नॉर्मन मॅक्लेरिनचे 'नेबर्स' व 'पा दे द्यू'

'नेबर्स' (Neighbours)
Canada/1952/8 min/Dir:Norman McLaren

'पा दे द्यू' (Pas de duex)
Canada/1958/13 min/Dir:Norman McLaren

ढोबळपणे चित्रपटांची दोन प्रकारात विभागणी करणे शक्य आहेः एका प्रकारात (प्रखर) वास्तवदर्शी चित्रपट व दुसऱ्या प्रकारात अभिनयाला केंद्रस्थानी ठेऊन घटनाक्रमांचे चित्रीकरण केलेले (व काही वेळा वास्तवाचा आभास निर्माण करणारे) काल्पनिक चित्रपट. परंतु अजून एक चित्रपटांचा प्रकार म्हणजे चलनवलनाचा आभास दाखविणारे Animation चित्रपट. प्रसंगातील चलनवलनांचे काही बारीकसारीक तुकडे पाडून एका विशिष्ट वेगाने डोळ्यापुढून सरकविल्यास प्रसंगाच्यां जिवंतपणाचा आभास निर्माण करणारी साधनं चित्रप़टांचा उदय होण्यापूर्वीसुद्धा होती. चित्रकथांची पट्टी चित्रपटांचा उदयापूर्वीसुद्धा लोकप्रिय होत्या. चित्रपटाचे तंत्रज्ञान अवगत झाल्यानंत कॅमेराचा वापर लिखित चित्रातून चलनवलन दाखविलेल्या चित्रमालिकाबद्दलचे कुतूहल काही कमी झाली नाही व अजूनही कार्टून चित्रपटांच्या स्वरूपात ती जिवंत आहे.

एखाद्या गोष्टीतील घडलेल्या प्रसंगाचे बारीक बारीक तपशीलाचे चित्र काढून कॅमेराने चित्रीकरण करून प्रोजेक्टरच्या सहायाने पडद्यावर दाखविलेले animated कार्टून चित्रपट आबालवृद्धांचे मनोरंजन अजूनही करतात. लिखित चित्राप्रमाणे शिल्प, बाहुल्या, काड्या, सावल्या, बिंब-प्रतिबिंब इत्यादींचा वापर करूनसुद्धा चित्रपटांची निर्मिती केली जाते. काही कलावंत कॅमेराचा वापर न करता कच्च्या फिल्मवर चित्र व साउंड ट्रॅक वापरून चित्रपटांची निर्मिती करत होते. चित्र-विचित्र तंत्र वापरून साधे दिसणाऱ्या चित्रांना विलक्षणरित्या चित्रीकरण करून रसिकांचे लक्ष वेधत होते. अशा प्रकारे चलित चित्रपटांच्या खजिन्यात कार्टून (व्यंग) चित्रपट, बाहुल्यांचे चित्रपट, प्रकाश - सावलींचे चित्रपट, बिंब-प्रतिबिंब चित्रपट, बिन कॅमेराचे चित्रपट, चमत्कृतीयुक्तशैलीचे चित्रपट, इत्यादींची भर पडत गेली.

चित्रपटांच्या लांबीनुसारसुद्धा पूर्ण लांबीचे व लघु चित्रपट अशीही विभागणी केली जाते. थिएटर्स, वितरक व इतर निर्मितीबाह्य गोष्टीच्या मागणीनुसार 2-4 रीळ असलेले व/वा कमी वेळेत संपणाऱ्या चित्रपटांना लघु चित्रपट म्हणून ओळखले जाते. चित्रपटांची सुरुवातच मुळात लघु चित्रपटाने झाली. 1910 पर्यंतचे बहुतेक चित्रपट दहा मिनिटाच्या कालावधीपेक्षा जास्त वेळ घेत नव्हते. कारण चित्रपट या माध्यमाचा आवाका तोपर्यंत समजलेला नव्हता. नंतर मात्र हा उद्योग भरभराटीला आला; तंत्रज्ञान सुधारू लागले व चित्रपट निर्मात्यांना जनसामान्यांना मायावी जगात नेण्याची चित्रपटांची खरी ताकत कळाली. आठ-दहा रिळापेक्षा जास्त लांबीचे चित्रपट चांगला धंदा करू लागले. तरीसुद्धा लघु चित्रपटाचे स्थान अढळ राहिले. लघु चित्रपटांनी सर्जनशील कलाकांराना त्यांच्यातील कलानिर्मितीसाठी वेगळे दरवाजे उघडून दिले.

सुरुवातीच्या काळात कार्टून चित्रपट तर लघु चित्रपट म्हणूनच प्रदर्शित होत असत. कार्टून चित्रपटांच्या निर्मितीतील जगप्रसिद्ध सर्वात मोठे नाव म्हणून वाल्ट डिस्ने यांचे घेता येईल. मूक चित्रपटांच्या निर्मितीच्या शेवटच्या कालखंडात चित्रपट क्षेत्रात उतरलेले वाल्ट डिस्ने यांनी कार्टून चित्रपटांच्या निर्मितीत फार मोठा पल्ला गाठला. आबालवृद्धांचे मनोरंजन करणारे चित्रपट म्हणून अजूनही कार्टून चित्रपटांची निर्मिती होत आहे.
या लघु चित्रपट क्षेत्रातील अजून एक मोठे नाव म्हणून नॉर्मन मॅक्लरिनचे (1914-1987) घेता येईल. प्रायोगिक व चमत्कृतीयुक्त लघु चित्रपट निर्मितीत नावाजलेल्या या स्कॉटिश दिग्दर्शकाने पहिल्यांदा लंडनमधून व नंतर कॅनडामधून चित्रपटांची निर्मिती केली. तो प्रयोग म्हणून कॅमेराचा वापर न करता फिल्मवर डायरेक्ट चित्रमालिका काढून चित्रपट तयार करत होता. ध्वनीमुद्रणासाठीसुद्धा फिल्मच्या कडेला असलेल्या ध्वनीपट्टीवर रेघोट्या मारून ध्वनी उमटवित होता. त्यामुळे त्याचे चित्रपट अगदीच वेगळ्या प्रकारचे वाटत होते. काही चित्रपटामध्ये संगीताचा एखादा तुकडा घेवून त्यानुसार रेषाची हालचाल चित्रित करत होता.

त्यानी दिग्दर्शित केलेल्या ‘नेबर्स’ या लघु चित्रपटाचे कथानक असे आहेः
photo 1
एका विस्तीर्ण मैदानात दोन घरे. तेथे शेजारी शेजारी दोघे राहतात. आरामखुर्चीवर बसून पेपर वाचत असतात; चिरूट ओढत असतात; एकमेकाकडे बघून हसत असतात. त्तितक्यात तेथेच जवळपास एक फूल उमलते. दोघानाही ते फूल आवडते. ते दोघेही त्यावर मालकी हक्कासाठी भांडू लागतात; कुंपण घालू इच्छितात; हमरीतुमरीवर येतात; धक्काबुक्की करतात; रक्तबंबाळ होतात व शेवटी मरून जातात. मग तेथेच त्यांचे दफन होते व त्यांच्या थडग्यावर दोल फुलं उमलतात.

.....शेजाऱ्यावर प्रेम करा हा संदेश जगातील प्रमुख अशा सोळा भाषेत पडद्यावर झळकतो. व चित्रपट संपतो.
कथानकाची शैली नीतीकथा सांगितल्यासारखी आहे. यातील दोघेही एकमेकाच्या प्रतिबिंबासारखे दिसतात. हालचाली हुबेहूब करत असतात. व्यंगचित्राप्रमाणे दृश्यांचे चित्रीकरण केलेले असल्यामुळे चित्रपटाच्या संदेशाला वेगळा परिमाण लाभला आहे. मानवतेचे मूल्य रुजविणारा शेजाऱ्यावर प्रेम करा हा संदेश. सर्व भाषेमध्ये सर्व समाजामध्ये गेली हजारो वर्षे सांगितले जात आहे. परंतु हे मूल्य अजूनही प्रत्यक्ष कृतीत उतरले नाही. जात, धर्म, वर्ण, वर्ग वा सीमा इत्यादीसारखे काही तरी निमित्त पुढे करून व्यक्ती-व्यक्तीत, समाजा-समाजात, राष्ट्रा-राष्ट्रात तेढ निर्माण केली जात आहे. दिग्दर्शकाचा हा लघु चित्रपटसुद्धा मानवी विद्वेषाच्या अंतिम परिणामाची झळक दाखविणारा छोटासा प्रयत्न आहे.

याच दिग्दर्शकाचे ‘पा दे द्यू’ हाही एक गंमतीशीरपणे चित्रित केलेला लघु चित्रपट आहे. कॅनडातील बॅले नृत्यप्रकारात प्रसिद्धीच्या शिखरावरील मर्सियर् व विन्सेंट वारेन यांच्या द्वंद्व नृत्याची पार्श्वभूमी या चित्रपटाला लाभली आहे. संपूर्ण चित्रपटाला गडद काळ्या रंगाची पार्श्वभूमी आहे. त्यावर अगदी काळजीपूर्वकपणे नियंत्रित केलेल्या प्रकाश व्यवस्थेत शरीररेखा चमकत जातात. संपूर्ण चित्रपटात मानवीशरीराच्या सौंदर्याचे आस्वाद घेणाऱ्या डोळ्यातून शरीररेषेचे विणकाम आपल्यासमोर उभे केले जाते.

photo 2

सुरवातीला एकटा पुरुष नृत्य करत स्वमग्न अवस्थेत आपले नृत्यवैभवाचे प्रदर्शन करतो. हाताच्या, पायाच्या व शरीराच्या हालचालींचा वेग वाढत वाढत एकाचे दहा दहा प्रतिमा दिसू लागतात. बघता बघता बासुरीचे स्वर उमटत असताना दुसऱ्या कोपऱ्यात अजून एक प्रतिमा दिसू लागते. ती स्त्रीप्रतिमा पुरुष प्रतिमेबरोबर नृत्याच्या हालचाली करू लागते. तिच्या चलनेच्याही अनेक प्रतिमा दिसू लागतात. त्या दोघांनी उचललेल्या हाताच्या, पायाच्या, शरीराच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या मोहक हालचाली व त्याला अनुसरून दिलेले पार्श्वसंगीत इत्यादीमुळे चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या अनुभवविश्वात नेवून ठेवतो. प्रतिमा मुद्रेचे हे तंत्र सूक्ष्मगणिताच्या आधारे स्टुडियोतच चित्रित केलेले असले तरी या तंत्रावर प्रेक्षकाचे लक्ष जाणार नाही याची किमया दिग्दर्शकाला साधली असून एका वेगळ्या पुरुष-प्रकृती या आदिम अनुभवातून प्रेक्षकांना तो घेऊन जातो.

ग्लॅस्गो स्कूल ऑफ आर्ट येथे शिक्षण घेतलेला मॅक्लरिन मुख्यतः नॅशनल फिल्म बोर्ड ऑफ कॅनडासाठी चित्रपटांची निर्मिती करत होता. त्यानी सुमारे 60 लघु चित्रपटांची निर्मिती केली. त्यात ‘फँटसी’ (8 मिनिटे) ‘ऱ्हिदमिक’ (9 मिनिटे), व ‘ए चेअरी टेल’ (10 मिनिटे) अत्यंत गाजलेले चित्रपट आहेत. डॉक्युमेंटरी टाइप चित्रपटात लंडन पोस्ट ऑफिससाठी त्यानी चार चित्रपटांची निर्मिती केली. फिल्मवर हातानी कोरलेले, दृश्य-संगीत, ग्राफिकल ध्वनी, अमूर्त, पिक्सिलेशन असे विविध तंत्र वापरून त्यानी चित्रपटांची निर्मिती केली. मुख्यतः या चित्रपटामधून मानवीयतेला पूरक असे संदेश देण्याचा प्रयत्न त्यानी केला. युनेस्कोच्या वतीने तो भारतातही Animationचे तंत्र शिकविण्यासाठी काही काळ आला होता. त्याच्यावर McLaren's Negatives हा चित्रपटही काढण्यात आला.
वयाच्या ७३व्या वर्षी वृद्धाप्यामुळे त्याचा मृत्यु झाला.

चित्रपटासाठी येथे क्लिक करावेः
Neighbours
https://www.youtube.com/watch?v=e_aSowDUUaY

Pas De Duex
https://www.youtube.com/watch?v=WopqmACy5XI

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

दोन वेगळ्या चित्रपट कल्पना आहेत. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0