Thought Experiment No 2

सकाळची वेळ.
साहेब आणि बाईसाहेब नाष्टा करत होते. रोबोटिक वॅक्युम क्लीनर बेडरूम झाडत होता. रात्रीची उष्टी भांडी डिशवॉशरने रात्रीच स्वच्छ करून ठेवली होती. टोस्टरने ब्रेड भाजून ठेवले होते. कॉफी मेकरने कॉफी तयार केली होती. बाईसाहेबांनी नाश्ता मांडला होता.
पण मला वाटतं दोघांचेही खाण्यात लक्ष नव्हते. एक अनामिक ताण होता दोघांच्या मनावर.
शेवटी साहेबांनी शांततेचा भंग करत म्हटलं, “अनु, आता तू काय करणार?”
“काय करू? तूच सांग. आज पहिलाच दिवस होता. आणि हे असं.”
“तू एचआरला फोन करून रिक्वेस्ट करून बघ. अजून चार पाच दिवसांची सवड मिळाली तर. तसे चांगले आहेत ते लोक. मी करू का फोन? तसा तो मला बराच सिनिअर आहे. आमच्याच इन्स्टिट्यूटचा पास आउट आहे.”
अनूला अजयचा स्वभाव माहित होता. त्याच्या स्वभावात कुणाला रिक्वेस्ट बिक्वेस्ट करणं बसण्यासारखं नव्हतं.
स्वतःचे ओझे स्वतः वाहायला पाहिजे. नाही का!
तिनेच हट्ट धरून पुन्हा नोकरी करायचा निर्णय घेतला होता.
पण त्या आधी अपूर्वची काहीतरी व्यवस्था करायला पाहिजे होती.
“नको. तू फोन केलेलं बरं दिसणार नाही. मीच करेन.”
काय बोलायचं कस बोलायचं. मनातल्या मनात ती शब्दांची जुळवाजुळव करत होती.
“कॉफी गार होतेय, अनु.”
“आपण मराठी पेपरमध्ये जाहिरात द्यायला पाहिजे होती.”
“तू इतकी निराश होऊ नकोस. होईल काहीतरी व्यवस्था होईल.”
अप्पूला क्रेशमध्ये ठेवायचा हा एक ऑप्शन होता. पण अनूला तो मान्य नव्हता. तिला पाहिजे होती आज्जी. अप्पूची काळजी घेण्यासाठी. तिला स्वतःच्या बालपणाची आठवण येत असे.स्वतःची आज्जी आठवायची. पऱ्यांच्या, जादूगारांच्या, राजपुत्रांच्या, भुतांच्या गोष्टी सांगणारी. कुशीत घेऊन अंगाई गाणारी. मिळेल का अप्पूला अशी आजी? बोट धरून कल्पना विश्वाची सैर करून आणणारी. अनूला नॅनी नको होती, आज्जी पाहिजे होती. अप्पूच्या नशिबात असेल तर मिळेल.
“मी एचआरला फोन करते. लेट मी ट्राय माय लक.”
तिने नंबर शोधून काढला. रिंग करणार तोच दारावरची बेल वाजली.
“मी बघतो.” अजय उठून दरवाजा उघडायला गेला.
दरवाजा उघडला तर समोर आज्जी उभी. म्हणजे मला काय म्हणायचे आहे कि आज्जी सारखी दिसणारी म्हातारी उभी होती.
“?”
“अजय देशमुख इथेच राहतात काय?” तिने खड्या आवाजात विचारले. म्हातारी होती पण आवाज एकदम खणखणीट बंद्या डॉलरगत.
“होय, मीच अजय देशमुख. काय काम होतं तुमचं?”
म्हातारीनं मळक्या पिशवीतून इंग्रजी पेपराचं पान काढलं. त्यावर कोणीतरी अजयने दिलेल्या जाहिरातीच्या चोहोबाजूने लाल शाईचा चौकोन गिरवला होता. आज्जीने तो पेपर पुढे केला.
“हो हो. आम्हीच ती जाहिरात दिली होती. तुम्ही त्याच्यासाठी आला आहात का?
तुम्हाला इंग्रजी येत?”
“मला मेलीला विंग्रजी कसं येणार? मराठी पण वाचता येत नाय. आमच्या शेजारच्या खोलीत अन्ना आहे ना. त्याने मला दाखवली. म्हणाला जा म्हातारे जा. तुझ्या जोगतं काम हाय बग.”
त्यांचे संभाषण ऐकून अनु पुढे आली. “अहो, तिला आय मीन त्यांना आत यायला तरी सांगा. दारात काय उभं करून ठेवताय.” अनु तिऱ्हाइतासमोर नवऱ्याला अहो जाहो करते.
“अग, तू मला मुलीसारखी. एकेरीत बोललीस तरी बिघडत नाही हो. मी मनावर नाही घेणार.”
अजयने एक खुर्ची बसायला दिली.
“नाव काय तुमचे? कुठे रहाता? काही कागद आहेत. तुमच्याकडे?”
“अन्ना बोललाच होता.” आज्जीने प्लास्टिकच्या पिशवीत स्टेपल केलेलं कार्ड अजयला दिल.
“काय आहे हे?”
“हे? तुम्हाला नाय माहित? ह्याला म्हनत्यात रेशान कार्ड. माझे नाव सगुणा. सगुणा शेळके. रहाणार बोराटे वस्ती. रेलवे यार्डाच्या पल्याड.” एव्हढी ओळख तिच्या दृष्टीने पुरेशी होती.
अजयने मोबाईल काढला. गूगल मॅपवर चेक केलं.
“ओ माय! बोराटे वस्ती येथून सात किलोमीटर आहे.” त्याचा उत्साह मावळला.
“तुम्ही रोज येणं जाणं कस करणार?”
“अहो सत्त्यात्तर नंबरची बस आहे ना. ती आमच्या वस्तीवरून जाते. तीच पकडून आले मी.”
पुन्हा डबल सत्त्या! च्यायला ह्या सत्त्याच्या.
अजय अनुच्या जवळ सरकला. दोघांचे हलक्या आवाजात इंग्रजीत बोलणं झालं.
नीट ऐकू आलं नाही पण मला वाटतं कि एकंदरीत त्यांना आजीबाई पसंत पडल्या असाव्यात.
“आज्जी, ही माझी पत्नी अनुराधा. आम्ही दोघेही नोकरदार लोकं आहोत. आमच्या मुलाचं नाव अपूर्व. अप्पू म्हणतो आम्ही त्याला. इतके दिवस ही नोकरी करत नव्हती. पण आता पुन्हा करणार आहे म्हणतेय. आजच पहिला दिवस आहे.”
“तुमचे काम आहे आम्ही संध्याकाळी घरी परत येईस्तो त्याला सांभाळायचे. प्रेमाने. जमेल?”
“प्रेमाने. सांभाळणार. अगदी प्रेमाने. स्वतःच्या नातवासारख.” आज्जी उत्तरल्या.
“आम्ही तुम्हाला महिना दहा हजार देऊ. एव्हढ्यात जमेल का अजून पाहिजेत? मोकळ्या मनाने सांगा.”
“बख्खळ झाले.”
“आणि अप्पूचं आणि तुमचं जमलं तर मग वाढवून पण देऊ. काय?”
“अप्पू मोठा गोड मुलागा आहे. कधी हट्ट करत नाही, रडत नाही. त्याला चॉकलेट आवडत नाहीत. आम्ही देत पण नाही. दात किडतात ना. कधी वडा पाव खायचा हट्ट करतो. ते पण कसं देणार? कुठे बनवतात, कुठलं तेल वापरतात, तेच तेल पुन्हा पुन्हा उकळून त्यातच भजी, त्यातच वडा तळतात. कसे द्यायचे त्याला. हो की नाही हो आजी? अहो, मी वर जाऊन अप्पूला आजीबाई बद्दल सांगून येते.”
अप्पूची झोपायची खोली वर असणार. अनु तिकडे गेली.
“आजी, अप्पूचा ब्रेकफास्ट इथे बाउल मध्ये काढून ठेवला आहे. त्याला हे केलॉगचे कॉर्नफ्लेक्स खूप आवडतात,”
आजीने बाउल बघितले. बाउल रिकामे होते. तिला हसू आले. अप्पूच्या बाबांना काही सांगायची गरज नव्हती.
अजयने फ्रिज उघडून त्यातून दुधाचा टेट्रापॅक काढून डायनिंग टेबलावर ठेवला, “हे दूध. मिक्स करून त्याला द्यायचे. आज्जी तुम्हाला गॅस सांभाळता येईल ना? इथे चहाचे सामान आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा तलफ येईल तेव्हा करून घ्या.”
“थॅंक यू.” आजीने सफाईदार इंग्लिशमध्ये आभार मानले.
अजय चमकला. पण विचार करायला वेळ नव्हता.
अनु खाली आली, “मी अप्पूला समजाऊन सांगितले आहे. तो येईल थोड्याच वेळात खाली.”
पुन्हा एकदा सगळी उजळणी झाली, अप्पूला हे आवडतं, ते आवडतं, त्याला टीवीचे कुठले चॅनल आवडतात, कुठल्या टाइपच्या गोष्टी आवडतात, कुठली गाणी आवडतात. अप्पुचा दुपारच्या खाण्याचा डबा कुठे ठेवला आहे ते दाखवून झालं.
“त्याला स्केरी भुतांच्या कथा नाही आवडत, त्याला इसापनीती, बिरबल-बादशहा, शिकारी शंभू, त्या टाईपच्या गोष्टी आवडतात. बाहेर जाऊन मुलांच्यात खेळायला पण आवडत नाही...”
आज्जीबाईना एकूण परिस्थितीची कल्पना आली. “बिच्चारा अप्पू.” त्या स्वतःशी पुटपुटल्या.
“आमचा अप्पू खूप गमतीदार मुलगा आहे बरका. लहर आली की मधेच लपून बसतो. घरभर शोधलं तरी सापडत नाही. काळजीनं जीव हैराण करतो. मग एकदम दरवाज्याच्या मागून येऊन हाक मारतो “आई!”” अनु मुलाचे कवतिक सांगत होती. आजीला वाटले की दोघांना तिच्या बरोबर खूप गप्पा मारायच्या असाव्यात.
पण दोघांची ऑफिसला जायची वेळ झाली असावी. अजयने टायची गाठ व्यवस्थित केली. अनुने आपला ड्रेस व्यवस्थित आहे कि नाही ते बघून घेतले. मेक अपचा हलकासा वापर करून चेहरा उणे अधिक करून घेतला.
ऑफिसला जाणार पण दरवाज्यात पाय अडखळले. दोघे एकमेकांशी इंग्रजीत हलकेच बोलले. बोलावे कि न बोलावे अशी द्विधा मनस्थिती झाली. अखेर अजयने पुढाकार घेतला, “आज्जी, एक सांगायचे राहिलेच की. अप्पू आहे ना तो आमचा मानलेला मुलगा आहे. तुम्हाला सांगावे कि नाही? आमचे ठरत नव्हते. पण मला वाटत हे तुम्हाला माहित असणं चांगलं. म्हणजे तुम्ही त्याला हॅडल करू शकाल. म्हणून मी मघा तुम्हाला सांगितले कि त्याला प्रेमानं सांभाळायचं आहे.
“मानलेला मुलगा? हो हो. मानलेला मुलगा! आता समजलं.” आजीच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. “अहो मी पण खरी आजी थोडीच आहे? मी पण मानलेली.”
अजय आणि अनु समाधानाने घराबाहेर पडले. एक मोठी काळजी मिटली होती.
अप्पू खाली यायला अजून वेळ होता. म्हातारीने आजूबाजूला नजर फिरवली. घरात सगळं काही होत. उच्च वर्गीय लोकांच्या घरात जे काय असायला पाहिजे होत ते सर्व.
चांगला दोन मजली बंगला होता. आजीने घरभर हिंडून घर बघून घेतले. खालच्या मजल्यावर ड्राइंगरूम होती. किचन होतं. बाजूलाच एक लहानसं देवघर होतं. चांदीचे देव होते. गणपतीची मूर्ती आणि राम पंचायतन. वरच्या मजल्यावर जिम आणि होम थिएटर होते. एक बेडरूम होती. हीच ती अप्पूची खोली असणार.
हे एवढे मोठे घर, किमती वस्तू इकडे तिकडे पडलेल्या. आणि ही नवरा बायको चक्क माझ्यावर भरवसा टाकून निघून गेले?
मी कोण? कुठून आले? येऊन अर्धा एक तासही झाला नव्हता. कोणी दुसरी असती तर घर धुवून नेलं असतं म्हणजे मग? सख्या भावावरही कोणी विश्वास ठेवत नाही आजकाल. कमाल आहे ना.
आजी अशी विचारात गढली असताना जिन्यावर पावलांचा आवाज झाला.
“ए आज्जी, कुठे आहेस तू? दिसत का नाहीस?”
शुअरली धिस मस्ट बी अप्पू!
“अप्पू जरा दिमागपे जोर दो. म्हणजे मी दिसेन.”
आजीने पण जोर लावला. एक्टोप्लास्म रिलीज व्हायला थोडा वेळ तर लागणारच.
दोघांना एकमेकांचे दर्शन झाले.
अप्पू जिन्याच्या कठड्यावरून घसरत खाली आला.
उड्या मारत मारत आजीपाशी आला. स्वतःभोवती गिरकी मारून तो डायनिंग टेबलापाशी आला.
“आजी, किती वाट पहायला लावलीस. म्हणतात ना देरसे आयी, दुरुस्त आयी. आई, बाबा, आई आई, बाबा करून कातावलो होतो बघ. आज्जी तू छान छान गोष्टी सांगशील न?”
“तुझ्या आईने मला सांगितलय कि तुला इसापनीति, अकबर- बिरबल अश्या टाईपच्या गोष्टी आवडतात म्हणून.”
“व्हाट नोंन्सेन्स! मी काय कुकुलबाळ आहे? असल्या काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकायला? आईने अजून पण काही सांगितले असेल ना कि मला चॉकलेट आवडत नाही. मला वडापाव आवडत नाही. मी ऐकलं आज्जी तू म्हणालीस ना, “बिच्चारा अप्पू.” ते अगदी खरं आहे. मला अळणी करून टाकलं आहे, टेस्टलेस, कलरलेस, ओडरलेस नैट्रोजन वायू!”
“अप्पू, आपला प्रॉब्लेम काय आहे कि आपलं अस्तित्व इतरांवर अवलंबून आहे. अप्पू, युअर पेरेंट्स थिंक देअरफर यु आर! माय प्रोजेक्ट कोओर्डीनेटर थिंक्स देअरफर आय अॅम. त्यांनी विचार करायचे थांबवलं की आपले आयुष्य संपले. इतरांच्या विचारात आपण जन्म घेतो, वाढतो, जगतो आणि मरतो.”
मग आज्जीने जादूच्या पोतडीतून चोकलेट, वडापाव, कोकाकोला, कांदाभजी असे निषिद्ध प्रतिबंधित प्रकृतीला अपायकारक आणि म्हणूनच चविष्ट पदार्थ आणि पेये काढली. दोघांनी त्याच्यावर ताव मारला.
“अप्पू, ही भजी आमच्या बोराटे वस्तीच्या नाक्यावरच्या तुक्याने बनवली आहेत. नाक्यावर त्याचा चहाचा ठेला आहे. अरे काय भाजी बनवतो. कांद्याची बटाट्याची पालकाची मिरचीची मुंगची अहहा. ह्या तुमच्या कॉलनितले लोक ड्रायव्हरला पाठवून मागवून घेतात.”
एव्हढे ओरपल्यावर झोप तर येणारच. मग काय सगळया सजीव निर्जीव विश्वाला फाट्यावर मारून दोघेही मऊ मऊ गादीवर डाराडूर झोपी गेले.
संध्याकाळ झाली. अप्पुचे आई बाबा ऑफिसातून परतले.
तशी म्हातारीने आपली पोतडी उचलली, जायची तयारी चालवली.
“आज्जी, थांबा मी सगळ्यांसाठी चहा करते. चहा पिऊनच जा. लांब जायचे आहे ना,”
अनुने अप्पूला खाली बोलावले.
“अप्पू आज दिवसभर काय केले?”
“आज्जीने मला गोष्टी सांगितल्या. ‘निळा कोल्हा,’ 'सुसर आणि माकडाचे काळीज’, ‘दगडाचे सूप’, आणि गाणी पण गाऊन दाखवली. ‘ये रे ये रे पावसा,’ ‘माशी ग माशी शी शी शी...;
“वा छान. माझं गोड बाळ ते.” अनुला प्रेमाचे भरते आले.
चहा पिऊन झाल्यावर आजी निरोप घेऊन निघाली.
अजय विचार करत होता.
आज्जी खांद्यावर पिशवी दुडक्या चालीने चालत राहिली.
“अजय, तू कसला विचार करतोयस?” अनुने विचारले.
“अनु, मी आजीबाईचा विचार करतो आहे. बिचारी चालत चालत बसस्टॉप पर्यंत जाणार. बसला मरणाची गर्दी. त्यात त्या म्हातारीचा कसा निभाव लागणार? कठीण आहे.”
“खर आहे अजय. पण आपण तरी कुणा कुणाचा विचार करणार.”
अजयने आजीबाईचे विचार झटकून टाकले. आणि ब्रेकिंग न्यूज ऐकण्यासाठी टीवी ऑन केला.
चालता चालता म्हातारी जागेवर थबकली. आजचे काम संपले आहे ह्याची तिला जाणीव झाली.
बघता बघता हलकेच हवेत विरून गेली.
रात्रीचे नऊ साडे नऊ वाजले असावेत.
म्हातारीचा फोन घणघणला.
हेडऑफिसाकडून प्रोजेक्ट कोओर्डीनेटरचा फोन होता,
“हाय विच, यू देअर?”
“येस्स सर. बोला.”
“हे बघ लॉस अँजल्स वरून अर्जंट कॉल आहे. UCLA मेडिकल सेंटर मध्ये एक म्हातारी मरणासन्न अवस्थेत पडली आहे. मुलगा भेटायला येईल ह्या वेड्या आशेवर. प्राण एकवटून त्याची वाट पाहत आहे. तो कसा येणार? तो तर महिन्यापूर्वी युद्धात कामाला आला आहे. तुला तिथे तिचा मुलगा होऊन तिची भेट घ्यायची आहे. मग बिचारी सुखाने प्राण सोडेल.”
काम कठीण होतं. पण कुणीतरी करायला पाहिजे होतं.
“ओके डन. मुलाचे डिटेल्स पाठवा. एक मिनिट, त्याच्या डोळ्यांचा कलर RYB फॉर्मट मध्ये पाठवा. ते ह्यू, साच्युरेशन वगैरे मला काही समजत नाही. सर्व कलरइन्फो RYB मधेच पाठवा, प्लीज. मागल्या वेळ सारखी गफलत नको व्हायला. एक मिनिट अंकल...”
“माय डिअर सगुणा, सगू, कितीवेळा सांगितले तुला, अंकल मत कहा करो. अजून माझं लग्न पण झालं नाहीये.”
“लग्न? माझ्याशी करणार काय? तुला जी कुठली हिरोईन आवडते ती होईन.घाबरू नकोरे. उगीच गंमत केली. ओके, माय डिअर अन्अंकल माझ्या प्रमोशनचं काय झालं?”
“होणार, होणार. ह्या मार्चला तुझ्या हातात ऑर्डर पडेल.” प्रोजेक्ट कोओर्डीनेटरने घाईघाईने फोन बंद केला.
विचला हसू आलं. मार्च नुकताच संपून एप्रिल सुरु झाला होता.
म्हणजे प्रमोशन हातात यायला अजून थोSSडा वेळ होता.
म्हातारीच्या मुलाची डेटा फाईल येईपर्यंत वेळ होता. तो पर्यंत एक कटिंग मारायला. तिने म्हातारीचं रूपडं अंगावर चढवलं.
ती चाळीच्या खाली गेली. तुका ठेला बंद करत होता.
“ये म्हातारे, चहा पिणार ना.”
म्हातारी काही न बोलता बाकड्यावर टेकली.
“आता कुट जानार? रातची डूटी लागली जणू.”
तुका दिवसा ठेला चालवायचा आणि रात्री त्रस्तसमंध बनून पिंपळाच्या झाडावर चढून बसायचा. तिथून सर्व बोराटे वस्तीवर नजर ठेवायचा. त्याच्यामुळेच वस्तीत कधी दंगा धोपा झाला नाही.
युद्धात मारल्या गेलेल्या मुलाची फाईल येऊन पोहोचली होती.
चला आता उशीर करण्यात काही अर्थ नव्हता. चहा पिऊन निघावे झालं.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

अगदी फास्ट फॉरवर्ड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आभार.
मला काही कळल नाही. तरी देखील
आभार.
सध्या आपल्याला कोण प्रतिसाद द्यायचे कष्ट घेताहेत?
जो मिला वो मुकद्दर समज लिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जाणून वैज्ञानिक कथा प्रसंग भराभर पुढे सरकवला त्याअर्थी फास्ट फॉरवर्ड. कथा सरकती ठेवणे आणि एक गंमत सांगणे चांगले जमलं आहे. )
(या नावाचा एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता,आवडला होता आणि त्याच्या बऱ्याच नकला डान्स स्पर्धा, रिअलिटी शोजमध्ये होत असतात त्याच्याशी काही संबंध नाही.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही आज्जी म्हणजे सिंधूआज्जी तर नाही?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*********

बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?