कॉलेजचं पहिलं वर्ष. पावसाळी दिवस. चहा. मुंबईचा पाऊस. ऑफ पिरियड. लायब्ररी बर्यापैकी रिकामी आहे. सहज कवितांच्या सेक्शनमधे मी गेलो आहे.
पॉप्युलर प्रकाशनाने १९६० आणि १९७०च्या दशकात काढलेले नव्या कवींचे कथासंग्रह. रजनी परुळेकर, ग्रेस आणि ना. धों. महानोर. या पुस्तकांच्या पहिल्यावहिल्या आवृत्तीला तोवर वीसेक वर्षं होऊन गेलेली आहेत.
शाळेत परीक्षेला कविता होत्या; पण आपणहून चाळताना अभावितपणे हाती लागलेल्या ह्या पहिल्यावहिल्या कविता बहुदा. (मंगेशकरांनी केलेली ग्रेसची गाणी नुकतीच आलेली आहेत. जैत रे जैतला मात्र दहा बारा वर्षं होऊन गेलेली आहेत.)
"रानातल्या कविता" चाळताना उभा असलेला मी तिथेच रेंगाळतो. संग्रहाच्या मागे कवीचा एकदम रांगडा वाटावा असा फोटो.
मन चिंब पावसाळी झाडात रंग ओले ।
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले ॥
पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी |
शिडकाव संथ येता झाडे निळी कुसुंबी||
घरट्यात पंख मिटले झाडात गर्द वारा |
गात्रात कापणारा ओला फिका पिसारा ||
या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे ।
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे ॥
रानात एककल्ली सुनसान सांजवेळी ।
डोळ्यात गल्बताच्या मनमोर रम्य गावी ॥
केसात मोकळ्या या वेटाळुनी फुलांना |
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे||
मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले ।
त्या राजबन्सी कोण्या डोळ्यात गुंतलेले ॥
ही कविता पहिल्यांदा वाचताना असं जाणवत आहे की आज आपल्याला आपलं स्वतःचं असं काहीतरी नवं मिळालं. अभावितपणे सापडलं.
नंतरच्या वर्षांमधे त्यांची आधी ऐकलेली गाणी पुन्हा ऐकली. त्यानंतरच्या वर्षांमधे नवी गाणीही आली. त्यांचाही आनंद घेतला. जैत रे जैतच्या गाण्यांनी ज्या असंख्य लोकांना वेडं केलं असेल त्यांच्यात मीही सामील झालो. पुढे लावण्या ऐकल्या. महानोरांच्या आमदारकीबद्दल वाचलं. गाणी ऐकत राहिलो. कविता वाचत राहिलो अधूनमधून.
... पण आजही तो लायब्ररीमधला क्षण आठवतो. लायब्ररीच्या ग्रिलच्या बाहेर पडत असलेला पाऊस आठवतो. आपण त्या क्षणाच्या आधी वेगळे होतो आणि त्यानंतरचे थोडे वेगळे झालो ही अशरीरी जाणीव आठवते.
'रानकवी' आणि निसर्गकवी अशी ओळख असणारे आणि अनेक पिढ्यांना रानाची सफर आपल्या शब्दांच्या मार्फत घडवणारे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांच्या मृत्युची बातमी आलेली आहे. ते ८१ वर्षांचे होते.
ना. धों. महानोर यांना आदरांजली वाहतो. मी त्यांच्याप्रती सदैव कृतज्ञ राहीन.
चार चांदण्या दिल्यात
चार चांदण्या दिल्यात . पाचवी तपशिलात लिहिल्यावर मिळेल
"चार चांदण्या दिल्यात" ...... कुठायत त्या?
...... कुठायत त्या?
"मी बघताय हां वाश्या, मी बघताय" !!
महानोर हे एक अद्वितीय कवि
महानोर हे एक अद्वितीय कवि होते. त्यांची शब्दकळा बालकवि, कुसुमाग्रजांच्या तोडीची पण कल्पना सर्वस्वी स्वतःच्या.