क्लोझो दिग्दर्शित ‘वेजिस् ऑफ फीअर’

France-Italy Joint/ 1935/ B&W/ 127 Min/Dir: H.G. Clouzot

1930च्या सुमारास जेव्हा चित्रपट ‘बोलू’ लागले तेव्हा युरोपमधील अनेक सिनेमा कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला. कारण ध्वनीतंत्रज्ञानाची पूर्ण मक्तेदारी अमेरिकन कंपन्यांच्याकडे होती. कंपन्या सांगतील त्या किंमतीत ध्वनीयंत्रणा विकत घेणे भाग पडत होते. कारण, काही अपवाद वगळता, मूकचित्रपटांकडे प्रेक्षकाने पाठ फिरविली होती. त्यामुळे, आवडो न आवडो, अनेक युरोपियन फिल्म मेकर्सना इतर देशाशी भागिदारी करून भांडवल उभे करावे लागत होते. भांडवल वसूलीसाठी बहुभाषेत ध्वनीमुद्रण करावे लागत होते. अशाच प्रकारच्या भागिदारीत निर्मित झालेला ‘वेजिस् ऑफ फीअर’ हा चित्रपट त्या काळी (व नंतरही) इतिहास घडविला. तसे पाहता ‘वेजिस ऑफ फीअर’ या चित्रपटाचा फिल्म मेकर, हेन्री जॉर्जेस क्लोझो (1907-1977) त्याकाळच्या इतर फिल्म मेकर्सच्या तुलनेने फार उत्कृष्ट होता असे नव्हे. परंतु चित्रपटाची भाषा व सादरीकरण यात तो फारच निष्णात होता. प्रेक्षकांची नस त्यानी पूर्णपणे ओळखली होती. त्यामुळे त्या युद्धकाळात प्रेक्षकांचे हमखास मनोरंजन करू शकेल अशा उत्कृष्ट भयपटांची निर्मिती केली. प्रेक्षकांना पूर्ण वेळ खुर्चीला खिळवून टाकणाऱ्या कौशल्याच्या जोरावर व त्या काळच्या राजकीय परिस्थितीवर कुठलेही भाष्य न करता पुढे काय होणार याचे उत्कंठापूर्वक वाट बघायला लावणारा हा चित्रपट मैलाचा दगड समजला जातो.

photo 1

तसे पाहिल्यास चित्रपटाची कथा फार गूढ वा अंगावर शहारे येणाऱ्या (हिचकॉक टाइप) प्रसंगानी भरगच्च भरलेले असे काही नाही. दक्षिण व उत्तर अमेरिकेच्या मध्यावर कुठेतरी असलेल्या एका घाणेरड्या लास पेड्रॉस या गावात घडलेली गोष्ट. चारी बाजूला लांबवर पसरलेल्या वाळवंटातील हे एक गाव. फक्त छोट्या विमानातूनच बाह्यजगाशी संपर्क. मुळात या गावात राहणारी माणसं कसे तरी करून लवकरात लवकर हे गाव सोडून जाण्याच्या बेतात असतात. परंतु बेकारीमुळे विमानाचे भाडे देण्याइतपतसुद्धा कुणाजवळही पैसे नसतात. बहुतेक जण तेथून 300 मैलावर असलेल्या पेट्रोलियम विहिरीमध्ये नोकरी लागून पैसे कमावता येईल या आशेने आलेले असतात. त्यामुळे त्या छोट्या गावातील एकमेव हॉटेल हा वेगवेगळ्या देशातून आलेले गुन्हेगार, लुच्चे, लफंगे, भामटे, बेकार व वेळ जाण्यासाठी मजा करणारे छैलछबीले आदींचा अड्डा असतो. गावात एक धड रस्ता नाही, स्वच्छता नाही, रस्त्यावर गाढव – डुकरांचा सतत वावर. एका हॉटेलच्या समोर बसून टिंगल टवाळी करण्यात हे सर्व बेकार वेळ घालवत असतात. असे हे गाव खास पेट्रोलियम कंपनीसाठी वसलेले गाव असते.

या गावातील फ्रान्सहून आलेले मारिय़ो व जो, जर्मनीहून आलेला बिंबा व इटलीहून आलेला लुइगी यांच्या भोवती विणलेली ही कथा आहे. तरण्याबांड प्लेबॉय मारियोवर तेथील हॉटेलमध्ये काम करणारी लिंडा एकतर्फी फिदा झालेली असते. परंतु मारियो तिला रिस्पॉन्स देत नसतो. मारियोच्या खोलीत त्याच्या बरोबर राहणारा लुइगी मौजमजेची आवड असलेली अत्यंत कामसू व्यक्ती. मारियो व जो पॅरिसहून आलेले असल्यामुळे त्यांची दोस्ती. वयोमानाने थकलेल्या जोच्या पुफ्फुसात सिमेंटची धूळ गेल्यामुळे तो कॅन्सरग्रस्त पेशंट. डॉक्टरानी फक्त आठ-नऊ महिन्याचे आयुष्य आहे असे सांगितलेले असते. त्यामुळे तेथून बाहेर पडण्यासाठी अगदी घायकुतीला आलेला हा लुइगी. जो हा एकेकाळचा गँगस्टर. जोच्या तिरसठ स्वभावामुळे तेथील अड्ड्यावरील बेकार त्याच्याकडे खुनशी नजरेने बघत असतात. बिंबा हा गंभीर प्रकृतीचा, जास्त न बोलणारा. जर्मनीतील नाझींच्या छळामुळे त्याच्या वडिलांचा मृत्यु झालेला असतो. व हा स्वतः तीन वर्षे मिठाच्या खाणीतील शिक्षा भोगून येथे आलेला असतो.

एके दिवशी अचानकपणे अमेरिकन कंपनीच्या तेलाच्या एका विहिरीला आग लागते. आग विझत नसल्यामुळे आग इतर विहिरीवर पसरू नये यासाठी आग लागलेल्या विहिरीत स्फोट घडवून विहिर बुजवून टाकण्याचा निर्णय तेथील व्यवस्थापन घेते. स्फोट घडविण्यासाठी नायट्रोग्लिसरिनची जरूरी भासते. परंतु नायट्रोग्लिसरिनचा साठा त्या गावात असतो. जेरीकॅनमध्ये भरलेल्या या विस्फोटकांला खाच खळगे, दरी खोऱ्यातून मोठ्या ट्रकमधून नेण्यासाठी चार ड्रायव्हर्सची गरज असते. थोडेसे दुर्लक्ष झाले तरी नायट्रोग्लिसरिन वाटेतच ट्रकसकट जळून खाक होण्याची शक्यता माहित असूनसुद्धा जिवावर उदार होऊन ड्रायव्हिंग करावे लागणार होते.

कंपनीचा फोरमन, बिल ओ ब्राइन गावातील इच्छुक लोकामधून चार जणांची निवड करतो. ही एक अत्यंत धोकादायक मोहिम आहे हे माहित असूनसुद्धा दोन हजार डॉलर्ससाठी (व तेथून कायमचे बाहेर पडण्यासाठी) सर्व इच्छुक उत्सुक असतात. दोन हजार डालर्स म्हणजे त्यांच्यासाठी मोठी लॉटरीच. याच पैशातून कायमची मुक्ती असे स्वप्न बाळगून ते तयार होतात.

मारियो, बिंबा, लुइगी व स्मेर्लॉफ या चौघांची निवड होऊन दुसऱ्या दिवशी येण्याचे ऑर्डर बिल देतो. जोची निवड न झाल्यामुळे तो बिलपाशी तक्रार करतो. बिलचे व जोचे पूर्वीच्या काळ्या व्यवहारातील मैत्रीमुळे बिल स्मेर्लॉफ न आल्यास जो मोहिमेवर जाईल असे आश्वासन देतो. ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी स्मेलॉर्फ वगळता तिघेही येतात. स्मेर्लॉफ न आल्यामुळे जोला निवडले जाते. स्मेर्लॉफ नाहिसे होण्यात जोचा हात असावा असे इतरांना वाटते.

जो आणि मारियो एका ट्रकमध्ये व लुइगी व बिंबा दुसऱ्या ट्रकमध्ये व धोका पत्करू नये म्हणून एका मागून एक असे अर्ध्या तासाच्या अंतराने जायचे असे ठरते. अगदी पहिल्या काही क्षणातच खराब रस्त्यामुळे व भल्या मोठ्या ट्रकमधील धोकादायक स्फोटकांचे जेरीकॅन घेऊन जाणे अत्यंत धोकादायक असूनसुद्धा ट्रक हळू हळू जाऊ लागतात. एके ठिकाणी रस्त्याची रिपेरी चालल्यामुळे ट्रक वळवून पुढे जाण्यासाठी लाकडी फळ्या टाकलेल्या तात्पुरत्या रस्त्यावरून ट्रक घेऊन जावे लागते. अशा कठिण प्रसंगी माणसाची कसोटी लागते. जो कितीही बढाया मारत असला तरी भलताच भ्याड असतो. ऐन मोक्याच्या वेळी इतरांना तो मदत करू शकत नाही. वाटेत लुइगी व बिंबाचा ट्रक विस्फोट होऊन जळून खाक होतो व बिंबा, लुइगींचा त्यात अंत होतो. कसेबसे मारियो व जोंचा ट्रक तेलाच्या विहिरीजवळ पोचत असताना रस्त्यावर पडलेल्या तेलाच्या चिखलात ट्रक रुततो. विहिरीच्या अगदी जवळ पोचलेले असल्यामुळे तेथील सर्व जण त्यांचे अभिनंदन करू लागतात. जो खाली उतरून वाटेवरील झाडांची फांद्या बाजूला काढत चाकाखाली टाकून ट्रक पुढे नेण्यास सांगत असताना तो तेलाच्या डबक्यात पाय घसरून पडतो व मारियोला ट्रक नियंत्रित न करता आल्यामुळे जोच्या अंगावरून ट्रक जातो. मारियोला फार वाईट वाटते. तो फार थकलेला असल्यामुळे मूर्छित होऊन पडतो. त्यातून जागा झाल्यानंतर मित्राचेही पैसे घेऊन परतीच्या वाटेवर त्याच ट्रकने येऊ लागतो. आता कुठलीही भीती नसल्यामुळे खुषीत ड्रायव्हिंग करत येत असतो. याच्या परतीची बातमी गावात कळते. हॉटेलमध्ये सर्व जण डान्स करून आनंद व्यक्त करत असतात. दोनेक तासात मारियो येणार म्हणून लिंडासुद्धा डान्स करत असते. मृत्युला अनेक वेळा फसवल्याच्या आनंदात मारियो ड्रायव्हिंग करत असताना एका निसटत्या क्षणी ट्रकवरील ताबा सुटल्यामुळे ट्रक खोल दरीत पडतो व त्यातच मारियाचा अंत होतो.

त्याकाळी एका गाजलेल्या कादंबरीवरून क्लोझो यानी हे कथानक घेतलेले असले तरी त्यात भरपूर बदल त्यानी केले होते. दृश्यमाध्यमाला योग्य वाटेल तसे त्यात त्यानी बदल केले होते. यातच दिग्दर्शकाची प्रतिभा जाणवते. हा चित्रपट बघत असताना एका भाषाकृतीवर ते बेतलेले आहे हेसुद्धा लक्षात येत नाही.
चित्रपटाचा सुरुवातीचा भाग बघत असताना आपण एखादी डॉक्युमेंटरी तर बघत नाही ना असा भास होतो. त्या गावाची भयाणता, गरीबी, बेवारशी-बेकारांची फौज, तेथील काळाबाजार, अमेरिकन कंपन्याचे शोषणाच्या तऱ्हा, प्रेम, मैत्री, वैरत्व, प्रेमप्रकरणातून लैंगिक शोषण... असे सर्व प्रकार पडद्यावर दिसतात. परंतु नंतरचा भाग मात्र प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीला खिळवून टाकणारा. प्रत्येक फ्रेम न् फ्रेममधून उत्कंठा शिगेला पोचविणारा. वास्तवात घडलेली गोष्ट की काय असे चित्रपट बघताना वाटू लागते. भयंकर रोमांचकारी असे वाटत असतानाच एखाद्या दुःखांत काव्यासारखे चित्रपट पुढे पुढे सरकत जाते. काही तरी संदेश देत आहे किवा कुठल्यातरी उपदेशाचे डोज पाजत आहे असले कुठलेही अभिनिवेश न बाळगता कथानकाचे पदर उलगडत गेले आहेत. भयानक व भणंग परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी माणूस कसला धोका पत्करू शकतो याचे सुरेख चित्रण आपल्याला या चित्रपटात बघायले मिळते. माणूसच माणसाचा बळी घेत स्वार्थ साधण्यासाठी कुठल्या थराला तो जाऊ शकतो व या हिंस्र समाजाला त्याचे काहीही वाटू नये याचे आपल्याला आश्चर्य वाटू लागते. माणसातील दुर्दम्य आशा व त्यासाठी तो पत्करत असलेले साहस व धोका याचा दृश्यानुभव घेत असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या प्रतिभेचे कौतुक करावेसे वाटते. दिग्दर्शक आपल्यासमोर जीवनाचा एक तुकडा ठेवत आहे की काय असा भास होतो. चित्रपटांच्या अभ्यासकांसाठी हा एक मॉडेल चित्रपट म्हणून अजूनही जगभर दाखवत असतील.

क्लोझो यानी या चित्रपटानंतर डायबॉलिक्स (Les Diaboliques) नावाचा अजून एक भयपट दिग्दर्शित केला. त्याच्या द मिस्टरी ऑफ पिकॅसो या डॉक्युमेंटरीला फ्रेंच गव्हर्नमेंटचे पारितोषक मिळाले.

1977 साली हृदयाघाताने तो मरण पावला.

या चित्रपटासाठी खालील लिंकवर क्लिक करावेः
https://www.dailymotion.com/video/x6jg3bu

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मी आपण लिहिलेली चित्रपट परिक्षणे आवडीने वाचत आहे.
पण ह्या चित्रपटाची "डेली मोशन" ची लिंक मला माझ्या पीसी मध्ये मिळत नाही. हा यूट्यूब वर नाहीये का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात वरील डेलीमोशन लिंक चालते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

धन्यवाद. अगदीच प्रयत्न फोल गेले नहीत. यूट्यूबवर लिंक मला मिळाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0