प्ले इट ॲज इट लेज - जोन डिडियन

Play it as it lays

१९५७ साली, जॅक केरूआकची 'ऑन द रोड' ही कादंबरी प्रसिद्ध झाली. अमेरिकन साहित्यातल्या थोर कादंबऱ्यांच्या अनेक याद्यांत ही कादंबरी आहे आणि ती अनेक कारणांनी महत्वाची आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेत 'बीट' पिढी (beat generation) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणांच्या आयुष्याची झलक या कादंबरीत बघायला मिळते. कादंबरीचे दोन नायक - सॅल पॅरडाईज आणि डीन मोरियार्टी - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्ट्यांदरम्यान प्रवास करत स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतात. या कादंबरीत अमेरिकेतल्या विविध राज्यांची अतिशय मोहक वर्णनं येतात. अनेक अस्तित्ववादी कादंबऱ्यांप्रमाणेच ही वाचताना अनेकदा आपण कुठेतरी भरकटत चाललो आहोत अशी भावना येते. पण असं वाटून कंटाळा येईपर्यंत एखादं सुंदर वर्णन किंवा एखादं साक्षात्कारी वाक्य वाचायला मिळतं, आणि आपण वाचत राहतो. बीट पिढीतल्या लेखकांनी त्यांच्या साहित्यातून आणि त्यांच्या जगण्यातून अनेक प्रस्थापित नियम मोडले. कवितांचा साचा मोडून यमकाचे किंवा आशयाचे कोणतेही ठरलेले नियम नसलेली कविता या पिढीनं रूढ केली. समलिंगी व्यक्ती त्यांच्या लैंगिकतेविषयी खुलेपणाने बोलू लागल्या. आधी ज्याला लैंगिक स्वैराचार म्हणलं जाई, तो आत्मशोध घेण्याचा मार्ग आहे अशी या पिढीची धारणा होती. शिवाय, आपल्या मनालाही आपल्याला जागृतावस्थेत जाणवतात त्यापेक्षा जास्त मिती आहेत असं या पिढीचे अनेक तत्वज्ञ मानू लागले. आपण नक्की कोण आहोत हे शोधून काढण्यासाठी म्हणून वेगवेगळ्या रसायनांच्या मदतीनं स्वतःच्याच मानाचं पर्यटन या पिढीतले लोक करू लागले. अल्डस हक्सलेचं मेस्कॅलीनवरील प्रयोगांवरचं 'द डोअर्स ऑफ पर्सेप्शन' या काळातलं एक महत्वाचं पुस्तक होतं, ज्याचा या पिढीच्या अमली पदार्थांच्या आकलनावर परिणाम झाला. या पुस्तकातूनच 'द डोअर्स' या रॉकबॅन्डनं त्यांच्या नावाची प्रेरणा घेतली.

मुक्त लैंगिकता, रसायनं वापरून केलेलं मानाचं अवस्थांतर आणि लग्न आणि कुटुंब व्यवस्थांच्याविरोधातली भूमिका - ही या पिढीची व्यवच्छेदक लक्षणं म्हणता येतील. तसंच, जॅझ संगीत आणि पुढे साठच्या दशकातलं सायकेडेलिक रॉक या सगळ्यांवर या पिढीचा प्रभाव आहे. युद्धखोरीला विरोध, नशा उत्पन्न करणाऱ्या रसायनांचा सर्रास वापर, मुक्त लैंगिकतेमुळे मिळणारं स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, सिव्हिल राईट्स चळवळ - हे सगळं एका पाठोपाठ एक झपाट्यानं या दशकात होत गेलं. त्याचे परिणाम समाजावर, संगीतावर, सिनेमावर झाले.

पुरुषाचं शील त्याच्या खंबीरपणावरून, बायका-मुलांची काळजी घेण्यावरून, देशभक्तीवरून ठरवणाऱ्या देशात, बीट कवींनी आणि लेखकांनी हरवलेले, कोणतीही जबाबदारी न घेणारे, कवीमनाचे आणि गांजाच्या तारेत असलेले पुरुष आत्मशोधाच्या वेष्टनात गुंडाळून लोकांना दिले. हे वाक्य लिहिल्यावर, ते लिहिताना माझ्या मनात काहीसा कडवटपणा असल्याची जाणीव मला झाली. तो कडवटपणा या कादंबरीबद्दल नक्कीच नाही. 'ऑन द रोड' मला आवडलेल्या कादंबऱ्यांपैकी एक आहे. ती मी दोन-तीन वेळा वाचली आहे. त्यातले काही परिच्छेद आठवून ती अजूनही कधीतरी उघडली जाते. पण 'पुरुषांनी लिहिलेल्या अस्तित्ववादी कादंबऱ्यांमधले स्त्रियांचे स्थान' असा निबंध मला कुणी लिहायला सांगितला तर मी लिहायची कधीच थांबणार नाही इतकं मला म्हणायचं असेल!

"कुणीही मला बांधून घालू शकत नाही" - असं काही ब्रीदवाक्य घेऊन अनेक रोडट्रिप झाल्या. बांधून घालणाऱ्या, पकडून ठेवणाऱ्या स्त्रियांना मागे सोडून त्यांच्याबद्दल रस्त्यात मध्येच कुठेतरी थांबून रोमँटिक होणारे पुरुष, मला कादंबऱ्यांतूनही सहन होत नाहीत. १९७३ साली लेनर्ड स्किनर्ड (Lynrd Skynyrd) नावाच्या रॉकबँडचं 'फ्री बर्ड' नावाचं असंच एक गाणं आलं. आपल्या (कदाचित तात्पुरत्या) प्रेयसीला मागे सोडून जाणाऱ्या पुरुषाचं मनोगत त्या गाण्यात आहे. ते जेव्हा अनेक वर्षांपूर्वी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझ्यातली पुणेरी काकू जागृत होऊन, "तुम्हाला कुणीही थांबा म्हणालं नाहीये इथे. गाऊ नका उगीच. निघा!" असा टोमणा त्या गाण्याला तात्काळ मारल्याचं आठवतं आहे.

खरंतर १९६० च्या दशकांत अमेरिकेत सिव्हिल राईट्स आणि स्त्रीवादी चळवळींनीही जोर धरला होता. त्याच दरम्यान झालेल्या व्हिएतनाम युद्धामुळे युद्धविरोधी चळवळही सुरु झाली. अमेरिकन समाज अधिकाधिक व्यक्तिकेंद्री होऊ लागला. बीट पिढीच्या पुढची पिढीदेखील ठाशीव समाजव्यवस्थांच्या, युद्धखोरीच्या विरोधात आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने उभी राहिली. या 'हिप्पी' पिढीनं रॉक संगीत, एलएसडीसारखे अमली पदार्थ, योगासनं आणि ध्यानधारणा अश्या अजब गोष्टी एकत्र आणल्या. या पिढीच्या नाकर्तेपणातच त्यांचं बंड होतं. एकीकडे समाज समतेच्या दिशेने जात होता तर दुसरीकडे तरुण पिढीच्या या अशा बंडखोरीने अराजक माजलं होतं. स्वतःवर कोणतीच बंधनं घालून न घेणारं व्यक्तीस्वातंत्र्य खरंच मुक्त करणारं असतं का? आधीच्या समाजव्यवस्थांनी मांडून दिलेले पाट, घालून दिलेले रस्ते झुगारून दिल्यावर समोर दिसणाऱ्या पायवाट नसलेल्या माळरानावर चालायला कुठून सुरुवात करायची? आपण कोण आहोत, आपल्याला काय हवं आहे, आपल्या आयुष्याचा अर्थ काय - अशा व्यक्तिकेंद्री प्रश्नांची उत्तरं शोधणं, आणि त्यात आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटणं पुरुषांना सहज शक्य होतं.याचं कारण कदाचित त्यांच्या जडणघडणीनं त्यांना दिलेल्या एकटं राहण्याच्या आत्मविश्वासात असावं.कुटुंब व्यवस्थेत पुरुषांवर अवलंबून राहत आलेल्या स्त्रियांसाठी, आणि विशेषतः त्यांच्या वयात आलेल्या मुलींसाठी मात्र अशा प्रकारचं व्यक्तीस्वातंत्र्य गोंधळवून टाकणारं होतं.

धर्माचं, कुटुंबाचं किंवा समाजाचं असं कुठलंच ठळक बंधन नसलेल्या स्त्रीसाठी हा काळ कसा होता ते जोन डिडियन या लेखिकेनं 'प्ले इट ॲज इट लेज' या १९७० सालच्या अस्तित्ववादी कादंबरीत उभं केलं आहे. कादंबरीची नायिका मारिया, मानसिक विकारामुळे कोसळून गेल्यानं एका इस्पितळात दाखल झालेली असते. तिथेच, तिच्या डोळ्यासमोरून तिचं आयुष्य तरळून जातं, आणि तिच्या काहीशा खजील होऊन केलेल्या पण थंड कथनातून ती तिची गोष्ट सांगते. तारुण्यात हॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेचं काम केलेल्या, पस्तिशी ओलांडलेल्या मारियाला आता मनासारखं काम मिळेनासं झालेलं असतं. एक घटस्फोट होऊन, तिच्या दुसऱ्या, दिग्दर्शक नवऱ्याच्या घरात ती राहत असते. तिचं लग्नही नावापुरतंच असतं आणि तिच्या आयुष्यात अनेक प्रियकरांची ये-जा असते. तिच्या मतिमंद मुलीची नीट काळजी घेतली जावी म्हणून तिला एका संस्थेत ठेवण्यात आलेलं असतं. मारियाचा जीव मुलीसाठी सतत तुटत असतो आणि तिला त्या संस्थेतून बाहेर काढायच्या अनेक क्लुप्त्यांचा विचार ती करत असते. आपल्या आयुष्याला काही लय नाही, काही दिशा नाही, कसला आधार नाही या जाणिवेनं ती हळूहळू बधिर होत गेलेली असते. घरातल्या सगळ्या गरजा नवऱ्याच्या पैशानं पूर्ण होत असतात पण त्या पलीकडे रोज उठून ज्यासाठी तयार व्हावं असं तिच्याकडे काहीच नसतं. आपल्याला काही एक दिनक्रम असावा म्हणून मारिया रोज सकाळी कॅलिफोर्नियातल्या ठराविक महामार्गांवरुन सुसाट गाडी चालवत एका ठरलेल्या क्रमाने परत घरी येत असते. अधूनमधून काही आजी-माजी प्रियकर तिच्या आयुष्यात डोकावून जातात, तेवढीच काय ती तिला सोबत असते.

सिनेमाजगतातील लोकांचा भावनिक उथळपणा, कामं मिळवण्यासाठी घडणारी स्पर्धा, चढाओढ, श्रीमंत लोकांच्या घरी होणाऱ्या पार्ट्यांमधले मानापमान - या सगळ्या बारीकसारीक, पण नेटक्या तपशिलांमुळे मारियाच्या आयुष्यातच आपण सहभागी झालो आहोत असं वाटायला लागतं. पहिली तीन प्रकरणं नेमकं काय चाललं आहे ते कळलं नाही. पण हे वाचत राहावं असंही वाटत राहिलं. डिडियन कुणी थोर लेखिका आहे असं काहीच मला आधी माहिती नव्हतं कारण हे पुस्तक अमेझनवर, "पीपल हू बॉट धिस ऑल्सो बॉट" या यादीत दिसलं म्हणून मी ते घेतलं. त्यामुळे केवळ पूर्वग्रहामुळे चिकाटीनं वाचन करायचा हा प्रकार नव्हता. डिडियनची लेखनशैली वेगळी आहे. ती अनेक वर्षांच्या पत्रकारितेतून तयार झाली आहे. मारियाचं आयुष्य जितकं दिशाहीन आहे तितकंच डिडियनचं लेखन चपखल, चोख आणि विचारपूर्वक केलेलं आहे. प्रत्येक वाक्य नीट तपासून, झटकून मजकुरात घातलं आहे याची जाणीव पहिल्या काही पानांतच होते.

हेमिंग्वे डिडियनचा आदर्श होता. त्याच्या कादंबरीतले परिच्छेद उतरवून तिनं लेखनाचा सराव केला असं नंतर तिच्याबद्दल वाचत असताना समजलं. हेमिंग्वेच्या शैलीतली लहान वाक्य, सोपे पण थेट अर्थ सांगणारे शब्द, पात्रं काय विचार करतात हे थेट सांगण्यापेक्षा, त्यांच्या कृतीतून वाचकांना त्यांच्या विचारांचा अंदाज यावा असं लेखन - या सगळ्या गोष्टी डिडियनच्या शैलीत सापडतात. पण त्याव्यतिरिक्त, प्रकर्षानं जाणवणारी तिची अशी एक बाब म्हणजे एखाद्या टोकदार भावनेबद्दल लिहिताना डिडियन ती बोथट करून लिहिते. उदाहरणार्थ: मारियाला तिच्या एका प्रियकराकडून दिवस जातात. ते मूल तिच्या नवऱ्याला नको असतं. त्यावरून त्या दोघांमध्ये अनेक दिवस संघर्ष होतो आणि मग एका गर्भपात करून देणाऱ्या बेकायदेशीर, घरवजा जागेत ती एकटी जाऊन गर्भपात करून येते. त्या गर्भपाताच्या थंड, बोथट तरीही तपशीलवार वर्णनामुळे तो प्रसंग अधिक भेदक झाला आहे. त्याची सुरुवात बँकेतून हजार डॉलर नकद काढण्यापासून होते. कॅशियरचं, एवढे पैसे या बाईला का हवे असतील म्हणून संशयानं बघणं, मग ठराविक ठिकाणी एका अनोखळी पुरुषाची वाट बघत उभं राहणं; आपली गाडी लावून त्याच्या गाडीतून गर्भपाताच्या ठिकाणी पोहोचणं; तिचं एकटं असणं आणि त्यानंतर येणारं प्रत्यक्ष गर्भपाताचं वर्णन - या सगळ्यातली मूळ मुद्दा सोडून असलेली निरर्थक वाटावीत अशी वर्णनं, तिची मनःस्थिती उलट अधिक ठळकपणे दाखवतात. एखादी नको असलेली पण आवश्यक अशी वैद्यकीय प्रक्रिया जेव्हा बेकायदेशीरही असते तेव्हा ती करून घेणाऱ्या व्यक्तीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे मारियाच्या प्रत्येक हालचालीतून लक्षात येत जातं आणि वाचक, तिला ते मूल नक्की हवं आहे किंवा नको आहे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्या व्यवस्थेतील जीवावर बेतू शकणाऱ्या धोक्यांकडे बघू लागते.

डिडियनच्या लेखनाचं आणखी एक बलस्थान, तिच्या कॅलिफोर्नियाच्या विविध भागांच्या वर्णनांत आहे. अगदी मोजक्या शब्दांत ती आपल्याला श्रीमंत, सिलीब्रीटी कॅलिफोर्नियातून डेथ व्हॅलीच्या आसपास राहणाऱ्या ट्रेलरमधल्या गरीब लोकांकडे घेऊन जाते. तिच्या पत्रकारितेचा बराचसा काळ तिनं कॅलिफोर्नियातच घालवला असल्यानं तिची वर्णनं सहज आहेत. 'स्लाउचिंग टुवर्ड्स बेथलहेम' नावाचं तिनं लिहिलेल्या निबंधांचं पुस्तक केवळ या कारणासाठी वाचनीय आहे. कॅलिफोर्नियातले विविध भाग, तिथे राहणाऱ्या माणसांची संस्कृती, त्यांतले सूक्ष्म फरक तिच्या निरीक्षणामुळे, एका नव्या अर्थानं आपल्या लक्षात येतात. त्या काळात उदयाला आलेल्या 'न्यू जर्नलिझम'चं 'स्लाउचिंग टुवर्ड्स बेथलहेम' हे एक उदाहरण आहे. पत्रकारानं लिहिताना फक्त तथ्य मांडावीत या रूढ पद्धतीच्या विरोधात जाऊन, घडलेल्या घटनांचं व्यक्तिनिष्ठ विश्लेषण काही पत्रकार करू पाहात होते. डिडियनचं बरंचसं नॉन-फिक्शन या प्रकारात मोडणारं आहे.

ऐंशीच्या दशकात, जगाच्या दुसऱ्या टोकावर जन्माला आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला साठ आणि सत्तरच्या दशकातील अमेरिकेचं - विशेषतः कॅलिफोर्नियाचं, त्या काळच्या रॉक संगीतामुळे एक वेगळंच आकर्षण होतं. पण डिडियनचा निबंध वाचून त्या पिढीची दिशाहीनता अंगावर येते. त्यातले अनेक सामाजिक, राजकीय मुद्दे - अगदी स्थानिक पातळीवरचेही - वाचून लक्षात येतं की हा काळ अमेरिकेसाठी किती क्रांतिकारी होता. नव्वदीत वयात आलेल्या - अमेरिकन संस्कृतीचं, संगीताचं, सिनेमाचं आकर्षण असलेल्या पिढीनं व्यक्तीकेंद्री समाजाचं गोंडस रूप आधी बघितलं. आमच्यावेळी, लग्न न करता, कुटुंबाबरोबर न राहता मित्र मैत्रिणींबरोबर राहणारी, कमावती स्वतंत्र पात्र आम्ही टीव्हीवर बघितली. न्यू यॉर्कमधलं एखादं कॉफीशॉप ज्यांचा अड्डा आहे असे, आपल्यापुरती पैशांची, घराची आणि शारीरिक सोबतीची सोय करून बराचसा वेळ निरुद्देश टवाळक्या करण्यात घालवणारे जेरी, जॉर्ज, इलेन आणि क्रेमर आम्हाला 'कूल' वाटायचे (असंच काही रेचल, मॉनिका, फिबी इत्यादींबद्दलही म्हणता येईल). या लोकांच्या आयुष्यात कधी देव आलाच तर तो विनोद म्हणून येतो. हे लोकही प्रेमातल्या भावनिक गुंतवणुकीपासून पळून जाणारे आहेत पण यांचं पैशानं खरेदी करता येण्यासारख्या वस्तूंवर प्रेम आहे. आपल्याला चांगलं आयुष्य जगायला पुरेसा पैसा हवा हे त्यांना पटलेलं आहे. कुटुंबाची जागा मैत्र घेऊ शकतात आणि आपल्या सुख दुःखात सहभागी होणारे जिवाभावाचे लोक निखळ मैत्रीच्या नात्याचे असू शकतात हा आत्मविश्वास आम्हाला या पात्रांनी दिला. त्याच काळात आलेल्या ‘सेक्स अँड द सिटी’ सारख्या काही मालिका, लेनर्ड स्किनर्डचं 'फ्री बर्ड' कुणी स्त्री गात आहे असं वाटायला लावणाऱ्या होत्या. ईट-प्रे-लव्ह सारखे एकट्या स्त्रीच्या आत्मशोधाचे प्रवासही आम्ही बघितले. हे सगळं विशीत किंवा त्याआधीच बघितलेल्या पिढीतल्या स्त्री-पुरुषांसाठी डिडियनचं 'प्ले इट ॲज इट लेज' महत्वाचं आहे.

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

सई, हा निबंध खूपच आवडला. पुस्तकाच्या निमित्तानं लिहिलेला निबंध.

अवांतर - १. इराकवर अमेरिकनं (दुसऱ्यांदा) हल्ला करण्याला २० वर्षं झाली या निमित्तानं नोम चॉम्स्कीची मुलाखत आजच वाचली. त्यात तो व्हिएतनाम युद्धाची आठवण काढतो. अमेरिका बहुतेक काळ युुद्ध्यमानच असते, असं जिमी कार्टरचं विधानही त्याच मुलाखतीत वाचलं. व्हिएतनाम युद्धाला अमेरिकी नागरिकांनी विरोध करायला खूप उशिरा सुरुवात केली असंही तो म्हणतो.

२. या गाण्यांच्या तू केलेल्या वर्णनामुळे मला ॲलिसन क्राऊसचं 'द लकी वन' गाणं आठवलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.