Skip to main content

लग्न झाले नी अंकल झालो

गेल्या महिन्यात लग्नाला 37 वर्ष पूर्ण झाले. केस पांढरे झाले असले तरीही मी स्मार्ट दिसतो, किमान मला तरी असे वाटते. एक जुना किस्सा आठवला. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यावेळी मी कृषी भवन मध्ये कार्यरत होतो. इमारतीतील एका छोट्या हॉलमध्ये माझ्यासोबत ६ स्टेनो त्यात ४ कन्या होत्या. दोन तर माझ्याच समवयस्क. दोघींचे लग्न झालेले होते. त्यातली एक अजूनही गुलाबाची कळी होती पण दुसरीचे गोबीच्या फुलात रूपांतरण झाले होते. सर्वच पुरूषांना बायकांचे बोलणे कान टवकारून ऐकण्यात एक आसुरी आनंद मिळतोच. दिवस मस्त जात होते. त्यादिवशी:

गुलाबाची कळी: काल न, संध्याकाळी रिक्ष्यात बसून बाजारात जात होते, तेवढ्यात एक बाइकस्वार जवळून गेला १७-१८ वर्षाचा पोरगा असेल. मला पाहत त्याने डोळा मारला व फ्लायिंग किसहि केले. हा किस्सा सांगताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत होता.

गोबीचे फूल: (मनातल्यामनात, कपाळावर कुंकू लावत नाही आणि गळ्यातहि मंगळसूत्र घालत नाही. स्वत:ला जुही चावला समजते. मी काही मूर्ख नाही, मलाहि कळते, तुझ्या बोलण्यामागचा हेतू. बघ कशी तुझी बोलती बंद करते): त्या मुलाची काय चूक, तू अजूनहि १६ वर्षाच्या तरुणी सारखी दिसते. मुंबईला गेली असती तर जुही एवजी तुलाच सिनेमात काम मिळाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही, प्रयत्न करून बघ. इथे उगाच दिवस भर यस सर/यस मॅडम करत वेळ घालविते. ते जाऊ दे, पण एक खटकते, तू एवढी सुंदर पण तुझ्या मिस्टरांचे पोट सुटत चालले आहे. डोक्यावरचे काही केसहि पांढरे झाले आहेत. असेच सुरु राहिले तर एक दोन वर्षांत ते तुझे अंकल दिसू लागतील. बघ जरा त्यांच्या कडे.

तिचे बोलणे ऐकून मला हसू आले. गोबीच्या फुलाला मनातल्यामनात दाद दिली. काय शालजोडी मारली आहे, गुलाबाच्या कळीच्या दुखत्या नसेवर बोट ठेवले. मला हसताना पाहून गुलाबाच्या कळीला राग आला. ती माझ्यावर भडकली, काहीना बायकांच्या गोष्टी टवकारून ऐकण्याची भारी हौस असते. मी ही बेशरमपणे म्हणालो, देवाने कान दिले आहे, त्याचा सदुपयोग करणे हा काही गुन्हा नाही. असो.

गोबीचे फूल: लक्ष देऊ नको त्याच्या कडे. एक नंबरचा बेशरम आहे. बाकी काही ही म्हण पटाईत अजूनही हेंडसम दिसतो.

लग्नाला दोन एक वर्ष झाले असले तरीहि माझे काही पोट निघाले नव्हते व केसहि काळे होते. अजूनही मी हंड्सम आणि स्मार्ट दिसत होतो. तरुण पोऱ्या किमान आपल्याला 'अंकल' म्हणणार नाही, प्रयत्न केला तर आजहि त्या आपल्याला 'घास' टाकतील, असा गैरसमज होता.

त्याच दिवशी ऑफिसहून थोडा लवकर निघालो. सूर्यास्ताच्या आधी घराच्या गल्लीत शिरलो. घराच्या दरवाजाच्या बाहेर सौ. शेजारच्या २२-२३ वर्षाच्या तरुणी सोबत बोलत होती. सौ.ची पाठ माझ्याकडे होती. पण त्या तरुणीचे लक्ष माझ्याकडे गेले, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाली, "दीदी, अंकल आ रहे हैं". च्यायला सौ. दीदी आणि मी अंकल, कुठे तरी जळत आहे असे वाटले. घराजवळ पोहचताच, ती तरुणी मधुर आवाजात म्हणाली, 'अंकलजी नमस्ते'. आतामात्र तळपयाची आग मस्तकात गेली. मी भडकलेले डोके शांत ठेवीत तिला म्हणालो, "जिजाजी को अंकल कहोगी तो दीदी को भी आंटी कहना पड़ेगा". नकळत मी सापाच्या शेपटीवर पाय ठेवला होता. मी घरात शिरलो, सोफ्यावर जाऊन बसलो. सौ. ही पाठोपाठ आत आली. नेहमीप्रमाणे तिने प्यायला पाणी आणून दिले. पाणी पिणे झाल्यावर सौ.कडे पाहिले. तिच्या चेहऱ्यावर नाराजगी स्पष्ट दिसत होती. ती रागातच म्हणाली, आजकाल तुमची जीभ जास्तस चरचर करू लागली आहे. तोंडावर ताबा ठेवा, तुमचे लग्न झालेले आहे, किमान हे तरी लक्षात असू द्या. "मी दीदी असली तरी, शेजार-पाजारच्या तरुणी तुमच्या साळ्या नाहीत. तुम्ही त्यांचे अंकल आहात. तिच्या बोलण्यातील वैधानिक चेतावनी स्पष्ट होती तिच्या बहिणीशी जास्त गूटरगूँ केलेली तिला आवडत नाही.

तात्पर्य एवढेच, लग्नानंतर तुम्ही कितीही स्मार्ट, हंड्सम असले तरी तुम्ही तरुण पोरींसाठी तुम्ही अंकल झालेले असतात.

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

Rajesh188 Tue, 11/07/2023 - 16:01

बायको मिळाली आहे
आता संसार करा ..

वय झाले आहे गंभीर होण्याचे..पोरकट विचार सोडा

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/07/2023 - 04:02

खूप वर्षांपूर्वी मी आयआयएस्सीत गेले होते, बंगलोरला. तेव्हा माझं एमेस्सी नुकतंच पूर्ण झालं होतं. तिथे एका मैत्रिणीला भेटायला गेले होते, ती तिथे पीएचडी करत होती.

रस्त्यावर काही शाळकरी पोरांनी मला 'आंटी' म्हणून थांबवलं आणि काही तरी प्रश्न विचारला. मला उत्तर माहीत नव्हतंच. मी त्याबद्दल माझ्या मैत्रिणीला विचारलं. ती म्हणाली, "हां, मी तुला सांगायला विसरले. ही पोरं मुद्दाम कुठल्याही मुलीला, स्त्रीला थांबवून आंटी म्हणण्यासाठी असे प्रश्न विचारतात."

Rajesh188 Wed, 12/07/2023 - 13:16

नाती जोडण्याचे मूळ आपल्या संस्कृती मध्येच आहे.

वयानुसार.
आजी,आजोबा,uncle, मामा, दादा,वहिनी म्हणायची जुनी पद्धत आहे.
Office मध्ये.
साहेब,मॅडम, हे रीत आहे.
पण हे सर्व आता खूप मागास समजायला काही हरकत नाही
कोणी ही असू नावाने हाक मारा.
अनोळखी असेल तर..
ये gentle man mhana.. तेच योग्य आहे.
आई वडिलांना फक्त नावाने हाक मारू नका..तेच पालन,पोषण करणारे आहेत

'न'वी बाजू Wed, 12/07/2023 - 17:37

In reply to by Rajesh188

प्रतिसादाच्या आशयाशी बहुतांशी सहमत आहे. फक्त,

आई वडिलांना फक्त नावाने हाक मारू नका..तेच पालन,पोषण करणारे आहेत

पालनपोषण करणारे असले, म्हणून काय झाले? त्या कारणास्तव नावाने हाक नक्की का मारू नये?

आणि, नावाने हाक मारणे आणि अनादर/आदराचा अभाव (किंवा, खरे तर, आदर आणि नावाने हाक न मारणे) यांचा परस्परांशी काही संबंध आहे काय? एक परंपरोद्भव कन्व्हेंशन, याव्यतिरिक्त?