ज्याँ-लुक गोदार (Jean Luc Godard) दिग्दर्शित ‘ब्रेथलेस’

France/1959/B&W/89 Min/Dir: Jean Luc Godard

photo 1

दुसऱ्या जागतिक महायुद्धात होरपळलेली कित्येक युरोपियन राष्ट्रे व अमेरिका यांची युद्धानंतर जीवनाकडे बघण्याची दृष्टी पार बदलून गेली. तेथील समाजातील सामान्यांना चाकोरीबद्ध आयुष्याचा कंटाळा आला. परंपरागत जीवनाला ते विटले होते. प्रत्येक क्षेत्रात काही तरी नवीन हवे असे त्यांना वाटत होते. चित्रपट सृष्टीसुद्धा त्याला अपवाद ठरू शकत नव्हती. चित्रपट कसा बनवावा यापेक्षाही अधिक महत्त्व तो तिकीटबारीवर कसा ‘वाजवावा’ याला येऊ लागले होते आणि हॉलीवूडमधील स्टुडिओ संस्कृती किंवा अगदी आपल्याकडेही सिनेमा कंपन्यांतून या कलेचे साचे तयार होऊ लागले होते. कथा, त्या कथेवर बेतलेली पटकथा, पात्रांच्या हालचाली आणि भावमुद्रा, प्रकाशयोजना, दृश्य आणि ध्वनिसंकलन, त्या संकलनाच्या माध्यमातून निर्माण होणारा सिनेमाचा वेग आणि लय हे सारे घटक एकत्र आणून प्रेक्षकांसमोर सिनेमा नावाचे रसायन सादर केले जात होते. भव्य, दिव्य, अतिखर्चिक, साचेबद्ध कथा, दिलखेचक संभाषणं, (व आपल्याकडे ठच्चून भरलेली नाच-गाणी), गोड-गोड चेहऱ्याचे (चॉकलेटी) हीरो-हीरॉइन, इत्यादींचे आकर्षण त्याकाळी होते.

ही चाकोरी युद्धोत्तर काळातील काही सिनेदिग्दर्शक तोडू पाहत होते. रूढीमुक्त युगातील रूढीमुक्त लोकांबाबतचे सिनेमे बनवण्यासाठी ज्या तयार आणि कच्च्या पद्धती आहेत, त्या यथायोग्यपणे वापरणाऱ्यांची गरज भासत होती. आधुनिक जगण्याच्या वावटळीत सापडलेल्या समकालीन युरोपियन तरुणांच्या - पत्रकार, सैनिक, वेश्या, कामगार स्त्रिया, बुद्धिजीवी - आयुष्यांची फेरमांडणी करणारे चित्रपट हवे होते. चित्रपटात नाविन्य, गती आणि लय हवी होती, कथनाच्या कल्पना नव्या हव्या होत्या.

दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषत: युरोपातील देश पूर्वपदावर येत असताना, चित्रपटांमध्ये त्या जनमानसाचे प्रतिबिंब पडणे अगदीच स्वाभाविक होते. पण आशय सादर करताना, त्याचे ‘पॅकेजिंग’ आणि विक्रीचे बंधन कशासाठी घ्यायचे, असे प्रश्न विचारू लागलेल्या नवतावादी आणि नवताप्रेमी दिग्दर्शकांच्या एका फळीमध्ये ज्याँ-लुक गोदार (Jean Luc Godard) होते.

ज्याँ-लुक गोदार या फ्रेंच दिग्दर्शकाचे मोठेपण सध्याच्या पिढीला फारसे माहीत असण्याचे काही कारण नाही. कारण ‘ओटीटी’ प्रसारामुळे, गोदार यांनी सहा दशकांपूर्वी मांडले तसे प्रवाहापेक्षा वेगळे आणि कमी-अधिक तऱ्हेवाईक, धक्कादायक सिनेमे बघण्यास ही पिढी पुरेशी सरावलेली आहे. हे सरावणे कल्पनेतही नव्हते त्या काळात, म्हणजे सिनेमाविश्वात ज्याला फ्रेंच ‘नवप्रवाह’ किंवा ‘न्यू वेव्ह’ असे मानले गेले, त्या चित्रक्रांतीच्या ऐन भरात ज्याँ-लुक गोदार यांनी एकाहून एक वेगळे, पूर्णपणे भिन्न धाटणी आणि हाताळणीचे सिनेमे सादर केले. 1960चे ते दशक मुळातच प्रयोगशीलतेचे होते आणि कोणत्याही क्षेत्राप्रमाणे चित्रपटांच्या क्षेत्रातही प्रयोगशीलतेचे झालेले आद्यस्वागत गोदार यांच्याही वाटणीला आले. गोदारचे ‘ब्रेथलेस’ हे चित्रपट फ्रेंच न्यू वेव्ह चित्रपटांची नांदी ठरली.

गोदार यांच्या ‘ब्रेथलेसची कथा तसे पाहिल्यास अगदी सामान्य कथा असे वाटेल. इटलीच्या मार्सेल्स या शहरात मिशेल पायोकार्ड हा कार चोरून ऐषारामी जीवन जगत असतो. चोरांना ज्याप्रकारची हाव असते तसा हाव याच्यात बिलकुल नव्हता. एकदा चोरलेल्या कारमध्ये बसून तो प्रवास करत असताना वाटेत त्याला पोलीस आडवतो. हा त्या पोलीसाचा खून करून त्याची प्रेयसी पॅट्रिशिया राहत असलेल्या पॅरिसच्या हॉटेलमध्ये जातो. तेथे ती त्याला भेटते. ही अमेरिकन तरुणी पॅरिस शहरात पेपर विकून कसेबसे पोट भरून घेत असते. तिला फ्रेंच भाषेतील बारकावे समजत नसतात. सोर्बान विद्यापीठात तिला शिकायचे असते. ती एक कादंबरी लिहित असते. तिच्याबरोबर काही काळ तो मजेत घालवतो. गप्पा मारतात. तिला त्याचे आकर्षणही असते व तिटकाराही असतो. परत एकदा रूमवर येऊन पॅट्रिशियाबरोबर वेळ घालवतो. ती गर्भिणी आहे असे त्याला ती सांगते. पोलीस त्याचा तपास करत तिच्यापर्यंत पोचतात. ती पोलीसांना त्याचा थांगपत्ता लागू देत नाही.

मिशेलवर पोलीसांची नजर असते. त्याला पकडण्यासाठी पोलीस सापळा रचतात. परंतु मिशेल तेथून निसटतो व अजून एक कार चोरून ती विकतो. त्याच्या मित्राकडून पैसे वसूल करून पॅरिस सोडून जाण्याच्या विचारात तो असतो. पॅट्रिशियाबराबर पॅरिसपासून लांब कोठेतरी रोमला पळून जाण्याचा बेत तो आखतो. तो तिला भेटून आपला बेत सांगतो. परंतु पॅट्रिशिया पॅरिस सोडून जाण्यास नकार देते. त्यापूर्वी पोलीस तिला मिशेलविषयी जंग जंग पछाडतात व पुन्हा येतो असे सांगून जातात. पोलीसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ती हॉटेल सोडून मित्राच्या स्टुडिओमध्ये राहायला जाते व मिशेललाही तेथेच बोलावते. परंतु दुसऱ्याच दिवशी ती पोलीसांना तो कुठे आहे ते फोन करून सांगून टाकते
.
पोलीसांच्या हातात तो सापडू नये म्हणून त्याचे मित्र त्याला मदत करण्यास तयार असतात. परंतु हा ती मदत नाकारतो. पोलीसांची गोळी लागून तो मरणावस्थेत असताना पॅट्रिशिया तेथे येते. तिला ‘विश्वासघातकी’ म्हणून तो जीव सोडतो. पॅट्रिशिया पोलीसांना ‘विश्वासघातकी म्हणजे काय?’ असे विचारते.
गोदार यानी ही कथा विलक्षणरित्या रंगवलेली आहे. हा चित्रपट प्रेमाचे स्वरूप व त्याची भाषा याबद्दलचे दिग्दर्शकाच्या मतांची मांडणी करते. साठाव्या दशकातील लैंगिकतेला अवास्तव महत्व देण्याच्या पार्श्वभूमीकडे नजर टाकल्यास गोदारचे सांस्कृतिकतेविषयी व भांडवलशाहीविषयीची मतं या चित्रपटातील पटकथेत जागोजागी सापडतात. ज्या वेगाने आधुनिक जग बदलत आहे, मूल्यांची पुनर्मांडणी होत आहे त्याला फक्त भांडवलशाही जबाबदार नसून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेली जीवनशैलीसुद्धा आहे, हे त्याचे मत चित्रपटातून व्यक्त होते. त्या काळापर्यंत अपरिचित असलेले जंप कट्समधून कथा वेगाने सरकत जाते. एखाद्या अमूर्त कलाकृतीसारखे चित्रपटातील चौकटी दिसू लागतात. व ही शैली नंतरच्या काळातील अनेक दिग्दर्शकानी ठिकठिकाणी वापरल्याचे जाणवते.

गोदार यांच्या बहुतेक सिनेमांमध्ये त्यांनी काहीएक भूमिका घेतल्याचेही आढळून येते. त्या काळातील दिग्दर्शक प्रभावळीप्रमाणे त्यांच्यावरही मार्क्‍सवादाचा प्रभाव होता. शेतकरी, विद्यार्थी या मुद्दय़ांवर त्यांनी मतप्रदर्शन केलेले आहे. पण त्यांचा पिंड दिग्दर्शकाचा होता. 1960 ते 1967 या काळातील त्यांचे सिनेमे विशेष गाजले. ते सरधोपटपणे वर्णिले जातात त्याप्रमाणे बोजड वगैरे अजिबात नव्हते. उलट गोदार यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्यांची बहुतेक पात्रेही विलक्षण शैलीदार रंगवली गेली आहेत. A Woman Is a Woman (1961), Vivre Sa Vie 1862), Alphaville (1965), Weekend (1967), Sympathy for the Devil (1968), First Name: Carmen (1983), Hail Mary (1985) , Goodbye to Language (2014) ही त्यांची इतर गाजलेले चित्रपट आहेत.

3 डिसेंबर 1930रोजी पॅरिसमध्ये एका श्रीमंत फ्रेंच-स्विस कुटुंबात जन्मलेल्या गोदार यांनी ‘अपारंपरिक चित्रपटांचा जनक’ म्हणून आपले वेगळेपण जपले. अनेक वर्षे युरोपसह सर्व जगभर महत्वाचे, तसेच वादग्रस्त दिग्दर्शक म्हणून त्यांना ओळख निर्माण केली. 2010साली ऑस्कर अकादमीने गोदार यांना त्यांच्या चित्रपट कारकीर्दीचा सन्मान म्हणून जीवनगौरव पुरस्कार जाहीर केला. मात्र तो पुरस्कार त्यांनी नाकारला.

त्यांचे अलीकडेच, 13 सप्टेंबर 2022 रोजी निधन झाले.

चित्रपटासाठी येथे क्लिक करावे.

https://m4uhd.cc/watch-movie-breathless-1960-253958.html

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet