अकिरा कुरोसावा दिग्दर्शित चित्रपट ‘राशोमान’
Japan/1950/B&W/88 Min/Dir: Akira Kurosawa
एखादी कलाकृती मानवी जीवनाविषयी, नीती-अनीती, रूढी-परंपरांविषयी भाष्य करते, त्याला कालातीत मोल असते. तेव्हा ती कलाकृती अजरामर होते. ‘राशोमान’ हा चित्रपट, त्यातील कथानक-आशय आणि विषय मांडण्याची शैली इतकी चिरंजीवी आहे, सदा सतेज आहे की त्यामुळेच हा चित्रपट अजूनही ताजा वाटतो.
1951च्या ‘व्हेनिस फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटास ‘गोल्डन लायन अॅवॉर्ड’ मिळालं. चोविसाव्या ‘अकॅडमी अॅवॉर्ड्स’मध्ये परकीय भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, पटकथा, अभिनय असे अनेक पुरस्कार, विविध स्पर्धामधून, या चित्रपटास मिळाल्यानंतर जगभरातील सर्व रसिकांना जपानी चित्रपटाविषयी आस्था वाटू लागली. त्यानंतरच्या काळातसुद्धा जपानी चित्रपटांबद्दलचे कुतूहल व आकर्षण वाढतच गेले. त्यापूर्वीही जपानमध्ये चित्रपटांची निर्मिती होत होती. अमेरिका व युरोपमध्ये तुरळकपणे जपानी चित्रपटांचे प्रदर्शनही होत असत व या चित्रपटांना रसिकांचा दादही मिळत असे. परंतु ही आसक्ती तेवढ्यापुरतीच होती. व त्यामुळे जपानच्या चित्रपटांना मार्केट नाही म्हणून कुणीही तेवढे गंभीरपणे प्रयत्नही केले नाहीत.
चित्रपटांचा उदयानंतरच्या चार-पाच वर्षातच चित्रपट निर्मितीत जपान जास्त रुची दाखवू लागला. ज्या काळात अमेरिकेतसुद्धा चित्रपटांसाठीच म्हणून एकही थिएटर नव्हते त्या 1903च्या सुमारास जपानमध्ये चित्रपट प्रदर्शनासाठी एक भव्य थिएटरही बांधण्यात आले. पिटातल्या अमेरिकेतील प्रेक्षकांसाठी स्वस्तातील स्वस्त मनोरंजन म्हणून गोडावूनसारख्या ठिकाणी चित्रपटांचे प्रदर्शन होत असत. तरीसुद्धा जपानमध्ये चित्रपट हे एक अभिव्यक्तीचे साधन म्हणून नावारूपास येण्यासाठी 1921 साल उजाडावे लागले. जपानचे सर्वश्रेष्ठ चित्रपट निर्मापक म्हणून यासुजिरो ओजू याला प्रसिद्धी मिळू लागली.
जपानच्या यासुजिरो ओजु (1903-1963) केन्जी मिजोगुची (1898-1956) व अकिरा कुरोसावा (1910-1998) या तिघांची गणना जगातील उत्कृष्ट निर्मापकांमध्ये केली जाते. कुरोसावा यानी सुमारे पंचवीस चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील सर्वात उत्कृष्ट चार-पाच चित्रपटांपैकी राशोमान हा एक आहे. काहींच्या मते राशोमानच सर्वात उत्कृष्ट चित्रपट आहे.
चित्रपटाची गोष्ट अशी आहेः
बाराशे वर्षापूर्वीचा काळ. जपानमधील क्योटो हे एक शहर. यादवी युद्ध व दुष्काळामुळे तेथील लोक निष्कृष्ट जिणे जगत आहेत. शहर ओस पडण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर क्योटो शहराच्या वेशीतील पडक्या राशोमान गेटपासून चित्रपटाची सुरुवात होती. ‘राशोमान’ चित्रपट सुरू होतो तोच धो-धो कोसळणाऱ्या पावसात. राशोमान गेटच्या आतल्या बाजूस पावसात निवाऱ्यासाठी लाकूडतोड्या व भिक्षू उभे आहेत. त्याच वेळी अजून एक वाटसरू तेथे येतो. लाकूडतोड्या अस्वस्थपणे काही दिवसापूर्वी घडलेल्या खुनाबद्दल बोलत असतो. नवीन आलेला माणूस लाकूडतोड्याला सविस्तरपणे गोष्ट सांगण्याचा आग्रह धरतो. राशोमानसारख्या सुनसान, पडक्या वेशीत लाकुडतोड्या जंगलात पाहिलेल्या एका खुनाची गोष्ट सांगतो आहे.
लाकुडतोड्या जंगलात लाकूड तोडण्यासाठी जात असताना वाटेत एका स्त्रीचे कपडे झाडावर लटकलेले दिसतात. तसेच पुढे गेल्यानंतर एक घोडा चरताना दिसतो. आणखी पुढे गेल्यावर त्याला एक प्रेत दिसते. व हे सर्व तो त्या शहराच्या पोलीस चौकीत येवून सांगतो.
एका पहारेकऱ्याला नदीकाठी डाकू सापडतो. त्याला पकडून सामुराईचा (जपानचे शूर वीर सरदाराचा) खून केल्याबद्दल खटला भरतात. व न्यायालयात साक्षी पुरावे दिले जातात. न्यायालयासमोर डाकू आपण सामुराईचा खून केल्याचे कबूल करतो. परंतु त्यानी शपथेवर सांगितलेले सत्य अशी असतेः ‘एके दिवशी जंगलातून एक सामुराई बायकोला घोड्यावर बसवून जंगलातून नेत असताना जंगलात माझी नजर तिच्यावर पडते. सामुराई व त्याची बायको जंगलातून जात असताना मी पाहिले; गरम वारा सुटल्यामुळे मला कसेबसे वाटले; मी सामुराईपाशी जावून जमीनीत गाडून ठेवलेल्या तलवारी दाखवतो म्हणत त्याला थोडेसे लांब घेऊन गेलो; तो चांगला शूर होता. आम्हा दोघांच्या मध्ये तलवारीने चुरशीची लढाई झाली. शेवटी मी त्याला पकडून त्याला तेथेच एका झाडाला दोरीने बांधून मी त्याच्या समोरच त्याच्या बायकोवर बलात्कार केला. पहिल्या पहिल्यादा ती विरोध करत होती; परंतु नंतर ती राजी झाली. माझ्यासारख्या बलात्कारित स्त्रीला दोन्ही पुरुष जिवंत असलेले बघविणार नाही. असे तिने म्हटले. मला तिच्याबद्दल तिरस्कार वाडू लागला. तिला मारून टाकू का? म्हणून मी सामुराईला विचारले. तेथेच त्याच्या बायकोच्या खंजीरीने मी सामुराईचा खून केला.’ हा होता डाकूचा कबूली जवाब.
परंतु सामुराईच्या पत्नीची साक्ष वेगळी होती. ‘डाकूने बलात्कार केल्यानंतर तो डाकू ‘मी नावाजलेला डाकू तजोमरू’ म्हणून बढाई मारू लागला व तो निघून गेला. मी सामुराईपाशी गेले व त्याला मिठी मारली. परंतु त्याच्या चेहऱ्यावरील माझ्याबद्दलचा तिरस्कार बघून मला कसेसेच वाटले. माझी खंजीर तेथे पडली होती. व खंजिराने नवऱ्याला बांधून ठेवलेले दोर सोडण्यासाठी पुढे पुढे गेले व मी मूर्छित झाले. व मी जागे झाल्यानंतर पळून गेले व नदीत जीव देण्याचा प्रयत्न केला. परंतु मी काही मेले नाही. नंतर एका देवळात लपून बसले.’
नंतरची साक्ष मृत सामुराईची असते. अंगात आलेल्या बाईच्या द्वारे मृत सामुराई स्वतःच्या मृत्युची गोष्ट सांगतो. ‘बलात्कारानंतर डाकू तिला समाधान करत होता. परंतु माझ्या पत्नीने नवऱ्याला मारून टाक म्हणून डाकूला आग्रह करू लागली. डाकूला अशा स्त्रीबद्दल घृणा उत्पन्न झाली. माझी बायको पळत सुटली. डाकू तिचा पाठलाग करत गेला. मग मी खंजीरीने आत्महत्या केली. मृत्युसमयी कुणीतरी ती खंजीर माझ्या पोटातून बाहेर काढत आहे असा मला भास झाला.’ ही होती सामुराईची गोष्ट.
खटला संपल्यानंतर लाकूडतोड्या तेथून परत आलेला असतो. वाटसरू त्याला गोष्ट सांगण्यास भाग पाडतो. तो पण जंगलात घडलेल्या प्रसंगाचे वर्णन करतो. ‘मी खटल्यात सांक्ष दिली नाही. कारण मला त्या भानगडीत पडायचे नव्हते’ अशी सुरुवात करून तो गोष्ट सांगू लागतो. ‘साक्षीदारांने सांगितल्याप्रमाणे हा प्रसंग घडला नव्हता. डाकू त्या सामुराईच्या पत्नीला त्याच्याशी लग्न करण्याची मागणी घालतो. परंतु ती सामुराईला बंधमुक्त करते व सामुराईला डाकूबरोबर लढण्यास सांगते. सामुराईला ‘असल्या’ बायकोच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालण्याची इच्छा नव्हती. परंतु त्याची पत्नी ‘जे खरे पुरुष असतात ते स्त्रीवरील प्रेमासाठी लढतात’’ म्हणून त्या दोघांनाही आव्हान देते. ते दोघे आपापली हत्यारं बाहेर काढून वार करू लागतात. पत्नीला हे सहन न झाल्यामुळे ती तोंड झाकून घेते. दोघांच्यामध्ये चुरशीची लढाई होते. डाकूच्या सुदैवामुळे तो जिंकतो व सामुराई मरतो. तोपर्यंत बायको पळून गेलेली असते. डाकू निराश होऊन सामुराईची तलवार घेऊन लंगडत लंगडत निघून जातो.’
गोष्ट सांगून झाल्यावर तितक्यात त्यांना जवळच एक नुकतेच जन्मलेलं,वाटसरूला लाकूडतोड्यानीच सामुराईच्या पोटातील रत्नजडित खंजीर उपसून काढल्याचा संशय येतो. माणुस किती स्वार्थी आहे, तसे ते बोलून दाखवतो. तितक्यात त्या तिघाना कपड्यात गुंडाळलेलं एक लहान मूल रडताना दिसते. त्या अनाथ मुलावरील गुंडाळलेले कपडे व त्याच्या अंगावरील दागिने वाटसरू चोरतो. लाकूडतोड्या त्याला तसे करण्यास मनाई करतो. परंतु ते चोरण्यात काही पाप नाही असे समर्थन करत वाटसरू कपडे काढून घेतो. ‘स्वतःच डाकू असणारा दुसऱ्याला डाकू म्हणू शकणार नाही’ असे वाटसरू त्याला सुनावतो. ‘सगळेच स्वार्थी आहेत.’ असे म्हणत वाटसरू राशोमान गेटमधून बाहेर पडतो.
परंतु या सर्व घटना भिक्षूच्या मानवीयतेबद्दलच्या कल्पनांना धक्का पोचवितात. परंतु लाकुडतोड्या त्या बाळाला कडेवर घेण्याचा प्रयत्न करतो. भिक्षूला संशय येतो. परंतु लाकूडतोड्या ‘माझ्या सहा लहान मुलांबरोबर या अनाथ बाळालाही सांभाळतो’. असे म्हटल्यावर भिक्षूचा त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास बसतो. लाकूडतोड्या बाळाला घेऊन जातो. तोपर्यंत पाऊस थांबलेला असतो व सूर्यप्रकाश आत येऊ लागतो.
लाकूडतोड्या, व सामुराईची बायको यांच्या नजरेतून ही घटना कशी बदलत जाते व शेवटी डाकूने सांगितलेले सत्य याचे सुंदर चित्रण दिग्दर्शकानी केले आहे. हीच घटना चित्रपटात चार वेळा दाखवलेली असली तरी नेमके काय घडले असावे याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचते. ज्या वेळेस साक्षीसाठी बोलावलं जातं त्या वेळी प्रत्येकाच्या सांगण्यात गोष्टीतील काही साधर्म्य आढळतं, तर काही बाबतींत तफावत. दिग्दर्शक चित्रपटात एकच घटना चार जणांच्या दृष्टिकोनांतून दाखवण्याचा प्रयत्न करतो. खरं तर दृष्टिकोनही म्हणता येणार नाही, कारण नवऱ्याच्या खुन्याबद्दलची माहिती प्रत्येकाकडून वेगवेगळी मिळत राहते.
कुरोसावाने या प्रकरणाची सुनावणी प्रेक्षकांच्या न्यायालयात ठेवली. घटनेत सहभागी, साक्षी चार पात्रे एकेक करून येतात आणि एक पवित्रा घेऊन घटनात्मक 'सत्य' सांगतात. घटितासंदर्भात नेमके कुठले पात्र सत्य मांडते, त्यातील किती सत्य उघड करते व किती दडवून ठेवते, कोण शतप्रतिशत सत्य सांगते, या बाबी कुरोसावा सत्यशोधनासाठी वापरतो आणि 'अंतिम सत्य' नेमके कुठले, ते शोधण्याचे काम प्रेक्षकांवर सोपवतो.
तीच पात्रं, तेच लोकेशन दिग्दर्शक आपल्याला चार वेळेस दाखवत असताना आपल्याला चित्रपटात कुठेही कंटाळा येत नाही किंवा गोष्टीत तोचतोपणाही जाणवत नाही. कारण स्थळाची मर्यादा असल्यामुळे कॅमेरा पोझिशन्सनापण मर्यादा येतात. पण प्रत्येकाची गोष्ट ऐकताना आपण तेवढेच तल्लीन होऊन जातो आणि तेवढेच गुंतत जातो. ह्या तिघांची गोष्ट सांगत असताना दिग्दर्शक आपल्याला स्त्री-पुरुष-संबंध, त्यांच्यातील विषमता, त्यांच्या नात्यात असलेली मालकी भावना, स्त्रीकडे असलेली शक्ती अशा विषयांना हात घालत राहतो. तर शेवटच्या प्रसंगात, सापडलेल्या अर्भकाला ‘माझ्या सहा मुलांसारखा जपेन’ असं सांगणाऱ्या लाकुडतोड्याला बघून भिक्षूच्या मनात ‘अजून ह्या जगामध्ये माणुसकी आहे’, असा आशावाद दिग्दर्शक दर्शवतो.
1950 ते 1960च्या दशकात दरवर्षी एक या प्रमाणे कुरोसावानी चित्रपट निर्मिती केली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटापैकी इकिरू, सेव्हन सामुराई, थ्रोन ऑफ ब्लड, रेड बीअर्ड. रन या चित्रपटांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
चित्रपटासाठी येथे क्लिक करावे.
https://archive.org/details/akira-kurosawa-rashomon-1950-eng-sub/Akira+K...(1950)+Eng+Sub.avi
किंवा
https://arc018.com/watch-movie/watch-rashomon-free-80101.8313070