त्रियांसाठी लिहिलेली मासिके आज नाहीत असे खेदाने म्हणावे वाटते. सीमंतिनीसारखी उखाणे-मुरंबे-रांगोळी-बायकी मासिके आजही प्रसिद्ध होत आहेत. आता मुरंबे जाऊन पिझ्झा आला पण प्रकार तोच. स्त्रियांनी त्यातून बाहेर पडावे.

field_vote: 
0
No votes yet

जुने उकरण्यात काही अर्थ नाही
त्या वेळी सामाजिक,राजकीय स्थिती वेगळी होती .
ते निकष आता लावण्यात काडी चा ही अर्थ नाही.
आज च्या काळात स्त्री आणि पुरुष अशी विभागणी च नको.
समाजासाठी धोकायक.
कायद्या नी न वागणारे.
गुन्हेगार.
अशीच लोक बाजूला करून त्यांना शिक्षा हवी जेणे करून समाज रोग मुक्त राहील.
स्त्री आहे की पुरुष ह्याचा विचार करण्याची काहीच गरज नाही.
सर्व कायदे जे लिंग भेदावर आहेत ते सर्व नष्ट करून एकच कायदा हवा .
लिंग भेद मुक्त.
तेव्हाच समानता आली असे म्हणता येईल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

मासिकांच्या दर्जाचा विचार करता, सीमंतिनीसारखा एखादा अपवाद वगळता, बऱ्याचशा मासिकांत दर्जेदार लिखाण होत होते. अशा तऱ्हेची स्त्रियांनी स्त्रियांसाठी लिहिलेली मासिके आज नाहीत असे खेदाने म्हणावे वाटते. सीमंतिनीसारखी उखाणे-मुरंबे-रांगोळी-बायकी मासिके आजही प्रसिद्ध होत आहेत. आता मुरंबे जाऊन पिझ्झा आला पण प्रकार तोच. स्त्रियांनी त्यातून बाहेर पडावे.

बाकी सर्व ठीक आहे, परंतु, ते ठळक केलेले वाक्य बोले तो… स्त्रियांनी काय करावे नि काय करू नये हेसुद्धा पुरुषच (पक्षी: तुम्ही) ठरवणार! बिग नो-नो.

गेलात आता कामातून! आता आपल्या कर्माची फळे भोगायला तयार राहा.

——————————

तुम्ही पुरुष आहात, हे येथे गृहीत धरलेले आहे. तसे नसल्यास १. चूभूद्याघ्या, तथा २. प्रश्न मिटला!

बाकी, त्या आरोपात अगदीच तथ्य नाही, असे मात्र म्हणवत नाही. असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0