ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन झालं.
वय खरं तर ८० होतं . पण वृत्ती शेवटपर्यंत प्रसन्न होती आणि सदाहरित विनोदाची देणगी होती. शिवाय कार्यरत होते. परवापरवापर्यंत लिखाण यायचं. त्यामुळे खूप लवकर गेले असंच वाटतंय.
कणेकरांच्या लेखनापासून मी दूर आलो आहे हे खरं आहे. त्यांचे आस्थाविषय आणि एकंदर सौंदर्यस्थळं यापासून हळुहळू दूर आलो. त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाशीही हळुहळू फारकत घेत गेलो. (दादर शिवाजीपार्कमधे आयुष्य काढूनही त्यांनी राजकीय भूमिका घेणं पूर्ण आयुष्यभर टाळलं असं दिसतं चूभूद्याघ्या)
मात्र ज्यांच्यावर त्यांनी भक्ती केली, प्रेम केलं त्याची जातकुळी, त्याची इंटेन्सिटी मला खूप आवडते. वयाच्या योग्य त्या वळणावर मी या स्वरूपाचं लिखाण वाचलं. रसरंग, चित्रानंद वगैरेचा जमाना. म्हणजे ७०चं दशक संपत आलं होतं आणि ८०च्या दशकाची सुरवात. त्याही आधी किमान दहापंधरा वर्ष ते लिहीत होते. इंग्रजी नियतकालिकांमधे त्यांनी नोकरी केली आणि तिथला पगार सुखवस्तू जीवनशेलीपुरता असणार. मात्र त्यांना अमाप लोकप्रियता शहरी मध्यमवर्गीय वाचक/श्रोते/प्रेक्षकांकडून मिळाली. मराठी लिखाणातून सुरवातीला चरितार्थ चालवण्याइतपत कमाई झाली असेल-नसेल. पण त्यांनी बदलत्या दशकांबरोबर स्वत:ला वेगवेगळ्या माध्यमांतून लोकांसमोर नेलं. इंग्रजी पत्रकारितेला त्यांनी निवृत्तीवयाच्या बऱ्यापैकी आधी रामराम ठोकला असावा याचं कारण म्हणजे मराठी लिखाण, ध्वनिफीती, कार्यक्रम यात ते तुफान बिझी होते. १९८५ ते सुमारे १९९५ हा त्यांच्या मराठी लोकांमधल्या लोकप्रियतेचा शिखराचा काळ म्हणूया.
माझ्यासारख्या कॅज्युअल वाचकाच्या आठवणींमधे एखाद्या लेखकाच्या लिखाणातले किमान १५-२० लेख यादगार असावेत. किमान ३०-४० विनोद लक्षात राहावेत यामधे त्या लेखकाची थोरवी सहज येते.
त्यांच्या लेखनामागचं मन प्रगल्भ होतं असं म्हणता येणं कठीण आहे. एकीकडे इन्टेन्स म्हणता येईल अशी १९५०-१९६५ या काळावरची भक्ती, नॉस्टाल्जिया, - ज्याचे प्रमुख संदर्भ अर्थातच तत्कालीन हिंदी सिनेमे आणि क्रिकेट हे होते - तर दुसरीकडे टिपिकल मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन शहरी पुरुषाच्या दृष्टीने केलेली सामाजिक टिप्पणी - असा त्यांचा साहित्यिक वावर दिसतो.
शैली हा जो घटक जवळजवळ अस्तंगत झालेला आहे ती गोष्ट त्यांच्याकडे होती आणि ती त्यांनी प्रयत्नपूर्वक विकसित केलेली होती. त्यांच्या लिखाणातच परफॉरमन्सचं प्रचंड पोटेन्शियल होतं त्यामुळे त्यांनी आपल्या वक्तृत्वाद्वारे आणि काही अर्थाने केलेल्या अभिनयाच्याही द्वारे त्याला स्टँड अप कॉमेडीचं अत्यंत यशस्वी रीतीने परिमाण दिलं ते शिकण्यासारखं आहे. तुमचा कंटेंट कमी अधिक गुणवत्तेचा असू देत, मात्र त्याचं प्रेझेंटेशन रंजकच हवं; कंटाळवाण्या गोष्टींना लोकांमधे स्थान अजिबात नाही हे त्यांनी सोदाहरण सिद्ध केलं असं मला वाटतं.
काळ खानेसुमारी करेल तेव्हा कणेकरांचं तात्कालिक स्वरूपाचं लिखाण बहुदा मागे पडेल पण सिनेमा आणि क्रिकेटबद्दलचं - विशेष करून त्यांच्या दैवतांबद्दलचं लिखाण माझ्यामते टिकणार आहे.
कणेकरांना आदरांजली.
स्टँड अप्
कणेकरांशी लव्ह आणि जास्त हेट ..असल्याने :असो.
पण त्यांचा स्टँड अप हा जगात भारी वाटला होता :) जबरी हसवणारा.
त्यांचं सिरियस लिखाणही आवडायचं - नॉस्टाल्जिया झेपत् नसल्याने बाकी टाळायचो.
मागे एकदा कणेकरांना "सारखं तेचतेच काय लिहिता" असं इमेल केलेलं तेव्हा "that means as a writer I am dead" अशी एकोळी चपराक मिळाली.
अजुन एक कारण
इंग्रजी पत्रकारितेला त्यांनी निवृत्तीवयाच्या बऱ्यापैकी आधी रामराम ठोकला असावा याचं कारण म्हणजे मराठी लिखाण, ध्वनिफीती, कार्यक्रम यात ते तुफान बिझी होते.
याशिवाय, माझ्या आठवणीप्रमाणे, पत्रकारितेत असताना त्यांनी, बांद्र्याच्या ड्राईव्ह इन मधल्या शो नंतर रात्री घरी परतणाऱ्या एका जोडप्यातल्या बायकोवर गुंडांनी पळवुन नेऊन बलात्कार केला (ज्यावर पुढे घर हा चित्रपट निघाला), अशी त्याची बातमी दिली होती. पण त्यातल्या जोडप्याने पोलिस कम्प्लेंट करायला नकार दिल्यामुळे, त्यांना ती बातमी मागे घ्यावी लागली होती आणि त्यामुळे ती नोकरी सोडावी लागली अशी त्यावेळी वदंता होती. तपशीलात काही चूक असल्यास माहीतगारांनी दुरुस्ती करावी.
खळखळून हसवणारी व्यक्ती गेली.
खळखळून हसवणारी व्यक्ती गेली. वाईट झाले. सतत दर्जेदार कंटेंट देणे कोणालाच शक्य नसते. आतापर्यंत वाचनात आलेले बहुतांश मृत्युलेख समीक्षकी वाटले. आपल्याला कणेकर पूर्णपणे आवडतात असा कोणाचा समज होऊ नये अशी खबरदारी म्हणून सर्वांनीच पूर्वीच्या जुन्या चार गोष्टींचे कौतुक करून नंतर ते कसे मोनोटनस होत गेले आणि तितकेसे उच्च राहिले नाहीत (आपण खुद्द ही मच्युअर होत गेलो) याचा आवर्जून उल्लेख केलेला आढळला. त्यात तथ्य नाही असे नव्हे. साचलेपण कोणाला चुकले? स्वभाव दोषांपासून कोणाला मोक्ष मिळाला? आपल्या स्वतःवर टीका ऐकून कोण अस्वस्थ होत नाही?
आता या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना कृतज्ञ आदरांजली. .
आदरांजली
कुणी लिहिणारं माणूस गेलं की वाईट वाटतं. त्यांचे काहीच वाचले नसल्याने कोणतीही दर्जात्मक टिपण्णी करत नाही. पण असली माणसं असावीत, त्यांना चाहणारे असावेत, त्यांची मापे काढणारे, तावातावाने भांडणारे असावेत असं मनापासून वाटतं त्यामुळं असलं कुणी गेलं की दिवस बरबाद होतो
नजीकच्या काळातलं
नजीकच्या काळातलं लेखन वाचलं नाहीये फारसं.
काही लिंका देऊ शकाल का? "या कातरवेळी" सारख्या त्यांच्या नंतरच्या काळातल्या प्रयोगांच्या सिडीज उपलब्ध आहेत का कुठे?
क्रिकेट आणि सिनेमावरच्या त्यांच्या कॅसेट्स ऐकल्या आणि मग लिखाण वाचलं. अतिशय सुरेख एकपात्री कार्यक्रम होता तो. काय विलक्षण स्मरणशक्ती! आपण नशीबवान आहोत की त्यांचं संगीताबद्दलचं लिखाण वाचताना यू-ट्यूब वर लगेच (बरिचशी) गाणी ऐकता येतात. ते लेख जेव्हा प्रसिद्ध होत होते तेव्हा ते लेख वाचणं म्हणजे माझ्यासारख्याची - ज्याने ती जादूभरी गाणी कधी ऐकलीच नव्हती - अवस्था म्हणजे चव/वास संपूर्णपणे हरपल्यावर जेवायला बसावं तशी होत असणार. पोळी काय भाजी काय कींवा त्यांचं प्रिय आंबट वरण काय, एकच निर्गुण अनुभव!! Mr Kanekar, you are gone and you are around...
नजर तयार झाली...
कणेकरांमुळे चित्रपटांकडे, चित्रपट गीतांकडे बघायची नजर तयार झाली.
मुळात मराठीची गोडी कळली ती मैट्रिक झाल्यानंतर...
शहराच्या एका वाचनालयात मटा दिसला... त्यात पूर्ण पानभर लेख होता... शीर्षक होतं-'अभी तो मैं जवान हूं...' (लेखक कोण हे आजपर्यंत माहीत नाही...कुणी सोंगू शकेल का...?)
तो लेख वाचायलाच तब्बल दोन दिवस लागले... कारण मराठी वाचनात तेव्हां गती नव्हती...
त्याच आठवडयातील शनिवारच्या मनोरंजन पुरवणीत अशोककुमार, राजकपूर, नरगिसच्या बेवफा चित्रपटाबद्दल अर्ध पान भरुन लेख होता प्रकाश जोशींचा.
कुतूहल म्हणून लायब्रेरियन कडून गेल्या आठवडयातील पुरवण्या शोधून काढल्या... आणि उडालोच...
जुन्या चित्रपटांवर प्रकाश जोशींचं यादें सदर येत असे... तिथे जितके लेख सापडले घेऊन आलो... (लाइब्रेरियनने 25 रुपए घेतले.)
तिथेच कळलं की मटा इथे कुठे सापडेल... लगेच पेपर सुरू केला...
त्यात कणेकर लिहायचे... (हे नंतर कळलं.)
इथे कणेकरांच्या लेखनशैलीची ओळख झाली आणि ती शैली आवडली देखील.
कारण चित्रपट आणि क्रिकेट माझ्या देखील आवडीचे विषय.
मुळात रेडियो सीलोनवरील सकाळी साडे 7 वाजता येणारया पुरानी फिल्मों का संगीत चा नियमित श्रोता असल्यामुळे कान चांगलेच तयार झाले होते.
त्यात मटा सापडला... त्यात कणेकर वाचतांना मजा येत असे...
पूर्वी ऐकलेल्या गाण्यांचे किस्से... त्याच चित्रपटांतील फारसं न गाजलेल्या गीता बद्दल माहिती... हे सगळं पहिल्यांदाच वाचायला मिळे...
जरी चित्रपट हिंदी असले तरी तयाबद्दल हे कणेकर इतकं मस्त किस्सा सांगायचे की बस्स... त्या मुळे ते फारसं न गाजलेलं गीत ऐकण्याची इच्छा व्हायची.
क्रिकेट कडे बघण्याची नजर देखील कणेकर आणि संझगिरी यांच्यामुळे मिळाली...
कारण हिंदीत इतकं रोखठोक कधीच वाचायला मिळालं नव्हतं...
मग कणेकर आवडू लागले...
आज देखील माझ्या संग्रही असलेली मटातील त्यांच्या लेखांची कात्रणं कधी कधी हातात आली की पूर्ण वाचून झाल्याशिवाय ठेवल्या जात नाहीत...
लोकप्रभा मधे हकूनामटाटा असाच दीर्घ लेख आहे...
कणेकरांना भावपूर्ण आदरांजली.