मुगाच्या डाळीचे इन्स्टेंट सूप
एकदा एका मित्राच्या घरी मुगाच्या डाळीचे सूप प्यायला मिळाले. पातळ घोटलेली मुगाची डाळ त्यावर तूप आणि जिर्याची फोडणी. स्वाद चांगला होता. मुगाच्या डाळीत उत्तम प्रथिने असतात. पचायला ही हलकी असते. पण हॉस्पिटलवाल्या डाळीचा ठपका मुगाच्या डाळीवर लागलेला आहे. घरी कमीच बनते. मनात विचार आला आजकाल इन्स्टेंटचा जमाना आहे. पाच मिनिटांच्या आत आपण मुगाच्या डाळीचे सूप बनवू शकतो का? काल सकाळी सौ. ने उपमा केला होता. त्याच वेळी डोक्यातली ट्यूब लाईट पेटली. भाजलेला रवा उकळत्या पाण्यात टाकल्यानंतर दोन मिनिटात उपमा शिजतो. मनात विचार आला उपमा प्रमाणे भाजलेल्या मूगाच्या डाळीचे सूप ही पाच मिनिटांच्या आत निश्चित बनू शकते. मग काय. संध्याकाळी तीन -चार चमचे मुगाची डाळ कढईत मंद गॅस वर रंग बदले पर्यन्त भाजली. बहुतेक पाच मिनिटे लागली असतील. थंड झाल्या वर मिक्सर मध्ये डाळीचे पावडर करून घेतले. गॅस वर एका भांड्यात चार कप पाणी ठेवले. पानी थोडे गरम होताच, भाजलेल्या डाळीचे तीन चमचे पावडर पाण्यात ढवळले. गॅस वर सूप उकळू दिले. तो पर्यंत थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. दोन मिनिटांत पाण्याला उकळी येताच गॅस मंद केला, त्यात स्वादानुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकले. गॅस बंद करून चिरलेली कोथिंबीर टाकली. दोन चमचे सूप आमच्या चिरंजीवाला स्वाद तपासायला दिले. त्याने आंगठा वर करून उत्तम स्वादाचे प्रमाणपत्र दिले. बाकी तो आठ-दहा वर्षांचा होता तेंव्हा पासून माझ्या पाकशास्त्राचे प्रयोग आधी त्याच्यावरच करतो. काही कमी जास्ती असेल तर तो सांगतो.
सूप पिण्यासाठी तीन बाउल घेतले (एक माझ्यासाठी, एक सौ आणि एक चिरंजीव साठी). मला तूप आवडते म्हणून चहाच्या चमच्या एवढे तूप सूपात घातले. चित्रात तूप वर तरंगताना दिसत आहे. तूप घातल्याने चव वाढते असे माझे मत आहे. पण आमची सौ. त्यावर सहमत नाही. असो.
बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल. या सूपाला तूप जिर्याची फोडणी ही देऊ शकतात. ज्यांना तिखट आवडते ते थोडे तिखट किंवा लाल मिरची घालू शकतात. याशिवाय चिंच गूळ टाकून मूग/तुरीची डाळ भाजून पावडर करून इन्स्टेंट सार किंवा आमटी ही बनविता येऊ शकते. अजून प्रयोग करून बघितला नाही आहे. बाकी आज दोन वाटी मूगची डाळ भाजून बरणीत भरून ठेवणार आहे.
प्रतिक्रिया
अतिशय चांगला सुझाव.
अतिशय चांगला सुझाव.
हे मी केव्हातरी घरी पकवून बघणार.
काका, तुमच्या अधिकांश पोस्ट ज्या विषयावर असतात त्यापेक्षा अधिकांश पोष्टींमध्ये असा सकारात्मक कंटेंट तुम्ही प्रदान करणार असलात तर तुमचा फॅन होण्याची क्षमता मी राखेन.
ही पोस्ट केल्याबद्दल शत प्रतिशत प्रणाम व धन्यवाद.
प्रतिसादासाठी आभार. माझे
प्रतिसादासाठी आभार. माझे सर्व लेख सकारात्मक असतात. वाचणार्यांचे दृष्टीकोण वेगळे असू शकतात.
साधा सोपा आणि तरीही चविष्ट
साधा सोपा आणि तरीही चविष्ट पदार्थ दिसतोय. तूप टाळून करायला हरकत नाही. धन्यवाद.
+
कल्पना खरोखरच वाईट नाही. ('Not a bad idea' अशा (सकारात्मक) अर्थाने.)
----------
एवढ्याश्या१ तुपाने काहीही बिघडू नये. (अर्थात, शेवटी ज्याचीत्याची मर्जी.)
==========
१ 'एवढ्याश्या' ही संज्ञा अर्थातच सापेक्ष आहे. तीत (चित्रातल्याप्रमाणे) 'बचकभर'चासुद्धा समावेश व्हावा.
आवडलं सूप
जरा वेगळा प्रकार होतो आमच्याकडे. कॉफीतल्या तुपापेक्षा सुपातले तूप बरे.
करून बघितलं पाहिजे.
करून बघितलं पाहिजे.
कुठल्याही अन्नपदार्थावर तवंग बघून मला ते खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे मीही बहुतेक वरून तूप घालणं टाळेन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
उपाय
तूप सुपात वरून किंवा खालून कसेही घातले, तरीही ((वितळलेल्या) तुपाचे विशिष्ट गुरुत्व हे सुपाच्या विशिष्ट गुरुत्वापेक्षा कमी असल्याकारणाने१) तूप हे वर येणारच, अत एव तवंग हा येणारच.
हे टाळण्याकरिता दोन उपाय चटकन लक्षात येतात.
१. अगोदर सूप पिऊन नंतर बचकभर तूप पिणे२, किंवा
२. अगोदर बचकभर तूप पिऊन नंतर सूप पिणे.
(अर्थात, सूपच न पिणे, जेणेकरुन तूप पिण्याचा प्रश्न उद्भवणार नाही — न रहेगा बाँस, न बजेगी बाँसुरी — हादेखील एक मार्ग आहेच; मात्र, तो येथे जमेस धरलेला नाही. कारण, त्या परिस्थितीत, या पाककृतीची तरी गरज काय? जिस रास्ते से ग़ुज़रना नहीं, उस रास्ते का ज़िक्र क्यों, वगैरे वगैरे.)
(सूप पिणे, परंतु सुपातून/सुपाबाहेरून तूप न पिणे, हा मात्र विचारदेखील करण्याच्या लायकीचा पर्याय नाही. या रेटने, उद्या कृष्णावाचून भगवद्गीता मागाल! शेम शेम.)
——————————
१ Elementary Physics, my dear Watson!
२ चार्वाक झिंदाबाद!
चार्वाक झिंदाबाद!
(अवांतर)
क़ाफ़िरांचा क़ाफ़िर?
सूपातल्या पदार्थाचं आणि
सूपातल्या पदार्थाचं आणि तुपाचं प्रमाण जमल्यास तवंग एवढा वाईट दिसत नाही. टोमॅटोच्या सारा१ला फोडणी देताना त्यात माफक तूप घातलं तर ते बहुतेकदा जिऱ्याला चिकटून राहतं आणि असा तवंग दिसत नाही.
पण सध्या हाय, चांगले टोमॅटोच मिळत नाहीयेत. आणखी महिन्याभरात मिळतील तोवर उकाडा वाढल्यानं सुपं पिण्याची इच्छा फार राहणार नाही. दात आहेत तर ... चणे आहेत तर ...
१ हा हाफव्हॉली मीही सोडून देईन.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
तुम्ही शाकाहारी आहात; निहारी, पाया, वगैरे प्रकारांशी दुरूनही संबंध आला नसेलच.
एवढेच सुचवून नम्रपणे खाली बसतो.
एवढंच कशाला!
तवंग दिसला तर मी उंधियुलाही चमचा लावणार नाही!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
उंधियुला तसेही मी चमचा लावीत नाहीच. (डायरेक्ट हाताने खातो.)
उंधियु खूप तेलकट, किंबहुना
उंधियु खूप तेलकट, किंबहुना तेलाने लडबडलेला देखील असू शकतो पण त्याचा जो काही फॉर्म आहे त्यात वर तवंग येण्याचा स्कोप कसा असू शकतो हे डोळ्यासमोर येत नाहीये.
+
हे मलाही कळले नाही, परंतु, "जाऊ दे, 'त्यांच्या'त तसेच असेल" म्हणून सोडून दिले, झाले.
मग?
तुम्ही लोक उंधियुत जे काही ग्रेव्हीसारखं असतं त्यावर तेल दिसलं तर त्याला काय म्हणता?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
.
तेल.
.
>>बाकी इन्स्टेंट मुगाचे सूप बनविणारा मी पहिलाच असेल.
बाळ सहा महिन्याचं झालं की देण्यात येणाऱ्या पहिल्या काही अन्नपदार्थांमध्ये तुमच्या ह्या इन्स्टंट मुगाच्या सूपचा समावेश होतो.
पण नवमातांना ते करताना तुमच्याइतका आनंद होत नाही म्हणून मी इतके दिवस तुम्हाला वूमन्स्प्लेनिंग करायचं टाळलं.
या बालसंगोपन पाककृतींपैकी नाचणीच्या सत्त्वाची सगळ्यात जास्त संतापजनक आहे. नाचणीला आधी मोड आणायचे, मग मोड आलेली नाचणी उन्हात न वाळवता, घरातच एखाद्या स्वच्छ (म्हणजे स्टरलाइज्ड) तलम (कोणतेही रंग नसलेले पांढरे सुती) कापडावर वाळवायची. मग ती भाजून घरीच (बॅचवाईज चटणी करायच्या भांड्यात अर्थात ते स्टरलाइझ करून) दळायची आणि कोरड्या काचेच्या (अर्थात स्टरलाइज्ड) बरणीत साठवून ठेवायची. ही एवढी पूर्वतयारी झाली की मग ते सत्व साजूक तुपावर भाजून, त्यात उकळतं पाणी आणि गूळ घालून एक अत्यंत कुरूप पदार्थ तयार होतो, जो फक्त आणि फक्त लहान बाळांचा पुरेसा बौद्धिक विकास झालेला नसतो म्हणून ती खातात.
ही पाककृती जितकी संतापजनक आहे तितकाच संताप पुढे तेच मूल हौसेने केरसुण्या नाहीतर चपला-बूट खाऊ लागतं तेव्हा होतो.
…
कधी गर्बर नावाचा प्रकार खाऊन बघितलाहेत?
सुमारे वीसएक वर्षांपूर्वी, माझा मुलगा गर्बर खाण्याच्या वयाचा असताना, त्याला खाऊ घालताघालता (निव्वळ कुतूहल म्हणून१) एकदा हळूच एक चमचाभर चाखून पाहिला होता. (नक्की फ्लेवर – किंवा, द लॅक देअरऑफ – कोणता, हे आता (कालमानपरत्वे नि वयोमानपरत्वे) आठवत नाही.) त्यानंतर पुन्हा असे अघोरी कृत्य करण्याचे धाडस आयुष्यात कधी केले नाही. हा प्रकार लहान बाळांनाच लखलाभ होवो!
परंतु, लहान बाळेसुद्धा हा प्रकार आवडीने खातात, अशातला भाग नाही. आणि, पुरेसा बौद्धिक विकास झालेला नसतो, म्हणून तर नाहीच नाही. हायचेअरमध्ये बांधून आई, बाप, किंवा अन्य कोणी सिग्निफिकंट अडल्ट चमचाचमचाभरून गर्बर (किंवा फॉर्दॅट्मॅटर तुम्ही सुचविलेला अघोरी प्रकार) एकापाठोपाठ एक डायरेक्ट नरड्यात जबरदस्तीने जर ढोसत असेल, तर न खाऊन लहान बाळे सांगताहेत कोणाला? तरी, प्रतिकाराचा शक्य तेवढा प्रयत्न (इन्कलूडिंग तोंडात कोंबलेले थुंकून देणे, किंवा, नपक्षी, फुर्रकन चहूबाजूंस उडविणे, वगैरे वगैरे) करून पाहतात बिचारी. परंतु, अखेरीस इलाज चालत नाही.
होय, तीसुद्धा एक फ़ेज़ असते खरी. म्हणजे, समोर दिसेल ती वस्तू तोंडात घालण्याकडे कल असतो. (एक तर तोंडात तरी, नाहीतर मग माझ्या मुलाच्या लहानपणी व्हीसीआर नावाचा एक प्रकार असे, त्याच्या कॅसेट घालण्याच्या फटीत. किंवा, या दोहोंत घालण्याचा मूड नसल्यास, थेट कमोडमध्ये. (कमोडचा योग्य कामाकरिता उपयोग करण्यास शिकविणे मात्र महाकर्मकठिण गेले. असो.))
माझा मुलगा या फ़ेज़मध्ये असताना अनेकदा तांबड्या सेंटची नाणी तोंडात घालीत असे. त्यावरून आम्हांस अनेकदा हा मोठा झाल्यावर एखादा स्मॉलटाइम (गावपातळीवरचा वगैरे) राजकारणी वगैरे होतो की काय, अशी भीती वाटत असे. परंतु, अशी भाकिते करू नयेत.२
——————————
तळटीपा:
१ तत्पूर्वी, १९७९ साली एकदा माझ्या आईची एक अमेरिकास्थित मैत्रीण भारतभेटीस आली होती, तेव्हा, तिच्या तान्ह्या बाळास गर्बर भरविताना तिला पाहिले होते, तेव्हापासूनच खरे तर हे कुतूहल जागृत झालेले होते. किंबहुना, त्या वेळेस, समोर दुसरे एक लहान मूल (पक्षी: मी!१अ) पाहून ती मलासुद्धा ते गर्बर ऑफर करेल, अशी एक जबरदस्त आशा तथा लालसा मनात पैदा झाली होती. परंतु, कसचे काय! (तरी बरे, तेव्हा मी शहाण्या मुलासारखा वागलो नि तिथे हट्ट केला नाही. परंतु, आशाळभूतपणे ‘आत्ता देईल, मग देईल’ म्हणून तिच्याकडे नि तिच्या बाळाकडे डोळे लावून बसलो होतो, एवढे निश्चित आठवते.) तर सांगण्याचा मतलब, प्रस्तुत कुतूहल हे तसे १९७९ सालीच उत्पन्न झाले होते, ते अशा रीतीने २००३च्या इसवीत शमवून घेतले. असो चालायचेच.
१अ त्या वेळेस माझे वय खरे तर १३ वर्षे होते. (म्हणजे, रेल्वेच्या हाफतिकिटाची मुदतसुद्धा खरे तर ओलांडलेली होती.) परंतु, (तेव्हा चालू असलेल्या) आंतरराष्ट्रीय बालकवर्षाच्या१अ१ निमित्ताने तेव्हा मी स्वतःची गणना (सोयिस्करपणे) ‘बालकां’त करीत असे.
१अ१ हे आंतरराष्ट्रीय बालकवर्ष (झालेच तर, आंतरराष्ट्रीय महिलावर्ष१अ१अ) वगैरे प्रकार नक्की कशासाठी साजरे करतात, हे मला आजतागायत समजलेले नाही. म्हणजे, आंतरराष्ट्रीय बालकवर्षात सगळेजण बालकांचे ऐकतील, अशी माझी प्रामाणिक अपेक्षा होती. परंतु, तसे काही घडले नाही.
१अ१अ हे तत्पूर्वी १९७५ साली होते. (आणि, नाही! १९७५ साली मी स्वतःची गणना (सोयिस्करपणे अथवा गैरसोयीनिशी) ‘महिलां’त करीत नसे!)
२ माझ्या मुलाने लहानपणी केलेल्या प्रकारांवरून, हा मोठा झाल्यावर डॉक्टर, न्हावी, राजकारणी, किंवा कुत्रा, यांपैकी काहीतरी एक (किंवा अनेक) नक्की होईल, असे भाकीत कोणीही केले असते. (कुत्रा नक्की का, ते या क्षणी आठवत नाही, परंतु, असेही एकदा वाटले होते खरे, एवढे निश्चित आठवते.) परंतु, अशा भाकितांना काहीही अर्थ नसतो. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, हे (वाच्यार्थाने जरी खरे असले, तरीही, लाक्षणिक अर्थाने) झूठ आहे.
सत्तू प्रकार आहे.
गहू (खरं म्हणजे जव नावाचं धान्य होतं) आणि चणे यांपासून पारंपरिक सत्तू करण्याची ही पद्धत होती.
आता जे शॉर्टकट आले आहेत ते युट्यूबवर आहेत.
_________
खजुराहो येथे एक जोवारी मंदिर आहे त्याची प्रवेश कमान ही जवाच्या लोंब्यांची प्रतिकृती आहे. यावरून पडलेले नाव.दहावे शतकातले.
सत्तू पीठ
माझ्या सासूबाईंच्या मध्यप्रदेशातील रेसिपीनुसार सत्तू पीठ गहू, हरबरा डाळ आणि जव (barley) १: १/२ : १/४ या प्रमाणात भाजून, दळून तयार करतात. पण बिहारी सत्तू ओरिजिनल असावं. काही जण हरबरा डाळीऐवजी फुटाणे वापरतात.
सत्तूच्या पिठाचं सारण असलेले पराठे अप्रतिम लागतात. लाडूही छान होतात.
अवांतर : सातू
जव/सातू हे महाराष्ट्रातल्या प्रमुख तृणधान्यांपैकी एक होते असे इतिहासाच्या पुस्तकांत हमखास असायचे. एका पुस्तकात सातूच्या लागवडीचा नकाशाही पाहिल्याचे स्मरते.
मग नंतर असे काय झाले, सातू महाराष्ट्रातून जवळ जवळ हद्दपार झाले आहे. माझी आई मला म्हणाली की ऐंशीच्या दशकात जो दुष्काळ पडला तेव्हा आलेल्या अमेरिकन धान्यात सातूही होते. त्याला कर्नाटकसीमेवर 'कोट्याळ' म्हणत असत. परंतु आता कोट्याळ औषधालाही मिळत नाही.
पुण्यात काही किराणा दुकानांत जव मिळतो. परंतु तो सोललेला नसतो. म्हणजे खपलीसहित असतो. तो तसा का मिळतो आणि तसा कसा वापरतात देवजाणे.
कधी कधी वाटते, ज्वारीने जवाला रिप्लेस केले की काय. जव आणि ज्वारी यांच्यात तसे नामसाधर्म्य देखील आहे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
Barley
>>पुण्यात काही किराणा दुकानांत जव मिळतो. परंतु तो सोललेला नसतो. म्हणजे खपलीसहित असतो.
मी एकदा एका स्वयंपाकातल्या प्रयोगाकरता जव शोधत होते. तेव्हा मला अमेझॉनवर सोललेली जव मिळाली होती. आत्ता मी पुन्हा बघितलं तर अजूनही मिळतेय. मध्यंतरी कुणीतरी तिला सुपरफूड घोषित केले होते तेव्हा सगळेजण बार्ली खिचडी करून खात होते. त्या अन्नक्रांतीमुळे कदाचित मिळू लागली असेल.
बार्लीचं पीठही उपलब्ध आहे.
"मुगाम्बो खुश हुआ"
अशा प्रकारचं सूप माझी आजी कधी कधी करीत असे, पण त्यात मुगाची पावडर करण्याचा प्रकार नव्हता, मूग आधी भिजवून मग थोडे शिजवून घेत असे ( अर्थातमूग लवकर शिजतात हा एक फायदा!) . तूपजिऱ्याची फोडणी असे. आता वसंत ऋतूच्या आगमनानंतर खाण्यापिण्यात बदल करावा लागेल, त्यात हे सूप करून पाहतो आणि नंतर "मुगाम्बो खुश हुआ" असा एक किचनीय मीम टाकतो :)
तूरडाळ लवकर शिजावी यासाठी काही ट्रिक्स आहेत का कोणाकडे ?
Observer is the observed
…
प्रेशरकुकरमध्ये शिजवून भरपूर शिट्ट्या काढाव्यात.
(आता, शिट्ट्या काढणे हे कसे अशास्त्रीय आहे हे सांगायला कोणीतरी सरसावून येईलच.)
– (पारंपरिक१) 'न'वी बाजू.
—————
१ ‘आमच्या’त प्रेशरकुकरला ‘पारंपरिक’ समजतात. (‘आमची’ परंपरा!)
कुठे नेऊन ठेवला मोजमापीपणा आमचा!
अहो 'न'बा शास्त्राशास्त्र द्या सोडून.
तूरडाळ शिजवण्याआधी, जमल्यास, दोन तास भिजत घालावी. आमच्याकडे कधी शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचला ठरतं की आज वरणभात जेवायचा. आणि साडेसहाला जेवायला बसले नाही तर आमच्यांत (माझ्यात) फाऊल मानतात. मग डाळ भिजवून ठेवायला वेळ नसतो.
प्रेशर कुकरमध्ये तूरडाळ टाकायची. कुकरची शिट्टी वाजायला आली की गॅस (हो आमच्या घरी गॅसच आहे) बारीक करायचा. डाळ थेट कुकरात असेल आणि २ तास भिजवली असेल तर दोनेक मिंटांत गॅस बंद करायचा. भिजवली नसेल किंवा कुकरमध्ये भांड्यात घालून ठेवली असेल तर सात-दहा मिंटांत; दोन्ही केलं नसेल तर दहा-बारा मिंटांत गॅस बंद करायचा. झाकण उघडायची घाई करायची नाही; वाफ जिरायची वाट बघायची.
शिट्या मारल्या नाही की गॅस वाचतो. घर कमी गरम होतं. (हो, हो, आम्ही अमेरिकेत राहात असले तरीही आमच्याकडे वर्षाचा बहुतेकसा काळ खूप गरम असतं. राहत असले, हा शब्दप्रयोग मुद्दाम केला आहे; हे ऑटोकरेक्ट नाही.) आणि जिथे पैसे वाचतात तिथे शास्त्राबिस्त्राचा काय पाड!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माझ्याकडे का कुणास ठाऊक
माझ्याकडे का कुणास ठाऊक तुरीची डाळ शिजायला किमान चार तरी शिट्ट्या कराव्या लागतात. त्यानंतरही किमान दहा मिनिटे कुकर तसाच ठेवला तरच डाळ मऊ शिजल्याचे आढळून येते. भात मात्र एका शिट्टीत होतो. डाळ-पालक हा माझा आवडता पदार्थ, केवळ ह्या तुरीच्या डाळीमुळे त्याला वेळ लागतो. इकडच्या पाण्याचा ह अवगुण असावा असे अर्धांगी आणि जन्मदात्री दोघींचे मत.
*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल!!
हाकुना मटाटा!!
*****************
ट्रिक्स
>>तूरडाळ लवकर शिजावी यासाठी काही ट्रिक्स आहेत का कोणाकडे ?
डाळ-तांदूळ (फॉरदॅटमॅटर, कोणतेही कड/धान्य) पाण्यात भिजत ठेवून मग शिजवले की लवकर शिजते (सोहनी, गोडबोले, ओगले et al.).
स्टार्टींग विथ द हिरोईन, मूग डाळ भिजवावी लागत नाही. तूर डाळ साधारण दोनएक तास भिजवली की चांगली शिजते. पण उद्या तुम्हाला जर शाबूत ज्वारी किंवा बाजरी शिजवायची असेल, तर बारा तास तरी भिजवावी लागेल आणि नंतर भरपूर शिट्ट्या काढाव्या लागतील.
पण तुम्ही 'नबां' इतके ओल्ड फॅशन्ड नसाल तर इन्स्टापॉट वापरू शकता. त्यात शिट्ट्या होत नाहीत आणि त्या मोजाव्याही लागत नाहीत.
तूरडाळ लवकर शिजावी यासाठी काही ट्रिक्स आहेत का कोणाकडे
खरं म्हणजे असा विचार करत नाहीत. उलट ती चार तास रटरटत ठेवतात त्या खानावळीत गर्दी फार असते. यूट्यूबवर शोधा.
तूर डाळ आधी भाजून पिसून ठेवली
तूर डाळ आधी भाजून पिसून ठेवली तर पटकन शिजवता येईल. आजच याच पद्धतीने सौ. ने सांभार केले होते. डाळ भाजली तीन मिनिटे. तूर डाळ मिक्सर मध्ये पावडर करून घेतली. दुसरी कडे कांदा टमाटो कडी पत्ता फोडणी दिली. त्यात पानी घातले आणि नंतर पावडर मिसळले. दहा मिनिटात सांभार तैयार झाले. (आमचूर चिंच गूळ इत्यादि स्वादनुसार)
पिसल्यावर शिजणारच ना!
काहीही भाजून पिसलं (न भाजताही पिसलं) की आपण त्या वस्तूचा सर्फेस एरिया वाढवतो. त्यामुळे गरम पाण्याशी/वाफेशी पदार्थाचा संपर्क वाढतो आणि पदार्थ लवकर शिजतो. हे तत्त्व डाळीलाच काय पण गहू, तांदूळ, फणस, हत्ती.. कशालाही लागू होईल.
बघा
यांचं पाहून मटाला पण सुरसुरी आली. https://maharashtratimes.com/web-stories/food/how-to-make-moong-dal-soup...
!!!
१. तवंग कोठे आहे?
२. मुगाच्या डाळीच्या सुपात गाजरे कोण घालते?
३. मिक्सरला टेकू देऊन ती केळी नक्की कशासाठी ठेवलीहेत?
थोडक्यात: “येडेच आहेत!”
पटाईत काका रागवू नका.
मुगावरून जव पकडून सुपरफुड असा प्रवास सुरू आहे.
मस्त प्रवास आहे. निवृत
मस्त प्रवास आहे. निवृत झाल्यावर खाण्याचे प्रयोग शोधावे लागतात.
पटाईतकाका, तुम्ही निवृत्त कधी
पटाईतकाका, तुम्ही निवृत्त कधी झालात ?
तुम्ही साधारण ६०-६२वयाचे की तुमच्या ऑफिसात रिटायरमेंटचे वय ६५ ?
(उगा भोचक चौकश्या करत नाहीये. आपण दोघे समवयस्क का ते कुतुहुल म्हणून पडताळून पाहतोय)
सुपाची पा.कृ. चांगली आहे.
मुगाची डाळ लवकर शिजते, तुरीची डाळ जरा वेळ घेते.
तुरीची डाळ लवकर शिजण्याकरता खरे तर प्रेशर कुकर पुरेसा असतो.. टायमिंग जमायला पाहिजे, तसेच शिजवताना डाळीच्या भांड्यात असलेल्या पाण्याचे प्रमाण महत्वाचे असते. तांदुळासाठी घेतलेल्या पाण्यापेक्षा ते अधिक असायला लागते. साधारण बोटाच्या एक पेरापेक्षा किंचित जास्त पाण्याची पातळी असली तर चांगले.
डाळ आधी भिजवून शिजवायची असल्यास कोमट पाण्यात भिजवली तर लवकर शिजते, तसेच शिजवताना त्यात किंचितसे मीठ घातले तर चांगले. आमटी न करता वरण-भाताचा बेत असेल तर डाळ शिजवताना मी त्यात मीठ आणि थोडी हळद वापरते.. चव चांगली लागते.
तुरीची डाळ शिजायला वेळ लागत असेल आणि शिजली तरी मिळून येत नसेल तर ती डाळ योग्य नाही असे समजावे. चकचकीत पिवळसर रंगाची(पॉलीश केलेली) आणि लहान दाणे असलेली चांगली नाही. त्या ऐवजी मोठे दाणे असलेली, काळसर रंगाची आणि मउसर (पण ठिसुळ नाही) अशी डाळ चांगली असते. पॉलीश केलेली आणि टचटचीत असलेली डाळ शिजली तरी मिळून येत नाही आणि चवीला पण तितकीशी चांगली नसते. काळसर आणि मोठ्या आकाराची डाळ दिसायला अनाकर्षक असली तरी लवकर शिजते, मिळून येते आणि चवीला चांगली असते. पॉलीश केलेली डाळ आरोग्यासाठी चांगली नसते असे वाचले आहे.
*********
बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना |
ऐसे मनमौजीको मुश्कील हैं समझाना | है ना?
बारीक तूरडाळ
पाहिलेली,खाल्लेली दिसत नाही. सर्वात चविष्ट असे. अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन वाणापुढे मागे पडली. गेली बिचारी. एक प्रेसिडेंट नावाची डाळही आमचा वाणी द्यायचा. अगदी मोठी असे.